Translate

Friday, September 25, 2015

शहरांची बातच वेगळी !



फिरण्यासाठी कुठे जावं हा नेहमीच एक चर्चेचा विषय असतो. त्यातही मग शहरांमध्ये जावं की एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी जावं हा प्रश्न पडतो. प्रत्येकाची आवड निरनिराळी असते. काही जण शहरी कोंदणातून बाहेर न पडता एखाद्या दुस-या शहरातच फिरायला जातात. पण ही शहरांमधली भ्रमंतीदेखील मनोरंजक असू शकते.
header-1-1‘‘तुम्ही काय सतत फिरत असता, तुमची तर मजाच असते,’’ अशी वाक्यं कानावर पडणं हे नेहमी फिरतीवर असणा-या लोकांसाठी नवीन नाही. पण साधारण माणसांपेक्षा ज्यांचं फिरणं हे जरा जास्त होत असतं, बारा गावांमधील लहान-मोठे रस्ते ज्यांच्या पायाखालून गेलेले असतात त्यांनाच या सततच्या प्रवासांमधल्या अडचणी माहीत असतात.
मी नेहमीच एक बजेट ट्रॅव्हलर असते. या प्रकारातील प्रवासी शक्यतो निघण्यापूर्वी काही गोष्टींची व्यवस्थित माहिती घेऊन तयारीत निघतात. विशेषत: एकटय़ाने प्रवास करत असाल तर अशाच प्रकारे निघालेलं हे उत्तम असतं. त्यामुळे मग त्या ठिकाणी गेल्यावर कोणत्याही गोष्टीसाठी शोधाशोध करावी लागत नाही. परंतु एखाद्या अनोळखी शहरात भटकायची अनपेक्षित संधी मिळाली तर सोडू नये.
कधीकधी नव्याच ठिकाणी कारणाने किंवा कारणाशिवाय फिरण्यातही मजा असते. त्यातून बरंच काही समजतं. असं भटकणं हे मला हमखास आवडतं. नेहमीच जंगलात फिरण्यापेक्षा हाही एक आवडता पर्याय. खूप दूर जाण्यासाठी वेळ हाताशी नसेल आणि निसर्गाची आवड नसेल तर शहरांचा शोध घ्या. हल्ली (गेली ३-४ र्वष) मुंबई शहरात काही संस्थांनी एक टूम काढलेली आहे, हेरिटेज वॉकची. कल्पना खूप छान आहे.
मुंबईला स्वत:चा एक इतिहास आहे. तो जाणण्याची संधी या निमित्ताने मिळते. या हेरिटेज वॉकना लोकांचा नेहमीच छान प्रतिसाद मिळतो. पुणे शहरात देखील जनवाणी संस्था पुणे नगरपालिकेच्या सहाय्याने हेरिटेज वॉक घेते. प्रसिद्ध नाटय़निर्माते अनंत पणशीकर यांची कन्या प्राजक्ता पणशीकर या हेरिटेज वॉकची सल्लागार आहे. ऐतिहासिक वारसा स्थळं व हेरिटेज वॉकचं महत्त्व, एखाद्या शहराची सौंदर्यस्थळं कशी टिपावीत, ती का जपली गेली पाहिजेत, भारतात आपण या अनुषंगाने काय करू शकतो यावर ती अत्यंत जिव्हाळ्याने बोलते.
पुणे हेरिटेज वॉक हा प्रोजेक्ट तिनेच डिझाईन केलाय आणि तिच्या या यशस्वी संकल्पनेसाठी तिला राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय पारितोषिकही मिळाले आहे. अशीच एक शहरांवर प्रेम करणारी आहे गोव्याची फोटोग्राफर आसावरी कुलकर्णी, हिने ‘मार्केट्स ऑफ गोवा’ हे पुस्तक संशोधन करून लिहिलं आहे. गोवा तसंही रंगीन शहर. इथली नाईट फ्ली मार्केट्स लोकप्रिय आहेत पण गोव्यात अनेक प्रकारचे ५८ बाजार भरतात. गोव्याच्या संस्कृतीच्या या अविभाज्य भागावर आसावरीने लिहिलेलं हे मनोरंजक कॉफी टेबल बुक प्रकारातलं छायाचित्रांचे पुस्तक गोव्यात फिरताना आवर्जून पाहावे असे आहे.
