Translate

Friday, September 25, 2015

रणथंबोर व्याघ्र अभयारण्य

लोनली प्लॅनेटमधून, इतर काही वेबसाईट्सवरून माहिती टिपून ठेवून बराच जमाना झाला होता; पण राजस्थानात पाऊल काही पडले नव्हते. टीव्हीवर राणा प्रताप वगरे मालिका पाहताना नेहमी वाटायचं की वीरांच्या या भूमीला आपलं पाऊल एकदा तरी लागलंच पाहिजे.
Tiger sitting in a chattri or palace in Ranthambore tiger reserve
लोनली प्लॅनेटमधून, इतर काही वेबसाईट्सवरून माहिती टिपून ठेवून बराच जमाना झाला होता; पण राजस्थानात पाऊल काही पडले नव्हते. टीव्हीवर राणा प्रताप वगरे मालिका पाहताना नेहमी वाटायचं की वीरांच्या या भूमीला आपलं पाऊल एकदा तरी लागलंच पाहिजे.
जायचं जायचं म्हणताना अचानक रणथंबोरला एक ग्रुप निघाला होता, त्यांच्या टोळक्यात सामील होऊन निघाले देखील. राजस्थानला जाण्यामागे रणथंबोर व्याघ्र अभयारण्याचं आकर्षण खूप मोठं होतं. इतकी वर्ष डिस्कव्हरी, नॅशनल जिओग्राफिक, अ‍ॅनिमल प्लॅनेट वगरे वाहिन्यांवर पाहून पाहून रणथंबोरचं जंगल जणू पाठच झालं होतं. फक्त तिथे जायचं बाकी होतं.
व्याघ्र अभयारण्यात जाणा-यांची एक गंमत असते. त्यांनी तिथल्या वाघांना जी काही नावं किंवा क्रमांक दिलेले असतात आणि मग याच वाघांची चर्चा जाण्याआधीपासून सुरू होते. तशीच चर्चा आमची देखील सुरू झाली होती. आम्ही १०-१५ जण मुंबईहून निघालो होतो. पूर्ण प्रवासभर आम्ही फक्त वन्यजीवन आणि सहलींवरच बोलत होतो. योगायोगाने आमच्यातील दोघे सोडल्यास बाकी सर्वजण पहिल्यांदाच रणथंबोरला जात होतो. त्यामुळे तिथे जाण्याच्या प्रचंड उत्सुकतेपोटी आम्ही रणथंबोरचं जंगल पाहण्यासाठी जणू अधीरच झालो होतो. मी तर राजस्थानला देखील कधी गेले नव्हते.
एकूणच हा प्रांत मला अनोळखी, त्यामुळे अशा पूर्णपणे अनोळखी भागात जाण्याची जी काही मजा असते, ती मी अनुभवत होते. प्रवासात दिसणारी गावं, शहरं, निसर्ग, माणसं, खाद्यपदार्थ असं सगळंच निरीक्षण चालू होतं. सवाई माधोपोरला आम्ही सकाळी अकराच्या सुमारास पोहोचलो; पण अकरा वाजता देखील तिथे अंगाची काहिली करणारं ऊन पडलेलं होतं. इतका वेळ एसी ट्रेनमध्ये बसून बाहेर पडल्यावर आता अंगाला उनाचे चटके बसत होते.
परिसरातील पर्यटक सहजच ओळखता येत होते, कारण आमच्यासारखे पर्यटक सोडले तर इतर कोणीही डोक्यावरून आच्छादन घेतले नव्हते, गॉगल लावले नव्हते का टोप्या घातल्या नव्हत्या. पुरुष मंडळी फक्त स्थानिक साफ्यामध्ये फिरत होती आणि बायकांचे डोक्यावरून पदर.
इतकेच काय ते आच्छादन. हे तप्त वातावरण त्यांच्यात शतकानुशतके मुरले असावे, कदाचित म्हणून या उन्हाची ते फिकीरही करत नाहीत. आम्ही मात्र उन्हापासून बचाव करणारी सर्व आयुधं वापरत होतो. मुंबईकर मंडळींना उन्हाचा असा पहिलाच गरमागरम झटका मिळाल्यानंतर सर्वाना कधी एकदा रिसॉर्टवर पोहोचतोय असं झालं होतं. सुदैवाने आमचं रिसॉर्ट खूपच छान होतं.
रणथंबोरपाशी सवाई माधोपोर गावात हा व्यवसाय चांगलाच बहरलेला आहे. अगदी ताज, ओबेरॉयपासून इतर थ्री स्टार, फोर स्टार हॉटेलांची इथे गर्दी आहे. या सर्वाना प्रॉपर्टी निर्माण करायला मोठया मोकळ्या जागा देखील आहेत, मग फायदा घेणार नाहीत तर ते हॉटेल व्यावसायिक कसले ! सध्या तिकडे ताज ग्रुपचा दुसरा हॉटेलरूपी पॅलेस बनतो आहे. राजस्थानला एकूणच अप्रतिम वास्तुकलेची व कोरीव नक्षीकामाच्या कारागिरीची देण वारसागत लाभलेली आहे, या नक्षीकामाचा प्रभाव इथल्या वास्तुरचनांवर खूप जास्त आहे.
अगदी साधी घरांची देखील रचना छान असते. ती बघून हेवा वाटतो. शहरात काडयाच्या पेटीसारख्या घरांमध्ये राहून ती काडयाची पेटी किती स्क्वेअर फूटची आहे, किती मोठी आहे हेच सांगण्यात आपण धन्यता मानतो. हे असं खुल्या गावात राहण्याचं नशीब आपल्याकडे नाही.
दुपारीच आम्ही सामान रिसॉर्टवर टाकून जंगलात निघालो. आता उन्हाची कोणी पर्वा करणार नव्हतं. कारण त्याहीपेक्षा मोठं आकर्षण तिथे आत जंगलात होतं. रणथंबोरचं जंगल म्हणजे रखरखीत खडकाळ पट्टय़ांचा प्रदेश. इथे ११ झोन आहेत. जंगलाच्या कोणत्याही भागात जीपमधून फिरा, तुमची हाडन् हाडं खिळखिळी होणार याची गॅरंटी. पण जंगल इतकं लक्षवेधक आहे की हाडांचं दु:ख फार काही आपण मनावर घेत नाही.
रणथंबोर वाघांखेरीज पक्षी निरीक्षणासाठी देखील सर्वोत्तम आहे. एखाद्या तळ्याकाठी थांबावं आणि खूप सारे पक्षी पाहून घ्यावेत, यासारखं दुसरं सुख नाही. आम्ही वाघ बरेचदा पाहिलेले असल्यामुळे पक्षी निरीक्षणात आम्ही बराच वेळ घालवला. पक्षी आणि वाघांखेरीज इतरही प्राणी इथे पाहण्यासारखे आहेत. नीलगाय, हरणं, सांबर, काळवीट, मगरी असे खूप प्राणी इथे आहेत. बिबटे देखील आहेत. आमची नजर डोंगरघळींमध्ये नेहमी त्याला शोधायची; पण तो दिसणं काही यावेळी नशिबात नव्हतं.
तलाव देखील आहेत, ज्यात माणिक तलाव, राजबाग तलाव व पद्म तलाव हे दिसतातच. रणथंबोरला जाऊन चुकवू नये अशी एक जागा म्हणजे रणथंबोर किल्ला. हा माझ्या कायम लक्षात राहील, कारण मी हो-नाही करत या किल्ल्यावर चढले होते, कारण तेव्हा माझ्या गुडघ्यांना दुखापत झाली होती व चालणंही मला कठीण झालं होतं, तशा परिस्थितीत मी २ तास किल्ला चढून वर गेले होते.
इथे वर एक अत्यंत सुंदर गुहेमधलं शिवमंदिर आहे. आपल्या कोकणातल्या माल्रेश्वरसारखं. आतमधल्या काळोखात दिव्यांची उजळलेली आरास व त्या तेजात दिसणारी पिंड. खूप छान वाटलं इथे. किल्ल्यावर राणी पद्मावतीचा महाल, जलमहाल, तलाव आहेत. अजूनही काही मंदिरं आहेत. ती देखील खूप सुरेख आहेत. पण इथून पूर्ण रणथंबोर जंगलाचं जे दृश्य दिसतं ते खूप सुंदर आहे. निदान ते पाहण्यासाठी तरी वर चढून जायलाच पाहिजे.
