Translate

Sunday, March 24, 2013

With Olive Riddley turtles on Velas beach


                                                             
कासविणीने पाठ फिरवलेल्या अंड्यांमधून बाहेर येऊन ज्यांचे डोळे आणि पावले देखील अजून विकसित झालेली नाहीत अशी इवलाली पिल्ले कोणत्याही मदतीशिवाय मुलायम रेतीमधून अथांग सागराकडे धाव घेतात आणि त्यावेळी एकप्रकारे इच्छाशक्ती कशी सकारात्मक असली पाहिजे याचे प्रात्यक्षिकच जणू आपल्याला मिळते. कारण या पिल्लांना पाण्याचा स्पर्श ही माहित नसतो तरीदेखील भवताली शिकारी सागरी पक्षी आणि प्राणी त्यांचा घास घ्यायला टपलेले असताना फक्त समुद्राकडेच जायचे आहे या उपजत जाणिवेमुळे ही पिल्ले सागराच्या लाटांवर स्वार व्हायचे धाडस करतात. लाटा त्यांना निर्दयीपणाने पुन्हा किनाऱ्यावर भिरकावून देतात पण या पिल्लांची पाण्याकडे जाण्याची आस जबर असते त्यामुळे पुन्हा पुन्हा प्रयत्न करून कासवांची ही पिल्ले शेवटी समुद्र गाठतातच. अर्थात ऑलिव्ह रिडले कासवाच्या अशा हजार पिल्लांपैकी काहीच पिल्ले जिवंत राहतात आणि त्यांची मोठी कासवे होतात. कोकणच्या किनारपट्टीला ऑलिव्ह रिडले प्रजातींच्या कासवांची वीण होते हे १२ वर्षांपूर्वी झालेल्या एका सर्वेक्षणात माहिती झाले आणि त्यानंतर चिपळूणच्या सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेने कासवांच्या संरक्षण आणि संवर्धन यासाठी पुढाकार घेतला. ऑलिव्ह रिडले ही कासवाची जात वन्यजीव कायद्याच्या शेड्यूल एकमध्ये मोडतात थोडक्यात सांगायचे तर त्यांना वाघाइतकाच संरक्षण दर्जा आहे. संस्थेने जे बीज रोवले त्याची फळे आज किनाऱ्यावरील वेळास, दिघी, मारळ सारख्या काही गावांना पर्यटन विकासाच्या रुपाने चाखायला मिळत आहेत. कासव जत्रेच्या निमित्ताने वेळासला भेट देता आली आणि पर्यटन विकासात कोकणातील सागर किनारा लाभलेल्या गावांच्या यादीत आता वेळासनेही आपलं खाते उघडले आहे हे लक्षात आले. वेळासची कासव जत्रा या संकल्पनेला आता सात वर्षे झाली आहेत. सागरी किनाऱ्याचे आकर्षण असले तरीही कासव संवर्धनासारख्या गोष्टीकडे पर्यटकांचे लक्ष आणि स्वारस्य वळवणे ही सोपी गोष्ट नाही. पुन्हा पर्यटक इथे आल्यानंतर त्यांना शिस्तीमध्ये ठेवून कासवांची पिल्ले दाखवून कासवांच्या संरक्षण आणि संवर्धनाच्या चार गोष्टी सांगणे हे त्याहून ही कठीण काम आहे. सह्याद्री निसर्ग मित्र आणि वेळासचे गावकरी यांनी गेली सात वर्षे परस्पर सहकार्याने ही कासव जत्रा चालवली आहे.

