प्रवासाला गेल्यावर जेवढी ती सहल महत्त्वाची तेवढंच तुम्ही वास्तव्य कुठे करता हेही महत्त्वाचं ठरतं. मुक्काम चांगल्या ठिकाणी पडला, चांगले यजमान मिळाले तर प्रवासाचीही गोडी वाढते. मग निर्धोकपणे तुम्ही फिरायला मोकळे होता.
कोणत्याही ठिकाणी जाण्याचा बेत तर आपण तात्काळ घरबसल्या आखू शकतो पण खाणं, राहणं अशा काही गोष्टींचीही सोय लावावी लागते. फिरण्यासाठी दर महिन्याला काही हजार रुपये खर्च करणारे अनेक जण आहेत. तसेच वर्षाला लाखो रुपये खर्च करणारेही आहेत. पण यामध्येही बजेट ट्रॅव्हलर म्हणजे मोजूनमापून पैसा खर्च करून पण त्याच पैशात चांगल्या सुविधा मिळवण्याच्या शोधात असणारे प्रवासीही असतातच की.
आजकाल फिरणं, पर्यटन एवढं महाग झालेलं आहे की एका सहलीवर आरामात २०-५० हजार रुपये खर्च होतात. हा माणशी खर्च आहे. चार-पाच माणसांच्या कुटुंबाला तर या पटीत खर्च येतो. फिरायचं म्हटलं की मग वाहन खर्च, अन्न खर्च व राहण्याचा खर्च हे तीन खर्च प्रामुख्याने डोळ्यांसमोर उभे राहतात. हे तीनही खर्च तुम्ही पाहिजे तसे वाढवू शकता किंवा कमी करू शकता. ते प्रत्येकाच्या आवडीवर अवलंबून आहे.
कुठेही गेलं तरी सर्वात जास्त खर्च होतो तो राहण्याच्या, वस्तीच्या जागेवर. खाण्या-पिण्याची सोय आपण एखाद्या मस्त ढाब्यावरही करू शकतो, मात्र जास्त दिवसांचे वास्तव्य असेल तेव्हा झोपण्यासाठी, राहण्यासाठी एका सुरक्षित जागेची गरज असतेच. ट्रेकिंग करणारे, गडमाथे पालथे घालणा-यांना अशा गडांवर किंवा नजीकच हमखास एखाद्या साधूची कोठी किंवा धर्मशाळा मिळतेच मिळते. किंबहुना आज इथे तर उद्या तिथे असा प्रवास करणा-यांसाठी धर्मशाळा हा राहण्याचा उत्तम पर्याय ठरू शकतो.
धर्मशाळा हा प्रकारच मुळात अशा फिरस्त्यांसाठी फार प्राचीन काळापासून विचार करून अस्तित्वात आलेला दिसतो. अशा धर्मशाळांमध्ये काही ठिकाणी मोफत वास्तव्य करता येते तर काही ठिकाणी थोडेफार शुल्क द्यावे लागते. काही धर्मशाळांमध्ये खासगी खोल्यांची देखील सोय असते, ती अर्थात जास्त पैशांनी. भटकंतीच्याच उद्देशाने बाहेर पडलेल्या काही जणांना एखाद्या मंदिरातला निवाराही भावतो.
नर्मदा परिक्रमा करणारे आपल्यामध्ये अनेक असतील. या परिक्रमेत कित्येक वेळा मंदिरांमध्ये, गावांमध्ये असा आसरा घ्यावा लागल्याची उदाहरणं ऐकलेली आहेत. अर्थात या सर्व ठिकाणांपैकी बायकांना सुरक्षित अशी फक्त धर्मशाळाच. हल्ली महाराष्ट्रातल्या बहुतेक देवस्थानांजवळ एक चांगली सोय झालेली आहे ती म्हणजे, भक्तनिवासाची. अगदी कमी पैशात देवस्थानांचे दर्शन घ्यायला गेलेल्या भाविकांची सोय तिथे होऊ शकते.
