Translate

Friday, April 24, 2015

सारे प्रवासी घडीचे, ग्राहक कायमचे!


प्रवास करणं हे खरं तर एक निमित्त असते; पण या निमित्ताने आपल्या पदरी अनेक बरे-वाईट अनुभव पडत असतात. एखादी उत्तम सहल लक्षात राहते तेव्हा तिच्यापाठी असेच काही चांगले अनुभव असतात व तसेच एखाद्या प्रवासातून चांगलाच धडाही आपल्याला मिळून जातो. १५ मार्च म्हणजे आजच्या जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्ताने अशा अनुभवांची ही उजळणी.
सारे प्रवासी घडीचे हेच सत्य असतं कारण हल्ली आपला प्रवास हा फक्त आपला नसून तो साकार करण्यामागे कितीतरी जण खपत असतात. गेली काही दशकं पर्यटन व्यवसायाला जगभरात भरभराट लाभलेली दिसतेय. त्सुनामी, महापूर, भूकंपासारखी मोठी नसर्गिक हादरवणारी आपत्ती किंवा एखादा सांसर्गिक रोग अशा कारणांनी काही काळापुरता पर्यटन व्यवसाय जरूर मंदावतो मात्र पुन्हा तरारतो. त्याचं श्रेय तुमच्या-
आमच्यासारख्या प्रवाशांनाच जातं. आपण या पर्यटन व्यवसायाचे ग्राहक असतो. हल्लीच्या काळात पैसे खर्च करायची तयारी असेल तर प्रवासासारखा दुसरा आनंद नाही. आजच्या ग्राहककेंद्रित जगात पर्यटन व्यवसायानं ग्राहकाचं पर्यायाने प्रवाशांचं मूल्य व त्यांची आवडनिवड चांगलीच जोखली आहे. म्हणूनच अनेक पर्यटन कंपन्या, विमान कंपन्या, क्रूझ कंपन्या, रेल्वे, हॉटेल्स इ. प्रवाशांना त्यांचं उत्पादन अत्यंत आकर्षक वाटेल अशी प्रलोभनं दाखवत विकतात.
इथे ग्राहक हा त्याच्या घराबाहेर देखील राजा असतो. शिवाय त्याला निवडीमध्ये वैविध्य असतं. परंतु याच ग्राहक राजाने आपला प्रवास व सहल संस्मरणीय करण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं अत्यावश्यक असते.
होतं काय की आपण रोजच्या नोकरी-धंद्याच्या, कामाच्या कंटाळवाण्या कटकटीतून सुटणार या आनंदात असलेला पर्यटक ग्राहक गरसोय किंवा फसवणूक झाली तरी होता होईतो सहन करत दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत असतो.
प्रवासात असताना कशाला हवाय झमेला असं त्याला वाटत असतं. मात्र आपल्याच फायद्यासाठी आपण काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. याचं सर्वात साधं उदाहरण म्हणजे एसी रूम.
आपण एसी रूम बुक करतो आणि तिथे गेल्यावर आपल्याला सांगण्यात येतं की साहेब, रूम एसी बंद पडलाय. मेकॅनिकला बोलावलंय. आपण दुसरी रूम द्या म्हटलं तर दुस-या सर्व रुम्स भरलेल्या असतात, हे आपल्यालाही दिसत असते.
अशा वेळी आपल्याला नाइलाजाने एसीचं भाडे भरून नॉन एसी झालेल्या रूममध्ये राहावं लागतं. भाडं मात्र तेच लागतं, कारण हॉटेलचे नियम बदलता येत नाहीत, असं कारण सांगितलं जातं. हॉटेलांमधील सोयीसुविधा नेहमी व्यवस्थित सुरू आहेत की नाही याची माहिती गेल्या गेल्या घेणं व फोनवरूनही घेणं गरजेचं आहे. नाहीतर होते ना फसगत..
ग्राहक असूनही फसले जाण्याची वेळ आपल्यावर प्रवासात अनेकदा येत असते. याचा असाच एक अनुभव नागपूरहून मुंबईला येत असताना एकदा आम्हाला आला.
रेल्वेचा जेवणासाठीचा माणूस किती लोकांना जेवण हवंय याची यादी घेऊन गेला. आम्हीही आम्हाला जेवणाचा कोणता प्रकार हवाय हे त्याला सांगितलं. काही वेळाने जेवण वाटप झालं. इतर माणसं जेवायला लागली.
आमचे डिनर बॉक्स काही येईनात आणि तो यादी घेऊन जाणारा मनुष्यही फिरकेना. अखेर आम्हीच शोधाशोध करून त्याला पकडलं तेव्हा जेवण संपलंय असा साक्षात्कार त्यानं घडवला. भांडून उपयोग नव्हता.
एका स्टेशनवर रात्री अकरा वाजता जे काही मिळेल ते घेतलं आणि जेवलो. अर्थात त्याच्याकडून पैसेही परत घेतले. एका ठिकाणी रस्त्यावरचा प्रवास होता, ऐनवेळी सहल संयोजकाने जास्तीची माणसं कोंबली व माझी अवस्था खुराडयातील कोंबडीसारखी झाली. पुढचे चार तास मी दरवाजाला चिकटून आता बाहेर पडते की नंतर पडते अशा भीतीत प्रवास केला. वादावादी शक्य नव्हती. मला इच्छित स्थळी जायचंच होतं, त्यामुळे अत्यंत दाटीवाटीत बसण्याचा पर्याय स्वीकारावा लागला.
पर्यटन कंपनीकडून प्रवास व सहल करणार असाल तर आपल्याला हव्या त्या गोष्टी काळजीपूर्वक पाहाव्या लागतात, इथेही माझी एकदा घाईघाईत फसगत झाली होती. सर्वसाधारणत: जंगलांमध्ये फिरताना जिप्सीज वापरल्या जातात. त्यामुळे ऑनलाईन बुकिंग करताना मी वाहन काय आहे ते पाहिलं नाही आणि पर्यटन कंपनीने फिरण्यासाठी कॅन्टर वापरला.
ज्यांना जिप्सी आणि कॅन्टरच्या अनुभवातला फरक माहितेय त्यांना माझ्या म्हणण्याचा अर्थ बरोबर कळेल. शक्यतो कोणत्याही अभयारण्यात छत मोकळं असणा-या जिप्सीजमधून फिरावं त्यामुळे जंगल मोकळेपणाने वाचता येतं. तुम्हाला खाली उतरून भटकण्याची संधी मिळणार असेल तर त्यासारखी दुसरी गोष्ट नाही. पण कॅन्टरमधून फक्त नवख्यांनीच फिरावं.
असं नवख्यासारखं जंगल पाहण्याची वेळ माझ्याच चुकीमुळे माझ्यावर आली. पण काही वेळा तुमचा नाइलाजही होतो. एके ठिकाणी जाताना मला जेट एअरवेजचं शॉर्ट सीटर विमान मिळालं होतं. आणि त्यातही माझ्या वाटयाला आली ती सीट होती अगदी शेवटची, जिला पुढे लेग रेस्ट व मागे हेड रेस्टसाठी जागाच उपलब्ध नव्हती.
ही माहिती मला तिकीट बुकिंग करताना देण्यात आली नव्हती. पण सुदैवाने विमानात ब-याच जागा रिकाम्या होत्या व छोटंच विमान असल्यामुळे क्लासबिसचा काही प्रश्न नव्हता, त्यामुळे मला आरामात सीट बदलून मिळाली व प्रवास छान झाला.
नेहमीच वाईट अनुभव येतात, असं नाही तर कधीकधी चांगले देखील अनुभव असतात. एकदा पुण्याला जाताना आमची बस वाशीजवळ बंद पडली, त्यावेळी ड्रायव्हर व कंडक्टर यांची बस दुरुस्त होत नाही असं दिसल्यावर आमची दुस-या बसमध्ये सोय करून दिली. त्यांनी प्रवाशांना वा-यावर सोडलं नाही हे महत्त्वाचं.
अन्यथा आमच्यावर भांडण्याची वेळ आली असती. खरं तर तुम्ही स्वत: कशा प्रकारचे पर्यटक व व्यक्ती आहात यावर तुमचा प्रवास, सहल कशी होते हे बरेचसे अवलंबून असतं. चांगल्याचं वाईटात रूपांतर करणं हे अखेर आपल्याच हाती असतं.
तर अशा प्रकारच्या अनुभवांना तोंड देताना पर्यटकामधला ग्राहक देखील जागृत असावा लागतो. हल्ली खूप ठिकाणी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध आमिषं दाखवली जातात. त्यात नको असलेली स्थळं किंवा हॉटेल्स पण यादीत घातली जातात.
अशावेळी तुम्ही पर्यटकासोबत ग्राहकही आहात हे लक्षात ठेवा. घाईत किंवा काही वाक्यांचा अर्थ न कळल्यामुळे असे अनुभव आपल्याला प्रवासादरम्यान येत असतात. यात तुमची फसवणूक करणारा कोणीही असू शकतं, मग तो टूर एजंट असेल किंवा पर्यटन कंपनी किंवा रिसॉर्ट मालक. चुकीची सुरुवात आपल्याकडून होत नाही ना याचं भान बाळगावं आणि प्रवास आनंदाचा करावा.
Here is the link for published article- http://epaper.eprahaar.in/detail.php?cords=8,952,756,2276&id=story3&pageno=http://epaper.eprahaar.in/15032015/Mumbai/Suppl/Page4.jpg

तुम्ही कोण?


