Translate

Wednesday, May 6, 2015

वेळ चुकवून पाहा..


बारा वर्ष, बारा महिने वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याचा संकल्प सोडा; पण एका अटीवर. कोणत्याही निश्चित वेळी एखाद्या ठिकाणी ठरवून जायचं नाही. शक्यतो वेळ चुकवायचीच. अनेकदा वेळ चुकल्याने तुमच्या अनुभवांना वेगळीच खोली मिळून जाते. काही अविस्मरणीय अनुभव येतात.
मी मागे म्हटलं होतं की ऋतुचक्राशी किंवा घडय़ाळाशी स्वत:ला बांधून घेऊ नका. अमुक वेळीच अमुक ठिकाणी जाईन असं म्हटलंत तर तुम्हाला जे दिसेल ते कदाचित घरातल्या फ्लॅट स्क्रीन टीव्हीएवढाच आनंद देणारं असेल. भटकायलाच जायचं असेल तर कोणत्याही ठिकाणी जायचा शिरस्ता पाळू नका. कुलूमनालीला मे महिन्यातच जाल तर इतर महिन्यांत तिथलं सौंदर्य थोडी कमी होतं? जसं दिवस उजाडल्यावर पक्षीनिरीक्षण कठीण असतं. पक्षी पाहायचे असतील, त्यांचं गाणं ऐकायचं असेल तर पहाटेसारखी अप्रतिम वेळ नाही. पण कधीतरी संध्याकाळीही घरटय़ात परतण्याची त्यांची लगबग पाहा. इतर वेळीही आवडती ठिकाणं अनुभवून बघा. ती तेवढीच सुंदर असतात. शिवाय ऑफ सीझनला जाण्याचे फायदे मिळतात ते वेगळेच. पण केवळ त्याचसाठी नाही तर ऋतूंमधलं वैविध्य पाहण्यासाठी जा. माझ्या अनुभवानुसार काही ठिकाणचे गाईड त्यांना जायचं नसेल तर ‘इस जगह मे जाना वेस्ट ऑफ टाइम है’ वगैरे ऐकवतात. अशा वेळी स्वत:चं लॉजिक लावा आणि निर्णय घ्या. इतर वेळचे दुस-या प्रांतातील ऋतू अनुभवून पाहा. काही ठिकाणी नक्कीच ते कठीण आहे; मात्र आपल्या नजरेला त्या त्या ठिकाणाचं एक रुटीन वैशिष्टय़ पाहायची सवय झाली आहे. ती मग मोडता येते. कधीतरी वेळाही चुकवून पाहा. त्यातही गंमत असते.
कॉब्रेटच्या जंगलात फिरताना एक दिवस मी खोलीवर थंडीत गुडूप झोपून गेले होते व साडेपाचला माझा ड्रायव्हर उठवायला आला. म्हणाला, आता फक्त अर्धा तासच उरलाय. तेवढा वेळच फिरून येऊ. म्हटलं ठीक आहे. सहाला बाहेर पडलो. गेलो सीताबनीच्या जंगलात. तिथं प्राण्यांचे अलर्ट कॉल सुरू होते. जंगलातून गाडय़ा परतत होत्या. वाटेत फॉरेस्टची माणसं भेटली. ती म्हणाली, ‘जास्त पुढं जाऊ नका. एकतर संध्याकाळ होऊन गेलीय. तुम्ही येणार तरी कधी परत आणि या एरियात वाघीण फिरतेय, हे कॉल तिच्यासाठीच आहेत.’ त्यावेळेस पायानं लंगडी झालेली एक वाघीण तिथं आसपासच्या गावात फिरत होती. मी परत मुंबईला आल्यानंतर बातमी कळली की, तिनं एका बाईला उचललं होतं. एव्हाना साडेसहा वाजून गेले होते.
ऐन डिसेंबरमधली ती भर्रकन काळोख पांघरून घेणारी संध्याकाळ. आम्ही तर नुकतेच जंगलात शिरलो होतो. तिथं सुंदरसा छोटा वळणावळणाचा घाटासारखा वाटणारा रस्ता आहे. अगदी पाहात राहावा असा. मात्र तो रस्ताही मागे केव्हाच काळोखात बुडत आलेला. तरी आम्ही शेवटल्या धूसर प्रकाशात गाडी जेवढी पुढे नेता येईल तेवढी नेली. भंडारपानी गेटच्या जवळ पोहोचल्यावर ड्रायव्हर म्हणाला, ‘‘मॅडम अब बस हो गया, अभी वापस चलेंगे. आप को डर नही लगता क्या?’’ मग आम्ही परतू लागलो. आता तर पूर्णच काळोख झालेला. पुन्हा एकदा झाडा-झुडपांमध्ये भास व्हायला लागले. गवताची पाती जरा जास्तच सळसळतायत असं वाटू लागलं. जीपच्या मागच्या रस्त्यावरून जरा मोठा आवाज आला की आम्ही चहूबाजूने पाहू लागलो. एकतर ती उघडी जीप. गार झोंबणारा वारा. तिच्यावर छतही नव्हतं. सीताबनीचं जंगलही एकाच भूप्रदेशात असल्यामुळे कॉब्रेटसारखंच गवताळ आणि म्हटलं तर मेन पार्कपेक्षा अधिकच मस्त. पण हे सर्व तेव्हा परतताना नव्हतं जाणवलं. कारण मनात भीती साचत चालली होती. अखेर आम्ही बफर झोनबाहेर गावच्या रस्त्याला लागलो व कंदील घेऊन चालणारे गावकरी भेटू लागले. तेव्हा कुठे हायसं वाटलं.
