Translate

Sunday, September 8, 2013

विष्णूपूरच्या बंगाली वृन्दावनात

                                                            



  उत्तराखंडमध्ये यावर्षीच्या जूनमध्ये झालेल्या ढगफुटीनंतर आलेल्या पुरामुळे प्रचंड वाताहत झाली परंतु केदारनाथाचेजारो वर्षांपूर्वीचे मंदिर निसर्गाच्या एवढ्या तडाख्यातून बचावून उभे आहे. लगेचच काही लोकांनी त्याला परमेश्वरी शक्तीचा अगाध महिमा अशी लेबले लावली तर काहींनी तेव्हाचे आणि आताचे वास्तुविशारद यांची तुलना सुरु केली. कारण काहीही असो, या मंदिराची बांधणी भक्कम आहे हे दिसून आले आणि आपल्या देशातल्या कितीतरी प्राचीन मंदिरे आणि वास्तू बांधणाऱ्या अनाम शिल्पकार आणि स्थापत्यकारांच्या कलेला तोड नाही हे सिद्ध झाले. मंदिरांवरील शिल्पकाम किंवा कोरीवकाम म्हणजे त्याकाळची माहिती देणारे एक सर्च इंजीनच. आपल्या सुदैवाने भारतात सर्वत्र पुरातन मंदिरांच्या देखण्या वास्तू अजूनही शाबूत आहेत. त्यापैकीच एक आहे मल्ल राजांचा वारसा सांगणारा सोळाव्या शतकातील विष्णुपूरचा टेराकोटा मंदिरांचा समूह. विष्णुपूर पश्चिम बंगालच्या बांकुरा जिल्ह्यात कोलकाता शहरापासून सुमारे २०० कि.मी अंतरावर आहे. इसवी सन ९९४ पासून मल्ल राजांची राजधानी असलेले विष्णुपूर. इथली तीस देवळे भाजलेल्या मातीच्या विटांपासून बांधून काढली आहेत हे त्यांचे एक वैशिष्ट्य पण १६व्या शतकातील मल्ल राजांचा इतिहास, त्यांचा कलासक्तपणा,सौंदर्यदृष्टी,भक्तीभाव आणि एकूणच त्यांच्या राज्यकाळातील अनेक बारीकसारीक गोष्टी या टेराकोटा मंदिर समूहाच्या माध्यमातून आपल्याला समजतात. टेराकोटा या मूळ इटालियन शब्दाचा अर्थ भाजलेली जमीन किंवा माती असा होतो. मल्ल राजांच्या काळात टेराकोटा स्थापत्यशैली पूर्ण बंगालमध्ये फोफावली, विषेशतः बांकुरा, वर्धमान जिल्ह्यात अशी अनेक मंदिरं पाहायला मिळतात. बंगालमधली टेराकोटा मंदिरे पाहायला जगभरातून संशोधक,अभ्यासक आणि पर्यटक इथपर्यंत येतात. इतिहासातील कित्येक राजा-महाराजांनी त्यांच्या काळात स्वतःची ओळख मागे राहावी यासाठी देऊळे बांधून ठेवली आहेत. तशीच ही विष्णूपुरची देऊळे. हि ऐतिहासिक मंदिरे, या वास्तू आपल्याला इतिहास, वैभव, संस्कृती सांगायला उत्सुक आहेत म्हणूनच शतकानुशतके वादळवाऱ्यात टिकून आहेत. देवळांचे इतके अनन्यविध प्रकार भारतात आहेत कि एखाद्याने नुसती देवळं जरी पहायची ठरवली तर त्याचा अख्खा जन्म पुरणार नाही.