पर्यटक, मग तो हौशी वा नवखा असो किंवा अगदी दर आठवडयाला घराच्या बाहेर वीकेंड घालवणारा, प्रत्येकाची काही ना काही आवडनिवड असतेच. कुठे जायचं, काय पाहायचं हे सर्व ठरवूनच बहुतेक वेळा आपण प्रवासाला सुरुवात करत असतो. परंतु फिरण्यासाठी इतकी विविध आकर्षण असतात की अनेकदा काय पाहावं हेच कळत नाही. या सा-या गुंत्यातून अगदी पर्यटकालाही ‘कोहम’ असा प्रश्न पडतो.
टूर कंपन्यांसोबत जाऊन इथली-तिथली देवळं पाहणा-या भाविकांसाठी अख्खा जन्म अपुरा पडेल इतकी देवळं भारतात आहेत, असं मी कधीतरी गमतीने म्हणते.
अर्थात, यात कुठेही मस्करीचा भाग नाही; पण भारतातली मंदिरांची पुरातन स्थापत्यशैली व कोरीवकाम हे खरंच इतकी अप्रतिम व प्रेक्षणीय आहे की कोणत्याही प्रांतात जा, तिथली निदान १० प्रमुख देवळं तरी पाहण्यासारखी असतातच असतात.
तुमच्या सहलीत पाहण्याच्या प्रेक्षणीय स्थळांमधून काढून टाकता येणं अशक्य असं एखादं तरी देऊळ प्रत्येक प्रांतात असतंच. याचा अनुभव मला दक्षिणेत आला तसाच राजस्थानातही आला.
कितीही पाहायचं नाही म्हटलं तरीही इथली देवळं व राजवाडे, महाल यांची अत्यंत मनमोहक वास्तुशैली व कारागिरी ही आपल्याला त्यांच्याकडे खेचून नेतेच.
परंतु राजवाडे-महाल किंवा देवळं पाहणं ही माझी आवड नक्कीच नाही. मला शिल्पकला व वास्तुरचना यात काही विशेष असेल तर पाहायला आवडतं, मात्र फिरायला गेल्यावर उठसूट तेच पाहीन असंही नाही.
ही झाली माझी आवड. तर प्रत्येक पर्यटकाची स्वत:ची अशी काही खास आवडनिवड असते. ज्यात त्याला त्याच्या पसंतीची ठिकाणं पाहायला आवडतात. कोणाला जंगलं आवडतात तर कोणाला द-याखो-या, कोणाला सागरकिनारे आवडतात तर कोणाला ग्रामीण विभागात फेरफटका मारायला. शक्यतो स्वत:ला आवडेल त्या ठिकाणीच जाण्याचा पर्यटकांचा कल असतो. उदाहरणार्थ शिल्पकला पाहण्यात रुची असणारा पर्यटक हा तशाच ठिकाणी जाईल.
आपल्याला नेहमीच्या आयुष्यात न मिळू शकणा-या अशा गोष्टींकडे आपला प्रवास सतत सुरू असतो. हे केवळ दैनंदिन आयुष्यासाठीच नव्हे तर पर्यटनासाठीही लागू होतं. भारतात राहणारा पर्यटक सतत बारा महिने ऊन-घाम-गर्दी याला तोंड देत असतो.
मग त्याला युरोप-अमेरिकेसारख्या थंड हवेच्या प्रदेशांची भुरळ पडते. तिथे घालवलेले दिवस मोजकेच असले तरी ते त्याच्यासाठी अविस्मरणीय होतात. अशा प्रकारे आपल्या भोवतालच्या परिस्थितीवरही आपली फिरण्याची आवड ठरत असते.
तशीच ती स्वभावावरही अवलंबून असते. साहसी वृत्तीचा असलेला पर्यटक त्याला पॅराग्लायिडग, स्कुबा डायिव्हग, बंजी जंपिग, सी-ग्लायिडग असे काही साहसी, रोमांचक खेळ खेळायला मिळतील अशा ठिकाणांना प्राधान्य देतो. निसर्गप्रेमाची व वन्यजीवनाची आवड असल्यामुळे माझ्या यादीत जंगल जवळपास असलेली स्थळं भरपूर असतात.
मात्र हे झालं सर्व वैयक्तिक. आपण बरेचदा टूर कंपन्यांसोबतही फिरायला जात असतो. काही वेळा तो प्रदेश आपल्याला अनोळखी असतो. तेव्हा मात्र टूर एजंट व गाईड सांगेल ती स्थळं आपल्याला पाहावी लागतात. त्याला नाइलाज असतो. हे स्थलदर्शन आपल्या हातात नसतं, त्यामुळे इच्छा नसेल तरीही आपल्याला त्या ठिकाणी जावंच लागतं.
मी भारतातली बरीचशी देवळं याचमुळे पाहिलेली आहेत. अर्थात ग्रुपसोबत गेल्यामुळे ही गोष्ट आपल्याला नाकारता येत नाही. असो. परंतु आता पूर्वीसारखे टिपिकल थंड हवेची स्थळं, धबधबे वगरे पाहणारे पर्यटक राहिलेले नाहीत. त्यांच्याही आवडी, मागण्या बदलत चालल्या आहेत. त्यामुळे पर्यटन व्यावसायिकांसमोर नवी पर्यटन स्थळं शोधून काढण्याचं आव्हान समोर उभं राहिलेलं आहे.
अशीच एक नवी टूम निघाली आहे ती युद्धग्रस्त किंवा तणावग्रस्त भागांना भेट देण्याची. जर्मनी, रशिया, जपान वगरे देशात जाऊन जागतिक महायुद्धांचे अवशेष व स्मारकं पाहण्याची आजही लोकांना आवड आहेच.
मात्र नव्या पिढीने यात अजूनच भर घातलीय. इस्रयल, काबूल, अफगाणिस्तान, इजिप्त वगरेसारख्या ठिकाणी जाऊन तिथलं जनजीवन, संस्कृती आदी पाहण्यात हल्ली लोकांना रस निर्माण झाला आहे.
जागतिक घडामोडींचे पडसाद आपल्या वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रे, मासिकं इत्यादी माध्यमातून उमटत असतात. याचं अत्यंत रंजक पद्धतीनं वर्णन व चित्रण केलं जातं. त्यामुळे तिथल्या लोकांबाबत जगातील नागरिकांना सहानुभूती निर्माण तर होतेच, शिवाय त्यांना जाऊन एकदा प्रत्यक्ष पाहावं किंवा भेटावं असंही ब-याच जणांना वाटत असतं.
मात्र अशा तणावग्रस्त भागात एकटयाने फिरू शकणारे धाडसी पर्यटक फार कमी असतात. सर्वामध्येच एवढे धाडस नसते. अशांसाठी मग आता टूर कंपन्यांनीच पॅकेजेस जाहीर केलेली आहेत. अगदी आपलं काश्मीरही यात येतंच की.
कारण आपल्यासाठी ती एक सर्वसाधारण सहल असली तरी भारताबाहेरून येणा-या पर्यटकासाठी ती निश्चितच एक साहसी सहल असते. कारण त्याने टीव्हीवर काश्मीरसंबंधीचं वृत्तांकन पाहिलेलं असते, त्यासंबंधी वाचलेले असते.
असाच एक प्रकार देशाच्या टोकाच्या सीमाभागात जाण्या-या पर्यटकांचा असतो. कोणत्याही देशाच्या अशा शेवटच्या सीमाभागात फिरणं हे इतर पर्यटनस्थळी फिरण्यापेक्षा थोडं जास्त जोखमीचं असतं.
कारण आज अनेक देशांमध्ये प्रांतीय, धार्मिक वाद सुरू आहेत. अशा ठिकाणी तणाव असण्याची शक्यता बरेचदा असते. त्यामुळे देशाच्या सीमाभागात जाऊन प्रत्यक्ष सीमा पाहता आल्या तर नक्कीच ते पर्यटकांना आवडतं.
आता त्यासाठी वाघा बॉर्डरला जाणारे लाखो पर्यटक आपल्याकडे आहेत. पण तो झाला संरक्षित व जनतेला पाहण्यासाठी कायदेशीररित्या खुला असलेला सीमाभाग. परंतु अनेकांना इंफाळ, उत्तर प्रदेश, राजस्थान, प. बंगाल, काश्मीर इत्यादी भागात जाऊन तिथल्या सीमेनजीकच्या गावांनाही भेट द्यायला आवडतं.
तिथे जाऊन सीमा पाहणं हा अर्थातच एक पूर्णपणे वेगळा अनुभव असतो. त्यात तुमच्यासोबत जाणकार व्यक्ती असणं अत्यंत आवश्यक आहे, शिवाय विशेष परवानगीही लागते. अन्यथा नुसताच निरुद्देश इकडे-तिकडे पाहत फिरणारा पर्यटक घुसखोर म्हणून मारला जाऊ शकतो.
तर अशा प्रकारे पर्यटकांच्या यादीमध्ये काही वेगळीच पर्यटनस्थळं असू शकतात. अशा ठिकाणी एकदा तरी जायला मिळावं यासाठी जातीचा पर्यटक कसोशीचे प्रयत्न करत असतो.
मात्र नेहमीच आपल्या आवडीचे पाहायला मिळेलच असं नाही. तेव्हा आजूबाजूला दिसणा-या गोष्टींमध्येही खूप काही सापडतं. एखादं ठिकाण तुमच्या खास पसंतीस उतरलं नसेल तर तिथे थीम फोटोग्राफी करा.
कोणत्याही ठिकाणी निसर्ग हा आपल्यासोबत असतोच. त्यातल्या थीम्स शोधा. परिसरातील लोकांमध्ये, इतर जीवनामध्ये थीम शोधा. त्यानेही समाधान होत नसेल तर तिथलं लोकजीवन पाहा, तिथली गाणी ऐका, लोकांशी बोला, स्थानिक खाद्यपदार्थ चाखा, चालीरितींची माहिती करून घ्या. स्थानिक वाहनांमधून प्रवास करा. तिथली भाषा अवगत करण्याचा प्रयत्न करा.
तिथं एखादी स्थानिक वस्तू छोटयाशा दुकानात जाऊन खरेदी करा. यातून तो प्रदेश तुम्हाला समजत जातो. कोणत्याही शहराची-गावाची माहिती घ्यायची म्हणजे इंटरनेट किंवा पुस्तक, नकाशे उघडून पाठ करायचं असं नाही तर तिथं प्रत्यक्षात गेल्यावर जे दिसतेय ते समजून घेण्याचा प्रयत्न करा.
यामुळे तुम्ही पर्यटक म्हणून समृद्ध व्हाल. कदाचित मग पुढल्या वेळी तुम्ही अमुकच एका ठिकाणीच मी जाईन म्हणून हट्ट धरणार नाही. एकदा का पर्यटक म्हणून अनुभवसंपन्न झालात की ‘वसुधव कुटुंबकम’चा प्रत्यय तुम्हाला जरुर येईल.
Here is the link for published article- http://epaper.eprahaar.in/detail.php?cords=6,1406,1462,2266&id=story4&pageno=http://epaper.eprahaar.in/22032015/Mumbai/Suppl/Page4.jpg