रणथंबोरला भेट देऊन आल्यावर आता तिथून येणा-या बातम्या वाचण्यासाठी आम्ही उत्सुक असतो. अशीच गेल्या आठवडयात बातमी आली की रणथंबोरचा वनरक्षक रामपाल सैनीवर टी-७२, सुलतानने हल्ला करून त्याला ठार मारलं. डोळ्यासमोर त्या बांबू व लाकडाने बांधलेल्या प्रहरी चौकीवर बसलेला रामपाल आला. या चौकीवर सोलर पॅनल्स बसवली असल्यामुळे ती विशेष लक्षात राहिली होती.
फार दिवस तिथं राहिलो नाही, पण होतो त्या २-३ दिवसात रणथंबोरने मोहून टाकलं. वास्तविक मोहून टाकलं म्हणण्यासारखं तिथं एखाद्याला काहीच दिसणार नाही. सर्वत्र रखरखीत लँडस्केप, तप्त उन्हाळा व गरम झळा सोडणारी हवा, शुष्क झाडं व नावालाच हिरवळ बाळगणारं असं रणथंबोरचं व्याघ्र अभयारण्य. पण या जंगलावर आज सुमारे ६०-६५ वाघ अधिराज्य गाजवतायत.
वरच्या बातमीतला सुलतान त्यातलाच एक तरुण वाघ. आम्ही याला पाहिलं नाही; पण याचा बाप, टी-२४, उस्ताद त्याचं दर्शन मात्र आम्हाला झालं आणि तेही अवचित. झुडुपांमधून तो जात होता, अक्षरश: तो संपेचना..एवढा लांबलचक म्हणजे जवळपास ८-९ फूट तर असेलच. ते शक्तिशाली जनावर पाहून आम्ही थक्कच झालो. त्याचं डोकं इतकं भव्य आणि एकूणच अत्यंत देखणं जनावर, त्याला पाहून रणथंबोरच्या जंगलात वाघांवर तस्कर का नेम लावून बसतात याची कल्पना आली.
रणथंबोरची एक वेगळीच शान आहे. इथं तलाव आहेत, किल्ले आहेत, डोंगरद-या, कपारी, मंदिरं, झाडंझुडुपं, गवताळ मैदान असं सर्व काही आहे. राजस्थानच्या शुष्क मरूभूमीत हिरवंगार रसरशीत अरण्य कसं टिकून राहत असेल असं आपल्याला वाटतं, पण प्रत्यक्षात तिथे गेल्यावर या सर्व शंका दूर होतात.
रणथंबोरचं खास वैशिष्टय म्हणजे इथला लँडस्केप. इतर जंगलांमध्ये आपण नुसती हिरवाई पाहतो; पण इथं अप्रतिम लँडस्केप आहे. लँडस्केप म्हणजे जमीन, आसपासचा परिसर आणि एकूणच आसमंत मिळून जे काही अफाट दृश्य दिसते, त्यात आपण विरघळूनच जातो. राजस्थानच्या रेताड जमिनीत कसला आलाय सुंदर लँडस्केप असं तुम्ही म्हणाल, पण वाचकांपैकी काही छायाचित्रकारांना याची कल्पना येऊ शकेल.
रणथंबोरवर वाघांचं राज्य आहे, त्यामुळे त्यांचं दर्शन तिथं दुरापास्त नाही. इथल्या सर्व वाघांना ‘टी’ आद्याक्षरापासून क्रमांक देण्यात आलेले आहेत. यांचा वावर अगदी गावापर्यंत असतो. वाघ तसे नरभक्षक नाहीत; पण गरसमजुतीतून त्यांनी माणसांवर हल्ले करून त्यांना मारल्याची काही उदाहरणे झालेली आहेत.
आम्हाला मछलीला पाहण्याची उत्सुकता होती, परंतु मछली राणी आता खूप वयस्कर झाल्याने ती झोन नऊमध्येच पडून असते व तिला तिथे मांस नेऊन टाकण्यात येतं असं सांगण्यात आलं. तिच्याकडे पर्यटक सोडून तिला तिच्या अखेरच्या दिवसात त्रास दिला जात नाहीये हे तिचं सुदैवच. कारण मछलीने जेवढा महसूल मिळवून दिला व प्रसिद्धी या अभयारण्याला मिळवून दिली त्याची तुलना फार कमी भारतीय वाघांशी होऊ शकेल.
बांधवगढमधील सीता व चार्जर देखील असेच सेलिब्रिटी वाघ होते. आम्ही मछलीची मुलगी कृष्णा हिला तिच्या चार पिल्लांसह बघितलं. तो प्रसंग अविस्मरणीयच होता. एका तळ्याकाठच्या गवतात ती चार जण खेळत होती आणि मधूनमधून आईच्या खोडया काढत होती.
सुमारे तास-दीड तास ही पाच जण आमच्या समोर राहिली, एखाद्या वन्यजीवनविषयक वाहिनीवर दाखवतात तसंच दृश्य. आईच्या मार्गदर्शनाखाली ती पिल्लं आता हळूहळू शिकार करू लागली आहेत. नूर व तिच्या दोन पिल्लांना पाहण्यासाठी आम्ही बरेच प्रयत्न केले; पण ती तेव्हा राजस्थान टूरीझमच्या विश्रांतीगृहाच्या आवारात पहुडली होती, त्यामुळे त्यांनी तिच्यावर तात्पुरता मालकी हक्क दाखवला व फक्त त्या विश्रांतीगृहात उतरलेल्या पर्यटकांनाच तिचे खास दर्शन झालं. मुंबईत परतल्यानंतर दोनच दिवसात बातमी आली की त्या दोन पिल्लांची मारामारी होऊन त्यात एक दगावलं. निसर्गनियमात पशु-पक्षी ढवळाढवळ करत नाहीत. ती दुर्बुद्धी फक्त मानवालाच बहाल झालेली आहे.
कृष्णा आणि तिची पिल्लं आम्हाला लागोपाठ दोन दिवस दिसत होती. मन भरून त्यांना पाहून घेतलं. परंतु वाघाच्या बाबतीत सुदैवीच असावं लागतं. आमच्यासोबत वाघ आयुष्यात प्रथमच पाहणारे काही जण होते, त्यांचा आनंद तर अपार होता.
आम्ही सतत तीन दिवस वाघांना आडवे जात होतो, मात्र आमच्याच रिसॉर्टवर उतरलेल्या एका दुस-या ग्रुपला मात्र वाघाचं नखही दिसलं नव्हतं. त्यांना तसंच परत जावं लागलं. हे कौतुक, असूया किंवा चेष्टेपोटी लिहीत नाही; पण वाघाचं दर्शन ही निदान मला तरी अजूनही ‘मॅटर ऑफ लक’ अशी गोष्ट वाटते.
रणथंबोर, कान्हा किंवा बांधवगढ ही हमखास वाघ दिसणारच यासाठी प्रसिद्ध असलेली व्याघ्र अभयारण्यं आहेत. परंतु तिथेही ३-४ दिवस पाठपुरावा करूनही वाघ न पाहता परत येणारी माणसं आहेत. तर अशा प्रकारे ती नशिबाची गोष्ट आहे. आपण निसर्गावर सत्ता गाजवू शकत नाही आणि गाजवूही नये.
Print Friendly
Tags:  |  |  |  |  | 

तळ्यांच्या शहरात

राजस्थानात पाहण्यासारखी काही निवडक ठिकाणं आहेत, त्यापैकी अवश्य गेलं पाहिजे, असं एक शहर म्हणजे उदयपूर. तळ्यांचं शहर म्हणून उदयपूरची ख्याती आहे. एकंदरीत हे शहर लोभस आहे. उदयपूरच्या गल्ल्यांमधून मारलेला हा फेरफटका.
udaypur
रणथंबोरनंतर दुसरा टप्पा होता तो उदयपूरचा. राजस्थानच्या तापलेल्या वातावरणात फिरणं हा नक्कीच आनंद नव्हता; सुदैवाने नुकताच फेब्रुवारी संपला होता व मार्च सुरू झाला होता, त्यामुळे वातावरणात गारवा टिकून होता. तरीही काही वेळेस माध्यान्हीच्या वेळेस एवढी उष्णता जाणवायची की बाहेर पडणं नकोसं व्हायचं.