अनेकदा चित्रे वगैरे पाहून मूळ वास्तूची कल्पना येत नाही आणि प्रत्यक्ष पाहताना आपण इथे आलो हे बरेच केलं असं वाटायला लागतं. विष्णुपूरच्या देवळांबाबत माझं नेमकं हेच झालं. एखाद्या ठिकाणी गेल्यावर पाहण्यासारखं बरेच आहे असा स्थानिकांकडून देखील आग्रह होतो. ‘काय पाहावे’ यादीतील सर्वच पाहता पाहता खरोखरीच जिथे गेलं पाहिजे होतं अशी ठिकाणं मग राहून जातात आणि त्याची हुरहूर मनाला लागते. त्यामुळे पश्चिमबंगात( बंगाली उच्चारानुसार पोश्चिमबोंगात) फिरताना १०-१२ दिवसांमध्ये काय आणि किती पहायचे हा प्रश्न होताच. पण विष्णुपूरची टेराकोटा देवळं पहावीच असा सल्ला अनेकदा माझ्या कानांनी ऐकून झाला होता. टेराकोटाशी माझा संबध म्हणजे फक्त काही शोभेच्या वस्तू आणि खोट्या दागिन्यांपुरता. प्रत्यक्ष विष्णुपूरला जाऊन ठेपल्यावर त्या अप्रतिम कलाकारीने थक्क झाले. ते कोरीवकाम, नक्षीकाम आणि काळाच्या झपाट्यात भक्कम अखंड राहिलेले असं बांधकाम पाहून नेहमीप्रमाणे ‘आ’ वासला गेलाच. तिथली प्रत्येक वास्तू विलोभनीय आहे आणि केवळ देवावरील प्रेमापायी आपल्या पूर्वजांनी इतकं काही सुघड निर्माण करून ठेवलं आहे हे अनाकलनीयच आहे. बंगालच्या स्थापत्यकलेच्या इतिहासात या मंदिरांना मोठं महत्व आहे. दक्षिण भारतासारखे इथे मोठे कातळ आणि दगड सापडत नाहीत त्यामुळेच दगडांना पर्याय म्हणून या भाजलेल्या मातीच्या विटांचा वापर करून इथली मंदिरे बांधली गेली आणि अश्या प्रकारे टेराकोटा शिल्पकलेचा उदय बंगालमध्ये झाला. अनेक शतके इस्लामी आधिपत्याखाली काढल्यानंतर सोळाव्या शतकाच्या आसपास बंगालमध्ये वैष्णव पंथाने पर्यायाने हिंदूधर्माच्या प्रभावाने पुन्हा अंमल दाखवायला सुरुवात केली. त्याच सुमारास विष्णुपूरमध्ये श्रीकृष्णाची देऊळे अस्तित्वात येत होती. साहजिकच टेराकोटा देवळांच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धातल्या देवळांच्या बांधणीवर इस्लामी स्थापत्यशैलीची झाक आहे. विष्णुपूरची ही देऊळे बंगालमधील १३व्या अणि १४व्या शतकातील मशिदी अणि ओरिसातील मंदिरे यांच्यापासून प्रभावित होऊन निर्माण झालेल्या शैलीत बांधली असल्याचेही काहींचे मत आहे. काही संशोधकांच्या मते कृष्णभक्त मल्ल राजांनी वृंदावन-मथुरेच्या धर्तीवर स्वतःच्या राज्यात मंदिरे असावीत म्हणून विष्णुपूर मंदिरांची निर्मिती केली. मंदिरांच्या भिंतींवर केलेल्या कोरिवकामात महाभारत, रामायण यातील गोष्टी आहेत खेरीज श्रीकृष्णाच्या जीवनातील काही कथा, भगवान बुद्ध ,चंडीदेवी अणि राक्षस वध, योद्धा, शिकारी, व्यापारी, निसर्ग, पशु-प्राणी, सामान्य जनांच्या दैनंदिन गोष्टी हे सर्वदेखील या नक्षीकामात कोरलेले दिसते. मुळात कोणत्याही प्रकारचे ज्ञान जेव्हा फक्त लिखित आणि मौखिक होते तेव्हाच्या प्राचीन आणि ऐतिहासिक काळात ज्ञानाच्या प्रसारासाठी शिल्पकारांनी आपल्या कलेचा अतिशय समर्पक वापर केलेला दिसतो. विविध देशांमधील शिल्प आणि कोरीवकामात साम्य आढळत असल्यामुळे आता संशोधकही अचंबित होत आहेत. विष्णुपूर मंदिरांच्या कोरीवकामातही अशी साम्य आढळली आहेत. येथील कोरीवकामात अनेक पौराणिक, ऐतिहासिक,धार्मिक आणि सामाजिक संदर्भ असलेल्या गोष्टींचे चित्रण आहे आणि याच वेगळेपणामुळे ही टेराकोटा मंदिरे भारतीय शिल्पकलेचा अत्यंत महत्वाचा नमुना म्हणून जगप्रसिद्ध आहेत.