Thursday, April 23, 2015

बाव-या मनासाठी


कोणत्याही प्रवासात असताना नेहमीच एक प्रश्न पडतो किंबहुना तो पडलाच पाहिजे की, आपण इथे का आलो आहोत? हा प्रश्न किंवा इतरही काही प्रश्न तुम्हाला प्रवासात पडत असतील तर तुमचा आत्मसंवाद सुरू आहे समजा. तो सुरू असेल तर तुम्ही निव्वळ पर्यटक असण्याच्या पुढच्या पायरीवर पोहोचता.
इयरफोनमधून सुरू असणा-या रेडिओची खरखर वाढत जाते, निवेदिकेचा आवाज कापरा होत होत हळूहळू बंदच होतो, कानातला विरंगुळा संपलाय म्हटल्यावर नजरेला तरी काही सापडतंय का ते पाहायला आपण बाहेर पाहू लागतो. झरझर बाहेर दिसणारं सर्वकाही आपल्याशी छत्तीसचा आकडा धरून उलटं पळत जातं, स्थिर वस्तूही हलत असल्याचा भास होऊ लागतो, नजर कुठे टिकवून राहताच येत नाही.
एखाद्या घराच्या भिंतीवर काय लिहिलंय वाचू म्हटलं तरी अक्षरं भिंतीवरून उडी मारून गायब होतात आणि गाडीला वेग आल्याचं एकदा मनाला पटल्यावर आपण आपलं हलतं डोकं आणि डोळे यांना नॉर्मल ठेवण्याचा प्रयत्न करू लागतो. सिमेंटच्या घरांचे ठोकळे मागे पडत जातात, अधूनमधून दिसणारे शेतीचे कोवळे लुसलुशीत तुकडेही विरळ होत जातात, मोकळी जमीन सुरू होते.
विस्तीर्ण जमीन, नदी, जमिनीसोबत धावणारं आकाश, झाडं, माळरानं, घाट, द-या, डोंगररांगा, कपारी, वळणांचे रस्ते, असा सारा प्रदेश सुरू होतो आणि आपली काही काळापुरती सगळ्या शहरी जगापासून सुटका होते. मोबाईलवर रेंज येतेय का याची दहावेळा चाचपणी केली जाते. अखेर त्याचा उपयोग निदान फोटोसाठी तरी करू असं म्हणून आपण बाहेरच्या दृश्यात मन रमवतो.
इतकं शांत राहायची सवय नसते ना आपल्याला, मग मन ‘चाळ’करी होऊ लागतं. कोणीतरी मुद्दामहून दूर लोटल्यागत आपण अस्वस्थ होत असतो. (इथं प्रवासात निवांत झोप येणारे सुदैवी). काय हवं असतं, काय करावं हे कळत नसतं. सहप्रवाशांशी बोलून झालेलं असतं, खाऊनपिऊनही झालेलं असतं, मोबाईलमधली नेहमीचीच गाणी ऐकण्यात आता रस उरलेला नसतो, हातातल्या पुस्तकापेक्षा बाहेरचा अनोळखी प्रदेश खुणावत असतो.
आपलं मन एक्झिट झोनमध्ये शिरलेलं असतं. प्रवासातली ही अवस्था अटळ असते, मग तुम्ही कुठेही असा, जहाजात, विमानात, रेल्वेत किंवा चारचाकी वाहनात. ही अस्वस्थता नसते, तर ती सुरुवात असते. तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून तुम्ही नवं काही शोधायला, पाहायला, स्वीकारायला, जाणून घ्यायला, अनुभवायला बाहेर पडलेले असता. पुढे काय होणार याची पुरेशी माहिती नसते. तरीही छान वाटत असतं. त्या छान वाटण्याचीच ही सुरुवात असते.
मनाला घट्ट चिकटलेले विविध प्रकारच्या संवादांचे तुकडे वा-यासोबत बाहेर पडून उडून जातात. हे संवाद कोणाकोणाशी, कोणकोणत्या भावनांनी झालेले असतात. जसे ते दूर जातात, आपल्याला हलकं वाटू लागतं. सर्व ओझी डोक्यावरून बाजूला काढून ठेवल्यासारखी वाटतात.
एव्हाना मोबाईल बंद असला तरी त्याची गरज आहे असं वाटणं एकदमच कमी झालेलं असतं. खरं तर आपल्या गरजा अशा कमीच कशा राहतील असा नवाच विचार येऊ लागतो. गरजांसोबत त्या पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारी माणसं व त्या अनुषंगाने येणारे संवाद व इतर गोष्टीही कमी करता येतील का याचा विचार सुरू होतो. वाहनातून एकीकडे प्रवास सुरू असतो आणि मनातल्या विचारांनीही वेग घेतलेला असतो.
सुदैवच म्हणायचं की आपल्या जबाबदा-या, चिंता, काळज्या, विवंचना, अडचणी यांना व्यक्तीस्वरूप नाही, नाहीतर बाहेर जाताना त्यांनाही बांधून घेऊन जाणं भाग पडलं असतं! आपला आपल्याशी संवाद सुरू झालेला असतो, खूप वेगळं वाटत असतं; पण समाधानही वाटत असतं. प्रवासाला बाहेर पडण्याचा आपला निर्णय योग्यच होता हे मनाला सांगितल्यावर तेही सुखावत असतं.
सुंदरबनमधल्या एका नीरव रात्री माझ्या मनाने मला असंच सांगितलं होतं. ब्रह्मपुत्रा आणि गंगेच्या त्या विस्तीर्ण पात्रात (समुद्रच तो, कारण इथं मच्छीमारांच्या बोटी बरेचदा भरकटतात!) अतिशय संथ पाण्यात बोटीच्या डेकवर एकटयानेच चांदण्याखाली आरामात झोपले होते, रात्रीचे दोन वाजले होते बहुदा.
किती का वाजलेले असेनात, अशा नितळ शांततेत तुम्हाला भान राहत नाही. हो, एवढी गूढरम्य शांतताही आपल्याला गुंगवून टाकू शकते. मग कधी भासही होतात. अशावेळी मनावरचा हक्कसोडून देण्यासाठी देखील खूप पराकाष्ठेचे प्रयत्न करावे लागतात. तरच त्या क्षणाशी आपण एकरूप होऊ शकतो. आम्ही गावांपासून, किनाऱ्यांपासून चांगलेच दूर आलो होतो. त्यामुळे तिथले आवाजही नव्हते.
यापेक्षा अप्रतिम जगात काही नसावं असं त्याक्षणी मला वाटलं. ही भावना तुम्हालासुद्धा अनुभवता येऊ शकते किंवा तुम्ही अनुभवली देखील असेल. असं म्हणतात की प्रवासाचं कधी ध्येय ठेवू नये, जे दिसतंय ते मनात उमटवत जावं, साठवून घ्यावं. त्यामुळे मी ब-याच ठिकाणी असे क्षण अनुभवले आहेत. त्यात कॉब्रेटमधला रामगंगेचा काठ होता, दांडेलीमधलं जंगल व प्राचीन वृक्षराजीत लपून गेलेली दरी होती, धरमशालेतलं त्रियुंडचं पठार होतं, अशा काही जागा होत्या, जिथे मी माझं मन सोडून आले.
आपण प्रवासाला बाहेर का पडतो तर आपल्याला रोजच्या रहाटगाडग्यातून विरंगुळा हवा असतो, विश्रांतीचे चार क्षण पाहिजे असतात. शरीराला आरामाची आवश्यकता असते, त्याहूनही जास्त ती मनाला असते. याच मनावर, मेंदूवर आपण कारण-अकारण अनेक ओझी रोज रोज चढवत असतो.
हीच ओझी, बंधनं उतरवून टाकण्यासाठी प्रवास हे एक अतिशय योग्य निमित्त असतं. त्यातून तुम्हाला एकटयाने असे काही क्षण काही घालवत, स्वत:शी संवाद करायची संधी मिळाली तर मग काय..दुधात साखरच जणू ! तुमच्या आवडीचं शहर, गाव, ठिकाण कोणतंही असू देत, मग ते पठार असू देत, किल्ला असू देत, सागरकिनारा असू देत किंवा डोंगर असू देत, तुम्हाला निर्विकार होता येईल अशी एखादी जागा नक्कीच तिथे असेल.
त्यासाठी खूप लांबच, एकांतात गेलं पाहिजे असं नाही. एखाद्या छानशा नदीकाठी बसूनदेखील तुम्ही हा संवाद सुरू करू शकता. ज्यांना प्रवासाची आवड आहे, कंटाळा येत नाही अशांसाठी प्रवासासारखा दुसरा गुरू नाही. मग तुमच्या पायाखालची जमीनच तुमचं गुरुकुल बनतं. तुमची नेहमीचीच नजर, तीही चौकटीतून बाहेर पडते.
निर्बुद्धासारखे एका चाकोरीत धावणारे आपण, प्रवासात असताना तृषार्त होऊन फिरतो. आपल्याभवतीचं जग हे असं आहे याची नव्याने जाणीव होऊ लागते. आत्मसंवाद झाल्याने आयुष्यात काय हवं आहे, काय नको, काय चुकतंय, आपली दिशा कोणती याचं भान येऊ लागतं. खरं तर प्रवास हे केवळ निमित्त असतं, पण पायाखालची वाट सोडल्याशिवाय काही उत्तरं मिळत नसतात. तेव्हा तुम्हीही शोधा असंच एखादं निमित्त !
Here is the link for published article  http://epaper.eprahaar.in/detail.php?cords=12,1402,1466,2260&id=story4&pageno=http://epaper.eprahaar.in/29032015/Mumbai/Suppl/Page4.jpg

