Translate

Sunday, April 26, 2015

पाऊस दाटलेला


पाऊस.. तुम्हा आम्हा सर्वाचाच आवडीचा. पावसाळा ऋतू सा-यांच्याच आवडीचा असावाच असंही काही नाही; पण ऋतू आवडीचा नसला तरी पावसातले काही क्षण तर अनेकांच्या निश्चितच आवडीचे असतात. विशेषत: ते प्रवासातले असतील तर ते खासच लक्षात राहतात.
बसमधून जाताना दुर्गापूरहून पुढे गेल्यावर वातावरण अचानक बदललं. घामटलेली हवा एकदम खूप सुखद व छान गार झाली. त्यामुळे बसमधल्या भयानक गर्दीकडेही माझं दुर्लक्ष झालं. पुढे जंगलाचा पट्टा लागला आणि मन अजूनच निवांत झालं. डोळेही निवले. बिष्णुपुरला उतरल्यावर एक क्षण आपण एखाद्या पुरातन नगरीतच उतरलोय, असा भास झाला. तिथं १५-२० मिनिटांच्या अंतराने अशी १६ व्या शतकातली अत्यंत अप्रतिम टेराकोटा मंदिरं आहेत.
दूरवर दिसणा-या मंदिरांकडे पाहतोय, एवढय़ातच पावसाचा शिडकावा अंगावर बसला म्हणून टांगा ठरवला आणि पुढे निघालो, पण पहिल्याच मंदिरापाशी उतरताना वरुणधारांचं जोरदार नर्तन सुरू झालं. जणू ही मंदिरं त्याच्या संगतीतच पाहावीत असा पण करूनच सोसाटय़ाचं थैमान घालत पाऊस चाल करून आला. अखेर आम्ही टांगा सोडला आणि पायी चालायला सुरुवात केली.
ही मंदिरं, त्यांचं कोरीवकाम, शिल्पकला, वास्तुरचना हे सर्व त्या पावसात पाहताना एक वेगळाच अनुभव आला. थोडा वेळ जास्त लागला, पण असं वाटलं की गेली चार-पाचशे वर्षाच्या पावसाला तोंड देत ही मंदिरं कशी उभी टिकून राहिली याचं एक प्रात्यक्षिकच जणू पाहायला मिळालं. वाटलं की, त्यांच्या रंध्रातून निसटणारं ते पाणीदेखील दरवेळी तितकंच पुरातन होऊन बाहेर पडत असेल.
धुवांधार पाऊस पडत असताना फिरण्याची मजा अशी काही औरच आहे. कौतुक म्हणून नाही सांगत, पण खरंच पावसाळ्यातलं फिरणं हे इतर दिवसांपेक्षा वेगळंच असतं. पावसाळा हा मनाला हुरहूर लावणारा ऋतू आहे, अशा पावसात जर प्रिय व्यक्तीपासून दूर कोणत्या ठिकाणी असाल तर आता तिथे कसा पाऊस पडत असेल याचे विचार नक्कीच मनात येऊ लागतात. पावसातला प्रवास प्रिय व्यक्तीसोबत असेल तर ठीक आहे; पण नसेल तर मन कधीचंच त्या मेघांवर स्वार होऊन पाहिजे तिथं पोहोचलेलं असतं.
मुंबईकर निसर्गप्रेमींची पाऊस सुरू झाला की, जवळच्या ट्रेकला किंवा जंगलात जायची लगबग सुरू होते. आंबोलीला जाणार का, येऊरला येणार का किंवा चोरला घाटाला जायचं का, अशा चर्चा भटक्यांना जागं करतात. मुंबईत राहून पाऊस अंगावर घेण्याची कल्पना अस्सल भटक्यांना सहन होत नसते. अर्थात, यात वन डे पिकनिकवालेही असतात, ज्यांची धाव एखाद्या रिसॉर्टपर्यंतच असते. इथं शहरात मात्र लोकलने जाताना बाहेरची हिरवाई, डोंगरावरले ढग पाहून मन कळवळत राहतं. अनेक जण पावसाळ्यात बाहेर पडणं टाळतातच.
खरं तर अडचणींनी भरलेला पावसाळ्यातला प्रवास तुम्हाला धडे शिकवून जातो. आपल्यापैकी कोकणात जाणा-या अनेकांनी गाडी दोन स्टेशनांच्या मध्ये पाच-सहा तास रखडल्यावर असा अनुभव घेतलाही असेल. पण काही जण अशा रखडलेल्या गाडीतूनही बाहेर उतरून मस्तपैकी टेहळण्याचा आनंद घेतात. तात्पर्य हेच की कुठेही किंवा कोणत्याही वाहनातून जात असाल; परंतु अडचणींमधूनही फिरण्याचा आनंद घेता येऊ शकतो. त्यातही एक वेगळी मजा आहे. जबलपूर स्टेशनला प्रवाशांना थांबण्यासाठी उत्तम खोल्या आहेत, याचा शोध अशाच एका रखडलेल्या प्रवासात लागला होता. मध्य प्रदेशमधल्या याच दिवसांत पावसाळी भटकंती घडली ती बांधवगडला गेल्यावर. एका संध्याकाळी आकाशातलं मळभ पाहून सर्वानीच सफारी अर्धवट ठेवून मागे फिरण्याची घाई सुरू केली.
