Translate

Friday, September 25, 2015

एक खिडकी असावी न्यारी..



कोणत्याही पर्यटनस्थळी किंवा निसर्गरम्य ठिकाणी गेल्यावर सर्वात प्रथम पाहिली जाते ती राहण्याची खोली. ती छान असेल तर तिथपर्यंत झालेल्या प्रवासाचा निम्मा शीण निघून जातो आणि त्यातून त्या खोलीला जोडून खिडकी, व्हरांडा, गॅलरी वगैरे असेल तर अधिकच आनंद होतो. आणि त्यातही भर म्हणजे त्या खोलीतलं हे दुस-या बाजूला उघडणारं मोकळं दार एखाद्या घनदाट जंगलाकडे किंवा समुद्राकडे उघडणारं असेल तर अजूनच बहार !
windowमुंबईतल्या सर्व शीणाचा, भयानक विळखा घातलेल्या थकव्याचा एक एक वेढा सुटत होता. पहाटे उठल्यावर बाहेर व्हरांडयात आले. थंडगार शिरशिरी उमटवणारा वारा वाहत होता. हवा कमालीची शुद्ध व निर्मळ होती. असं वाटत होतं की, आपण यापूर्वी असा श्वास कधी घेतलाच नव्हता. शहरात राहताना मन प्रसन्न राहावं म्हणून आपण काय काय प्रयत्न करत असतो. तसंल इथे काहीच करावं लागत नव्हतं. मनाला, डोळ्यांना, शरीराला प्रसन्न वाटून घेण्यासाठी कुठलेच कष्ट करावे लागत नव्हते. त्यांच्यासाठी आज कोणतेही आदेश नव्हते. त्यांना फक्त आरामच करायचा होता.
जगात इतकं काही छान, शुद्ध असू शकतं आणि तेही आपल्यासमोरच यावर विश्वासच बसत नव्हता. पक्ष्यांचा, प्राण्यांचा दिवस कधीचाच सुरू झाला होता. एका लाकडाच्या ओंडक्यावर जाऊन बसले. समोरच्या घनदाट या शब्दालाही मागे टाकेल अशा गच्च जंगलात नजर लावून काय दिसतंय ते पाहण्याचा प्रयत्न केला. डोळे त्या हिरवाईने नुसते निवून गेले. कदाचित त्यांनी मला धन्यवादच दिले असावेत. रोज दिवसाचे १०-१२ तास कॉम्प्युटरच्या झगझगीत स्क्रीनकडे पाहण्याची त्यांना शिक्षा होत असते, त्यामुळे हा हिरवा रंग त्यांच्यासाठी नक्कीच धक्कादायक पण सुखावणारा होता.
सर्व काही शांत, निश्चल होतं. निसर्गनियमाप्रमाणे सर्वकाही चालू होतं. त्यात कुठेही घाईगडबड नव्हती. इथे शहरात सकाळी उठल्यावर घाण्याला जुंपल्यासारखी धावपळ करणा-या मला खरंच स्वर्गात असल्यासारखं वाटत होतं. समोरच्या जंगलातून येणा-या विविध आवाजांनी जंगलात राहत असल्याची धुंदी मनावर चढत होती. सकाळचा गरमागरम चहा घेत इतक्या सुंदर दृश्यात आपणही एक भाग असावं, आपलं अस्तित्व विरघळून जावं, भानही जावं यापेक्षा अजून मनाला काय हवं असणार? या माझ्या सर्व आनंदाला छोटंसं कारण ठरला होता तो, मी जिथे उतरले होते, त्या इको कॅम्पमधल्या खोलीचा व्हरांडा.
खोलीचा दरवाजा थेट जंगलाच्या बाजूनेच उघडत होता. आम्ही रात्री पोहोचलो तेव्हा काळोखात समोर काय पसरलं आहे हे लक्षातच आलं नव्हतं व सकाळी उठल्यावर हा सुखद धक्का मिळाला होता. कर्नाटकातल्या सिरसीजवळ काही मैलांवर असणारं एक डोंगरावर वसलेलं छोटं पठार, तिथला हा इको कॅम्प होता. अशा ठिकाणी जाताना नेहमीच वाटतं की कोणत्याही सुखसुविधा नसल्या तरी चालतील, पण एक दरवाजा असा असावा जो एखादं रम्य दृश्य दाखवण्यासाठी उघडत असेल.