सहप्रवासी


प्रवासाची खरी गंमत येते ती सहप्रवाशांसोबत. मग ते अनोळखी असोत किंवा ओळखीचे. थोडय़ाच काळासाठी आपले अनुभव, आपली सुख-दु:खं त्यांच्यासोबत वाटून घेताना आपण त्यांच्याशी दीर्घकाळाचं नातंच जणू जोडत असतो.
आपल्याकडे एक जुनी म्हण आहे की ‘केल्याने देशाटन, मनुजा येतसे शहाणपण’, अर्थात ही संस्कृत आधारित म्हण आहे. तिचा अर्थ असा की अगदी प्राचीन काळापासून प्रवासाचं, त्यातून मिळणा-या ज्ञानाचं महत्त्व आपल्या पूर्वजांनाही माहीत होतं. त्या काळी अनेक साधू-तपस्वी हे एकतर एकटयाने भ्रमणाला बाहेर पडत किंवा त्यांच्यासोबत त्यांचा शिष्यगण असे.
इतिहासाची पानं उलटली तर अनेक संशोधक हे असे फिरस्ते असल्यामुळेच त्यांना देशोदेशींची माहिती मिळालेली दिसते. इब्न बतुता, हुआंग झँग, असे काही विदेशी फिरस्ते तथा पंडित त्याकाळी भारतात येऊन गेले, देशोदेशी फिरले.
देशोदेशीचं नवल पाहणं हीच यांची मोठी कामगिरी असे. मग हे ज्ञान पुस्तक लिहून किंवा मौखिक गोष्टी सांगून लोकांना दिलं जात असे.
आजकाल हे काम इंटरनेट करतं. लोक प्रवासाला जाऊन येतात आणि मग त्याबद्दलच्या कित्येक गोष्टी आपल्या सग्यासोबत्यांना सांगण्यासाठी इंटरनेटचा वापर करतात. अशा तऱ्हेने आजकाल प्रत्येकच जण इब्न बतुता झालेला आहे. प्रवासाला बाहेर पडण्याचं प्रत्येकाकडे वेगवेगळे निमित्त असते.
कोणी चंदरतालला ट्रेकिंग करायला जातं तर कोणी रंगनथिट्ट पक्षी अभयारण्यामध्ये पक्षी निरीक्षणासाठी जातं, कधी कोणाला बोधगयाला जाऊन भगवान गौतम बुद्धांना ज्या झाडाखाली आत्मज्ञान मिळालं तो बोधी वृक्ष पाहण्याची उत्सुकता असते तर कोणाला महाबलीपुरमच्या मंदिरावरील अद्भुत शिल्पकला पाहायची असते. मात्र हे प्रवासाचं ध्येय निरनिराळं असलं तरी आपल्याला सतत भेटत राहतात ती माणसं.
विविध रंग, रूप, स्वभाव, भाषा यांचं मिश्रण घेऊन ही माणसं आपल्याला भेटतात आणि आपला प्रवास रंगतदार बनवतात. हाच तर कोणत्याही प्रवासाचा यूएसपी असतो. किंबहुना अशा व्यक्ती आणि वल्ली भेटल्याशिवाय प्रवासाची मजाच येत नाही. म्हणून तर कुठेही प्रवास करताना आपण सहप्रवासी कोण आहेत हे आधी पाहत असतो.
ते चांगले असतील तर पुढे सहप्रवाशांमुळे वेळ चांगला जाणार हे समजून आपला मूडही छान होतो. सहप्रवाशांशी ओळख होण्यासाठी वेळ लागत नाही. त्यासाठी अगदी लहानसं निमित्तही पुरतं. अशीच एकदा विमानतळावर मला एक गृहिणी भेटली, तिचा हा पहिलाच विमान प्रवास होता. त्यामुळे विमानात आपापली सीट कशी शोधायची हे तिला माहीत नव्हते  (हे अर्थातच पहिल्या विमान प्रवासात मलाही माहीत नव्हतं) तेव्हा मी तिला मदत केली आणि आमची ओळख झाली. अनेकदा एकटयाने प्रवास करताना सहप्रवासी वयस्कर असतील तर ते माझ्याकडे सहानुभूतीनेच पाहतात. मी एकटीच अमुक एका ठिकाणापर्यंत कशी जाणार याची त्यांना काळजी वाटते.
तेव्हा मला गंमत वाटते व छानही वाटते. कधीकधी तर घरी यायचे आमंत्रणही मिळते एवढी छान ओळख होऊन जाते. अशाच एका विमान प्रवासात माझ्या शेजारी सुतारकामासाठी बाळगतात तशी कंतानची पिशवी घेऊन आलेला एक कामगार येऊन बसला.
खूपच साध्या कपडयातला असा तो माणूस होता. सोबत त्याचे काही सहकारी देखील होते. त्यांना कुठे बसावं हे कळत नव्हतं म्हणून ते थोडे भांबावले. मी त्यांना त्यांच्या सीट्स दाखवल्या. पण माझ्या मनातील कुतूहल शमत नव्हते.  ही साधी माणसं विमानाने कुठे जात असावीत असा प्रश्न माझ्या मनात आला. कारण अजूनही खूप निकड असल्याखेरीज आपण मध्यमवर्गीय विमानासारख्या महागडया प्रवासावर पैसे खर्च करत नाही, तेव्हा ही श्रमिक माणसं विमानातून कुठे व का चालली आहेत हे मला जाणून घ्यायचं होतं.
माझ्या शेजारी बसलेल्या कामगाराला विचारल्यावर त्याने सांगितलं की एका बडया कंपनीचा एक मोठा प्रोजेक्ट दुस-या शहरात सुरू होता व तिथे त्यांना तात्काळ या माणसांची गरज होती त्यामुळे कंपनीने हा प्रवासखर्च केला होता.
काही का असेना, त्या निमित्ताने विमानप्रवास करण्याचा आनंद त्यांच्या चेह-यावर दिसत होता. असंच लक्षात राहिलेले एक जोडपे भेटले रामनगरला जाताना. तिथं जिम कॉब्रेट नॅशनल पार्क आहे. दिल्लीहून आम्ही रामनगरला जाण्यासाठी ट्रेनमध्ये बसलो. यातली पत्नी ही अँग्लोइंडियन होती तर पती अमेरिकन. हे दोघेही काबूल युनिव्हर्सटिीमध्ये कामाला होते.
मुलांना घेऊन ते तिच्या माहेरी शिवपुरीला चालले होते. त्यांच्याकडून अफगाणिस्तान व काबूलमधल्या ब-याच गोष्टी ऐकायला मिळाल्या. मी पत्रकार असल्याचं कळल्यावर त्यांची उत्सुकता अधिकच वाढली. मग नेहमीप्रमाणे गप्पा सुरू झाल्या. गाडी तीन तास उशिरा रामनगरला पोहोचली, मात्र त्यांच्या सहवासामुळे ते दु:ख थोडं कमी झालं.
अशी खूप मंडळी आपल्याला प्रवासात भेटत असतात. विशेष म्हणजे एखाद्या परक्या ठिकाणी भेटणारी ही मंडळी आपल्या गावातूनच आलेली असली तर त्यानंतर होणारा आनंद वेगळाच असतो. अर्थात हे सर्व आपल्या मनोव्यापारांशी निगडित आहे, अन्यथा आपल्या गावातली तरीही अनोळखी माणसं एखाद्या परक्या प्रदेशात भेटल्यावर आपल्याला का आनंद व्हावा हा प्रश्नच आहे.
परंतु प्राचीन काळात गटागटाने फिरणा-या आदीमानवाला त्याच्या गटातील माणसांबरोबर जी सुरक्षिततेची भावना वाटत असावी, तीच या आनंदापाठी असावी असं वाटतं. एकदा का आपला आनंद या अनोळखी मंडळींसोबत आपण शेअर केला की ती आपलीच माणसं होऊन जातात.
ही देखील समूहनिर्मितीचीच एक प्रक्रिया आहे. असाच आनंद मला व माझ्या वहिनीला, नागरहोलेच्या जंगलात फिरताना आमच्या विभागात राहणारी मंडळी भेटल्यावर झाला होता. मग गप्पांची, खाण्यापिण्याची देवाणघेवाण झाली. जंगलात फिरण्याचा आनंद द्विगुणित झाला. मात्र प्रत्येकच वेळी असा अनुभव येतो असं नाही. माणसं वेगवेगळ्या प्रकारची असतात.
कोहिमाजवळच्या किसामा गावात हॉर्नबिल फेस्टिव्हलमध्ये फिरताना अचानक माझ्या समोर िहदीमिश्रित मराठीत बोलणारी मंडळी आली. मी उत्सुकतेने त्यांची चौकशी केली, तर ही माणसं मुंबईहूनच आली होती. पण त्यांनी पुढे बातचीत करण्यात काही स्वारस्य दाखवलं नाही.
धागा न जोडताच तो तोडून ही माणसं गर्दीत मिसळून गेली. पण माझ्यासोबत काही स्थानिक माणसं होती, त्यांच्यामुळे मुंबईच्या माणसांनी पाठ फिरवल्याचं काहीच वाटलं नाही. अशा निरुत्साही लोकांमुळे आपण आपल्या आनंदाला कधीच दूर करू नये.
ही प्रवास आणि आयुष्यातली एक समानता आहे, कितीही वाईट अनुभवांनी आपलं जीवन झाकोळलं गेलं तरी त्यांना विसरून जाऊन आपण पुढे चालत राहावं. नाहीतर जीवनातील ख-या आनंदाला आपण पारखे होतो. त्याचप्रमाणे सहप्रवासी कसेही असोत, आपला प्रवास कसा छान होईल हे आपण पाहावं.
Here is the link for published article http://epaper.eprahaar.in/detail.php?cords=4,1508,1456,2258&id=story4&pageno=http://epaper.eprahaar.in/05042015/Mumbai/Suppl/Page4.jpg

