Translate

Wednesday, May 6, 2015

मावळतीचे ठसे


प्रवासाची गोष्ट लिहायला घेतल्यावर एक जाणवलं की जिथे-तिथे भेटलेत ते मावळतीचे रंग. हे रंग आवडले म्हणून स्मरणात त्यांचे ठसे राहिले. काही गोष्टींना तोड नसते म्हणतात ना, तसेच असतात मावळतीचे रंग. तप्त दिवसाला मृदू करून सोडणा-या मावळतीचे रंग जणू हंसध्वनीच्या सुरात उमटू लागतात आणि दिवसभराच्या शिणलेल्या, विखुरलेल्या मनाला एकत्र घेऊन येतात.
प्रवासात आपण फारसं थांबू नयेच कुठेही. असा नियम आपणच करावा आणि आपणच मोडावा; पण तो मोडण्यासाठी सुंदरसा क्षणही भेटावा लागतो. जिथून आपल्याला परत फिरू नये असं वाटू लागतं आणि बहुतेकदा ही वेळ मावळतीची असते. सूर्य अस्ताला जाताना दिसत असतो, तो उद्याशिवाय परत येणार नाही हे देखील कळत असतं तरीही त्याला पूर्णपणे जाताना पाहिल्याशिवाय काही आपण माघारी येत नाही. शहरांमध्ये फिरताना हमखास ही वेळ कुठे ना कुठे तरी भेटतेच. मात्र जंगलांमध्ये फिरताना ते थोडं कठीण असतं. कारण बहुतेक राष्ट्रीय अभयारण्यांमध्ये संध्याकाळी पाचच्या सुमारास गाड/e मागे परतू लागतात, तसे आदेशच असतात. अर्थात जंगल तुमच्या गावातलं असेल तर गोष्ट वेगळी. अशा तिन्हीसांजेला वन परिसरात फिरण्याची मजा काही वेगळीच असते. शहरात बँडस्टॅण्डवर बसून पाहिलेला किंवा एनसीपीएच्या मागे उभं राहून पाहिलेला सूर्यास्त छानच असतो, पण अरण्यातील या मावळत्या रंगांचा झोक काही निराळाच असतो. तिथं निसर्ग बेबंद असतो. तो इमारतींच्या गराड्यात अडकलेला नसतो. त्याला हव्या त्या रंगाचे फटकारे त्या निळ्या-पांढऱ्या पटलावर मुक्तपणे मारण्याची त्याची हौस जणू तो पुरवून घेत असतो. अर्थात इथे तिथे आकाश सर्व एकच असतं म्हणा, पण एखाद्या नदीकाठी संध्याकाळी बसून पाहा, म्हणजे काय ते कळेल.
आवडनिवड ऋतुचक्राशी किंवा कशाशीच बांधलेली नसावी. म्हणजे फेब्रुवारीत मी इथेच जाईन किंवा गोव्याला गेल्यावर हेच करेन. फिरस्त्याच्या मनाने पहिले ही खूणगाठ मनाशी बांधावी, तरच त्याच्या आनंदाचा दर्जा उंचावू शकतो. याचं प्रत्यंतर मध्य प्रदेशात आलं. तिथं बांधवगढला गेल्यावर शेवटच्या दिवशी सफारी करून सर्वच जण खूप थकले होते. सहलीचे पैसे भरून जंगलात गेल्यावर वाघाने निमूटपणे पुढे यावं अशी काही जणांची माफक अपेक्षा होती. पण वाघाला या गोष्टीची कल्पना नसल्यामुळे व बहुतेक मध्य प्रदेशातले वाघ तितकेसे कर्तव्यदक्ष नसल्यामुळे की काय, अनेकांना वाघ दिसला नव्हता. तर अशा काहींनी वाघ अखेरच्या दिवशी दिसेल याची आशाच सोडली होती. सुदैवाने आम्हाला सतत तीनही दिवस हा उमदा प्राणी अगदी जवळून पाहायला मिळाला होता. त्यामुळे आम्ही शेवटच्या दिवशी दुपारी बाहेर पडलो ते वाघासाठी नाही तर अरण्य कसं आहे ते पाहायला. अनपेक्षितपणे आमच्या समोर वाघीण आणि तिची तीन बछडी खेळताना दिसली. हा बोनस होता. मन हरखून गेलं. त्यानंतर लगेच सांजवेळ होऊ लागली आणि बछडे दाट गवतात दिसेनासे झाले. म्हणूनच जंगलात कशाचीही अपेक्षा न ठेवता जावं. त्यातून अशी सांजवेळ साधता आली तर बहारच. मारुती चितमपल्ली, व्यंकटेश माडगूळकर आणि कित्येक लेखकांनी अरण्यातील या सांजवेळेचं महत्त्व व कौतुक लिहून ठेवलेलं आहे. माडगूळकरांनी त्यांच्या ‘नागझिरा’ पुस्तकामध्ये निलयकाठच्या तळ्यावर काढलेल्या संध्याकाळचं व अरण्याचंही वर्णन फार सुरेख केलंय. खरं तर शब्दातही मांडता येणार नाही अशाच या मावळतीच्या वेळा असतात.