विष्णुपूरची सैर एखाद्या टाईम कॅप्सूलप्रमाणेच आहे. वर्धमानवरून चार तासांचा बसचा प्रवास करून मी इथे पोहोचले. पुढे विष्णुपूरच्या गल्ल्यांमधून सायकल रिक्षा ओढत नेईल तिथे उतरून मंदिरे पाहण्याचा कार्यक्रम सुमारे ४-५ तास चालू होता. हा सायकल रिक्षा भाग सोडला तर हि मंदिरे थेट मल्ल राजांच्या काळातच नेऊन उभी करतात. कोणतीही प्राचीन देवळे किंवा शिल्प ही आरश्याप्रमाणेच असतात कारण त्यांच्यावरून त्याकाळच्या सांस्कृतिक, साहित्यिक, राजकीय, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचा अंदाज येतो. विष्णुपूरच्या देवळांची शिल्पकलाही अद्भुत आहे. या सर्व मंदिरांची स्थापत्यशैली भारतात पाहायला मिळणाऱ्या इतर मंदिरांपेक्षा अत्यंत वेगळी आहे आणि हेच त्यांचे वैशिष्ट्य आहे. देऊळ म्हटले कि त्यात देवाच्या मूर्ती असणं हे ग्राह्य धरलं जातं पण ज्यात मूर्तीच नाहीत अशी फक्त देवांच्या विश्रांतीसाठी बांधलेली देऊळे( शय्यागृह) देखील इथे आहेत. हि टेराकोटा देऊळे आणि वास्तू भक्तीप्रिय मल्ल राजांनी श्रीकृष्ण आणि श्रीविष्णूला समर्पित केलेली आहेत. देऊळे बांधताना साध्या रचनेत आणि आजूबाजूला मोकळी जागा सोडून बांधली आहेत. जास्तीत जास्त प्रजेने तिथे यावे, जमून देवांची भक्ती-आराधना करावी हा त्यामागील हेतू होता. वैष्णवपंथ देखील साध्या जीवन राहणीला महत्व देतो त्यामुळे सामान्य नागरिकांची घरं जशी, तशीच त्यांना हि मंदिरं वाटावीत म्हणून त्यांची बांधणी साधीच ठेवली गेली.
