Translate

Wednesday, May 6, 2015

पाऊलखुणा


धावपळीच्या आयुष्यात आपण अनेक गोष्टींना विसरून गेलेलो असतो. आपण जगतोय तीच आपली जीवनशैली असा आपण एक समज करून घेतलेला असतो. अशा चाकोरीतून थोडं बाहेर पडलं की आपलंच आपल्याला नवल वाटू लागतं. या नवलामधूनच काहीशा वेगळ्या विचारांनाही जाग येते.
१०:३०
हळूहळू लाल मातीच्या रस्त्याने चालायला सुरुवात केलीय. रस्ता कुठे जातो तेही माहित नाही. त्यामुळे उमटलेली पावलं पाहात चालणं सुरू होतं. अनेकदा आयुष्यात असंच आपल्याला दुस-यांवर विसंबून राहावं लागतं. रस्त्यावर सोबतीला अनेक वाटसरू दिसत होते. मात्र ते नेमके कोणत्या दिशेने जातील हे मलाही माहीत नव्हतं. त्यामुळे त्यांच्यामागून गेल्यावर ते माझ्याच इच्छित स्थळापर्यंत जाणारे असतील याचा भरवसा नव्हता. मग काय..आजूबाजूच्या पायवाटांचा अंदाज घेत चालणं सुरू होतं. सोबतीला फक्त माझ्याच पावलांचा आवाज आणि बाजूला झाडावरून उडया मारणा-या माकडांचे आवाज, बाकी काही नव्हतं. चालायला सुरुवात केल्यावर थोडावेळ काहीसं विचित्र वाटलं, चुकल्याचुकल्यासारखं वाटलं. काय मिसिंग आहे ते कळायला काही वेळ लागला. मग लक्षात आलं की इथं भलतीच शांतता आहे. एवढया शांततेची आपल्याला सवय नाही. मनात आलं ही एवढी शांतता इथं मुळात टिकून तरी कशी राहिली? शहरातला गोंगाट, कोलाहल हा कानावर कितीही गच्च हात दाबून ठेवले तरी भेदून आत शिरतच राहतो. याउलट या वाटेवरली, या परिसरातली ही शांतता. हळूहळू डोळ्यांवर झापड यावी तशी अंगात भिनत चालली होती. शहरापासून दूर आल्यावर कुठेही डिटॉक्सिफिकेशनची प्रक्रिया काही लगेचच सुरू होत नसते. थोडा वेळ जावा लागतो. तशाच प्रकारे इथं आल्यावर कानात गच्च साठलेले शहरी आवाज विरघळून त्यांच्या जागी निशब्द शांतता भिनायला काही अवधी लागतो, मग ती मुरत जाते. तिची सवय व्हायला लागते. मुंबईपासून अवघ्या काही तासावरचं हे गावपण मुंबईत मिळणार नाही अशी लाखमोलाची मन:शांती इथं मिळते. गिरिस्थानी असलेल्या या शहराचं हे प्रमुख आकर्षण असायला पाहिजे पण ते तसं नाहीये. कारण शहरी पर्यटक त्याच्यासोबत कायम शहरातल्या गोष्टी घेऊन फिरत असतो म्हणून त्याला इथल्या शांततेचं अप्रूप वाटत नसावं.

 २०:१५
निस्तब्ध जंगल..दुतर्फा झाडी न् अलवार पसरत गेलेला काळोख. काळोखाच्या या रंगातही एक लयबद्धता जाणवतेय. संध्याकाळची ही नीरवता सा-या आसमंतावर पसरलीय. थोड्या वेळाने लाल रस्ताही पायाखालून दिसेनासा झाला तेव्हा म्हटलं अंधार चांगलाच साकळलाय. डोळे पायाखाली काही साप-किरडू येत नाही ना ते पाहतायत. या अशा वेळी लांबचलांब वाटणारा जंगलातला रस्ता. तोही एकटय़ानेच चालायचा. अवचित काळोखातून भरधाव टापांचा आवाज येतोय. अंधारात एकतर काय समोर येईल याचा अंदाजही लावता येत नाहीये. घोड्यांच्या टापांचाच आवाज तेवढा कानापर्यंत पोहोचलाय पण नजरेच्या टप्प्यात घोडा काही आलेला नाही. घोड्यावर नक्की कोण असेल, मग त्याचा आवाज का नाही येत असा विचार मनात आला. सर्रकन डोळ्यांसमोर हॉलोमॅनमधला अश्वधारी येतो. आता पुढय़ात काय येईल ते पाहण्याची उगाचच उत्सुकता लागते. याच विचारात गुंतून बॅटरी बाहेर काढणार तेवढय़ात तो अंधारात बेमालून मिसळून गेलेला घोडा भरधाव शेजारून निघूनही जातो. नवलच वाटतं. कोण होतं त्यावर हे पाहायलाच हवं होतं असं वाटत राहतं. पुन्हा त्याची व माझी दिशा विरूद्ध त्यामुळे पुढं जाऊन त्याला गाठण्याचाही प्रसंग येणार नव्हता. चला..तेवढीच हॉटेलच्या वाटेवर थोडी सोबत झाली!

