Translate

Sunday, November 11, 2012

सुंदरबन सफारी

बोनबीबी आणि दक्षिण राय देवाच्या जंगलातला शिकारी दबक्या पावलानी येतो मात्र चालत येत नाही तर तो पोहोत येतो आणि ते देखील तब्बल २-३ कि.मी अंतर पार करून येतो. परत जाताना शिकारीचे ओझे देखील पाण्यातूनच घेऊन जातो. त्याच्याच दहशतीमुळे बोनबीबीच्या म्हणजे वनदेवतेच्या पायाशी हिंदू आणि मुस्लीम दोघेही एकत्र येतात. ती त्यांचे जगातल्या सर्वात शक्तिमान आणि धूर्त शिकाऱ्यापासून संरक्षण करेल अशी सुंदरबनमध्ये राहणाऱ्या स्थानिकांची घट्ट श्रद्धा आहे आणि म्हणूनच जंगलात मध गोळा करायला जाताना किंवा मासेमारीसाठी जाताना हे स्थानिक बोनबीबीला साकडं घालून जातात. पण तेवढयानेही भागले नाही तर संकटाला दूर ठेवण्यासाठी सुंदरबनच्या आसमंतात रात्री फटाके आणि ढोलाच्या आवाजाचे पडसाद उमटतात. तरीही इथला सर्वेसर्वा म्हणजे रॉयल बंगाल टायगर त्याची शिकार उचलतोच. सुंदरबनमधील गावागावातून वाघाने केलेल्या शिकारींचे किस्से ऐकायला मिळतात. इथला निसर्ग जेवढा लहरी आहे तेवढाच इथला माणूस आणि वाघ देखील चिवट इच्छाशक्तीचा आहे. त्यामुळेच पश्चिम बंगालमधील सुंदरबन जगातील एक आश्चर्य आहे आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक आहे.

सुंदरबनमध्ये प्रवेश करणारे बहुतांशी पर्यटक ‘रॉयल बंगाल टायगर’ दिसेल काय अशीच हुरहूर मनाशी बाळगून बोटीतल्या प्रवासाला सुरुवात करतात आणि या भटकंतीमधला खरा थरार हरवून बसतात. प्रवासाच्या सुरुवातीला सोबत करणारी किनाऱ्याला लगटून असणारी छोटी छोटी गावं कधीच मागे पडलेली असतात. आता जमिनीच्या सीमा नजरेला शोधाव्या लागतात आणि समोर फक्त गंगा, ब्रह्मपुत्रा, मेघना आणि त्यांच्या अनेक उपनद्यांचा निळाशार कॅनव्हास अफाट पसरलेला असतो आणि तेव्हाच वर आकाशात भान हरपवून टाकणारा रंगांचा विलक्षण खेळ सुरु असतो. दुतर्फा हेन्ताल( गोलपाता) ,काकडा आणि सुंदरीच्या झाडांनी ( इथल्या स्थानिक भाषेत तिवरांना सुंदरीची झाडं म्हणतात. ती बहुसंख्येने इथे आहेत म्हणूनच हे सुंदरबन ) व्यापलेले किनारे , किनाऱ्यावर उन खात पहुडलेल्या आणि बोटीच्या आवाजाची चाहूल लागताच पाण्यात गडप होण्याऱ्या विशालकाय मगरी, हिरवळीच्या पट्ट्यामध्ये चरणारी हरणं, माकडं आणि इतर प्राणी, लाटांनी बनवलेले पुळणींचे विविध आकार आणि त्यावर बसलेले अनेक जातींचे पाणपक्षी, बांगलादेशच्या बाजूने येणारी मोठाली व्यापारी जहाजं असं सर्व पाहता पाहता विचारांना आणि नजरेला कोंदण उरत नाही पण या इंडियन अमेझॉनच्या प्रदेशाची अद्भूत सफर आत्ता कुठे सुरु झालेली असते. पश्चिम बंगालच्या २४ परगणा जिल्ह्याच्या उत्तर आणि दक्षिण भागातले सुंदरबन व्याघ्र प्रकल्पाचं जंगल निश्चितच बंगालच्या पर्यटन क्षेत्रासाठी सोन्याची खाण आहे. भारतीय सुंदरबन ९६२९ चौरस कि.मी इतक्या क्षेत्रफळावर अफाट पसरलेलं आहे. परंतु पूर्ण सुंदरबनचा मोठा म्हणजे २/३ हिस्सा बांगलादेशातही गेलाय. हुगळी, गोमर, दुर्गादुनी आणि गोमदी या चार नद्यांचा संगम जिथे होतो तो सुंदरबनमधला प्रदेश तर स्तिमित करून सोडतो.

