Translate

Friday, September 25, 2015

हिरवं स्वप्न



शहरातले प्रोजेक्ट्स तिथे असणा-या जैवविविधतेवर, हिरवाईवर वरवंटा फिरवून उदयाला येत असतात. मूठभर सिमेंटच्या ठोकळ्यांसाठी आपण आपलंच भविष्य नष्ट करतो आहोत हे लक्षात येऊनही आपल्या हावेला अंत नाही.
forestमध्यंतरी राजस्थानात भटकंती करताना हिरवळीची, झाडांची उणीव फारच भासत होती. ही उणीव राणाराम बिश्नोईसारखे कट्टर वृक्षप्रेमी भरून काढतात. नाहीतर इथे झाडं म्हणजे उगीचच हिरवा ठिपका लावल्यासारखी. परंतु आज राजस्थानच नव्हे तर इतर अनेक राज्यांमधून कधी जाताना निरीक्षण करा. याला कदाचित केरळ, तामिळनाडू, कर्नाटक वगरे दक्षिणेकडील राज्यं थोडी अपवाद असतील. पण इतरत्र हिरवे पट्टे कमी होत चालले आहेत.
दिल्लीच्या बाहेर एक लांबवर फेरफटका मारला की ठिकठिकाणी प्रोजेक्ट्स सुरू असलेले दिसतात. किती ही प्रगतीकडे मोठी झेप असं वाटून खूप सद्गदितच वाटतं.
वर्षानुवर्षे चाललेल्या, रस्ते व जमिनी अडवून बसलेल्या या (व अनिश्चित काळात पूर्ण होणा-या) सुधारणांमुळे सामान्य माणसाला भविष्यात फुलांच्या पाकळ्यांवरच झोपायला मिळणार आहे, अशी स्वप्नं दाखवली जातात. दिल्लीच कशाला अगदी मुंबई, पुणे किंवा कोणत्याही मेट्रोसिटीच्या मुख्य शहर भागाच्या पलीकडे गेलात की हेच चित्र दिसतं.
आताशा शहर नेमकं कुठपर्यंत वाढत चाललंय याचा अंदाजच येत नाही. सर्वत्र डेव्हलपर्स-बिल्डर्सची मोठंमोठी बांधकामं सुरू असतात. हजारो लोकांनी त्यात पैसे गुंतवलेले असतात. हे प्रोजेक्ट्स तिथे असणा-या जैवविविधतेवर, हिरवाईवर वरवंटा फिरवून उदयाला येत असतात. मूठभर सिमेंटच्या ठोकळ्यांसाठी आपण आपलंच भविष्य नष्ट करतो आहोत हे लक्षात येऊनही आपल्या हावेला अंत नाही.
शहरात आपण अशी सिमेंटची जंगलं उभी करतो आणि मग ताणतणाव कमी करण्यासाठी उरल्यासुरल्या हिरव्या जंगलांकडे दूरवर धाव घेतो. हिरव्या रंगाचा एक नकळत मानसिक परिणाम आपल्यावर होत असतो. तो सुखद आहे. डोळ्यांसाठी व मनासाठी देखील. स्ट्रेस बस्टर म्हणून हिरव्यागार झाडांकडे पाहा असं नेहमी मानसोपचारतज्ज्ञ सांगतात ते याचमुळे. हिरवळ, झाडे दिसली की मनाला एक प्रकारची शांतता मिळते. पण आपण तर आपल्याच मनाचं संतुलन बिघडवण्याच्या मागे लागलेलो आहोत असं एकंदरीत दिसते.
हल्ली कोकणातही फिरताना जंगलं, झाडी कमी होत चालल्याचं जाणवतं. तिथेही जंगलांची कत्तल होते आहे. हे खरं तर सोन्याची अंडी देणा-या कोंबडीवरच घाव घालण्यासारखं आहे. आज तुम्ही जो असंरक्षित जंगलाचा पट्टा पाहताय तो ५-६ महिन्यांनी तिथे असेलच याची निश्चिती देता येत नाही. मध्यंतरी एका पर्यावरणप्रेमी मित्राने जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने एका चारशे वर्षाच्या वडाच्या झाडाचा फोटो फेसबुकवर टाकला होता. त्याने ते झाड प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. तसंच ते इतरही अनेक सामान्यांनी पाहिलं असेल पण त्यांना त्याचं महत्त्व समजणं कठीण आहे. तो वड एका रस्त्याच्या कडेच्या भागात आहे. असा हा वड तोडला जाऊ नये म्हणून त्याने त्याचं ठिकाण मुद्दामहून नमूद केलं नाही. आज पर्यावरण व वृक्षवल्ली वाचवण्यासाठी एवढा बारीक सारीक विचार करावा लागतोय, याचं कारण कोरडया सुखांसाठी आपण नद्या, वृक्षराजी, पर्वत, समुद्र अशी सगळ्याचीच वाट लावत सुटलेलो आहोत. परंतु जागं होण्याची वेळ अजूनही गेलेली नाही.
