चराचर म्हणजे काय याचा अनुभव अरण्यातच येतो. आपण एखाद्या दरीच्या कडयापाशी उभे राहतो आणि तिथून पुढे सारं काही अथांग घनदाट हिरवंगार असतं किंवा एखाद्या तलावापाशी जातो आणि त्या पाण्यात दिसणारं झाडांचं कमालीचं स्थिर प्रतिबिंब आपली दृष्टी बांधून घेतं. अरण्यात गेल्यावर सृष्टी समग्र रूपांनी अशी आपल्या समोर ठाकते. तिचं हे रूप नजरेत किती साठवावं, किती ते श्वासात खोल भरून घ्यावं, किती तिच्या अंगाखांद्यावर बागडावं-लोळावं याचं भान राहत नाही. हे अमृत पिण्यासाठी मग अधिकाधिक अपुरेच वाटू लागते. जंगलातले दिवस-रात्र कसे जातात याची ही एक झलक. अरण्यात घालवलेला प्रत्येक क्षण हा अविस्मरणीय असतो. मग तिथे एक तास घालवा नाहीतर दोन-तीन दिवस फक्त. जंगलातल्या एका दिवसाच्या एकेका प्रहरात कायकाय दडलंय हे सांगणा-्या अष्टौप्रहरांमधल्या कथा.
प्रहर १
आज साडेपाच वाजताच ड्रायव्हरने आम्हाला खोलीवरून पिकअप केलं आणि हत्तींच्या गोठयापाशी आणून सोडलं. हत्ती बिचारे आमची जणू वाटच पाहत होते. नव्या दिवसाचा तो कोरा करकरीत गंध किती छान वाटत होता. त्यात हत्तींच्या शेणाचा उग्र वासही मिसळला होता. आकाशात अनोखं चित्र हळूहळू साकारत होतं. त्याआधी एक अप्रतिम निळसर प्रकाश क्षितिजावर रेंगाळल्यासारखा वाटत होता. मग त्यात हलके हलके पिवळे सोनेरी रंग मिसळू लागले. मग ते गडद होत शेंदरी झाले आणि म्हणता म्हणता त्या शेंदरी रंगाचा चक्क एक गोलच झटकन क्षितिजावर आला.
काही क्षणार्धातच हा एवढा मोठा गोळा कसा काय तयार झाला याचं आश्चर्य वाटलं. त्या विस्तीर्ण दाट हिरव्या गवताळ कुरणावर देखील त्या शेंदरी गोळ्याने त्याच्यातला सोनेरी रंग शिंपडला आणि तमाम पक्ष्यांना आवाज फुटला. वेषांतरासाठी घातलेला पोशाख बदलून एखाद्याने समोर यावं तसं त्या गवतात लपलेल्या आकारांना पाय फुटले आणि हरणं, गेंडे, हत्ती, पक्षी असं सर्व काही अचानक समोर येऊ लागले. वाटलं, किती महागडा दुर्लभ असावा हा या क्षणाचा श्वास.
इथे येण्यासाठी मोजलेल्या पैशांपेक्षाही कितीतरी पटीने महागडा. कशात तरी साठवून घरी घेऊन जाता आली असती ही हवा तर त्यापरते सुख नाही. इतक्यात मागून कुणीतरी हाक मारली. तीही मराठीत. बाजूच्या हत्तीवरल्या लोकांना त्यांचा फोटो काढून पाहिजे होता. मला मराठीत फोनवर बोलताना पाहिलं होतं बहुतेक त्यांनी. त्यामुळे विश्वासाने त्यांनी कॅमेरा माझ्या हाती दिला. तुम्ही जंगलात गेल्यावर काय पाहता हा ज्याचा त्याचा दृष्टिकोन आहे. असो.
