Translate

Friday, September 25, 2015

उत्साही वन्यजीवप्रेम

भारतीय पर्यटन व्यवसायात सध्याच्या काळात चांगली चालणारी एक शाखा म्हणजे वन्यजीव पर्यटन व्यवसाय. जोपर्यंत भारत आपलं प्राणीवैभव टिकवून ठेवेल आणि वन्यजीवप्रेमी असतील तोपर्यंत या व्यवसायाला मरण नाही.
kanhaसकाळी १० किंवा संध्याकाळी साडेपाच वाजताची वेळ. स्थळ कोणतंही व्याघ्र अभयारण्य आणि तिथल्या गेटवर उभ्या असणा-या जंगल जिप्सीज व कँटर्स. चर्चा एकच. तुम्हाला वाघ दिसला का? आणि तो नाही दिसला तर मग कोणते प्राणी दिसले? अशा अनेक रसरंजित गोष्टींची देवाण-घेवाण केली जाते. त्या दिवसात वाघ न दिसलेल्यांच्या चेह-यावर उद्या तरी तो दिसेल का याचं प्रश्नचिन्ह दिसत असतं. दिसलेल्यांच्या चेह-यावर अतोनात आनंद असतो. मग, ‘दिसेल हो तुम्हालाही उद्या’ असा सांत्वनाचा सूर एकंदरीत वातावरणात ऐकू येतो. आशा-निराशेचा खेळ जणू इथे रंगत असतो.
खुल्या अरण्यात वाघ-बिबटयाची एक झलक पाहायला मिळावी म्हणून सतत वर्षानुवर्षे विविध जंगलांमध्ये खेपा टाकणारे कितीतरी जण आहेत. तसंच त्यांना वाघ हमखास दाखवतो म्हणून जंगलात नेणारे देखील अनेक आहेत. त्यातही भोळ्याभाबडया, वाघाची एक झलक पाहायला मिळावी म्हणून तरसलेल्या वन्यजीवप्रेमींना गळाला लावलं जातं. अर्थात भारतीय जंगल, आपला पर्यटन व्यवसाय व वाघ यांची पूर्ण माहिती असणारे लोक क्वचितच अशा गळाला लागतात. म्हणूनच वाघ हमखास पाहायला मिळेल याची शक्यता वाढावी यासाठी काही ठरावीक जंगलांमध्येच लोकांना नेलं जातं.
उदाहरणार्थ रणथंबोर, कान्हा, बांधवगढ इ. जंगलात व्याघ्रदर्शन होण्याची शक्यता इतर जंगलांच्या तुलनेत जास्त असते. लोकांनाही वाघ पाहायला मिळेल ना, याच्याशीच फक्त कर्तव्य असतं. त्यांना कोणत्या जंगलात जात आहोत याच्याशी अज्ञानामुळे फारसं देणं-घेणं नसतं. वास्तविक लोकांच्या याच रोमांचित उत्साहामुळे आज भारतीय वन्यजीव पर्यटन व्यवसाय तेजीत चालतो आहे. किंबहुना त्याला एक वेगळंच धंदेवाईक स्वरूप मिळालं आहे. कितीतरी राष्ट्रीय उद्यानांच्या आसपासच्या गावांमध्येही पर्यटन व्यवसाय याच कारणामुळे फोफावला आहे. यात छोटया व्यावसायिकांबरोबरच मोठे व्यावसायिकही आहेत.
आज अनेक जण आपला मूळ धंदा सोडून वन्यजीव पर्यटन व्यवसायामध्ये नव्याने उतरत आहेत. यात भारतीय वन्यजीवनाची मामुली माहिती असणारे कितीतरी जण आहेत. कारण यात पैसा आहे. मागणी आहे. गरज आहे ती फक्त तुमच्या ग्राहकांना शोधण्याची. पुढे गरज असते ती ग्राहक तुमच्याकडे टिकून राहील यासाठी प्रयत्न करण्याची. तेवढं जमलं की तुम्ही यशस्वी होता. हे व्यवस्थापन कमी माणसांची सहल ठेवली की यशस्वी होण्याची शक्यता जास्त. मात्र इतर कोणत्याही व्यवसायाप्रमाणे यातही विश्वास टिकवून ठेवता आला पाहिजे. वाघ आपला राष्ट्रीय प्राणी आहे म्हणून नाही, तर त्याखेरीज इतर अनेक पशू-प्राण्यांनी देखील आपली जंगलं समृद्ध आहेत.
या सर्वासाठी विविध स्तरातील ग्राहक, वन्यजीवप्रेमी, संशोधक आहेत. त्यामुळे इतर व्यवसायांप्रमाणेच यातही ‘क्लाएंट टॅपिंग’ जमलं पाहिजे. हा एक असा व्यवसाय आहे, ज्यात आपणही अनुभवसंपन्न होत जातो. इतरांसोबतच आपणही आनंद घेऊ शकतो. म्हणूनच वन्यजीवप्रेमी असणा-या माझ्या अनेक मित्रमंडळींनी लोकांना जंगलात फिरवून आणण्याचा व्यवसाय आवडीने स्वीकारलेला आहे. काही जणांनी तर याच आर्थिक नफ्यालाही फाटा दिलेला आहे. कारण ही मंडळी पर्यटनाचा व्यवसाय केवळ फायद्याच्या स्वार्थापोटी करायला आलेली नाहीत, तर त्यांच्या आवडीतून त्यांनी हा मार्ग निवडलाय. आपल्यासोबतच इतरांनाही भारतीय वन्यजीवनाचं अनोखं विश्व दाखवण्याची असोशी त्यांच्याकडे आहे. तसं पाहिलं तर वन्यजीव पर्यटनामध्ये आज हजारो टूर ऑपरेटर व एजंट्स सापडतील.