मला वाटतं, तुमच्या-आमच्यापैकी पर्यटनस्थळी जाणा-या प्रत्येकालाचा अशी एखादी खिडकी किंवा दरवाजा नक्कीच हवाहवासा असेल. अखेर आवडत्या ठिकाणी गेल्यावर चार भिंतींनी बंद, जराही मोकळेपणा नसणारी खोली कोणाला आवडेल म्हणा. अनेकदा हॉटेल किंवा रिसॉर्टमध्ये खोल्यांचं बुकिंग करायला गेल्यावर कळतं की अशा निसर्गरम्य दृश्याचा देखावा दाखवणारी एखादी खोली तिथे असेल तर ती सर्वात आधी बुक झालेली असते. अशा खोल्यांचा दरही इतर खोल्यांपेक्षा जास्त असतो. कारण त्यांना नेहमीच जास्त मागणी असते.
भंडारद-याला एमटीडीसीचं रिसॉर्ट आहे, तिथं तलावाचा नजारा दाखवणारी एक लेक फेसिंग खोली आहे, तिचं बुकिंग मिळणं कठीणच असतं. अशी कित्येक उदाहरणं देता येतील. मग अशावेळी समुद्रकिनारी फिरायला जाणारे भाग्यवान ठरतात. कारण अख्खा समुद्रच खोल्यांमधून पाहण्यासाठी तिथे असतो. तिथे फारशी अशी अडचण होत नाही.
एखादं हिल स्टेशन असेल किंवा समुद्र किनारी असणारं रिसॉर्ट असेल तर, आपल्या खोलीतून अप्रतिम निसर्गनजारा दिसावा अशी बहुतेकांचीच इच्छा असते. ज्यांना अशी खोली मिळत नाही, त्यांच्या हेवापूर्ण नजरा मग या लोकांना झेलाव्या लागतात. कोणत्याही पर्यटनस्थळी असलेल्या रिसॉर्ट किंवा हॉटेलच्या जाहिरातीत त्यांच्याकडे अशा सुंदर खोल्या किती आहेत हे पहिलं नमूद केलेलं असतं.
एखाद्या छानशा ठिकाणी प्रवास करून आलेल्या व्यक्तीला त्याच्या आठवणी विचारल्या तर त्याच्या आठवणीत एक गोष्ट हमखास असते, ती म्हणजे त्या ठिकाणी असलेली राहण्याची व्यवस्था. अर्थात, एखादे रिसॉर्ट किंवा हॉटेलची रूम, बंगला वगैरे आणि त्यातही त्या राहिलेल्या खोलीला एखादी खिडकी, बाल्कनी किंवा मोठा व्हरांडा होता असेल तर त्याची छानशी आठवण नेहमी मनात रेंगाळत राहते.
व्हरांडा म्हटला की नेहमी फॉरेस्ट बंगले किंवा रेस्ट हाऊस किंवा जुने ब्रिटिशकालीन बंगले आठवतात. अशा बंगल्यांमध्ये नेहमीच निवांतपणा असतो, शिवाय आजूबाजूचा परिसरही छान असतो. आपण एखाद्या ठिकाणी गेलो आहोत आणि तिथं राहत असलेल्या खोलीतून बाहेरचा अप्रतिम असा नजारा दिसत असेल तर ती आठवण नक्कीच अविस्मरणीय असते. मग तो समुद्रकिनारा असो किंवा वृक्षराजी किंवा पांढ-याशुभ्र बर्फाच्छादित पर्वतांचा देखावा असेल.
आपल्या खोलीतून छानसं दृश्य दिसलं पाहिजे असा ब-याच पर्यटकांचा नेहमीच आग्रह असतो. माझ्याही आठवणीत अशी अनेक ठिकाणं आहेत, जिथे सुदैवाने मला नेहमीच उत्तम राहण्याची व्यवस्था मिळाली. अगदी न मागता. तेव्हा तेव्हा मला स्वत:चाच हेवा वाटत आला. नेहमीप्रमाणेच प्रत्येक ठिकाणी गेल्यावर हीच जगातली अखेरची सुंदर जागा असंही वाटून गेलं. आपण कुठेही जातो कशासाठी, तर थकवा, ताण विसरून जाण्यासाठीच तर ना.. मग अशी सुंदर दृश्यं दाखवणारी खोली मिळाली तर ते स्वर्गसुखच म्हणायला पाहिजे.
Print Friendly
Tags:  |  |  | 

No comments:

Post a Comment