आपल्या देशात वाघ,सिंह किंवा डॉल्फिन पाहायला चला म्हटल्यावर सहलींना चांगला प्रतिसाद मिळतो. अश्या सहलींना जाण्यासाठी कुटुंब, निसर्गप्रेमी, भटके पर्यटक,वन्यजीव अभ्यासक, हौशी फोटोग्राफर असे सारेच उत्सुक असतात. या साऱ्यांनी काढलेल्या फोटोंनी फेसबुक इत्यादी सोशल मिडिया ओसंडून वाहत असतो. अर्थातच यातला बिझनेसचा भाग सोडून दिला तर कधी कोणी एव्हढ्याच हौशीने किंवा तळमळीने मगरी, कासवे किंवा माळढोक, गिधाडे असे प्राणी-पक्षी पाहायला जाणे जरा मुश्कीलच आहे. म्हणूनच अश्या परिस्थितीत सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील गावांमध्ये सुमारे सहा वर्षे नेटाने टिकाव धरलेल्या समुद्री कासव संवर्धन आणि संरक्षण प्रकल्पाला आता लोकांकडून मिळणारा बराचसा प्रतिसाद आणि मदत खूप महत्वाची ठरते आहे. या प्रकल्पाला राज्य शासन, पर्यावरण आणि वन खात्याचेही सहकार्य आहे. यामध्ये स्थानिकांनाही सामावून घेण्यात आले आहे, कारण कोणतीही वन्यजीव संवर्धन मोहीम ही स्थानिकांच्या सहभागाशिवाय यशस्वी होत नाही. प्राण्यांचे संवर्धन आणि संरक्षण प्रकल्प म्हणजे फक्त वन्यप्राण्यांसाठी काम करणाऱ्या संस्थेतील लोकांचेच काम अशी काहीशी समजूत आहे. जे पर्यटक डॉल्फिन किंवा सर्पउद्यान पाहायला जातील, ते पर्यटक कासव संवर्धन आणि संरक्षण प्रकल्प पाहायला जातीलच असे नाही. त्यामुळेच सह्याद्री निसर्ग मित्रने चालवलेले प्रयत्न आणि आता त्याचा वेळासच्या पर्यटन विकासात होणारा उपयोग महत्वाचे ठरतात. देशात टायगर टूरिझम वगळता अन्य वनचर अथवा जलचरांसाठी वेगळे प्रयत्न करून पर्यटकांना सामावून घेणारे विशेष प्रकल्प फारसे नाहीत आणि त्या अनुषंगाने आयोजित केल्या जाणाऱ्या सहलीदेखील नाहीत. आपल्याकडे ज्या काही मोजक्याच ठिकाणी डॉल्फिन दिसतात तिथे सहली नेल्या जातात. आपल्याकडे अश्या प्रकारच्या संवर्धन आणि संरक्षण प्रकल्पांना सहल म्हणून भेट देण्याची आवड रुजलेली नाही त्यामुळेच सह्याद्री निसर्ग मित्रचा हा कासव संवर्धन आणि संरक्षण प्रकल्प उल्लेखनीय ठरतो. म्हणूनच वेळासच्या कासव जत्रेमधली ऑलिव्ह रिडले या दुर्मिळ प्रजातीच्या कासवाची पिल्ले कशी दिसतात या उत्सुकतेपोटी यावर्षी वेळासला जायचे ठरवले.