या सर्व मंदिरांची रचना वेगवेगळी असली तरी स्थापत्यशैली एकच आहे. हे मल्ल राजे कृष्णभक्त आणि या भक्तीपायीच त्यांनी टेराकोटा देऊळे बांधण्याचा सपाटा लावला. या मंदिरांचे स्थापत्यविशारद म्हणजे आचार्य आणि शिल्पकार ज्यांना सूत्रधार असेही म्हटले जायचे, त्यांना श्रीमंत जमीनदार, व्यापारी यांच्याकडे आश्रय मिळायचा. ते आपली कला मंदिर बांधणीतून दाखवत बंगालच्या अनेक गावांमधून फिरायचे. तेव्हापासूनच बंगालमधली मंदिर शिल्प-वास्तूकला टेराकोटामय झाली. त्यामुळेच बंगालच्या बांकुरा, हुगळी, वर्धमान आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये टेराकोटा शिल्पकलेचा प्रभाव आणि प्रसार दिसून येतो. ‘चाल’, ‘रत्न’ आणि ‘दालान’ अश्या तीन प्रकारे ही मंदिरे बांधली गेली आहेत. ‘चाल’ म्हणजे छताचे कोपरे अणि अशी दोन,चार किंवा आठ उतरते कोपरे असणारी छोटी मोठी देवळे इथे दिसतात. विष्णुपूरची मंदिरे देखील चाल पद्धतीने बांधलेली आढळतात. सामान्यतः बंगाली घरे ज्या धाटणीची असत त्याचप्रमाणे ही मंदिरे देखील बांधली जात. चाल किंवा चाला म्हणजे छप्पराचे उतरते निमुळते कोन, अश्या दोन कोनाच्या छप्पराला दुईचाला म्हटले जाते तशीच चौचाला, अटचाला मंदिरे देखील आहेत. बंगालमधील ग्रामीण भागात आज देखील अशा छप्परांची घरे आढळतात. ‘रत्न’ म्हणजे देवळावरील शिखर आणि त्यातही एक, तीन किंवा पाच शिखरांची मंदिरे इथे आहेत. ‘दालान’ या प्रकारात देवळावर सपाट छत असते. हि टेराकोटा मंदिरे भारतीय इतिहासातील स्थापत्य आणि शिल्पकलेचा असाधारण वारसा आहेत. रसमंच ही इथली एक सभागृहासारखी प्रमुख वास्तू आहे. इ.स १६०० मध्ये मल्ल राजा वीर हंबीर याने रसमंच बांधले, जे या समूहातले सर्वात जुने मंदिर आहे. अनेक स्तंभांव उभे असलेले विटांच्या मनोहारी  बांधणीतले हे मंदिर अतिशय सुंदर आहे. वास्तविक हे भगवान श्रीकृष्णासाठी अर्पण केलेले शयनगृह आहे. त्रिकोणाकृती रचनेच्या मंदिराच्या जोत्यासाठी लेटेराईट स्टोन वापरण्यात आला आहे. दूरवरूनही डोळ्यात भरेल अश्या या मंदिराचे छप्पर उतरते आहे. फक्त बंगालच नव्हे तर पूर्ण भारतातदेखील या शैलीचे मंदिर आढळत नाही. मात्र या मंदिरावर कमळ इत्यादी फुलांखेरीज इतर कोणतीही खास शिल्पकला कोरलेली दिसत नाही. मुळात हे मंदिरच नसल्यामुळे इथे कोणतीही मूर्ती नाही पण १९३२ सालापर्यंत रास उत्सवाच्या वेळेस विष्णुपूरमधील इतर मंदिरातून दर्शनासाठी मूर्त्या इथे आणल्या जात. इथे एका छोट्याश्या टेकडीवर एका खोलीवजा बुरुजाचे भग्नावशेष आढळतात त्याला गुमगढ म्हणतात. त्याचा वापर नक्की कशासाठी पूर्वी होत असे याची माहिती त्यावर कोरलेली दिसत नाही आणि इतरत्र उपलब्ध देखील नाही. काहींच्या मते हा तुरुंग होता तर काहींच्या मते ते धान्य साठवण्याचे गोदाम होते. आता तिथे फक्त खिडक्या-दरवाजे नसलेले खिंडार बाकी आहे.
