Translate

Tuesday, May 30, 2017

पक्षीतीर्थ भिगवण

बारामती आणि पुणे शहरांपासून मध्यवर्ती अंतरावर असणारं भिगवण गाव आज पक्षी अभ्यासकांच्या डायरीतलं अगदी महत्त्वाचं ठिकाण झालं आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर असलेल्या भिगवणजवळ असणा-या उजनी धरणाच्या परिसरात शेकडो प्रकारचे परदेशी व स्थानिक पक्षी पाहायला मिळतात. जानेवारी ते एप्रिल या काळात राज्यातला प्रत्येक पक्षीप्रेमी या पंढरीची वारी करतोच करतो. त्यातूनही भिगवणचं मोठं आकर्षण म्हणजे गुलाबी पायांचे नितांत सुंदर असे अग्नीपंख अर्थात फ्लेमिंगो पक्षी. या शिवाय भिगवणजवळच असणा-या मयुरेश्वर वन्यजीव अभयारण्यात चपळ चिंकाराही पाहाता येतात.
फ्लेमिंगो पक्षी मुंबईकरांना नवीन नाहीत परंतु भिगवण आणि उजनी धरणाबद्दल इतकं काही ऐकलं होतं की तिथे जावं अशी उत्सुकता मनात होती. त्यामुळेच अस्सल मुंबईकरांप्रमाणे एका वीकेंडला ठरवलं की भिगवणला पक्षी पाहायला जायचं आणि एका ग्रुपसोबत मी निघाले. पुण्याहून पुढे आम्ही कात्रज फाट्यावरून सोलापूरच्या दिशेने मार्गस्थ झालो. भिगवण आणि इथल्या परिसरात दरवर्षी हे परदेशी पक्षी लाखो-हजारो मैलांचे अंतर पार करून येऊन पोहोचतात. जानेवारी ते मार्च हा या पक्ष्यांना भेटण्याचा उत्तम काळ. हजारो पक्षीप्रेमी आणि पक्षी अभ्यासक दरवर्षी न चुकता भिगवण परिसराला भेट देतातच. पक्षी निरिक्षकांसोबतच कॅमेराची तहान भागवायला येणारेही कमी नसतात. अर्थातच भिगवणचं हे पक्षीतीर्थ आहेच एवढं सुंदर! पुणे सोडल्यावर आम्ही दोन तासातच कुंभारगावला पोहोचलो. हे भिगवणजवळचं एक गाव. भिगवण देखील पुणे-सोलापूर महामार्गावरचं एक लहानसं खेडेगाव, जे पुणे व सोलापूर जिल्ह्यांना अगदी जवळ आहे. इथेच भीमा नदी आहे आणि तिच्यावर बांधलेलं विस्तीर्ण आणि अतिशय सुंदर असं उजनी धरणाचं पात्र. म्हणजेच पक्षी निरिक्षकांचं पक्षीतीर्थ!  परदेशातून काही काळासाठी स्थलांतर करून थंडीच्या दिवसात आपल्या इथे राहाणारे स्थलांतरीत म्हणजे मायग्रेटरी बर्ड्स पाहण्याचे उत्तम ठिकाण म्हणून भिगवण ओळखलं जातं. आता गेली काही वर्ष तर इथे हौशी पक्षीप्रेमींची मांदियाळीच जमते. अगदी पक्षीप्रेमी नसलेलेही इथपर्यंत धरणाच्या पाण्याकाठी वीकेंड साजरा करायला म्हणून येऊन पोहोचतात. आसपासच्या गावांनाही पर्यटनाच्या दृष्टीने जाग येऊ लागली आहे. तसं भिगवण हे बारामती, फलटण, दौंड, करमाळा, माळशिरसच्या जवळचं गाव. पर्यटकांना येण्यासाठी अगदी सोयीचं गाव. कुंभारगाव, डिकसाळ वगैरे गावं थोडी आतल्या अंगाला असल्यामुळे बसने महामार्गावर उतरून मग आत जावं लागतं. पण परदेशी पक्ष्यांच्या निमित्ताने पर्यटन क्षेत्राची चव इथले गावकरी घेत आहेत. डिकसाळ-पारेवाडी आणि डाळज- कुंभारगाव अशी धरणाच्या दोन्ही बाजूंना गावं आहेत, जिथे पक्षीप्रेमींची व्यवस्था होऊ शकते.
आम्ही मुक्काम केला तो कुंभारगावात. कुंभारगावमध्ये संदीप नागरे व दत्ता नागरे या बंधूंनी क्रांती फ्लेमिंगो पॉईंट( अग्नीपंख फ्लेमिंगो पॉईंट) या नावाने होम स्टे अर्थात राहण्या-खाण्यासाठी लॉजिंग-बोर्डिंगची व्यवस्था उभारली आहे. आपल्या परिसरात येणा-या पक्ष्यांचं महत्त्व आणि पर्यावरण संवर्धनाची गरज ओळखून नागरे बंधूंनी हा उपक्रम सुरू केला. त्याला एमटीडीसीची मान्यताही आहे. या दोघांनी आता गावातील इतर तरूणांनाही पक्षी प्रेमींसाठी व पर्यटकांसाठी गाईड म्हणून प्रशिक्षित