Translate

Friday, September 25, 2015

जाऊ तिथे खाऊ



तुमच्या प्रवासाला रंगत आणणा-या गोष्टी कोणत्या? असं विचारलं तर कोणी म्हणेल, बाहेरचा निसर्ग, तर कोणी म्हणेल, बरोबर असलेली माणसं, सहप्रवासी. परंतु प्रवासातल्या खाद्यपदार्थाच्या मेजवानीवर सवर चंच एकमत असतं. प्रवासातला सर्वात मोठा टाईमपास म्हणजे वाटेत विविध खाद्यपदार्थावर मारलेला ताव.

nashtaप्रवासाला निघायचं म्हटल्यावर काही जणांच्या मनात खाण्यापिण्याचे बेत शिजू लागतात. प्रवासाचा आनंद हा त्याशिवाय पूर्ण होणारच नाही असंच काहींचं म्हणणं असतं. प्रवासाइतकंच महत्त्व त्यांच्या लेखी वाटेतल्या खाद्यस्थळांच्या सौंदर्याचा आस्वाद घेत जाण्याला असतं.
किंबहुना आपल्यापैकी एक जण तरी असा असतो की ज्याचं वाटेत दिसणा-या खाद्यपदार्थ विकणा-या दुकानांकडे व सर्व फेरीवाल्यांकडे बारीक लक्ष असतं. रोड ट्रिपची खरी गंमत तर असं खाणंपिणं करत जाण्यातच असते. म्हणजे पुणे, कोल्हापूर, सातारा किंवा अगदी कुठेही देशभरात कारने जायचं असलं की आधी मित्रमंडळींकडे वाटेत जेवणखाण्यासाठी कोणती चांगली ठिकाणं लागतील याची माहिती घेतली जाते.
प्रवासात आवश्यक असणा-या इतर सामानांप्रमाणेच हॉटेलांची ही यादी महत्त्वाची असते. आधी त्याच मार्गावरून प्रवास करून आलेली मंडळी देखील आनंदाने व बारकाईने ही सर्व माहिती पुरवतात. पूर्वी कारने वगैरे फारसा प्रवास होत नसे. आता जवळपास प्रत्येक कुटुंबीयांकडे स्वत:ची गाडी असते किंवा कारची सोय केली जाते. पूर्वी बसने आम्ही कोकणात जायचो तेव्हा पनवेल, इंदापूर, माणगाव, पोलादपूर, महाड, अशी सर्व ठिकाणी बस थांबत जायची. त्यातला १५-२० मिनिटांचा काळ हा चहा-पानासाठीच असायचा.
त्या प्रवासात भुकेला एसटी स्टँडवरली ती कळकट्ट कॅन्टीनही चांगली वाटायची. प्रवासाचा शीण घालविण्यासाठी चहा तर हवाच असायचा. त्याची जास्त गरज कंडक्टर-ड्रायव्हरला असे. मग सर्वच बटाटा-वडा, इडली-मेदूवडा, मिसळ-पाव असा नाश्ता करत असत. कारण एस.टी. आमच्या गावापर्यंत पोहोचे तेव्हा दुपारचे तीन वाजलेले असत. जेवणाची वेळही टळून गेलेली असे. मग चिपळूणला आल्यावर स्वागत किंवा अभिषेकमध्ये जेवण हे ठरलेलं असायचं.
तसं एखाद्या शहरात जाऊन राहायचं असेल तर आपण तिथे कोणती हॉटेल्स लोकप्रिय आहेत याचीही माहिती घेतो. देशातल्या अनेक शहरांमध्ये कुठे कुठे, काय काय चांगलं चुंगलं खायला मिळतं हे दाखवणारा एनडीटीव्ही गुड टाइम्सवरला ‘हायवे ऑन माय प्लेट’ हा माझा आवडता शो. असाच एक बहुतेकांच्या आवडीचा शो होता विनोद दुआ यांचा ‘जायका इंडियाका’.
टीव्हीमुळे इतर शहरांमध्ये काय उत्तम खायला मिळतं याचं रोचक चित्रण घरबसल्या पाहायला मिळू लागलं. आता असे टीव्ही शोज पाहून लोक बाहेर जाण्याच्या आधी कुठे जाऊन काय पाहायचं? याच सोबत काय खाऊयात याचेही बेत आखतात. इंदोर, चंदीगढ, सुरत, मुंबई, कोलकातासारखी ठिकाणं तर अशा भटक्या खवय्यांच्या खूप पसंतीस येतात.
भारतीयांना चाट, भेळ प्रकारातलं स्ट्रीटफूड हे अत्यंत आवडतं, त्यामुळे अगदी मुंबई विमानतळावरही महागडया दुकानांवर हे असे पदार्थ उपलब्ध असतात. त्यात आपल्या पोह्यांनी देखील हजेरी लावलेली दिसते. तसंच दाक्षिणात्य पदार्थानीही विमानतळावर कब्जा मिळविलेला आहे. त्यामुळे विमानप्रवास करणा-या खवय्यांना अगदीच विमानतळाबाहेर पडण्याची वाट पाहायला नको.