गुमगढवरून थोडेसे पुढे गेल्यावर श्यामराय मंदिर दिसते. इसवी सन १६४३ मध्ये मल्ल राजा रघुनाथ(दुसरा) याने हे मंदिर बांधले. पाच शिखरांचे हे पच्चुरा मंदिर अद्याप उत्तम स्थितीत आहे. या मंदिराच्या चोहोबाजूला त्रिकोणी कमानीचे दरवाजे आहेत. याच्या भिंतींवर महाभारत, रामायण, रास चक्र आणि राधा-श्रीकृष्ण यांच्याशी संबधित प्रसंग कोरलेले आहेत. श्यामराय मंदिराच्या पुढे दिसते ते केश्तोराय मंदिर. हे उंचच उंच मंदिर देखील आवर्जून पाहावे असे मंदिर आहे. जोरबंगला शैलीतल्या या मंदिराला दोन उतरत्या भाजणीची छत जोडून असल्यामुळे याला जोर (जोड )बंगला मंदिर असे म्हणतात. जोरबंगला म्हणजे संयुक्त छतांचे मंदिर. या जोडछतांच्या मध्ये एक छोटेसे शिखर आहे ज्याच्यामुळे छतांनादेखील आधार मिळाला आहे. टेराकोटा शैलीचा उत्तम नमुना म्हणजे हे इ.स १६५५ साली राजा रघुनाथसिंह(दुसरा) याने बांधलेले मंदिर आहे. या मंदिरात आत आणि बाहेर आढळणारे  कोरीवकाम देखील आकर्षक आहे. त्यात शरशय्येवर पडलेले भीष्माचार्य तसेच जहाजे आणि बोटी देखील दिसतात. पुढे दिसते ते एकच शिखराचे म्हणजे एक रत्न राधेश्याम मंदिर. याच्या भवताली उंच भिंतींची तटबंदी आहे आणि प्रवेशद्वारावर मुस्लीम स्थापत्यशैलीचा प्रभाव असणारी त्रिकोणी कमान आहे. इ.स. १७५८ मध्ये मल्ल राजा चैतन्यसिंह याने हे मंदिर बांधले. असे म्हटले जाते कि राज्याच्या खजिन्यात खडखडाट असतानाही केवळ मंदिर बांधण्याची परंपरा जपली जावी म्हणून राजाने हे मंदिर बांधले. एक शिखर असणारे दुसरे एक मंदिर म्हणजे राधालालजेऊ मंदिर, जे इ.स.१६५८ मध्ये मल्ल राजा बीरसिंह याने बांधले. राधेश्याम मंदिराच्या अगदी समोरच मृण्मयी मंदिर आहे. मंदिर जीर्ण झाले असल्यामुळे इथली मृण्मयीमातेची मूर्ती दुसरीकडे नव्या मंदिरात ठेवण्यात आली आहे. इथून पुढे गेल्यावर दोन मोठी प्रवेशद्वारे दिसतात. एक आहे तो बडा पत्थर दरवाजा, राजमहालाचे उत्तरेकडील प्रवेशद्वार म्हणून हा दरवाजा सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात महाराजे बीरसिंह यांनी बांधला. या दुमजली प्रवेशद्वाराच्या आत सैनिकांना बसण्याची जागा आहे. तिथेच जवळ एक छोटे प्रवेशद्वार आहे ते देखील याच काळात बांधले गेले होते. हि दोन्ही प्रवेशद्वारे राजघराण्याच्या एकेकाळच्या वैभवाची साक्ष देतात. जवळच सतराव्या शतकामध्ये बांधलेला एक दगडी रथ दिसतो.