सुंदरबनचा खरा प्रवास सुरु होतो तो गोद्खाली जेटीपासून. कधी कधी जे चित्र काना-डोळ्यांसमोर रेखाटले जातं त्यापेक्षा सत्य नेहमीच काहीतरी वेगळे असू शकते. सांगायचं कारण असं कि पर्यटन करताना भ्रमनिरास करणारे अनुभव नेहमीच येतात आणि सुंदरबनला भेट देण्याआधी देखील अशीच काहीशी भीती मनात होती. कोलकाता ते गोद्खाली गावापर्यंतच्या रस्ता नामक मातीच्या खड्डेयुक्त पट्ट्याने या भीतीला तडा जाऊ दिला नाही. नाही म्हणायला दुतर्फा अगदी केरळात असल्यासारखे नजारे होते पण खड्डे मात्र देवाचे नाव घ्यायला लावत होते. गोद्खालीपर्यंत कित्येक गावा-गावांमधून प्रवास होतो. पश्चिम बंगालचं खरं चित्र दाखवणारी ही छोटी गावं बाजूबाजूने दिसत राहतात. एका अर्थानं भारतातली प्रातिनिधिक गावं, गरीब तरी ही आनंदी. प्रत्येक घराची भातशेती, अंगणात बागडणारी बदकं आणि मासे असलेलं तळं असल्याशिवाय इथल्या गावातलं घर पूर्ण होत नाही. इथेच एकेकाळच्या प्रसिद्ध येझदी बाईकची सायकल रिक्षा केलेली पाहायला मिळाली. पश्चिम बंगालच्या गावा-गावात लोकप्रिय असणाऱ्या या सायकल रिक्षाला येझदी बाईकचं इंजिन जोडणाऱ्या भन्नाट डोक्याला मानलं पाहिजे. गोसाबा मार्केटपर्यंतचा सुमारे ३ तासांचा रस्त्यावरून होणारा प्रवास जरा त्रासदायक आहे पण एकदा का मोटारलॉन्चने नदीतून प्रवास सुरु झाल्यावर सर्व कंटाळा निघून जातो. फोटोग्राफर्ससाठी अक्षरशः नंदनवन असणाऱ्या या टायगर रिझर्वमध्ये शिरल्यावर भान हरपून जाते.

सुंदरबनचे कोअर, फक्त पर्यटकांसाठी आणि बफर असे तीन विभाग पाडण्यात आले आहेत कारण इथल्या सर्वच बेटांवर पर्यटकांना प्रवेश नाहीये. एकूण १०८ बेटांपैकी ५४ बेटांवर मानवी वस्ती आहे आणि फक्त अशा बेटांच्या आजूबाजूलाच प्रवाशांना फिरवले जाते. सजनेखाली इथं वनविभागाचं ऑफिस आहे तिथे गेल्यावरच गाईड दिला जातो. एकूण २१ गाईड आहेत ज्यापैकी वेळेला काहीच उपलब्ध असतात कारण अनेकदा हे गाईड तिथल्या रिसोर्टसाठी देखील काम करतात. त्यामुळे गाईड मिळणं मुश्कील असते आणि म्हणूनच बरोबर जर एखादा तज्ञ असेल तर उत्तमच ( तज्ञ सोबत असावाच कारण सुंदरबन एक भूलभुलैया आहे आणि माहितगार माणसाशिवाय कधी कधी बोटी भरकटत पार बांगलादेशच्या सीमेला जाऊन पोहोचतात. ) सजनेखालीला बोटीची आणि गाईडची नोंद झाल्यानंतरच सुंदरबन भ्रमंती सुरु होते. सजनेखालीला देखील वॉच टॉवर आणि सजनेखाली म्यान्ग्रोव इंटरप्रीटेशन सेंटर आहे. हा परिसर अगदीच माणसाळलेला असल्याने इथेच आजूबाजूला काही रिसोर्टस देखील आहेत. सजनेखाली,सुधन्यखाली, दोबांकी, नेतीधोपानी, बुरीर दाब्री, मारीच झापी, कुमीरमारी अश्या काही वॉच टॉवर्स आणि बेटांच्या बाजूने प्रवाशांना फिरवले जाते पण या फिरवण्यात देखील सहल संचालक लबाडी करतातच. अगदीच अनभिज्ञ असणाऱ्या हौशी प्रवाशांच्या कळपाला घेऊन वरवर तिथल्या तिथे गोल गोल फिरवले जाते, मघाशी म्हटल्याप्रमाणे सुंदरबन भूलभुलैया असल्यामुळे फिरताना सगळीकडे पाणीच पाणी आणि तिवरांची झाडी दिसत असल्यामुळे फारसा वेगळेपणा जाणवत नाही आणि त्यातून बोटीवर गाणी,खाणे-पिणे यात प्रवाशांना गुंगवून ठेवले जाते त्यामुळे बाहेर लक्ष गेलेच तरी कोणाच्या फारसं काही लक्षात येत नाही. सजनेखालीवरून बोट फिरत फिरत सुधन्यखाली,दोबांकी,नेतीधोपानी, बुरीर दाब्री इथल्या वॉच टॉवर्सकडे घेऊन जाते.