 १२:४५
कोणीतरी शार्लोट लेकला जाणारा रस्ता दाखवलाय. किती जवळ आहे किती लांब हे कळायला मार्ग नाही त्यामुळे रस्ता नेईल तिथं जायचं. गावात पर्यटकांची गर्दी नाहीच. रस्त्याने सोबतीला झाडं, न दिसणारे पक्षी व त्यांचे घुमणारे आवाज. झाडं सरळसोट उंच त्यामुळे पाखरांचं गाणंच फक्त ऐकू येतं. श्वासात मिसळणारा गंधभरला रानवारा. बाजूने मोठा ओहोळ वाहत असावा पण दिसत तर नाहीये खरा. त्याचा थांग लावता लावता अचानक समोर रस्ता संपून पालापाचोळा पडून हिरवट झालेला एक छोटा डोहच येतो. तो कुठे संपतोय पाहावं, तर समोर मोठा तलाव दिसतो. या तलावाला केंद्र करून एक छान मोठी रपेटही मारता येते जंगलातून. तलावाच्या बाजूला छोटय़ा बंधा-यातून पाणी सोडलंय, लोकांना पाण्यात खेळण्याचा आनंद घेता यावा म्हणून. तलाव पार केला की पुन्हा दोन फाटे. आता यातल्या कोणत्या रस्त्याने जावं, असा प्रश्न पडतो. त्यातल्या त्यात थोडा माणसाळलेला वाटणारा रस्ता पकडून चालणं सुरू ठेवायचं. निमर्नुष्य असण,ं ही या पायवाटांची खासियतच असावी. बाजूला बंगले आहेत पण तिथं जाग नाही. रस्ता चुकला तरी लांबवर विचारायला कोणी नाही. मग दगडावर बसून थोडी विश्रांती घ्यायची आणि एखाद्या गावक-याची नाहीतर घोडेवाल्याची वाट पाहायची. इथं पाटय़ा तशा कमीच. एकदाच सुरुवातीला अमुक एका पॉईंटला हा रस्ता जातोय असं बाणाने दाखवलं की, झालं काम. मग पुढे तुमच्या अंदाजाने चालत राहायचं. हरवला नाहीत तर तुमचं नशीबच म्हणायचं.

 ७:३०
तीन बेंच टाकलेला हा गर्द झाडीत लपलेला रस्त्याचा कोपरा..वाटचालीचा असूनही सुस्त अजगरासारखा पडलेला. तीन रस्ते इथं येऊन मिळतात. पुन्हा त्या रस्त्यांना वर जंगलात जाणा-या असंख्य पायवाटा फुटतात. बेंचशेजारची चौकी वापर होत नसल्याने रिकामी पडलीय. खालून रेल्वे लाईन जाते. त्यापलीकडे दरीच. इथं निवांत बसून दिवसभरात पुढं काय करायचं त्याचं प्लॅिनग करता येतं. अनाहूत पाहुणा दिसला की पाखरं व माकडं थोडा कल्ला करतात, नंतर आपण त्या चित्रात मिसळून गेल्यावर ती दुर्लक्ष करतात. मधूनच कधी खाली गावातून जड ओझं हातगाडीवर ढकलून वाहून आणणा-यांचे दम घेतानाचे आवाज लांबवरून खालूनच घुमत येतायत. वर गावात यायचं म्हणजे पूर्ण चढणीचा आणि खडकाळ रस्ता. या अशा रस्त्यानं सामान वर चढवून आणण्यात तगड्या लोकांचाही दम निघतो. पण नाईलाज आहे. त्यातच एखादी म्हातारीही ढकलगाडीने वर येते. पण नाक्यावर वर्दळ तशी कमीच कारण बहुतेकजण खालच्या रेल्वे रूळातून सपाटीच्या रस्त्यावरून जाणं पसंत करतात. इथं बसून कंटाळा आला तर झाडाखाली जाऊन झोपही काढता येते.

