लोनली प्लॅनेटमधून, इतर काही वेबसाईट्सवरून माहिती टिपून ठेवून बराच जमाना झाला होता; पण राजस्थानात पाऊल काही पडले नव्हते. टीव्हीवर राणा प्रताप वगरे मालिका पाहताना नेहमी वाटायचं की वीरांच्या या भूमीला आपलं पाऊल एकदा तरी लागलंच पाहिजे.
Tags: भटकंती | रणथंबोर | राजस्थान | वाघांचं राज्य | विशाखा शिर्के | व्याघ्र अभयारण्य
लोनली प्लॅनेटमधून, इतर काही वेबसाईट्सवरून माहिती टिपून ठेवून बराच जमाना झाला होता; पण राजस्थानात पाऊल काही पडले नव्हते. टीव्हीवर राणा प्रताप वगरे मालिका पाहताना नेहमी वाटायचं की वीरांच्या या भूमीला आपलं पाऊल एकदा तरी लागलंच पाहिजे.
जायचं जायचं म्हणताना अचानक रणथंबोरला एक ग्रुप निघाला होता, त्यांच्या टोळक्यात सामील होऊन निघाले देखील. राजस्थानला जाण्यामागे रणथंबोर व्याघ्र अभयारण्याचं आकर्षण खूप मोठं होतं. इतकी वर्ष डिस्कव्हरी, नॅशनल जिओग्राफिक, अॅनिमल प्लॅनेट वगरे वाहिन्यांवर पाहून पाहून रणथंबोरचं जंगल जणू पाठच झालं होतं. फक्त तिथे जायचं बाकी होतं.
व्याघ्र अभयारण्यात जाणा-यांची एक गंमत असते. त्यांनी तिथल्या वाघांना जी काही नावं किंवा क्रमांक दिलेले असतात आणि मग याच वाघांची चर्चा जाण्याआधीपासून सुरू होते. तशीच चर्चा आमची देखील सुरू झाली होती. आम्ही १०-१५ जण मुंबईहून निघालो होतो. पूर्ण प्रवासभर आम्ही फक्त वन्यजीवन आणि सहलींवरच बोलत होतो. योगायोगाने आमच्यातील दोघे सोडल्यास बाकी सर्वजण पहिल्यांदाच रणथंबोरला जात होतो. त्यामुळे तिथे जाण्याच्या प्रचंड उत्सुकतेपोटी आम्ही रणथंबोरचं जंगल पाहण्यासाठी जणू अधीरच झालो होतो. मी तर राजस्थानला देखील कधी गेले नव्हते.
एकूणच हा प्रांत मला अनोळखी, त्यामुळे अशा पूर्णपणे अनोळखी भागात जाण्याची जी काही मजा असते, ती मी अनुभवत होते. प्रवासात दिसणारी गावं, शहरं, निसर्ग, माणसं, खाद्यपदार्थ असं सगळंच निरीक्षण चालू होतं. सवाई माधोपोरला आम्ही सकाळी अकराच्या सुमारास पोहोचलो; पण अकरा वाजता देखील तिथे अंगाची काहिली करणारं ऊन पडलेलं होतं. इतका वेळ एसी ट्रेनमध्ये बसून बाहेर पडल्यावर आता अंगाला उनाचे चटके बसत होते.
परिसरातील पर्यटक सहजच ओळखता येत होते, कारण आमच्यासारखे पर्यटक सोडले तर इतर कोणीही डोक्यावरून आच्छादन घेतले नव्हते, गॉगल लावले नव्हते का टोप्या घातल्या नव्हत्या. पुरुष मंडळी फक्त स्थानिक साफ्यामध्ये फिरत होती आणि बायकांचे डोक्यावरून पदर.
