भारतीय वन्य पर्यटनाचं सर्वात प्रमुख आकर्षण कोणतं असेल, तर ते आहे टायगर सफारी, म्हणजे जंगलामध्ये जाऊन वाघांना पाहणे. आजमितीला भारत हा जगाच्या पाठीवर वाघ उरलेल्या देशांपैकी एक महत्त्वाचा देश आहे, जिथे नसर्गिक अधिवासात २२२६ अशा अल्पसंख्येत का होईना, पण वाघ नावाचा प्राणी नमुन्यादाखल टिकून आहे. त्याचमुळे आज प्रत्येक वन्यजीव सहलींचा प्रमुख उद्देश हा केवळ पर्यटकांना वाघ दाखवणे हा झालेला आहे.
भारतातल्या एका प्रसिद्ध जंगलातली टायगर सफारी. हो, व्याघ्र अभयारण्यातील अशा सफारींना टायगर सफारी म्हणूनच लोक ओळखतात. कारण या सफारीचा उद्देशच मुळी लोकांना जास्तीत जास्त जवळून वाघ दाखवणे हा असतो. अशी सफारी सुरू होण्याआधी व्यवस्थित हवा तयार केली जाते. जंगलातील अमुक एका झोनमध्ये वाघ दिसलाय किंवा त्या दुस-या झोनमधली वाघीण तिच्या पिल्लांना घेऊन आताच पाणी प्यायला बाहेर पडली आहे वगरे गोष्टी त्यांच्या कानावर फेकल्या जातात.
जंगलात गेल्यावर कुठेतरी वाघाच्या पावलांचे ठसे दाखवले जातात. पर्यटकांची आतुरता ताणली जाते. त्यांच्यापैकी अनेकांनी वाघ अद्यापही प्रत्यक्ष पाहिलेला नसतो. त्यांच्यासाठी तो महत्त्वाचा क्षण ठरणार असतो. त्याचसाठी तर ते एवढया लांब शहरातून आलेले असतात. एवढंच नाही तर केवळ वाघ पाहण्यासाठीच त्यांनी रिसॉर्ट व टूरचे २५-३० हजार रुपये भरलेले असतात. अशा पर्यटकांना नाराज करून चालत नाही. मग त्यासाठी वाघाचा माग काढला जातो.
तो जिथे असेल तिथपर्यंत त्याचा पाठलाग पुरवला जातो. तासन् तास जंगलात जिप्सी टेहळणी करत फिरतात, एकाच जागी थांबून राहतात व एकदा तो सापडला की मग जीप्स आणि हत्तींच्या गराडयात त्याला कोंडून एखाद्या सर्कशीतला दाखवावा त्याप्रमाणे पर्यटकांना वाघ दाखवला जातो. प्रथमच वाघ पाहत असाल तर निश्चितच या राजिबडया, उमद्या जनावराच्या तुम्ही प्रेमात पडता. त्याचं हे पहिलं दर्शन मनावर कायमचं कोरलं जातं. अधिकाधिक वाघांना आपण पाहिले पाहिजे, अशी इच्छा मनात उत्पन्न होते.
भारतातील सुमारे १६६ राष्ट्रीय अभयारण्यांपैकी ४७ ही व्याघ्र अभयारण्यं आहेत. त्यातील काही खास वाघांच्या सोप्या दर्शनासाठीच प्रसिद्ध झालेली आहेत. एखाद्या देवस्थानाला असावी तशी तिथे कायम गर्दी असते. यात हौशे-नवशे-गवशे सर्व असतात. मग अशा ठिकाणांहून तिथल्या वाघांच्या कथा देशभरात पसरत असतात.
पण विचार करा की आजघडीला देशात जेवढे वाघ लोकप्रिय आहेत, त्यांची संख्या फक्त २५च्या आसपास आहे. त्यातही काही पिल्ले आहेत. उदाहरणार्थ रणथंबोरमधील टी १९ व तिची पिल्ले, बांधवगढचा बामेरा मेल, कान्हाचा मुन्ना, ही सर्व यादी काही २५-३०च्या वर जायची नाही. मग प्रश्न असा पडतो की देशात २२२६ वाघ असताना केवळ निवडकच वाघ लोकांना माहीत का व्हावेत? या विषयाकडे फार कमी वन्यजीव अभ्यासकांचे लक्ष गेलेले आहे.
