Translate

Showing posts with label West Bengal. Show all posts
Showing posts with label West Bengal. Show all posts

Sunday, April 26, 2015

अतिथी देवो भव!


दुस-याच्या घरी एक दिवस-रात्र काढायची म्हटली तरी आजही कित्येकांच्या जीवावर येतं. रात्री दमूनभागून कधी एकदा स्वत:च्या घरी जाऊन पाठ टेकतोय असं आपल्याला होत असतं. स्वत:च्या घराशिवाय चैनच पडत नाही असंही काहींचं म्हणणं असतं. किंबहुना आपल्याकडल्या कित्येक म्हणी घराशी निगडित आहेत. अशा भारतीय पर्यटकाला प्रवासाला गेल्यावर होम स्टेचं आकर्षण वाटू लागलं आहे.
हे आमचं दुसरं घरच आहे किंवा घरच्यासारखी माणसं इथं भेटतात वगरे वाक्यं मला पूर्वी जाहिरातीच्या कात्रणातून कापून काढल्यासारखी वाटायची. कारण आपला एक अढळ विश्वास असतो की आपल्या घरासारखं ( मग ते कितीही छोटं-मोठं का असेना ) दुसरं घर मिळणं ही जवळजवळ अशक्यच गोष्ट असते. ते खरंही असतं म्हणा. कारण घर भिंतींनी नाही, तर आतल्या माणसांनी बनलेलं असतं. घराविषयीच्या व एकूणच कुटुंबपद्धतीबाबतच्या आपल्या भारतीयांच्या काही कल्पना अगदी ठाम आहेत. त्या टिकून आहेत म्हणूनच भारतीय संस्कृती आजतागायत टिकून आहे.
आपलं घर व घराचं वेगळेपण, प्रेम जपणारी आपण माणसं. आपलं घर ते आपलंच घर, दुस-यांच्या घरात ती भावना कशी येणार, असा सारा भावनिक मामला असताना भारतीय पर्यटन व्यवसायात होम स्टे यासारखी संकल्पना रुजणं थोडं अवघडच होतं. आजही आहे. परंतु आज होम स्टे कल्पनेचा विस्तार होतोय. वर म्हटलेलं माझं मत आज थोडंफार बदलू लागलं आहे.
काही दशकांपूर्वी केरळमध्ये पहिला होम स्टे सुरू झाला. परदेशातील बेड अँड ब्रेकफास्टसारखी ही कल्पना आहे. म्हणजे एखाद्याच्या घरी मुक्काम ठेवून आपण पर्यटन स्थळी फिरून यायचं. ही कल्पना खरी भारतीयांच्या मानसिकतेच्या अधिक जवळची. म्हणजे एखाद्या नातेवाईकाच्या घरी राहायला जाऊन तिथली आसपासची पर्यटनस्थळं पाहायची हा प्रकार काही आपल्याला नवीन नाही. पण इथे घर नातेवाईकांचं किंवा मित्र-मैत्रिणीचं नसणार तर दुस-या कोणा अपरिचित माणसाचं असणार. त्यामुळे पैसे देऊन का होईना, अशा घरात कसं राहायला जायचं याविषयी भारतीय पर्यटकांच्या मनात हजार प्रश्न उभे राहतात. पुन्हा त्या घराविषयी आपण कधी ऐकलेलं नसतं.
आता इंटरनेटनं सर्व काम सोपं केलंय. इथं निरनिराळ्या होम स्टेंचे रिवू वाचायला मिळतात. पण अगदी पूर्वी ही सोय नव्हती. होम स्टेचा मालक नक्की चांगलंच वागवेल की नाही, याची खात्री नसतानाही पैसे भरून परक्या घरात राहण्यापेक्षा हॉटेलात राहिलेलं परवडलं असा विचार आजही लोक करतात.
आपल्याकडे होम स्टेची संकल्पना रुजायला उशीर का झाला याच्या काही कारणांपैकी प्रमुख कारण हे की, भारतीयांची मानसिकता. हे घर आहे हॉटेल नाही, इथं वाट्टेल ते चालणार नाही, असा दम दिलेला आजही काही घरात ऐकू येतो. म्हणजे हॉटेल ही काहीतरी दुय्यम दर्जाची गोष्ट असावी हे आपल्या मनात खूप वर्षापासून बिंबवलं गेलंय. असं असताना आपण होम स्टे घरात सुरू करायचा, पर्यायाने घराचं हॉटेलच बनवायचं हेच मुळी कित्येकांना मान्य नव्हतं व नाहीये. परदेशातही होम स्टे आहेत. ते आपल्यासारखेच आहेत. पण आपल्याकडे मुळात होम स्टे सुरू झाला तो घरापासून दूर येणा-या पर्यटकाला घरासारखी जाणीव देणारं दुसरं घर त्याच्या प्रवासात मिळावं या उद्देशाने. असा अनुभव देताना प्रवाशाने त्या घरात समरस व्हावं, असं त्याला स्वत:हून वाटलं पाहिजे.
पण कोणा परक्याने आपल्या घरात आल्यावर कसं वागावं, यासाठी भारतीयांचे काही नियम आहेत. मग हे सर्व नियम होम स्टे कल्पनेत पाळले जाणार होते का? खासगीपणा जपला जाणार होता का? प्रवाशाला घरच्यासारखी आस्था व घरमालकाला पैसा मिळणार होता का? होम स्टे संकल्पनेविषयी अशा अनेक समजुती व गरसमज लोकांच्या मनात होते. आजही असतात. दुसरा अडसर होता तो प्रत्यक्ष घरमालकाच्या मनामध्ये. मध्यंतरी वेळासला गेले असताना याचा अनुभव आला. तिथं माडा-पोफळाच्या बागा आहेत, आमराया आहेत, विपुल निसर्गवैभव आहे.
वेळाससारखं गाव कासव पर्यटनाच्या निमित्ताने जगाला माहीत झालं. पण तिथं किंवा कोकणातल्या अनेक गावांमध्ये आज होम स्टे सुरू करून परक्या प्रवाशांना आपलं घर वापरू द्यायच्या मुद्दय़ावर द्विधा मन:स्थिती आहे. पर्यटनातून अर्थार्जन होऊ शकतं, हे काहींना समजलेलं आहे, त्याच लोकांनी होम स्टे सुरू केलेत. मात्र काहींच्या गळी अजून ही कल्पना उतरलेली नाही.
आपण आपल्या कुटुंबाचा खासगीपणा चार पैशांसाठी का बाजारात मांडावा, असा काहींचा आक्षेप असतो. याचं दुसरं कारण माझ्या निरीक्षणानुसार असं असू शकतं, ते म्हणजे आपण आपल्या कुटुंबातल्या स्त्रियांना जपतो. मग परका प्रवासी येऊन तिथं घरातल्या बायकांच्या आजूबाजूला वावरणार ही काहीजणांना काहीशी धोक्याची गोष्ट वाटू शकते. त्यात काही गर नाही. मात्र एकाच गावात अनेक घरं ही तिथल्या एखाद्या संस्थेच्या अंतर्गत होम स्टे सुरू करत असतील, तर अशा घरांना सुरक्षिततेचा फायदा मिळतो. त्यांच्यावर गावातल्या व संस्थेच्या लोकांची नजर राहते. पण एखाद्या गावात एका बाजूला असणा-या घरात होम स्टे सुरू असेल तर मालक व प्रवासी या दोघांनाही काळजी घ्यावी लागते. विशेषत: महिलांना.
होम स्टे इतर अनेक बाबतीत हॉटेलांपेक्षा सरस ठरतात. एखाद्या ठिकाणचं स्थानिक वैशिष्टय़, तिथल्या चाली-रिती, खाद्य व कुटुंब संस्कृती वगरे जाणून घ्यायची असेल तर होम स्टेला पर्याय नाही. म्हणूनच आज अनेक कुटुंबं त्यांचं फार्महाऊस वगरे होम स्टेमध्ये रूपांतरित करतात. इथं भारतीयांचा चाणाक्षपणा दिसतो. आपण जिथं राहणार नाही, अशी म्हणजे आपलं प्रत्यक्ष घर नसलेली जागा ते होम स्टेसाठी देतात.
पर्यटक आले की ही माणसं तिथं जाऊन राहतात. हॉटेलांपेक्षा इथं अधिक मोकळेपणा व घरगुती वातावरण असतं म्हणून होम स्टेची परंपरा आपल्याकडे सुरू झाली व तिच्या लोकप्रियतेचा फायदा उठवत अनेकांनी अव्वाच्या सवा भाव वसूल करणं सुरू केलं. अशा होम स्टेमध्ये चुकूनही फिरकू नका. इंटरनेटवरील परीक्षणांमध्ये प्रामाणिक मतं कोणती आहेत, याचा अंदाज घ्या. त्या होम स्टेची स्थानिक परिसरात चौकशी करा. मगच होम स्टे बुक करा. यातील बाकी निकष वैयक्तिक असतात. भारतीय पर्यटनाला प्रसिद्धी, महसूल व पर्यटक मिळवून देण्यात आज होम स्टे चांगलं काम करत आहेत.
आज ठिकठिकाणी होम स्टे उपलब्ध आहेत. होम स्टेमध्ये राहण्याविषयी पर्यटकांच्या मनात आता फारसे गरसमज नसतात. उलट भारतातील प्रांतीय संस्कृतीची झलक पाहायला मिळेल म्हणून लोक होम स्टेची निवड करू लागले आहेत. त्यातही होम स्टेमध्ये राहणं हे अधिक उत्तम व खर्चाच्या दृष्टीनंही फायदेशीर ठरतंय म्हटल्यावर माझ्यासारख्यांनी अनेकदा होम स्टेला पसंती दिलीय. माझ्या अनुभवानुसार मनानं चांगली असणारी माणसं होम स्टेची मालक असतील तर नक्कीच अशा होम स्टेमध्ये खरोखर घरी राहिल्यासारखा अनुभव मिळतो. कर्नाटक, प. बंगाल, आसाम, कोकण अशा अनेक ठिकाणी मला चांगले मनासारखे होम स्टे म्हणजे घरं वाटय़ाला आली. असा एखादा उत्तम अनुभव तुम्हालाही मिळो.
Here is the link for published article http://epaper.eprahaar.in/detail.php?cords=18,1406,1464,2268&id=story4&pageno=http://epaper.eprahaar.in/22022015/Mumbai/Suppl/Page4.jpg

सुलभ नसे जे !


