Translate

Sunday, April 26, 2015

सोबतीला कुणी..


प्रवासाला रंगत आणतो तो रस्ता, याच रस्त्याच्या सोबतीने आपण चालत असतो, निश्चित स्थळी पोहोचत असतो. प्रवासातल्या अनेक अनुभवांचा रस्ता साक्षीदार असतो. आपण अनेक अनुभवांविषयी बोलत असतो, मात्र रस्त्यांविषयी फार कमी बोलतो.
‘‘इस मोड से जाते है कुछ सुस्त कदम रस्ते, कुछ तेज कदम राहे..’’ परवा हे गाणं ऐकताना अचानक रस्त्याबद्दलचे विचार मनात आले. खरंच आपण इतका प्रवास करत असतो, पण या सा-यात रस्ता हा नेहमीच थोडासा साईड अ‍ॅक्टरसारखा बाजूला राहतो, तो पायाखाली असल्याने फारसा उल्लेखात राहत नाही. फार फार तर त्या रस्त्यावरून जाताना वेगळं काही दिसलं असेल तर तो आठवणीत राहतो किंबहुना एखादा रस्ता खराब असला तरच तो जास्त लक्षात राहतो. रस्ता खरं तर ‘मूड चेंजर’च असतो. कारण इथूनच आपला प्रवास सुरू होत असतो आणि इथेच तो संपत असतो. प्रवासातलं जे काही नाट्य असतं, त्यातलं बरंचसं रस्त्यावरच घडत असतं. तुमचा प्रवास हेच तुमचं ध्येय असतं, असं म्हटलं जातं. हे ध्येय गाठण्यात रस्त्याखेरीज योग्य असा जोडीदार कोणीच नाही. कारण भले जोडीला कोणी असो वा नसो, रस्ता तर नेहमीच तुमच्यासोबत राहतो. तोच तुम्हाला दिशा दाखवतो आणि पाहिजे तिथे नेऊनही सोडतो. अर्थात या प्रवासाशी आणि रस्त्याशी तुमचं नातं किती जुळलेलं आहे यावर हे अवलंबून असतं. कवी रॉबर्ट फ्रॉस्टने म्हटलंय, ‘‘आय टूक द वन लेस ट्रॅव्हल्ड बाय.’’ त्याप्रमाणेच म्हणजे अस्सल भटके हे नेहमी मळलेल्या वाटेनं न जाता, कमी माणसं गेली असतील त्या रस्त्यानेच जाणं पसंत करतात; परंतु असे रस्तेही नेहमीच भेटतील असं नसतं.
सोबतीला कोणी असो वा नसो, प्रवासात तुम्ही जितके तल्लीन व्हाल, तितकाच आनंद तुम्हाला मिळत जातो. तसंच रस्ता उजाड असो किंवा सुंदर निसर्गदृश्यांनी भरलेला, आपला प्रवास हा आपण त्याच्यात किती मिसळून गेलोय यावर त्यातला आनंद अवलंबून आहे. तुम्ही रडत-खडत जाल तर पूर्ण रस्ता अन् प्रवासही तुम्हाला तसाच वाटू शकतो. आनंदात असाल तर तुम्हाला आनंदच मिळत जाईल. हैदराबादच्या वैराण माळरानासारख्या रस्त्यावरून बस धावत असताना आमचं तिथल्या शतकानुशतकं निश्चल होऊन विसावणा-या भल्यामोठय़ा कातळांकडे काही दिवसांनंतर लक्षही जायचं नाही. अनेकदा खाली उतरून त्यांना हात लावायचा मोह व्हायचा पण ते शक्य नसायचं. हे रस्ते सृष्टीसौंदर्याने भरलेले नव्हते पण मित्रमंडळी सोबत असल्याने त्यांचं उजाडलेपण फारसं निराश करू शकलं नाही. असाच होता एक डोंगररस्ता, मनालीच्या बिजली महादेव डोंगरावर जाणारा. पूर्ण मनाली भटकून झाल्यावर डोंगर चढण्याची कोणाची फारशी तयारी नव्हती. पण गावकरी वर जाऊन या असं सांगत होते. म्हटलं पाहू या तरी असं वर काय आहे ते, असं म्हणत म्हणत चांगले साडेतीन-चार तास वर चढून गेलो. काहीजणांनी अध्र्या वाटेत विश्रांती घेतली. पण वर गेल्यावर पायपीटीचं सार्थक व्हावं इतका अप्रतिम नजारा तिथं होता. वर मोठं पठार पसरलेलं होतं. तिथं बिजली महादेवाचं सुंदर मंदीर होतं. या डोंगरावरच्या पठारावरून मनालीचा सारा आसमंत दिसत होता. तिथून पाय निघत नव्हता. अर्थातच इतका सुंदर देखावा पाहिल्यावर खाली येताना पायांना थकवा फार कमी जाणवला. हीच तर गंमत असते. काहीतरी हवं असलेलं मिळणार आहे या ओढीने आपण रस्ता चालत असतो, त्यामुळे आपोआपच तो रस्ता किंवा पायवाटदेखील आपल्याला छान वाटत असते. अनेकदा एखाद्या तळ्याकडे जाणारी वाट ही अशीच ओढ लावणारी असते. कुर्गला एका तळ्याकडे नेणारी पायवाट ही अशीच गर्द झाडीतून जाणारी होती. बराच वेळ सुमारे तासभर चालल्यावर एक तळं व धबधबा समोर आला. पण त्याला पाहून वाटलं की यापेक्षा ही पायवाटच किती सुंदर होती. माथेरानचा शार्लोट लेकही असाच भ्रमनिरास करणारा