वेळेअभावी जैसलमेर किंवा उदयपूर असे दोन पर्याय माझ्यापुढे होते. अर्थातच मी हे तळ्यांचं शहर निवडलं. जोधपूरवरून उदयपूरला जाणा-या बसचं बुकिंग करणं फारसं अवघड नव्हतं. योगायोगाने बसस्टॉपही मैत्रिणीच्या, सायलीच्या घराजवळच होता. माझी सर्व जबाबदारी जणू काही तिनेच उचलली होती त्यामुळे एक दिवस तिच्यासोबत सरकारी बसस्टँडवर जाऊन बसची चौकशी व बुकिंग करून आलो.
बस व्होल्वो नव्हती पण चांगली एसी लक्झरी बस होती. त्यामुळे प्रवासाचा फारसा त्रास झाला नाही. या बसेस दिवसातून चार फे-या मारतात. या बससेवेला खूप चांगला प्रतिसाद मिळतो. मी उदयपुरात लवकर पोहोचावं म्हणून सकाळी साडेसहाचीच बस पकडली होती. सायलीने मला बसमध्ये बसवलं आणि माझा उदयपूरकडे प्रवास सुरू झाला. वाटेत साडेनऊच्या सुमारास फक्त एक स्टॉप बसने घेतला.
सहा तासांच्या प्रवासानंतर साधारण साडेअकराला बसने उदयपूर शहरात प्रवेश केला व तिथल्या बसस्टॉपवर जाईपर्यंत बारा वाजलेच. पहिल्या नजरेत पाहिलं तर शहर तसं स्वच्छ वाटलं. तशीच ब-यापैकी स्वच्छता इतरत्र आढळली. परदेशी पर्यटकांचा तिथं राबता असल्यामुळे बहुतेक महानगरपालिकेने स्वच्छता मनावर घेतली असणार. पर्यटकांना फिरताना घाण वाटणार नाही याची काळजी घेतलेली दिसते. थोडाफार इकडेतिकडे कचरा असेल तर तो भारतासारख्या देशात फार मोठा गुन्हा नाही.
उदयपूरला उतरले तेव्हा जैसलमेरऐवजी त्याची निवड केल्याबद्दल स्वत:लाच धन्यवाद दिले याचं कारण म्हणजे तिथला थंडावा. भर दुपारी देखील तिथे जोधपूरइतकं गरम होत नव्हतं. संध्याकाळी तर स्वेटर घालावा लागत होता व रात्री ब्लँकेट. हवेत खूप जास्त उष्णता नव्हती. कारण उन्हाळा सुरू झालेला नव्हता. बहुतेक थंडीच्या अखेरच्या दिवसातली मी शेवटची पर्यटक तिथे होते. बसस्टॉपवर उतरल्यानंतर माझ्या गेस्टहाऊसकडे जाण्यासाठी ऑटोची शोधाशोध केली.
नेहमीप्रमाणे इथून तिथून सर्व ऑटोरिक्शाचालक हे सारखेच असतात याचा अनुभव घेतला. उदयपूरमध्ये खूप सारी पाहण्यासारखी स्थळं आहेत व यातील एका ठिकाणाहून दुसरीकडे जायचं असेल तर हे रिक्षावाले सरसकट मीटर न लावता शंभर रुपये सांगतात. नाईलाज हा पर्यटकांच्या नशिबीच असतो. त्यामुळे मी देखील शंभर रुपये देऊन गेस्टहाऊसमध्ये पाऊल टाकलं. माझ्या सुदैवाने हनुमान घाटावरचं हे गेस्टहाऊस छान होतं. खोली तिस-या मजल्यावर होती, ती अडचण सोडली तर तिथं बाकी काही अडचण नव्हती. खोलीही चांगली होती. लेक फेसिंग. पूर्ण हनुमान घाट खिडकीतून दिसत होता.
तसं म्हटलं तर एखाद्या शहरात शंभर जागा पाहण्यासारख्या असतात, अशा प्रसिद्ध ठिकाणी फिरत फिरत काढायचे असे कित्येक दिवस लागू शकतात पण प्रत्यक्षात उदयपूर दोन दिवसात पाहून होतं. तळ्यांच्या या शहरात आल्यावर तलाव पाहणं चुकवताच येत नाही. शिवाय राजस्थानी स्थापत्यशैलीचे राजवाडे व मंदिरं लक्ष वेधून घेत असतात. शहरात फिरायचं म्हणजे एकतर रिक्षा करावी किंवा आरामात रमतगमत पायी चालावे. मी लांबच्या व जवळच्या अशा ठिकाणांसाठी दोन्ही पर्याय निवडले होते. बॅकपॅकर्स पायी फिरताना इथे खूप संख्येने आढळतात. फक्त हातात एक नकाशा ठेवायचा.
मी जिथे उतरले होते त्या पॅनोरमा गेस्ट हाऊसच्या मॅनेजरने मला लागलीच एक नकाशा दिला होता व सर्व ठिकाणी कसं चालत जायचं याची देखील माहिती दिली होती. इथे परदेशी पर्यटक मोठया संख्येने येतात. मुख्य म्हणजे हे परदेशी पर्यटक आपल्यापेक्षाही खर्च कमी कसा होईल याबाबत जागरूक असतात. त्यामुळे अनेक जण पायीच फिरणं पसंत करतात. एखाद्या ठिकाणी गेल्यावर तिथली प्रेक्षणीय स्थळं, हॉटेलपासून तिथे जाण्याचं अंतर, राहण्या-जेवण्याचा खर्च इ. हिशेब हे लोक बरोब्बर करतात व त्यानुसारच फिरतात.
राजस्थानात रिक्षाने फिरणारे परदेशी लोक फारसे दिसणारच नाहीत. माझ्या गेस्टहाऊसपासून ५-१० मिनिटांच्या अंतरावर लेक पिचोला, सिटी पॅलेस, बागोर की हवेली, जगमंदिर व तिथला पॅलेस, लेक पॅलेस, जगदीश मंदिर वगरे ठिकाणं होती. हनुमान घाटाच्या पलीकडे ही सर्व स्थळं होती व मी उतरले होते अलीकडे. फक्त एका छोटया फुटब्रिजचं अंतर होतं.
लेक पॅलेस व लेक पिचोलाची संध्याकाळची फेरी चुकवायची नव्हती. या फेरीत पिचोला तलावाला फेरी मारून मग लेक पॅलेस व जगमंदिर दाखवतात. जगमंदिर पॅलेसचं रूपांतर हॉटेलमध्ये करण्यात आलेलं आहे. राजस्थानातल्या बहुतेक राजवाडय़ांची आता हीच स्थिती आहे. ताज ग्रुपचंही हॉटेल या तलावात आहे.
उदयपूरमधील सर्व तलाव मानवनिर्मित आहेत. पण हे प्रचंड तलाव पाहताना मन हरखून जातं. विशेषत: संध्याकाळी तर हे तलाव विलोभनीयच दिसतात. फतेहसागर लेकमध्ये वेगवेगळ्या बोट राईड्स उपलब्ध आहेत, ज्यांचे दरही कमी आहेत. तशी सोय पिचोला लेकमध्ये नाही. इथे फक्त सिटी पॅलेसद्वारेच बोट राईड पुरवली जाते व तिची किंमतही अवास्तव महागडी आहे. अर्थात बोट राईड घ्यायची नसेल तर तलावकाठाने फिरता येतं.
सिटी पॅलेस हा राजवाडा देखील खूप प्रेक्षणीय आहे. या राजवाडयात ठेवलेल्या अत्यंत महागडया क्रिस्टलच्या जागतिक संग्रहामुळे तिथे पर्यटकांची गर्दी असते. बाकी इतर राजवाडय़ांसारखाच हा देखील एक आहे. फक्त त्याच्या पांढ-या रंगामुळे तो उठून दिसतो. पूर्ण राजस्थानात सँडस्टोन वास्तुरचनेसाठी वापरलेला दिसतो. मग ते साधं घर असो किंवा महाल. अति तीव्र उन्हामुळे काही महालांना पांढ-या रंगात रंगवलेलं आहे.
राजस्थानात गेलात तर एक गोष्ट जमल्यास पाहाच. ती म्हणजे तिथली लग्नं. रंगांची उधळण अशा प्रसंगी विशेषत्वाने ओसंडून गेलेली दिसते. पर्यटक या नात्याने कॅमेरा घेऊन गेलात तर तुमचं स्वागतच होतं. फतेहसागर लेकची फेरी करताना दूरवर सज्जनगड दिसतो. संध्याकाळी तिथे रोषणाई केलेली असते. त्यामुळे तो खूप सुंदर दिसतो. शिवाय या तलावात सोलर ऑब्झव्‍‌र्हेटरी आहे, ती सकाळी गेल्यास पाहता येते. इथली खाद्यसंस्कृती तर अप्रतिमच आहे, जी जगभरात प्रसिद्ध आहे. त्यामुळे इशान्यपूर्व भागात गेल्यावर खाण्याचे जे प्रश्न पडतात, ते इथे उद्भवत नाहीत. माझ्या सुदैवाने मला ‘मिलेट्स ऑफ मेवार’ हे हॉटेल सापडलं.
