Translate

Wednesday, September 23, 2015

कशासाठी.. कोणासाठी?

निरुद्देश मनाने निघालेली पावलं कुठल्या ना कुठल्या गोष्टीत गुंततातच आणि मग त्यांना मिळतात वळणं आणि रस्ते. पाहिजे असणा-या ठिकाणी आपण पोहोचलो किंवा अगदी नाही पोहोचलो तरी काही ठिकाणी पावलं जरा जास्तच काळ रेंगाळतात. अशा आठवणींमध्ये मऊ रेतीत पावलं जशी रुतत जातात, तसं मन रुततच जातं. अशाच एका अनुभवाबद्दल. मॅकलिऑडगंजमधल्या नामग्याल मोनास्ट्रीमध्ये भरपूर गर्दी जमलेली होती. पण इतकी गर्दी असूनही गोंधळ-गोंगाट अजिबात नव्हता. लोक जणू काही मूकपणे व्यवहार करत होते. त्या गर्दीलाही एक शिस्त होती व सोबत लय देखील होती. सकाळचे सात-साडेसात वाजले होते. लोक भरभरून येतच होती. अर्थातच ही मोनास्ट्री शेकडो लोकांना सामावून घेण्याइतकी मोठी आहे.
कोणी, कुठून कसं जावं हे सांगण्यासाठी स्वयंसेवक ठिकठिकाणी उभे होते. सभागृहात शिरण्याआधी प्रत्येकाला एक सुती पिशवी देण्यात येत होती. त्यामध्ये काही माहितीपत्रकं होती. सभागृहात शिरण्याआधीच इलेक्ट्रॉनिक उपकरणं काढून घेण्यात आली होती.
अर्थात, हे माहीत असल्यामुळे मी मोबाईल व कॅमेरा तिथे नेलाच नव्हता. बसण्याचं आसन आपलं आपण आणायचं अशी सूचना आदल्या दिवशी देण्यात आली होती. त्यामुळे मी शालीची बैठक करून बसले. ज्यांना तिबेटी भाषा समजत नव्हती त्यांना इअरफोन देण्यात आले. थोडयाच वेळात सर्व जण अगदी शांत बसून वाट पाहू लागले.
तिथे सर्व वयोगटातली माणसं आलेली होती. भारतीयांसोबतच तिथे अनेक परदेशी मंडळी देखील होती. त्या वाट पाहण्यात देखील एक प्रकारची आत्मीयता, तन्मयता होती. मग एक धीरगंभीर आवाज तिथे निनादला. तो आवाज ऐकताच हरेकाच्या चेह-यावरचे भाव पालटले. त्या आवाजातली भारदास्तता जाणवत होती, माझ्यावर तर त्या आवाजाने जादूच फेरली. तीन मजल्यांवर माणसं दाटीवाटीने तरीही कोणाला त्रास न होईल अशा पद्धतीने बसली होती.
एक तासाभराने भाषण संपलं व मी उठून वरच्या मजल्याकडे दर्शनासाठी जायला निघाले. टीव्ही पत्रकारांच्या घोळक्यात शिरल्यावर मला हायसं वाटलं व त्यांच्यासोबत पुढेही सरकता आलं. अचानक एका व्यक्तीच्या पुढयात जाऊन मी थबकले. त्यांनी माझे हात हातात घेतले आणि त्यांच्या हातातला ‘खाता’ हे पांढरं वस्त्र मला दिलं. त्या क्षणाला सर्व जीवन सार्थकी लागलं आहे असंच वाटलं.
Buddha Statue at Namgyal Monastry1माझ्या तोंडून फार काही शब्द फुटूच शकले नाहीत, इतकी मी त्या क्षणाला भारावून गेले होते. मी तुमची पुस्तकं वाचली आहेत किंवा मला तुमचे विचार आवडतात असं काहीसं मी पुटपुटले असावे. पण माझ्या डोळ्यातली श्रद्धा त्यांना दिसली असावी, तिचं प्रतिबिंब त्यांच्या मिस्कील वाटणा-या डोळ्यात दिसत होतं.
