Translate

Thursday, April 23, 2015

सहप्रवासी


प्रवासाची खरी गंमत येते ती सहप्रवाशांसोबत. मग ते अनोळखी असोत किंवा ओळखीचे. थोडय़ाच काळासाठी आपले अनुभव, आपली सुख-दु:खं त्यांच्यासोबत वाटून घेताना आपण त्यांच्याशी दीर्घकाळाचं नातंच जणू जोडत असतो.
आपल्याकडे एक जुनी म्हण आहे की ‘केल्याने देशाटन, मनुजा येतसे शहाणपण’, अर्थात ही संस्कृत आधारित म्हण आहे. तिचा अर्थ असा की अगदी प्राचीन काळापासून प्रवासाचं, त्यातून मिळणा-या ज्ञानाचं महत्त्व आपल्या पूर्वजांनाही माहीत होतं. त्या काळी अनेक साधू-तपस्वी हे एकतर एकटयाने भ्रमणाला बाहेर पडत किंवा त्यांच्यासोबत त्यांचा शिष्यगण असे.
इतिहासाची पानं उलटली तर अनेक संशोधक हे असे फिरस्ते असल्यामुळेच त्यांना देशोदेशींची माहिती मिळालेली दिसते. इब्न बतुता, हुआंग झँग, असे काही विदेशी फिरस्ते तथा पंडित त्याकाळी भारतात येऊन गेले, देशोदेशी फिरले.
देशोदेशीचं नवल पाहणं हीच यांची मोठी कामगिरी असे. मग हे ज्ञान पुस्तक लिहून किंवा मौखिक गोष्टी सांगून लोकांना दिलं जात असे.
आजकाल हे काम इंटरनेट करतं. लोक प्रवासाला जाऊन येतात आणि मग त्याबद्दलच्या कित्येक गोष्टी आपल्या सग्यासोबत्यांना सांगण्यासाठी इंटरनेटचा वापर करतात. अशा तऱ्हेने आजकाल प्रत्येकच जण इब्न बतुता झालेला आहे. प्रवासाला बाहेर पडण्याचं प्रत्येकाकडे वेगवेगळे निमित्त असते.
कोणी चंदरतालला ट्रेकिंग करायला जातं तर कोणी रंगनथिट्ट पक्षी अभयारण्यामध्ये पक्षी निरीक्षणासाठी जातं, कधी कोणाला बोधगयाला जाऊन भगवान गौतम बुद्धांना ज्या झाडाखाली आत्मज्ञान मिळालं तो बोधी वृक्ष पाहण्याची उत्सुकता असते तर कोणाला महाबलीपुरमच्या मंदिरावरील अद्भुत शिल्पकला पाहायची असते. मात्र हे प्रवासाचं ध्येय निरनिराळं असलं तरी आपल्याला सतत भेटत राहतात ती माणसं.
विविध रंग, रूप, स्वभाव, भाषा यांचं मिश्रण घेऊन ही माणसं आपल्याला भेटतात आणि आपला प्रवास रंगतदार बनवतात. हाच तर कोणत्याही प्रवासाचा यूएसपी असतो. किंबहुना अशा व्यक्ती आणि वल्ली भेटल्याशिवाय प्रवासाची मजाच येत नाही. म्हणून तर कुठेही प्रवास करताना आपण सहप्रवासी कोण आहेत हे आधी पाहत असतो.
ते चांगले असतील तर पुढे सहप्रवाशांमुळे वेळ चांगला जाणार हे समजून आपला मूडही छान होतो. सहप्रवाशांशी ओळख होण्यासाठी वेळ लागत नाही. त्यासाठी अगदी लहानसं निमित्तही पुरतं. अशीच एकदा विमानतळावर मला एक गृहिणी भेटली, तिचा हा पहिलाच विमान प्रवास होता. त्यामुळे विमानात आपापली सीट कशी शोधायची हे तिला माहीत नव्हते  (हे अर्थातच पहिल्या विमान प्रवासात मलाही माहीत नव्हतं) तेव्हा मी तिला मदत केली आणि आमची ओळख झाली. अनेकदा एकटयाने प्रवास करताना सहप्रवासी वयस्कर असतील तर ते माझ्याकडे सहानुभूतीनेच पाहतात. मी एकटीच अमुक एका ठिकाणापर्यंत कशी जाणार याची त्यांना काळजी वाटते.
तेव्हा मला गंमत वाटते व छानही वाटते. कधीकधी तर घरी यायचे आमंत्रणही मिळते एवढी छान ओळख होऊन जाते. अशाच एका विमान प्रवासात माझ्या शेजारी सुतारकामासाठी बाळगतात तशी कंतानची पिशवी घेऊन आलेला एक कामगार येऊन बसला.
खूपच साध्या कपडयातला असा तो माणूस होता. सोबत त्याचे काही सहकारी देखील होते. त्यांना कुठे बसावं हे कळत नव्हतं म्हणून ते थोडे भांबावले. मी त्यांना त्यांच्या सीट्स दाखवल्या. पण माझ्या मनातील कुतूहल शमत नव्हते.  ही साधी माणसं विमानाने कुठे जात असावीत असा प्रश्न माझ्या मनात आला. कारण अजूनही खूप निकड असल्याखेरीज आपण मध्यमवर्गीय विमानासारख्या महागडया प्रवासावर पैसे खर्च करत नाही, तेव्हा ही श्रमिक माणसं विमानातून कुठे व का चालली आहेत हे मला जाणून घ्यायचं होतं.