मनोज प्रजापत या कष्टाळू तरुणाने हे हॉटेल स्वकष्टावर उभं केलंय. त्यात त्याच्या मित्राचीही त्याला साथ आहे. अवघा बारावी शिकलेल्या या तरुणाने काहीतरी वेगळं करायचं म्हणून उदयपूरमध्ये ऑरगॅनिक कृषी उत्पादनांपासून बनवलेले खाद्यपदार्थ देणारं हे पहिलं हॉटेल उभारलं. तीन मजली व्यवस्था असलेलं हे हॉटेल देशी-विदेशी पर्यटकांचं आकर्षण आहे. वेळ घालवण्यासाठी बागोर की हवेली हे संग्रहालय पाहण्यासारखं आहे. १८ व्या शतकातली ही हवेली आहे. इथल्या १३८ खोल्यांमध्ये बाहुल्यांच्या खेळातील पुतळे, त्यांचे कपडे, शस्त्रं, राजस्थानी कलेच्या वस्तू, वाद्यं, चित्रं इत्यादी ठेवलेले आहे.
बराच वेळ असेल हाताशी तरच इथे प्रवेश करावा. हा नियम तसाही सर्वसाधारणपणे उदयपूरमधील कोणत्याही ठिकाणाला लागू होतो. शॉिपग करण्याच्या फंदात भारतीय पर्यटकांनी मुळीच पडू नये. कारण इथले दर हे परदेशी पर्यटकांना अनुसरून लावलेले आहेत. त्यात फारसं कमी जास्त होत नाही. राहण्याची व्यवस्था कितीही कमी पैशात होऊ शकते मात्र खरेदीसाठी जाल तर खिसा खाली करूनच याल. या राजस्थान फेरीत एक प्रकर्षाने जाणवलं ते म्हणजे राजवाडे, महाल व मंदिर हे पाहण्यात अजिबात रस नसेल त्यांनी राजस्थानात जाऊ नये.
Print Friendly
Tags:  |  |  |  |  | 

काझीरंगाचं अरण्य


आसामच्या छोट्या निसर्गरम्य खेड्यांनी वेढलेलं काझीरंगा.. नजर जाईल तिथपर्यंत भातशेती व एलिफंट ग्रास (हत्तीगवत) पसरलेलं. मध्येच नजरेला विसावा देण्यासाठी चहाचे मळे व दूरवर दिसणा-या कार्बी   अँगलॉँगच्या डोंगररांगा. या खेड्यांमधून जाता जाता काझीरंगाचं अरण्य नेमकं कधी सुरू होतं ते कळत नाही पण शेतांमध्ये राबणा-या माणसांमध्ये अचानक गेंडे व हत्ती दिसायला लागले की समजायचं काझीरंगात आलोयत. गेली कित्येक वर्ष  आसाम म्हटलं की इथे  मानस  अभयारण्य , पवित्रा अभयारण्य असूनही सर्वाधिक उल्लेख होतो तो फक्त काझीरंगाचाच. आसामच्या पर्यटन विकासात अत्यंत महत्त्वाचं स्थान असणारं व युनेस्कोनं एकशिंगी गेंडय़ांसाठी जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलेलं काझीरंगा नॅशनल पार्क हे वन्यजीव अभ्यासक व पर्यटक दोघांसाठीही अफाट खजिन्यासारखं आहे
कधीतरी असे क्षण येतात जेव्हा आपण खूप काळ एखाद्या गोष्टीसाठी थांबलेलो असतो, ती गोष्ट अगदी एका झटक्यात होऊन जाते. जंगलाचं पानदेखील गेल्या दोन वर्षात न पाहिलेली मी, एखाद्या नशेखोर माणसासारखी जंगलातल्या मातीमधून व पात्यांमधून येणारा तो अनोखा गंध श्वासामध्ये मुरवून घेण्यासाठी वाट पाहत होते. जंगलात मुद्दामहून वाट चुकायला जाणारा शहरी मनुष्य सहसा पश्चाताप करत नाही. माझ्यासारख्या अनेक भटक्या लोकांना हे पटत असेल. त्यामुळे संधी मिळताच या वेळी दुसरी-तिसरीकडे न जाता थेट आसाममधल्या काझीरंगाचा रस्ता पकडायचा हे मनाशी ठरवलेलं होतंच. त्यामुळे अनपेक्षित संधी मिळताच मी कोहरा या काझीरंगामधल्या गावात उतरले होते. हातात कोणतंही बुकिंग वगैरे नव्हतं. पण असं सर्व करायला लागलं की एक बरं होतं की आपली वाट आपणच आखतो व झापडबंद घोडय़ासारखे ठरवलेल्या मार्गावरूनच जात नाही. भटकंतीचा खरा आनंद घ्यायचा असेल तर तो असाच येतो. अगदी गोहाटीपासून कोहरापर्यंत येण्यासाठी बसचं तिकीटही माझ्याकडे नव्हतं. ते मी आदल्या रात्री नऊ वाजता गोहाटीतल्या लॉजच्या नोकराला मदतीला घेऊन आसाम परिवहनच्या बस स्टँडवर जाऊन बुक केलं होतं. ही सकाळी नऊ वाजता गोहाटीवरून सुटलेली बस नॉनस्टॉप (एकच स्टॉप तोही पंधरा मिनिटांचा, नागाव गावात घेऊन) पाच तासांनी कोहरामध्ये पोहोचली होती. सुदैवाने मित्राचं बीबीसीसाठी शूट सुरू होतं, त्यांची टीम माझ्यासाठी वाटच पाहत होती. त्यांच्यामुळे अर्थातच काझीरंगा अधिक वेगळ्या बाजूंनी पाहण्याची संधी मिळाली. पण एक आहे की, जंगलात तुम्ही कितीही फिरलात तरी जंगल कधीही पूर्णपणे वाचता येत नाही. असल्या चार-पाच दिवसांच्या फे-यांमध्ये तर मुळीच नाही. पण शहरात राहून उबगलेल्या मनाला थोडा तजेला मिळवून देण्यासाठी एवढा मुक्काम पुरेसा होतो. तसं अनेकदा काझीरंगाचं जंगल ब्रह्यपुत्रेच्या पुरात बुडून गेलेलं टीव्हीवरील दृश्यांमध्ये पाहिलेलं. पुराच्या पाण्यात पोहण्याचा व जीव वाचवण्याचा निकराचा प्रयत्न करणारे प्राणी पाहून जीव गलबलून यायचा. त्या दृश्यांवरूनच काझीरंगाचा विस्तार किती अफाट आहे याची कल्पना आली होती. आणि आता तर प्रत्यक्ष तिथेच उभे होते. तिथल्या आदिम रहिवाशांची नजरभेट होईल या उत्सुकतेने.
काझीरंगा ४७० चौरस किलोमीटर इतकं पसरलेलं आहे. भारतीय वन्यजीवांतील बिग फाइव्हपैकी चार म्हणजे हत्ती, वाघ, बिबटय़ा व गेंडा हे काझीरंगात आढळतात. तसं म्हटलं तर काझीरंगा ज्यांच्यासाठी ओळखलं जातं त्या गेंडय़ांचं दर्शन बागुरी रेंजमधील गावांपासूनच सुरू होतं. कोहराला पोहोचण्याआधी लागते ती बुरापहार व बागुरीची रेंज. त्याच वाटेवर बाजूला जाणारी आगरतोलाची रेंजपण आहे. बागुरी गाव काझीरंगाच्या चार रेंजेसपैकी एक. काझीरंगा चार रेंजमध्ये विभागलेलं आहे. आगरतोली, बुरापहार, कोहरा व बागुरी. यापैकी बुरापहारमध्ये होणा-या चोरटय़ा शिकांरीमुळे त्याची थोडी दुष्किर्ती झाली आहे व अजूनही इथं अशा शिकारी होतच असतात. त्यामुळे पर्यटकांना शक्यतो ही रेंज मनमोकळेपणे पाहता येत नाही. इथल्या चोरटय़ा शिकारीला आळा बसावा म्हणूनच खरं तर ही रेंज काझीरंगा अरण्यात वाढवण्यात आली. पण परिणाम उलटाच झाला. गावातल्या लोकांमध्ये फारसा उत्साह नसल्यामुळे इथं पर्यटक फारसे जात नाहीत. शिवाय सेंट्रलचा विस्तारच एवढा मोठा आहे की हौशी पर्यटकांची भूक भागवण्यासाठी सेंट्रलची रेंज पुरेशी होते.
