अनेकदा जंगलात वन्यजीवांच्या अभ्यासानिमित्त भटकंती होते. ती अर्थातच हवीहवीशी असते. शहरातल्या कोंदटलेल्या वातावरणातून मोकळा श्वास घेण्याची ती एकमेव संधी असते. हिरवाईमध्ये लपेटलेल्या वनचरांच्या विश्वात आम्ही थोडीफार ढवळाढवळ करत असतो. वन्यजीव संशोधक व अभ्यासक असणा-या मंडळींसमवेत जंगलात जाण्याचा, निरीक्षणाचा अनुभव अनेकदा मिळतो. यावेळी पक्षी-प्राण्यांना कसं पाहावं याचेही काही नियम कळतात.
कोणत्याही राष्ट्रीय उद्यानात सहल गेल्यावर अनेकांना प्रश्न पडतो तो म्हणजे नेमकं काय पाहायचं याचा. प्राणी पाहणं व पक्ष्याचं निरीक्षण करणं यात उत्साह तेवढाच असला तरी खूप फरक आहे. दोघांमध्ये एक समानता आहे ती म्हणजे, खूप संयम इथे पाळावा लागतो. त्याशिवाय काहीच शक्य नाही. तुम्हाला कोणत्या प्रकारचे वन्यजीव पाहण्यात रस आहे ते ठरवावं लागेल अथवा त्या व्यतिरिक्त फक्त वनस्पतीविश्वाचा अभ्यास करायचा आहे का हेही ठरवावं.
तुमचा उद्देश स्पष्ट झाला की सहलीचा आनंद अधिक जाणीवपूर्वक घेता येतो. त्या अनुषंगाने तुम्ही वन्यजीव सहलीवर जाणार असाल तर काही गोष्टी जरूर लक्षात ठेवा. हे नियम नाहीत; पण ती तुमची जाण आहे असं म्हणता येईल. या गोष्टी तुम्ही आत्मसात करू शकत असाल तर एक चांगला वन्यजीवप्रेमी म्हणून तुमचा विकास होतोय असं म्हणता येईल.
साप पकडणा-या तज्ज्ञांचं निरीक्षण करा. त्याला किती वेळ पकडून ठेवायचं, कसं पकडायचं याचे काही नियम असतात. कोणत्याही वन्य प्राण्याच्या अभ्यासासाठी निरीक्षण करताना त्याचे काही नैतिक नियम पाळावे लागतात. वन्य प्राण्यांचा अभ्यास करताना हे नियम शिकवले जातात. त्यानुसारच पक्षी-प्राण्यांचा अभ्यास केला जातो.
काही वेळा वन्यजीव संशोधकांसमवेत जंगलात जाण्याची संधी मिळते. तेव्हा हे निसर्गाचे अभ्यासक व सामान्य पर्यटक यातील महद्अंतर पाहून मला नेहमीच दु:ख वाटतं. आश्चर्यही वाटतं. महत्त्वाचे संशोधन करताना जर वन्यजीव संशोधक एवढी काळजी बाळगत असतील तर आपल्यासारख्या सामान्य पर्यटकांनी व वन्यजीवप्रेमींनी जंगलात किंवा प्राणिसंग्रहालयामध्ये प्राणी पाहायला गेल्यावर अशी काळजी का घेऊ नये. प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पाहण्याचा आनंद काही वेगळाच असतो.
प्राणिसंग्रहालयातील प्राणी पाहताना तो अजिबात मिळत नाही. त्यासाठी लहानशा वनक्षेत्राला बंदिस्त करून त्यात प्राण्यांना मोकळं सोडलं जातं. हा एखाद्या शेजारी शेजारी पिंजरे मांडून ठेवलेल्या अगतिक प्राणिसंग्रहालयापेक्षा बरा प्रकार असतो. आपल्याकडे बंगळुरूचं बाणेरगट्टा बायॉलॉजिकल पार्क, धरमशाला व पालमपूरपासून जवळ असलेलं गोपालपूर झू, भोपाळचं वनविहार ही अशी काही वनउद्यानं पाहण्यासारखी आहेत.
देशात अजून अशी बरीच वनउद्यानं आहेत. परंतु कुठेही वन्यजीवन पाहायला जाताना काही नियम पाळावेत असं मला जरूर वाटतं. वास्तविक निसर्गात गेल्यावर शहरातल्यासारखा धांगडधिंगा बंद करून त्याच्या कलाने गोष्टींचं निरीक्षण करावं.
प्रथम जंगलात जाताना तुम्ही कोणत्याही नैसर्गिक संकटाला किंवा प्रत्यक्ष त्या प्राण्याला घाबरणार नाहीत तसंच आरडाओरडा करून त्या प्राण्याला घाबरवणार नाहीत हे मनाशी ठरवावं लागेल. याचा चांगला प्रत्यय मला सुंदरबनला आला. बोटीवरची लहान मुलं काठावर पहुडलेली मगर दिसली की आधीच ओरडायला सुरुवात करत व मगर वेगात पाण्यात नाहीशी होत असे.
अन्यथा बोट नदीतून जात असताना मगर न घाबरता सुस्त पडून राहू शकते. लक्षात ठेवा की प्राण्यांच्या रूपात अरण्याचे तुमच्यावर असंख्य डोळे रोखलेले असतात. तुमच्या बारीकसारीक हालचालींची तिथे नोंद होत असते. तुम्ही एखाद्या ठिकाणी पोहोचण्याच्या आधी तुमचा वास, आवाज हे त्या प्राण्यापर्यंत पोहोचलेले असतात. त्यामुळे एखादा प्राणी पाहायचा असेल तर अंगात स्तब्धता बाणवायला शिकलं पाहिजे. परंतु प्राणी पाहायच्या उत्साहात कोणत्याही अनोळखी जागेत उतरून तिथे हात लावू नका.