भारतातील प्रवासातली एकमेव व मला जाणवलेली उणीव कोणती असेल तर ती आहे, ठिकठिकाणच्या स्वच्छ व चांगल्या शौचालयांची.
भारतातील प्रवासातली एकमेव व मला जाणवलेली उणीव कोणती असेल तर ती आहे, ठिकठिकाणच्या स्वच्छ व चांगल्या शौचालयांची.
जागतिक महिला दिन आठवडयावर आलाय, त्या निमित्ताने आपल्याकडे स्त्री प्रवाशांसाठी असलेल्या शौचालयांची दैन्यवस्था आठवतेय आणि मी पार केलेल्या दिव्यांचीही आठवण येतेय.
प. बंगालमधल्या एका गावात आम्हाला जायचं होतं. त्यासाठी भल्या पहाटेच म्हणजे चारला उठून पाचला बाहेर पडलो होतो. कारण पुढे एक तासाचा रेल्वे व पाच तासांचा बसचाही प्रवास होता.
या सर्व प्रवासात माझी काय गोची होणार आहे हे मला घरातच लक्षात आलं होतं; पण त्याला नाइलाज होता, त्यामुळे ‘आलिया भोगासी असावे सादर’ या विचाराने मी पुढल्या संकटासाठी मानसिक तयारी ठेवली होती.
प. बंगालमधलं बर्धमान शहर हे जिल्ह्याचं शहर असलं तरी इथं अस्वच्छता व मागासलेपणा बोकाळलेला आहे. वर्षानुर्वष इथली स्थानिक माणसं अपु-या नागरी सुविधांच्या खाते-यात पडलेली आहेत हे तिथं स्पष्ट जाणवत होतं.
जिल्ह्याच्या शहरात एवढी घाण असेल तर प्रत्यक्ष ग्रामीण भागात काय स्थिती असेल याचा विचारच करायला नको. आम्ही बर्धमानला साडेसात वाजता पोहोचलो. चहा घ्यायची भरपूर तल्लफ आली होती. पण थंडीने आपला असरही दाखवला होता. निसर्गाची हाक आली होती.
रेल्वे स्टेशन काय किंवा बाहेर काय, कुठेही जाण्यायोग्य शौचालय नव्हतं. त्यात ती अगदी सकाळची वेळ. सर्वत्र कसा आळसावलेला परिसर. कुठेही मोठं हॉटेल नाही. शिवाय आमची बसही लागलेली होती. अखेर जागा मिळवायची असल्याने बसमध्ये एकदाचे चढून बसलो. त्यानंतर बस एवढी पॅक झाली की जाण्याचा दरवाजाही दिसेना. असा तो काठोकाठ भरलेल्या बसचा प्रवास सुरू झाला व मी सरळ झोपून गेले.
बिष्णूपूरला साडेबारा वाजता उतरलो तेव्हा पहिल्यांदा एका चांगल्याशा हॉटेलाकडे धाव घेतली. तिथला वेटर जेवणाची वेळ झाली असल्याने तुम्ही काय जेवण घेणार असं विचारू लागला. त्याला म्हटलं की बाबा रे, पहिल्यांदा बाथरूम दाखव कुठे आहे ती. तो म्हणाला, अशी काही हॉटेलमध्ये जेवायला येणाऱ्यांसाठी बाथरूम वगरे नाही; पण इथं वरती हॉस्टेल आहे, त्या पुरुषांची बाथरूम आहे.
तिथे तो मला घेऊन गेला व मला अक्षरश: स्वर्ग सापडल्याचा आनंद झाला. तो आनंद व्यक्त करून बाहेर येते तोच बाहेर एक पुरुष हातात धुण्याचे कपडे घेऊन उभा होता, तो आश्चर्याने पाहू लागला. त्याला बहुतेक माझं हे अतिक्रमण रुचलं नसावं. पण माझा नाइलाज होता.
या एका बाबतीत स्त्री नेहमीच भीडेस्तव पुरुषापेक्षा मागे पडते. तरीही आज गावोगावातून जाताना हायवेने असणा-या शेताच्या बांधावर किंवा एखाद्या मोठया झाडाच्या आडोशाने लघुशंकेला जाण्यासाठी स्त्रियांची तयारी असते. अन्यथा काहीच पर्याय नसतो.
येऊरच्या जंगलातदेखील हाच अनुभव आला. एक दिवस सात वाजताच आम्ही नेचर ट्रेलला सुरुवात केली होती. अर्थात त्यासाठी मी सहाला उठून घराबाहेर पडले होते. दिवस पावसाळ्याचे होते. त्यामुळे अर्थातच आम्ही चिंब भिजलो होतो. जंगलात फिरताना अंगावरच्या रेनकोटचा खूप फायदा झाला नव्हता.
त्यात गुडघ्याच्यावर पाणी असलेले ओढेही पार केले होते. त्यामुळे काही तासांनी आतून ‘आडोसा शोधच’ अशी जाणीव व्हायला लागली. मग आम्ही सर्व जणींनी जंगलातल्याच त्या मोठाल्या झाडाझुडूपांचा सहारा घेतला. ब-याचशा इतर मोठया जंगलांपेक्षा तुलनेने लहान असणा-या जंगलांमध्ये आज पर्यटकांसाठी स्वच्छतागृहाची सोय नसते. दांडेलीच्या जंगलात त्यांनी छानसा नसíगक असा छोटा बांबू लावून आडोसा निर्माण केलाय.
फक्त आडोसाच, तिथं पाणी वगरे काही नाही. नागरहोलेच्या जंगलात एक पक्कं सिमेंटचं स्वच्छतागृह आढळलं. त्यावर जंगलच्या रहिवाशांनी खरोखरच राज्य सुरू केलं होतं. म्हणजे आतमध्ये मोठ्ठाली कोळ्याची जाळी व मधमाश्यांचं पोळं, त्यामुळे तिथं कोळी व मधमाश्यांनी आमचं स्वागत केलं. मग आम्ही कुठे साप वगरे दिसतो का हेही पाहून घेतलं व ते पाहता पाहताच विधी उरकून घेतले. अशी धर्मसंकटं बरेच वेळा आली. माझ्याच नाही तर भारतात फिरणा-या प्रत्येक स्त्रीपाशी असे अनुभव असतील.
आपण भारत प्रगतीकडे चाललेला देश म्हणतो खरे, पण या बाबतीतली प्रगती तरी अजून काही दृष्टिपथात नाही. भारतीय स्त्री एकवेळ तिचा स्वत:चा देश म्हणून समजून घेईल; पण बाहेरून येणा-या परदेशी स्त्रियांचं काय? अर्थातच, त्यांच्या लिखाणातून यासंबंधीचे शेरे वाचायला मिळतात व त्यांच्या मनात भारताविषयी काय प्रतिमा त्या घेऊन गेल्या आहेत हे देखील स्पष्ट होते.
मध्य प्रदेशातील एका गावात असेच एकदा प्रवासादरम्यान थांबलो असताना आम्ही स्वच्छतागृह शोधत होतो. ते काही सापडलं नाही म्हणून पोलीस चौकीत तरी निदान तिथल्या महिलांसाठी काही सोय असेल या हेतूने डोकावलो. तिथल्या एका महिलेने एक शाळेच्या वर्गासारखी दिसणारी खोली दाखवली. जी पुरेपूर घाण झालेली होती; पण नाइलाजाने आम्हाला त्याचा वापर करावा लागला. दुसरा पर्यायच नव्हता.
भारतातल्या बहुतांशी ग्रामीण भागात महिलांसाठी स्वच्छतालयंच नाहीत व असली तरीही त्यांची दुरवस्थाच असते. शहरी व निमशहरी भागातही फार काही चांगली स्थिती नाही हेही मी अनुभवलंय. रेल्वेतून फिरताना तर या समस्येचा गंभीरपणा विसरायला लावणारे हास्यास्पद अनुभव येतात. प्रथम वर्गाचा वातानुकूलित डबा असेल तरच भारतीय रेल्वेत चांगलं शौचालय तुमच्या नशिबी येऊ शकतं. नाही तर इतर वर्गाच्या शौचालयातही दाटीवाटीने माणसं बसलेली दिसतात.
तुम्ही कुटुंब किंवा महिला असलेल्या ग्रुपसोबत प्रवास करत असाल तर परिस्थिती थोडीफार सांभाळता येते. कोणी सामानावर नजर ठेवू शकतं, तर दुसरं कोणी आपल्यासोबत येऊ शकतं किंवा स्वच्छतागृहाचा शोध घेऊ शकते. मात्र आपल्या देशात एकटयाने प्रवास करणा-या स्त्रीची अशा बाबतीत फारच कुचंबणा होते. ही वेळ माझ्यावरही अनेकदा ओढवली आहे.
विचार करा, भारतीय असल्यामुळे मी सहजच िहदी भाषेचा वापर करून मला पाहिजे ते शोधू शकते, मात्र आपल्या देशात फिरायला आलेल्या एखाद्या विदेशी पर्यटक पाहुणीची काय स्थिती होत असेल! कर्नाटकात माझ्या वहिनीसोबत फिरताना आम्हाला याची खूप जाणीव झाली. पण फक्त कर्नाटकच नव्हे तर आपल्या देशातील पर्यटनाच्या दृष्टीने विकसित होणा-या व तसं महत्त्व नसलेल्या देखील अनेक मोठया व छोटया शहरांत महिलांसाठी चांगल्या स्वच्छतागृहांची आत्यंतिक गरज आहे. तशी ती पुढील काळात मिळोत व आपला प्रवास सुखाचा होवो हीच येणा-या आंतरराष्ट्रीय महिला दिनासाठी शुभेच्छा !
Here is the link for published article http://epaper.eprahaar.in/detail.php?cords=2,1510,1466,2266&id=story4&pageno=http://epaper.eprahaar.in/01032015/Mumbai/Suppl/Page4.jpg