प्रहर २
सकाळच्या फेरीतला शेवटचा टप्पा. उनं वर यायला लागलीत. भयानक उष्मा. सर्वत्र कोरडं आणि सावलीला पान देखील नाही. जिथे नजर जावी तिथं काटेसावरच फक्त. सारा लँडस्केपच या काटेसावरीने आणि निळ्याभोर आकाशाने व्यापून टाकलेला. या राखाडी निळ्या रंगांमध्ये अगदी क्वचितच कुठेतरी हिरव्या रंगाला जागा मिळालेली. त्याच रणरणत्या रणात गाडी चालतेय. एवढया सर्व आसमंतात पक्षीदेखील नाहीत. नाही म्हणायला रुफस ट्री पायने सोबत सोडलेली नाही. थव्याने त्यांच्या कर्कश्य आवाजासकट गाडीबरोबर उडतायत. त्यांना गाडीतले प्रवासी खायला देतात हे माहीत झालंय. पण बाकी पक्षी-प्राणी कुठेतरी गडप झालेत.
अभयारण्य असूनही अरण्याचा मागमूस नाही. पण इथल्या प्राण्यांसाठी हाच निवारा आहे, हा उघडावाघडा आसरादेखील ते मोठया कसबाने वापरत असणार. आपल्याला त्यातलं फार कमी कळतं. तहान लागतेय सारखी. आणि अचानक गाडी चालता चालता ठप्प! सर्वाना परत खोलीवर जाण्याचे वेध लागलेत. सकाळचा नाश्तादेखील केलेला नाही. आता या वाळवंटी अरण्यात किती वेळ काढावा लागणार याची काहीच कल्पना नाही.
एक-दोन गाडया येऊन पुढे निघून गेल्या. पुढे थोडया लांब मृगजळाप्रमाणे हिरवळ पट्टा दिसतोय. तिथे तळंही असावं बहुदा. पण नियमाप्रमाणे गाडीतून उतरता येत नाही. त्यातच गाडीच्या जवळून गेलेल्या वाघाच्या ताज्या पाऊलखुणा दिसतात. तो विरुद्ध दिशेने गेल्याचं तज्ज्ञ सांगतात. तो कोणत्याही दिशेने गेलेला असो, आता तर कोणीच खाली उतरण्याची हिंमत करणार नाही. त्या लँडस्केपमध्ये तो कुठेही दडलेला असू शकेल असं वाटत राहतं. काही मिनिटांत होईल गाडी सुरू असं मोजत मोजत झाला तासाच्या वर वेळ. अखेर सव्वा तासाने गाडी सुरू झाली. आता एवढया शांततेत सर्वाचेच निश्वास ऐकायला आलेत.
प्रहर ३
ही वेळ शांत राहून आजूबाजूचा निसर्ग निरखण्याची. रेस्टहाऊसच्या पडवीत छानपैकी सतरंजीवर लकटावं आणि मस्तपैकी इकडेतिकडे पाहत राहावं. कोणीच त्रास देणार नसतं. आरामच आराम. विचारांनाही दूर लोटून द्यावं आणि निवांत पडावं. इतक्यात समोरच्या छोटयाशा मोकळ्या जागेत माकडांचा गलका ऐकू येतो.
कसला एवढा मोठा आवाज म्हणून सगळेच खोलीबाहेर येतात. बघितलं तर मोठीच गंमत सुरू असते. चांगला शंभरएक माकडांचा कळप आलेलाय. मोकळ्या जागेत काही कचरा टाकण्यासाठीच्या पेटया पण आहेत. त्यात हात घालून कचरा बाहेर काढण्याचे उद्योग काही जणांचे सुरू आहेत. पण एक जण सर्वाचं लक्ष वेधून घेतोय. त्याच्याचमुळे हा सर्व किचाट सुरू आहे. हे मर्कटराजे तिथल्या दोन खांबांवर कसरती करतायत.
अगदी पोल व्हॉल्टचा तरबेज खेळाडू असल्यागत त्याच्या उडया सुरू आहेत. खूप बारकाईने पाहिल्यावर त्याच्या उडया खरंच खूप पद्धतशीर वाटू लागल्यात. जवळजवळ पाऊणएक तास त्याचा हा खेळ सुरू होता, त्यात त्याचे कोणीच साथीदार सहभागी झाले नव्हते ही नवलाची गोष्ट. या अशा उडया मारण्यामागे त्याचा काय उद्देश होता हे कळत नव्हते. कदाचित मोहाची फुलं जास्त झाली असावीत. पण त्याचा खेळ खूपच मनोरंजक होता. आम्ही विश्रांती सोडून तेच पाहत बसलो.