इतकेच काय ते आच्छादन. हे तप्त वातावरण त्यांच्यात शतकानुशतके मुरले असावे, कदाचित म्हणून या उन्हाची ते फिकीरही करत नाहीत. आम्ही मात्र उन्हापासून बचाव करणारी सर्व आयुधं वापरत होतो. मुंबईकर मंडळींना उन्हाचा असा पहिलाच गरमागरम झटका मिळाल्यानंतर सर्वाना कधी एकदा रिसॉर्टवर पोहोचतोय असं झालं होतं. सुदैवाने आमचं रिसॉर्ट खूपच छान होतं.
रणथंबोरपाशी सवाई माधोपोर गावात हा व्यवसाय चांगलाच बहरलेला आहे. अगदी ताज, ओबेरॉयपासून इतर थ्री स्टार, फोर स्टार हॉटेलांची इथे गर्दी आहे. या सर्वाना प्रॉपर्टी निर्माण करायला मोठया मोकळ्या जागा देखील आहेत, मग फायदा घेणार नाहीत तर ते हॉटेल व्यावसायिक कसले ! सध्या तिकडे ताज ग्रुपचा दुसरा हॉटेलरूपी पॅलेस बनतो आहे. राजस्थानला एकूणच अप्रतिम वास्तुकलेची व कोरीव नक्षीकामाच्या कारागिरीची देण वारसागत लाभलेली आहे, या नक्षीकामाचा प्रभाव इथल्या वास्तुरचनांवर खूप जास्त आहे.
अगदी साधी घरांची देखील रचना छान असते. ती बघून हेवा वाटतो. शहरात काडयाच्या पेटीसारख्या घरांमध्ये राहून ती काडयाची पेटी किती स्क्वेअर फूटची आहे, किती मोठी आहे हेच सांगण्यात आपण धन्यता मानतो. हे असं खुल्या गावात राहण्याचं नशीब आपल्याकडे नाही.
दुपारीच आम्ही सामान रिसॉर्टवर टाकून जंगलात निघालो. आता उन्हाची कोणी पर्वा करणार नव्हतं. कारण त्याहीपेक्षा मोठं आकर्षण तिथे आत जंगलात होतं. रणथंबोरचं जंगल म्हणजे रखरखीत खडकाळ पट्टय़ांचा प्रदेश. इथे ११ झोन आहेत. जंगलाच्या कोणत्याही भागात जीपमधून फिरा, तुमची हाडन् हाडं खिळखिळी होणार याची गॅरंटी. पण जंगल इतकं लक्षवेधक आहे की हाडांचं दु:ख फार काही आपण मनावर घेत नाही.
रणथंबोर वाघांखेरीज पक्षी निरीक्षणासाठी देखील सर्वोत्तम आहे. एखाद्या तळ्याकाठी थांबावं आणि खूप सारे पक्षी पाहून घ्यावेत, यासारखं दुसरं सुख नाही. आम्ही वाघ बरेचदा पाहिलेले असल्यामुळे पक्षी निरीक्षणात आम्ही बराच वेळ घालवला. पक्षी आणि वाघांखेरीज इतरही प्राणी इथे पाहण्यासारखे आहेत. नीलगाय, हरणं, सांबर, काळवीट, मगरी असे खूप प्राणी इथे आहेत. बिबटे देखील आहेत. आमची नजर डोंगरघळींमध्ये नेहमी त्याला शोधायची; पण तो दिसणं काही यावेळी नशिबात नव्हतं.
तलाव देखील आहेत, ज्यात माणिक तलाव, राजबाग तलाव व पद्म तलाव हे दिसतातच. रणथंबोरला जाऊन चुकवू नये अशी एक जागा म्हणजे रणथंबोर किल्ला. हा माझ्या कायम लक्षात राहील, कारण मी हो-नाही करत या किल्ल्यावर चढले होते, कारण तेव्हा माझ्या गुडघ्यांना दुखापत झाली होती व चालणंही मला कठीण झालं होतं, तशा परिस्थितीत मी २ तास किल्ला चढून वर गेले होते.