सेलिब्रिटी वाघ व त्यांची अभयारण्ये!


भारतीय वन्य पर्यटनाचं सर्वात प्रमुख आकर्षण कोणतं असेल, तर ते आहे टायगर सफारी, म्हणजे जंगलामध्ये जाऊन वाघांना पाहणे. आजमितीला भारत हा जगाच्या पाठीवर वाघ उरलेल्या देशांपैकी एक महत्त्वाचा देश आहे, जिथे नसर्गिक अधिवासात २२२६ अशा अल्पसंख्येत का होईना, पण वाघ नावाचा प्राणी नमुन्यादाखल टिकून आहे. त्याचमुळे आज प्रत्येक वन्यजीव सहलींचा प्रमुख उद्देश हा केवळ पर्यटकांना वाघ दाखवणे हा झालेला आहे.
भारतातल्या एका प्रसिद्ध जंगलातली टायगर सफारी. हो, व्याघ्र अभयारण्यातील अशा सफारींना टायगर सफारी म्हणूनच लोक ओळखतात. कारण या सफारीचा उद्देशच मुळी लोकांना जास्तीत जास्त जवळून वाघ दाखवणे हा असतो. अशी सफारी सुरू होण्याआधी व्यवस्थित हवा तयार केली जाते. जंगलातील अमुक एका झोनमध्ये वाघ दिसलाय किंवा त्या दुस-या झोनमधली वाघीण तिच्या पिल्लांना घेऊन आताच पाणी प्यायला बाहेर पडली आहे वगरे गोष्टी त्यांच्या कानावर फेकल्या जातात.
जंगलात गेल्यावर कुठेतरी वाघाच्या पावलांचे ठसे दाखवले जातात. पर्यटकांची आतुरता ताणली जाते. त्यांच्यापैकी अनेकांनी वाघ अद्यापही प्रत्यक्ष पाहिलेला नसतो. त्यांच्यासाठी तो महत्त्वाचा क्षण ठरणार असतो. त्याचसाठी तर ते एवढया लांब शहरातून आलेले असतात. एवढंच नाही तर केवळ वाघ पाहण्यासाठीच त्यांनी रिसॉर्ट व टूरचे २५-३० हजार रुपये भरलेले असतात. अशा पर्यटकांना नाराज करून चालत नाही. मग त्यासाठी वाघाचा माग काढला जातो.
तो जिथे असेल तिथपर्यंत त्याचा पाठलाग पुरवला जातो. तासन् तास जंगलात जिप्सी टेहळणी करत फिरतात, एकाच जागी थांबून राहतात व एकदा तो सापडला की मग जीप्स आणि हत्तींच्या गराडयात त्याला कोंडून एखाद्या सर्कशीतला दाखवावा त्याप्रमाणे पर्यटकांना वाघ दाखवला जातो. प्रथमच वाघ पाहत असाल तर निश्चितच या राजिबडया, उमद्या जनावराच्या तुम्ही प्रेमात पडता. त्याचं हे पहिलं दर्शन मनावर कायमचं कोरलं जातं. अधिकाधिक वाघांना आपण पाहिले पाहिजे, अशी इच्छा मनात उत्पन्न होते.
भारतातील सुमारे १६६ राष्ट्रीय अभयारण्यांपैकी ४७ ही व्याघ्र अभयारण्यं आहेत. त्यातील काही खास वाघांच्या सोप्या दर्शनासाठीच प्रसिद्ध झालेली आहेत. एखाद्या देवस्थानाला असावी तशी तिथे कायम गर्दी असते. यात हौशे-नवशे-गवशे सर्व असतात. मग अशा ठिकाणांहून तिथल्या वाघांच्या कथा देशभरात पसरत असतात.
पण विचार करा की आजघडीला देशात जेवढे वाघ लोकप्रिय आहेत, त्यांची संख्या फक्त २५च्या आसपास आहे. त्यातही काही पिल्ले आहेत. उदाहरणार्थ रणथंबोरमधील टी १९ व तिची पिल्ले, बांधवगढचा बामेरा मेल, कान्हाचा मुन्ना, ही सर्व यादी काही २५-३०च्या वर जायची नाही. मग प्रश्न असा पडतो की देशात २२२६ वाघ असताना केवळ निवडकच वाघ लोकांना माहीत का व्हावेत? या विषयाकडे फार कमी वन्यजीव अभ्यासकांचे लक्ष गेलेले आहे.
अभयारण्यांची भटकंती करताना दरवेळेस हा प्रश्न मला सतावतो की पर्यटक त्याच त्याच निवडक लोकप्रिय झालेल्या व्याघ्र अभयारण्यांना का भेट देत आहेत? ४७ व्याघ्र अभयारण्यं असतानाही पर्यटक काही निवडकच ८-१० व्याघ्र अभयारण्यांना भेट देतात. हा सर्व लोकांनी व प्रसारमाध्यमांनी दिलेल्या प्रसिद्धीचा परिणाम आहे. त्यामुळे देशातील बाकीची व्याघ्र अभयारण्ये ही पूर्णपणे दुर्लक्षित राहिलेली आहेत.
महसुलाअभावी त्यांचा विकास पुरेसा होत नाहीये. अर्थात यात चांगली एक गोष्ट घडते ती म्हणजे तिथल्या वाघांची पर्यटकांपासून सुटका होते. त्यांना त्यांच्या स्वत:च्या जंगलात मनमोकळं वावरायला मिळतं.
शिका-यांसारखे त्यांच्या मागावर राहणारे पर्यटक तिथे नसतात. तिथल्या पर्यावरणाची हानी कमी होते. मात्र यातली दुसरी तोटयाची गोष्ट म्हणजे अशा जंगलांमध्ये तस्करांचा वावर वाढतो. जिथे पर्यटकांची फारशी चहलपहल नसते तिथे त्यांना वावरायला, चोरटी शिकार करायला रान मोकळं मिळतं.
पर्यटकांची जिथे गर्दी असते तिथे निदान दिवसाढवळ्या तरी असे प्रकार घडत नाहीत; परंतु ही अभयारण्यं एकीकडे पर्यटकांच्या गर्दीपासून मुक्त राहतात तर दुसरीकडे देशातील काही मोजक्याच व्याघ्र अभयारण्यांमध्ये पर्यटकांची, फोटोग्राफर्सची, वन्यजीव अभ्यासकांची गर्दी उसळलेली असते. ही व्याघ्र अभयारण्यं जणू सेलिब्रिटी पार्कस् बनली आहेत. या पार्कचे सेलेब म्हणजे प्रमुख आकर्षण आहेत ते तिथले वाघ. ज्यातील काही मोजक्याच वाघांची माहिती आतापर्यंत आपल्याला आहे.
वास्तविक २ हजारांच्या आसपास वाघ देशातील जंगलात असताना केवळ मोजक्याच वाघांवर पर्यटकांचे लक्ष केंद्रित असणं ही खरं तर चुकीचीच गोष्ट. पण ती घडते आहे. यामुळे त्या वाघांच्याही जीवनाला धोका पोहोचतो आहे. सदासर्वदा हे निवडक वाघ, त्यांचे कुटुंब यांच्यावर प्रसिद्धीचा प्रकाशझोत टाकला जातो. गर्दी त्यांच्यापासून हटतच नाही. या वाघांना नावंही देण्यात आली आहेत. जणू काही हे अभयारण्य नसून एखादी सर्कसच असावी.
बांधवगढ, कान्हा, कॉर्बेट, ताडोबा, पेंच, रणथंबोर अशा काही निवडक व्याघ्र अभयारण्यांमधील वाघांचे अक्षरश: लाखो फोटो आज इंटरनेटवर पाहायला मिळतात. कारण इथल्या वाघांना पाहिलं नसेल असा माणूस मिळणं विरळच! या अभयारण्यांपर्यंत जाणं इतर व्याघ्र अभयारण्यांच्या तुलनेने सोपं असल्यामुळे पर्यटक तिथेच वारंवार जातात.
आज माझ्या माहितीत असे अनेक जण आहेत ज्यांनी ताडोबाला ५० वेळा भेट दिली असेल, मात्र त्यांनी तामिळनाडूतील सत्या मंगलम राष्ट्रीय अभयारण्याचं किंवा छत्तीसगढमधील अचानक मार व्याघ्र अभयारण्याचं नावही ऐकले नसेल. किंवा ऐकले असेल तरी तिथे भेट दिलेली नसेल.
सत्या मंगलममध्ये सुमारे २० वाघ अस्तित्वात आहेत. निश्चित आकडा माझ्याकडे नाही; पण तिथे नक्कीच वाघ सुखाने नांदतायत. सांगायचा मुद्दा हा की त्याच त्याच व्याघ्र अभयारण्यांमध्ये जाऊन त्याच त्याच वाघांचे फोटो काढण्याचा, त्यांना त्रास देण्याचा हा सोस सोडून द्या. लक्षात ठेवा, पर्यटकांच्या सततच्या येण्या-जाण्यानेही अरण्यातील पर्यावरणाची हानी होत असते. तिथली शांतता नेहमीच भंग होत असते.
आपल्याकडील ४७ व्याघ्र अभयारण्यांपैकी जी फारशी प्रसिद्ध नाहीत, अशी अभयारण्यं निवडा, तिथे जा, तिथला निसर्ग व वन्यजीवन पाहा. पाहण्यासारखं, घेण्यासारखं खूप काही आहे आणि पर्यायही आहेत. पण गरज फक्त तिथे वळण्याची आहे. गरज आहे ती समतोल वागण्याची. त्याच त्याच सेलिब्रिटी व्याघ्र अभयारण्यांमध्ये होणा-या गर्दीवर उपाय हवाय.
आपल्याला व्याघ्र पर्यटनातून भरपूर देशी व विदेशी महसूल मिळतो. या देशी-विदेशी पर्यटकांना फारशा लोकप्रिय नसणा-या व्याघ्र अभयारण्यांकडे जाण्यासाठी उद्युक्त केलं तर तो महसूलही वाढेल. हाच या समस्येवरील उपाय आहे.
आपल्या देशात लाखोंनी वन्यजीवप्रेमी आहेत. या अभयारण्यांची चांगली प्रसिद्धी केली, तिथे पुरेशा सोयी केल्या तर पर्यटक तिथे वळतील. परदेशी पर्यटकही नवी अभयारण्यं पाहण्यासाठी उत्सुक आहेत. त्यांनाही उत्तेजन मिळेल व पर्यायाने विदेशी चलन भारतात येण्यालाही.
नव्या ठिकाणी जा याचा अर्थ तुम्ही कान्हा अभयारण्य कधीच पाहिले नसेल तरीही तिथे जाऊ नका असा नाही, तर कान्हा पाहून झाल्यावर उत्तर प्रदेशातील पिलभित अभयारण्यालाही कधीतरी भेट द्या. आज जिम कॉर्बेट पार्क असणा-या रामनगरमध्ये रिसॉर्टची भरमसाट गर्दी आहे. अशीच गर्दी कान्हा, रणथंबोर इ. सेलिब्रिटी पार्कभवतीदेखील आहे.
२५ वर्षापूर्वी ही स्थिती अशी नव्हती. मात्र लोकांनी याच व्याघ्र अभयारण्यांना वारंवार लक्ष्य केल्यामुळे ही स्थिती ओढवली आहे. त्यामानाने सुंदरबनसारख्या दुर्गम भागातील वाघ सुखात आहेत. कारण ते तिवरांच्या जंगलाच्या आड लपलेले आहेत; परंतु पेंच, बंदीपूर, नागझिरा, बांधवगढ अशा अतिच लोकाश्रय लाभलेल्या अभयारण्यांना हे सुख नाही. तिथे कायम असणा-या गर्दीमुळे प्रवेश परवान्याची समस्या ओढवते.
नव्या अभयारण्यांकडे पर्यटक वळले तर तीदेखील कमी होतील. खरं तर प्रत्येकच अभयारण्यातील निसर्ग व वन्यजीवन, हे खूप सुंदर व अनुभवण्यासारखं आहे. या लेखाच्या निमित्ताने तुम्हीही एक नवी सुरुवात करा व सेलिब्रिटी सॅन्क्च्युअरी नसणा-या एखाद्या व्याघ्र अभयारण्याला भेट द्या.

