Translate

Friday, September 25, 2015

तळ्यांच्या शहरात

राजस्थानात पाहण्यासारखी काही निवडक ठिकाणं आहेत, त्यापैकी अवश्य गेलं पाहिजे, असं एक शहर म्हणजे उदयपूर. तळ्यांचं शहर म्हणून उदयपूरची ख्याती आहे. एकंदरीत हे शहर लोभस आहे. उदयपूरच्या गल्ल्यांमधून मारलेला हा फेरफटका.
udaypur
रणथंबोरनंतर दुसरा टप्पा होता तो उदयपूरचा. राजस्थानच्या तापलेल्या वातावरणात फिरणं हा नक्कीच आनंद नव्हता; सुदैवाने नुकताच फेब्रुवारी संपला होता व मार्च सुरू झाला होता, त्यामुळे वातावरणात गारवा टिकून होता. तरीही काही वेळेस माध्यान्हीच्या वेळेस एवढी उष्णता जाणवायची की बाहेर पडणं नकोसं व्हायचं.
वेळेअभावी जैसलमेर किंवा उदयपूर असे दोन पर्याय माझ्यापुढे होते. अर्थातच मी हे तळ्यांचं शहर निवडलं. जोधपूरवरून उदयपूरला जाणा-या बसचं बुकिंग करणं फारसं अवघड नव्हतं. योगायोगाने बसस्टॉपही मैत्रिणीच्या, सायलीच्या घराजवळच होता. माझी सर्व जबाबदारी जणू काही तिनेच उचलली होती त्यामुळे एक दिवस तिच्यासोबत सरकारी बसस्टँडवर जाऊन बसची चौकशी व बुकिंग करून आलो.
बस व्होल्वो नव्हती पण चांगली एसी लक्झरी बस होती. त्यामुळे प्रवासाचा फारसा त्रास झाला नाही. या बसेस दिवसातून चार फे-या मारतात. या बससेवेला खूप चांगला प्रतिसाद मिळतो. मी उदयपुरात लवकर पोहोचावं म्हणून सकाळी साडेसहाचीच बस पकडली होती. सायलीने मला बसमध्ये बसवलं आणि माझा उदयपूरकडे प्रवास सुरू झाला. वाटेत साडेनऊच्या सुमारास फक्त एक स्टॉप बसने घेतला.
सहा तासांच्या प्रवासानंतर साधारण साडेअकराला बसने उदयपूर शहरात प्रवेश केला व तिथल्या बसस्टॉपवर जाईपर्यंत बारा वाजलेच. पहिल्या नजरेत पाहिलं तर शहर तसं स्वच्छ वाटलं. तशीच ब-यापैकी स्वच्छता इतरत्र आढळली. परदेशी पर्यटकांचा तिथं राबता असल्यामुळे बहुतेक महानगरपालिकेने स्वच्छता मनावर घेतली असणार. पर्यटकांना फिरताना घाण वाटणार नाही याची काळजी घेतलेली दिसते. थोडाफार इकडेतिकडे कचरा असेल तर तो भारतासारख्या देशात फार मोठा गुन्हा नाही.
उदयपूरला उतरले तेव्हा जैसलमेरऐवजी त्याची निवड केल्याबद्दल स्वत:लाच धन्यवाद दिले याचं कारण म्हणजे तिथला थंडावा. भर दुपारी देखील तिथे जोधपूरइतकं गरम होत नव्हतं. संध्याकाळी तर स्वेटर घालावा लागत होता व रात्री ब्लँकेट. हवेत खूप जास्त उष्णता नव्हती. कारण उन्हाळा सुरू झालेला नव्हता. बहुतेक थंडीच्या अखेरच्या दिवसातली मी शेवटची पर्यटक तिथे होते. बसस्टॉपवर उतरल्यानंतर माझ्या गेस्टहाऊसकडे जाण्यासाठी ऑटोची शोधाशोध केली.