अमेरिकेतील कॅलिफोर्नियासारखी आपली परिस्थिती अद्याप तरी झालेली नाही. तिथे आज गेली चार र्वष सतत दुष्काळी स्थिती आहे. हा दुष्काळ इतका भयानक आहे की कॅलिफोर्नियाचा चेहरामोहराच साफ बदलून गेलेला आहे. काही दशकांपूर्वी आपण कोकणचा कॅलिफोर्निया करायला निघालो होतो. तेव्हाची स्थिती वेगळी होती. तेव्हाचा कॅलिफोर्निया अत्यंत सुंदर व हिरवागार होता. आज कॅलिफोर्निया उजाड झालेला आहे. तिथले पाण्याचे स्त्रोत आटलेले आहेत. नद्या, तलाव, झरे, ओढे-नाले सर्व काही आटले आहेत. तिथे आता फक्त वर्षभर पुरेल इतकाच साठा उरलेला आहे. दुष्काळाचा परिणाम तिथल्या निसर्गावर झालेला आहे. याचं कारण फक्त दुष्काळातच नाही तर एकूणच पर्यावरणाशी निगडित इतर गोष्टींमध्येही आहे.
अमेरिकेतलं हे एकेकाळचं श्रीमंत राज्य, जिथे जाऊन राहण्यासाठी आपल्याकडील लोकांची धडपड सुरू असे. तिथे राहायचं म्हणजे स्टेट्स मानलं जायचं. परंतु आज कॅलिफोर्निया नष्ट होईल की काय अशी भीती वर्तवली जात आहे. तिथला निसर्ग व श्रीमंती पाहूनच कोकणासाठी कॅलिफोर्नियाचा आदर्श ठेवायची कल्पना आली होती. आज मात्र कोकणचा कॅलिफोर्निया होण्याची कल्पनाही भयावह वाटते. तसे बिल्कुल होऊ देऊ नका. नाहीतर कोकणात अद्याप थोडीफार टिकून असलेली हिरवाई देखील नाहीशी होईल आणि कोकण उजाड होईल. किंबहुना भारतातल्या कोणत्याच प्रांताचा कॅलिफोर्निया होणार नाही ही काळजी आपण आतापासूनच घेणं जरुरी आहे. आपण देखील आज त्या संकटाच्या उंबरठयावर घुटमळतो आहोत. निसर्गाचा -हास होत राहिला तर ही वेळ कोणावरही येऊ शकते. कॅलिफोर्नियाचं हे उदाहरण डोळ्यात अंजन घालणारं आहे.
आपण मात्र आपल्या हाताने पायावर कुऱ्हाड मारण्याची कामे चालवली आहेत. आज मुंबईतल्या सर्वाचंच व विशेषत: पर्यावरण व निसर्गप्रेमी संशोधक, अभ्यासकांचं आवडतं ठिकाण असलेलं धारावीचं महाराष्ट्र निसर्ग उद्यान नष्ट करून ती जागा एका खासगी कंपनीला विकण्याचे प्रयत्न मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने चालवलेले आहेत. उद्यानाचा पुनर्वकिास होईल असं सांगितलं गेलं, मात्र प्रत्यक्षात ही जमीन कंपनीच्या घशात जाण्याखेरीज काहीच चांगलं यातून निष्पन्न होणार नाहीये हे सर्वानाच माहीत आहे. अर्थातच मुंबईतील अनेक पर्यावरण व निसर्गप्रेमी संस्थांनी, माणसांनी याला जोरदार विरोध केलेला आहे. हीच अवस्था आरे कॉलनीच्या जंगलाचीही झालेली आहे.
आरे कॉलनी जंगलातच शासनाला मेट्रोसाठी कारशेड उभी करायची आहे आणि त्यासाठी इथल्या अनेक दुर्मीळ झाडांसहित सुमारे तीन हजार झाडांची कत्तल होणार आहे. हे जंगल विविध जैवविविधतेने समृद्ध आहे. हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सीमेलगतचा एक भाग आहे. आरे कॉलनीच्या या जंगल विभागाला वाचवण्यासाठी ‘सेव्ह आरे’ ही चळवळ मुंबईकरांनी उभी केलेली आहे. तिला व अशा अनेक पर्यावरण चळवळींना यश मिळो हीच प्रार्थना.
