Translate

Friday, September 25, 2015

मैलांमागची स्वप्नं



प्रत्येकाच्या जगण्याला काहीएक अर्थ असतो, त्याचप्रमाणे एकेकाच्या प्रवासालाही काही अंत-उगम असतो, उद्दिष्ट असतं. प्रत्येकाच्या प्रवासाला काही एक वेगवेगळा उद्देश असतो. व्यक्तीनुसार बदलत जाणारी आवड लक्षात घेऊन हल्ली पर्यटनाची व्याख्याही बदलत चालली आहे. भटकंती करणा-यांप्रमाणेच पर्यटन व्यावसायिक कंपन्या देखील नवनवीन कल्पनांच्या व जागांच्या शोधात आहेत.

CANOE-WHANGANUI-1200अरण्याचं वेड मला लावलं ते जिम कॉर्बेट यांच्या रोमांचक पुस्तकांनी. त्यांची पुस्तकं वाचताना आपण त्या उत्तरांचलच्या गढवाल-कुमांऊच्या प्रदेशातच फिरतो आहोत, असं वाटत असे. शाळकरी वयापासून जिम कॉर्बेट यांची इंग्रजी-मराठी अनुवादित जंगल कथांची सर्व पुस्तकं वाचून काढलेली होती. त्यामुळे त्यांच्या थरारक साहसी शिकारकथांचं गारुड मनावर होतं.
जिम कॉर्बेट हे जिथं राहिले, ज्या भारतीय माणसांनी त्यांच्यावर जीव लावला, जिथल्या नरभक्षक वाघ व बिबटय़ांनी कॉर्बेट यांना एक पटाईत शिकारी बनवलं, ज्या कुमांऊच्या प्रदेशात कॉर्बेट रमले त्या प्रदेशाची ओळख करून घेण्याची इच्छा मनात दाटून राहिलेली होती. जिम कॉर्बेट यांच्या स्मृतीखातर उत्तरांचलच्या प्रदेशात राष्ट्रीय उद्यान बनवण्यात आलं. जंगलकथा भरपूर वाचल्या असल्या तरीही कधी जंगलात पाऊल टाकलं नव्हतं. त्यामुळे सोबत कोण येणार असं विचारत विचारत एक दोघांना तयारही केलं होतं.
ऐनवेळी वन्यजीवनाची फारशी आवड नसणा-या या मित्रमंडळींनी काढता पाय घेतला आणि अस्मादिक एकटेच पोहोचले जंगलात! मुंबई ते दिल्ली पुन्हा दिल्ली ते रामनगर हा सर्व प्रवास खूपच मजेशीर व अविस्मरणीय होता. एकटयाने केला म्हणून नव्हे तर या प्रवासात कित्येक अशा गोष्टी घडल्या, ज्यामुळे या लांबलचक प्रवासाचा अजिबात कंटाळा आला नाही.
दोन दिवसांच्या प्रवासानंतर अखेर जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा इतक्या लांबवर आल्याचं सार्थकच झाल्यासारखं वाटलं, इतकं हे कॉर्बेटचं जंगल मोहात पाडणारं आहे. एकतर जंगल हा प्रकार कसा असतो ते कधी पाहिलं नव्हतं व मला वाटतं हे प्रत्येकाबाबत घडत असते. पुढे देशातील अनेक अरण्यांबाबत गोष्टी वाचनात येऊ लागल्या व प्रत्येक ठिकाणी आपण जावं असं वाटू लागलं. पण प्रत्येकच वेळी कोणी सोबत असतं असं नाही होत, त्यामुळे पाठंगुळीला सामान बांधून पाहिजे तिथे जायचं असं ठरवलं.
