भारतातल्या प्रवासाचं एक वैशिष्टय़ म्हणजे इथे गावोगावी बदलत जाणा-या भाषा, त्यांचे सूर, त्यांचे हेल. हे सर्व अनुभवत जाणं. आपल्याकडे भाषा बोलण्याची पद्धत व पाण्याची चव या दोन गोष्टी दर बारा मैलांवर बदलतात असं म्हटलं जातं. भाषेवर आधारित कितीतरी म्हणी आपल्या देशात आढळतात. पण भाषांचं हे वैविध्य अनुभवायला आपल्यालाही कित्येक मैलांचा प्रवास केला पाहिजे, तरच भाषा सौंदर्यातली रोचकता कळते.
मुंबईत जन्माला आल्यामुळे लहानपणापासूनच अनेक भाषांशी ओळख झालेली. त्यातच आजूबाजूला विविध भाषिक राहायचे, त्यामुळे बंगाली, मल्याळी, कानडी, कोकणी, मालवणी, आगरी, पंजाबी, गुजराती अशा कित्येक भाषांशी तोंडओळख होती. प्रत्येक भाषेच्या-धर्माच्या मुलांशी खेळणं व्हायचं. समोरच मुसलमानांचा वाडा असल्यामुळे व त्यांची मुलं आमच्या शाळेतच असल्यामुळे त्यांचंही बोलणं कानावर पडायचं.
माणूस शब्दांनी व भाषेनं बांधला जातो हे सभोवतालच्या गप्पिष्ट बायकांकडे पाहून कळायचं. पण त्या लहान वयात भाषेविषयी कोणत्याच भावना मनात नव्हत्या. जगाची माहिती होत गेली, वाचन वाढत गेलं तसं वाटू लागलं की आपण बहुभाषिक, किमान द्वैभाषिक तरी असलं पाहिजे. पुढे जिथे तिथे फिरू लागले आणि बहुभाषी असलं पाहिजे ही इच्छा अधिकच टोचू लागली. त्या नादात फ्रेंच शिकले. एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीच्या न्यूजडेस्कसाठी काम करताना राज्यातल्या अठरापगड बोली कानावर पडू लागल्या. मग काही जणांशी त्यांच्यासारख्या शैलीत बोलण्याची मजा वाटू लागली. पुढे तोंडात नक्की कुठली शैली बसलीय हे कळेनासं झालं. त्या काळात मराठीचीच वेगवेगळी रूपं ऐकताना छान वाटायचं.
त्या त्या प्रांती प्रवास झालेला नसला तरीही एखाद्या व्यक्तीच्या मार्फत ती शैली ऐकायला मिळायची. हैदराबादच्या अडीच वर्षाच्या या वास्तव्यात मराठीखेरीज बंगाली, कन्नड, उर्दू, तेलगू अशा अनेक भाषांमध्ये संवाद होत असत. त्या त्या भाषांमध्ये मोडकातोडका का होईना, पण थोडाफार संवाद साधायला गंमत वाटत असे. त्यातूनच मग बंगाली शिकून घेतली. हैदराबादच्या आसपास व शहरात फिरताना तेलगू यावंच लागे. अन्यथा स्थानिकांशी संवाद शून्य होत असे. पण कन्नड व तेलगूचा अभ्यास पूर्ण व्हायच्या आधीच हैदराबाद सोडलं. नंतर प्रवासाचं वेड लागलं आणि पुढच्या अनेक प्रवासांमध्ये भाषांचं मोल कळत गेलं.
अनेक भाषांची तोंडओळख असल्यामुळे देशात ब-याच ठिकाणी प्रवास करताना मला खूप मदत झाली. परप्रांतात जाऊन तिथल्या माणसातला आपलेपणा, प्रेम बाहेर काढायला स्थानिक भाषेशिवाय अचूक पर्याय नाही. अनेक नाती याच भाषेच्या माध्यमातून जुळतात. एक नमस्कारच घ्या ना आपला.. दोन्ही हात जुळवून नमस्ते किंवा नमस्कार म्हणणं हे तर आता अगदी परदेशी पर्यटकांनीही आत्मसात केलंय. परकीयांसाठी भारतीय भाषेची ओळख या नमस्कारापासूनच सुरू होते. हल्लीची पिढी हुशार आहे.
कोणत्याही देशात जाताना तिथल्या स्थानिक भाषेचा अभ्यास करून अनेक जण आपल्या देशात येताना मी पाहिले आहेत. त्यामुळे चांगलं व तोडकंमोडकं हिंदी बोलणारे अनेक परदेशी पर्यटक फिरताना दिसतात. शिवाय ते आवर्जून हिंदी किंवा मराठी येत असेल तर तसा संवाद साधण्याचा, हिंदी-मराठी बोलण्याचाही प्रयत्न करतात. याचं मला नेहमीच कौतुक वाटत आलं आहे. पण परदेशी पर्यटकांमुळे आपल्याकडील पर्यटन व्यवसायाशी संबंधित कितीतरी लोकांनी फ्रेंच, जर्मन, रशियन वगैरे भाषा शिकून घेतल्या आहेत.