गेल्या सप्टेंबरमध्ये आलेल्या पुरामुळे या वेळी इस्टर्न आगरतोलीची रेंज काही काळाकरता बंद होती. त्यामुळे माझ्याकडे फक्त बागुरी ही वेस्टर्न रेंज व सेंट्रल रेंज करण्याखेरीज दुसरा पर्याय नव्हता. पण कोणत्याही जंगलात पहिल्यांदाच फिरताना रेंजची आवडनिवड फारशी पाहायची नसते. तो दिमाख करायचा तो एकाच जंगलात दहाव्यांदा जाताना. तर खास गेंडा पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना सेंट्रल रेंजमध्येच फिरवलं जातं. इथं गेंडा अगदी हौस फिटेस्तोवर पाहायला मिळतो. गेंडा इथल्या लोकांसाठी अगदी दारातला प्राणी आहे. एकाच शेतात काम करणारे शेतकरी व गेंडा चरताना दिसणं इथं कॉमन दृश्य आहे. गेंडा हा मख्ख प्राणी आहे, असं प्रथमदर्शनी वाटतं पण तसं नाही. गेंडय़ाला नजर कमी असली तरी त्याचे कान व नाक अत्यंत तीक्ष्ण आहेत व तो वरकरणी शांत राहून सुखासीन चरत असला तरी वेळेला गेंडा अत्यंत धोकादायक प्राणी आहे. सेंट्रल रेंज बरीचशी फिरून झाल्यावर मी वेस्टर्न रेंजला जायचं ठरवलं व त्याच संध्याकाळी सेंट्रल रेंजमध्ये चवताळलेल्या गेंडय़ाने पर्यटकांच्या जीपवर हल्ला करून जीप उलटी केली. परंतु हत्तीवरून किंवा जीपमधून फिरताना एकटय़ा गेंडय़ाला कॉर्नर करून जवळून पाहण्यासाठी त्याला चहूबाजूने हत्तींनी किंवा जीप्सीज्नी घेरल्यावर असे प्रसंग घडणं साहजिक आहे. इथल्या तळ्याकाठी व शेतात निवांत चरणारा गेंडा अधेमधे चहाच्या मळ्यांमध्येही शिरतो व चहामळ्यातील कामगारांची धावाधाव होते. इथल्या विस्तिर्ण गवताळ प्रदेशामुळे काझीरंगा गेंडय़ांसाठी नंदनवनच आहे. इथं एलिफंट ग्रास म्हणजे ज्यात अगदी हत्तीदेखील लपून राहू शकतो इतक्या उंचीचं गवत मुबलक आहे, त्यामुळे यात लपलेला गेंडा अगदी जवळ गेल्यावर अवचित उठून उभा राहिपर्यंत त्याचा अंदाजच येत नाही. त्यातही पिल्लासोबत फिरणारी आई असेल तर शक्यतो त्यांच्यापासून दूरच राहिलेलं बरं. त्यांच्याकडून अचानक हल्ला होण्याचा संभव असतो. पण काझीरंगात सध्या तरी गेंडा पाहण्यासाठी फारसे कष्ट घ्यावे लागत नाहीत. इथं गेल्या वर्षीच्या गणनेनुसार २२९० गेंडे आहेत. अर्थात त्यांच्यापैकी किती पोचर्सच्या रेडारवर याचा पत्ता तर खुद्द इथल्या सरकारलाही नाही अशी माहिती माझ्या बसमधील सहप्रवाशाने दिली होती. काझीरंगाच्या जंगलात मिलीभगत नाही तर दहशतीने चोरटी शिकार होते. एक तर काझीरंगामध्ये दाट व उंच गवतात लपलेले प्राणी पर्यटकांना पाहण्यासाठी शोधूनच काढावे लागतात. गाइड मदतीला असतात तरीही जीपमधून फिरताना गेंडय़ाखेरीज इतर पाहिजे तो प्राणी दिसेलच याची शाश्वती नाही. इथल्या सुजाण लोकांशी बोलताना जाणवलं की त्यांनाही गेंडय़ांची अशाप्रकारे चोरटी शिकार वाढत असल्याची खंत व हळूहळू भारतातून तो नामशेष होईल याची भीती आहे. शिवाय दर पावसाळ्यात येणा-या पुरामुळे असंख्य प्राण्यांनाही प्राण गमवावे लागतात, ही नैसर्गिक आपत्ती आहेच.
काझीरंगात १०६हून अधिक वाघदेखील आहेत पण इथला वाघ दिसणं तसं दुरापास्तच. हे देखील चोरटय़ा शिकारीला बळी पडत आहेत. काझीरंगात वाघ पाहायचा असेल तर जंगल चाळण लावून पाहावं लागतं. परंतु काझीरंगाच्या वैभवात भर घालण्यासाठी इथं पेलिकन, बेंगाल फ्लोरिकनसारखे सुंदर व दुर्मीळ पक्षीदेखील आहेत. काझीरंगाचं जंगल वॉचटॉवरवर जाऊन पाहण्यापेक्षा तळ्याकाठी बसून आरामात पाहावं. अर्थात तळ्यावर उतरताना आधी आसपास गेंडा किंवा हत्ती नाही ना याची खात्री करून घ्यावी. तळ्यावर जाण्यासाठी योग्य वेळ म्हणजे संध्याकाळ होण्याच्या जरा आधीची. दिवसभर तहानलेले पक्षी व प्राणी याचवेळी सांजसावल्या पडत असताना तळ्यावर येतात. तेव्हा त्यांना जीव भरून पाहता येतं. काझीरंगात सोहोला, हारमोटी, मिहीमुख, काढपारा व फोलियामारी असे वॉचटॉवर्स आहेत. यातले काही तळ्यांच्या काठीच आहेत. काझीरंगाच्या जंगलात हत्ती व जंगली म्हशीदेखील पाहायला मिळतात. हत्ती तर भारतातल्या कोणत्याही जंगलात दिसतातच, त्यामुळे खरं तर हत्ती पाहण्यासाठी एवढी उत्सुकता नव्हती. परंतु फिरता फिरता आमच्या पुढय़ात हत्तीचं एक नाचरं पिल्लू आलं. या पिल्लाने आमचं चांगलंच मनोरंजन केलं. ते रस्त्यात मध्येच उभं असल्याने त्यानं आधी जावं मग आपण अशी जंगलची रितच आहे. पण हे पिल्लू झाडीमध्ये जाण्याऐवजी मध्येच छानपैकी पायांचा ताल धरून नाचत होतं, त्याचं कारण तर कळलं नाही पण त्याला पाहताना मात्र मजा आली. पाळीव हत्ती नाचताना नेहमीच सर्कशीत बघितले मात्र या जंगली हत्तीच्या पिल्लाला रस्तात असं मध्येच उभं राहून नाचताना पाहण्याचा अनुभव वेगळाच होता. त्याला सोडून पुढं आल्यावर गवताळ मैदानात बारशिंगा (स्वॅम्प डिअर) हरणांची मोठी फौजच चरत उभी होती. त्यातच काही भेकरं पण होती. दोन-तीन फुटबॉल ग्राउंडएवढय़ा मोठय़ा अशा त्या हिरव्यागार गवताळ प्रदेशात एकाचवेळी गेंडा, हरणं, भेकरं, जंगली म्हशी, रानटी डुक्कर असे प्राणी एकत्र चरताना पाहायला मिळण्याचा अनुभव काही वेगळाच असतो. त्यातच जवळ तळं किंवा पाणथळ असेल तर काही पक्षीदेखील या समूहात उतरलेले दिसतात. जगभरातून पर्यटक भारतातली जंगलं पाहण्यासाठी का येत असावेत याचं कारण काझीरंगात डोळ्यांदेखतच दिसतं. गवताळ प्रदेशानं व्यापलेलं काझीरंगा विविध प्रकारच्या व सवयींच्या प्राण्यांसाठी राहण्याचं एक अत्यंत उत्तम अरण्य आहे. एका अर्थाने दक्षिण आफ्रिकेच्या मोठमोठय़ा गवताळ जंगलांना भारताकडून मात देणारं काझीरंगा.. खरोखरीच एकदा अनुभवलंच पाहिजे असं.