Wednesday, April 22, 2015

अरण्यभाषा


वारंवार जंगलांमध्ये भटकंती करायला जाणा-यांना तिथल्या वाटा, तिथला गंध, तिथला परिसर, तिथले आवाज हे एवढया ओळखीचे झालेले असतात की रात्रंदिवस कधीही, कुठेही ते अरण्य त्यांच्या मनात जिवंत असतं. अनेकदा शहरात राहूनही त्यांना त्या जगाकडून साद येत असते, तिथले आवाज ऐकू येत असतात. त्यांना खुळावून टाकणारी असते ही अरण्यभाषा.
आयुष्यात प्रथमच अरण्यात जाणारा शहरी मनुष्य, जंगलांमध्ये जगता जगताच प्राचीन झालेला तिथला स्थानिक आणि शहरातून एका प्रचंड ओढीने तिथे जाणारी व्यक्ती या तिघांमध्ये खूप फरक असतो. मात्र या तिघांनाही भारावून टाकते ती अरण्यभाषा. जंगलाच्या अंगाखांद्यावर खेळत मोठं झालेल्या आदिवासी किंवा इतर स्थानिकाला जंगलाची ही भाषा आपसूकच येऊ लागते.
शहरातून जाणा-या माझ्यासारख्या वन्यजीव व निसर्गप्रेमींना मात्र आजूबाजूचं हे अरण्य काय सांगतंय ते सरावानेच कळू लागतं. त्यासाठी अर्थातच तन-मन-धन ओतून जंगलांवर, तिथल्या वृक्षांवर, प्राणी-पक्ष्यांवर प्रेम करावं लागतं. ही प्रक्रिया खूप निरंतर आहे, पण एकदा का याचं वेड लागलं की ती थांबत नाही.
कधीकाळी पहिल्यांदा घाबरत, कोणाच्या तरी सोबतीने जंगलात पहिलं पाऊल टाकलेलं असतं तेव्हा सभोवतालच्या गर्द सावल्यांनी व अगदी गारव्यानेही अस्वस्थ केलेलं असतं, पण काही काळाने अशी वेळ येते की शहरात परतल्यावर अस्वस्थ वाटू लागतं. जीवाच्या आतमध्ये सारखं काहीतरी खोलवर जाऊन उसळून यावं असं होत राहतं; तो गारवा, त्या सावल्या, ते तळ्याकाठचे क्षण, ती सळसळ, ती शांतता पुन्हा पुन्हा अनुभवावी, ते सर्व काही आत्ता या क्षणाला आपल्या जवळच उभं राहावं असं वाटू लागतं आणि जंगलात पाऊल पडत नाही तोपर्यंत चित्ताला काही थारा लागत नाही.
तसं म्हटलं तर काय असतं तिथे, एखाद्या नवख्याने पाहिलं तर त्याला इथे झाडेच दिसतील; पण त्यावरचा नीळकंठ नाही दिसणार. दाट गच्च माजलेलं गवत-झाडोरा दिसेल; पण त्याआडचं भेकर नाही दिसणार. वेडंवाकडं पसरलेलं तळं दिसेल; पण त्या तळ्याच्या काठच्या चिखलात उमटलेल्या प्राण्यांच्या पावलांच्या खुणा नाही दिसणार. तिथल्या पाऊलवाटांना तो रस्ते म्हणेल, त्या खडकाळ रस्त्यांनी त्याचं अंग चांगलंच तिंबून निघेल आणि स्वत:कडे लक्ष देता देता त्याचं त्याच पाऊलवाटांवर पडलेल्या रानमेव्याकडे लक्षच जाणार नाही.
तिथली रात्र त्याला भीतीदायक वाटेल, तर एखाद्या अस्सल जाणकाराला त्या रात्रीच्या पडद्याआडून येणारे विविध हाकारे झोपू देणार नाहीत. कधी एकदा पहाट होतेय आणि बाहेर रानात जातोय असं त्याला होऊन जाईल. हे असंच असतं. जीव अस्वस्थ होऊ लागला, कासावीस होऊ लागला की आमच्यासारख्या भटक्यांना कोणती आस लागलीये ते आपोआपच समजतं. पावलं मग तिथेच वळतात.
शहरातल्या कृत्रिम सुगंधी श्वासांच्या कुबडया भिरकावून देऊन रानातला तो अरण्यगंध पुन्हा एकदा श्वासात मनमोकळा, हवा तेवढा भरून घेण्यासाठी धडपड सुरू होते. तो प्राणवायूच जणू असतो. तिथल्या सग्यासोबत्यांना भेटल्याशिवाय मग चैन पडत नाही. कॉर्पोरेट लॉबीत मऊ कारपेटमध्ये टाचा घुसवून चालणा-या जंगल भटक्यांना मग कधी एकदा तो पालापाचोळा पायाखाली येतोय असं होऊन जातं.
एकदा का जंगलात गेलात की तुम्हाला ते प्रेमाचा विळखाच घालतं. हा बंध मग आयुष्यभर सोडवत नाही. तिथेच मन भिरभिरत राहातं. तिथले आवाज कानात मग शहरात येऊन देखील कानात उमटत राहतात. हे आवाज अनोळखी असतात परक्यांसाठी, पण कायम जंगलवाचन करणाऱ्यांसाठी ती अरण्यभाषा असते. ती तिथली बोली असते. जिच्यात अनेकांची साद दडलेली असते.
ज्यावेळी जंगलात जाणं शक्य होत नाही त्यावेळी मनाला समजवावे लागते. असंच एकदा सहज मनाला गुंतवण्यासाठी आमिष म्हणून इंटरनेटवर जरा शोध घेतला. समोर आली ती प्रत्यक्ष या अरण्यबोलींची रेकॉìडग्स. आज इंटरनेटवर अनेक संकेतस्थळांवर कितीतरी पक्षी-प्राण्यांचे आवाज उपलब्ध आहेत. अर्थात त्यांचे नमुने हे मोफत ऐकायला मिळतात व बाकी ध्वनिमुद्रण हे विकत घेऊन ऐकावे लागते.
यात जगाच्या पाठीवरील अनेक जंगलांमध्ये टिपलेले आवाज आहेत. जंगलात गेल्यावर हेच आवाज निसर्गप्रेमींना नादावून टाकतात. ते मधुर बोल ऐकण्यासाठी जीव तहानतो. मात्र जाऊ शकत नसाल तर इंटरनेटवर तीही सोय आहे. पण ही सोय अशी सहजासहजी होत नाही. त्यासाठी वर्षानुवर्षे, तासन् तास, दिवस-रात्र अरण्यात मुक्काम ठोकावा लागतो.