आधीच आडवळणावर असलेल्या एखाद्या गावाला अचानक पहिल्यांदाच भेट द्यायचे ठरले तर ठरलेल्या मुक्काम पोस्टवर पोहोचेपर्यंत जो खटाटोप करावा लागतो तो सर्व वेळासच्या प्रवासात घडला. वेळासला पोहोचताना बऱ्याचजणांची ‘जाते थे जापान पहुँच गये चीन’ अशी अवस्था होते कारण इथे दोन विरुद्ध दिशांना असणारी दोन वेळास गावे आहेत. एक आहे बाणकोट(आगरी) वेळास तर दुसरे आहे साधे वेळास. गोरेगाव-श्रीवर्धन-म्हसळा नंतर एक हरिहरेश्वरला जाणारा तर दुसरा दिघीला जाणारा असे दोन फाटे फुटतात. गोरेगाववरून आंबेत घाटात उतरूनही वेळासपर्यंत पोहोचता येते पण तो लांबचा रस्ता आहे, पण हरिहरेश्वर-बागमंडला असा रस्ता धरून नंतर जेटीने फेरीबोटीव्दारे नदी पार करून गेल्यास बाणकोट वेळासला कमी वेळात जाता येते. कासव मित्र मंडळाच्या किंवा सह्याद्री निसर्ग मित्रच्या माहिती स्थळावर कोठेही दोन वेळास गावे अस्तित्वात असल्याचा आणि हरिहरेश्वर- बागमंडला रस्त्याने व्हाया फेरीबोटीने येण्याचा पर्याय उपलब्ध असल्याचा उल्लेख केलेला नसल्याने आमच्या प्रवासात  बाणकोटी हिसका बसला  याचे कारण म्हणजे आम्ही दुसऱ्याच वेळासचा रस्ता धरला होता. जेटीवरून फेरीबोटीने जायचे असल्यास त्यांच्या काही ठराविक वेळादेखील माहिती असणे आवश्यक आहे. पण गावात पोहोचल्यानंतर जेव्हा परदेशी पर्यटक पाहिले तेव्हा कोकणच्या किनारपट्टीवर असणाऱ्या एका लहानशा गावात फक्त कासवांची पिल्ले पाहण्यासाठी कुठूनतरी सातासमुद्रापलीकडून आलेल्या त्यांचे आणि सह्याद्री निसर्ग मित्रच्या प्रयत्नांचेही कौतुक करावेसे वाटले. गेली वीस वर्षे रत्नागिरी,रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावांमध्ये सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेने ऑलिव्ह रिडले कासवे, शेषारी गरुड, गिधाडे आणि भारतीय पाकोळ्या यांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी प्रयत्न चालवले आहेत.

ऑलिव्ह रिडले कासव मादी नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान वेळासच्या किनाऱ्यावर येऊन अंडी घालते. साधारण ४५ ते ५५ दिवसांचा उबवण काळ लोटल्यानंतर पिल्ले बाहेर येतात. पर्यटकांना पिल्ले पाहता यावीत यासाठी वेळास येथे फेब्रुवारी ते मार्च दरम्यान कासव जत्रा घेतली जाते. सुमारे महिनाभर चालणाऱ्या कासव जत्रेत सामील होण्यासाठी दर रोज इथे सुमारे पाचशे पर्यटक येतात. या पर्यटकांवर लक्ष ठेवण्यासाठी, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मनुष्यबळ कमी पडते त्यासाठीच मग वेळाससारख्या ठिकाणी स्थानिकांची मदत घेतली जाते. सागरी कासवे, विशेषतः ऑलिव्ह रिडले जातीच्या दुर्मिळ कासवांची वीण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा, मोचेमाड, आरवली, तळाशील, केळूस, मुणगे आणि बागायतवाडी, रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिवेआगर आणि मारळ तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील तवसाळ, करडे, गुहागर, कोळथरे, मुरूड, दाभोळ, केळशी, आंजर्ला, वेळास या किनाऱ्यांवर आढळून आली आहे. येथील स्थानिकदेखील या प्रकल्पामध्ये आवडीने सहभागी होत आहेत कारण कासव पर्यटनामुळे त्यांचाही फायदा होतो आहे. सह्याद्री निसर्ग मित्रला वनखात्याकडूनही सहाय्य मिळते. कासवांची पिल्ले पाहण्यासाठी जमा झालेल्या पर्यटकांमध्ये फोटो काढण्यासाठी चढाओढ लागते आणि अश्या वेळी ही तळहाताएव्हढी पिल्ले कोणाच्याही पायाखाली येऊ शकतात. हे सर्व टाळण्यासाठी कासव जत्रेच्या दिवसातही वनखात्याने बेशिस्त पर्यटकांवर जरब बसवण्यासाठी एक सहाय्यक द्यावा अशी मागणी सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेने केली आहे. कासव जत्रा आयोजित करताना त्याचे व्यावसायिकीकरण होणे अटळ आहे त्यामुळेच पर्यटन अथवा इतर कामांसाठी किनाऱ्यांचा विकास करताना तेथील जैविक विविधतेला धोका निर्माण होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.