मध्यंतरी एका हिलस्टेशनला गेले होते. तेव्हा तिथं अजिबात गर्दी नव्हती. गावही कसं निवांत पडलं होतं. कोणालाच कसलीही घाईगर्दी नव्हती. माणसं बिझी नसल्यामुळे बोलायला मोकळी होती, मोकळी होऊन बोलत होती. चालाय-फिरायला रस्ते मोकळे होते. असाच निवांतपणा मिळाला तो पचमढीला. आम्ही नेमके पचमढी गाव बंद असणा-या दिवशी जाऊन पोहोचलो होतो. त्यामुळे एखादं पर्यटकांनी एरवी गजबजलेलं गाव शांतता कशी पांघरून घेतं, हे जाणवलं. जंगलात असताना कधीही ठरवून चालू नका की, आता या वेळेस आपल्याला अमुक एक प्राणी दिसेल. तसं कराल तर घोर अपेक्षाभंग होईल. उलट डोक्यात कोणत्याही कल्पना न ठेवता जाल तर नक्कीच काहीतरी पाहायला मिळेल. माझ्या जंगल सफरींमध्ये मला भालू, वाघ, बिबटय़ा, रानकुत्री हे सर्व असेच अचानक भेटले आहेत. नागझिराला गेल्यावर सर्वच जण रानकुत्र्यांच्या मागे होते. तिथं चिक्कार रानकुत्री दिसतात. भालूही दिसतात. पण आम्ही गेलो तेव्हा दोन-तीन दिवस भालू कुठे गडपच झाले होते. आणि अखेर जायच्या दिवशी सकाळी आमच्या समोर एक अस्वल कितीतरी वेळ येऊन चालत राहिले. बांधवगढला भेटलेल्या बामेरा मेल वाघासारखी.
प्रवास करताना सतत मनात काहीतरी शोध असू द्यात. आजूबाजूच्या निसर्गाशी बोला, माणसांशी बोला. बरंच काही सापडेल. माझी काही वर्षापूर्वी बरीच इच्छा होती की हॉर्नबिल प्रत्यक्ष जंगलात पाहावे; पण योग आला नव्हता. असंच एकदा गावी माल्रेश्वरला गेलेले असताना माझ्या घराच्या समोरच्या झाडावर येऊन एका संध्याकाळी अवचित धनेश येऊन बसले व माझी इच्छा पूर्ण झाली. त्यानंतर दांडेलीच्या जंगलातल्या दरीत विहरणारे हॉर्नबिलदेखील पाहिले. मला हा अमुक प्राणी-पक्षी पाहायचा आहे, हे तुम्ही निसर्गाला सांगू शकत नाहीत आणि निसर्ग काही माणूस नाही जो तुमचं ऐकेल; पण थोडा धीर दाखवला तर निश्चितच काहीतरी गवसतं. म्हणूनच त्यासाठी वेळकाळ ठरवून जाऊन उपयोगी नाही. हे जे अद्भुत असतं ते कधीही घडू शकतं. पश्चिम बंगालच्या अगदी ग्रामीण भागात असणारं एक खेडं बेलून. तिथं गेल्यावर माझा वन्यजीव संशोधक मित्र म्हणाला की, आता आपण संध्याकाळी बाहेर पडू. मी म्हटलं, अरे नाही असं कसं संध्याकाळी काळोखात बाहेर जाणार? मनात लहानपणापासून संध्याकाळी-रात्री वगरे मुद्दामहून शेतात, जंगलात जाऊ नये असं ठसवलेलं वर येऊ लागलं. अखेर त्याच्या आग्रहामुळे सुमारे साडेसहा-सातला शेतं ओलांडून जंगलात गेलो. तर शहरात कधी न पाहिलेल्या नवलाईच्या गोष्टी समोर येऊ लागल्या. संध्याकाळी घरटय़ात परतणारे अनेक पक्षी पाहायला मिळाले. कोल्हे, जंगल कॅट, मुंगूस व इतर अनेक जंगली निशाचर प्राणी त्यांच्या वेळेनुसार बाहेर पडत होते. ते पाहायला मिळाले. आम्ही एका ठिकाणी मुक्काम ठोकून बसलो. तिथून आम्हाला सारं काही दिसत होतं. समोर नदी होती. एरव्ही मी जंगल पाहिलं ते सूर्यास्ताआधीचं, दिवसाकाठी असं सुरक्षित वेळेत. पण हा अनुभव काही वेगळाच होता. ऑफबीट पायवाट पकडा, वेळ चुकवा आणि बिनधास्त जा. नेहमीच संकट येतं असं नाही, त्या दृष्टीने तयारी ठेवून मगच वाटल्यास पाऊल टाका. आपल्यापैकी अनेकांनी हे केलंही असेल. त्यांना जरूर यातली गंमत कळली असेलच.
Link for published article http://epaper.eprahaar.in/detail.php?cords=684,74,2436,1040&id=story6&pageno=http://epaper.eprahaar.in/26012015/Mumbai/Suppl/Page4.jpg

No comments:

Post a Comment