मात्र पंढरीची वारी किंवा कुंभमेळा यासारखा एखादा यात्रा महोत्सव असेल तर मात्र राहण्याची सोय चांगली होणं हे जरा मुश्कीलच. तिथे गर्दी, सुरक्षा, आरोग्य, स्वच्छता इ. निकष लावून जागा मिळवायला जाल तर रेतीमध्ये हिरा शोधण्याइतकं ते कठीण आहे.
खूप सारे पैसे टाकून आरामात एखादे महागडे हॉटेल मिळवता येतं, जिथे सर्व सुखसोयी मिळू शकतात. मात्र एखाद्या दुर्गम तरीही निसर्गरम्य गावात गेल्यावर सुखसोयींची अपेक्षाच का करा मुळात? अनेक ग्रुपसोबत सहली केल्यामुळे अनुभवाअंती माझ्या असं लक्षात आलं आहे की अनेक जणांना आपल्या शहरी सवयी मोडता येत नाहीत. जंगल असो वा पर्वतांच्या सान्निध्यातलं ठिकाण, लोकांना सुखासीनतेची सवय झाल्यामुळे त्यांना तिथे गेल्यावरही घरात लागणा-या सुविधाच लागतात. नागझिराला जाताना तिथे कोअर एरियात वीज नाही हे लोकांना आवर्जून सांगावं लागत असे.
लडाखसारख्या अति उंचावरल्या प्रदेशात वीज, पाणी यांची टंचाई असते. शिवाय खूप उंचावर असल्याने तिथे अन्नधान्य व इतर वस्तू मुबलकतेने वाहून आणणं हे कठीण असतं त्यामुळे त्यांची उपलब्धता ही पाहिजे तशी, वाट्टेल त्या प्रमाणात होत नाही.
अनेकांच्या हे लक्षात येत नाही. वस्तूंचा तुटवडा हा प्रकार अनेक ठिकाणी अनुभवायला मिळतो. पण त्यामागे प्रादेशिक, भौगोलिक कारणं असतात. ही गोष्ट लक्षात आली नाही की पर्यटक अरुणाचल, लेह-लडाखसारख्या दुर्गम ठिकाणी जाऊन देखील अवास्तव गोष्टींची आणि त्याही वेळच्या वेळी मिळण्याची अपेक्षा करतात. जी अर्थातच पूर्ण करणं तिथल्या स्थानिकांच्या कुवतीबाहेरचं असतं.
पाण्याची कमतरता ही आपल्या भारतात अनेक ठिकाणी आढळणारी समस्या आहे. मध्यंतरी राजस्थानात एका हॉटेलातील स्वच्छतागृहात फलक लिहिलेला पाहिला की पाणी अत्यंत जपून वापरावे व आवश्यकतेपेक्षा जास्त वेळा फ्लश करू नये. राजस्थानमधील पाण्याच्या तीव्र टंचाईची बाहेरून येणा-या पर्यटकांना जाणीव करून देण्यासाठी तसंच पाणी वाचवा हा संदेश देण्यासाठी हा फलक लावलेला होता.
काही पर्यटकांना अशा प्रकारच्या कोणत्याही सूचना देणा-या हॉटेलांमध्ये वगैरे वास्तव्य करायला आवडत नाही. खरं तर ही माणसं अस्सल पर्यटक नाहीच असं म्हणता येईल. खरा पर्यटक हा त्या त्या भौगोलिक परिस्थितीशी स्वत:ला जुळवून घेतो व शक्य तितक्या कमी सोयीतही प्रवासाचा आनंद शोधत असतो.
वारंवार आवडीने किंवा काही कारणाने प्रवास करणा-या लोकांपाशी राहण्याच्या उत्तम ठिकाणांची एक यादीच असते. या यादीमध्ये महागडय़ा हॉटेलांची नावं नसतात तर उत्तम अशा होम स्टेंची, साधारण अशा हॉटेलांची व लॉजिंग-बोर्डिगची नावं असतात. कर्नाटकात फिरताना एक नाव असंच आमच्या यादीत भर घालून गेलं ते म्हणजे दास प्रकाश. अगदी साधारण अशा या लॉजिंगमध्ये अगदी महिलांनीही जाऊन राहावं इतकी चांगली व्यवस्था आहे आणि दरही अगदी कमी.
