तंत्रविज्ञानाने काळाच्या संकल्पना बदलून टाकल्या आहेत. केवळ काळाच्याच नव्हे तर मानवी भावभावनांच्याही. एखाद्या गोष्टीची परिमाणं पूर्वी वेगळी असायची आणि आता ती वेगळी असतात. आयुष्याची वाटचाल नक्की कोणत्या दिशेने चालली आहे हे कळण्यासाठी एखाद्या प्रवासाचीही मदत होऊ शकते. म्हणूनच गरज असते ती थोडं संपर्क क्षेत्राच्या बाहेर राहण्याची.
जखामाच्या उंच शिखरावर आर्मी पोस्टवर राहत असताना रोज सकाळी एकीकडे सनिकांची कवायत सुरू असायची आणि दुसरीकडे थोडया दूर अंतरावर मी मोबाईलची रेंज मिळवण्याची झटापट करत असे. सनिकांच्या प्रमुखाचं लक्ष माझ्याकडेही असे. मी रेंज मिळवण्याच्या नादात कुठे टोकाला जाऊ नये याची काळजी त्याला होती बहुधा. मग असाच कुठेतरी एखाद्या टोकाला थोडाफार रेंजचा मिलीमीटर तुकडा मिळायचा आणि घरच्यांशी बोलणं व्हायचं.
वास्तविक खूप प्रवास करणा-या लोकांना व त्यांच्या जवळच्यांना त्यांच्या संपर्क क्षेत्राच्या बाहेर असण्याचीही सवय झालेली असते; परंतु या अचानक मिळणा-या अल्पकालीन स्वातंत्र्यातही एक गंमत असते, तिचा आस्वाद घेता आला पाहिजे. आपलं होतं काय की, आपण शहरी बेडया तोडून फारसं कुठे जाऊच शकत नाही. किंबहुना अशा साखळ्यांशिवाय आपल्याला जगणं म्हणजे अळणी वाटत असतं. मग पुढयात कितीही स्वच्छ पाण्याचा समुद्र व किनारा असो किंवा शुभ्र पर्वतराजीने लपेटलेला आसमंत असो.
आपण जिथे जाऊ तिथे पहिल्या प्रथम काय पाहतो, तर तिथे मोबाईलची रेंज येते की नाही हे. अर्थात हे करण्यासाठी सुरक्षिततेची भावना भाग पाडते. मोठया समूहातून दूर गेलेल्या मनुष्याचे वर्तन असेच असते. तो सुरक्षेचे पर्याय शोधत राहतो. त्या ओघाने त्याला कोणाशी तरी संवाद साधण्याची गरज भासते. मग तो संपर्काची साधने शोधतो. एकांत त्याला भीती घालतो.
दुरावा असणं, संपर्क तुटणं, निर्मनुष्य होणं, एकांतवास या माणसाच्या भीतीच्या काही प्राथमिक कल्पना आहेत. म्हणून तर रामायण आणि महाभारत यात देखील वनवास ही शिक्षेची संकल्पना आढळते. या शिक्षेचाही विचार केला तर असं दिसतं की दोन्ही कथांमध्ये कोणीही एक व्यक्ती एकटी वनवासाला गेलेली नाही. त्यामुळे एकटं राहणं ही शिक्षाच हे आपल्या मनावर शतकानुशतकं बिंबवलं गेलंय. परंतु श्रीराम असो किंवा धर्मराजा किंवा गौतम बुद्ध, सर्वानाच ज्ञान चौकटीच्या बाहेर पडल्यावर मिळालेलं आहे व त्यांचा कसही घराच्या बाहेरच लागलेला आहे.