येत्या काही वर्षात वेळास येथे कायमस्वरूपी कासव संशोधन आणि संरक्षण केंद्र उभारण्यासाठी सह्याद्री निसर्ग मित्रचे प्रयत्न सुरु असल्याचे वेळास कासव जत्रेचे समन्वयक रामाशिष जोशी यांनी सांगितले. त्यासाठी सुमारे नऊ लाख रुपयांची गरज आहे. त्यासंबधीची आणि या प्रकल्पाविषयीची सर्व माहिती त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. संस्थेला अभ्यासू कार्यकर्त्यांचीही गरज आहे. स्थानिकांचा सहभाग आणि पर्यटन विकास या दोन गोष्टी लक्षात घेतल्या तर कासव संरक्षण आणि संवर्धनाचा हा संस्थेचा आतापर्यंतचा सर्वाधिक यशस्वी प्रयोग आहे. वेळासच्या कासव मित्र मंडळाचा देखील एक ब्लॉग आहे जो पुरेसा अपडेट नसतो. कासव जत्रेला हजेरी लावणाऱ्या पर्यटकांसाठी गावातल्या काही घरांमध्ये निवास-भोजनाची सोय केली जाते मात्र प्रत्यक्ष जत्रेच्या काळात यातील किती घरे पाहुण्यांचे बुकिंग घेण्यासाठी उपलब्ध आहेत याची माहिती दोन्ही संकेतस्थळांवर दिली जात नाही. तरीदेखील दोन्ही माहितीस्थळावरून इतर बरीचशी माहिती मिळू शकते. कासव जत्रेच्या निमित्ताने उजेडात आलेले वेळासदेखील आता झपाट्याने बदलत आहे. गावाचा पर्यटन आणि आर्थिक विकास होण्याचे महत्व स्थानिकांच्या लक्षात आले आहे आणि त्यादृष्टीने त्यांच्या हालचालीही सुरु झाल्या आहेत. प्रकल्पात सहभागी झालेल्या इतर गावांनादेखील आर्थिक विकासाचे अनेक मार्ग उपलब्ध झाले आहेत. वेळासला जाताना रस्त्याला अत्यंत देखणी अशी सागरी किनार आहे आणि प्रत्यक्ष वेळासला देखील सुंदर समुद्र किनारा आहे. फोटोग्राफी टुरीझम या नव्याने फोफावत चाललेला प्रकारातील पर्यटकांचा वेळाससारख्या गावांना फायदा होऊ शकतो.

