Translate

Friday, September 25, 2015

वाघ आहे म्हणूनच..



रणथंबोरच्या जंगलात तळ्याकाठी ती चार रुबाबदार पिल्लं, (खरं तर वाघाचे बच्चे, कारण साधारण एक वर्षाचे झाल्यावर वाघाचे बच्चे हे गोंडस पिल्लं वगैरे म्हणण्याला लायक राहात नाहीत. कारण त्यांच्यातला देखणा वाघ आकार घेत असतो.) त्यांच्या तेवढयाच उमद्या दिसणा-या, आईभोवताली खेळत होती. काही प्राणी पाहिल्यावर आपल्या जन्माचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. वाघ हा त्यातलाच एक. 
tigerजंगलातल्या खेपा अधिकाधिक वाढू लागल्या तसं लक्षात आलं की वाघ दृष्टीस पडणं ही तेवढी सोपी गोष्ट नाही. एकतर वाघ संख्येने उरलेत थोडके व त्यातच तो एकांतप्रिय प्राणी, कुठे तरी गवतात दडून राहणारा, त्यामुळे तो प्रत्येक वेळीच दिसेल असं नाही.
वाघाचं दर्शन हे खरोखरीच सुखावणारं आहे, वेड लावणारं आहे; पण म्हणून दरवेळीच हे सुख मिळेल असं नाही. त्याचं येणं हे अंगावर थरार उमटवणारं आहे. तो आला की आपल्यापुढे स्तब्धपणे पाहण्याशिवाय कोणताच पर्याय नसतो. (अर्थात अनेक जण वाघ पाहतानाही घरात असल्यासारखी कचकच करतात ती गोष्ट वेगळी!)
वाघाच्या बछडय़ांचं ते गवतात बागडणं, आईच्या अंगावर लोळणं, तिला सतावणं, झुडपांमध्ये लपाछपी खेळणं, एकमेकांशी मस्ती करणं, पाण्यात डुबकी मारणं हे सर्व पाहताना कमालीचा थरार वाटत तर होताच; पण एकीकडे खूप वाईटही वाटत होतं.
गराडा घालून उभ्या असणा-या माणसांबद्दल अनभिज्ञ असणा-या या पिल्लांचं आयुष्य निसर्गावर नाही तर त्याच्या भोवतालच्या माणूस नावाच्या भयानक, वाघापेक्षा हिंस्त्र प्राण्यावर अवलंबून आहे हा विचार मनाला घाबरवत होता. व्हॉट्सअ‍ॅप व फेसबुकवर नेहमी एक पोस्ट वाचायला मिळते, एका चित्रात एक ग्रेट व्हाईट शार्क पोहताना दाखवलाय व त्याच्या बाजूला लहानसा दिसणारा माणूस पोहतोय.
चित्रात लिहिलंय की तुम्ही पाहताय तो जगातला सर्वाधिक हिंस्त्र प्राणी आहे व त्याच्या उजव्या बाजूला शांतपणे पोहतोय तो ग्रेट व्हाईट शार्क आहे. या संदेशामधून माणसाने आजवर जगातल्या कित्येक प्रजातींची किती अमाप हानी केलीय हे लक्षात येतं. ग्रेट व्हाईट शार्क हा समुद्रातला उत्तम शिकारी, परंतु माणूस हा त्याच्याही पेक्षा हिंस्त्र शिकारी. त्याचप्रमाणे वाघ हा जमिनीवरला सर्वोत्तम शिकारी, जंगलचा राजा, मात्र माणसाने वाघांनाच नष्ट करून त्याचा हा किताब पायदळी तुडवलाय.
‘आपण जगातले सर्व वाघ संपवलेत..’ हे वाक्य लिहिलं जाईल तो काळ फारसा दूर नाही. ३,२०० या वाघांच्या आत्ताच्या आकडयातले ३, २ चे आकडे पुसले जाऊन फक्त शून्य वाघ उरतील, त्यासाठी खूप काळ लागणार नाहीये. १९१३ सालापर्यंत आशिया खंडात एक लाखाहून अधिक वाघ होते, यावर विश्वास बसणं आताच्या पिढीतल्या कोणाहीसाठी कठीण आहे. मागील शंभर वर्षात ९७ टक्के वाघ विविध कारणांनी नाहीसे झाले.
आज पूर्ण जगात मिळून फक्त ३,२०० जंगलात खुले फिरणारे वाघ उरलेत. त्यातील किती जण तस्करांच्या बंदुकीच्या निशाण्यावर आहेत हे माहीत नाही. हा आकडा खूपच भयावह व दुर्दैवी आहे. नुकताच जागतिक वाघ दिवस जगातल्या अनेक ठिकाणी, अनेक संस्थांनी विविध कार्यक्रम करून साजरा केला.
२०१० साली सेंट पीट्सबर्ग टायगर समिटमध्ये ग्लोबल टायगर डे दरवर्षी २९ जुलैला असेल, अशी घोषणा करण्यात आली. खुल्या जंगलात राहणा-या वाघांना अधिक संरक्षण मिळावं, त्यांचं संवर्धन व्हावं यासाठी हा दिवस ठरवण्यात आला आहे. यंदा फक्त ३,२०० वाघ या दिवसाचे मानकरी होते.
आपण भारतीय त्यामानाने सुदैवीच म्हणायला पाहिजेत की आज इथे आपल्या मुलांना दाखवण्यासाठी जंगलांमध्ये थोडे तरी वाघ शिल्लक आहेत. किंबहुना भारतीय पर्यटनाला ‘ग्लॅमर’ मिळवून दिलं ते वाघांनीच. ‘इन्क्रेडिबल इंडिया टुरिझम’च्या महसुलातील अत्यंत महत्त्वाचा वाटा वाघ उचलतो.
तसे वाघ रशिया, चीन, नेपाळ, थायलंड, बांगलादेश, कंबोडिया, म्यानमार, दक्षिण कोरिया, लाओस, इंडोनेशिया, मलेशिया, व्हिएतनाम व भूतान येथे देखील आहेत. पण जगात इतर कोणत्याही देशापेक्षा जंगलात मोकळ्या फिरणा-या वाघांची संख्या आपल्या देशातच जास्त आहे त्यामुळे साहजिकच वाघ या दुर्मीळ ठरलेल्या प्राण्याला पाहण्यासाठी जगभरातून पर्यटकांना इथे यावं लागतं.
मात्र ही स्थितीदेखील फार दिवस टिकेल याची शाश्वती नाही. याचं कारण आपल्याकडचं वाघांच्या अवैध शिकारीचं प्रमाण. अर्थात, या सर्वात सकारात्मक बाजू म्हणजे भारत व जगातील इतर देशांमधून अनेक व्यक्ती व संस्था या वाघांचं संवर्धन व संरक्षणासाठी पुढे येत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना लोकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण वाघांचं संरक्षण करायचं असेल तर त्यांच्या आजूबाजूला राहणारी माणसं व वाघांमध्ये सुसंवाद जोडला जाणं अत्यंत गरजेचं आहे. या दोघांनीही एकमेकांचं अस्तित्व आनंदाने स्वीकारून तडजोड करून राहणं आवश्यक आहे. जंगलांच्या आसपास राहणा-या या माणसांना वाघाचा थेट सामना करावा लागतो. इथे शहरात राहून वाघ बचाव
मोहिमेबद्दल लिहिणं सोपं असतं, मात्र वाघाचा वावर असलेल्या परिसरातून बॅटरी वा कंदील घेऊन चालत जाण्याचं धारिष्टय़ आपल्यापैकी शहरात राहणारे किती जण दाखवू शकतात? त्यामुळे वाघांच्या संवर्धनाचे उपाय सांगताना, ते प्रत्यक्षात आणताना फिल्ड वर्क, तिथल्या लोकांशी संवाद साधणं हे खूप महत्त्वाचं आहे.
आज जगातील कित्येक नामवंत मंडळी, मोठया संस्था या वाघांच्या संरक्षणासाठी काम करत आहेत. भरपूर पैसा ओतत आहेत. पण फक्त म्हणूनच वाघ जिवंत आहेत असं नाही, तर वाघांसोबत प्रत्यक्ष जंगल शेअर करणा-या माणसांमुळे देखील ते जिवंत आहेत.
वाघांच्या नष्ट होण्यामागील एक मोठं कारण म्हणजे त्यांचा नैसर्गिक अधिवास नाहीसा होणं हे आहे. वाघांसाठी जंगलच उरलं नाही तर त्यांचं आसरा व खाद्याविना नष्ट होणं हे स्वाभाविकच आहे. वाघांच्या अस्तित्वासाठी आवश्यक जैविक साखळी तिथं प्रत्यक्ष राहणारा माणूस टिकवतो. तिथला वनाधिकारी टिकवतो. जंगलासाठी महसूल उत्पन्न करणारा पर्यटक टिकवतो.
तिथले (शिका-यांची नजर न पडलेले) प्राणी टिकवतात. वाघ नाहीसे होण्यासाठी वातावरणातील बदल हे सुद्धा मोठं कारण ठरलं आहे, विशेषत: पश्चिम बंगालमधील सुंदरबनातील वाघांवर याचा जास्त परिणाम होतो आहे. आज सुंदरबनात वाघ पाहायला मिळणं अत्यंत कठीण आहे. तिवरांच्या जंगलाचा नाश, तसंच पाण्याची वाढती पातळी अशा काही कारणांमुळे इथे वाघांची संख्या कमी होते आहे.
आज वाघ आययूसीएन संस्थेने रेड लिस्टमध्ये दुर्मीळ या प्रकारात समाविष्ट केला आहे. उद्या तो अत्यंत दुर्मीळ, त्यानंतर नामशेष अशा प्रकारांमध्ये जायला वेळ लागणार नाही. अत्यंत खेदाची गोष्ट म्हणजे वाघाच्या नामशेष होण्याची वाट पाहणारे देखील जगात लाखोंनी आहेत. याला कारण वाघाच्या शरीराच्या भागांची तस्करी, वाघाच्या शरीराचे मिशांपासून ते नखांपर्यंत सर्व भाग अवैधरित्या खरीदले जातात व उपयोगात आणले जातात. हा व्यापार खूप मोठा आहे आणि वाघांच्या या घटत्या संख्येचंही ते एक मोठं कारण आहे. वाघाच्या शरीराचे भाग लाखो रुपये देऊन काही श्रीमंत ग्राहकांनी संग्रहात ठेवलेले आहेत. जसजशी वाघांची संख्या कमी होते आहे तसतशी या ‘अमूल्य’ संग्रहाची किंमत वाढते आहे. त्यांच्या नामशेष होण्यावर सट्टा लावणारे देखील आहेत. नागालँडमध्ये हॉर्नबिल फेस्टिव्हल साजरा होतो,
मात्र हे पक्षी अति शिकारीमुळे तिथून नाहीसे झालेत. आता हॉर्नबिल पक्ष्यांची निशाणी फक्त तिथल्या लोकांच्या पारंपरिक दागिन्यांमध्ये उरली आहे. या पक्ष्यांप्रमाणेच वाघांवरही अशी वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. जेव्हा वाघ फक्त दिवाणखान्यातील त्याचं कातडं, त्याच्या अंगापासून बनवलेली औषधं, दागिने, कपडे अशा वस्तूंमधून उरेल.
सुदैवाने भारतीयांवर अजून अशी वेळ आलेली नाहीये. आपल्या जंगलांमध्ये वाघांचा मुक्त संचार आजही आहे. परंतु आज प्रत्येक वेळी भारतीय जंगलांमध्ये मुक्त संचार करणारा वाघ पाहिल्यानंतर हा थरार, हा रोमांच पुन्हा एकदा अनुभवता येईल की नाही, असा प्रश्न मनात उभा राहतो.
Print Friendly
Tags:  |  |  |  |  | 

No comments:

Post a Comment