अभयारण्यांची भटकंती करताना दरवेळेस हा प्रश्न मला सतावतो की पर्यटक त्याच त्याच निवडक लोकप्रिय झालेल्या व्याघ्र अभयारण्यांना का भेट देत आहेत? ४७ व्याघ्र अभयारण्यं असतानाही पर्यटक काही निवडकच ८-१० व्याघ्र अभयारण्यांना भेट देतात. हा सर्व लोकांनी व प्रसारमाध्यमांनी दिलेल्या प्रसिद्धीचा परिणाम आहे. त्यामुळे देशातील बाकीची व्याघ्र अभयारण्ये ही पूर्णपणे दुर्लक्षित राहिलेली आहेत.
महसुलाअभावी त्यांचा विकास पुरेसा होत नाहीये. अर्थात यात चांगली एक गोष्ट घडते ती म्हणजे तिथल्या वाघांची पर्यटकांपासून सुटका होते. त्यांना त्यांच्या स्वत:च्या जंगलात मनमोकळं वावरायला मिळतं.
शिका-यांसारखे त्यांच्या मागावर राहणारे पर्यटक तिथे नसतात. तिथल्या पर्यावरणाची हानी कमी होते. मात्र यातली दुसरी तोटयाची गोष्ट म्हणजे अशा जंगलांमध्ये तस्करांचा वावर वाढतो. जिथे पर्यटकांची फारशी चहलपहल नसते तिथे त्यांना वावरायला, चोरटी शिकार करायला रान मोकळं मिळतं.
पर्यटकांची जिथे गर्दी असते तिथे निदान दिवसाढवळ्या तरी असे प्रकार घडत नाहीत; परंतु ही अभयारण्यं एकीकडे पर्यटकांच्या गर्दीपासून मुक्त राहतात तर दुसरीकडे देशातील काही मोजक्याच व्याघ्र अभयारण्यांमध्ये पर्यटकांची, फोटोग्राफर्सची, वन्यजीव अभ्यासकांची गर्दी उसळलेली असते. ही व्याघ्र अभयारण्यं जणू सेलिब्रिटी पार्कस् बनली आहेत. या पार्कचे सेलेब म्हणजे प्रमुख आकर्षण आहेत ते तिथले वाघ. ज्यातील काही मोजक्याच वाघांची माहिती आतापर्यंत आपल्याला आहे.
वास्तविक २ हजारांच्या आसपास वाघ देशातील जंगलात असताना केवळ मोजक्याच वाघांवर पर्यटकांचे लक्ष केंद्रित असणं ही खरं तर चुकीचीच गोष्ट. पण ती घडते आहे. यामुळे त्या वाघांच्याही जीवनाला धोका पोहोचतो आहे. सदासर्वदा हे निवडक वाघ, त्यांचे कुटुंब यांच्यावर प्रसिद्धीचा प्रकाशझोत टाकला जातो. गर्दी त्यांच्यापासून हटतच नाही. या वाघांना नावंही देण्यात आली आहेत. जणू काही हे अभयारण्य नसून एखादी सर्कसच असावी.
बांधवगढ, कान्हा, कॉर्बेट, ताडोबा, पेंच, रणथंबोर अशा काही निवडक व्याघ्र अभयारण्यांमधील वाघांचे अक्षरश: लाखो फोटो आज इंटरनेटवर पाहायला मिळतात. कारण इथल्या वाघांना पाहिलं नसेल असा माणूस मिळणं विरळच! या अभयारण्यांपर्यंत जाणं इतर व्याघ्र अभयारण्यांच्या तुलनेने सोपं असल्यामुळे पर्यटक तिथेच वारंवार जातात.
आज माझ्या माहितीत असे अनेक जण आहेत ज्यांनी ताडोबाला ५० वेळा भेट दिली असेल, मात्र त्यांनी तामिळनाडूतील सत्या मंगलम राष्ट्रीय अभयारण्याचं किंवा छत्तीसगढमधील अचानक मार व्याघ्र अभयारण्याचं नावही ऐकले नसेल. किंवा ऐकले असेल तरी तिथे भेट दिलेली नसेल.