प्रहर ४
आम्ही पाणवठयाकडे गाडी वळवली. वाटेत एक छोटा सिमेंटचा पाण्याचा चौक लागला. तिथं भेकर उभं होतं. जवळपास पिल्लूच होतं. गाडीचा आवाज ऐकून भेदरलं. त्याला काय करावं ते सुचेना. खरं तर त्याने पळून जायला हवं होतं. पण भ्यायल्यामुळे ते तिथेच थिजून त्याच्या भेकरडोळ्यांनी आमच्याकडे टुकटुक बघत उभं राहिलं. भर उन्हाळ्यात असे कृत्रिम पाणसाठे जंगलात ठिकठिकाणी बांधलेले असतात. नैसर्गिक पाण्याच्या स्रोतांपर्यंत नेहमीच सर्वच प्राण्यांना पोहोचता येत नाही.
कधीकधी दुस-या मोठया जनावरांचं भय असतं. कधी कळपांच्या मारामा-या असतात. त्यामुळे असे वेगवेगळे पाणवठे प्राण्यांना-पक्ष्यांना खूप उपयोगी पडतात. शिवाय नैसर्गिक पाणवठे सुकले तरी या कृत्रिम पाणवठयांमध्ये वनखात्याचे कर्मचारी पाणी आणून सोडतात. या कृत्रिम पाणवठयांमुळे कितीतरी पशु-पक्ष्यांचा जीव वाचतो. इथे असंच एक तहानलेलं भेकर उभं होतं. नंतर थोडं आत पाहिलं तर अजून एक भेकर होतं. कदाचित आई असावी. आमच्या येण्यामुळे त्याच्या पाणी पिण्यात व्यत्यय आला होता. आम्ही गाडी तशीच पुढे नेली, त्याच्याकडे न पाहता. नंतर मागे वळून पाहिलं तर ते पाणी पित होतं.
प्रहर ५
संध्याकाळच्या भटकंतीला बाहेर पडलोय. जंगलाच्या इतक्या जवळ राहणाऱ्यांची घर-दुकानं पाहत फिरतोय. केळीची बनं दिसतायत. केळी हत्तींचं मोठं आकर्षण. मग का नाही इथे हत्तींचा मोठया प्रमाणात वावर असणार असं मनात आलं. ती गावठी केळी सगळ्यांच्याच मनात भरली होती. दुकानात मांडलेली केळी मग हातोहात खपली. इथे थेट निसर्गातूनच तुमच्या समोर आलेली फळं होती.
लांबलचक प्रवास करून आलेल्या फळांपेक्षा ही केळी खाण्यात मजा होती. ती हातात घेऊनच मग जंगलाकडे निघालो. उंच झाडांच्या दाट गर्दीतून वाट काढत आम्ही चालतोयत. अचानक माझ्या पुढयातून मोठी धामण सळसळत ओंडक्याबाहेरून निघते. ती रस्ता ओलांडून जाते. बाकी बोलण्यात गर्क होते, त्यामुळे तिच्याकडे कोणाचं लक्ष गेलं नव्हतं आणि मग ती कुठे गेली असेल याची चर्चा.
थोडया अंतरावर पुन्हा एकदा एक मोठा साप आम्हाला ओलांडून गेला. आता चालण्यातली मजा थोडी सांभाळून घ्यायला हवी. कारण बोलता बोलता पायाखाली लक्ष राहत नव्हतं. मग सर्वानाच गप्प राहून निसर्गाकडे लक्ष द्यायला सांगितलं. आता अंधार पडला होता. पुढे एक तळं होतं.
छान हिरवाईने वेढलेले शांत तळं. तिथे उभं राहिलो आणि काहीवेळातच पलीकडल्या झाडांमधून खसपस सुरू झाली. काय आहे पाहतो तर, बघता बघता एक एक करत पाच हत्ती तळ्यात दाखल झाले. त्यांनी आमची फारशी दखल घेतली नाही. आम्ही रस्त्याच्या एका बाजूला जाऊन उभे राहिलो. हत्तींची आंघोळ बघत. बराचवेळ पाण्यात खेळून झाल्यावर मग त्यांनी जंगली केळ्यांच्या झाडांकडे मोर्चा वळवला. पिल्लांना हत्तीण कसं भरवते ते पाहायला मिळालं. तिथून जावंसं वाटत नव्हतं; पण कदाचित हत्ती तळ्यातून रस्त्यावर आले असते त्यामुळे निघावं लागलं.