केलं आहे. इथल्या पक्ष्यांची काहीच माहिती नसेल तर तिथे मार्गदर्शक पुस्तकंही विकायला ठेवलेली आहेत. शिवाय गाईडही जलसफारीत सोबत असतोच. त्यांनी गावात काही चांगल्या बैठ्या खोल्या बांधल्या आहेत, ज्या धरणापासून जवळच्या अंतरावर आहेत. ज्या पर्यटकांना तंबूमध्ये राहण्याचा अनुभव हवा आहे त्यांच्यासाठी टेंटही उपलब्ध आहेत. याशिवाय त्यांनी जेवणाचीही चांगली व्यवस्था इथे ठेवली आहे. चिकन-मटनापासून नदीतल्या चिलापी माशांपर्यंत सर्व काही खवय्यांसाठी इथे उपलब्ध असतं. इथे उतरल्यावर मग बोटिंगसाठी जाता येते, या बोटिंगच्याच माध्यमातून पक्षी पाहाण्याची संधी मिळते. धरणात भरपूर प्रकारचं जलचर खाद्य उपलब्ध असल्याने सर्व प्रमुख पक्ष्यांची इथे जत्राच भरलेली असते. इथे अगदी दोन दिवस काढलेत तरी परिसरातले ७० टक्के पक्षी पाहून होतात. ग्रेटर फ्लेमिंगो (रोहित), पेटेंड स्टॉर्क, लिटल कॉर्मोरँट, पर्पल स्वँप हेन, रडी शेल डक (चक्रवाक), नॉर्दन शॉवेलर, एशियन ओपनबिल, युरेशियन स्पूनबिल, ब्राऊन हेडेड गल, सीगल, इग्रेट, पाँड हेरॉन, ब्लॅक विंग्ड स्टिल्ट, सँडपायपर, ओरिएंटल व्हाईट एबिस, स्मॉल पॅटिनकोल आणि इतर असंख्य प्रकारचे या यादीत नसलेले पक्षी या उजनी धरणाच्या पाण्यात विहार करताना पाहाणं म्हणजे पक्षीप्रेमींच्या आयुष्यातील सुर्वणक्षणच होय.
उजनी धरणाचा हा परिसर एकूणच हिरवागार आहे. बाजूच्या गावांमध्ये फळबागायत आढळते. उजनी धरणाच्या पाण्याने इंदापूर तालुक्यात अतिशय सुयोग्य अशी पर्यावरणीय व्यवस्था निर्माण केलीय ज्यामुळे हजारो पक्षी या धरणाला पसंती देतायत. शिवाय या पाण्याचा उपयोग आजूबाजूच्या गावांतील स्थानिक शेतीलाही होतोय. पाण्याची इथे चणचण होतीच, आजही काही गावांत ती आहे. नुकतेच आमिर खानच्या पाणी फाउंडेशनतर्फे घेतलेल्या पाणी स्पर्धेत (वॉटर कप-२) या इंदापूर तालुक्याचाही समावेश आहे. इथेच जवळ असलेलं मयुरेश्वर वन्यजीव अभयारण्य पाहण्यासाठी गेलो असताना आम्हाला बाळासाहेब बोंद्रे हे प्रयोगशील व मेहनती शेतकरी भेटले. त्यांनी त्यांच्या अडीच-तीन एकरात डाळींबाची शेती फुलवली आहे. याशिवाय उस, धान्याचेही ते थोडंफार उत्पादन घेतात. पाण्याची समस्या गावागावात असली तरी उजनी धरणाकाठच्या या शेतक-याच्या चेह-यावर मात्र हसू होतं आणि कितीही अडचणी आल्या तरी शेती करतच राहाणार हा निर्धार त्यांनी बोलून दाखवला. शेतक-याच्या याच समाधानी चेह-याची आज राज्याला अपेक्षा आहे. मयुरेश्वरची भटकंती म्हणजे उजाड माळरानावर बाभळीच्या रानातून फिरत चिंकारांना शोधणं! भिगवण किंवा कुंभारगावला येणारा पर्यटक सहसा चिंकारांचं दर्शन घेतल्याखेरीज परत जात नाही. मात्र ते ही नशिबात असावं लागतं. कारण हे चिंकारा अतिचपळ असतात. माणूस दिसताक्षणीच ते चौखूर उधळून दूर जातात. काहीच दुर्दैवी असतात जे शिका-यांच्या गोळीला बळी पडतात. आम्हाला एकल चिंकारांखेरीज इथे माय-लेकरांचीही जोडी दिसली. चिंकारांना मोठा धोका म्हणजे इथे लागूनच असलेला महामार्ग. या अभयारण्याला कुंपण नाही. त्यामुळे हे चिंकारा परिसरातल्या शेतांमध्येही महामार्गाचा रस्ता ओलांडून फिरत असतात व काहीवेळा ते गाडीखालीही येतात. चिंकारा हे इथे येणा-या पर्यटकांचं मोठं आकर्षण आहे. धरणामधले पक्षी पाहून झाले की चिंकारांना शोधत छान वेळ घालवता येतो. असा हा भिगवणजवळचा परिसर, परदेशी पक्षी व चिंकारांसाठी इथे एकदा तरी भेट द्यायलाच हवी.