सत्या मंगलममध्ये सुमारे २० वाघ अस्तित्वात आहेत. निश्चित आकडा माझ्याकडे नाही; पण तिथे नक्कीच वाघ सुखाने नांदतायत. सांगायचा मुद्दा हा की त्याच त्याच व्याघ्र अभयारण्यांमध्ये जाऊन त्याच त्याच वाघांचे फोटो काढण्याचा, त्यांना त्रास देण्याचा हा सोस सोडून द्या. लक्षात ठेवा, पर्यटकांच्या सततच्या येण्या-जाण्यानेही अरण्यातील पर्यावरणाची हानी होत असते. तिथली शांतता नेहमीच भंग होत असते.
आपल्याकडील ४७ व्याघ्र अभयारण्यांपैकी जी फारशी प्रसिद्ध नाहीत, अशी अभयारण्यं निवडा, तिथे जा, तिथला निसर्ग व वन्यजीवन पाहा. पाहण्यासारखं, घेण्यासारखं खूप काही आहे आणि पर्यायही आहेत. पण गरज फक्त तिथे वळण्याची आहे. गरज आहे ती समतोल वागण्याची. त्याच त्याच सेलिब्रिटी व्याघ्र अभयारण्यांमध्ये होणा-या गर्दीवर उपाय हवाय.
आपल्याला व्याघ्र पर्यटनातून भरपूर देशी व विदेशी महसूल मिळतो. या देशी-विदेशी पर्यटकांना फारशा लोकप्रिय नसणा-या व्याघ्र अभयारण्यांकडे जाण्यासाठी उद्युक्त केलं तर तो महसूलही वाढेल. हाच या समस्येवरील उपाय आहे.
आपल्या देशात लाखोंनी वन्यजीवप्रेमी आहेत. या अभयारण्यांची चांगली प्रसिद्धी केली, तिथे पुरेशा सोयी केल्या तर पर्यटक तिथे वळतील. परदेशी पर्यटकही नवी अभयारण्यं पाहण्यासाठी उत्सुक आहेत. त्यांनाही उत्तेजन मिळेल व पर्यायाने विदेशी चलन भारतात येण्यालाही.
नव्या ठिकाणी जा याचा अर्थ तुम्ही कान्हा अभयारण्य कधीच पाहिले नसेल तरीही तिथे जाऊ नका असा नाही, तर कान्हा पाहून झाल्यावर उत्तर प्रदेशातील पिलभित अभयारण्यालाही कधीतरी भेट द्या. आज जिम कॉर्बेट पार्क असणा-या रामनगरमध्ये रिसॉर्टची भरमसाट गर्दी आहे. अशीच गर्दी कान्हा, रणथंबोर इ. सेलिब्रिटी पार्कभवतीदेखील आहे.
२५ वर्षापूर्वी ही स्थिती अशी नव्हती. मात्र लोकांनी याच व्याघ्र अभयारण्यांना वारंवार लक्ष्य केल्यामुळे ही स्थिती ओढवली आहे. त्यामानाने सुंदरबनसारख्या दुर्गम भागातील वाघ सुखात आहेत. कारण ते तिवरांच्या जंगलाच्या आड लपलेले आहेत; परंतु पेंच, बंदीपूर, नागझिरा, बांधवगढ अशा अतिच लोकाश्रय लाभलेल्या अभयारण्यांना हे सुख नाही. तिथे कायम असणा-या गर्दीमुळे प्रवेश परवान्याची समस्या ओढवते.
नव्या अभयारण्यांकडे पर्यटक वळले तर तीदेखील कमी होतील. खरं तर प्रत्येकच अभयारण्यातील निसर्ग व वन्यजीवन, हे खूप सुंदर व अनुभवण्यासारखं आहे. या लेखाच्या निमित्ताने तुम्हीही एक नवी सुरुवात करा व सेलिब्रिटी सॅन्क्च्युअरी नसणा-या एखाद्या व्याघ्र अभयारण्याला भेट द्या.
Here is link to published article http://epaper.eprahaar.in/ detail.php?cords=10,1368,1452, 2248&id=story4&pageno=http:// epaper.eprahaar.in/12042015/ Mumbai/Suppl/Page4.jpg
No comments:
Post a Comment