कुठल्या तरी क्षणी आपण सर्व सग्यासोबत्यांची साथ न घेता एकटयानेच चालू लागतो, त्यांच्या बरोबर असण्याची-नसण्याचीही आपल्याला फिकीर वाटत नाही, इच्छित स्थळी पोहोचेपर्यंत आपली तगमग होत राहते; परंतु या प्रवासाच्या व पाहिजे ते मिळवल्याच्या आनंदात आपल्या मागे घरी राहिलेल्यांचाही आपल्याला विसर पडतो. पुढे-पुढे अट्टल फिरस्ते बनल्यावर घरच्यांनाही याची सवय होते.
निसर्गात कोणतीही घटना घडण्यामागे एखादे कारण असते, त्याप्रमाणे प्रवास घडून येण्यामागेही एखादे कारण प्रत्येकाचे असते. कोणाला एखाद्या लिखाणातील वर्णन पाहून एखाद्या ठिकाणी जावेसे वाटते तर कधी वीर सावरकरांसारखी एखादी व्यक्ती अनेकांच्या अंदमान भेटीला कारण ठरलेली असते. कधी फुलपाखरांच्या अभ्यासासाठी भीमतालसारख्या सुंदर ठिकाणी भेट दिली जाते तर कधी केवळ फक्त छंद म्हणून निरनिराळ्या ठिकाणच्या देवळांना भेट दिली जाते.
कोणाला एखादी परिक्रमा पूर्ण करायची असते. प्रत्येकाचे उद्देश वेगवेगळे असतात. प्रवासाला कसं स्वरूप द्यायचं हेही आपल्यावरच अवलंबून असतं. काही जणांना खर्च होणा-या पैशांचं समाधान देईल, असा प्रवास म्हणजे व्हॅल्यू ट्रॅव्हल करायला आवडतं. व्हॅल्यू ट्रॅव्हल म्हणजे थोडंफार बजेट ट्रॅव्हलसारखाच प्रकार. फक्त यात पैशांची मर्यादा फिरणारा बाळगत नाही, त्याला फक्त त्याने खर्च केलेल्या पैशांमध्ये प्रवासातली सर्व वैशिष्टय़ं दिसणार आहेत की नाही याची काळजी असते. अनेक टूर कंपन्यांकडे अशाच व्हॅल्यू ट्रॅव्हलचे पर्याय असतात. त्यांचा उद्देशच मुळी अशा व्हॅल्यू ट्रॅव्हलर्सना म्हणजे ‘काळजीवाहू’ पर्यटकांना वेचण्याचा असतो.
‘१२ हजारांत मध्य प्रदेशातील १२ विख्यात ठिकाणं पाहा’ अशा जाहिराती वाचून सहलीवर जातात ते असेच पर्यटक असतात. अशा पर्यटकांना रोज उठल्यावर एका शहरातलं फिरणं पूर्ण करून दुसरं शहर लवकरात लवकर गाठायचं असतं. तशी आखणीच मुळी केलेली असते. मग त्या नियोजनात कुठे काही पुढे-मागे झालं की सहलीचा बोजवारा तर उडतोच, शिवाय अशा सहलींमध्ये व्यवस्थांचे गोंधळ, तडजोडी, धावाधाव हे ठरलेलंच असतं.
अर्थात, अशा सहली काही चुकीच्या आहेत असं नाही. पण एखाद्या मंदिराबाहेर बसलेल्या साधूबाबाने सांगितलेलं जीवनाचं तत्त्वज्ञान आणि जे. कृष्णमूर्तीनी सांगितलेलं जीवनसार यात जेवढा फरक असतो तेवढाच अशा सहलींमध्ये व इतर मनमोकळ्या प्रवासांमध्ये असतो. फक्त वीकेंडच मोकळा मिळणा-या, अहोरात्र कामात गढलेल्या हल्लीच्या पिढीसाठी ‘शॉर्ट ब्रेक्स’ नावाच्या सहली अनेक कंपन्यांनी सादर केलेल्या आहेत. ज्यात पटकन जाऊन येता येईल अशा ठिकाणी सहल नेली जाते. हे शॉर्ट ब्रेक्सही थोडेफार व्हॅल्यू ट्रॅव्हलसारखेच. वेळेत बसवलेलं गणितच.