मदन मोहन मंदिर हे इथले सर्वात प्रसिद्ध मंदिर. एक शिखराचे हे मंदिर इ.स १६९४ मध्ये मल्ल राजा दुर्जनसिंह यांनी बांधले. विष्णुपूरच्या सर्व मंदिरांमध्ये हे अतिशय सुंदर मंदिर म्हणून गणले जाते. भगवान विष्णू यांचा अवतार मदन मोहनाची मूर्ती या देवळात आहे. विष्णुपूरच्या काही मंदिरांमध्ये मूर्ती देखील आहेत आणि त्यांची पुजादेखील केली जाते त्यातले हे एक. मदन मोहन मंदिरात गेल्यानंतर मलाही पूजा करण्याची संधी मिळाली. पण इथल्या सर्वच मंदिरात अशा प्रकारे पूजा केली जात नाही. या मंदिराला दोन संयुक्त छते आहेत. सर्वात जुनी आणि प्रचंड दालमदल तोफ इथले आकर्षण आहे. इ.स १७४२ मधली हि तोफ ११२ क्विंटल वजनाची आणि ३.८ मीटर लांबी आणि ३० सेंटीमीटर व्यासाची आहे. मल्ल राजांच्या या मल्लभूमीवर अठराव्या शतकात मराठ्यांनी देखील आक्रमण केले होते. त्यावेळी हि तोफ वापरण्यात आली होती. एक शिखराचे छिन्नमस्त मंदिर लाईम आणि लेटेराईट स्टोनमधून बांधून काढले आहे. दुर्गेच्या या जीर्णशीर्ण मंदिराचे पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. पुढे जवळ जवळ असणारी एक शिखरीय सात मंदिरे पाहायला मिळाली. यामध्ये नंदलाल मंदिर आणि जोरमंदिर यांचा समावेश आहे. जोरमंदिराच्या एकाच आवारात तीन छोटी मंदिरे आहेत, ती मल्ल राजा कृष्ण सिंग याने इ.स १७२६ मध्ये बांधली. राधागोविंद मंदिर देखील पाहण्यासारखे आहे. हे देखील इ.स १७२९ मध्ये मल्ल राजा कृष्ण सिंग यानेच बांधले. इथून जवळच इ.स १७३७ मध्ये बांधले गेलेले राधामाधव मंदिर आहे. दोन छते आणि एक शिखराचे हे मंदिर आहे. मल्ल राजा कृष्णसिंह याची पत्नी चूडामणीदेवी हिने हे देऊळ बांधले. याच रस्त्यावर पुढे कलाचंद मंदिर आहे. इ.स १६५६ मध्ये मल्ल राजा रघुनाथसिंह याने हे मंदिर बांधले परंतु आता याचे काही भग्न अवशेषच उरले आहेत.
ही सर्व मंदिरे पहाताना पायी चालण्याइतके अंतर आहे. तरीही वेळ वाचवण्यासाठी गावात उतरल्यावर एक सायकल रिक्षा सर्व मंदिरांच्या फेरफटक्यासाठी ठरवून घेतली की काम सोप्पे होते. मंदिर पाहण्याची सुरुवात रसमंचपासून करावी लागते कारण तिथेच सर्व मंदिरांसाठीचे प्रवेश तिकीट फी घेऊन दिले जाते. इतर पाहण्यासारखे म्हणजे गावातल्या वेस्ट बंगाल टुरिस्ट लॉजच्या बाजूचे विष्णुपूर संग्रहालय अर्थात आचार्य योगेशचंद्र पुराकीर्ती भवन आणि बालुचारी साड्या बनवणाऱ्या विणकरांची घरे. आपल्या गन्जीफा पत्त्यांच्या खेळाप्रमाणे इथे मल्ल राजे पूर्वी दशवतार हा पत्त्यांचा खेळ खेळायचे तसे पत्ते देखील दुकानात विकत मिळतात. विष्णुपूरमध्ये खरेदी करण्यासारखे फार काही नाही. भारतीय हस्तकलेचे प्रतिक म्हणून जिथेतिथे दिसणारे इथले टेराकोटाचे बांकुरा घोडे जगविख्यात आहेत. खास शंखापासून बनवलेल्या दागिने,शोभेच्या वस्तू आणि नक्षीचे कोरीवकाम केलेले शंखही इथे मिळतात. (बंगाली संस्कृतीत शंखाला खूप महत्वाचे स्थान