बुरीरदाब्रीचा रायमंगल वॉच टॉवर आणि सिमेंटच्या ठोकळ्यांवरून घेऊन जाणारा वॉक चुकवूच नये असा आहे कारण एकतर या वॉचटॉवरवरून अगदी समोरच बांगलादेशची सीमा आपल्याला दिसते अन् सभोवताल पसरलेलं घनदाट जंगल. वॉचटॉवरपर्यंत पोहोचण्यासाठी आधी एक केज वॉक करावा लागतो ज्यामध्ये दुतर्फा लोखंडी जाळी लावलेल्या चिखलमय मार्गावर सिमेंटचे दोन फ़ुट उंचीचे ब्लॉक्स बनवून ठेवले आहेत आणि अश्या सुमारे १००-१५० ब्लॉक्सवरून उड्या मारत मारत आपण बुरीरदाब्रीच्या वॉचटॉवरपाशी पोहोचतो. नेतीधोपानी आणि दोबांकीचे वॉचटॉवरही पाहण्यासारखे आहेत. बुरीरदाब्रीला आपण केज वॉक करतो तर दोबांकीला एका बंदिस्त पुलावरून तिवरांच्या जंगलात जाता येतं. या पुलाला दुतर्फा नायलॉनच्या जाळ्या लावून सुरक्षित केलं आहे. या ठिकाणी बरीच हरणं चरताना दिसतात आणि कर्मचाऱ्यांच्या माहितीनुसार तिथं वाघदेखील कधी कधी शिकारीसाठी येतो. अर्थातच सुंदरबनमध्येही वाघ पहायला मिळणं हे कठीणच आहे. नेतीधोपानी वॉचटॉवरच्या परिसरात एक चारशे वर्षांपूर्वीचे शिवमंदिर आहे पण आता त्याचे फक्त भग्नावशेषच पाहायला मिळतात.

