Translate

Wednesday, May 6, 2015

प्रवासचित्र


काही प्रवासांच्या आठवणी या थंडगार झुळकेसारख्या असतात. अशा आठवणी कधी येऊन भेटल्या तर क्लांत मनाला बसल्याजागी थोडी विश्रांती मिळते व मन ताजंतवानं होतं. पुन्हा नव्या प्रवासाचं खातं लिहिण्यासाठी मन सरसावतं.
‘‘अज्ज मेरा जी करदा.. रब्बा रब्बा मीं बरसा.. सादी कोठी दाने पा..’’
खालच्या दरीत अंधाराच्या कुशीत गुडुप झालेल्या कोणत्या तरी अनोळखी गावातून पंजाबी लोकगीतातली तान-सूर वा-यावर हेलकावत वर येत होते. विलक्षण भेदक वाटत होते. दूरवर खाली काही प्रकाशाचे ठिपके लुकलुकत होते. बहुधा लग्नघर असावं. खिडकीत बसून डोळे मिटल्यावर त्या सुरांसोबत तिथं चाललेली सर्व घाईगडबड, नाचगाणी हे देखील डोळ्यांसमोर उगाचच उमटत होतं. भयंकर थंडीतही त्या कोण्या एका गावात नव्या जीवनाची सुरुवात करण्याची सारी तयारी चालली होती. कुलुला जाणा-या घाटातून आमची बसदेखील नव्या नवरीसारखी नाजूकपणे वळणं घेत चालली होती कारण वळणं नुसतीच धोकादायक नव्हती तर समजायलाही खूप कठीण होती. आमच्या डोळ्यांवर झोप चढत होती पण ड्रायव्हरच्या डोळ्यावर ती चढू नये ही प्रार्थना करत आम्ही जागे होतो. हे असे अनुभवच एखाद्या कंटाळवाण्या लांबलचक प्रवासालाही मनात जागा देत असतात. माणसाच्या आयुष्यातलं प्रवासाचं महत्त्व माझा आवडता लेखक ब्रुस चॅटविन यानं एका फटक्यात सांगितलंय, तो म्हणतो मुळात आयुष्यच हा एक आपला आपण करायचा मोठा प्रवास आहे, त्यामुळे फिरण्याचा आनंद घ्यायचा असेल तर तुमचं घर हे रस्ता असलं पाहिजे, बांधलेलं घर नव्हे. प्रवास कसाही असो, मग तो शतकानुशतकं पडीक कातळांच्या प्रदेशातला असो की नागमोडी हिरव्या घाटातला, तो घडत असताना त्याची एक प्रतिमादेखील मनात तयार होत असते. जणू त्याचं व्यक्तित्वच म्हणा ना.. त्यात भेटणा-या अनेक माणसांनी, घटनांनी रंग भरलेले असतात. एखादा प्रवास मनात जर खूप वर्षानीही ताजा असेल तर त्याला कारण हे रंग असतात. हे रंग सुकणारे नसतात. आठवणींना झटकन ओलावा देणारे हे रंग असतात.
आपण सतत कुठे ना कुठे तरी प्रवास करतच असतो, माध्यमं निरनिराळी असतात, मात्र प्रवासचित्र प्रत्येकवेळी वेगळं उमटतं. या चित्रात तुम्ही कुठे, कसा, कोणत्या जाणिवेने अनुभव घेत असाल यावर त्याचं उत्तम साकारणं अवलंबून आहे. हे तुमचं स्वत:चं प्रवासचित्र असतं. मग तुमच्या सोबतीनं प्रवास करणा-या प्रत्येकाच्या जाणिवेतून ते तुमच्या चित्रासारखंच उमटेल हे शक्य नाही. प्रवासचित्रांमधला काळ हा एक त्यातला अनिवार्य घटक आहे. तो दिवस असो वा रात्र, जुना असोत वा नवा, संदर्भ असोत किंवा नसोत, तो तिथंच गोठलेला असतो. असं एखादं प्रवासचित्र पाहताना त्या क्षणापेक्षा मोठं तुम्हाला होता येत नाही. त्यातलं सौंदर्य हे पुन्हा त्या काळातच डोकावण्यातच आहे. ते तिथंच अनुभवावं व चुपचाप परत आपल्या जगात यावं. हा स्तब्ध काळ फक्त तुमच्यापुरताच नसतो तर तो तुमच्या प्रवासातला एखादा घटकही असू शकतो. दुरांतो एक्स्प्रेसने कोलकात्याला जाताना असाच एकदा गोठलेला क्षण भेटला. मिदनापूर जिल्ह्यातून गाडी जात असताना ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसच्या कोसळलेल्या डब्यांचे अवशेष दोन वर्षानीही तिथंच पडलेले पाहायला मिळाले. मनात तेव्हाही चर्र झालं. कोणत्या बेसावध क्षणी त्या प्रवाशांच्या मनातलं चित्र अधुरं राहून गेलं असेल असं वाटलं. इतका काळ लोटून गेल्यावरही तिथली हवा थोडी सर्दच वाटली.