Sunday, September 8, 2013

विष्णूपूरच्या बंगाली वृन्दावनात

                                                            



  उत्तराखंडमध्ये यावर्षीच्या जूनमध्ये झालेल्या ढगफुटीनंतर आलेल्या पुरामुळे प्रचंड वाताहत झाली परंतु केदारनाथाचेजारो वर्षांपूर्वीचे मंदिर निसर्गाच्या एवढ्या तडाख्यातून बचावून उभे आहे. लगेचच काही लोकांनी त्याला परमेश्वरी शक्तीचा अगाध महिमा अशी लेबले लावली तर काहींनी तेव्हाचे आणि आताचे वास्तुविशारद यांची तुलना सुरु केली. कारण काहीही असो, या मंदिराची बांधणी भक्कम आहे हे दिसून आले आणि आपल्या देशातल्या कितीतरी प्राचीन मंदिरे आणि वास्तू बांधणाऱ्या अनाम शिल्पकार आणि स्थापत्यकारांच्या कलेला तोड नाही हे सिद्ध झाले. मंदिरांवरील शिल्पकाम किंवा कोरीवकाम म्हणजे त्याकाळची माहिती देणारे एक सर्च इंजीनच. आपल्या सुदैवाने भारतात सर्वत्र पुरातन मंदिरांच्या देखण्या वास्तू अजूनही शाबूत आहेत. त्यापैकीच एक आहे मल्ल राजांचा वारसा सांगणारा सोळाव्या शतकातील विष्णुपूरचा टेराकोटा मंदिरांचा समूह. विष्णुपूर पश्चिम बंगालच्या बांकुरा जिल्ह्यात कोलकाता शहरापासून सुमारे २०० कि.मी अंतरावर आहे. इसवी सन ९९४ पासून मल्ल राजांची राजधानी असलेले विष्णुपूर. इथली तीस देवळे भाजलेल्या मातीच्या विटांपासून बांधून काढली आहेत हे त्यांचे एक वैशिष्ट्य पण १६व्या शतकातील मल्ल राजांचा इतिहास, त्यांचा कलासक्तपणा,सौंदर्यदृष्टी,भक्तीभाव आणि एकूणच त्यांच्या राज्यकाळातील अनेक बारीकसारीक गोष्टी या टेराकोटा मंदिर समूहाच्या माध्यमातून आपल्याला समजतात. टेराकोटा या मूळ इटालियन शब्दाचा अर्थ भाजलेली जमीन किंवा माती असा होतो. मल्ल राजांच्या काळात टेराकोटा स्थापत्यशैली पूर्ण बंगालमध्ये फोफावली, विषेशतः बांकुरा, वर्धमान जिल्ह्यात अशी अनेक मंदिरं पाहायला मिळतात. बंगालमधली टेराकोटा मंदिरे पाहायला जगभरातून संशोधक,अभ्यासक आणि पर्यटक इथपर्यंत येतात. इतिहासातील कित्येक राजा-महाराजांनी त्यांच्या काळात स्वतःची ओळख मागे राहावी यासाठी देऊळे बांधून ठेवली आहेत. तशीच ही विष्णूपुरची देऊळे. हि ऐतिहासिक मंदिरे, या वास्तू आपल्याला इतिहास, वैभव, संस्कृती सांगायला उत्सुक आहेत म्हणूनच शतकानुशतके वादळवाऱ्यात टिकून आहेत. देवळांचे इतके अनन्यविध प्रकार भारतात आहेत कि एखाद्याने नुसती देवळं जरी पहायची ठरवली तर त्याचा अख्खा जन्म पुरणार नाही.
अनेकदा चित्रे वगैरे पाहून मूळ वास्तूची कल्पना येत नाही आणि प्रत्यक्ष पाहताना आपण इथे आलो हे बरेच केलं असं वाटायला लागतं. विष्णुपूरच्या देवळांबाबत माझं नेमकं हेच झालं. एखाद्या ठिकाणी गेल्यावर पाहण्यासारखं बरेच आहे असा स्थानिकांकडून देखील आग्रह होतो. ‘काय पाहावे’ यादीतील सर्वच पाहता पाहता खरोखरीच जिथे गेलं पाहिजे होतं अशी ठिकाणं मग राहून जातात आणि त्याची हुरहूर मनाला लागते. त्यामुळे पश्चिमबंगात( बंगाली उच्चारानुसार पोश्चिमबोंगात) फिरताना १०-१२ दिवसांमध्ये काय आणि किती पहायचे हा प्रश्न होताच. पण विष्णुपूरची टेराकोटा देवळं पहावीच असा सल्ला अनेकदा माझ्या कानांनी ऐकून झाला होता. टेराकोटाशी माझा संबध म्हणजे फक्त काही शोभेच्या वस्तू आणि खोट्या दागिन्यांपुरता. प्रत्यक्ष विष्णुपूरला जाऊन ठेपल्यावर त्या अप्रतिम कलाकारीने थक्क झाले. ते कोरीवकाम, नक्षीकाम आणि काळाच्या झपाट्यात भक्कम अखंड राहिलेले असं बांधकाम पाहून नेहमीप्रमाणे ‘आ’ वासला गेलाच. तिथली प्रत्येक वास्तू विलोभनीय आहे आणि केवळ देवावरील प्रेमापायी आपल्या पूर्वजांनी इतकं काही सुघड निर्माण करून ठेवलं आहे हे अनाकलनीयच आहे. बंगालच्या स्थापत्यकलेच्या इतिहासात या मंदिरांना मोठं महत्व आहे. दक्षिण भारतासारखे इथे मोठे कातळ आणि दगड सापडत नाहीत त्यामुळेच दगडांना पर्याय म्हणून या भाजलेल्या मातीच्या विटांचा वापर करून इथली मंदिरे बांधली गेली आणि अश्या प्रकारे टेराकोटा शिल्पकलेचा उदय बंगालमध्ये झाला. अनेक शतके इस्लामी आधिपत्याखाली काढल्यानंतर सोळाव्या शतकाच्या आसपास बंगालमध्ये वैष्णव पंथाने पर्यायाने हिंदूधर्माच्या प्रभावाने पुन्हा अंमल दाखवायला सुरुवात केली. त्याच सुमारास विष्णुपूरमध्ये श्रीकृष्णाची देऊळे अस्तित्वात येत होती. साहजिकच टेराकोटा देवळांच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धातल्या देवळांच्या बांधणीवर इस्लामी स्थापत्यशैलीची झाक आहे. विष्णुपूरची ही देऊळे बंगालमधील १३व्या अणि १४व्या शतकातील मशिदी अणि ओरिसातील मंदिरे यांच्यापासून प्रभावित होऊन निर्माण झालेल्या शैलीत बांधली असल्याचेही काहींचे मत आहे. काही संशोधकांच्या मते कृष्णभक्त मल्ल राजांनी वृंदावन-मथुरेच्या धर्तीवर स्वतःच्या राज्यात मंदिरे असावीत म्हणून विष्णुपूर मंदिरांची निर्मिती केली. मंदिरांच्या भिंतींवर केलेल्या कोरिवकामात महाभारत, रामायण यातील गोष्टी आहेत खेरीज श्रीकृष्णाच्या जीवनातील काही कथा, भगवान बुद्ध ,चंडीदेवी अणि राक्षस वध, योद्धा, शिकारी, व्यापारी, निसर्ग, पशु-प्राणी, सामान्य जनांच्या दैनंदिन गोष्टी हे सर्वदेखील या नक्षीकामात कोरलेले दिसते. मुळात कोणत्याही प्रकारचे ज्ञान जेव्हा फक्त लिखित आणि मौखिक होते तेव्हाच्या प्राचीन आणि ऐतिहासिक काळात ज्ञानाच्या प्रसारासाठी शिल्पकारांनी आपल्या कलेचा अतिशय समर्पक वापर केलेला दिसतो. विविध देशांमधील शिल्प आणि कोरीवकामात साम्य आढळत असल्यामुळे आता संशोधकही अचंबित होत आहेत. विष्णुपूर मंदिरांच्या कोरीवकामातही अशी साम्य आढळली आहेत. येथील कोरीवकामात अनेक पौराणिक, ऐतिहासिक,धार्मिक आणि सामाजिक संदर्भ असलेल्या गोष्टींचे चित्रण आहे आणि याच वेगळेपणामुळे ही टेराकोटा मंदिरे भारतीय शिल्पकलेचा अत्यंत महत्वाचा नमुना म्हणून जगप्रसिद्ध आहेत.
विष्णुपूरची सैर एखाद्या टाईम कॅप्सूलप्रमाणेच आहे. वर्धमानवरून चार तासांचा बसचा प्रवास करून मी इथे पोहोचले. पुढे विष्णुपूरच्या गल्ल्यांमधून सायकल रिक्षा ओढत नेईल तिथे उतरून मंदिरे पाहण्याचा कार्यक्रम सुमारे ४-५ तास चालू होता. हा सायकल रिक्षा भाग सोडला तर हि मंदिरे थेट मल्ल राजांच्या काळातच नेऊन उभी करतात. कोणतीही प्राचीन देवळे किंवा शिल्प ही आरश्याप्रमाणेच असतात कारण त्यांच्यावरून त्याकाळच्या सांस्कृतिक, साहित्यिक, राजकीय, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचा अंदाज येतो. विष्णुपूरच्या देवळांची शिल्पकलाही अद्भुत आहे. या सर्व मंदिरांची स्थापत्यशैली भारतात पाहायला मिळणाऱ्या इतर मंदिरांपेक्षा अत्यंत वेगळी आहे आणि हेच त्यांचे वैशिष्ट्य आहे. देऊळ म्हटले कि त्यात देवाच्या मूर्ती असणं हे ग्राह्य धरलं जातं पण ज्यात मूर्तीच नाहीत अशी फक्त देवांच्या विश्रांतीसाठी बांधलेली देऊळे( शय्यागृह) देखील इथे आहेत. हि टेराकोटा देऊळे आणि वास्तू भक्तीप्रिय मल्ल राजांनी श्रीकृष्ण आणि श्रीविष्णूला समर्पित केलेली आहेत. देऊळे बांधताना साध्या रचनेत आणि आजूबाजूला मोकळी जागा सोडून बांधली आहेत. जास्तीत जास्त प्रजेने तिथे यावे, जमून देवांची भक्ती-आराधना करावी हा त्यामागील हेतू होता. वैष्णवपंथ देखील साध्या जीवन राहणीला महत्व देतो त्यामुळे सामान्य नागरिकांची घरं जशी, तशीच त्यांना हि मंदिरं वाटावीत म्हणून त्यांची बांधणी साधीच ठेवली गेली.