पक्षी पाहण्यासाठी जाताना...
१)      तुमच्यासोबत सुके खाद्यपदार्थ, भरपूर पाणी व दुर्बिण अवश्य ठेवा. मात्र नावेतून जलविहार करताना पक्ष्यांना काहीही खायला घालू नका.
२)      नावेचे शुल्क अंदाजे ७०० ते ८०० रुपये आहे. यात लहान व मोठी असे दोन प्रकार आहेत. लहान नावेत ८ ते ९ जण बसू शकतात तर मोठ्या होडीत सुमारे २०-३० जण मावतात.
३)      एकटेच असाल तर इथे तुम्हाला ग्रुप नक्कीच भेटतील, ज्यांच्यासोबत तुम्ही होडीचे भाडे शेअर करू शकता. एकट्यासाठी सुमारे १०० ते २०० रूपये शुल्क आकारले जाते.
४)      पहाटे सहा वाजता आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळची नावेतली फेरी चुकवू नका. पक्षी पाहण्यासाठी व फोटोग्राफीसाठी या दोन्ही वेळा उत्तम आहेत.
५)      जाण्याआधी फोन करून राहण्याची व जेवण्याची व्यवस्था करून गेलेलं चांगले. ही गावे महामार्गापासून थोडी आत असल्याने खाजगी वाहन नेलं तर अधिक सोयीस्कर.
६)      पाण्याच्या जवळ राहण्याची व्यवस्था असल्याने डास व किटक दूर राहावे म्हणून प्रतिबंधक न्यावे.
७)      नावेतून जाताना गाईड किंवा नाविकाला पक्ष्यांच्या अति जवळ होडी नेण्याचा आग्रह करू नका. अशाने दिसणारे पक्षीही घाबरून उडून जातील.

This article has been published in Marathi newspaper 'Maharashtra Dinman' on 11th April 2017