Translate

Friday, September 25, 2015

माती असशी, मातीत मिळशी !

कधीकधी अभ्यासानिमित्ताने कुठे कुठे जंगलात जायची संधी मिळते. कधी असाच एखादा फेरफटका असतो. कारण काहीही असो, जंगलाकडून येणा-या हाकांना साद नाही द्यायची म्हणजे दुर्दैवच. अशा काही जंगलांमध्ये आपल्याकडे एवढी घनगर्द हिरवाई टिकून आहे की, आपण कुठे पोहोचलो आहोत याचं नवल वाटावं. त्या हिरवाईकडे पाहता पाहता मन गुंगून जातं.
Jungleडोंगराच्या शिखरावर पोहोचण्याची कोण घाई लागलेली असते. वर झटापट का चढायचं, तर तिथे आपल्याशी स्पर्धा करत ढग आपल्यापुढे वरवर पळत असतात. बरं, त्यांच्यावर नजर टिकवावी तर खाली अथांग दरी पसरलेली असते. पाऊल चुकलं तर आपलं भविष्य समाप्त हे निश्चित. पण कधी वाटतं की ही खाई एवढी आदिम आणि तिच्या हिरवाईने एवढी भारून टाकतेय.
कधी बेपत्ता व्हायचंच असेल तर इथेच व्हावं. एखाद्या समुद्राकडे पाहतानाही असाच विचार मनात येतो. ही प्रेरणादेखील आदिमची असावी. स्वत:च्या उत्क्रांतीचा गाजावाजा करणा-या माणसाला त्याचा पूर्ण थांगपत्ता तरी कुठे लागलाय, एवढंच असतं तर आजच्या दुनियेत समोरच्या माणसाला ओळखणंही सहज सोपं झालं असतं. त्यामुळेच कदाचित अथांगाची, जे माहीत नाही ते जाणून घ्यायची ही ओढ असावी. मग अशा हिरवाईने चारीठाव बहरून आलेल्या द-याखो-यांना पाहिलं की ही ओढ कुतूहल निर्माण करते.
जिथे जाऊ शकत नाही तिथे जायची ही ओढ असते. निसर्गातून येऊन निसर्गातच पुन्हा मिसळून जाण्याची ही प्रेरणा सर्वामध्येच असते. फक्त ती प्रत्येकाला अमलात आणता येते असं नाही. ज्यांना येते त्यांचं आयुष्य झळाळून उठतं. अंशी-दांडेलीच्या जंगलासमोर उभं राहिल्यावर असेच विचार मनात येत होते. सभोवार आपण उभे आणि अरण्याने चहूबाजूंनी हिरव्या हातांनी आपल्याला कवटाळलेलं असतं.
आपल्यालाही दूर उभ्या असलेल्या वनराईला स्पर्श करता यावा असं वाटतं. परंतु ते शक्य नसतं. मग वाटून जातं की आपण तिथलेच कोणी स्थानिक आदिवासी असतो तर किती बरं झालं असतं. या जंगलाशी आपसूकच नातं जुळलं असतं. गडचिरोलीचं जंगल असो किंवा तामिळनाडूमधलं, इथल्या स्थानिकांनाही हेवा करावा अशी संपत्ती लाभलेली आहे. ते शतकानुशतकं या अरण्यात वावरतायत.
अरण्याशी बोलण्याची त्यांची एक वेगळी भाषा आहे. या स्थानिकांकडे पाहिलं की, त्यांच्यात वावरलं की आपण किती क्षुद्र आहोत असं वाटतं. कारण एकदा खोल अरण्यात गेल्यावर तुमचे आयफोन वगैरे कवडीमोल होतात. तुमच्या लाखोच्या कॅमेरात बंद करायला धावाल तर तिथे अजूनच काहीतरी धमाल अधिकाधिक वेगाने घडत राहते. कृष्णमेघ कुंटे यांचं पुस्तक आहे, ‘एका रानवेडयाची शोधयात्रा’. त्यात एक लेख आहे. पुस्तक अप्रतिम व कोणत्याही जंगलवेडयाला आवडेल असं आहे. तर या लेखात मुदुमुलाईच्या जंगलातल्या एका अशाच गर्द खाईमधल्या वनसंपदेचं वर्णन आहे. हे पुस्तक वाचताना एखाद्या जंगलात हरवल्यासारखंच वाटतं.