काझीरंगाला कसं जाल?
काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत. राष्ट्रीय महामार्ग ३७ काझीरंगातून जातो. त्यापैकी वेळ वाचवणारे मार्ग म्हणजे विमानाने थेट गोहाटी किंवा जोरहाट किंवा तेझपूपर्यंत जायचं. अन्यथा रेल्वेने तिथं पोहोचायचं. तिथून बसने कोहरापर्यंत यायचं. तेझपूर किंवा जोरहाटपासून बसने काझीरंगापर्यंत पोहोचायचं असेल तर किमान तीन ते चार तास लागतात. थेट गोहाटीवरून कोहराला जाण्यासाठी पाच ते सहा तास लागतात. किमान वेळ देण्याचं कारण म्हणजे केवळ आसामच नाही तर पूर्ण पूर्वाचलातच रस्त्यांची कामं सुरू आहेत. त्यामुळे कोणत्याही ठिकाणी पोहोचण्याची निश्चित वेळ देता येत नाही. कोहरा, बागुरी व आगरतोली रेंजमध्ये फॉरेस्टची रेंज ऑफिसेस आहेत. तिथं जीप व गाइडचं बुकिंग करता येतं. शिवाय आसाम पर्यटन खात्यातील माणसं खूप कार्यतत्पर आहेत. तिथल्या कोणत्याही फोन नंबरवर फोन केल्यास एका फोनवरच तुम्हाला सर्व माहिती मिळते व तुमची सर्व सोय होऊ शकते.
काझीरंगात राहण्याची सोय
काझीरंगाला यायचं म्हणजे कोहरा गावात उतरायचं. कोहराच्या आसपास बरीच गेस्ट हाउसेस व रिसॉर्टस आहेत. वनखात्याचीही तीन रेस्ट हाउसेस पर्यटकांसाठी उपलब्ध असतात. त्यांचं बुकिंग खूप आधी करावं लागतं. ते नाहीच मिळालं तर वाइल्ड ग्रास रिसॉर्ट, आयोरा रिसॉर्ट, इकोरा गेस्ट हाउस ,-हायनो गेस्ट हाउस व इतरही काही पर्याय आहेत. यांचे दर दिवसाला माणशी नऊशे रुपयांपासून ते तीन हजार रुपयांपर्यंत आहेत.
जंगलात हत्तीवरुन सफारी
काझीरंगा अरण्य पाहताना हत्तीवरल्या सफारीचा अनुभव जरूर घेण्यासारखा आहे. भारतातील इतर जंगलांमध्ये (उत्तरांचलचं जिम कॉर्बेट नॅशनल पार्क सोडल्यास) हत्तीवरून दाट गवताळ जंगलात फिरण्याची अशी मजा येत नाही. शिवाय हत्तीवर असल्यामुळे दाट गवतात लपलेले प्राणी हुडकून पाहता येतात. काझीरंगात पहाटे पाचपासून ते सहा वाजेपर्यंत ही सफारी मिळते. त्याचा दर माणशी ५७५ रुपये आहे. हत्तीवर तिघांना बसावं लागतं. पण एकटय़ालाच बसून फिरायचं असल्यास तसंही बुकिंग करता येतं, मात्र ते पर्यटकांच्या संख्येवर अवलंबून असतं. सेंट्रल रेंजमध्ये सध्या आठ-दहा पाळीव हत्ती आहेत.
This article is published in Marathi news daily 'Prahaar' on the date 5th January, 2014. here is the link: http://prahaar.in/collag/171624



राजेशाही जोधपूर

राजस्थानात अनेक दिवस फिरल्यानंतरचा अखेरचा टप्पा होता तो जोधपूर. मुळात राजस्थान म्हटल्यावरच डोळ्यांपुढे दिमाखदार राजेशाही वातावरण व परंपरा येतात. जोधपूरही त्याला अपवाद नाही. तरी काळानुसार बदल घडत जोधपूर राजस्थानचं मॉडर्न शहर किंवा मेट्रो सिटी झालंय.
jodhpur
मेहरानगडावरून नजर टाकली तर सारं जोधपूर नजरेच्या टप्प्यात येतं. राजस्थानचं सर्वात मोठं असं दुसरं शहर. राजस्थानची ब्ल्यू सिटी जोधपूर. डोळे दीपवून टाकणा-या त्या उन्हाच्या पिवळ्याजर्द बॅकड्रॉपवर निम्म्याहून अधिक जोधपूर निळ्या रंगांच्या विविध छटांमध्ये रंगलेलं दिसतं. जोधपूरच्या जुन्या भागाचा हा निळा नजारा बघायला खूप छान वाटतं. इतक्या उंचावरून खाली दिसणारं छोटंसं शहर आणि त्यातले निळ्या रंगाचे कप्पे. ही घरं निळी का आहेत याच्या अनेक कथा आहेत. चालता चालता तुम्ही पण एखाद्या घरात सहज डोकावू शकता.
गप्पा मारू शकता. काही म्हणतात की राव जोधाने तेव्हा जोधपूरमधली सर्व घरं निळ्या रंगात रंगवायचं फर्मान काढलं होतं. तर काही म्हणतात ब्राह्मणांची घरं वेगळी ओळखता यावी म्हणून त्यांना निळा रंग दिलेला असतो. तर काही म्हणतात की या घरांना वाळवी लागू नये म्हणून काही केमिकल्स निळ्या रंगात मिसळून लावली जातात. कथा काहीही असो. मेहरानगडावरून हे दृश्य नक्की पाहावं असं आहे. १८९९मध्ये बांधलेलं महाराजा जसवंत सिंग दुसरे यांचे स्मारक ‘जसवंतथाडा’ हे देखील मेहरानगडावर जातानाच वाटेत दिसतं. खूप लांबवर उमेदभवन पण दिसतं.
इथल्या कट्टयावर उभं राहून चालत चालत जाताना हा गड बांधणा-या शासकांच्या हुशारीची कल्पना येते. परकियांच्या आक्रमणाची चाहूल घेता यावी म्हणून हा किल्ला बांधलेला. १ मे १४५९ रोजी हा किल्ला बांधायला घेतला, तो महाराजा जसवंतसिंग यांनी त्यांच्या कार्यकाळात पूर्ण केला. राव जोधा हा राजा रणमलचा २४वा मुलगा व राठोड घराण्याचा १५वा शासक. तोच जोधपूरचा संस्थापक.
जोधपूरच्या आधी राजस्थानची राजधानी ही मंडोरला होती. मंडोर हे जोधपूरपासून ८-१० कि.मी. अंतरावर आहे. मंडोरला असणारी सुरक्षितता राव जोधाला कमी भासू लागली, तशी त्याने राजधानी जोधपूरला हलवली. जोधपूरवर पूर्णपणे लक्ष ठेवता यावं म्हणून हा मेहरानगड बांधला. मिहिर म्हणजे सूर्य व हा सूर्याचा गड. सूर्य हे राठोड घराण्याचं एक प्रमुख दैवत. पुढे मिहिरगडाचा अपभ्रंश होत होत ते मेहरानगड झालं असावं.
असं म्हणतात की, किल्ल्याचं चांगभलं व्हावं म्हणून राजाराम मेघवाल या निष्ठावान सेवकाचा जिवंत बळी देण्यात आला. त्याच्या मागे त्याच्या कुटुंबीयांची तहहयात काळजी घेतली जाईल असं वचन राजाने त्याला दिलं. या मेघवालचे वंशज अजूनही राजबागमध्ये राहतात. तिथेच राजाराम मेघवाल गार्डन आहे. या गडाचा विस्तार ५ एकरावर आहे. एखादा सर्वगुणसंपन्न किल्ला जसा असावा तसाच हा मेहरानगड आहे. ब-याच चित्रपटांतून या किल्ल्याने दर्शन दिलेलं आहे. त्यामुळे तरुणाईलाही याचं आकर्षण आहे. याचं बाकी बांधकाम १६३८-१६७८ या काळात जसवंतसिंगच्या काळात झालं.
गडावर पाहण्यासारखं इतकं काही आहे की आरामात चार-पाच तास जाऊ शकतील. इथलं संग्रहालय तर नक्कीच पाहण्यासारखं आहे. दोन कॅफेटेरिया देखील आहेत. मध्येच कोणी राजस्थानी वाद्य कलाकार देखील आपल्या कुटुंबाला घेऊन कला प्रदर्शन करत बसलेला दिसतो. चपला, पर्स, कपडे आदी वस्तू विकणारे विक्रेते आहेत. त्यांची खूप दुकानं दिसतील. गडावर तोफादेखील आहेत.