पण ख-या प्रेमापोटी अशा सहली नेणारे फार कमी आढळतात. अशांची निवड करणं कठीण आहे. खरं तर तुम्हाला तुमच्या उद्दिष्टापर्यंत नेऊन ठेवणं हे सहल आयोजकाचं काम. तेच कोणताही वन्यजीव पर्यटन व्यावसायिक करतो. त्यापुढे त्याच्या हुकुमाची सद्दी संपते. पुढे हुकूम चालतो तो फक्त आणि फक्त निसर्गाचा. तेव्हा अमुक एखादा पशू-प्राणी दिसला नाही म्हणून सहल आयोजकाला दोषी धरण्यात काहीच अर्थ नसतो. परंतु अज्ञानामुळे अनेक जण अशी निराशा अनुभवतात व वन्यजीव सहल आयोजकाला दोषी धरतात. अशावेळी या पर्यटकांना एकंदरीत ‘सामान्य ज्ञान’ देण्याचं कसब त्या पर्यटन आयोजकाच्या अंगी असावं लागतं.
अनेक वेळा स्थानिकांना आपल्या व्यवसायात गुंतवून घेतलं जातं. या स्थानिकांकडेच बरेचदा सहल आयोजकापेक्षा जास्त ज्ञान असतं असं आढळून येतं. माझ्या माहितीत असे अनेक जण आहेत जे स्वत: अरण्यात फिरायला जातात व सोबतीला फक्त एखाद्या स्थानिकाला नेतात. या व्यवसायात जोखीमही तेवढीच असते. कारण प्रत्यक्ष जंगलात आपल्या जबाबदारीवर १०-१२ जणांना घेऊन जाणं ही सोपी गोष्ट नाही. याचं कारण मुळात जंगल फिरणं ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही. अनेकांना तिथे कोणती सावधगिरी बाळगावी लागेल, कसं वागावं लागेल, काय समोर येईल याचीही कल्पना नसते. या सर्वाना सांभाळण्याची जबाबदारी सहल आयोजकावर किंवा त्या टूर लीडरवर असते. शहरातून बाहेर पडून प्रथमच जंगल सफारी करणारे, त्या वातावरणाचा अनुभव घेणारे अनेक जण असतात.
सर्व काही छान छान, प्रसन्न वाटत असलं तरी या वातावरणात कधी कोणाला भीती वाटू शकते. जंगलात काहीवेळेस वाहन बंद पडण्याची वेळ येते. वरवर पाहता हे गमतीशीर वाटू शकतं. मात्र हत्ती, गेंडे, वाघ, सिंह असलेल्या अरण्यात संध्याकाळच्या वेळी पर्यटकांना घेऊन चाललेलं वाहन बंद पडलंय हा अनुभव कोणालाच नकोसा असणार. कारण बरेचदा यात लहान मुलं देखील असतात. तर अशा प्रकारे सहल आयोजकाला ब-याच स्तरावर काळजी घ्यावी लागते. मग ती आर्थिक जबाबदारी असो किंवा इतर कोणतीही. फक्त त्याची जोखीम इतर कोणत्याही ठिकाणापेक्षा वाढते, कारण अरण्य हे वाटतं तेवढं सुकर, सोपं नाही. रणथंबोरच्या जंगलात पाऊस खूप पडल्यामुळे एकदा एका ओढयाला पूर आला होता. पर्यटकांनी हट्टाने जीप ओढयातून नेली व ती वाहून गेली. अशी अनेक संकटं तिथं येऊ शकतात. याचं भान राखावं लागतं. अनेक वन्यजीव सहल आयोजक हे खूप धंदेवाईक असतात. त्यांचं उथळ ज्ञान सामान्य पर्यटकांना फारसं कळून येत नाही.
इथेच असे व्यावसायिक त्यांचा फायदा घेतात. नाईट नेचर ट्रेलचं आमिष काही सहलींमध्ये दाखवलं जातं. दिवसभर दोन सफारी करून झाल्यावर आपोआप पर्यटक दमलेला असतो. हीच संधी घेऊन काही सहल आयोजक रात्रीचा नेचर ट्रेल रद्द करून टाकतात आणि तो पर्यटक एका अनोख्या अनुभवाला मुकतो. भारतीय राष्ट्रीय उद्यानांमध्ये फिरताना तिथल्या झोन्सची पुरेपूर माहिती सहल नेणा-याला असली पाहिजे. तरच त्याच्यासोबत फिरण्याला अर्थ आहे. काही फोटोग्राफर्स देखील वन्यजीव सहली नेतात. मात्र काहीवेळा अशा सहलींवर निसर्ग अभ्यासक किंवा नॅचरलिस्ट नसतो. अशावेळेस कुठे जावं, काय पाहावं याचा गोंधळ उडू शकतो. मुळात तुम्ही एखाद्या जंगलात कशासाठी जात आहात हे तुम्हाला ठरवता आलं पाहिजे. अशा अनेक गोष्टी आहेत. त्याविषयी पुढील लेखातून बोलू.
Print Friendly
Tags:  |  |  | 

No comments:

Post a Comment