विशेषत: प्राणी व वनस्पतींची माहिती नसेल तर हे धाडस करूच नका. दुसरं म्हणजे प्राण्यांपासून योग्य ते अंतर राखा. काझिरंगाच्या जंगलात गेंडा मादी व पिल्लांजवळ जीप घेऊन जाणा-या पर्यटकांना याचा अनुभव अनेकदा येतो. वाघ किंवा गेंडयासारखा आक्रमक प्राणी पिल्लांना धोका आहे असं दिसल्यास हिंसक होऊ शकतो. मग अशावेळी प्राणी सरळ जीपवर चार्ज करतात.
हत्तींच्या बाबतीतही अनेक अभ्यासकांनी हा अनुभव घेतलेला आहे. जंगलामध्ये गेल्यावर कधीही स्वत:चा माग ठेऊ नका. खाद्यपदार्थ खाऊ नका आणि प्राण्यांनाही देऊ नका. रणथंबोरसारख्या जंगलात रुफस ट्री पाय पक्ष्यांना पर्यटकांनी खायला घालण्याची इतकी सवय झालेली आहे की ते आता चक्क पर्यटकांच्या खांद्यावर येऊन बसतात व खाण्याच्या वस्तू पळवतात.
अरण्यात दोन वन्यजीवांमध्ये एखादी गोष्ट सुरू असेल तर त्यात अजिबात हस्तक्षेप करू नये. वाघांच्या मेटिंगच्या वेळेस अनेक फोटोग्राफर्सनी त्यांच्या प्रणयात व्यत्यय आणून फोटो काढण्यात धन्यता मानलेली आहे. हे नंतर त्यांच्या फेसबुकवरील पोस्टवरून कळतं. हाच प्रकार अन्य प्राण्यांबाबतही घडतो. आम्ही एकदा ताडोबामध्ये असताना पोपटाचं पिल्लू घरटयातून खाली पडलेलं पाहिलं.
मात्र आम्ही त्याला वर उचलून ठेवलं नाही. कारण तो आमचा हस्तक्षेप झाला असता. नागझिरामधून फिरत असताना माकडाचं एक नवजात पिल्लू अचानक आमच्या जीपसमोर पडलं, त्याबरोबर त्याच्या कुटुंबीयांचा जोरजोरात कलकलाट सुरू झाला. आम्ही जीप थांबवली व वाट पाहू लागलो. इतक्यात एका प्रौढ माकडीणीने खाली झेप घेऊन ते पिल्लू उचललं व त्याच्या आईला नेऊन दिलं. प्राणीविश्वात काय नियम असतात, हे जग कसं असतं हे अशा अनुभवातून कळतं.
अरण्यात फिरायचं असेल तर नेहमी त्या अरण्याबद्दल माहिती घेऊन जा. त्यामुळे ते कळायला अधिक मदत होईल व गंमतही वाटेल. शिवाय एखादा विशिष्ट प्राणी वा प्रजातीसाठी तुम्ही जात असाल तर त्यासंबंधी तुमचा अभ्यास पक्का पाहिजे. अन्यथा तो जीव समोर आला तरी तुम्हाला कळणार नाही अशी गत ओढवेल. प्राण्यांचा माग काढताना त्यांच्या सवयीचा अभ्यास केलेला असेल तर उपयोग होतो.
वन्यजीवनाचं निरीक्षण करायचं असेल तर आळस दूर ठेवा. कोणत्याही वेळी जागं राहण्याची आणि तेही संयमाने राहण्याची तयारी ठेवा. कारण बरेचसे प्राणी हे अंधारात बाहेर पडतात किंवा एकतर पहाटे. तेव्हा नेहमी पहाटे उठण्याची तयारी असू द्यात. फोटोग्राफर्सना तर सुंदर फोटोंसाठी विशिष्ट वेळा आवश्यक असतात. तेव्हा कंटाळा करून चालतच नाही.
जंगलातल्या हिरव्या वातावरणाशी मिळत्याजुळत्या रंगाचे कपडे घालून जाण्याचा नियम तर बहुतेक सर्वानाच माहीत असेल. तो आवश्यकच आहे. पण त्याचबरोबर तुम्हाला स्तब्ध, शांत राहता येणं हे देखील तितकंच गरजेचं आहे. केवळ तुमच्या शांत राहण्याने एखादं सुंदर अरण्यनाटयाचे साक्षीदार होण्याची संधी तुम्हाला मिळू शकते. नागझिराला असताना आम्ही रस्त्यावरून जात असताना बाजूला हालचाल पाहिली. प्राणी दिसत नव्हता म्हणून गाडी पुढे नेऊन उभी केली व पाहू लागलो.
आमच्या जाण्यानंतर तिथे चांदी अस्वल अवतरलं व त्याने त्याचं खोदकाम बिनधास्त सुरू केलं. पण आमची तिथे चाहूल होती तोपर्यंत ते तिथं आलं नव्हतं. जंगलात जाताना नेहमी योग्य ती उपकरणं जवळ ठेवा. मग त्यात कॅमेरा, स्पॉटिंग स्कोप, दुर्बीण अशी साधनं येतात. हत्तीसारख्या मोठया प्राण्याला पाहायचं असेल तर दुर्बिणीची गरज नाही, मात्र पिवळ्याजर्द गवतात दडून बसलेल्या एखाद्या वाघाला पाहायचं असेल तर मात्र ती हवीच. सोबत काय न्यायचं ते तुमचं तुम्ही ठरवा.
No comments:
Post a Comment