राजघराण्यातील लोकांचे महाल व त्यांच्या वस्तू पाहून आश्चर्य वाटतं. मन त्या काळात जातं. विशेषत: मोती महल, फूल महल, शीश महल, दौलतखाना येथील कपडे, मोठी चित्रं, पालख्या, अंबा-या, हौदे, शस्त्रं, वाद्यं इ. पाहताना आपण मश्गूल होऊन जातो. जय पोल, फतेह पोल, देढ का मग्रा पोल, लोहा पोल अशाच काही नावांचे गडाला सात दरवाजे आहेत. ५०० वर्ष जुन्या असलेल्या या किल्ल्यावर दरवर्षी दस-याला पूजा होते. येथे चामुंडा मातेचे मंदिर आहे. २००८ साली इथल्या पायऱ्यांवर चेंगराचेंगरी होऊन सुमारे २०० लोक मृत्यू पावले होते. राजस्थानातल्या अनेक किल्ल्यांपैकी प्रेक्षणीय असा हा एक मेहरानगड.
याशिवाय जोधपूरचं दुसरं आकर्षण म्हणजे उमेदभवनाची देखणी वास्तू. हा जोधपूरचे महाराजे उमेद सिंग यांचा राहता पॅलेस. आता त्यांचे वंशज गज सिंग येथे राहतात. जगातल्या काही राहत्या राजवाडय़ांपैकी सर्वात मोठा असा एक. चित्तर म्हणजे रेड स्टोनमधून हा राजवाडा बांधून काढलाय, त्यामुळे पूर्वी चित्तर पॅलेस असंही म्हणत. १९२९ ते १९४३ असं चौदा वर्ष याचं बांधकाम सुरू होतं, पण निर्मिती पूर्ण होण्यासाठी इतकी वर्ष घेणारा हा राजवाडा देखील तसाच विलोभनीय आहे. पौर्णिमेच्या चांदण्यात हा अजूनच सुंदर दिसतो म्हणून काही जण याला राजस्थानचा ताजमहाल म्हणतात.
ब्रिटिश वास्तुस्थापत्यकार हेन्री लँकेस्टर याची ही रचना ३००० कामगारांनी पूर्णत्वाला नेली. बांधकामासाठी मकराना मार्बल व बर्मीज टिकवूडही वापरलं गेलं. तेव्हाच्या काळात याचा खर्च आला होता (अवघा) १५ लाख रुपये. मी विचार केला की आता एवढया पैशांत साधं घर घेणं देखील मुश्कील. मी मैत्रिणीच्या घरी उतरले होते, त्या घरातून देखील एअरपोर्ट रोडला असणारं हे उमेद भवन दिसायचं. २६ एकर जागेवर पसरलेल्या उमेद भवनाला बागेची देखील जोड आहे. येथील विंटेज कारचे संग्रहालय, पेंटिंग्ज, घडयाळं, राजेशाही दागिने हे सर्व पाहण्यासारखे आहे.
उमेद भवनखेरीज राव जोधा डेझर्ट रॉक पार्कलाही भेट देता येते. या सर्व वास्तूंखेरीज जोधपूर हल्ली साहसप्रेमी पर्यटकांचं आकर्षण ठरतंय ते झिप लायिनग टूरमुळे. फ्लाियग फॉक्स नावाच्या कंपनीने मेहरानगडच्या पायथ्याशीच हा साहसी खेळ सुरू केला आहे. झिप लायिनग म्हणजे एक स्टिलची केबल काही किलोमीटरच्या अंतरामध्ये या टोकापासून त्या टोकापर्यंत बांधलेली असते. त्या केबलला लटकत (अर्थातच योग्य उपकरणांनिशी) दुस-या टोकापर्यंत घसरत जाण्याचा हा रोमांचक खेळ.
मेहरानगडच्या उत्तरेलाच खाली सहा झिप लाईन्स केलेल्या आहेत. ३०० मीटर अंतराच्या टप्प्यात ६ केबल बांधलेल्या आहेत. या झिप्समधील प्रदेशावरून लटकत घसरत जाणं हा एक अनोखा अनुभव ठरतो. स्काय डायिव्हग, बंगी जंिपगपेक्षा हा खेळ कमी जोखमीचा आहे तसंच कमी भीतीदायक आहे. त्यामुळे याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अनेक तरुण-तरुणी या साहसाचा अनुभव घेताना दिसतात. जोधपूरशिवाय राजस्थानात नीमराणा येथेही झिप लायिनग करता येतं.
जोधपूर बदलतंय याचा प्रत्यय मेहरानगडापाशी चालणा-या या खेळापासूनच येतो. शहरात काही ठिकाणी एखाद्या सुंदर लहानशा राजवाडयाप्रमाणे अनेक प्रॉपर्टीज दिसतात. ज्यांची किंमत कोटींच्या घरात आहे. मॉल व मोठया ब्रँडेड दुकानांची संस्कृती इथेही मुरली आहे. देशातल्या अनेक शहरांमध्ये गेलात तर शहरीकरणामुळे ओल्ड टाऊन असा एक विभाग हमखास आढळतो. शहरीकरणाच्या लाटेत सापडण्याआधी ते शहर कसं होतं हे पाहायचं असेल तर नेहमी अशा ओल्ड टाऊन विभागात फेरफटका मारावा.
Print Friendly
Tags:  |  |  |  | 

स्वानंद

तंत्रविज्ञानाने काळाच्या संकल्पना बदलून टाकल्या आहेत. केवळ काळाच्याच नव्हे तर मानवी भावभावनांच्याही. एखाद्या गोष्टीची परिमाणं पूर्वी वेगळी असायची आणि आता ती वेगळी असतात. आयुष्याची वाटचाल नक्की कोणत्या दिशेने चालली आहे हे कळण्यासाठी एखाद्या प्रवासाचीही मदत होऊ शकते. म्हणूनच गरज असते ती थोडं संपर्क क्षेत्राच्या बाहेर राहण्याची.
long travelजखामाच्या उंच शिखरावर आर्मी पोस्टवर राहत असताना रोज सकाळी एकीकडे सनिकांची कवायत सुरू असायची आणि दुसरीकडे थोडया दूर अंतरावर मी मोबाईलची रेंज मिळवण्याची झटापट करत असे. सनिकांच्या प्रमुखाचं लक्ष माझ्याकडेही असे. मी रेंज मिळवण्याच्या नादात कुठे टोकाला जाऊ नये याची काळजी त्याला होती बहुधा. मग असाच कुठेतरी एखाद्या टोकाला थोडाफार रेंजचा मिलीमीटर तुकडा मिळायचा आणि घरच्यांशी बोलणं व्हायचं.
वास्तविक खूप प्रवास करणा-या लोकांना व त्यांच्या जवळच्यांना त्यांच्या संपर्क क्षेत्राच्या बाहेर असण्याचीही सवय झालेली असते; परंतु या अचानक मिळणा-या अल्पकालीन स्वातंत्र्यातही एक गंमत असते, तिचा आस्वाद घेता आला पाहिजे. आपलं होतं काय की, आपण शहरी बेडया तोडून फारसं कुठे जाऊच शकत नाही. किंबहुना अशा साखळ्यांशिवाय आपल्याला जगणं म्हणजे अळणी वाटत असतं. मग पुढयात कितीही स्वच्छ पाण्याचा समुद्र व किनारा असो किंवा शुभ्र पर्वतराजीने लपेटलेला आसमंत असो.
आपण जिथे जाऊ तिथे पहिल्या प्रथम काय पाहतो, तर तिथे मोबाईलची रेंज येते की नाही हे. अर्थात हे करण्यासाठी सुरक्षिततेची भावना भाग पाडते. मोठया समूहातून दूर गेलेल्या मनुष्याचे वर्तन असेच असते. तो सुरक्षेचे पर्याय शोधत राहतो. त्या ओघाने त्याला कोणाशी तरी संवाद साधण्याची गरज भासते. मग तो संपर्काची साधने शोधतो. एकांत त्याला भीती घालतो.