आहे.) टेराकोटाच्या वस्तूंची तुरळक दुकाने इथे दिसतात. टेराकोटापासून बनलेली खेळणी, भांडी,दागिने,घोडे,हत्ती,कासवे असे काही प्राणी आणि इतर काही शोभेच्या वस्तू विकण्याचा जोडधंदा इथे चालतो. जोडधंदा म्हटले अशासाठी कि विष्णुपूरजवळच असणाऱ्या पंचमुरा या गावात ‘कुंभकार’ जातीच्या टेराकोटा कारागीरांची काही कुटुंबे राहतात. बंगालच्या इतरही काही जिल्ह्यांमधील गावात टेराकोटा कारागीर राहतात. टेराकोटा कला जगवण्याचा ही कुटुंबे प्रयत्न करत आहेत पण यातील उत्पन्न फारच कमी असल्याने पुढची पिढी उदरनिर्वाहाच्या इतर मार्गांकडे वळतेय आणि पर्यायाने टेराकोटा उद्योग देखील अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे. इथल्या वस्त्रोद्योगालाही शतकांची परंपरा आहे. इथल्या बालुचारी साडीने विष्णूपुरचे नाव जगाच्या नकाशावर नेले. या साडीवर देखील टेराकोटा देवळांची नाजूक नक्षी पाहायला मिळते. अर्थातच अस्सल रेशीम असल्याने त्या खूप महागदेखील आहेत. ज्यांना संगीतकलेत रस आहे त्यांच्यासाठी विष्णुपूर अनोळखी नाही. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतात विष्णुपूर घराणे तर प्रसिद्धच आहे. डिसेंबरमध्ये इथे विष्णुपूर मेळा आणि संगीत महोत्सव साजरा होतो.

मल्ल राजांच्या काळात हे टेराकोटा मंदिरांचे स्तोम बंगालमध्ये अधिकच वाढले पण आपल्याकडे अजूनही चांगल्या स्थितीत असलेली टेराकोटातून बांधलेली अनेक सुंदर देऊळे उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश,झारखंडमध्ये देखील आहेत. सर्वात प्राचीन असे सहाव्या शतकातील टेराकोटा मंदिर उत्तरप्रदेशातील कानपूर जवळ असलेल्या भीतरगाव येथे आहे. एकट्या बंगालमध्येच पाहायला गेले तर बांकुरा आणि आजूबाजूच्या परिसरात तसेच दिनाजपूर, मुर्शिदाबाद, मालदा, वीरभूम, वर्धमान, हुगळी,पुरुलिया जिल्ह्यांमध्ये पुष्कळ टेराकोटा देऊळे पाहायला मिळतात. ती मंदिरे तर विष्णुपूरपेक्षा अधिक जुनी आहेत. परंतु वाईट स्थिती म्हणजे एवढे महत्वाचे ऐतिहासिक वैभव बाळगणाऱ्या दक्षिण बंगालमधील बांकुरा, वर्धमान, दुर्गापूर, विष्णुपूर अशा ठिकाणांना अजूनही शहरीकरणाच्या वाऱ्यांचा कोणताही फायदा झालेला दिसत नाही. महाराष्ट्रातील तालुका आणि जिल्हा पातळीवरील शहरांच्या तुलनेत तर ही शहरे जुनाट वाटतात, अर्थात त्याची राजकीय आणि सामाजिक कारणेही आहेत. गेली अनेक वर्षे विष्णुपूर मंदिराच्या ऐतिहासिक ठेव्याला युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळावा म्हणून भारत सरकार आणि पश्चिम बंगाल राज्य सरकार प्रयत्नात आहे. अमेरिकन वकिलातीच्या सांस्कृतिक संवर्धन निधीतून देखील या मंदिरांच्या देखभालीसाठी अनुदान देण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात विष्णुपूरला आजही अगदी जिल्हास्तरीय सुंदर गाव म्हणण्याचेही धाडस होत नाही. विष्णुपूर जेव्हा सर्व सोयीसुविधांनी युक्त बनेल