 १५:४५
इथं रान तुडवताना फारसं कोणी भेटत नाही. गर्दीचे पॉईंट सोडून दुस-या रस्त्याला लागलात तर अगदीच कोणी नाही. खालच्या दरीत डोकावलं तर धनगरवाड्यातून दूध घालायला वर येणारे गावकरी वर येताना दिसतात. गच्च कापडात नीट थंड राहील याची काळजी घेत बांधलेली दुधाची चरवी. बाकी उरतात थोड्या थोड्या अंतराने रानात आत कुठेतरी लांबवर दिसणारे पारशांचे जुनाट बंगले. काहींना तटबंदी तर काहींना ती देखील नाही. काही ठीकठाक तर काही अगदीच भग्नावस्थेत. बाहेर जीर्ण झालेल्या संगमरवरी पाटय़ा वाचून काहींची ओळख पटते. काही तसेच बेवारस वाटणारे. भुताखेतांच्या गोष्टींना जन्म देणारे. वाटेतच पारशांची स्मशानभूमी लागते. ती बाहेरूनदेखील नीट दिसते. तिथं कोणी येत नाही. जंगलात कोण जातंय मरायला, असं बरेचदा म्हटलं जातं. पण या पारशांनी खरंच जंगलात मरण्याची सोय करून ठेवलीय. किमान दोन तास सोबत केल्याखेरीज इथल्या रानवाटा तुम्हाला सोडत नाहीत. वाटेने जाताना गवत काढणारे आदीवासी दिसतायत. हे गवत ते चा-यासाठी विकणार. अगदी डोंगराच्या कडेकपारीच्या उतारावर जाऊन गवत काढतायत. हे उतारावर उगवणारं गवत काढणं खूप धोकादायक. पाय घसरला तर खाली साक्षात दरीच. जीव धोक्यात घालून त्याच जीवासाठी पैसे कमवायचे. यांना भीती कमी वाटते, कारण बहुतेकवेळा माणूस शहरी होतो, जेवढा त्याचा निसर्गाशी संपर्क तुटतो, तेवढा तो घाबरट होतो, पण निसर्गाकडून घेऊनही या लोकांनी बरंच काही शिल्लक ठेवलंय हे बरंच म्हणायचं. म्हणून तर रानमेवा अद्याप या आदीवासींच्या ताब्यात असावा.

१७:३०
संध्याकाळ झालीय. पण या रस्त्यावर वाट चुकता कामा नये. आणि चुकली तरी ती जिमखान्याजवळून जाता कामा नये. ही पूर्वीची पारशांची घोडे पाग किंवा घोडे तळ, पण गेल्या १०० वर्षापासून तळ बंद झाला अन् तळाचं रूपांतर गावाच्या डिपग ग्राऊंडमध्ये झालंय. त्यामुळे इथं थोडीथोडकी नाही तर १००-१५० कुत्री तळ ठोकून असतात. बरं ही शहरी वातावरणातली कुत्री नाहीत, तर रानात राहायला सवकलेली भटकी कुत्री. संध्याकाळी हा भाग पूर्ण त्यांच्या अंमलाखाली. वाटेत एकटादुकटा कोणी दिसला तर तिथंच फाडून खातील. ही कुत्री दिवसा गावात हॉटेलांपाशी रेंगाळतात. जंगलातही भटकत अस
तात. फिरताना त्यांची भिती वाटत नसेल तर खुशाल एकटय़ाने फिरावं. गावात हॉटेल व्यवसाय वाढतोय तसा कचराही भयंकर वाढतोय. प्रदूषणाचे नियम पाळणा-या या गावात कुत्र्यांची संख्या बेफाट वाढलीय. वाघालाही घाबरणार नाहीत असली गावठी कुत्री. सहानंतर कोणी पर्यटक फारसे हॉटेल-बाजार परिसर सोडून दूर जाणार नाहीत. एकूणच संध्याकाळी भुतांची व कुत्र्यांची भीती वाटत नसेल तर फिरावं असं इथलं वातावरण.

 ९:१०
ट्रेनसाठी स्टेशनवर आलेय. तिथं कोणीच नाही. थंडीत कोणत्याही छोटय़ा गावाच्या स्टेशनवर जा, तिथं एक प्रकारची आळसावलेली सामसूम असते. असलेले प्रवासीही दबकूनच बसल्यासारखे वाटतात. आख्खं स्टेशनच जणू रजई घेऊन झोपल्यासारखं वाटत असतं. पावसाळ्यात ही चिडीचूपची मजा नसते. तरीही पावसाळ्यात आणि हिवाळ्यात इथला नजारा इतरांनी हेवा करून दृष्ट लागावा इतका अप्रतिम. खूप पावसाचे दोन महिने तर इथं शाळा वाहतूक रेल्वे सारंच बंद, पण रानाची खरी ओळख पावसाळ्यातच होते. इथं रानवैभवाची मुक्तहस्ताने उधळण पाहायला मिळते. तीच पाहायला अनेकजण येतात. पावसाळ्यात इथं सहसा पयर्टकांना फिरवत नाहीत. त्यामुळे बाहेर फिरायचं तर स्वत:च्या भरवशावर. हिवाळ्यात धुकं इतकं दाट की धुक्यात बोट घातलं तरी हटणार नाही. असो. मग विचार केला की चालतच पुढल्या स्टेशनला जावं. जाता जाता शेवटचा मॉìनग वॉक तरी होईल. काल याच रेल्वेगाडीच्या वळणावळणाच्या रस्त्याने कोवळ्या सोनेरी उन्हात चालत सकाळची फेरी मारली होती. कोणत्याही छोटय़ा गावाची ओळख तिथं जेवढं जास्त चालाल तेवढी चांगली होते. गाडीच्या शिट्टीचा आवाज लांबवरून ऐकू येतोय. बहुदा गाडी सुटली असावी. आता पुढलं स्टेशन गाठण्यासाठी पावलं झपाझप टाकावी लागतील..

link for published article http://epaper.eprahaar.in/detail.php?cords=540,64,2288,1164&id=story3&pageno=http://epaper.eprahaar.in/04012015/Mumbai/Suppl/Page4.jpg

No comments:

Post a Comment