या सर्व मंदिरांची रचना वेगवेगळी असली तरी स्थापत्यशैली एकच आहे. हे मल्ल राजे कृष्णभक्त आणि या भक्तीपायीच त्यांनी टेराकोटा देऊळे बांधण्याचा सपाटा लावला. या मंदिरांचे स्थापत्यविशारद म्हणजे आचार्य आणि शिल्पकार ज्यांना सूत्रधार असेही म्हटले जायचे, त्यांना श्रीमंत जमीनदार, व्यापारी यांच्याकडे आश्रय मिळायचा. ते आपली कला मंदिर बांधणीतून दाखवत बंगालच्या अनेक गावांमधून फिरायचे. तेव्हापासूनच बंगालमधली मंदिर शिल्प-वास्तूकला टेराकोटामय झाली. त्यामुळेच बंगालच्या बांकुरा, हुगळी, वर्धमान आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये टेराकोटा शिल्पकलेचा प्रभाव आणि प्रसार दिसून येतो. ‘चाल’, ‘रत्न’ आणि ‘दालान’ अश्या तीन प्रकारे ही मंदिरे बांधली गेली आहेत. ‘चाल’ म्हणजे छताचे कोपरे अणि अशी दोन,चार किंवा आठ उतरते कोपरे असणारी छोटी मोठी देवळे इथे दिसतात. विष्णुपूरची मंदिरे देखील चाल पद्धतीने बांधलेली आढळतात. सामान्यतः बंगाली घरे ज्या धाटणीची असत त्याचप्रमाणे ही मंदिरे देखील बांधली जात. चाल किंवा चाला म्हणजे छप्पराचे उतरते निमुळते कोन, अश्या दोन कोनाच्या छप्पराला दुईचाला म्हटले जाते तशीच चौचाला, अटचाला मंदिरे देखील आहेत. बंगालमधील ग्रामीण भागात आज देखील अशा छप्परांची घरे आढळतात. ‘रत्न’ म्हणजे देवळावरील शिखर आणि त्यातही एक, तीन किंवा पाच शिखरांची मंदिरे इथे आहेत. ‘दालान’ या प्रकारात देवळावर सपाट छत असते. हि टेराकोटा मंदिरे भारतीय इतिहासातील स्थापत्य आणि शिल्पकलेचा असाधारण वारसा आहेत. रसमंच ही इथली एक सभागृहासारखी प्रमुख वास्तू आहे. इ.स १६०० मध्ये मल्ल राजा वीर हंबीर याने रसमंच बांधले, जे या समूहातले सर्वात जुने मंदिर आहे. अनेक स्तंभांव उभे असलेले विटांच्या मनोहारी  बांधणीतले हे मंदिर अतिशय सुंदर आहे. वास्तविक हे भगवान श्रीकृष्णासाठी अर्पण केलेले शयनगृह आहे. त्रिकोणाकृती रचनेच्या मंदिराच्या जोत्यासाठी लेटेराईट स्टोन वापरण्यात आला आहे. दूरवरूनही डोळ्यात भरेल अश्या या मंदिराचे छप्पर उतरते आहे. फक्त बंगालच नव्हे तर पूर्ण भारतातदेखील या शैलीचे मंदिर आढळत नाही. मात्र या मंदिरावर कमळ इत्यादी फुलांखेरीज इतर कोणतीही खास शिल्पकला कोरलेली दिसत नाही. मुळात हे मंदिरच नसल्यामुळे इथे कोणतीही मूर्ती नाही पण १९३२ सालापर्यंत रास उत्सवाच्या वेळेस विष्णुपूरमधील इतर मंदिरातून दर्शनासाठी मूर्त्या इथे आणल्या जात. इथे एका छोट्याश्या टेकडीवर एका खोलीवजा बुरुजाचे भग्नावशेष आढळतात त्याला गुमगढ म्हणतात. त्याचा वापर नक्की कशासाठी पूर्वी होत असे याची माहिती त्यावर कोरलेली दिसत नाही आणि इतरत्र उपलब्ध देखील नाही. काहींच्या मते हा तुरुंग होता तर काहींच्या मते ते धान्य साठवण्याचे गोदाम होते. आता तिथे फक्त खिडक्या-दरवाजे नसलेले खिंडार बाकी आहे.
गुमगढवरून थोडेसे पुढे गेल्यावर श्यामराय मंदिर दिसते. इसवी सन १६४३ मध्ये मल्ल राजा रघुनाथ(दुसरा) याने हे मंदिर बांधले. पाच शिखरांचे हे पच्चुरा मंदिर अद्याप उत्तम स्थितीत आहे. या मंदिराच्या चोहोबाजूला त्रिकोणी कमानीचे दरवाजे आहेत. याच्या भिंतींवर महाभारत, रामायण, रास चक्र आणि राधा-श्रीकृष्ण यांच्याशी संबधित प्रसंग कोरलेले आहेत. श्यामराय मंदिराच्या पुढे दिसते ते केश्तोराय मंदिर. हे उंचच उंच मंदिर देखील आवर्जून पाहावे असे मंदिर आहे. जोरबंगला शैलीतल्या या मंदिराला दोन उतरत्या भाजणीची छत जोडून असल्यामुळे याला जोर (जोड )बंगला मंदिर असे म्हणतात. जोरबंगला म्हणजे संयुक्त छतांचे मंदिर. या जोडछतांच्या मध्ये एक छोटेसे शिखर आहे ज्याच्यामुळे छतांनादेखील आधार मिळाला आहे. टेराकोटा शैलीचा उत्तम नमुना म्हणजे हे इ.स १६५५ साली राजा रघुनाथसिंह(दुसरा) याने बांधलेले मंदिर आहे. या मंदिरात आत आणि बाहेर आढळणारे  कोरीवकाम देखील आकर्षक आहे. त्यात शरशय्येवर पडलेले भीष्माचार्य तसेच जहाजे आणि बोटी देखील दिसतात. पुढे दिसते ते एकच शिखराचे म्हणजे एक रत्न राधेश्याम मंदिर. याच्या भवताली उंच भिंतींची तटबंदी आहे आणि प्रवेशद्वारावर मुस्लीम स्थापत्यशैलीचा प्रभाव असणारी त्रिकोणी कमान आहे. इ.स. १७५८ मध्ये मल्ल राजा चैतन्यसिंह याने हे मंदिर बांधले. असे म्हटले जाते कि राज्याच्या खजिन्यात खडखडाट असतानाही केवळ मंदिर बांधण्याची परंपरा जपली जावी म्हणून राजाने हे मंदिर बांधले. एक शिखर असणारे दुसरे एक मंदिर म्हणजे राधालालजेऊ मंदिर, जे इ.स.१६५८ मध्ये मल्ल राजा बीरसिंह याने बांधले. राधेश्याम मंदिराच्या अगदी समोरच मृण्मयी मंदिर आहे. मंदिर जीर्ण झाले असल्यामुळे इथली मृण्मयीमातेची मूर्ती दुसरीकडे नव्या मंदिरात ठेवण्यात आली आहे. इथून पुढे गेल्यावर दोन मोठी प्रवेशद्वारे दिसतात. एक आहे तो बडा पत्थर दरवाजा, राजमहालाचे उत्तरेकडील प्रवेशद्वार म्हणून हा दरवाजा सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात महाराजे बीरसिंह यांनी बांधला. या दुमजली प्रवेशद्वाराच्या आत सैनिकांना बसण्याची जागा आहे. तिथेच जवळ एक छोटे प्रवेशद्वार आहे ते देखील याच काळात बांधले गेले होते. हि दोन्ही प्रवेशद्वारे राजघराण्याच्या एकेकाळच्या वैभवाची साक्ष देतात. जवळच सतराव्या शतकामध्ये बांधलेला एक दगडी रथ दिसतो.
मदन मोहन मंदिर हे इथले सर्वात प्रसिद्ध मंदिर. एक शिखराचे हे मंदिर इ.स १६९४ मध्ये मल्ल राजा दुर्जनसिंह यांनी बांधले. विष्णुपूरच्या सर्व मंदिरांमध्ये हे अतिशय सुंदर मंदिर म्हणून गणले जाते. भगवान विष्णू यांचा अवतार मदन मोहनाची मूर्ती या देवळात आहे. विष्णुपूरच्या काही मंदिरांमध्ये मूर्ती देखील आहेत आणि त्यांची पुजादेखील केली जाते त्यातले हे एक. मदन मोहन मंदिरात गेल्यानंतर मलाही पूजा करण्याची संधी मिळाली. पण इथल्या सर्वच मंदिरात अशा प्रकारे पूजा केली जात नाही. या मंदिराला दोन संयुक्त छते आहेत. सर्वात जुनी आणि प्रचंड दालमदल तोफ इथले आकर्षण आहे. इ.स १७४२ मधली हि तोफ ११२ क्विंटल वजनाची आणि ३.८ मीटर लांबी आणि ३० सेंटीमीटर व्यासाची आहे. मल्ल राजांच्या या मल्लभूमीवर अठराव्या शतकात मराठ्यांनी देखील आक्रमण केले होते. त्यावेळी हि तोफ वापरण्यात आली होती. एक शिखराचे छिन्नमस्त मंदिर लाईम आणि लेटेराईट स्टोनमधून बांधून काढले आहे. दुर्गेच्या या जीर्णशीर्ण मंदिराचे पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. पुढे जवळ जवळ असणारी एक शिखरीय सात मंदिरे पाहायला मिळाली. यामध्ये नंदलाल मंदिर आणि जोरमंदिर यांचा समावेश आहे. जोरमंदिराच्या एकाच आवारात तीन छोटी मंदिरे आहेत, ती मल्ल राजा कृष्ण सिंग याने इ.स १७२६ मध्ये बांधली. राधागोविंद मंदिर देखील पाहण्यासारखे आहे. हे देखील इ.स १७२९ मध्ये मल्ल राजा कृष्ण सिंग यानेच बांधले. इथून जवळच इ.स १७३७ मध्ये बांधले गेलेले राधामाधव मंदिर आहे. दोन छते आणि एक शिखराचे हे मंदिर आहे. मल्ल राजा कृष्णसिंह याची पत्नी चूडामणीदेवी हिने हे देऊळ बांधले. याच रस्त्यावर पुढे कलाचंद मंदिर आहे. इ.स १६५६ मध्ये मल्ल राजा रघुनाथसिंह याने हे मंदिर बांधले परंतु आता याचे काही भग्न अवशेषच उरले आहेत.
ही सर्व मंदिरे पहाताना पायी चालण्याइतके अंतर आहे. तरीही वेळ वाचवण्यासाठी गावात उतरल्यावर एक सायकल रिक्षा सर्व मंदिरांच्या फेरफटक्यासाठी ठरवून घेतली की काम सोप्पे होते. मंदिर पाहण्याची सुरुवात रसमंचपासून करावी लागते कारण तिथेच सर्व मंदिरांसाठीचे प्रवेश तिकीट फी घेऊन दिले जाते. इतर पाहण्यासारखे म्हणजे गावातल्या वेस्ट बंगाल टुरिस्ट लॉजच्या बाजूचे विष्णुपूर संग्रहालय अर्थात आचार्य योगेशचंद्र पुराकीर्ती भवन आणि बालुचारी साड्या बनवणाऱ्या विणकरांची घरे. आपल्या गन्जीफा पत्त्यांच्या खेळाप्रमाणे इथे मल्ल राजे पूर्वी दशवतार हा पत्त्यांचा खेळ खेळायचे तसे पत्ते देखील दुकानात विकत मिळतात. विष्णुपूरमध्ये खरेदी करण्यासारखे फार काही नाही. भारतीय हस्तकलेचे प्रतिक म्हणून जिथेतिथे दिसणारे इथले टेराकोटाचे बांकुरा घोडे जगविख्यात आहेत. खास शंखापासून बनवलेल्या दागिने,शोभेच्या वस्तू आणि नक्षीचे कोरीवकाम केलेले शंखही इथे मिळतात. (बंगाली संस्कृतीत शंखाला खूप महत्वाचे स्थान आहे.) टेराकोटाच्या वस्तूंची तुरळक दुकाने इथे दिसतात. टेराकोटापासून बनलेली खेळणी, भांडी,दागिने,घोडे,हत्ती,कासवे असे काही प्राणी आणि इतर काही शोभेच्या वस्तू विकण्याचा जोडधंदा इथे चालतो. जोडधंदा म्हटले अशासाठी कि विष्णुपूरजवळच असणाऱ्या पंचमुरा या गावात ‘कुंभकार’ जातीच्या टेराकोटा कारागीरांची काही कुटुंबे राहतात. बंगालच्या इतरही काही जिल्ह्यांमधील गावात टेराकोटा कारागीर राहतात. टेराकोटा कला जगवण्याचा ही कुटुंबे प्रयत्न करत आहेत पण यातील उत्पन्न फारच कमी असल्याने पुढची पिढी उदरनिर्वाहाच्या इतर मार्गांकडे वळतेय आणि पर्यायाने टेराकोटा उद्योग देखील अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे. इथल्या वस्त्रोद्योगालाही शतकांची परंपरा आहे. इथल्या बालुचारी साडीने विष्णूपुरचे नाव जगाच्या नकाशावर नेले. या साडीवर देखील टेराकोटा देवळांची नाजूक नक्षी पाहायला मिळते. अर्थातच अस्सल रेशीम असल्याने त्या खूप महागदेखील आहेत. ज्यांना संगीतकलेत रस आहे त्यांच्यासाठी विष्णुपूर अनोळखी नाही. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतात विष्णुपूर घराणे तर प्रसिद्धच आहे. डिसेंबरमध्ये इथे विष्णुपूर मेळा आणि संगीत महोत्सव साजरा होतो.