प्रहर ६
आम्ही सकाळीच बाहेर पडलो होतो. काही दिसेल अशी अपेक्षाही नव्हती इतकं जंगल शांत होतं. असं जेव्हा असतं तेव्हाच नेमकी कुठेतरी हालचाल होत असते. आजही तसंच झालं होतं. बांबूच्या झाडीमधून जाणारा सुरेख लाल रस्ता. सुदैवाने गचके देणारा नव्हता. सकाळची शांतता. त्यात फक्त पक्ष्यांचे आवाज. या इथे अशा भल्या सकाळी काय दिसणार अशा विचारात सर्वजण. पण कोणाशीतरी नजरानजर व्हावी अशीच सर्वाची आतून इच्छा. पण इथले कायदेकानून वेगळे असतात.
आपल्या मर्जीप्रमाणे घडायला हे आपलं घर नव्हे. त्यामुळे आम्हीही निवांत होतो. इतक्यात समोर नजर गेली आणि आम्ही गारच पडलो. आनंद, उत्सुकता, थरार, रोमांच असं सर्वकाही एकाच क्षणात मनात मावेनासं झालं. एक सुंदर देखणं लांबलचक जनावर. बांबूच्या पिवळ्या सोनेरी हिरव्या जंगलामध्ये तो खरं तर आम्हाला प्रथम दिसलाच नव्हता.
आमच्या सुदैवाने तो एका जाळीतून दुस-या जाळीकडे जाताना आणि आम्ही तिथे हजर व्हायला एकच गाठ पडली होती. त्याला पाहून आम्ही स्तब्धच झालो. तो मात्र जाळीत जाऊन विसावला. वाघाइतकंच भारतीय प्राण्यांमध्ये उमदं जनावर कोणी असेल तर तो बिबटया आहे. आपल्या दुर्दैवाने आपल्याकडला चित्ता फार पूर्वीच नामशेष झालाय. पण बिबटयाही काही कमी देखणा नाही. आमच्या डोळ्यांचं पारणं फिटलं.
प्रहर ७
रात्रीच्या काळोखातही पलीकडे गवतात हरणं चरताना दिसतायत. दिसतायत म्हणजे त्यांचे डोळे लुकलुकतात. घुबडांचे आवाज येतायत. आम्ही जिथं तळ्याच्या बाजूला बसलोयत तिथून मुंगुसाची जोडी भरभर पळत गेलीय. अंधार गच्च आहे आणि गचपण पण तेवढंच दाट आहे. त्यामुळे मुंगुसं कोणती होती ते फारसं नीट समजलं नाही. दोन जंगल आऊलेटना तर आताच बाजूच्या झाडाच्या ढोलीत पाहिलंय. तळ्यावरच्या एका झाडावर फिश आउलेटपण असतं. तेही आता बाहेर पडलं असेल.
रातकिडयांचा(सिकाडा) आवाज कहर करतोय असं फक्त जंगलातच वाटू शकतं. कारण आताशा शहरात ते तुमच्यापाशी येऊन ओरडणार नाहीत. तो काळ गेला. आज किडयामुंग्यांसाठी आपण झाडंच शहरात ठेवत नाही, साखळीच तोडतोय तर त्या साखळीतले हे बारीकसारीक प्राणी सिमेंटच्या जंगलात कुठून येणार? पूर्वी लहानपणी काजवे व रातकिडे दोन्ही घराच्या गॅलरीबाहेर येत. वाघळंपण चक्कर टाकत.एखाद् दुसरं घरातही शिरे.