शहरात बसून तुम्ही जंगलात भटकता म्हणजे तुमची मजा आहे बुवा असं वाटत असेल, तर असं सांगावंसं वाटतं की जंगलात जाऊन साऊंड रेकॉडिंग(ध्वनिमुद्रण) करणं ही मजा बिलकूल नाही. तिथे अथक कष्ट आहेत म्हणूनच त्याचे पैसे द्यावे लागतात. शिवाय तुमच्या दारापर्यंत आजकाल कोणतीही गोष्ट आणून ठेवली की त्याचे पैसे हे घेतले जातातच, मग हे तर थेट अरण्यातूनच आणलेले आवाज!
देशी-विदेशी वन्यजीव प्रेमी, अभ्यासक, संशोधक हे जंगलात जाऊन आवाज ध्वनिमुद्रित करतात. जंगली पक्ष्याचं पहिलं रेकॉìडग हे लुडविग कोह याने एडिसन फोनोग्राफवर १८८९ मध्ये केलं होतं. पण हे पिंज-यातील पाळीव पक्षी होते. मग युरोपात असं ध्वनिमुद्रण करण्याची लाटच पसरली. इंग्लंड, जर्मनी, अमेरिका, रशिया इ. देशांमध्ये कॅनरी बर्डस, नाईटिंगेल, थ्रश, ब्लॅकबर्ड, गार्डन वॅबलर असे कितीतरी आवाज पिंज-यात ठेवलेल्या पाळीव पक्ष्यांचे ध्वनिमुद्रित होऊन त्याच्या रेकॉर्डसही विकल्या जाऊ लागल्या.
हा प्रकार तेव्हा अत्यंत लोकप्रिय झाला होता. परंतु प्रत्यक्ष जंगलात जाऊन अशा आवाजांचं ध्वनिमुद्रण करण्याची सुरुवात केली ती बर्नी क्रॉस या अमेरिकन ध्वनिमुद्रण तज्ज्ञ व संगीतकाराने. एका सांगितीक आल्बमसाठी त्यांनी काही आवाजांचं प्रत्यक्ष जंगलात जाऊन ध्वनिमुद्रण केलं आणि तेव्हा मुळातच निसर्गप्रेमी असणा-या बर्नी यांना आपण हे सर्व आवाज ध्वनिमुद्रित करून ठेवले पाहिजेत असं वाटलं.
आजपर्यंत गेली ४५ वर्ष त्यांनी वन्यजीवन आणि निसर्गाच्या प्रेमापोटी सुमारे १५ हजार पक्ष्यांचे आवाज रेकॉर्ड केलेले आहेत. यात त्यांची मेहनत प्रचंड व वाखाणण्याजोगी आहे. बायोफोनी म्हणजे मनुष्याव्यतिरिक्त इतर नसर्गिक अधिवासातील आवाज, हा शब्द त्यांनीच निर्मिला. हे आवाज रेकॉर्ड करणं हे खूप कठीण आणि नाजूक काम आहे. आज पशू-पक्ष्यांचे त्यांच्या नैसर्गिक अधिवासातील आवाज ध्वनिमुद्रित करण्याच्या क्षेत्रात बर्नी क्रॉस हे अखेरचा शब्द मानले जातात.
परंतु अजून एका बाबतीत देखील बर्नी यांचे शब्द अखेरचे व चिंतादायक मानले पाहिजेत. ते म्हणतात की, मी ४५ वर्षापूर्वी जाऊन जी रेकॉìडग्स केलीत, त्यांच्यात आणि आज त्याच जागी जाऊन केलेल्या, त्याच पक्ष्यांच्या आवाजांच्या रेकॉìडगमध्ये खूप फरक जाणवतोय. हा सरळसरळ लोकसंख्या वाढल्याचा व मनुष्याचा निसर्गात होणा-या हस्तक्षेपाचा प्रभाव आहे.
कितीतरी पक्ष्यांच्या-प्राण्यांच्या प्रजाती त्यांना नष्ट होताना दिसल्या आहेत. ४५ वर्षापूर्वी ध्वनिमुद्रित केलेले आवाज आज ध्वनिमुद्रित करण्यासाठी उपलब्ध नाहीत. शिवाय त्याच जातीचा पक्षी आज सापडला तरीही त्याच्या आवाजाच्या दर्जात खूप फरक पडलेला दिसेल. या दोन्हींचं कारण म्हणजे आज पूर्वीच्या प्रजाती उरलेल्या नाहीत. त्यांच्यात घट होतेय.
मनुष्याने जंगलांची अपरिमित हानी चालवली आहे. त्यामुळे पूर्वीची गर्द अरण्यं आता उरलेली नाहीत. परिणामत: पक्षी-प्राणी नामशेष होत चाललेत. हा ‘ग्रेट अ‍ॅनिमल ऑर्केस्ट्रा’ लवकरच बंद पडेल असं बर्नी म्हणतात. जंगल हळूहळू शांत होतंय असा भीतीदायक इशारा ते देतात. हा इशारा जगभरातील तज्ज्ञ, निसर्गप्रेमी व अभ्यासकांनी दिलाय. तो खरा होऊ लागला आहे. वेळ आहे ती तुमच्या-आमच्या परिसरातील अरण्यं, वृक्षवल्ली, सागरकिनारे, तिथल्या पशू-प्राण्यांना वाचवण्याची.
This article was published in Prahaar Marathi Newspaper on 19th April 2015, here is the link http://epaper.eprahaar.in/detail.php?cords=14,1508,1450,2262&id=story4&pageno=http://epaper.eprahaar.in/19042015/Mumbai/Suppl/Page4.jpg

Tuesday, February 18, 2014

वाइन गुणिले पर्यटनाचं नफ्याचं गणित

                                                  

वाइन इंडस्ट्री आपल्या राज्यात स्थिरावली त्याला बरीच वर्ष झाली. आता वाइन पर्यटन म्हणजे वाइनरीज्मधली सहल लोकांना भुरळ घालतेय. वाइन पर्यटनाचं इथं बस्तान बसलं तर राज्यात परदेशी पर्यटकांकडून येणारा महसूलदेखील वाढेल. काळाची पावलं व लोकांचा कल पाहून वाइन इंडस्ट्री व राज्य शासनानेदेखील पर्यटन विकासात वाइन पर्यटनाला महत्त्व द्यायला सुरुवात केली आहे. अशीच एक सैर नाशिक जिल्ह्यातील ग्रोव्हर झाम्पा वायनरीची..