मल्ल राजांच्या काळात हे टेराकोटा मंदिरांचे स्तोम बंगालमध्ये अधिकच वाढले पण आपल्याकडे अजूनही चांगल्या स्थितीत असलेली टेराकोटातून बांधलेली अनेक सुंदर देऊळे उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश,झारखंडमध्ये देखील आहेत. सर्वात प्राचीन असे सहाव्या शतकातील टेराकोटा मंदिर उत्तरप्रदेशातील कानपूर जवळ असलेल्या भीतरगाव येथे आहे. एकट्या बंगालमध्येच पाहायला गेले तर बांकुरा आणि आजूबाजूच्या परिसरात तसेच दिनाजपूर, मुर्शिदाबाद, मालदा, वीरभूम, वर्धमान, हुगळी,पुरुलिया जिल्ह्यांमध्ये पुष्कळ टेराकोटा देऊळे पाहायला मिळतात. ती मंदिरे तर विष्णुपूरपेक्षा अधिक जुनी आहेत. परंतु वाईट स्थिती म्हणजे एवढे महत्वाचे ऐतिहासिक वैभव बाळगणाऱ्या दक्षिण बंगालमधील बांकुरा, वर्धमान, दुर्गापूर, विष्णुपूर अशा ठिकाणांना अजूनही शहरीकरणाच्या वाऱ्यांचा कोणताही फायदा झालेला दिसत नाही. महाराष्ट्रातील तालुका आणि जिल्हा पातळीवरील शहरांच्या तुलनेत तर ही शहरे जुनाट वाटतात, अर्थात त्याची राजकीय आणि सामाजिक कारणेही आहेत. गेली अनेक वर्षे विष्णुपूर मंदिराच्या ऐतिहासिक ठेव्याला युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळावा म्हणून भारत सरकार आणि पश्चिम बंगाल राज्य सरकार प्रयत्नात आहे. अमेरिकन वकिलातीच्या सांस्कृतिक संवर्धन निधीतून देखील या मंदिरांच्या देखभालीसाठी अनुदान देण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात विष्णुपूरला आजही अगदी जिल्हास्तरीय सुंदर गाव म्हणण्याचेही धाडस होत नाही. विष्णुपूर जेव्हा सर्व सोयीसुविधांनी युक्त बनेल तेव्हा निश्चितच या टेराकोटा देवळांच्या शहराला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळेल अशी आशा आहे. एकूणच विष्णुपूर आज शतकांचा इतिहास कवेत घेऊन बसलेय. सर्वात जास्त सुरस माहिती-कथा कोणत्या काळात दडलेल्या असतात तर त्या नेहमीच भूतकाळात असतात, म्हणूनच इतिहासकालीन वास्तूसंशोधन किंवा अश्या वास्तू पर्यटक म्हणून जाऊन पाहणे हे खरे तर अत्यंत मनोरंजक आहे. खूपजणांच्या मते हा एक नीरस आणि कंटाळवाणा उद्योग आहे, पण अश्याच विचारांमुळे जेव्हा आपण एखाद्या पुरातन वास्तूसमोर उभे राहतो तेव्हा प्रत्यक्ष इतिहास आपल्यासमोर बोलका होतोय हि गोष्ट अनुभवणे आपण विसरून जातो. आपल्या देशात मंदिरे आणि किल्ले यांनी असाच लाखो पानांचा इतिहास आपल्यासाठी लिहून ठेवलाय पण आपण काय करतो, तर तिथे जाऊन त्या उत्तुंग वास्तूंच्या अंगावर काहीतरी बकाल आणि निरर्थक खरडवून ठेवतो. सगळ्याच इतिहासकालीन वस्तूंना पुरातत्व खात्याचे किंवा इतर प्रकारचे संरक्षण लाभू शकत नाही त्यामुळे होताहोईस्तो विष्णुपूरसारख्या या वास्तू इतिहास जपत आणि सांगत उभ्या राहतील. विष्णुपूरच्या मंदिरांना भविष्यात युनेस्कोकडून जागतिक दर्जाचे स्थळ असल्याचा मान कदाचित जाहीर होईल देखील पण आपापल्या गावात किंवा शहरात देखील अशा काही इतिहासकालीन वास्तू, वस्तू अथवा शिलालेख असल्यास त्यांची काळजी प्रथम तिथल्या नागरिकांनीच घेतली तर उत्तम कारण शेवटी अश्या प्रकारच्या इतिहास पर्यटनातून मिळणाऱ्या पैशांच्या उपयोगाने गावाचा देखील विकास होत असतो. त्यामुळे भारताच्या सांस्कृतिक पर्यटनात मोठा वाटा ऐतिहासिक पर्यटनाचा आहे हे विसरून चालणार नाही. 
विष्णुपूरला कसे जाल :- कोलकातापासून विष्णुपूर सुमारे २०० ते २५० कि.मी अंतरावर आहे. हावड्याहून विष्णुपूरला जाण्यासाठी आरण्यक एक्स्प्रेस,रूपाशी बांगला एक्स्प्रेस आणि पुरुलिया एक्स्प्रेस रेल्वेगाड्या आहेत. वेस्ट बंगाल टुरिस्ट लॉजखेरीज राहण्यासाठी आणि जेवण्यासाठी बरेच पर्याय विष्णुपूरमध्ये उपलब्ध आहेत. ते फारसे चांगले नसले तरी अगदीच गैरसोयीत टाकणारे देखील नाहीत. विष्णुपूरला बसने देखील जाता येते. दुर्गापूर एक्स्प्रेसवेचा शेवटचा रस्ता सोनामुखी गावातून अत्यंत सुंदर हिरव्यागार जंगलातून जातो. दुतर्फा असलेली वनश्री मन अत्यंत प्रफुल्लित करते, अर्थात बसने जाण्याचा अनुभव खराब रस्त्यांमुळे काही सुखकर होत नाही, त्यामुळे एव्हढाच काय तो काही मिनिटांचा पट्टा मन रमवून प्रवासाचा शीण दूर करतो. विष्णुपूरमध्ये WBTDC च्या लॉजमध्ये राहण्याची आणि जेवण्याची चांगली व्यवस्था आहे आणि मंदिरे पाहण्यासाठी  त्यांचा मार्गदर्शकही मिळतो. 
Note- This blog article was earlier published in Marathi news daily 'Prahaar' , please read it through this link http://prahaar.in/collag/127153 and also give your suggestions. Thanks.

Sunday, November 11, 2012

सुंदरबन सफारी

बोनबीबी आणि दक्षिण राय देवाच्या जंगलातला शिकारी दबक्या पावलानी येतो मात्र चालत येत नाही तर तो पोहोत येतो आणि ते देखील तब्बल २-३ कि.मी अंतर पार करून येतो. परत जाताना शिकारीचे ओझे देखील पाण्यातूनच घेऊन जातो. त्याच्याच दहशतीमुळे बोनबीबीच्या म्हणजे वनदेवतेच्या पायाशी हिंदू आणि मुस्लीम दोघेही एकत्र येतात. ती त्यांचे जगातल्या सर्वात शक्तिमान आणि धूर्त शिकाऱ्यापासून संरक्षण करेल अशी सुंदरबनमध्ये राहणाऱ्या स्थानिकांची घट्ट श्रद्धा आहे आणि म्हणूनच जंगलात मध गोळा करायला जाताना किंवा मासेमारीसाठी जाताना हे स्थानिक बोनबीबीला साकडं घालून जातात. पण तेवढयानेही भागले नाही तर संकटाला दूर ठेवण्यासाठी सुंदरबनच्या आसमंतात रात्री फटाके आणि ढोलाच्या आवाजाचे पडसाद उमटतात. तरीही इथला सर्वेसर्वा म्हणजे रॉयल बंगाल टायगर त्याची शिकार उचलतोच. सुंदरबनमधील गावागावातून वाघाने केलेल्या शिकारींचे किस्से ऐकायला मिळतात. इथला निसर्ग जेवढा लहरी आहे तेवढाच इथला माणूस आणि वाघ देखील चिवट इच्छाशक्तीचा आहे. त्यामुळेच पश्चिम बंगालमधील सुंदरबन जगातील एक आश्चर्य आहे आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक आहे.

सुंदरबनमध्ये प्रवेश करणारे बहुतांशी पर्यटक ‘रॉयल बंगाल टायगर’ दिसेल काय अशीच हुरहूर मनाशी बाळगून बोटीतल्या प्रवासाला सुरुवात करतात आणि या भटकंतीमधला खरा थरार हरवून बसतात. प्रवासाच्या सुरुवातीला सोबत करणारी किनाऱ्याला लगटून असणारी छोटी छोटी गावं कधीच मागे पडलेली असतात. आता जमिनीच्या सीमा नजरेला शोधाव्या लागतात आणि समोर फक्त गंगा, ब्रह्मपुत्रा, मेघना आणि त्यांच्या अनेक उपनद्यांचा निळाशार कॅनव्हास अफाट पसरलेला असतो आणि तेव्हाच वर आकाशात भान हरपवून टाकणारा रंगांचा विलक्षण खेळ सुरु असतो. दुतर्फा हेन्ताल( गोलपाता) ,काकडा आणि सुंदरीच्या झाडांनी ( इथल्या स्थानिक भाषेत तिवरांना सुंदरीची झाडं म्हणतात. ती बहुसंख्येने इथे आहेत म्हणूनच हे सुंदरबन ) व्यापलेले किनारे , किनाऱ्यावर उन खात पहुडलेल्या आणि बोटीच्या आवाजाची चाहूल लागताच पाण्यात गडप होण्याऱ्या विशालकाय मगरी, हिरवळीच्या पट्ट्यामध्ये चरणारी हरणं, माकडं आणि इतर प्राणी, लाटांनी बनवलेले पुळणींचे विविध आकार आणि त्यावर बसलेले अनेक जातींचे पाणपक्षी, बांगलादेशच्या बाजूने येणारी मोठाली व्यापारी जहाजं असं सर्व पाहता पाहता विचारांना आणि नजरेला कोंदण उरत नाही पण या इंडियन अमेझॉनच्या प्रदेशाची अद्भूत सफर आत्ता कुठे सुरु झालेली असते. पश्चिम बंगालच्या २४ परगणा जिल्ह्याच्या उत्तर आणि दक्षिण भागातले सुंदरबन व्याघ्र प्रकल्पाचं जंगल निश्चितच बंगालच्या पर्यटन क्षेत्रासाठी सोन्याची खाण आहे. भारतीय सुंदरबन ९६२९ चौरस कि.मी इतक्या क्षेत्रफळावर अफाट पसरलेलं आहे. परंतु पूर्ण सुंदरबनचा मोठा म्हणजे २/३ हिस्सा बांगलादेशातही गेलाय. हुगळी, गोमर, दुर्गादुनी आणि गोमदी या चार नद्यांचा संगम जिथे होतो तो सुंदरबनमधला प्रदेश तर स्तिमित करून सोडतो.

सुंदरबनचा खरा प्रवास सुरु होतो तो गोद्खाली जेटीपासून. कधी कधी जे चित्र काना-डोळ्यांसमोर रेखाटले जातं त्यापेक्षा सत्य नेहमीच काहीतरी वेगळे असू शकते. सांगायचं कारण असं कि पर्यटन करताना भ्रमनिरास करणारे अनुभव नेहमीच येतात आणि सुंदरबनला भेट देण्याआधी देखील अशीच काहीशी भीती मनात होती. कोलकाता ते गोद्खाली गावापर्यंतच्या रस्ता नामक मातीच्या खड्डेयुक्त पट्ट्याने या भीतीला तडा जाऊ दिला नाही. नाही म्हणायला दुतर्फा अगदी केरळात असल्यासारखे नजारे होते पण खड्डे मात्र देवाचे नाव घ्यायला लावत होते. गोद्खालीपर्यंत कित्येक गावा-गावांमधून प्रवास होतो. पश्चिम बंगालचं खरं चित्र दाखवणारी ही छोटी गावं बाजूबाजूने दिसत राहतात. एका अर्थानं भारतातली प्रातिनिधिक गावं, गरीब तरी ही आनंदी. प्रत्येक घराची भातशेती, अंगणात बागडणारी बदकं आणि मासे असलेलं तळं असल्याशिवाय इथल्या गावातलं घर पूर्ण होत नाही. इथेच एकेकाळच्या प्रसिद्ध येझदी बाईकची सायकल रिक्षा केलेली पाहायला मिळाली. पश्चिम बंगालच्या गावा-गावात लोकप्रिय असणाऱ्या या सायकल रिक्षाला येझदी बाईकचं इंजिन जोडणाऱ्या भन्नाट डोक्याला मानलं पाहिजे. गोसाबा मार्केटपर्यंतचा सुमारे ३ तासांचा रस्त्यावरून होणारा प्रवास जरा त्रासदायक आहे पण एकदा का मोटारलॉन्चने नदीतून प्रवास सुरु झाल्यावर सर्व कंटाळा निघून जातो. फोटोग्राफर्ससाठी अक्षरशः नंदनवन असणाऱ्या या टायगर रिझर्वमध्ये शिरल्यावर भान हरपून जाते.

सुंदरबनचे कोअर, फक्त पर्यटकांसाठी आणि बफर असे तीन विभाग पाडण्यात आले आहेत कारण इथल्या सर्वच बेटांवर पर्यटकांना प्रवेश नाहीये. एकूण १०८ बेटांपैकी ५४ बेटांवर मानवी वस्ती आहे आणि फक्त अशा बेटांच्या आजूबाजूलाच प्रवाशांना फिरवले जाते. सजनेखाली इथं वनविभागाचं ऑफिस आहे तिथे गेल्यावरच गाईड दिला जातो. एकूण २१ गाईड आहेत ज्यापैकी वेळेला काहीच उपलब्ध असतात कारण अनेकदा हे गाईड तिथल्या रिसोर्टसाठी देखील काम करतात. त्यामुळे गाईड मिळणं मुश्कील असते आणि म्हणूनच बरोबर जर एखादा तज्ञ असेल तर उत्तमच ( तज्ञ सोबत असावाच कारण सुंदरबन एक भूलभुलैया आहे आणि माहितगार माणसाशिवाय कधी कधी बोटी भरकटत पार बांगलादेशच्या सीमेला जाऊन पोहोचतात. ) सजनेखालीला बोटीची आणि गाईडची नोंद झाल्यानंतरच सुंदरबन भ्रमंती सुरु होते. सजनेखालीला देखील वॉच टॉवर आणि सजनेखाली म्यान्ग्रोव इंटरप्रीटेशन सेंटर आहे. हा परिसर अगदीच माणसाळलेला असल्याने इथेच आजूबाजूला काही रिसोर्टस देखील आहेत. सजनेखाली,सुधन्यखाली, दोबांकी, नेतीधोपानी, बुरीर दाब्री, मारीच झापी, कुमीरमारी अश्या काही वॉच टॉवर्स आणि बेटांच्या बाजूने प्रवाशांना फिरवले जाते पण या फिरवण्यात देखील सहल संचालक लबाडी करतातच. अगदीच अनभिज्ञ असणाऱ्या हौशी प्रवाशांच्या कळपाला घेऊन वरवर तिथल्या तिथे गोल गोल फिरवले जाते, मघाशी म्हटल्याप्रमाणे सुंदरबन भूलभुलैया असल्यामुळे फिरताना सगळीकडे पाणीच पाणी आणि तिवरांची झाडी दिसत असल्यामुळे फारसा वेगळेपणा जाणवत नाही आणि त्यातून बोटीवर गाणी,खाणे-पिणे यात प्रवाशांना गुंगवून ठेवले जाते त्यामुळे बाहेर लक्ष गेलेच तरी कोणाच्या फारसं काही लक्षात येत नाही. सजनेखालीवरून बोट फिरत फिरत सुधन्यखाली,दोबांकी,नेतीधोपानी, बुरीर दाब्री इथल्या वॉच टॉवर्सकडे घेऊन जाते.

बुरीरदाब्रीचा रायमंगल वॉच टॉवर आणि सिमेंटच्या ठोकळ्यांवरून घेऊन जाणारा वॉक चुकवूच नये असा आहे कारण एकतर या वॉचटॉवरवरून अगदी समोरच बांगलादेशची सीमा आपल्याला दिसते अन् सभोवताल पसरलेलं घनदाट जंगल. वॉचटॉवरपर्यंत पोहोचण्यासाठी आधी एक केज वॉक करावा लागतो ज्यामध्ये दुतर्फा लोखंडी जाळी लावलेल्या चिखलमय मार्गावर सिमेंटचे दोन फ़ुट उंचीचे ब्लॉक्स बनवून ठेवले आहेत आणि अश्या सुमारे १००-१५० ब्लॉक्सवरून उड्या मारत मारत आपण बुरीरदाब्रीच्या वॉचटॉवरपाशी पोहोचतो. नेतीधोपानी आणि दोबांकीचे वॉचटॉवरही पाहण्यासारखे आहेत. बुरीरदाब्रीला आपण केज वॉक करतो तर दोबांकीला एका बंदिस्त पुलावरून तिवरांच्या जंगलात जाता येतं. या पुलाला दुतर्फा नायलॉनच्या जाळ्या लावून सुरक्षित केलं आहे. या ठिकाणी बरीच हरणं चरताना दिसतात आणि कर्मचाऱ्यांच्या माहितीनुसार तिथं वाघदेखील कधी कधी शिकारीसाठी येतो. अर्थातच सुंदरबनमध्येही वाघ पहायला मिळणं हे कठीणच आहे. नेतीधोपानी वॉचटॉवरच्या परिसरात एक चारशे वर्षांपूर्वीचे शिवमंदिर आहे पण आता त्याचे फक्त भग्नावशेषच पाहायला मिळतात.

सुंदरबनला गेल्यावर एकवेळ वाघ नाही दिसला तरी चालेल ( कारण तो इतर जंगलातही दिसतोच ) पण अफाट पसरलेल्या भारताच्या या ‘अमेझॉन’ मधून छोट्याश्या नावेतून स्वतः वल्हं मारत जाण्याचा जाण्याचा अनुभव खरेच अमेझिंग आहे. किनाऱ्यावर असलेल्या ‘चारघेरी चार’ गावात छोट्या होडक्यांमधून पोहोचण्याच्या आधी, किनारा अर्धा तासभर दूर असताना ( म्हणजे खरे तर किनारा सुरक्षित असा नजरेच्या टप्प्यात असताना ! ) आमच्या हातात वल्हं सोपवलं गेलं आणि नावाड्यांनी चक्क विश्रांती घेतली. अर्थातच वल्हं चालवताना आमची होणारी त्रेधा पाहून त्यांचीदेखील छान करमणूक झाली. आम्ही वल्हं मारताना नावाड्यांची आम्हाला कळू न देता काहीतरी कुजबुज सुरु होती, पण आमच्या होडीत मी सोडल्यास कोणीच बंगाली समजणारे नव्हते त्यामुळे ( मी सोडून !) कोणीच घाबरले नाही. नावाड्यांनी जवळपास मगर पाहिली होती पण हे जर आम्हाला कळले असते तर आम्ही घाबरलो असतो म्हणूनच त्यांनी मगर पाहिल्याची आम्हाला गंधवार्ता देखील लागू दिली नाही. सुंदरबनला गेल्यावर मोटरबोटीतून प्रवास अनिवार्य आहे अन्यथा दुसरा पर्याय नाहीच. पाण्यात तरंगण्यापासून ब्रेक हवा असेल तर सरळ रिसोर्टवर परतायचे नाहीतर चिखलातून चालत किनाऱ्यावरल्या गावात शिरायचे. ‘चारघेरी चार’ गावात जाताना मडफ्ल्याट म्हणजे रेतीच्या गाळातून चालण्याचा भन्नाट अनुभव घेतला. गाळामधली रेती चिकणमातीसारखी पांढरी आणि चमकणारी असते. पण अश्या या घट्ट चिखलात गुडघ्यापर्यंत पाय रुतला कि बाहेर काढणं अतिशय कठीण होऊन बसतं. त्यातच आतमधून पायाला स्पर्श होणारा खेकडा आहे कि समुद्री वनस्पती या भीतीने पाय वर काढण्यासाठी जोर लावत किनारा ते गाव असा मडवॉक पार पडतो. या चिखलात पाऊल टाकण्याआधी हातभर अंतर चालायला कितीसा वेळ लागतोय असं वाटलं होतं पण नंतर हेच अंतर पार करताना अशी धमाल आली कि एव्हढेसे अंतर चालायलाच अर्धा तास लागला. अश्या या चिखलातून पाय रुतवत आणि वर काढण्याचा व्यायाम करतच गावात पोहोचलो. इथे पाण्यात भयानक मोठ्या मगरींचं वास्तव्य आणि काठावरल्या जंगलात वाघासारखं अत्यंत हिंस्त्र श्वापद त्यामुळेच सुंदरबन आजही मोठ्या प्रमाणावर निर्मनुष्य आहे. आहेत ती गावंदेखील खूप मोठी नाहीतच. एका गावात फारतर २०-३० घरं असतात. गावाच्या किनाऱ्यावर होड्या आणि बोटींच्या येण्या-जाण्याकरिता जेट्टी म्हणजे धक्का बांधलेला असतो. काही गावात तर अश्या जेट्टीचीही सोय नसते,तर तिथे फक्त सिमेंटचे दगड बसवून पाण्यापर्यंत पोहोचण्यासाठी पायवाट केलेली असते. पश्चिम बंगालमध्ये भावी काळात येणारं आणि सध्या असलेलं सरकार केव्हा तरी भलं करेल अश्या आशेत इथले गावकरी अजूनही दिवस काढतायत. ऐन पावसाळ्यात तर यांच्यासाठी अजूनच हलाखीचे दिवस. पावसाळ्यापूर्वी गावकरी छोट्या होड्या-नावांमधून आवश्यक साधन-सामुग्रीचा जमेल तसा साठा करून ठेवतात. अशीच ने-आण एरव्हीदेखील रोजच्या प्रवासात चालते. मग अगदी बाळंतीण असू देत वा शाळकरी मुलं, रोजच्या प्रवासासाठी मग होडीशिवाय पर्याय नाही. २००९ साली आलेल्या ‘आयला’ वादळानं इथल्या गावकऱ्यांचे जीवन पुरतं उध्वस्त केले ज्याच्या परिणामाच्या धक्क्यातून ते आता सावरलेयत खरे पण आर्थिक नुकसानाची भरपाई अजूनही काहीजणांपर्यंत पोहोचलेली नाही. आज ना उद्या कोणतं तरी सरकार आपला त्राता बनेल याची ते वाट पाहतायत. भाजीपाला,तांदळाची शेती,गाई-गुरांचं पालन तसेच मत्स्यपालन हाच त्यांचा उदरनिर्वाह. काही गावकरी जंगलात मध गोळा करण्याचं धाडस दाखवतात पण हा मध गोळा करून विकण्याचा धंदा खुपच जोखमीचा कारण तसेही गावात वाघाचे हल्ले होत राहतात त्यात मध गोळा करायला किंवा चोरट्या शिकारीसाठी प्रत्यक्ष जंगलात जायचं म्हणजे वाघाच्या जाळ्यात आयतेच सापडणं. वाघांचे हल्ले आणि वादळी हवामान यामुळे या गावकऱ्यांचे दैनंदिन जीवन सतत धोक्याच्या रडारवर असते. या ग्रामीण भागात वीजपुरवठा नाही. अतिशय दुर्गम ठिकाणी असणाऱ्या या गावांचा पावसाळ्यात तर जगाशी संपर्कच संपतो.

इथल्याच स्थानिकांमधून मग गाईड तयार होतात. त्यातलेच काही जण बोटी किंवा लॉन्च भाड्याने देण्याचा व्यवसाय करतात. दीपंकर मंडल, मृत्युन्जय, निरंजन रपतानसारखे अनेक स्थानिक गाईड इथं नावाजलेले आहेत. फक्त गाईडगिरी करणं हाच त्यांचा व्यवसाय नाही तर त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या लॉन्चदेखील असतात. अनेकदा हे सर्व रिसोर्टशी किंवा शहरातील एखाद्या टूर ऑपरेटरशी बांधील असतात. वनखात्याचे एकूण २७ गाईड उपलब्ध असतात, पण सिझनच्या वेळेस एकही गाईड मिळत नाही. आमचा गाईड होता अमर रपतान- गाईड नंबर १९. सुंदरबनमधील अवाढव्य प्रदेशात फिरण्यासाठी नावाड्याना मार्ग ठरवून दिलेले आहेत. त्यातूनच मग पर्यटक बोटी फिरतात. बोटीने सुंदरबनमध्ये फिरण्याचा आणि दिवसरात्र बोटीवरच काढण्याचा अनुभव विलक्षण असतो, कारण या मोटर बोटी म्हणजे लक्झरी क्रुझ नव्हेत. हवामान ठीक असेल तरच मोटरबोटी बाहेर काढल्या जातात. पाउस इथे अवकाळी आहे त्यामुळे असा पाउस आणि वादळी हवा असेल तर पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या बोटी बाहेर काढण्याचा धोका कोणी पत्करत नाही. मुख्य म्हणजे अश्या वातावरणात वाघ दिसण्याची शक्यता अजिबात नसते आणि तसेही सुंदरबनला जाऊन पाण्यात पोहणारा वाघ दिसेल अशी अपेक्षा ठेवली तर प्रचंड निराशा होईल कारण सुंदरबनमधला वाघ कान्हा किंवा बांधवगढ जंगलातल्या वाघांसारखा सहजगत्या दृष्टीस पडणं म्हणजे चमत्कारच. तरीही लॉन्चवर काही दिवस राहण्याचा अनुभव घेण्यासारखा आहे किंबहुना जर हा अनुभव घ्यायचा नसेल तर इतक्या लांबपर्यंत तंगडतोड करत जाणेच व्यर्थ आहे.

सुंदरबन नैसर्गिकरित्या विलक्षण शांत प्रदेश आहे, शांतता इतकी नीरव कि पाण्यात सुळकन मासा जरी गेला तरी आवाज ऐकू येतो. सुंदरबन त्रिमितीत अनुभवण्याची गोष्ट आहे. जमीन, आकाश आणि पाणी यांचं एखाद्या ठिकाणी किती महत्व असू शकते हे इथे आल्यावरच कळते. गेली शेकडो वर्षं इथल्या निर्मनुष्य बेटांवर रॉयल बंगाल वाघाचं वर्चस्व होतं पण आता याच आदिम प्रदेशात माणसांची धांगडधिंगा घालणारी पावलं रुतायला लागली आहेत. तसे म्हटले तर जमिनीवरल्या जंगलाचे नियम या प्रदेशातील जंगलाला लावता येत नाहीत कारण इथली माणसे, वाघ, इतर पशु-प्राणी आणि जैव-विविधता यावर फक्त निसर्गाचीच हुकुमत चालते. सुंदरबनमध्ये असे म्हटले जाते कि जमिनीवर वाघाच्या तावडीतून सुटलात तर मगरी पाण्यात तुमची खबर घेतीलच एकूणच काय दोन्हीही ठिकाणी इथला मनुष्य शिकाऱ्याच्या तावडीतून सुटू शकत नाही. तरीही कोणत्याही भीतीला न जुमानता पर्यटक इतक्या दुर्गम ठिकाणी येऊन सुंदरबनसारख्या अतिशय मनोहारी प्रदेशाची वाट लावतच आहेत. वाघांच्या चोरट्या शिकारी इथे जास्त होत नाहीत पण इथल्या पर्यावरणाची मात्र गेली कित्येक वर्षे इमानदारीत नासधूस केली जाते आहे. किनाऱ्यावरच्या संरक्षक जाळ्यांमध्ये अडकून राहिलेल्या जेवणासाठी वापरल्या जाणाऱ्या थर्माकोलच्या थाळ्या याची साक्ष देतात. रिसोर्टवर आणि लॉन्चवर वाजवले जाणारे कर्कश संगीत यामुळे इथली शांतता तडीपार होण्याच्या मार्गावर आहे. मात्र इथला निसर्ग आणि प्राणी देखील अतिशय लहरी आहेत त्यामुळेच माणसाची सुंदरबनमध्ये फारशी सत्ता चालत नाही आणि म्हणूनच बोनबिबिच्या कृपेने सुंदरबनचे वाघ देशातल्या इतर जंगलांपेक्षा अधिक सुरक्षित आहेत.

सुंदरबनच्या सफरीसाठी लक्षात ठेवा :

कसे जाल? कोलकाता शहरातून सोनाखाली, नामखाना, सागर आयलंड किंवा बक्खाली येथे बाय रोड जाऊन पुढील जलप्रवास सुरु करता येतो.

कुठे राहाल? साजनेखाली टुरिस्ट लॉज, दयापूर, पाखीराला.

काय पाहाल? सागर आयलंड, बक्खाली, कॅनिंग, साजनेखाली, दोबांकी, सुधन्यखाली,लोथीआन आयलंड, नेतीधोपानी, भागबतपूर, सुंदरकती, बुरीरदाब्री, हालीडे बेट, कलशद्वीप बेट,कुमीरमारी, मोरीचझापी इत्यादी.

एकूण प्रवास तास किती? बाय रोड ३-४ आणि जलप्रवास ३-४ तास असा मिळून एका दिवसात ७ ते ९ तासांची भटकंती होतेच.
Way to Sunderban,West Bengal-
From City of Kolkata, reach to Sonakhali, Namkhana, Sagar Island or Bakhali by road and then travel by launch to Sajanekhali,Dayapur or Pakhirala. There are some resorts near Sajanekhali and also the WBTDC tourist lodge is available at Sajanekhali. It takes around 3-4 hours from Kolkata to Godkhali jetty.
                                              
( सुंदरबन माझ्या आतापर्यंतच्या सर्व जंगल सफारीमधला सर्वात अविस्मरणीय असा अनुभव होता. तिथे प्राणी पाहायला तर मिळालेच पण इतक्या दुर्गम प्रदेशात माणसं कशी निसर्गाशी मिळतं-जुळतं घेऊन राहतात हे देखील पाहायला मिळालं. सुंदरबनमध्ये वाघ पहिल्याच खेपेत दिसणं फार भाग्याची गोष्ट आहे पण युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा मिळालेलं हे जंगल अनुभवणं हे देखील तितकेच सुंदर आहे आणि खरे तर भारतीय जंगलाचा एक वेगळा प्रकार म्हणून हे जंगल आणि हा प्रदेश पाहिलाच पाहिजे. सुंदरबनच्या काही आठवणी माझ्या पुढील लेखात वाचायला मिळतील, त्यासाठी कृपया खालील लिंक क्लिक करा. )
http://epaper.prahaar.in/detail.php?cords=20,100,1478,1598&id=story2&pageno=http://epaper.prahaar.in/11112012/Mumbai/Suppl/Page8.jpg