सुंदरबनला गेल्यावर एकवेळ वाघ नाही दिसला तरी चालेल ( कारण तो इतर जंगलातही दिसतोच ) पण अफाट पसरलेल्या भारताच्या या ‘अमेझॉन’ मधून छोट्याश्या नावेतून स्वतः वल्हं मारत जाण्याचा जाण्याचा अनुभव खरेच अमेझिंग आहे. किनाऱ्यावर असलेल्या ‘चारघेरी चार’ गावात छोट्या होडक्यांमधून पोहोचण्याच्या आधी, किनारा अर्धा तासभर दूर असताना ( म्हणजे खरे तर किनारा सुरक्षित असा नजरेच्या टप्प्यात असताना ! ) आमच्या हातात वल्हं सोपवलं गेलं आणि नावाड्यांनी चक्क विश्रांती घेतली. अर्थातच वल्हं चालवताना आमची होणारी त्रेधा पाहून त्यांचीदेखील छान करमणूक झाली. आम्ही वल्हं मारताना नावाड्यांची आम्हाला कळू न देता काहीतरी कुजबुज सुरु होती, पण आमच्या होडीत मी सोडल्यास कोणीच बंगाली समजणारे नव्हते त्यामुळे ( मी सोडून !) कोणीच घाबरले नाही. नावाड्यांनी जवळपास मगर पाहिली होती पण हे जर आम्हाला कळले असते तर आम्ही घाबरलो असतो म्हणूनच त्यांनी मगर पाहिल्याची आम्हाला गंधवार्ता देखील लागू दिली नाही. सुंदरबनला गेल्यावर मोटरबोटीतून प्रवास अनिवार्य आहे अन्यथा दुसरा पर्याय नाहीच. पाण्यात तरंगण्यापासून ब्रेक हवा असेल तर सरळ रिसोर्टवर परतायचे नाहीतर चिखलातून चालत किनाऱ्यावरल्या गावात शिरायचे. ‘चारघेरी चार’ गावात जाताना मडफ्ल्याट म्हणजे रेतीच्या गाळातून चालण्याचा भन्नाट अनुभव घेतला. गाळामधली रेती चिकणमातीसारखी पांढरी आणि चमकणारी असते. पण अश्या या घट्ट चिखलात गुडघ्यापर्यंत पाय रुतला कि बाहेर काढणं अतिशय कठीण होऊन बसतं. त्यातच आतमधून पायाला स्पर्श होणारा खेकडा आहे कि समुद्री वनस्पती या भीतीने पाय वर काढण्यासाठी जोर लावत किनारा ते गाव असा मडवॉक पार पडतो. या चिखलात पाऊल टाकण्याआधी हातभर अंतर चालायला कितीसा वेळ लागतोय असं वाटलं होतं पण नंतर हेच अंतर पार करताना अशी धमाल आली कि एव्हढेसे अंतर चालायलाच अर्धा तास लागला. अश्या या चिखलातून पाय रुतवत आणि वर काढण्याचा व्यायाम करतच गावात पोहोचलो. इथे पाण्यात भयानक मोठ्या मगरींचं वास्तव्य आणि काठावरल्या जंगलात वाघासारखं अत्यंत हिंस्त्र श्वापद त्यामुळेच सुंदरबन आजही मोठ्या प्रमाणावर निर्मनुष्य आहे. आहेत ती गावंदेखील खूप मोठी नाहीतच. एका गावात फारतर २०-३० घरं असतात. गावाच्या किनाऱ्यावर होड्या आणि बोटींच्या येण्या-जाण्याकरिता जेट्टी म्हणजे धक्का बांधलेला असतो. काही गावात तर अश्या जेट्टीचीही सोय नसते,तर तिथे फक्त सिमेंटचे दगड बसवून पाण्यापर्यंत पोहोचण्यासाठी पायवाट केलेली असते. पश्चिम बंगालमध्ये भावी काळात येणारं आणि सध्या असलेलं सरकार केव्हा तरी भलं करेल अश्या आशेत इथले गावकरी अजूनही दिवस काढतायत. ऐन पावसाळ्यात तर यांच्यासाठी अजूनच हलाखीचे दिवस. पावसाळ्यापूर्वी गावकरी छोट्या होड्या-नावांमधून आवश्यक साधन-सामुग्रीचा जमेल तसा साठा करून ठेवतात. अशीच ने-आण एरव्हीदेखील रोजच्या प्रवासात चालते. मग अगदी बाळंतीण असू देत वा शाळकरी मुलं, रोजच्या प्रवासासाठी मग होडीशिवाय पर्याय नाही. २००९ साली आलेल्या ‘आयला’ वादळानं इथल्या गावकऱ्यांचे जीवन पुरतं उध्वस्त केले ज्याच्या परिणामाच्या धक्क्यातून ते आता सावरलेयत खरे पण आर्थिक नुकसानाची भरपाई अजूनही काहीजणांपर्यंत पोहोचलेली नाही. आज ना उद्या कोणतं तरी सरकार आपला त्राता बनेल याची ते वाट पाहतायत. भाजीपाला,तांदळाची शेती,गाई-गुरांचं पालन तसेच मत्स्यपालन हाच त्यांचा उदरनिर्वाह. काही गावकरी जंगलात मध गोळा करण्याचं धाडस दाखवतात पण हा मध गोळा करून विकण्याचा धंदा खुपच जोखमीचा कारण तसेही गावात वाघाचे हल्ले होत राहतात त्यात मध गोळा करायला किंवा चोरट्या शिकारीसाठी प्रत्यक्ष जंगलात जायचं म्हणजे वाघाच्या जाळ्यात आयतेच सापडणं. वाघांचे हल्ले आणि वादळी हवामान यामुळे या गावकऱ्यांचे दैनंदिन जीवन सतत धोक्याच्या रडारवर असते. या ग्रामीण भागात वीजपुरवठा नाही. अतिशय दुर्गम ठिकाणी असणाऱ्या या गावांचा पावसाळ्यात तर जगाशी संपर्कच संपतो.