तेव्हा निश्चितच या टेराकोटा देवळांच्या शहराला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळेल अशी आशा आहे. एकूणच विष्णुपूर आज शतकांचा इतिहास कवेत घेऊन बसलेय. सर्वात जास्त सुरस माहिती-कथा कोणत्या काळात दडलेल्या असतात तर त्या नेहमीच भूतकाळात असतात, म्हणूनच इतिहासकालीन वास्तूसंशोधन किंवा अश्या वास्तू पर्यटक म्हणून जाऊन पाहणे हे खरे तर अत्यंत मनोरंजक आहे. खूपजणांच्या मते हा एक नीरस आणि कंटाळवाणा उद्योग आहे, पण अश्याच विचारांमुळे जेव्हा आपण एखाद्या पुरातन वास्तूसमोर उभे राहतो तेव्हा प्रत्यक्ष इतिहास आपल्यासमोर बोलका होतोय हि गोष्ट अनुभवणे आपण विसरून जातो. आपल्या देशात मंदिरे आणि किल्ले यांनी असाच लाखो पानांचा इतिहास आपल्यासाठी लिहून ठेवलाय पण आपण काय करतो, तर तिथे जाऊन त्या उत्तुंग वास्तूंच्या अंगावर काहीतरी बकाल आणि निरर्थक खरडवून ठेवतो. सगळ्याच इतिहासकालीन वस्तूंना पुरातत्व खात्याचे किंवा इतर प्रकारचे संरक्षण लाभू शकत नाही त्यामुळे होताहोईस्तो विष्णुपूरसारख्या या वास्तू इतिहास जपत आणि सांगत उभ्या राहतील. विष्णुपूरच्या मंदिरांना भविष्यात युनेस्कोकडून जागतिक दर्जाचे स्थळ असल्याचा मान कदाचित जाहीर होईल देखील पण आपापल्या गावात किंवा शहरात देखील अशा काही इतिहासकालीन वास्तू, वस्तू अथवा शिलालेख असल्यास त्यांची काळजी प्रथम तिथल्या नागरिकांनीच घेतली तर उत्तम कारण शेवटी अश्या प्रकारच्या इतिहास पर्यटनातून मिळणाऱ्या पैशांच्या उपयोगाने गावाचा देखील विकास होत असतो. त्यामुळे भारताच्या सांस्कृतिक पर्यटनात मोठा वाटा ऐतिहासिक पर्यटनाचा आहे हे विसरून चालणार नाही. 
विष्णुपूरला कसे जाल :- कोलकातापासून विष्णुपूर सुमारे २०० ते २५० कि.मी अंतरावर आहे. हावड्याहून विष्णुपूरला जाण्यासाठी आरण्यक एक्स्प्रेस,रूपाशी बांगला एक्स्प्रेस आणि पुरुलिया एक्स्प्रेस रेल्वेगाड्या आहेत. वेस्ट बंगाल टुरिस्ट लॉजखेरीज राहण्यासाठी आणि जेवण्यासाठी बरेच पर्याय विष्णुपूरमध्ये उपलब्ध आहेत. ते फारसे चांगले नसले तरी अगदीच गैरसोयीत टाकणारे देखील नाहीत. विष्णुपूरला बसने देखील जाता येते. दुर्गापूर एक्स्प्रेसवेचा शेवटचा रस्ता सोनामुखी गावातून अत्यंत सुंदर हिरव्यागार जंगलातून जातो. दुतर्फा असलेली वनश्री मन अत्यंत प्रफुल्लित करते, अर्थात बसने जाण्याचा अनुभव खराब रस्त्यांमुळे काही सुखकर होत नाही, त्यामुळे एव्हढाच काय तो काही मिनिटांचा पट्टा मन रमवून प्रवासाचा शीण दूर करतो. विष्णुपूरमध्ये WBTDC च्या लॉजमध्ये राहण्याची आणि जेवण्याची चांगली व्यवस्था आहे आणि मंदिरे पाहण्यासाठी  त्यांचा मार्गदर्शकही मिळतो. 
Note- This blog article was earlier published in Marathi news daily 'Prahaar' , please read it through this link http://prahaar.in/collag/127153 and also give your suggestions. Thanks.

1 comment: