Translate

Sunday, April 26, 2015

खेळ छायाचित्रांचा


हल्ली काही गोष्टी घेतल्याशिवाय आपण प्रवास सुरूच करत नाही. कॅमेरा ही त्यातलीच एक गोष्ट. कॅमेरा आणि प्रवास यांचं नातं अतूटच होऊन गेलंय. पण ते खरंच तसं आहे का?
आपण एखाद्या छानशा पर्यटनस्थळी फिरायला गेलो आहोत. समोर रमणीय देखावा आहे. आपण तो पाहतोय, पण नीट आठवा.. काही सेकंदच किंवा मिनिटभर आपण तो आपल्या डोळ्यांनी पाहिलेला असतो. अनेकदा आपण तो कॅमे-याच्या डोळ्यांनीच बराच काळ पाहिलेला असतो.
कॅमेरा ही आपल्या बहुतेकांच्या प्रवासातली एक आवश्यक गोष्ट असते बहुधा. तशी ती असायलाही काही हरकत नाही. काही जण व्यवसायाच्या निमित्ताने कॅमेरा घेऊन फिरतात आणि काही हौसेसाठी. हेतू एकच. मनात जे रेखाटता येत नाही ते सारं काही आपण कॅमेराबद्ध करायचा आटोकाट प्रयत्न करत असतो. कॅमेरा हा जणू साठवणीची पेटीच होऊन जातो. आज गेली कित्येक दशकं कॅमेरा माणसाच्या प्रवासातला मूक सोबती होऊन गेलाय.
कॅमे-याच्या विविध प्रकारांनी कित्येकांचा प्रवासाचा आनंद द्विगुणित केलाय. स्वतंत्र कॅमेऱ्यांच्या जोडीला आता टॅब व मोबाईलमधले कॅमेरेही आहेत. अगदी डोक्यावर लावून फिरता येणारे गो-प्रो कॅमेराही आहेत. कॅमे-याची हौस आधुनिक अजिबात नाही, चित्रदृश्य स्मरणात साठवून ठेवण्याची ही भावना आदिम आहे. याआधीचा माणूस मनात, नजरेत चित्र साठवून ते नंतर गुहांमधल्या भिंतींवर, कपारींवर त्यानंतरच्या काळात कागदावर उतरवत होता.
माणसाची निरीक्षणशक्ती व त्याची इतर प्राण्यांपेक्षा थोडी जास्त असलेली चौकसबुद्धी त्याला चित्रकलेकडे घेऊन गेली. प्राचीन मानवाने व त्यानंतरही मानवाच्या कित्येक पिढय़ांनी या खंडातून त्या खंडात प्रवास केला. त्यावेळी त्याच्या हाती कॅमेरासारखी उपकरणं नव्हती. यावेळी त्याची स्मरणशक्ती, निरीक्षणशक्ती व रेखाटनकलाच त्याच्या कामी यायची. काही अनुभवांना तो शब्दांमध्ये बांधण्याचं कौशल्य शिकला, परंतु काही अनुभव त्याच्या लेखी शब्दातीत होते. अविस्मरणीय, अलौकिक व त्याच्या कल्पनेपलीकडचे होते.
अशा वेळी फिरणा-या या माणसाच्या मदतीला आली चित्रं. अर्थात, चित्रकला ही सर्वानाच येईल, अशीही कला नाही. त्यामुळे कॅमे-यासारखी उपकरणं फिरणा-या लोकांच्या बहुपयोगी पडली. दृश्यचित्रकलेचं हे हातात कुठेही घेऊन फिरता येण्यासारखं स्वरूप लोकप्रिय झालं.
माणसानं चित्रं काढायला सुरुवात केली ती स्वत:साठी, एक स्मरणचित्रं म्हणून; पण ही फक्त त्याची स्मरणचित्रं नव्हती तर ती त्याच्यासोबत राहणा-या समुदायासाठी ज्ञानाचा स्त्रोतही होता. त्याने फिरताना आजूबाजूला पाहिलेल्या वस्तूंची, प्राण्यांची, वनस्पतींची, निसर्गाची माहिती इतरांना करून द्यावी, त्यासाठी त्याने चित्रकलेचा आधार घेतला तो आजतागायत त्याने कायम ठेवलाय.
त्यासाठी लागणा-या साधनांमध्ये बदल जरूर होत गेले. मात्र उद्देश तोच होता. मानवी समुदायांपर्यंत माहिती पोहोचवणे. आज आपल्याला माहिती पोहोचवण्याची इतकी गरज उरलेली नाही, तरीही आपण स्मरणचित्रांसाठी कॅमे-यासारख्या उपकरणांचा वापर सुरू ठेवलाय. ही स्मरणचित्रं नेहमीच प्रवाशाला आनंद देत आली आहेत. किंबहुना आज काहीवेळा उलट स्थितीदेखील झालेली दिसते. पूर्वी मनुष्य नवल पाहण्यासाठी, ज्ञान किंवा व्यापारउदीमासाठी प्रवास करायचा. जे दिसेल ते स्मृतींमध्ये बांधून ठेवायचा प्रयत्न करायचा.