आमच्या गाईडनं विचारलं की, तुम्ही परत जाणार का? अर्थातच आम्ही परतण्याच्या मूडमध्ये नव्हतो, म्हटलं मस्त पाऊस दाटून आलाय आणि अशा वेळी जंगल फिरण्याचा, ते अनुभवण्याचा मोका कोण सोडेल बरं..? पाऊस येत असताना खरंच अगदी ‘डिस्कव्हरी’ वगरे चॅनेलवर फास्ट एडिटिंग करून दाखवतात तसं भराभर वातावरण पालटत जातं. झाडांच्या सावल्या अधिकच गर्द होतात, आधीच संमिश्र गंधांनी भरलेल्या त्या अरण्यात मग मृद्गंधही येऊन मिसळतो आणि क्षणार्धात ते हिरवंगार जंगल ओलं कंच होऊन ठिबकू लागतं.
वाटेतली निथळणारी बांबूची बेटं नवे रंग दाखवू लागतात. असा कोणत्याही जंगलातला पाऊस अनुभवा आणि त्याची तोडही तुम्हीच शोधा, परंतु काही जंगलातला पाऊस मात्र तिथल्या रहिवाशांसाठी दुर्दैवी असतो. कारण तिथं येणारे पूर. काझीरंगाच्या जंगलात उभं असताना इथं काही दिवसांपूर्वीच पावसानं किती उत्पात घडवला असेल या विचाराने वाईट वाटून गेलं. काझीरंगा, मानस, पवित्रा, नामदफासारखी अरण्यं पावसात बाकीच्या दिवसांमध्ये जेवढं काही मिळवलं असेल ते हरवून मोकळी होतात. म्हणूनच तो प्रत्येक ठिकाणी सोज्वळ असतोच असं नाही.
कुर्गला जाताना छान वळणावळणाचा घाटरस्ता आहे. तसाच तो साता-याला जातानाही आहे. अशा घाटरस्त्यांची पावसाच्या दिवसांमध्ये श्रीमंती वेड लावणारी असते. खिडकी मिळाली असेल तर अधिकच बहार. मग खिडकीत बसून पावसाचे टपोरे थेंब नाकावर जोराने बसत असले आणि गार वारा अंगाला झोंबत असला तरीही (शेजारी खिडकी बंद करा हो, असं सांगत असतानाही वेळकाढूपणा करत) बाहेर पाहण्यातली मजा वेगळीच असते. अशा वेळी प्रवासाला किती वेळ लागतोय, याचा हिशेब आपण ठेवत नाही. कारण मन गुंगलेलं असतं.
पण हाच जर का उन्हाळा असेल तर आपण किती वैतागतो. खिडकीप्रेमी लोकांची प्रवासात आणखीच मजा येते. त्यांना कोणत्याही ऋतूत, कोणत्याही वाहनात कायम खिडकी हवीच असते, बाहेरची दृश्य पाहण्यासाठी. मग ती मिळवण्यासाठी त्यांचे विविध उपाय असतात. असो. तो एक वेगळा विषय आहे. अर्थात बाईकवरचा प्रवास असेल आणि तोही पावसातला तर अजूनच धमाल.
मग तर पावसाचे थेंब असले जोरदार लागतात की मुश्कील होते, पण तरीही प्रवासाचा मूड प्रसन्न करून सोडणारा पावसासारखा दुसरा ऋतू नाही हे आपलं माझं मत. कारण अनेक जण हिवाळ्यात प्रवासाला अधिक पसंती देतात, हे माहितेय मला. पावसानं फिरायला अडवलं तरीही तो मला नेहमीच भावलाय. अशीच एक लक्षात राहिलेली पाऊसवेळ होती ती ब्रह्मपुत्रेवरली.
बोटीवर असताना तुफान पावसाला सुरुवात झाली. मोठमोठे थेंब नाजूकपणा सोडून राक्षसी धसमुसळेपणा करत होते. जोरदार वारा बोटीला हलवत होता. त्या सटासटा लागणा-या मोठाल्या पावसाने आम्हा सर्वाना आत पळवलं. अर्थातच बोटीवर आचारी चहा-पकोडे करून द्यायला तयारच होते. वा-यामुळे विस्तव नीट राहत नव्हता, तरीदेखील त्यांनी कष्टाने प्रवाशांची हौस भागवली आणि त्या प्रवासाची लज्जत वाढवली.
भारत उष्ण कटिबंधीय प्रदेश असल्याने इथला पाऊसही लहरी आहे आणि विशेषत: तो पूर्वोत्तर भागात जास्त लहरी आहे. कोणत्या एखाद्या ऋतूमुळे तुमच्या अख्ख्या प्रवासाची दिशा बदलू शकते तर तो पाऊस आहे. एकाच वातावरणात आपल्याला उष्मा, थंडी आणि पाऊस असा सर्व अनुभव देण्यात तो वाक्बगार आहे. तरीही अनेकांच्या अविस्मरणीय प्रवासातला एक तरी प्रवास हा पावसातला असेलच असेल, अशी माझी खात्री आहे.
Here is the link for published article http://epaper.eprahaar.in/detail.php?cords=6,74,936,1346&id=story3&pageno=http://epaper.eprahaar.in/01022015/Mumbai/Suppl/Page5.jpg

No comments:

Post a Comment