इथे वर एक अत्यंत सुंदर गुहेमधलं शिवमंदिर आहे. आपल्या कोकणातल्या माल्रेश्वरसारखं. आतमधल्या काळोखात दिव्यांची उजळलेली आरास व त्या तेजात दिसणारी पिंड. खूप छान वाटलं इथे. किल्ल्यावर राणी पद्मावतीचा महाल, जलमहाल, तलाव आहेत. अजूनही काही मंदिरं आहेत. ती देखील खूप सुरेख आहेत. पण इथून पूर्ण रणथंबोर जंगलाचं जे दृश्य दिसतं ते खूप सुंदर आहे. निदान ते पाहण्यासाठी तरी वर चढून जायलाच पाहिजे.
रणथंबोरला भेट देऊन आल्यावर आता तिथून येणा-या बातम्या वाचण्यासाठी आम्ही उत्सुक असतो. अशीच गेल्या आठवडयात बातमी आली की रणथंबोरचा वनरक्षक रामपाल सैनीवर टी-७२, सुलतानने हल्ला करून त्याला ठार मारलं. डोळ्यासमोर त्या बांबू व लाकडाने बांधलेल्या प्रहरी चौकीवर बसलेला रामपाल आला. या चौकीवर सोलर पॅनल्स बसवली असल्यामुळे ती विशेष लक्षात राहिली होती.
फार दिवस तिथं राहिलो नाही, पण होतो त्या २-३ दिवसात रणथंबोरने मोहून टाकलं. वास्तविक मोहून टाकलं म्हणण्यासारखं तिथं एखाद्याला काहीच दिसणार नाही. सर्वत्र रखरखीत लँडस्केप, तप्त उन्हाळा व गरम झळा सोडणारी हवा, शुष्क झाडं व नावालाच हिरवळ बाळगणारं असं रणथंबोरचं व्याघ्र अभयारण्य. पण या जंगलावर आज सुमारे ६०-६५ वाघ अधिराज्य गाजवतायत.
वरच्या बातमीतला सुलतान त्यातलाच एक तरुण वाघ. आम्ही याला पाहिलं नाही; पण याचा बाप, टी-२४, उस्ताद त्याचं दर्शन मात्र आम्हाला झालं आणि तेही अवचित. झुडुपांमधून तो जात होता, अक्षरश: तो संपेचना..एवढा लांबलचक म्हणजे जवळपास ८-९ फूट तर असेलच. ते शक्तिशाली जनावर पाहून आम्ही थक्कच झालो. त्याचं डोकं इतकं भव्य आणि एकूणच अत्यंत देखणं जनावर, त्याला पाहून रणथंबोरच्या जंगलात वाघांवर तस्कर का नेम लावून बसतात याची कल्पना आली.
रणथंबोरची एक वेगळीच शान आहे. इथं तलाव आहेत, किल्ले आहेत, डोंगरद-या, कपारी, मंदिरं, झाडंझुडुपं, गवताळ मैदान असं सर्व काही आहे. राजस्थानच्या शुष्क मरूभूमीत हिरवंगार रसरशीत अरण्य कसं टिकून राहत असेल असं आपल्याला वाटतं, पण प्रत्यक्षात तिथे गेल्यावर या सर्व शंका दूर होतात.
रणथंबोरचं खास वैशिष्टय म्हणजे इथला लँडस्केप. इतर जंगलांमध्ये आपण नुसती हिरवाई पाहतो; पण इथं अप्रतिम लँडस्केप आहे. लँडस्केप म्हणजे जमीन, आसपासचा परिसर आणि एकूणच आसमंत मिळून जे काही अफाट दृश्य दिसते, त्यात आपण विरघळूनच जातो. राजस्थानच्या रेताड जमिनीत कसला आलाय सुंदर लँडस्केप असं तुम्ही म्हणाल, पण वाचकांपैकी काही छायाचित्रकारांना याची कल्पना येऊ शकेल.