आज एकटेपणा ही शिक्षा वाटावी अशी स्थिती नाही. आजचा माणूस सुखाच्या शोधासाठी एखाद्या गोष्टीच्या पार अंतापर्यंत जातो. आज त्याला एकांत प्रिय झालेला आहे. प्रवासाच्या निमित्ताने थोडासा तरी वेळ स्वत:च्या एकटं असण्यासाठी द्यावा असं आज खूप जणांना वाटतं. त्याला त्याची साहसं करायची आहेत. त्याला स्वकीय प्रिय आहेत तसेच त्याला एकटं राहण्याचीही हौस असते. म्हणूनच आज अनेक तरुण-तरुणी एकटयानेच भ्रमंती करताना दिसतात. यात साहसी प्रकार देखील आहेत.
कमांडर दिलीप दोंदे व कमांडर अभिलाष टॉमी यांनी वेगवेगळ्या वेळी एकटयाने एका छोटयाशा शिडाच्या बोटीतून जगाची सफर केली. त्या सफरीतील अनुभव दोंदे यांच्या ‘द फर्स्ट इंडियन’ आणि अभिलाषच्या ‘१५१’ या पुस्तकात वाचण्यासारखे आहेत. भटकंतीवर आधारित असाच एक चित्रपट आहे ‘वाईल्ड’, रिज विदरस्पूनचा. शेरील स्ट्रेड या अमेरिकेतील एका स्त्रीच्या आयुष्याला प्रवासाने कसं वळण मिळतं याचं चित्रण या चित्रपटात आहे.
नव-यापासून विभक्त झालेली आणि आईच्या मृत्यूच्या दु:खात असणारी २६ वर्षीय शेरील ९४ दिवस हायकिंग करत अनेक जंगलातून, द-याडोंगरातून फिरते. वेगवेगळ्या टप्प्यांवर काही माणसं तिला भेटतात. जीवनाचं सार तिला या एकटयाने केलेल्या प्रवासामुळेच उमगतं.
आपण प्रवासात असताना वारंवार मोबाईलची रेंज पाहत असतो. एका अर्थाने आपण स्वत:ला एकटे पाडू इच्छित नसतो. ‘आपण ज्या व्यक्तीशी संपर्क साधू इच्छिता आहात, ती व्यक्ती सध्या संपर्क कक्षेच्या बाहेर आहे. कृपया थोडया वेळाने संपर्क करा.’ असे शब्द ऐकताना होणारं दु:ख मी समजू शकते, पण माझा संपर्क कक्षेच्या बाहेर राहण्याचा आनंद त्याहून मोठा आहे.
नागालँडच्या जखामाच्या उंच शिखरावर वस्तीला असताना हा आनंद मला झाला, तसाच तो धरमशालाच्या त्रियुंडच्या शिखरावर गेल्यावरही झाला आणि तसाच तो ब्रह्मपुत्रेच्या विस्तीर्ण पात्रामध्ये हेलकावत असतानाही झाला. संवाद व त्यासाठी गरजेचा असणारा संपर्क झाला नाही, माध्यम मिळालं नाही तर जीव कसनुसा होतो. प्रवासातल्या काही अडचणीच्या, संकटांच्या प्रसंगांमध्ये इतरांशी संवाद होणं, संपर्काची माध्यमं सुरू असणं हे अतिशय महत्त्वाचं असू शकतं.
त्याचवेळी शहरी गजबजाटातून एकांताकडे झुकणा-या मनाला एखाद्या निश्चल वातावरणात कोणताही संवाद घडत नसण्याचंही अप्रूप वाटू शकतं. त्याच ओघात जेव्हा आपल्यापाशी असणारी संपर्क साधनं फोल ठरतात तेव्हा आश्चर्य वाटतं व मुकाटपणे गप्पच राहावं लागतं. खरं तर तेव्हाच कुठे आपलं आपल्याकडे, आपल्या प्रवासाच्या उद्देशाकडे लक्ष जातं. माझ्यासारखाच असा हा अंतर्मुख करायला लावणारा आनंद अनेकांनी घेतला असेल.