एखाद्या ठिकाणी जाताना आपण मनात काही तरी ठरवून जात असतो. तिथे गेल्यावर व तिथपर्यंतच्या प्रवासात आपण काय पाहणार याचं एक ठरावीक चित्र आपल्या मनात काहीसं तयार असतं. ठिकाण अगदीच ओळखीचं असेल, खूपच प्रसिद्ध असेल तर मनातल्या त्या चित्राबरहुकूम प्रवास होऊ शकतो. पण त्यापेक्षा खरी मजा असते ती कोणताही अंदाज न लावत वाटचाल करण्याची. आता काय हा प्रश्न मनात उभा करून त्याची उत्तरं शोधायला सुरुवात केलीत की या अनोळखी क्षणांमधली गंमत निघून जाते. म्हणजे टिपूर चांदणं पडलेलं आहे आणि आपण त्यामागचं शास्त्रीय कारण शोधायला जाऊ असंच ते काहीसं होतं. अशीच एक वाटचाल पौर्णिमेच्या चांदण्यातून केली होती. गाव अनोळखी, माणसं अनोळखी. पण एका सामाजिक कामासाठी एका गावात जाणं भाग पडलं होतं. तिथली माणसं मला स्टेशनवर घ्यायला आली होती. तिथून मग सुमारे अध्र्याएक तासाची चाल होती आणि पाहिलं तर गावात रस्त्यांवर लाईटचे खांबच नव्हते. नेहमीच्या शहरी (मूर्ख) सवयीप्रमाणे मी त्यांना म्हटलं की आता कसं चालायचं अंधारातून? त्यांनी माझी बहुतेक कीव केली असावी पण तसं न बोलता त्यातल्या एकानं वर आकाशात बोट दाखवलं. तेव्हा कुठे माझ्या लक्षात आलं की रात्र पौर्णिमेची होती व पूर्ण रस्ताभर त्या चिंधीभर बॅट-यांपेक्षाही कितीतरी जास्त व सुरेख प्रकाश पडलेला होता.
मनावर शहरी झापडं असल्यामुळे माझं मुळी त्याकडे लक्षच गेलं नव्हतं. अर्थातच गाडीतून उतरल्यावर कीर्र काळोखी वाटलेली ती वाट त्यानंतर खूप सुंदर वाटू लागली. प्रवासालाही एक लय असते. ती तुमची तुम्हाला शोधावी लागते. त्या लयीला बांधून घेतलंत तर तो प्रवास कितीही लांबचा किंवा कंटाळवाणा असू देत, तो आवडू लागतो. ब्रह्मपुत्रेला येऊन मिळणा-या गंगा व मेघनेच्या संगमावरचं सुंदरबन. अफाट जलसागर. आत आत गेलं की जणू समुद्रच भासावा. सवय नसेल तर असं तरंगत राहिल्यानंतर काही एक दिवसांनी मनावर मळभ दाटायला सुरुवात होते. कायम समुद्रावर राहणारे नौदल सनिक किंवा संशोधक इ. यांना याबाबतचं मानसिक समुपदेशन केलेलं असतं. आपलं तसं नाही. तर तिथे चार दिवस सतत जमीन दूर दूर कुठेतरी ठिपक्यासारखी दिसायची. त्याचं फक्त पहिल्या दिवशी वाईट वाटलं. कारण शहरी गोंगाटापासून दूर जातोय याचा आनंद त्यावर मात करत होता. अशातच आला होता वर्षाचा अखेरचा दिवस.
निर्मनुष्य डेकवर चांदणं पित, गाणी ऐकत, सर्व कोलाहलापासून दूर काढलेली ती रात्र अविस्मरणीय ठरली. काही प्रवास हट्टाने तुमच्या मनात जागा मिळवून बसतात. जिम कॉब्रेट नॅशनल पार्कजवळच्या रामनगरला रात्री पाऊण वाजता उतरून दुतर्फा घनदाट जंगल असणा-या रस्त्यावरून कारमधून केलेला प्रवासही असाच लक्षात राहिलेला. त्या रस्त्यावर एवढय़ा रात्री मी व माझा ड्रायव्हर एवढेच होतो. वन्यक्षेत्रातील रस्त्यांवर गाडीचे लाईट्स लावायला रात्रीची बंदी असते. ते कायम लावून न ठेवता फक्त थोडा वेळ अधूनमधून लावता येतात. त्यामुळे झोपाळलेल्या डोळ्यांना काळोखात अजूनच चित्रविचित्र भास होत होते. प्रवासांच्या अशा आठवणी झरझर मागे पडणा-या एखाद्या स्टेशनसारख्या असतात. मनात आलं तर पाहिजे तितका वेळ त्यात रमावं, नाहीतर रेल्वेत दरवाजात पाय सोडून बसून बाहेरचा नजारा पाहण्याची धावती मजा घेता येते तशी नुसतीच अशा प्रवासांची याद करून मनाला विरंगुळा द्यावा.
link for published article http://epaper.eprahaar.in/detail.php?cords=600,88,2046,1020&id=story3&pageno=http://epaper.eprahaar.in/11012015/Mumbai/Suppl/Page4.jpg

No comments:

Post a Comment