एखादा प्रवास हा आपण फक्त निव्र्याज आनंदासाठी करत असतो. मनात काहीही नसतं. काहीही पाहायचं नसतं. कुठेही फिरायचं नसतं, साईटसिईंग करायचं नसतं. फक्त साधासरळ प्रवास करत त्याची मजा अनुभवयाची असते. आपले सोबती कोण असतील, काही अडचणी येतील का, पैसे पुरतील का, पाहिजे त्या सोयीच मिळतील का अशा फुटकळ चिंता वा-यावर सोडून देऊन असा प्रवास करायचा असतो. त्यातला आनंदानुभव घ्यायचा असतो. एखाद्या वेळेस वाटतं की शहर सोडून निवांत कुठेतरी अज्ञातवासात जाऊन राहावं.
आताशा अज्ञातवास हा कोणालाही मिळणं मुश्कीलच, पण त्यातल्या त्यात जिथे पर्यटकांची गर्दी नसेल, स्थानिक लोकांखेरीज फारशी कोणाला ज्याची माहिती नसेल अशी ठिकाणं आपल्या देशात अजूनही आहेत. फक्त थोडं चौकस राहून त्यांचा शोध घ्यावा लागतो.
हिमाचल प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक अशा कित्येक राज्यात सुंदरशी गावं आहेत जिथपर्यंत कोणाचीच नजर गेलेली नाही. अशा ठिकाणांची माहिती फक्त आजूबाजूच्या लोकांकडूनच मिळत असते किंवा वाटेवरून जाताना अशी ठिकाणं नजरेस पडतात. त्यांची माहिती मिळवून एखादी छानशी सुट्टी तिथे घालवता येणं शक्य आहे. असा मुक्तछंदी प्रवास काही जण स्वत:च्या आवडीच्या वाहनानेही करतात. रोड ट्रिप त्यातल्याच. मग काही जण बाईक घेतात किंवा अगदी सायकलवरून देखील काही जण सफर करतात.
हल्ली काही जण स्वत:ची यॉट घेऊन समुद्र सफरही करतात. यॉटिंग करत-करत मुंबई-गोवा, मुंबई-कोची वगैरे छोटी अंतरं जाता येतात. काही जण आराम मिळवणं म्हणजे लीशर ट्रॅव्हलव्यतिरिक्त स्वत:च्या छंदांसाठीही प्रवास करतात. ज्यात प्रामुख्याने छंदासाठीचा अभ्यास समाविष्ट असतो. त्यात येतात फिल्ड ट्रिप्स. निसर्ग अभ्यासक, इतिहासाचे किंवा वास्तुकलेचे अभ्यासक, विज्ञान संशोधक यांच्यासाठी अशा फिल्ड ट्रिप्स महत्त्वाच्या असतात. याचा फायदा असा की अशा फिरण्यातून अभ्यास तर होतोच, शिवाय जनसंपर्कही वाढतो, निरनिराळ्या लोकांना भेटण्याची संधी मिळते.
पर्यटनाच्या क्षेत्रातला नवा टप्पा म्हणजे थीम बेस्ड् ट्रॅव्हल. ही थीम ठिकाणांची, शहरांची नाही तर तुमच्या आवडीप्रमाणे सहलीचं, पर्यटनाचं नियोजन केलं जातं. तुम्ही संगीतकार असाल तर संगीत क्षेत्राशी संबंधित ठिकाणी नेलं जातं, तिथे काही संवाद-अभ्यास होतो. काहींना खाद्यप्रकारांची आवड असेल तर उत्कृष्ट खाद्यसंस्कृती असलेल्या ठिकाणी त्यांना नेलं जातं. प्रत्येकाच्या प्रेरणेनुसार प्रवासामागे अशी खूप काही कारणं असू शकतील. मुळात कमी दिवसांमध्ये जास्तीत जास्त फायदा मिळवून देणारी सहल करायची की आरामात रमत-गमत फिरायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न.
Print Friendly
Tags:  |  | 

No comments:

Post a Comment