टेलिफोन आणि त्यानंतर मोबाईल फोन आल्यानंतर आपण एकमेकांच्या संपर्कात कायमच राहण्याची सवय लावून घेतली आहे. किंबहुना ती गरज भासावी इतकं त्या सवयीचं व्यापक रूप आपण करून टाकलेलं आहे. तंत्रज्ञानाचे काही फायदे आणि काही तोटे असतात. म्हणूनच तंत्रज्ञानाला दुधारी तलवार म्हणतात. आज संपर्क माध्यमांमुळे माणसाची तीच गत झालेली आहे.
पूर्णपणे टाळताही येत नाही आणि खूप हवंहवसं आहे असंही नाही. अशा स्थितीला आपण येऊन पोहोचलेलो आहोत. संवादाच्या मानसशास्त्रावर बरंच काही लिहिण्यासारखं आहे, पण तो इथला विषय नाही. विषय आहे तो संवादात बहुउपयोगी ठरणा-या माध्यमांचा आणि त्यांच्या आहारी आपण कसे गेलो आहोत हे पाहण्याचा. तर हेच कळण्यासाठी कधीतरी एखाद्या निबिड अरण्यात पाऊल टाकावं लागतं. दिवसेंदिवस घरातल्यांशी फोनवर न बोलण्याचा अनुभव माझ्या अनेक भटक्या मित्रमंडळींनी घेतला असेल.
व्याघ्र गणनेला गेल्यावर आतमध्ये रेंज मिळणं अशक्य असतं तसंच एखाद्या शिखराच्या टोकावर गेल्यावर तिथे फोनसाठी रेंज मिळणं कठीणच. अगदी अरण्यातच नका जाऊ, थोडं शहरी भागापासून दूर गेलात की गावखेडयात देखील हा अनुभव घेता येतो. अर्थात तो कोणाला हवा असतो, कोणाला नको. ते प्रत्येकाच्या सवयीवर अवलंबून आहे. छानशा नदीकाठी बसलेली एखादी व्यक्ती आसपासच्या वातावरणाचा आनंद घेईल तर दुसरी व्यक्ती कदाचित मोबाईलची रेंज मिळत नसल्याने कासावीस होईल. आपण शहरात राहतो म्हणून आपल्याला संपर्क क्षेत्राबाहेर राहण्याची केवढी नवलाई देखील वाटेल, पण तेच गावात राहणा-या माणसाला वाटणार नाही. त्यांच्यासाठी रेंज नसणं हीच सामान्य गोष्ट असते.
मला आठवतं, आम्ही नागझिराला शाळकरी मुलांना घेऊन गेलो होतो. तेव्हा स्टेशनवर आलेल्या आई-बाबांना आम्ही मुलांकडचे मोबाईल परत दिले होते. त्यांना म्हटलं की, एकदा का आतमध्ये जंगलात गेल्यावर कसली येतेय रेंज, तिथे तुमच्या या यंत्राचा काही उपयोग होणार नाही. त्यावर पालकांचे चेहरे काळजीने भरून गेले. पण नाईलाज होता. टूर लीडरवर निर्धास्त राहा आणि मुलांची काळजी करू नका असं सांगून आम्ही सहलीला निघालो आणि खरंच मुलं तिथे इतकी रमली की त्यांना मोबाईल नसण्याची आठवणही झाली नाही.
वास्तविक आपण आपली गरज वाढवून घेतलेली आहे. प्रत्येक गोष्टीला आपण फोनवरील, इंटरनेटवरील संपर्काशी इतकं जोडून टाकलेलं आहे की त्याशिवाय जग सुरळीत चालणारच नाही, असं आपल्याला वाटत असतं. पण शहराबाहेर गेल्यावर आपल्या या कल्पना किती फोल आहेत हे जाणवतं. म्हणूनच जमेल तेव्हा थोडंस या कोलाहलापासून दूर देखील जाण्याचा प्रयत्न करा.
No comments:
Post a Comment