वेळास गाव कोणत्याही कोकणी गावासारखेच अगदी साधे आणि स्वच्छ गाव आहे, पण कासव संरक्षण आणि संवर्धन प्रकल्प तसेच कासव जत्रेमुळे वेळासला नवे वलय प्राप्त झाले आहे. याच प्रकल्पामुळे वेळास आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले आणि त्याचा फायदा पर्यटन विकासाच्या दृष्टीने आता वेळासला होतो आहे. या प्रकल्पात सहभागी असणाऱ्या वेळास आणि इतरही गावांना रोजगाराच्या अनेक संधी मिळाल्या आहेत. अर्थात पर्यटन विकास क्षेत्रात अश्या वेळी नेहमीच संधीचा गैरफायदा न घेता आणि योग्य मार्गाने पर्यटकांची लुबाडणूक न करता गावाचा आर्थिक विकास आणि पर्यटन विकास या दोन्ही गोष्टी समांतर चालतील हे पहायचे असते. दुर्दैवाने रोजगाराची उत्तम संधी मिळालेली असतानाही वेळासचे काही गावकरी पर्यटकांचा गैरफायदा घेताना दिसले. कासवांची पिल्ले पूर्णपणे नैसर्गिक स्थितीत जन्म घेत असल्याने ते पाहण्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्याची गरज नसताना वेळासचे उपसरपंच आणि काही तरुण हे पर्यटकांकडून दर दिवशी प्रत्येकी पन्नास रुपये उकळताना दिसले. विशेष म्हणजे या शुल्काचा कोणताही उल्लेख माहितीस्थळावर केलेला नाही. त्यामुळे अनपेक्षितरित्या मागण्यात आलेल्या या शुल्काचा काही पर्यटकांनी तीव्र निषेध देखील केला. वास्तविक कोकणी पदार्थ आणि वस्तू, कासव स्मृती चिन्हे यांची विक्री तसेच कासव जत्रेसाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी होम स्टेची सोय, सहल आणि प्रकल्प मार्गदर्शक अशा काही माध्यमातून गावकऱ्यांना चांगला पैसा मिळू शकतो. सध्या गावातल्या १९ घरांमध्ये पर्यटकांच्या राहण्याची सोय केली जाते. गावातील महिला बचत गटाच्या सदस्यांनाही कासव संवर्धन प्रकल्पातून चांगला रोजगार मिळतो. पर्यटन विकास आणि रोजगार संधी महत्वाच्या आहेतच, परंतु व्यावसायिक वृत्ती प्रमाणाबाहेर वाढली तर काहीच वर्षात कासव संवर्धन आणि संरक्षण प्रकल्पाचा मूळ हेतू बाजूला पडून या कासव जत्रेचा ‘इव्हेंट’ बनण्याची शक्यता नाकारता येत नाही. गावात पर्यटन विकास होण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज आहे.

कोकणी घरात आणि कोकणी वातावरणात राहण्याचा अस्सल अनुभव मात्र वेळासमध्ये मिळतो. गावातली घरे अतिशय सुंदर आणि  पारंपरिक  पद्धतीची आहेत तसेच माणसेदेखील मोकळ्या मनाची आहेत. इथे पहिल्यांदाच येणाऱ्या परदेशी आणि देशी पाहुण्यांना आकर्षित करण्यासाठी सागर किनारा, माड, काजू आणि पोफळीच्या बागा, आमराया, फणस, रातांबे, विहिरी, शेते अश्या असंख्य गोष्टी आहेत, फक्त नियोजनबद्ध विकास झाला पाहिजे. याबाबतीत सिंधुदुर्ग जिल्हा केव्हाच प्रगत झाला आहे, आता वेळ उर्वरित कोकणाची आहे. महाराष्ट्राच्या कोकणपट्टीला सुदैवाने सागरी किनाऱ्यांनी संरक्षण आणि वैभवही दिले आहे. त्यातही मनशांती देणारे काही स्वच्छ किनारे अजूनही गर्दीपासून सुरक्षित आहेत. वेळास सध्या तरी फक्त कासव जत्रेच्या मोसमातच गजबजत आहे. अजून तरी वेळासचा किनारा पर्यटकांनी आक्रमून टाकलेला नाही. वेळासच्या निमित्ताने पुन्हा एकदा मोबाईल संपर्क क्षेत्राबाहेर राहण्याची मोकळीक अनुभवता आली. कोणतेही बंधन नसताना फेरफटका करण्याची मजा केवळ शहरी नोकरदार पर्यटकच जाणो. उसळत्या लाटांमधून पुढे कचरा न येता अजून तरी इथे फेसाची स्वच्छ शुभ्र फुलेच उमलत आहेत आणि सुरूच्या बनामधून पावले थेट मऊ मुलायम रेतीकडे धाव घेताना फेरीवाले आडवे येत नाहीत. विशेषतः कासवांच्या पिल्लांसाठी तरी वेळासच्या किनाऱ्यावरून येणाऱ्या गाजेला साद द्यायला हरकत नाही.

Please do read my article 'Velas chya kinarya varun' published on 24/03/2013 in Marathi news daily 'Prahaar',to read click on the link
 http://epaper.prahaar.in/24032013/Mumbai/Suppl/Page8.pdf   

No comments:

Post a Comment