इथल्याच स्थानिकांमधून मग गाईड तयार होतात. त्यातलेच काही जण बोटी किंवा लॉन्च भाड्याने देण्याचा व्यवसाय करतात. दीपंकर मंडल, मृत्युन्जय, निरंजन रपतानसारखे अनेक स्थानिक गाईड इथं नावाजलेले आहेत. फक्त गाईडगिरी करणं हाच त्यांचा व्यवसाय नाही तर त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या लॉन्चदेखील असतात. अनेकदा हे सर्व रिसोर्टशी किंवा शहरातील एखाद्या टूर ऑपरेटरशी बांधील असतात. वनखात्याचे एकूण २७ गाईड उपलब्ध असतात, पण सिझनच्या वेळेस एकही गाईड मिळत नाही. आमचा गाईड होता अमर रपतान- गाईड नंबर १९. सुंदरबनमधील अवाढव्य प्रदेशात फिरण्यासाठी नावाड्याना मार्ग ठरवून दिलेले आहेत. त्यातूनच मग पर्यटक बोटी फिरतात. बोटीने सुंदरबनमध्ये फिरण्याचा आणि दिवसरात्र बोटीवरच काढण्याचा अनुभव विलक्षण असतो, कारण या मोटर बोटी म्हणजे लक्झरी क्रुझ नव्हेत. हवामान ठीक असेल तरच मोटरबोटी बाहेर काढल्या जातात. पाउस इथे अवकाळी आहे त्यामुळे असा पाउस आणि वादळी हवा असेल तर पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या बोटी बाहेर काढण्याचा धोका कोणी पत्करत नाही. मुख्य म्हणजे अश्या वातावरणात वाघ दिसण्याची शक्यता अजिबात नसते आणि तसेही सुंदरबनला जाऊन पाण्यात पोहणारा वाघ दिसेल अशी अपेक्षा ठेवली तर प्रचंड निराशा होईल कारण सुंदरबनमधला वाघ कान्हा किंवा बांधवगढ जंगलातल्या वाघांसारखा सहजगत्या दृष्टीस पडणं म्हणजे चमत्कारच. तरीही लॉन्चवर काही दिवस राहण्याचा अनुभव घेण्यासारखा आहे किंबहुना जर हा अनुभव घ्यायचा नसेल तर इतक्या लांबपर्यंत तंगडतोड करत जाणेच व्यर्थ आहे.