आता शहरात ना पाकोळ्या उरल्या ना वाघळं, ना रातकिडे ना काजवे. लहानपणी चतुरांच्या शेपटाला दोरी लावून त्यांना हेलिकॉप्टरसारखं उडवायचा खेळ खूप आवडायचा. माझ्या मोठया भावाने शिकवलेला. पोपटांचे थवे नेहमी दिसत. शाळेतल्या निलगिरीच्या झाडांवर तर त्यांचा डेराच असे.
शाळेतल्या स्टेजच्या वर असणाऱ्या पोकळीत तेव्हा त्यांची घरटी असत. तेव्हा छानशा गोंडस अशा दिसणाऱ्या राघूंचा तो काळ होता. आता स्टेजची पोकळी कबुतरांनी घाण करून टाकलीय. या इथे तळ्याकाठच्या जमिनीवर बसून वर निरभ्र मोकळं आकाश पाहताना चांदण्या दिसण्याच्या ऐवजी हेच सर्व काही आठवतंय.
इथपर्यंत कुणी खेचून आणलंय त्याचा शोध मन घेतंय. अचानक महासीरने मोठी उडी घेतल्याचा आवाज येतो. खूप मोठा तरंग उठून नाहीसा होतो. त्याच्यासोबत मनातल्या आठवणी पण हळूहळू नाहीशा होत जातात आणि तळ्याच्या पलीकडे दिसलेल्या हालचालीकडे लक्ष जातं. ते काय असावं याचा वेध घेतल्यावर गवा असल्याचं दिसतं. इथे बॅटरी मारणं शक्य नाही. जे काही बघायचं ते चांदण्या न् चंद्राच्या प्रकाशातच. आता रान गोळा व्हायला सुरुवात झालीय. रात्रीच्या या खेळात कोण कोण सामील होतंय याची वाट पाहायची.
प्रहर ८
दोन वाजता झोपल्यावर खरं तर झोपच लागत नव्हती. सूं सूं वारा नुसता उधाणला होता आणि त्या उधाणाबरोबर काय काय उडत होतं हे बाहेर जाऊन पाहायची गरज नव्हती. सर्व पालापाचोळा खिडकीशी येऊन जात होता. साचत होता. सर्वत्र अंधार होता. कंदीलाची वात छोटीच केली होती, ती पण मालवली. उगाच त्यात मेणबत्ती-टॉर्च वगरे पेटवून त्या अनाम अंधाराचं न् वाऱ्याचं ते गुज भंग करावं असं वाटत नव्हतं.
खिडकीजवळ जाऊन उभं राहिल्यावर लक्षात आलं की वारा नुसताच नाहीये, सोबत पाऊस पण घेऊन आलाय. मृदगंध जाणवतोय, इतक्यातच अलवार थेंब मोठे टपोरे होऊन पत्र्यावर आदळू लागले. म्हटलं, हा ऑर्केस्ट्रा आता चांगलाच रंगात येणार, आपण निवांत झोपलेलं बरं. पावसामुळे की काय जंगलात देखील एक प्रकारची शांतता पसरली होती.
बाहेर काही सुरूही असेल; पण या पत्र्याच्या खोलीत काय सुगावा लागणार. झोप डोळ्यांवर पसरतेय. पहाटे चार साडेचारच्या सुमाराला जाग आली. बाहेर साडेपाचपर्यंत पडायचं होतं. इतक्यात दाणकन छपरावरून काहीतरी खाली आदळल्यासारखा आवाज आला. एक क्षण घाबरलेच. कारण बाहेर अजून काळोख होता आणि बाथरूम बाहेर होतं. मग लक्षात आलं की वानरं असणार. दोन्ही कंदील पेटवून दरवाजा उघडून सावकाश बाहेर पाहणी करून घेतली. सापकिरडू दिसतंय का ते प्रथम पाहिलं. मग वर पाहिलं तर माकडं नव्हती. दिवस सुरू झाला.
Here are the links for published articles http://epaper.eprahaar.in/detail.php?cords=12,10,1464,2280&id=story1&pageno=http://epaper.eprahaar.in/10052015/Mumbai/Suppl/Page4.jpg
http://epaper.eprahaar.in/detail.php?cords=16,1510,1470,2268&id=story4&pageno=http://epaper.eprahaar.in/03052015/Mumbai/Suppl/Page4.jpg