वास्तविक बॅकपॅकर्ससाठी उत्तम अशी हॉटेलं ठिकठिकाणी असतातच. किंबहुना खास बॅकपॅकर्ससाठीच अशी हॉटेलं काढली जातात. जिथे कमी पैशात एका दिवसापासून ते अगदी एक महिन्यापर्यंत असं कितीही वास्तव्य करता येतं. काही लॉजेसमध्ये खाण्याचीही सोय असते तर काही ठिकाणी ती नसते. असेच एक हॉटेल मिळालं ते गोहाटीला. सुंदरबन गेस्ट हाऊस नावाचे.
पूर्णपणे बॅकपॅकर्ससाठीचा लॉज. इथे मी रात्री पोहोचले होते. पण मॅनेजरने अत्यंत आदबशीरपणे सर्व काही व्यवस्था करून दिली. अशा ठिकाणी खाणं उत्तम दर्जाचं मिळेलच, अशी काही अपेक्षा करायची नसते. मात्र एक स्त्री म्हणून सुरक्षेची जी अपेक्षा असते, ती माझ्यासाठी देशातल्या बहुतांश ठिकाणी पूर्ण झालेली आहे. शिवाय मदतही केली जाते. भारतीय स्त्रियांबरोबरच परदेशी पर्यटक महिलांनाही चांगलं वागवलं जातं.
निदान मी तरी आतापर्यंत ज्या ठिकाणी उतरले आहे, त्या ठिकाणचे अनुभव मला चांगले आलेले आहेत. उदयपूरचं पॅनोरमा गेस्ट हाऊस हे त्यापैकीच एक. काही हॉटेल्स व लॉजेस हे तर अशा बॅकपॅकर्सच्याच जीवावर विशेषत: परदेशी पर्यटकांच्याच बुकिंग्जवर चालतात. बघावं तेव्हा तिथे देशी-परदेशी पर्यटकांचा अड्डाच असतो. मात्र लॉजेस किंवा गेस्ट हाऊसची ही सोय फक्त शहरी ठिकाणीच मिळते.
जंगलांमध्ये फिरायला जायचं असेल तर तिथे मात्र महागडय़ा रिसॉर्ट्सचं व हॉटेलांचं पेव फुटलेलं असतं. एखाद्या जंगल ट्रिपवर पैसे वाचवायचे असतील तर जवळपासच्या ठिकाणच्या गेस्ट हाऊसचा किंवा होम स्टेचा शोध घ्यावा. एखाद्या शहरामध्ये रमून जायचं असेल, तिथली सर्व स्थानिक वैशिष्टय़ं जाणून घ्यायची असतील तर मात्र होम स्टेला पर्याय नाही.
प्रवास, फिरणं वगैरे आलं की कुठेतरी राहणं, वस्ती ही ओघाने आलीच. आता वस्ती या प्रकाराची वेगवेगळी रूपं असू शकतात. आपल्या वाटय़ाला प्रवासात कशा प्रकारचा निवास येईल हे सांगता येत नाही. पूर, पाऊस इ. आपत्कालीन परिस्थितीत सापडलेल्या लोकांना त्यांनी आसरा घेतलेली ठिकाणं कायम लक्षात राहतात. तशीच एखाद्या सुंदर ठिकाणी केलेलं वास्तव्य तिथे फारशा सोयीसुविधा नसल्या तरीही त्या स्थळाच्या सौंदर्यामुळे लक्षात राहतं. तुमचा आतापर्यंतचा सर्वात चांगला मुक्काम कुठे झाला होता ते तुम्हीही आठवून पाहा.
No comments:
Post a Comment