तर आपण असे एखाद्या ठिकाणी पोहोचलेलो असतो, जिथे कुठेही पाहिलं तर समोर पसरलेली घनदाट प्राचीन वनराई असते. आपल्या नजरेला वरचेवर झेलून परत पाठवणारा तो हिरवागर्द गच्च थर, तिथे सूर्याची किरणंही कित्येक र्वष पोहोचलेली नसतील असं वाटतं. अशा या हिरव्या रंगाच्या अनेक छटांचे अनेक फटकारे पडलेल्या जंगलात न जाणो कितीतरी प्राणी-पक्षी कधीपासून राहात असतील. त्यांची तिथंच उत्क्रांती होत गेली असेल.
जंगलाला माणसाचा वाराही लागलेला नसल्यामुळे ते सुरक्षित राहिलेले असतात. अशा या अरण्यावरून येणारा वाराही रोमांच देऊन जातो. तिथे आतपर्यंत पोहोचणं अशक्य नाही; पण खूप कठीण मात्र असतं. कडयाच्या टोकाला दूरवर उभं राहून पाहण्यातही एक वेगळाच थरार असतो.
धट्टयाकट्टया माणसालाही हलवेल असा वारा सुटलेला असतो. काही बोलावं तर ऐकूही जाऊ नये एवढा वा-याचा आवाज, तो असा खोल दरीत सूर मारून वर येत असावा, मग शिखरावर घिरटया घालून, एखाद्या ढगाची छेड काढून पुन्हा दरीकडे झेपावत, झाडाझुडपांना धक्के मारत त्याचा संचार सुरू असतो. आपल्यासमोर निसर्गाचा अनाकलनीय देखावा मांडलेला असतो. त्या हिरव्या चित्रात दूरवर कुठल्या तरी नदीच्या नागमोडी वळणांनी पांढ-या रेषा उमटवलेल्या असतात.
ढगांकडे पाहावं तर त्यांनी गर्द होण्यामध्ये खालच्या वनराईशी स्पर्धा लावलेली असते. कोणत्याही क्षणी तुफान पाऊस कोसळेल अशी स्थिती असते. नजरेच्याही पल्याड जाणा-या डोंगररांगा. तिथे कोण वस्तीकरून असावं असा प्रश्न पाडतात. आपण इथपर्यंत यावं यातच आपलं सद्भाग्य असावं असं वाटून जातं. इथून पुढे जास्त वेळ थांबलो तर अजूनच गहन प्रश्न पडतील, मग त्यांचा सामना नको म्हणून आपलं क्षुद्रत्व तसंच अंगी राहू देऊन आपण पुन्हा उतरू लागतो.
कधी कोणाला मनातलं सगळं सांगून टाकावं असं वाटत असेल तर खुशाल अशा एखाद्या अरण्यात जाऊन मन मोकळं करून यावं. मागे एकदा सिरसीजवळच्या भीमनवारे हिलपॉइंटवर गेलो होतो. तेव्हा अक्षरश: नि:स्तब्ध झालो होतो. त्या निसर्गाच्या जादूपुढे आपले बोल मुके होतात. किती पाहशील दोन डोळ्यांनी अशी गत होते.
आपल्या भारतात आजही अशी काही ठिकाणं आहेत. जिथपर्यंत माणसाची उद्ध्वस्त करण्याची नशा पोहोचलेली नाहीये. त्याचे संहारक हात पोहोचलेले नाहीत. त्यामुळे जोपर्यंत असं काही शोधता येईल तिथे जात राहावं. मनातली ओझी तिथं हलकी करावीत आणि देहावरले शून्यमोल निर्थक मुलामे ओघळून जाऊ द्यावेत.
Print Friendly
Tags:  |  |  | 

No comments:

Post a Comment