Translate

Friday, September 25, 2015

सामान भरणे - सहासष्टावी कला



कोणतीही सहल, त्यासाठी होणारा प्रवास हे सर्वाच्याच आवडीचं, परंतु बेत ठरल्यावर एका सर्वात मोठया कंटाळवाण्या कामापासून बहुतेक जण दूर पळ काढत असतात, ते म्हणजे सामान भरण्याचं काम! पण प्रवासासाठी आवश्यकच असलेलं हे काम वेळखाऊ असलं तरी खूप कौशल्यपूर्णही आहे.
pakkingपु. ल. देशपांडे यांचं ‘अपूर्वाई’ हे पुस्तक वाचताना पहिल्या काही प्रकरणांत त्यांना परदेशात कोणत्या वस्तू न्याव्यात, सामानाचं पॅकिंग कसं करावं याचे भोचक सल्ले देणारे त्यांचे प्रेमळ नातेवाईक व मित्रमंडळी यांचं खास त्यांच्या खुसखुशीत शैलीतलं विनोदी वर्णन वाचायला मिळतं. ते वाचून एकंदरीतच प्रवासासाठी लागणारं सामान आपण बॅगेत कसं भरत असतो, हा सर्व गोंधळ प्रत्यक्ष प्रवासाच्या आधी कसा सुरू असतो याचं एक चित्र डोळ्यासमोर झळकलं. प्रवासाच्या अनुषंगाने येणा-या काही गोष्टी या अपरिहार्य असतात. त्या टाळून चालणारच नसतं.
त्यापैकीच एक म्हणजे सामानाचं पॅकिंग. एकदा का कुठे जायचं ठरलं की मग या सामानात कोणत्या वस्तू घ्याव्यात आणि त्या कशा भराव्यात याच्यावर घराघरात काथ्याकूट सुरू होतं. मुळात ते कोण भरणार हा मोठा प्रश्न असतो.
ज्याचं सामान त्याने भरावं असं सांगूनही चालत नाही, कारण तीन-चार माणसांचं कुटुंब असेल तर प्रत्येकासाठी निरनिराळ्या बॅगेचे लाड करून चालत नाही. एकतर सामानाचे वजन कमी करण्याचा आटापिटा करत हे सामान भरलं जातं. प्रथम कोणतं सामान घ्यायचं हे ठरवलं जातं. मग त्यात प्राधान्य असणा-या वस्तूंना प्रथम जागा दिली जाते. सामानाची यादी प्रत्येकाच्या हातातून फिरत असते. पण असं एकत्रित सामान असेल तर काही सामाईक वापराच्या गोष्टींचं ओझं होत नाही. पण एकटयाचं सामान भरताना हे सर्व ओझं आपल्याच खांद्यांवर असणार आहे या भीतीनेच कमी सामान भरलं जातं.
कमीत कमी तसा प्रयत्न तरी केला जातो. मुळात सामान हे कितीही माणसांचं का असेना, प्रवास कितीही दिवसांसाठीचा का असेना, सामान तेवढंच राहतं. म्हणजे पाहा ना..एका दिवसासाठी जा किंवा एक महिन्यासाठी जा, बाथरूम किट, टॉवेल, मेकअप किट इ. सामान घेणं तर आवश्यकच असतं. सामानाची लांबलेली यादी कमी करण्याचा आपण आपला प्रामाणिक प्रयत्न करत असतो; पण जाऊ त्या ठिकाणी आपली काही अडचण तर होणार नाही ना, या शंकेने नेहमीच अधिक सामान भरलं जातं.
मी एकटयाने प्रवास करायला सुरुवात केली तेव्हा, मी (पहिल्यांदा आणि शेवटचं) नको इतकं सामान नेलं होतं. त्यातील अध्र्याहून अधिक सामान वापरलं गेलं नाही. तेव्हापासून कानाला खडा लावला की, अजिबात भारंभार वस्तू बॅगेत भरायच्या नाहीत. यावर एक सोपी युक्ती आहे, प्रथम एक यादी हाताशी ठेवावी. मग सामान मनासारखं भरून झालं की त्याचं संकलन करायचं, थोडक्यात मनावर दगड ठेवून काटछाट करावी.
तुम्ही किती दिवस राहणार आहात, एखाद्या ठिकाणी हॉटेल किंवा तत्सम घराबाहेर पडण्याचा प्रसंग किती वेळा येणार आहे, तिथल्या समारंभात तुम्ही सहभागी होणार आहात का, तिथला ऋतू कोणता आहे, एखादा कपडा पुन्हा किती वेळा वापरता येईल, असे काही प्रश्न स्वत:ला विचारा.
महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कोणत्या ठिकाणी जाता आहात, म्हणजे तुम्ही जंगल फिरायला जाताय की एखाद्या शहराची भटकंती करायला जाताय, एखाद्या घरगुती समारंभासाठी जाताय की एखाद्या संस्थेच्या कार्यक्रमासाठी जाताय अशा प्रकारे तुमच्या जाण्याच्या उद्देशावर तुमचं सामान अवलंबून असेल. क्वचित प्रसंगी औपचारिक कार्यक्रमानंतर अनौपचारिक असेही काही कार्यक्रम असू शकतात.
एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी एखाद्या संस्थेचा औपचारिक कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमानंतर सहभागींना शहरात फिरवलं जातं. मग अशावेळी परिसंवादात घातलेले कपडे फिरायला जाताना घालून चालत नाही. तर सामान भरताना अशा अनेक गोष्टींचं भान ठेवावं लागतं.
जिथे पावसाळा किंवा हिवाळा सुरू असतो, तिथे कपडयांचे जास्तीचे जोड नेणं हे केव्हाही उत्तम. जे कायम कुठेही जाण्यासाठी एका पायावर तयार असतात अशा माणसांची बॅग कायम भरलेली असते. आमची एक मैत्रीण कायम जगभरात फिरत असते. तिची बॅग कायम भरलेली असते. शिवाय अशा माणसांना कमीत-कमी सामान कसं न्यावं याची चांगली जाण आलेली असते.
खूप वेळा प्रवास घडल्यावर असं ज्ञान आपल्यालाही मिळतं. सामान भरण्याचेही काही प्रकार आहेत. ते म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या बॅगांमध्ये सामान भरणं. हे तेवढंच कौशल्यपूर्ण काम असतं. प्रवास होवो न् होवो, तो कसाही होवो, पूर्ण होवो वा त्यामध्ये अडचणी येवोत, आपल्याला सामान हे घ्यावंच लागतं.
तुम्ही रेल्वेने जा नाहीतर विमानाने जा, काही ठरावीक अंतरापर्यंत आपलं सामान आपल्यालाच न्यावं लागतं. कारण हमाल घ्यायचा म्हटला तरी तो काही आपल्या घराच्या दरवाजापाशी येऊन उभा नसतो. त्यामुळे टॅक्सी किंवा रिक्षा स्टँडपर्यंत, रेल्वे स्टेशनपर्यंत आपलं सामान आपणच नेतो. याचा विचार करून नेहमी कमी वस्तू न्याव्यात.
कमीत कमी सामानात प्रवास करता येणं हे एका यशस्वी प्रवासाचं लक्षण आहे. आता सामान नेणं-भरणं यात एवढं काय आहे मोठं, असं कोणीही म्हणेल; पण लगेज बॅग्जची इंडस्ट्री भारतात खूप मोठी आहे. हा एक चांगला चालणारा व्यवसाय आहे. कोणत्याही रेल्वे स्थानकावर किंवा विमानतळावर गेल्यावर याची प्रचिती येते.
भारतीय प्रवाशाची मूळ प्रवृत्ती जास्त सामान नेण्याकडे झुकणारी आहे. याचं कारण आपल्या संस्कृतीत आहे. आपण कुटुंबाचा विचार करतो. इतर माणसांचाही विचार करतो. परदेशात कुटुंब संस्कृतीचा प्रभाव कमी आहे, त्यामुळे सामान भरताना परदेशी प्रवासी एवढा विचार करत नाही. त्यामुळेच त्यांचं सामान आटोपशीर राहतं.
भारतीय माणसापेक्षा परदेशी पर्यटक हा अधिक देश फिरणारा असतो, परंतु त्यांच्याकडे सामान भरण्याची एक कला आहे. ज्याला बॅगपॅकिंग असा शब्द आहे. खरं तर ट्रेकर्ससाठी हा शब्द जास्त योग्य आहे. मोठाल्या, पण एकाच लांब-उभट रकसॅकमध्ये सामान भरून ती पाठंगुळीला लावून फिरणारे अनेक पर्यटक हल्ली पाहायला मिळतात. आपण सर्वाचा विचार करतो. शक्यतो कोणाला ओझं जास्त होऊ नये म्हणून चार-पाच बॅग्ज घेतल्या जातात.
खरं तर प्रवास करणारे कितीही जण असोत, ‘किप इट लाईटवेट’ म्हणजे सामान हलकं असू द्यात असं नेहमीच सामानाबाबत म्हटलं जातं. शक्यतो आपण जिथे जाणार असू तिथे जाऊन खरेदी करता येतील अशा वस्तू स्वत:सोबत घेऊ नयेत.
थंडीचे दिवस सोडल्यास पातळसर कपडे भरावेत. या आणि अशा अनेक गोष्टींचं भान आपल्याला बॅग्ज भरताना ठेवावं लागतं. त्यातही परदेशात जाणार असाल तर विशिष्ट प्रकारे पॅकिंग करावे लागते. प्रवास हा एक अनुभव मिळविण्याचं व्यासपीठ आहे, असं मानलं तर सामान भरणं ही त्यात सादर होणारी एक कला आहे.
Print Friendly
Tags:  |  | 

No comments:

Post a Comment