दुरावा असणं, संपर्क तुटणं, निर्मनुष्य होणं, एकांतवास या माणसाच्या भीतीच्या काही प्राथमिक कल्पना आहेत. म्हणून तर रामायण आणि महाभारत यात देखील वनवास ही शिक्षेची संकल्पना आढळते. या शिक्षेचाही विचार केला तर असं दिसतं की दोन्ही कथांमध्ये कोणीही एक व्यक्ती एकटी वनवासाला गेलेली नाही. त्यामुळे एकटं राहणं ही शिक्षाच हे आपल्या मनावर शतकानुशतकं बिंबवलं गेलंय. परंतु श्रीराम असो किंवा धर्मराजा किंवा गौतम बुद्ध, सर्वानाच ज्ञान चौकटीच्या बाहेर पडल्यावर मिळालेलं आहे व त्यांचा कसही घराच्या बाहेरच लागलेला आहे.
आज एकटेपणा ही शिक्षा वाटावी अशी स्थिती नाही. आजचा माणूस सुखाच्या शोधासाठी एखाद्या गोष्टीच्या पार अंतापर्यंत जातो. आज त्याला एकांत प्रिय झालेला आहे. प्रवासाच्या निमित्ताने थोडासा तरी वेळ स्वत:च्या एकटं असण्यासाठी द्यावा असं आज खूप जणांना वाटतं. त्याला त्याची साहसं करायची आहेत. त्याला स्वकीय प्रिय आहेत तसेच त्याला एकटं राहण्याचीही हौस असते. म्हणूनच आज अनेक तरुण-तरुणी एकटयानेच भ्रमंती करताना दिसतात. यात साहसी प्रकार देखील आहेत.
कमांडर दिलीप दोंदे व कमांडर अभिलाष टॉमी यांनी वेगवेगळ्या वेळी एकटयाने एका छोटयाशा शिडाच्या बोटीतून जगाची सफर केली. त्या सफरीतील अनुभव दोंदे यांच्या ‘द फर्स्ट इंडियन’ आणि अभिलाषच्या ‘१५१’ या पुस्तकात वाचण्यासारखे आहेत. भटकंतीवर आधारित असाच एक चित्रपट आहे ‘वाईल्ड’, रिज विदरस्पूनचा. शेरील स्ट्रेड या अमेरिकेतील एका स्त्रीच्या आयुष्याला प्रवासाने कसं वळण मिळतं याचं चित्रण या चित्रपटात आहे.
नव-यापासून विभक्त झालेली आणि आईच्या मृत्यूच्या दु:खात असणारी २६ वर्षीय शेरील ९४ दिवस हायकिंग करत अनेक जंगलातून, द-याडोंगरातून फिरते. वेगवेगळ्या टप्प्यांवर काही माणसं तिला भेटतात. जीवनाचं सार तिला या एकटयाने केलेल्या प्रवासामुळेच उमगतं.
आपण प्रवासात असताना वारंवार मोबाईलची रेंज पाहत असतो. एका अर्थाने आपण स्वत:ला एकटे पाडू इच्छित नसतो. ‘आपण ज्या व्यक्तीशी संपर्क साधू इच्छिता आहात, ती व्यक्ती सध्या संपर्क कक्षेच्या बाहेर आहे. कृपया थोडया वेळाने संपर्क करा.’ असे शब्द ऐकताना होणारं  दु:ख मी समजू शकते, पण माझा संपर्क कक्षेच्या बाहेर राहण्याचा आनंद त्याहून मोठा आहे.
नागालँडच्या जखामाच्या उंच शिखरावर वस्तीला असताना हा आनंद मला झाला, तसाच तो धरमशालाच्या त्रियुंडच्या शिखरावर गेल्यावरही झाला आणि तसाच तो ब्रह्मपुत्रेच्या विस्तीर्ण पात्रामध्ये हेलकावत असतानाही झाला. संवाद व त्यासाठी गरजेचा असणारा संपर्क झाला नाही, माध्यम मिळालं नाही तर जीव कसनुसा होतो. प्रवासातल्या काही अडचणीच्या, संकटांच्या प्रसंगांमध्ये इतरांशी संवाद होणं, संपर्काची माध्यमं सुरू असणं हे अतिशय महत्त्वाचं असू शकतं.
त्याचवेळी शहरी गजबजाटातून एकांताकडे झुकणा-या मनाला एखाद्या निश्चल वातावरणात कोणताही संवाद घडत नसण्याचंही अप्रूप वाटू शकतं. त्याच ओघात जेव्हा आपल्यापाशी असणारी संपर्क साधनं फोल ठरतात तेव्हा आश्चर्य वाटतं व मुकाटपणे गप्पच राहावं लागतं. खरं तर तेव्हाच कुठे आपलं आपल्याकडे, आपल्या प्रवासाच्या उद्देशाकडे लक्ष जातं. माझ्यासारखाच असा हा अंतर्मुख करायला लावणारा आनंद अनेकांनी घेतला असेल.
टेलिफोन आणि त्यानंतर मोबाईल फोन आल्यानंतर आपण एकमेकांच्या संपर्कात कायमच राहण्याची सवय लावून घेतली आहे. किंबहुना ती गरज भासावी इतकं त्या सवयीचं व्यापक रूप आपण करून टाकलेलं आहे. तंत्रज्ञानाचे काही फायदे आणि काही तोटे असतात. म्हणूनच तंत्रज्ञानाला दुधारी तलवार म्हणतात. आज संपर्क माध्यमांमुळे माणसाची तीच गत झालेली आहे.
पूर्णपणे टाळताही येत नाही आणि खूप हवंहवसं आहे असंही नाही. अशा स्थितीला आपण येऊन पोहोचलेलो आहोत. संवादाच्या मानसशास्त्रावर बरंच काही लिहिण्यासारखं आहे, पण तो इथला विषय नाही. विषय आहे तो संवादात बहुउपयोगी ठरणा-या माध्यमांचा आणि त्यांच्या आहारी आपण कसे गेलो आहोत हे पाहण्याचा. तर हेच कळण्यासाठी कधीतरी एखाद्या निबिड अरण्यात पाऊल टाकावं लागतं. दिवसेंदिवस घरातल्यांशी फोनवर न बोलण्याचा अनुभव माझ्या अनेक भटक्या मित्रमंडळींनी घेतला असेल.
व्याघ्र गणनेला गेल्यावर आतमध्ये रेंज मिळणं अशक्य असतं तसंच एखाद्या शिखराच्या टोकावर गेल्यावर तिथे फोनसाठी रेंज मिळणं कठीणच. अगदी अरण्यातच नका जाऊ, थोडं शहरी भागापासून दूर गेलात की गावखेडयात देखील हा अनुभव घेता येतो. अर्थात तो कोणाला हवा असतो, कोणाला नको. ते प्रत्येकाच्या सवयीवर अवलंबून आहे. छानशा नदीकाठी बसलेली एखादी व्यक्ती आसपासच्या वातावरणाचा आनंद घेईल तर दुसरी व्यक्ती कदाचित मोबाईलची रेंज मिळत नसल्याने कासावीस होईल. आपण शहरात राहतो म्हणून आपल्याला संपर्क क्षेत्राबाहेर राहण्याची केवढी नवलाई देखील वाटेल, पण तेच गावात राहणा-या माणसाला वाटणार नाही. त्यांच्यासाठी रेंज नसणं हीच सामान्य गोष्ट असते.
मला आठवतं, आम्ही नागझिराला शाळकरी मुलांना घेऊन गेलो होतो. तेव्हा स्टेशनवर आलेल्या आई-बाबांना आम्ही मुलांकडचे मोबाईल परत दिले होते. त्यांना म्हटलं की, एकदा का आतमध्ये जंगलात गेल्यावर कसली येतेय रेंज, तिथे तुमच्या या यंत्राचा काही उपयोग होणार नाही. त्यावर पालकांचे चेहरे काळजीने भरून गेले. पण नाईलाज होता. टूर लीडरवर निर्धास्त राहा आणि मुलांची काळजी करू नका असं सांगून आम्ही सहलीला निघालो आणि खरंच मुलं तिथे इतकी रमली की त्यांना मोबाईल नसण्याची आठवणही झाली नाही.
वास्तविक आपण आपली गरज वाढवून घेतलेली आहे. प्रत्येक गोष्टीला आपण फोनवरील, इंटरनेटवरील संपर्काशी इतकं जोडून टाकलेलं आहे की त्याशिवाय जग सुरळीत चालणारच नाही, असं आपल्याला वाटत असतं. पण शहराबाहेर गेल्यावर आपल्या या कल्पना किती फोल आहेत हे जाणवतं. म्हणूनच जमेल तेव्हा थोडंस या कोलाहलापासून दूर देखील जाण्याचा प्रयत्न करा.
Print Friendly
Tags:  |