आज तो कॅमे-याच्या सोबतीने प्रवास करतो. कॅमे-याशिवाय त्याचं पाऊल हलत नाही. सर्वसाधारण पर्यटक कष्टाचे पैसे खर्च करून एखाद्या ठिकाणी जातात, त्यावेळी प्रत्येक दृश्य कॅमे-यात पकडण्याची त्यांची धडपड सुरू असते. डोळ्यांनी, मनाने समोरच्या दृश्याचा पूर्ण आस्वाद घेण्याआधीच, आपल्या डोळ्यांना फारशी संधी न देता आपण कॅमेरा बाहेर काढतो. यामुळे मनावर एखादी गोष्ट कोरली जातच नाही. एखाद्या ठिकाणी गेल्यावर तिथलं दृश्य पाहून आपल्याला तिथं नतमस्तक व्हावंसं वाटतं. इतकं ते दृश्य अप्रतिम असतं.
लेह-लडाखला किंवा अगदी हिमाचल प्रदेशात कुठेही गेल्यावर याची प्रचिती येते. आपण किती क्षुद्र असतो, याची जाणीव ताबडतोब आपल्याला होत असते. हीच भावना सह्याद्रीच्या रांगा पाहून किंवा नागझिराच्या जंगलात रूबाब चालवणारा वाघ पाहूनही होत असते. यावेळी आपण आधुनिक यंत्रांचा सहारा घेतो. अर्थात हे करूच नये असंही नाही. मात्र जिथे निसर्गाच्या सीमा पाळायच्या, तिथे त्या पाळल्या गेल्या पाहिजेत.
एखादं दृश्य किंवा परिसर खूप अभ्यासपूर्वक पाहिलंत, त्याला स्मरणबद्ध करण्याचा प्रयत्न केलात तर ते शक्यही होतं. अशावेळी आठवण म्हणून काही फोटो आणणं ही वेगळी गोष्ट. मात्र दरवेळी जिथे पाहू तिथे कॅमे-याचा क्लिकक्लिकाट करत बसायचं आणि मूळ आनंदाकडे दुर्लक्ष करायचं, हे ख-या फिरस्त्याचं काम नव्हे.
अशा कॅमेरापटूंनीच दोन-तीन वर्षापूर्वी वाईल्डलाईफ फोटोग्राफर्सवर संकट आणलं. वाघांना पर्यटकांच्या अतिप्रमाणामुळे, पर्यायाने त्यांच्या फोटो काढण्यामुळे त्रास होत असल्याचं सांगत व्याघ्र अभयारण्यांमध्ये चालणा-या फोटोग्राफीवर सरकारनं कडक बंधनं आणण्याचं ठरवलं होतं. ओल्याबरोबर सुकंही जळतं, तसा हा प्रकार होता. हौशे-नवशे-गवशे प्रकारातले सर्वसाधारण पर्यटक कोणताही प्राणी समोर दिसला की, त्याच्यावर कॅमे-याचं शस्त्र चालवतात.
परंतु हे शस्त्र चालवण्याचंही एक शास्त्र आहे, हे त्यांना कोणीतरी समजावून देणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ, कधीही हेलिकॉप्टर न पाहिलेल्या माणसाच्या अगदी जवळ ते येऊन उभं राहिलंय आणि त्याचा पंखा गरगरतोय, त्यावेळी ती व्यक्ती जेवढा घाबरेल तेवढीच भीती कॅमे-याची या प्राण्यांना वाटत असते. कॅमेराची प्राण्यांना सवय झालीय, अगदी जंगलातले वाघ-सिंह देखील माणसाळल्यासारखे कॅमेराला पोझ देतात असं काही लोक म्हणतात.
यावर विश्वास ठेवू नका. कित्येक उदाहरणं अशीही आहेत की, कॅमेरा पाहून प्राणी चवताळतात व पर्यटकांवर हल्ला करतात. हत्ती, गेंडा, सिंह, वाघ म्हणजे तुमच्या कॅमे-याकडे पाहून दात विचकणारं माकड नाही. अगदी तेदेखील मस्तीच्या मूडमध्ये असेल तर तुमचा कॅमेरा हिसकावून घेऊन पळून जातं. काझिरंगाच्या जंगलात मी असताना सेंट्रल रेंजमध्ये गेंडय़ाच्या जवळ जीप नेऊन फोटोगिरी करण्याचा आनंद घेणा-या पर्यटकांची गाडी गेंडय़ाने उलटवली होती. पिल्लं जवळ असणारी हत्तीण किंवा वाघीण, यांचे फोटो घेतानाही सावध राहणं गरजेचं असतं. कारण बहुतेक जंगली प्राणी नेहमीच आपल्या पिल्लांच्या संरक्षणाबाबत खूप सतर्क असतात.
त्यांना मानवाकडून धोका आहे असं जाणवलं तर हल्ला निश्चितच असतो. पिल्लांसोबत असलेली हत्तीण अनेकदा कॅमेरा पाहून झुडुपांमध्ये शिरलेली मी पाहिली आहे. कॅमे-याचा वापर करताना दुस-या सजीवाला त्रास होणार नाही इतपत असावा हे लक्षात ठेवून फोटोग्राफी केलीत तर निश्चितच तुम्ही प्रवासातून छानशा आठवणी घेऊन परताल.
Here is the link for published article http://epaper.eprahaar.in/detail.php?cords=692,82,1472,1600&id=story3&pageno=http://epaper.eprahaar.in/15022015/Mumbai/Suppl/Page4.jpg

No comments:

Post a Comment