नेहमीप्रमाणे इथून तिथून सर्व ऑटोरिक्शाचालक हे सारखेच असतात याचा अनुभव घेतला. उदयपूरमध्ये खूप सारी पाहण्यासारखी स्थळं आहेत व यातील एका ठिकाणाहून दुसरीकडे जायचं असेल तर हे रिक्षावाले सरसकट मीटर न लावता शंभर रुपये सांगतात. नाईलाज हा पर्यटकांच्या नशिबीच असतो. त्यामुळे मी देखील शंभर रुपये देऊन गेस्टहाऊसमध्ये पाऊल टाकलं. माझ्या सुदैवाने हनुमान घाटावरचं हे गेस्टहाऊस छान होतं. खोली तिस-या मजल्यावर होती, ती अडचण सोडली तर तिथं बाकी काही अडचण नव्हती. खोलीही चांगली होती. लेक फेसिंग. पूर्ण हनुमान घाट खिडकीतून दिसत होता.
तसं म्हटलं तर एखाद्या शहरात शंभर जागा पाहण्यासारख्या असतात, अशा प्रसिद्ध ठिकाणी फिरत फिरत काढायचे असे कित्येक दिवस लागू शकतात पण प्रत्यक्षात उदयपूर दोन दिवसात पाहून होतं. तळ्यांच्या या शहरात आल्यावर तलाव पाहणं चुकवताच येत नाही. शिवाय राजस्थानी स्थापत्यशैलीचे राजवाडे व मंदिरं लक्ष वेधून घेत असतात. शहरात फिरायचं म्हणजे एकतर रिक्षा करावी किंवा आरामात रमतगमत पायी चालावे. मी लांबच्या व जवळच्या अशा ठिकाणांसाठी दोन्ही पर्याय निवडले होते. बॅकपॅकर्स पायी फिरताना इथे खूप संख्येने आढळतात. फक्त हातात एक नकाशा ठेवायचा.
मी जिथे उतरले होते त्या पॅनोरमा गेस्ट हाऊसच्या मॅनेजरने मला लागलीच एक नकाशा दिला होता व सर्व ठिकाणी कसं चालत जायचं याची देखील माहिती दिली होती. इथे परदेशी पर्यटक मोठया संख्येने येतात. मुख्य म्हणजे हे परदेशी पर्यटक आपल्यापेक्षाही खर्च कमी कसा होईल याबाबत जागरूक असतात. त्यामुळे अनेक जण पायीच फिरणं पसंत करतात. एखाद्या ठिकाणी गेल्यावर तिथली प्रेक्षणीय स्थळं, हॉटेलपासून तिथे जाण्याचं अंतर, राहण्या-जेवण्याचा खर्च इ. हिशेब हे लोक बरोब्बर करतात व त्यानुसारच फिरतात.
राजस्थानात रिक्षाने फिरणारे परदेशी लोक फारसे दिसणारच नाहीत. माझ्या गेस्टहाऊसपासून ५-१० मिनिटांच्या अंतरावर लेक पिचोला, सिटी पॅलेस, बागोर की हवेली, जगमंदिर व तिथला पॅलेस, लेक पॅलेस, जगदीश मंदिर वगरे ठिकाणं होती. हनुमान घाटाच्या पलीकडे ही सर्व स्थळं होती व मी उतरले होते अलीकडे. फक्त एका छोटया फुटब्रिजचं अंतर होतं.
लेक पॅलेस व लेक पिचोलाची संध्याकाळची फेरी चुकवायची नव्हती. या फेरीत पिचोला तलावाला फेरी मारून मग लेक पॅलेस व जगमंदिर दाखवतात. जगमंदिर पॅलेसचं रूपांतर हॉटेलमध्ये करण्यात आलेलं आहे. राजस्थानातल्या बहुतेक राजवाडय़ांची आता हीच स्थिती आहे. ताज ग्रुपचंही हॉटेल या तलावात आहे.
उदयपूरमधील सर्व तलाव मानवनिर्मित आहेत. पण हे प्रचंड तलाव पाहताना मन हरखून जातं. विशेषत: संध्याकाळी तर हे तलाव विलोभनीयच दिसतात. फतेहसागर लेकमध्ये वेगवेगळ्या बोट राईड्स उपलब्ध आहेत, ज्यांचे दरही कमी आहेत. तशी सोय पिचोला लेकमध्ये नाही. इथे फक्त सिटी पॅलेसद्वारेच बोट राईड पुरवली जाते व तिची किंमतही अवास्तव महागडी आहे. अर्थात बोट राईड घ्यायची नसेल तर तलावकाठाने फिरता येतं.