रणथंबोर, कान्हासारख्या वर्दळीच्या राष्ट्रीय उद्यानांमध्ये गेल्यावर याचं प्रत्यंतर येतं. तिथे परकीय भाषा येणा-या गाईड्सना खास मागणी असते आणि हे गाईड्स या परकीय भाषा खूप सफाईने बोलत असतात. निदान तसं जाणवतं तरी. चंद्रपूर, कर्नाटक अशा काही ठिकाणी जंगलांमध्ये फिरायला गेल्यावर थोडाफार संवाद त्या त्या भाषेत, शैलीत साधला तर गाईड्सशी चांगलं नातं जमतं व पुढची सफरही छान होते. राजस्थानात सर्वाधिक परदेशी पर्यटक येतात. तिथल्या दुकानदारांनीही जर्मन, रशियन इ. भाषांमधली वाक्यं शिकून घेतली आहेत.
आपल्या देशात हिंदीचं प्राबल्य असलं तरी दक्षिण भारतात मात्र हिंदी सरळसरळ नाकारली जाते. तिथला सुशिक्षित माणूस इंग्रजीत बोलतो तर अशिक्षित मनुष्य थेट मातृभाषेतच बोलू लागतो. अशावेळी पंचाईत होते. गेल्या महिन्यात बिनू के. जॉन यांचं ‘द एंट्री फ्रॉम बॅकसाईड’ हे पुस्तक वाचनात आलं. आपण भारतीयांनी इंग्रजीचं जे हौस व अज्ञानापोटी भारतीयकरण केलेलं आहे त्याची धमाल उदाहरणं या पुस्तकात वाचायला मिळाली. पण त्याचबरोबर भारतीयांनी इंग्रजीसारख्या परकीय भाषेला (परिस्थितीजन्य कारणं काहीही असोत) आपलंसं करण्याचे प्रयत्न केले हे विशेष. दक्षिणेत फिरताना हे नेहमीच जाणवतं.
भाषेविषयीच्या अशा अडचणी प्रवासात येत असतात. नेहमीच तुमच्यापाशी गाईड किंवा दुभाष्या असेलच असं नाही किंवा काहीवेळा बरोबर परदेशी पर्यटक असतील तर त्यांच्याकडूनही स्थानिक मनुष्य काय बोलत आहे यासंबंधीची विचारणा होते. तेव्हा मग मख्खासारखं बसून चालत नाही. म्हणून जुजबी बहुभाषी असणं हे फायद्याचं ठरतं. भाषा येतच नसली तर सरळ प्रवाशांसाठी असलेली भाषा मार्गदर्शन पुस्तिका तरी हाताशी ठेवावी.
एखाद्या परप्रांतात जाऊन (निदान भारतात तरी) स्थानिक भाषेत तुम्ही संवाद साधलात तर तुम्हाला हमखास घराचे दरवाजे आदरातिथ्यासाठी उघडे होतात. हाही एक नेहमीचा अनुभव. आजही मी रेल्वेत शेजारी एखादा परभाषिक बसला असेल तर त्यांच्या भाषेत संवाद साधण्याचा आवर्जून प्रयत्न करते. मुंबईत तुमच्याशी तुमच्या भाषेत कोणी बोललं तर त्याच्याबद्दल लगेच आपलेपणा निर्माण होतो हे मी अनुभवलंय.
विशेषत: बांगलादेश किंवा पश्चिम बंगालच्या कुठल्या तरी दूरवरच्या खेडयापाडयातून आलेल्या अडाणी बायका रेल्वेत चढल्यावर बावरलेल्या असतात. तेव्हा एखाद्या सुशिक्षित बाईने त्यांच्या भाषेत त्यांना उत्तर दिल्यावर त्यांना हायसं वाटतं. तीच गोष्ट कोकणी मुसलमान बायकांची. त्यांनाही त्यांच्या शैलीत बोलल्यावर बरं वाटतं हे मी पाहिलंय. कुठेही गेल्यावर स्थानिक भाषा येत असली तर तिचा फायदा हा होतोच हा निदान माझा तरी अनुभव आहे. भाषा बोलण्यासोबतच ती वाचता देखील येत असेल तर अधिकच उत्तम. प्रवासात दिशादर्शनासाठी, माहितीसाठी मग दुस-यांची गरज पडत नाही.
भाषा शिकण्याचा फायदा मला माझ्या सुरक्षित प्रवासासाठी देखील झाला. आजकाल तसेही इंग्रजी शब्द प्रत्येकाच्याच बोलण्यात असतात. पण अनेक ठिकाणी रेल्वे, बस अशा स्थानिक वाहतूक माध्यमांतून फिरताना तुमचे सहप्रवासी तुमच्याबद्दल काय बोलतात हे भाषांची ओळख असली की आजमावता येतं. त्यामुळे आपले सहप्रवासी कसे आहेत याचा एक अंदाज येतो. जॉन बेलेझा हा माझा एक मित्र.
जन्माने अमेरिकन असलेला पुरातत्त्व संशोधक. तो गेली ३० र्वष हिमाचल प्रदेशच्या धरमशालामध्ये राहतोय. तो अस्खलित गढवाली, पंजाबी, उर्दू व हिंदी बोलतो. तिबेटी व पुश्तूही त्याला थोडी येते. संशोधन करता करता तो या भाषा शिकला. भारतात येऊन भारतीय भाषांवर एखादा परकीय मनुष्य एवढं प्रेम करू शकतो, मग आपण तर भारतीय नागरिक आहोत. तेव्हा आपण देखील मातृभाषेशिवाय एखादी दुसरी भारतीय भाषा शिकायला हरकत नाही. मग शिका एखादी भाषा आणि प्रवासाची रंगत वाढवा.
No comments:
Post a Comment