सुंदरबन नैसर्गिकरित्या विलक्षण शांत प्रदेश आहे, शांतता इतकी नीरव कि पाण्यात सुळकन मासा जरी गेला तरी आवाज ऐकू येतो. सुंदरबन त्रिमितीत अनुभवण्याची गोष्ट आहे. जमीन, आकाश आणि पाणी यांचं एखाद्या ठिकाणी किती महत्व असू शकते हे इथे आल्यावरच कळते. गेली शेकडो वर्षं इथल्या निर्मनुष्य बेटांवर रॉयल बंगाल वाघाचं वर्चस्व होतं पण आता याच आदिम प्रदेशात माणसांची धांगडधिंगा घालणारी पावलं रुतायला लागली आहेत. तसे म्हटले तर जमिनीवरल्या जंगलाचे नियम या प्रदेशातील जंगलाला लावता येत नाहीत कारण इथली माणसे, वाघ, इतर पशु-प्राणी आणि जैव-विविधता यावर फक्त निसर्गाचीच हुकुमत चालते. सुंदरबनमध्ये असे म्हटले जाते कि जमिनीवर वाघाच्या तावडीतून सुटलात तर मगरी पाण्यात तुमची खबर घेतीलच एकूणच काय दोन्हीही ठिकाणी इथला मनुष्य शिकाऱ्याच्या तावडीतून सुटू शकत नाही. तरीही कोणत्याही भीतीला न जुमानता पर्यटक इतक्या दुर्गम ठिकाणी येऊन सुंदरबनसारख्या अतिशय मनोहारी प्रदेशाची वाट लावतच आहेत. वाघांच्या चोरट्या शिकारी इथे जास्त होत नाहीत पण इथल्या पर्यावरणाची मात्र गेली कित्येक वर्षे इमानदारीत नासधूस केली जाते आहे. किनाऱ्यावरच्या संरक्षक जाळ्यांमध्ये अडकून राहिलेल्या जेवणासाठी वापरल्या जाणाऱ्या थर्माकोलच्या थाळ्या याची साक्ष देतात. रिसोर्टवर आणि लॉन्चवर वाजवले जाणारे कर्कश संगीत यामुळे इथली शांतता तडीपार होण्याच्या मार्गावर आहे. मात्र इथला निसर्ग आणि प्राणी देखील अतिशय लहरी आहेत त्यामुळेच माणसाची सुंदरबनमध्ये फारशी सत्ता चालत नाही आणि म्हणूनच बोनबिबिच्या कृपेने सुंदरबनचे वाघ देशातल्या इतर जंगलांपेक्षा अधिक सुरक्षित आहेत.

सुंदरबनच्या सफरीसाठी लक्षात ठेवा :

कसे जाल? कोलकाता शहरातून सोनाखाली, नामखाना, सागर आयलंड किंवा बक्खाली येथे बाय रोड जाऊन पुढील जलप्रवास सुरु करता येतो.

कुठे राहाल? साजनेखाली टुरिस्ट लॉज, दयापूर, पाखीराला.

काय पाहाल? सागर आयलंड, बक्खाली, कॅनिंग, साजनेखाली, दोबांकी, सुधन्यखाली,लोथीआन आयलंड, नेतीधोपानी, भागबतपूर, सुंदरकती, बुरीरदाब्री, हालीडे बेट, कलशद्वीप बेट,कुमीरमारी, मोरीचझापी इत्यादी.

एकूण प्रवास तास किती? बाय रोड ३-४ आणि जलप्रवास ३-४ तास असा मिळून एका दिवसात ७ ते ९ तासांची भटकंती होतेच.
Way to Sunderban,West Bengal-
From City of Kolkata, reach to Sonakhali, Namkhana, Sagar Island or Bakhali by road and then travel by launch to Sajanekhali,Dayapur or Pakhirala. There are some resorts near Sajanekhali and also the WBTDC tourist lodge is available at Sajanekhali. It takes around 3-4 hours from Kolkata to Godkhali jetty.
                                              
( सुंदरबन माझ्या आतापर्यंतच्या सर्व जंगल सफारीमधला सर्वात अविस्मरणीय असा अनुभव होता. तिथे प्राणी पाहायला तर मिळालेच पण इतक्या दुर्गम प्रदेशात माणसं कशी निसर्गाशी मिळतं-जुळतं घेऊन राहतात हे देखील पाहायला मिळालं. सुंदरबनमध्ये वाघ पहिल्याच खेपेत दिसणं फार भाग्याची गोष्ट आहे पण युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा मिळालेलं हे जंगल अनुभवणं हे देखील तितकेच सुंदर आहे आणि खरे तर भारतीय जंगलाचा एक वेगळा प्रकार म्हणून हे जंगल आणि हा प्रदेश पाहिलाच पाहिजे. सुंदरबनच्या काही आठवणी माझ्या पुढील लेखात वाचायला मिळतील, त्यासाठी कृपया खालील लिंक क्लिक करा. )
http://epaper.prahaar.in/detail.php?cords=20,100,1478,1598&id=story2&pageno=http://epaper.prahaar.in/11112012/Mumbai/Suppl/Page8.jpg

No comments:

Post a Comment