ठरला. तिथं जाणारा जंगलातला रस्ता इतका रम्य होता, ऐन दुपारीही गर्द झाडीमुळे तिथं उन जाणवत नव्हतं. मात्र तळं सर्वसाधारण होतं किंवा तसं ते वाटलं. असाच एकदा सुखद धक्का बसला तो माल्रेश्वरच्या नदीवर जाताना. बराच वेळ धडपडत उतरती पायवाट चालत गेल्यावर समोर अचानक नदी आली. नदीच्या पात्राभवती दुतर्फा हिरवीगच्च डोंगररांग. आवाज फक्त पक्ष्यांचा व नदीच्या पाण्याचा. बाकी काही नाही. अगदी बसून ध्यान करता येईल इतकी शांतता. इतका सुंदर देखावा फक्त बियासच्या काठी पाहायला मिळालेला.
अनेकदा जंगलांमधून जाणारे रस्ते हे खडतर असतात. जंगलातल्या रस्त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे तिथं फुटणा-या वाटा. परंतु राष्ट्रीय अभयारण्यांमध्ये तसं एकट्याला कोणी सोडतही नाही. अपवाद फक्त संशोधकांचा. इतर जंगलांमध्ये एकट्याने फिरणार असाल तर वाटा लक्षात राहतील याची सोय तुमची तुम्हीच करायची. कारण एकिकडे वाटेनं जाताना पुढय़ात काय-कोण येतंय हे पाहत आपण चाललेलो असतो आणि त्यातच वाट चुकली तर बिलामतच ओढवायची. कॉब्रेटच्या जंगलात आमची जीप वाटेत एका उतारावर बंद पडली. ड्रायव्हरनं नाईलाजानं उतरायला सांगितलं. कारण सुरक्षेच्या कारणामुळे पर्यटकांना सफारीत उतरवता येत नाही. मला तर ते हवंच होतं. मग थोडा वेळ गाईडसोबत त्या जंगलातल्या रस्त्यावर चाललो.
ड्रायव्हर भीत होता कारण आम्ही मागे एका टस्करला टाकून आलो होतो. तो ही आमच्या मागूनच चरत चरत येत होता आणि हत्तीच्या रस्त्यावर चालताना शंभर टक्के अलर्ट राहावं लागतं. जंगलांमध्ये फिरताना एक सावधगिरी नेहमी पाळायची असते. तशी सूचनादेखील कुठेकुठे लिहिलेली असते की तुमच्या मार्गात एखादा वन्यप्राणी आला तर त्याला त्याच्या रस्त्याने तुमच्या अगोदर जाऊ द्या. अर्थात आमच्यासारख्यांना कोणीतरी वाटेत येणं अपेक्षितच असतं. असं अनेकदा रानकुत्री, गवे, हत्तींचा कळप, अस्वलं यांना आम्ही आनंदाने जाऊ दिलेलं आहे. त्यांना त्यांच्या अधिवासात पाहण्याचा आनंद वेगळाच असतो. मात्र आजही काही अभयारण्यांच्या बाजूच्या गावांमधून जाणा-या रस्त्यांवर ही शिस्त पाळली जात नाही व त्या रस्त्यांवरून पलीकडे जाणारे वन्यजीव हकनाक सुसाट धावणा-या वाहनाखाली बळी जातात तेव्हा भयंकर वाईट वाटतं. नागरहोलेच्या रस्त्यावरून जाताना आम्हांला रानकुत्री भेटली होती. नागरहोलेच्या जंगलातल्या रस्त्याचं वैशिष्ट्य म्हणजे तिथली विशालकाय प्राचीन वाटणारी झाडं आणि या झाडांच्या मध्ये लटकणारी मोठाली कोळ्यांची जाळी. या उंचच उंच झाडांकडे पाहताना मन गुंगून जातं. कधी असंही होतं की खालचा रस्ता विसरून जावा म्हणून देखील आपण बाहेर पाहू लागतो. नागालँडमध्ये फिरताना रस्त्यांची दुर्दशा झालेली दिसली. पण रस्त्यांच्या या डुगडुग अवस्थेला विसरायला लावणारा निसर्ग तिथं आहे. नागालँडला दुसरं कोकण म्हणता येईल इतकं तिथल्या व कोकणच्या निसर्गात साम्य आहे. असेच अप्रतिम रस्ते होते कर्नाटकमधले. बेळगावपासून म्हैसूपर्यंत कुठेही जा, रस्तेही मुलायम व निसर्ग तर त्याहून सुंदर. काझीरंगाकडे जाताना गोहत्तीपासून तब्बल पाच तासांचा प्रवास आहे मात्र या प्रवासात एकदाही कंटाळा येत नाही इतकी सुंदर खेडी आजूबाजूला दिसत राहतात. आश्चर्य म्हणजे काझीरंगाचं वैशिष्ट्य असणारे गेंडे व हत्तीदेखील याच गावांच्या बाजूच्या शेतांमधून दिसत राहतात. वळणावळणाचे रस्ते मला नेहमीच आवडतात. पुढं काय आहे याची उत्सुकता लावणारे. तुम्हांलाही असेच छानशी सोबत देणारे रस्ते भेटले असतीलच.
Here is the link for published article http://epaper.eprahaar.in/detail.php?cords=682,70,1460,1606&id=story3&pageno=http://epaper.eprahaar.in/08022015/Mumbai/Suppl/Page4.jpg

No comments:

Post a Comment