द्राक्षं काढणीचा हंगाम आला की नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्यातल्या काही गावातलं चित्र भराभर पालटतं. ऐन थंडीच्या दिवसातही उबेला बसायचं सोडून माणसं लगबगीनं कामाला लागतात. रस्त्यांवर द्राक्षमळ्यांची दिशा दाखवणारे बोर्ड ठोकले जातात. गावांची छान साफसफाई केली जाते. मळ्यातली कामं संपल्यावर माणसं पारावर बसून पाहुण्यांची वाट पाहायला लागतात आणि दर सीझनप्रमाणे पाहुण्यांच्या गाड्या रस्त्यावर धुळीचे फर्राटे सोडत गावात शिरतात. सहसा गावांमध्ये शहरी संस्कृतीला थारा नसतो असं म्हटलं जातं, पण द्राक्षाच्या लेकीचं माहेरघर असणा-या गावांमध्ये जेव्हा शहरी भागातले धनिक-वणिक येऊन ठेपतात, तेव्हा उत्तर-दक्षिण ध्रुव एकत्र आल्यासारखं वाटतं. त्यातूनच अशा प्रकारे दोन विभिन्न विश्वं एकत्र येतात. यातून काहींच्या गरजा पूर्ण होतात तर काहींना रोजगार मिळतो. राज्यातला वाइन उद्योग याचं एक उत्तम उदाहरण ठरला आहे. यातूनच आपल्याकडे काही वर्षापूर्वी वाइन पर्यटनाच्या एका वेगळ्या प्रवाहाची सुरुवात झाली आहे.
द्राक्षाचे मळे, त्यातच कुठेतरी सावली धरून टाकलेल्या शेड्स, भवतालचा खुला निसर्ग, हातात उंच, निमुळते, नाजूक असे काचेचे किणकिणाट करणारे वाइनचे ग्लास आणि त्यात मनमोहक रंगांनी डोळ्यांना व जिभेला सुखावणारी वाइन, असा सगळा माहोल वाइन इंडस्ट्री असणा-या गावांसाठी आता ओळखीचा झालाय. फ्रान्स, इटली, स्पेन, जर्मनी अशा काही देशांच्या पावलावर पाऊल टाकून महाराष्ट्रातील वाइन उद्योगांनीही हा प्रयोग सुरू केला आणि वेगळेपणा म्हणून सुरू केलेल्या या संकल्पनेचे आजकाल मोठे इव्हेंट होऊ लागले आहेत. यातलेच एक वाइन उत्पादक म्हणजे ग्रोव्हर झाम्पा वाइन्स. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीजवळ असणा-या सांजेगावात ग्रोव्हर झाम्पा वाइन्सचं विनयार्ड आहे. वैतरणेच्या पाण्यावर पोसलेले हे द्राक्षाचे मळे ४० एकर जागेवर पसरलेत. वॅले द विन प्रायव्हेट लिमिटेड आणि ग्रोव्हर झाम्पा विनयार्डस् याच्या संयुक्त मालकीची ही वाइन कंपनी आज देशातल्या वाइन उत्पादक कंपन्यांमध्ये दुस-या क्रमांकावर आहे.
ग्रोव्हर झाम्पा वायनरी सुमारे नऊ लाख लिटर वाइनचं उत्पादन दरवर्षी करते. त्यांच्या ब्रँडखाली झोम्पा, वन ट्री हिल रोड, ला रिझव्‍‌र्ह, शेने अशा काही व्हाइट, रेड, स्पार्कलिंग, रोझ वगैरे २६ प्रकारच्या वाइन्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत व निर्यातही होतात. देशातली दुसरी उत्तम वाइन कंपनी असणा-या ग्रोव्हर झाम्पानं २००५ मध्ये वॅले द विन कंपनीशी हातमिळवणी केली. त्यांच्या अनेक वाइन्सना देश-विदेशात पुरस्कार मिळाले आहेत. बंगळूरुमध्ये नंदी हिल्सवर त्यांचं ४१० एकरवर पसरलेलं विनयार्ड आहे. वाइन पर्यटन करण्यासाठी सांजेगावात आलेल्यांना द्राक्षांनी भरलेल्या बकेटमध्ये नाचायला मिळतं, त्याची गंमत घ्यायला शहरातून गाड्या भरून माणसं येतात. त्यांच्यासाठी सर्व उत्तम सुविधा इथं उपलब्ध आहेत. दोन दिवस मुक्काम करायचा असल्यास कॅम्पसाइटपण आहे. तसंच एक दिवसाची वीकेंड टूरदेखील आहे. ज्यात द्राक्षाच्या मळ्यातून फिरता येतं, वाइन टेस्टिंग करता येतं व असं बरंच काही करता येतं. शुल्क भरून या टूरमध्ये गेल्यावर द्राक्षाच्या बागायतीची माहिती, वाइन कल्चरची माहिती पुरवली जाते. विविध प्रकारच्या वाइन्सची चव चाखायला मिळते. वाइनचा कारखाना दाखवला जातो, ज्यात वाइन साठवली जाते, मुरवली जाते ती बॅरल रूम, टँक्स पाहायला मिळतात. विविध वाइन्स कोणत्या प्रकारच्या निरनिराळ्या द्राक्षांपासून बनतात, याची मनोरंजक माहिती मिळते. कारखान्यात फिल्टरिंग, बॉटलिंग, पॅकेजिंग इत्यादी प्रक्रिया बघायला मिळतात.
नाशिक जिल्हा भारताची नापा व्हॅली किंवा वाइन कॅपिटल मानला जातो. इगतपुरी पट्ट्यात उत्तम वाइन बनवणा-या कंपन्यांची विनयार्डस् आहेत. या सर्वानीच विनयार्ड पर्यटनाची कल्पना उचलून धरली आहे. लोकांकडून मिळणा-या पैशांपेक्षा त्यांच्याकडून होणा-या तोंडी प्रसिद्धीची या कंपन्यांना जास्त गरज आहे. आपल्याकडची विनयार्ड सहल इतरांपेक्षा वेगळी कशी करता येईल यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असतात. त्यातूनच मग वेगवेगळे वाइन फेस्टिव्हल्स आयोजित केले जातात. ग्रोव्हर झाम्पानेही सिनेतारकांच्या सह्या असलेल्या व देशातील काही उत्कृष्ट चित्रकारांची चित्रं असलेल्या वाइन बॉटल्सचा लिलाव करून यात नावीन्य आणण्याचा प्रयत्न केला. शहरातल्या कोणत्यातरी हॉटेलमध्ये जाऊन वाइन ऑर्डर करण्यापेक्षा प्रत्यक्ष वायनरीज्मध्ये जाऊन आराम करत, आवडीचं संगीत ऐकत वाइन चाखण्याची मजा निराळीच आहे. अर्थात त्यासाठी शहरातून थोडं लांब जावं लागतं, पण वीकेंड सहलींसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
राज्यातील ७२ वायनरीज देशातल्या एकूण वाइनपैकी ८० टक्के उत्पादन करतात. तीस हजार हेक्टर शेती वाइनसाठी लागणा-या द्राक्षांसाठी केली जाते.
एमटीडीसीकडूनही वाइन पर्यटनाला प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न होत आहेत. नुकतंच गेल्या वर्षी गंगापूर धरण परिसरात पर्यटन विकास करण्यासाठी जे ४० कोटी रुपये राज्य शासनानं मंजूर केलेत त्यात वाइन पर्यटनाचाही समावेश आहे. भविष्यात वाइन पर्यटनाला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यास या पर्यटन प्रकारातून मिळणारा महसूलही वाढेल, अशी वाइन उत्पादकांना आशा आहे. एकूणच वाइन इंडस्ट्रीमधल्या स्पर्धेची पताका आता वाइन पर्यटनानं खांद्यावर घेतली आहे. नाशिकशिवाय पुणे, बारामती, सातारा, अकलूजमध्येही वायनरीज् सहली आयोजित केल्या जात आहेत. विविध स्पर्धा, ग्राहकांना वाइनच्या किमतीत सवलत, काही वाइनरीजमध्ये राहण्याची सोय अशा काही आकर्षणांनी वाइन पर्यटनाला चांगले दिवस आणण्याचे प्रयत्न होत आहेत. वाइन पर्यटनानं एकाच वेळी व्यावसायिक व स्थानिकांसाठी रोजगार निर्माण केला आहे. एकट्या नाशिक जिल्ह्यात आणि आसपास ५० वायनरीज् आहेत. अकलुजला फ्रॅटेली वायनरी, बारामतीजवळ युबी ग्रुपची फोर सीझन्स वायनरी, नाशिक जिल्ह्यात शातो देओरी, यॉर्क वायनरी अशा कितीतरी वायनरीज् राज्यात आहेत. यातील ब-याच वायनरीज् वाइन पर्यटन सुरू करण्यासाठी उत्सुक आहेत, काहींनी ते आधीच सुरू केलं आहे. वाइन पर्यटनाचा जम बसायला थोडा वेळ लागतो आहे, कारण कोणतीही कल्पना रुजायला अर्थकारणाची त्यात मोठी भूमिका असते. राज्यातील वाइन इंडस्ट्रीचा बिझनेस पुन्हा जोमाने बहरला, तर वाइन पर्यटनालाही यशाचा रंग मिळू शकतो.
This article is published in www.prahaar.in on 16th February,2014 here is the link to published article http://prahaar.in/collag/184870