Translate

Friday, September 25, 2015

राजेशाही जोधपूर

राजस्थानात अनेक दिवस फिरल्यानंतरचा अखेरचा टप्पा होता तो जोधपूर. मुळात राजस्थान म्हटल्यावरच डोळ्यांपुढे दिमाखदार राजेशाही वातावरण व परंपरा येतात. जोधपूरही त्याला अपवाद नाही. तरी काळानुसार बदल घडत जोधपूर राजस्थानचं मॉडर्न शहर किंवा मेट्रो सिटी झालंय.
jodhpur
मेहरानगडावरून नजर टाकली तर सारं जोधपूर नजरेच्या टप्प्यात येतं. राजस्थानचं सर्वात मोठं असं दुसरं शहर. राजस्थानची ब्ल्यू सिटी जोधपूर. डोळे दीपवून टाकणा-या त्या उन्हाच्या पिवळ्याजर्द बॅकड्रॉपवर निम्म्याहून अधिक जोधपूर निळ्या रंगांच्या विविध छटांमध्ये रंगलेलं दिसतं. जोधपूरच्या जुन्या भागाचा हा निळा नजारा बघायला खूप छान वाटतं. इतक्या उंचावरून खाली दिसणारं छोटंसं शहर आणि त्यातले निळ्या रंगाचे कप्पे. ही घरं निळी का आहेत याच्या अनेक कथा आहेत. चालता चालता तुम्ही पण एखाद्या घरात सहज डोकावू शकता.
गप्पा मारू शकता. काही म्हणतात की राव जोधाने तेव्हा जोधपूरमधली सर्व घरं निळ्या रंगात रंगवायचं फर्मान काढलं होतं. तर काही म्हणतात ब्राह्मणांची घरं वेगळी ओळखता यावी म्हणून त्यांना निळा रंग दिलेला असतो. तर काही म्हणतात की या घरांना वाळवी लागू नये म्हणून काही केमिकल्स निळ्या रंगात मिसळून लावली जातात. कथा काहीही असो. मेहरानगडावरून हे दृश्य नक्की पाहावं असं आहे. १८९९मध्ये बांधलेलं महाराजा जसवंत सिंग दुसरे यांचे स्मारक ‘जसवंतथाडा’ हे देखील मेहरानगडावर जातानाच वाटेत दिसतं. खूप लांबवर उमेदभवन पण दिसतं.
इथल्या कट्टयावर उभं राहून चालत चालत जाताना हा गड बांधणा-या शासकांच्या हुशारीची कल्पना येते. परकियांच्या आक्रमणाची चाहूल घेता यावी म्हणून हा किल्ला बांधलेला. १ मे १४५९ रोजी हा किल्ला बांधायला घेतला, तो महाराजा जसवंतसिंग यांनी त्यांच्या कार्यकाळात पूर्ण केला. राव जोधा हा राजा रणमलचा २४वा मुलगा व राठोड घराण्याचा १५वा शासक. तोच जोधपूरचा संस्थापक.
जोधपूरच्या आधी राजस्थानची राजधानी ही मंडोरला होती. मंडोर हे जोधपूरपासून ८-१० कि.मी. अंतरावर आहे. मंडोरला असणारी सुरक्षितता राव जोधाला कमी भासू लागली, तशी त्याने राजधानी जोधपूरला हलवली. जोधपूरवर पूर्णपणे लक्ष ठेवता यावं म्हणून हा मेहरानगड बांधला. मिहिर म्हणजे सूर्य व हा सूर्याचा गड. सूर्य हे राठोड घराण्याचं एक प्रमुख दैवत. पुढे मिहिरगडाचा अपभ्रंश होत होत ते मेहरानगड झालं असावं.
असं म्हणतात की, किल्ल्याचं चांगभलं व्हावं म्हणून राजाराम मेघवाल या निष्ठावान सेवकाचा जिवंत बळी देण्यात आला. त्याच्या मागे त्याच्या कुटुंबीयांची तहहयात काळजी घेतली जाईल असं वचन राजाने त्याला दिलं. या मेघवालचे वंशज अजूनही राजबागमध्ये राहतात. तिथेच राजाराम मेघवाल गार्डन आहे. या गडाचा विस्तार ५ एकरावर आहे. एखादा सर्वगुणसंपन्न किल्ला जसा असावा तसाच हा मेहरानगड आहे. ब-याच चित्रपटांतून या किल्ल्याने दर्शन दिलेलं आहे. त्यामुळे तरुणाईलाही याचं आकर्षण आहे. याचं बाकी बांधकाम १६३८-१६७८ या काळात जसवंतसिंगच्या काळात झालं.
गडावर पाहण्यासारखं इतकं काही आहे की आरामात चार-पाच तास जाऊ शकतील. इथलं संग्रहालय तर नक्कीच पाहण्यासारखं आहे. दोन कॅफेटेरिया देखील आहेत. मध्येच कोणी राजस्थानी वाद्य कलाकार देखील आपल्या कुटुंबाला घेऊन कला प्रदर्शन करत बसलेला दिसतो. चपला, पर्स, कपडे आदी वस्तू विकणारे विक्रेते आहेत. त्यांची खूप दुकानं दिसतील. गडावर तोफादेखील आहेत.
राजघराण्यातील लोकांचे महाल व त्यांच्या वस्तू पाहून आश्चर्य वाटतं. मन त्या काळात जातं. विशेषत: मोती महल, फूल महल, शीश महल, दौलतखाना येथील कपडे, मोठी चित्रं, पालख्या, अंबा-या, हौदे, शस्त्रं, वाद्यं इ. पाहताना आपण मश्गूल होऊन जातो. जय पोल, फतेह पोल, देढ का मग्रा पोल, लोहा पोल अशाच काही नावांचे गडाला सात दरवाजे आहेत. ५०० वर्ष जुन्या असलेल्या या किल्ल्यावर दरवर्षी दस-याला पूजा होते. येथे चामुंडा मातेचे मंदिर आहे. २००८ साली इथल्या पायऱ्यांवर चेंगराचेंगरी होऊन सुमारे २०० लोक मृत्यू पावले होते. राजस्थानातल्या अनेक किल्ल्यांपैकी प्रेक्षणीय असा हा एक मेहरानगड.
याशिवाय जोधपूरचं दुसरं आकर्षण म्हणजे उमेदभवनाची देखणी वास्तू. हा जोधपूरचे महाराजे उमेद सिंग यांचा राहता पॅलेस. आता त्यांचे वंशज गज सिंग येथे राहतात. जगातल्या काही राहत्या राजवाडय़ांपैकी सर्वात मोठा असा एक. चित्तर म्हणजे रेड स्टोनमधून हा राजवाडा बांधून काढलाय, त्यामुळे पूर्वी चित्तर पॅलेस असंही म्हणत. १९२९ ते १९४३ असं चौदा वर्ष याचं बांधकाम सुरू होतं, पण निर्मिती पूर्ण होण्यासाठी इतकी वर्ष घेणारा हा राजवाडा देखील तसाच विलोभनीय आहे. पौर्णिमेच्या चांदण्यात हा अजूनच सुंदर दिसतो म्हणून काही जण याला राजस्थानचा ताजमहाल म्हणतात.
ब्रिटिश वास्तुस्थापत्यकार हेन्री लँकेस्टर याची ही रचना ३००० कामगारांनी पूर्णत्वाला नेली. बांधकामासाठी मकराना मार्बल व बर्मीज टिकवूडही वापरलं गेलं. तेव्हाच्या काळात याचा खर्च आला होता (अवघा) १५ लाख रुपये. मी विचार केला की आता एवढया पैशांत साधं घर घेणं देखील मुश्कील. मी मैत्रिणीच्या घरी उतरले होते, त्या घरातून देखील एअरपोर्ट रोडला असणारं हे उमेद भवन दिसायचं. २६ एकर जागेवर पसरलेल्या उमेद भवनाला बागेची देखील जोड आहे. येथील विंटेज कारचे संग्रहालय, पेंटिंग्ज, घडयाळं, राजेशाही दागिने हे सर्व पाहण्यासारखे आहे.
उमेद भवनखेरीज राव जोधा डेझर्ट रॉक पार्कलाही भेट देता येते. या सर्व वास्तूंखेरीज जोधपूर हल्ली साहसप्रेमी पर्यटकांचं आकर्षण ठरतंय ते झिप लायिनग टूरमुळे. फ्लाियग फॉक्स नावाच्या कंपनीने मेहरानगडच्या पायथ्याशीच हा साहसी खेळ सुरू केला आहे. झिप लायिनग म्हणजे एक स्टिलची केबल काही किलोमीटरच्या अंतरामध्ये या टोकापासून त्या टोकापर्यंत बांधलेली असते. त्या केबलला लटकत (अर्थातच योग्य उपकरणांनिशी) दुस-या टोकापर्यंत घसरत जाण्याचा हा रोमांचक खेळ.
मेहरानगडच्या उत्तरेलाच खाली सहा झिप लाईन्स केलेल्या आहेत. ३०० मीटर अंतराच्या टप्प्यात ६ केबल बांधलेल्या आहेत. या झिप्समधील प्रदेशावरून लटकत घसरत जाणं हा एक अनोखा अनुभव ठरतो. स्काय डायिव्हग, बंगी जंिपगपेक्षा हा खेळ कमी जोखमीचा आहे तसंच कमी भीतीदायक आहे. त्यामुळे याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अनेक तरुण-तरुणी या साहसाचा अनुभव घेताना दिसतात. जोधपूरशिवाय राजस्थानात नीमराणा येथेही झिप लायिनग करता येतं.
जोधपूर बदलतंय याचा प्रत्यय मेहरानगडापाशी चालणा-या या खेळापासूनच येतो. शहरात काही ठिकाणी एखाद्या सुंदर लहानशा राजवाडयाप्रमाणे अनेक प्रॉपर्टीज दिसतात. ज्यांची किंमत कोटींच्या घरात आहे. मॉल व मोठया ब्रँडेड दुकानांची संस्कृती इथेही मुरली आहे. देशातल्या अनेक शहरांमध्ये गेलात तर शहरीकरणामुळे ओल्ड टाऊन असा एक विभाग हमखास आढळतो. शहरीकरणाच्या लाटेत सापडण्याआधी ते शहर कसं होतं हे पाहायचं असेल तर नेहमी अशा ओल्ड टाऊन विभागात फेरफटका मारावा.
Print Friendly
Tags:  |  |  |  | 

No comments:

Post a Comment