आजकाल मोठय़ा शहरांमध्ये एकटय़ाने फिरायचं असेल तर अशा प्रकारची अनेक पुस्तकं उपलब्ध असतात. कोणत्याही पुस्तकांच्या मोठय़ा दुकानात ती मिळतात. नाहीतर टीव्हीचा पर्याय आहेच. ज्यावर डिस्कव्हरीसारख्या वाहिन्यांवरील कार्यक्रमांमध्ये विविध शहरांची मनोरंजक माहिती दिली जाते.
सर्वात जास्त उत्तम उपाय म्हणजे, एखादा स्थानिक मित्र-मैत्रीण गाठायची आणि फिरायला सुटायचं! अशा भेटीगाठी घेत शहराची सैर करण्यात धमाल असते. पुणे, मुंबईप्रमाणेच लखनौ, दिल्ली, अहमदाबाद, गोवा, कोलकाता अशा विविध प्रकारचा इतिहास असणा-या शहरांमध्ये फिरणं यात देखील वेगळीच मजा असते.
परदेशात गेल्यावर प्रामुख्याने वेळ प्रसिद्ध शहरांमध्ये फिरण्यातच जातो. त्या त्या शहरातली प्रेक्षणीय ठिकाणं पाहण्याऐवजी तिथली खाद्यसंस्कृती, माणसं, त्यांची संस्कृती पाहत फिरा. पण फिरणं मोठय़ा शहरातच करावं असं काही नाही. एखाद्या लहानशा ठिकाणची भटकंती देखील खूप छान वाटू शकते. आम्ही कुर्गसाठी मडीकेरीला थांबलो होतो. हे एक लहानसं गावच आहे. पण कुर्ग तालुक्यात फिरायला येणारे बहुतांशी पर्यटक हे मडीकेरीलाच थांबतात. निसर्गरम्य मडीकेरी फिरताना थकवा कुठल्या कुठे पळून जातो.
मनमोकळं फिरण्याची संधी अशी शोधावी लागते. निसर्गप्रेमींना अशी संधी मिळते ते नेचर वॉकच्या निमित्ताने. नेचर वॉक म्हणजे लहानशा पायवाटांवरून केलेली भटकंती. ज्यांना किल्ले-डोंगर चढणं-उतरणं जमत नाही किंवा एखाद्या अरण्यात खूप दिवस जाऊन राहण्याइतकाही वेळ नसतो, त्यांना निसर्गाजवळ जायची संधी देणारा प्रकार म्हणजे नेचर वॉक किंवा नेचर ट्रेल. एखाद्या वीकेंडला अशा ट्रेलला जाऊ शकता. मुंबईत पावसाळ्यात तर अशा नेचर वॉकना उधाणच येतं.
शहरातच फिरायचा बेत असेल तर त्या शहराचं वेगळेपण शोधत फिरा. कोणताही गाईड न घेता फिरा. वेगवेगळ्या वाहनांनी फिरा. नव्या माणसांना भेटा, जुन्या मित्रांना भेटा. स्थानिक प्रेक्षणीय ठिकाणं पाहा. गजबजाटात सामील होऊन जा. एखाद्या शहराची सर्व वैशिष्टय़ं, तिथली संस्कृती, परंपरा जाणून घ्यायच्या असतील तर नेहमी सणावारी जावं. सण हा त्या शहरांना जाणून घेण्याचा एक उत्तम काळ असतो.
तेव्हा सर्व माणसं एक प्रकारच्या वेगळ्याच उत्साहात असतात. एक प्रकारची ऊर्जा तेव्हा पूर्ण शहरातूनच ओसंडून वाहत असते. माणसांचे चेहरे कसे आनंदी दिसतात. एरव्हीची दु:खं माणूस सण-उत्सवांच्या काळात थोडा काळ विसरून गेलेला असतो. त्यामुळेच उत्सव काळात कोणतंही शहर एक वेगळंच रूप लेऊन आपल्याला भेटतं. मग ते गोवा असो किंवा चंदीगढ. अशीच एक भटकंती केली होती ती कोलकाता शहरात. २-३ दिवस शहरातली सर्व वाहतुकीची साधनं वापरत आणि चालत चालत बरंच काही पाहून झालं.
खरं तर फिरायचं असेल तर परदेशी पर्यटकांचा आदर्श ठेवावा न् एक नकाशा हातात घेऊन मार्गी लागावं. बहुतेकांना कॅमेरा घेऊन फोटोही काढणं आवडतं. तेव्हा मात्र थोडी काळजी घ्यावी, कारण स्थानिकांना फोटो काढलेले चालतील की नाही याची चाचपणी करावी, मगच फोटो काढावे. एकूणच आता मौसमही मस्त आहे, तेव्हा सर्व काळज्या विसरा आणि भटकंतीला बाहेर पडा !
Print Friendly
Tags:  |  | 

No comments:

Post a Comment