हिज होलीनेस दलाई लामांना भेटून मी कृतार्थ झाले होते. अशा व्यक्तींना भेटणं हे देखील आपल्या नशिबात असावं लागतं. मी धरमशालाला पोहोचल्यावर सर्वप्रथम दलाई लामा यांच्या लेक्चरसंबंधी चौकशी केली होती. फारच कमी सीट्स शिल्लक होत्या, काही परवानग्या मिळवल्यानंतर त्यांच्या लेक्चरला बसण्याची अनुमती मला मिळाली होती. त्यांच्याचसाठी मी धरमशालापर्यंत गेले होते. त्यामुळे हा माझ्या दृष्टीने अलौकिक, अविस्मरणीय क्षण होता. ते माझ्या या प्रवासाची प्रेरणा होते.
प्रवासाला प्रेरित करणारं, आपण बाहेर पडावं यासाठी उद्युक्त करणारं असं काहीतरी असलंच पाहिजे असं वाटणारे अनेक लोक आहेत आणि याउलट वाटणारेही खूप लोक आहेत. इंग्लिश लेखक गिल्बर्ट चेस्टरटनचं एक वचन आहे, ‘अ ट्रॅव्हलर सीज व्हॉट ही सीज, अ टूरिस्ट सीज व्हॉट ही हॅज कम टू सी’. कुठेही जायला एका पायावर तयार असणारे फिरस्ते आणि कोरीव प्रवासी यांच्यातला फरक सांगायला चेस्टरटनचं हे एकच वाक्य पुरेसं आहे.
खरा प्रवासी जो असतो, ज्याला एखाद्या गोष्टीच्या नेमून दिलेल्या अर्थापलीकडेही काही दिसतं तर केवळ पर्यटक असणारा व्यक्ती एखाद्या गोष्टीचा सर्वसामान्य अर्थच फक्त समजू शकतो. अमुक एक गोष्ट पाहायलाच बाहेर पडलोय म्हणून आपण तीच गोष्ट पाहणार आहोत किंवा खरं तर अमुक एक गोष्ट पाहण्यासाठीच बाहेर पडावं असं नाही. कोणताही प्रवास हा फार काही न बोलता-सांगता तुमच्या जाणिवा समृद्ध करत असतो. फक्त प्रवासाला बाहेर पडल्यानंतर स्वत:च्या जाणिवांच्या कक्षा विस्तारणं ही ज्याची त्याची गोष्ट. असे अनेक बहुपदरी अनुभव प्रवासादरम्यान आपल्या झोळीत पडत असतात. त्यांच्याकडे आपलं लक्ष असतंच असंही नाही.
काही वेळा ती गोष्ट घडून गेल्यानंतर आपल्याला त्याचा अर्थ कळतो. प्रवास करताना तर बरेचदा असं होतं. कारण आपण एखाद्या ठिकाणी खूप जास्त वेळ थांबत नसतो. त्यामुळे ती गोष्ट तिथून आल्यानंतरही आपल्या मनात रेंगाळत राहते व तिचे अर्थ मग उलगडत जातात. बहुतेक वेळा हे अनुभव खूप साधेही असतात, त्यात फार काही खोल असा अर्थही नसतो, तरीही त्या त्या वेळी ते अनुभव आपल्याला स्तिमित करून जातात. हे तुमच्या प्रवासाला नवा अर्थ, संपन्नता मिळवून देणारे अनुभव असतात.
त्यांना ओढून-ताणून आणता येत नाही आणि तसंच त्यांचा अर्थ दुस-यांना विचारून वगैरे समजावून घेताही येत नाही. आपला आपणच तो शोधायचा असतो. एखाद्या दुष्काळग्रस्त, पाण्याची तीव्र टंचाई असणा-या गावात गेल्यावर त्यांचा जीवनानुभव आपल्याला उमजतो. एरव्ही भारतीय ग्रामीण विभागातील संस्कृतीचा अनुभव घ्या वगैरे जाहिराती करून टूर कंपन्यांतर्फे दाखवल्या जाणा-या गावांमध्ये हा चटका जाणवणार नाही. याचसाठी नेहमी चाकोरीबद्ध प्रवास न करता, उद्देशांमध्ये नवीनता आणून वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करण्याचा प्रयत्न करा.
Print Friendly
Tags:  |  |  | 

No comments:

Post a Comment