अर्थात त्या पदार्थाचे दरही विमानाप्रमाणाचे आकाशाला हात लावून आलेले असतात ती गोष्ट वेगळी. पण एक आहे, तुम्ही लोकल रेल्वेने जात असाल किंवा विमानाने, खायला मिळणार नाही असं कधीच होणार नाही. मुंबईची लोकल रेल्वे तर सर्व काही सामावून घेणारी, जणू धरणीमातेचं दुसरं रूपच! इथे काय खायला मिळत नाही, केक, डोसा, इडली-मेदूवडा चटणी, मेथी-डिंक लाडू, वेफर्स, शंकरपाळे, चिवडा, बाकरवडया, चकली, फळं, क्रीम वेफर्स, बिस्किटं, भेळ, साबुदाणा वडा, बटाटावडा, समोसा.. ही यादी न संपणारी आहे.
दर दिवशी लोकलच्या या प्रवासात नवनवीन खाद्यपदार्थाची भर पडतेच आहे. इथे फक्त चहा-कॉफी मिळायची बाकी आहे. पण ही कसर माझ्या हावरा लोकलच्या प्रवासात भरून निघाली. हावरावरून बांदेलला निघालेल्या लोकलमध्ये संध्याकाळी मला सोनपापडीसारखा एक पदार्थ खायला मिळाला, आणि आश्चर्य म्हणजे त्या लोकलमध्ये चहावालाही आला होता. मला तर अगदी भरूनच आलं व लगेच मी त्या मुंबई लोकल एवढयाच तुडुंब गर्दीतूनही त्या चहावाल्याकडून चहा विकत घेतला.
आपल्याकडे एक्स्प्रेस ट्रेनमधून चहा-कॉफी विकणारे फिरत असतात, तसलीच किटली घेऊन तो लोकलमध्ये एवढया गर्दीतही चढला होता व कौशल्याने चहा कोणाच्याही अंगावर न सांडता विकत होता. कोलकातामधला सरकारी बाबूमोशाय वर्ग संध्याकाळच्या सुमारास सुटतो, त्यावेळेला असा चहा-नाश्ता करत करत ही माणसं घरी पोहोचतात. आपल्याकडे पुणे किंवा लांब अंतरावर जाणा-या एक्स्प्रेस ट्रेनमध्येच चहा मिळतो. तिथे मात्र लोकलमध्येही मिळतो.
कोकणात जाताना रेल्वेत मिळणारी करवंदं, जांभळं, शाळू, चिकू, बोरं असा कोकणी मेवा खात गेल्यावर प्रवासाचा आनंद अजूनच वाढतो. खरं तर अशा वेळी गाडी हळूहळू चालली असेल तरीही फारसं काही वाटत नाही. बाहेरचा हिरवागार नजारा आणि हातात कोकणचा मेवा, असा मस्त प्रवास होतो.
आपल्याकडे एक्स्प्रेस ट्रेनमध्ये शेकडो फेरीवाले खाद्यपदार्थ विकायला घेऊन येत असतात, मात्र जोधपूरला जाताना माझ्यावर उपाशी राहण्याची वेळ आली होती (अर्थात जवळ काही स्नॅक्स होते म्हणून बरं झालं!) इंदौरवरून जोधपूरला जाणा-या गाडीत त्या दुपारी, संध्याकाळी आणि रात्री देखील, एकही विक्रेता आला नाही. ३-४ स्थानकांवर गाडी थांबली; पण तिथेही कोणतेच खाद्यपदार्थाचे स्टॉल्स नव्हते. मला काही कळेचना. याचं उत्तर मला सहप्रवाशाने दिलं, ते असं की बहुतांशी मारवाडी कुटुंबं या गाडीने प्रवास करतात.
साधारण दोन दिवसांचा प्रवास असल्याने ते घरातूनच खूप सारं खाणंपिणं बरोबर घेऊनच येतात. अगदी जेवण-नाश्त्यासकट त्यांचे मोठमोठाले टिफीन कॅरिअर भरलेले असतात. त्याच्या या स्पष्टीकरणानंतर शेजारच्याच मारवाडी कुटुंबाकडे असलेल्या मोठया डब्यांचं निरसन मला झालं. त्यांच्याकडे तर खाऊन उरेल व वाया जाईल इतकं अन्न त्यांनी सोबत घेतलेलं होतं.
जोधपूर यायला एक-दीड तास होता, तेव्हा या उरलेल्या अन्नाचं काय करावं हे त्यांना कळत नव्हतं. शेवटी त्यांनी त्या मोठाल्या भरलेल्या डब्यांचं काय केलं हे मलाही कळलं नाही. तर अशा प्रांतोप्रांतीच्या विविध त – हा! पण वेगवेगळ्या राज्यांमधल्या स्थानकांवर उतरून तिथल्या स्थानिक पदार्थाची चव घेण्यात एक वेगळीच मजा आहे. मग ते बस स्थानक असो किंवा रेल्वे स्थानक. तेव्हा तुमचा पुढला प्रवास अशा प्रकारे लज्जतदार करायला विसरू नका.
Print Friendly
Tags:  |  |  | 

No comments:

Post a Comment