सिटी पॅलेस हा राजवाडा देखील खूप प्रेक्षणीय आहे. या राजवाडयात ठेवलेल्या अत्यंत महागडया क्रिस्टलच्या जागतिक संग्रहामुळे तिथे पर्यटकांची गर्दी असते. बाकी इतर राजवाडय़ांसारखाच हा देखील एक आहे. फक्त त्याच्या पांढ-या रंगामुळे तो उठून दिसतो. पूर्ण राजस्थानात सँडस्टोन वास्तुरचनेसाठी वापरलेला दिसतो. मग ते साधं घर असो किंवा महाल. अति तीव्र उन्हामुळे काही महालांना पांढ-या रंगात रंगवलेलं आहे.
राजस्थानात गेलात तर एक गोष्ट जमल्यास पाहाच. ती म्हणजे तिथली लग्नं. रंगांची उधळण अशा प्रसंगी विशेषत्वाने ओसंडून गेलेली दिसते. पर्यटक या नात्याने कॅमेरा घेऊन गेलात तर तुमचं स्वागतच होतं. फतेहसागर लेकची फेरी करताना दूरवर सज्जनगड दिसतो. संध्याकाळी तिथे रोषणाई केलेली असते. त्यामुळे तो खूप सुंदर दिसतो. शिवाय या तलावात सोलर ऑब्झव्‍‌र्हेटरी आहे, ती सकाळी गेल्यास पाहता येते. इथली खाद्यसंस्कृती तर अप्रतिमच आहे, जी जगभरात प्रसिद्ध आहे. त्यामुळे इशान्यपूर्व भागात गेल्यावर खाण्याचे जे प्रश्न पडतात, ते इथे उद्भवत नाहीत. माझ्या सुदैवाने मला ‘मिलेट्स ऑफ मेवार’ हे हॉटेल सापडलं.
मनोज प्रजापत या कष्टाळू तरुणाने हे हॉटेल स्वकष्टावर उभं केलंय. त्यात त्याच्या मित्राचीही त्याला साथ आहे. अवघा बारावी शिकलेल्या या तरुणाने काहीतरी वेगळं करायचं म्हणून उदयपूरमध्ये ऑरगॅनिक कृषी उत्पादनांपासून बनवलेले खाद्यपदार्थ देणारं हे पहिलं हॉटेल उभारलं. तीन मजली व्यवस्था असलेलं हे हॉटेल देशी-विदेशी पर्यटकांचं आकर्षण आहे. वेळ घालवण्यासाठी बागोर की हवेली हे संग्रहालय पाहण्यासारखं आहे. १८ व्या शतकातली ही हवेली आहे. इथल्या १३८ खोल्यांमध्ये बाहुल्यांच्या खेळातील पुतळे, त्यांचे कपडे, शस्त्रं, राजस्थानी कलेच्या वस्तू, वाद्यं, चित्रं इत्यादी ठेवलेले आहे.
बराच वेळ असेल हाताशी तरच इथे प्रवेश करावा. हा नियम तसाही सर्वसाधारणपणे उदयपूरमधील कोणत्याही ठिकाणाला लागू होतो. शॉिपग करण्याच्या फंदात भारतीय पर्यटकांनी मुळीच पडू नये. कारण इथले दर हे परदेशी पर्यटकांना अनुसरून लावलेले आहेत. त्यात फारसं कमी जास्त होत नाही. राहण्याची व्यवस्था कितीही कमी पैशात होऊ शकते मात्र खरेदीसाठी जाल तर खिसा खाली करूनच याल. या राजस्थान फेरीत एक प्रकर्षाने जाणवलं ते म्हणजे राजवाडे, महाल व मंदिर हे पाहण्यात अजिबात रस नसेल त्यांनी राजस्थानात जाऊ नये.
Print Friendly
Tags:  |  |  |  |  | 

No comments:

Post a Comment