खरं तर मुंबईसारख्या बेटाला व केवळ पैशाअडक्यांच्या व्यवहारात प्रचंड गुंतलेल्या या नगरीला एका राष्ट्रीय उद्यानाचं कोंदण लाभलेलं आहे हीच केवढी सुदैवाची गोष्ट आहे. मात्र आपण मुंबईवरून ही हिरवी छाया नाहीशी करायला निघालो आहोत. अर्थात ही छाया नाहीशी झाल्यावर डोक्यावर संकटाच्या झळा तयार असणारच आहेत व कॅलिफोर्नियाप्रमाणे ती झेलायला आपली तयारी आहे काय याचा शासन-सरकारने विचार करावा. कारण कॅलिफोर्नियात दुष्काळ जरी आला तरी त्यांच्यामागे अमेरिकेचं प्रचंड ताकदवान सरकार आहे. आपल्याकडे संभाव्य उपाय काय आहेत याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे.
वास्तविक नेरळच्या सगुणाबागचे संस्थापक व प्रगतशील शेतकरी चंद्रशेखर भडसावळे म्हणतात त्याप्रमाणे आज प्रत्येकाचा एक शेतकरी मित्र असणं आवश्यक आहे. एक हिरवं शेत तर प्रत्येकाच्याच मनात असतं. परंतु आज अशी स्थिती आहे की बहुतांश शेतकरी हे शेती व्यवसाय सोडून देण्याच्या मागे आहेत. भारतासारख्या कृषीप्रधान अर्थव्यवस्था म्हणवल्या जाणा-या देशात शेतकरीच मागे हटू लागले, त्यांच्यावर अडचणींची संक्रात येऊन आदळू लागली तर भविष्यात चित्र विदारक असेल.
कृषीउत्पादन कमी झाल्यास अन्नपुरवठा वेगाने खाली घसरेल. परिणामी बाहेरील देशांकडून अन्नाची आयात करावी लागेल. मग १९६४ साली अमेरिकेकडून उसना आणलेला निकृष्ट गहू खाण्याची वेळ आली होती, तशीच वेळ पुन्हा ओढवेल. हा गहू अमेरिकेत घोडय़ांना खायला दिला जात असे असा तेव्हा प्रवाद होता. तोच घेण्याची वेळ आपल्यावर आली होती.
इथला शेतकरी संकटात सापडून शेती बंद करण्याच्या विचाराकडे वळला तर उद्या असलंच बाहेरील देशांमधून आयात केलेलं निकृष्ट अन्नधान्य खाण्याची वेळ आपल्यावर ओढवेल. ती वेळ ओढवू नये अशी इच्छा असेल तर आज आपल्यातील प्रत्येकाने इथल्या शेतक-याला हात दिला पाहिजे. पर्यावरणाचं संरक्षण व संवर्धन केलं पाहिजे.
आज फार्महाऊस म्हणजे थोडीफार शेती, फळफळावळ, ओढा किंवा नदी व या सर्व परिसरात उभं छोटं टुमदार घर अशी संकल्पना पर्यटन व्यवसायात रुजली आहे. हा कृषी पर्यटनाचा एक भाग आहे. आणि भारतासारख्या देशाला आज उत्पादक, पर्यावरण व पर्यटक या तिघांना सांभाळायचं असेल तर कृषी पर्यटनासारखा उत्तम मार्ग नाही.
पर्यटकांना कृषी पर्यटनाचं आकर्षण आहे याचं कारण आज शहरी संस्कृतीत मुरलेल्या लोकांना आपला जीवनस्त्रोत कुठून येतो हेच मुळी माहीत नाही. मासे, अन्नधान्य, फळं हे कुठून येतं, कसं निर्माण होतं हे सर्व आज लोकांना शाळकरी मुलांप्रमाणे समजावून सांगावं लागण्याची वेळ आलेली आहे. आपल्या आजूबाजूला असणारी झाडं, त्यांचे उपयोग, त्यांचं पर्यावरण साखळीतील महत्त्व हे लोकांना आज पटवून द्यावं लागतंय. हळूहळू का होईना याचे चांगले परिणाम दिसतील. राज्यातील कृषी पर्यटनात गुंतलेले शेतकरी बंधू आज आनंदाने लोकांना ही माहिती देतायत. चंद्रशेखर भडसावळे यांच्यासारख्या प्रवृत्ती निश्चितच वाढल्या पाहिजेत तर शेतकरी बांधवाला हात देणारे हजारो हात तयार होतील. अखेर यात फायदा आपलाच आहे. कारण शेतकरी तगला तर अन्नपुरवठा होत राहील व आपण तगू, आणि आपल्यामुळेच तर इथलं पर्यावरण टिकणार आहे.
Print Friendly
Tags:  |  |  |  |  | 

No comments:

Post a Comment