अशीच वेळ अनुभवली ती काझीरंगाच्या अरण्यावर काळोख सांडत चालला होता तेव्हा. ऑफ सीझन असल्यामुळे पर्यटक फारसे नव्हते. होते तेही परतू लागले होते. आम्हाला खोलीवर परतून काय करायचं हा प्रश्नच होता, त्यामुळे रेंजमधून बाहेर पडण्याचा अखेरचा सेकंद येईस्तोवर आम्ही तळ्यावर गाडी थांबवली. समोर सूर्य मावळत चालला होता. कितीतरी ओळखीच्या-अनोळखी पक्ष्यांची लगबग सुरू होती. तळ्यात महासीर उड/e मारत होते. पलीकडे गेंडे लांबवर दिसत होते. ते वातावरण इतकं अद्भुत होतं की तोंडातून शब्दही काढून तिथली निर्मम शांतता भंग करावी, असं कोणालाच वाटलं नाही. जणू बोललो तर त्या चित्राला तडा जाईल की काय अशी भीतीच वाटली होती. ‘मौनाच्या संध्याकाळी आकाश स्वरांचे झाले.. वितळले क्षितीज गंधात रंगातून रूप निथळले..’’ या सुधीर मोघ्यांच्या एका कवितेसारखा तो सारा नजारा होता. आपसूकच आम्ही नि:शब्द झालो होतो. मावळतीने आमच्यावरही किमया केली होती. सुमारे तासभर आम्ही त्या तळ्यावर होतो. मग अंधारात तळं दिसेनासं झालं तेव्हा आम्ही जंगल सोडलं. काझीरंगातली ती संध्याकाळ मनात भरून राहिली. पण त्यावरही मात केली होती ती सुंदरबनमधल्या सूर्यास्ताने.
सुंदरबनच्या विस्तीर्ण जलसागरात बोट फिरत असताना इतकी शांतता असते की वेळेकडे सहसा लक्ष जातच नाही. इतर ठिकाणच्या जंगलांमध्ये वेळ कळते कारण अंधार पडू लागला की पाखरांचे-प्राण्यांचे आवाज, हालचाली बदलू लागतात. झपाटयाने सामसूम व्हायला सुरुवात होते. तसं इथं नाही. असंच एकदा गप्पा मारत होडीच्या टोकावर बसलेलो असताना अचानक आकाशात लक्ष गेलं आणि थक्क व्हायला झालं. म्हटलं हा काय अद्भुत खेळ मांडलाय निसर्गानं. मला गो. नी. दांडेकरांच्या ‘मृण्मयी’ची आठवण झाली. लहानगी बाळ मृण्मयी तिच्या अंगावर खेळणाऱ्या कोवळ्या किरणांचं नवल जितक्या कवतिकाने पाहते तितक्याच निरागसतेने व तन्मयतेने मी तो रंगखेळ पाहू लागले. मन त्या सांजवेळेच्या रंगांच्या भोवऱ्यात फिरत होतं. हे रंग अनाकलनीय होते. ते सहसा शहरी आकाशात न दिसणारे रंग होते. निसर्गही एक्सक्ल्युजिव्ह व्हिज्युअल्स देण्याची करामत करू शकतो, हे तेव्हा कळलं व आपण किती क्षुद्र आहोत हे देखील जाणवलं. अनेकाविध रंग आकाशाच्या पटलावर अक्षरश: उधळण्याचं काम सुरू होतं. त्यांना फक्त नजरेत साठवावं की कॅमेरातही टिपावं अशी मनाची द्विधा स्थिती झाली होती. इतर कोणत्याही समुद्रकिनाऱ्यावरील सूर्यास्त व मेघना, गंगा, ब्रह्मपुत्रेच्या विस्तीर्ण संगमावरला तो सूर्यास्त यात जमीनअस्मानाचा फरक होता. अखेर कॅमेरा बंद करून ते विलक्षण दृश्य नुसतं नजरेत साठवून घेतलं. अशा अनेक वेळा असतात, अनेक ठिकाणं असतात की जिथं आपण पुन्हा येऊच याची शाश्वती नसते. अशी मनस्थिती असेल तर हमखास मनावर विसंबावं व त्या क्षणांना फक्त स्मृतीत ठेवावं. काही हरकत नाही. दिवसाच्या कोणत्याही प्रहरापेक्षाही सांजवेळेची जादू अनोखी असते. त्यातून ती सांजवेळ अरण्यातली असेल तर विशेषच असते. व्यंकटेश माडगूळकर म्हणतात त्याप्रमाणे, अशा शांत, सुखद वेळी मनात उदास विचारांची गर्दी होत नाही. अरण्यजीवन किती अर्थपूर्ण, थेट, रसरशीत व साधं आहे हे अशा एखाद्या संध्याकाळीच कळतं. आपण नकळत आपल्या आयुष्याविषयी अशा संध्याछायांमध्ये फिलॉसॉफिकल होत असतो, परंतु मावळतीच्या या जशा असंख्य छटा आहेत, त्याचप्रमाणे आयुष्यालाही अनेक छटा लाभलेल्या आहेत, हे समजून घेऊन त्या क्षणातील आनंदाला बिलगावं.
link for published article http://epaper.eprahaar.in/detail.php?cords=554,90,1812,1178&id=story3&pageno=http://epaper.eprahaar.in/18012015/Mumbai/Suppl/Page4.jpg

No comments:

Post a Comment