रणथंबोरवर वाघांचं राज्य आहे, त्यामुळे त्यांचं दर्शन तिथं दुरापास्त नाही. इथल्या सर्व वाघांना ‘टी’ आद्याक्षरापासून क्रमांक देण्यात आलेले आहेत. यांचा वावर अगदी गावापर्यंत असतो. वाघ तसे नरभक्षक नाहीत; पण गरसमजुतीतून त्यांनी माणसांवर हल्ले करून त्यांना मारल्याची काही उदाहरणे झालेली आहेत.
आम्हाला मछलीला पाहण्याची उत्सुकता होती, परंतु मछली राणी आता खूप वयस्कर झाल्याने ती झोन नऊमध्येच पडून असते व तिला तिथे मांस नेऊन टाकण्यात येतं असं सांगण्यात आलं. तिच्याकडे पर्यटक सोडून तिला तिच्या अखेरच्या दिवसात त्रास दिला जात नाहीये हे तिचं सुदैवच. कारण मछलीने जेवढा महसूल मिळवून दिला व प्रसिद्धी या अभयारण्याला मिळवून दिली त्याची तुलना फार कमी भारतीय वाघांशी होऊ शकेल.
बांधवगढमधील सीता व चार्जर देखील असेच सेलिब्रिटी वाघ होते. आम्ही मछलीची मुलगी कृष्णा हिला तिच्या चार पिल्लांसह बघितलं. तो प्रसंग अविस्मरणीयच होता. एका तळ्याकाठच्या गवतात ती चार जण खेळत होती आणि मधूनमधून आईच्या खोडया काढत होती.
सुमारे तास-दीड तास ही पाच जण आमच्या समोर राहिली, एखाद्या वन्यजीवनविषयक वाहिनीवर दाखवतात तसंच दृश्य. आईच्या मार्गदर्शनाखाली ती पिल्लं आता हळूहळू शिकार करू लागली आहेत. नूर व तिच्या दोन पिल्लांना पाहण्यासाठी आम्ही बरेच प्रयत्न केले; पण ती तेव्हा राजस्थान टूरीझमच्या विश्रांतीगृहाच्या आवारात पहुडली होती, त्यामुळे त्यांनी तिच्यावर तात्पुरता मालकी हक्क दाखवला व फक्त त्या विश्रांतीगृहात उतरलेल्या पर्यटकांनाच तिचे खास दर्शन झालं. मुंबईत परतल्यानंतर दोनच दिवसात बातमी आली की त्या दोन पिल्लांची मारामारी होऊन त्यात एक दगावलं. निसर्गनियमात पशु-पक्षी ढवळाढवळ करत नाहीत. ती दुर्बुद्धी फक्त मानवालाच बहाल झालेली आहे.
कृष्णा आणि तिची पिल्लं आम्हाला लागोपाठ दोन दिवस दिसत होती. मन भरून त्यांना पाहून घेतलं. परंतु वाघाच्या बाबतीत सुदैवीच असावं लागतं. आमच्यासोबत वाघ आयुष्यात प्रथमच पाहणारे काही जण होते, त्यांचा आनंद तर अपार होता.
आम्ही सतत तीन दिवस वाघांना आडवे जात होतो, मात्र आमच्याच रिसॉर्टवर उतरलेल्या एका दुस-या ग्रुपला मात्र वाघाचं नखही दिसलं नव्हतं. त्यांना तसंच परत जावं लागलं. हे कौतुक, असूया किंवा चेष्टेपोटी लिहीत नाही; पण वाघाचं दर्शन ही निदान मला तरी अजूनही ‘मॅटर ऑफ लक’ अशी गोष्ट वाटते.
रणथंबोर, कान्हा किंवा बांधवगढ ही हमखास वाघ दिसणारच यासाठी प्रसिद्ध असलेली व्याघ्र अभयारण्यं आहेत. परंतु तिथेही ३-४ दिवस पाठपुरावा करूनही वाघ न पाहता परत येणारी माणसं आहेत. तर अशा प्रकारे ती नशिबाची गोष्ट आहे. आपण निसर्गावर सत्ता गाजवू शकत नाही आणि गाजवूही नये.
No comments:
Post a Comment