माझ्या शेजारी बसलेल्या कामगाराला विचारल्यावर त्याने सांगितलं की एका बडया कंपनीचा एक मोठा प्रोजेक्ट दुस-या शहरात सुरू होता व तिथे त्यांना तात्काळ या माणसांची गरज होती त्यामुळे कंपनीने हा प्रवासखर्च केला होता.
काही का असेना, त्या निमित्ताने विमानप्रवास करण्याचा आनंद त्यांच्या चेह-यावर दिसत होता. असंच लक्षात राहिलेले एक जोडपे भेटले रामनगरला जाताना. तिथं जिम कॉब्रेट नॅशनल पार्क आहे. दिल्लीहून आम्ही रामनगरला जाण्यासाठी ट्रेनमध्ये बसलो. यातली पत्नी ही अँग्लोइंडियन होती तर पती अमेरिकन. हे दोघेही काबूल युनिव्हर्सटिीमध्ये कामाला होते.
मुलांना घेऊन ते तिच्या माहेरी शिवपुरीला चालले होते. त्यांच्याकडून अफगाणिस्तान व काबूलमधल्या ब-याच गोष्टी ऐकायला मिळाल्या. मी पत्रकार असल्याचं कळल्यावर त्यांची उत्सुकता अधिकच वाढली. मग नेहमीप्रमाणे गप्पा सुरू झाल्या. गाडी तीन तास उशिरा रामनगरला पोहोचली, मात्र त्यांच्या सहवासामुळे ते दु:ख थोडं कमी झालं.
अशी खूप मंडळी आपल्याला प्रवासात भेटत असतात. विशेष म्हणजे एखाद्या परक्या ठिकाणी भेटणारी ही मंडळी आपल्या गावातूनच आलेली असली तर त्यानंतर होणारा आनंद वेगळाच असतो. अर्थात हे सर्व आपल्या मनोव्यापारांशी निगडित आहे, अन्यथा आपल्या गावातली तरीही अनोळखी माणसं एखाद्या परक्या प्रदेशात भेटल्यावर आपल्याला का आनंद व्हावा हा प्रश्नच आहे.
परंतु प्राचीन काळात गटागटाने फिरणा-या आदीमानवाला त्याच्या गटातील माणसांबरोबर जी सुरक्षिततेची भावना वाटत असावी, तीच या आनंदापाठी असावी असं वाटतं. एकदा का आपला आनंद या अनोळखी मंडळींसोबत आपण शेअर केला की ती आपलीच माणसं होऊन जातात.
ही देखील समूहनिर्मितीचीच एक प्रक्रिया आहे. असाच आनंद मला व माझ्या वहिनीला, नागरहोलेच्या जंगलात फिरताना आमच्या विभागात राहणारी मंडळी भेटल्यावर झाला होता. मग गप्पांची, खाण्यापिण्याची देवाणघेवाण झाली. जंगलात फिरण्याचा आनंद द्विगुणित झाला. मात्र प्रत्येकच वेळी असा अनुभव येतो असं नाही. माणसं वेगवेगळ्या प्रकारची असतात.
कोहिमाजवळच्या किसामा गावात हॉर्नबिल फेस्टिव्हलमध्ये फिरताना अचानक माझ्या समोर िहदीमिश्रित मराठीत बोलणारी मंडळी आली. मी उत्सुकतेने त्यांची चौकशी केली, तर ही माणसं मुंबईहूनच आली होती. पण त्यांनी पुढे बातचीत करण्यात काही स्वारस्य दाखवलं नाही.
धागा न जोडताच तो तोडून ही माणसं गर्दीत मिसळून गेली. पण माझ्यासोबत काही स्थानिक माणसं होती, त्यांच्यामुळे मुंबईच्या माणसांनी पाठ फिरवल्याचं काहीच वाटलं नाही. अशा निरुत्साही लोकांमुळे आपण आपल्या आनंदाला कधीच दूर करू नये.
ही प्रवास आणि आयुष्यातली एक समानता आहे, कितीही वाईट अनुभवांनी आपलं जीवन झाकोळलं गेलं तरी त्यांना विसरून जाऊन आपण पुढे चालत राहावं. नाहीतर जीवनातील ख-या आनंदाला आपण पारखे होतो. त्याचप्रमाणे सहप्रवासी कसेही असोत, आपला प्रवास कसा छान होईल हे आपण पाहावं.
Here is the link for published article http://epaper.eprahaar.in/detail.php?cords=4,1508,1456,2258&id=story4&pageno=http://epaper.eprahaar.in/05042015/Mumbai/Suppl/Page4.jpg

No comments:

Post a Comment