उत्तरेकडची सर्व हिल स्टेशन्स पालथी घातलीयत, त्यात आता आणखी धरमशालात काय उरलंय पाहण्यासारखं, असं म्हणणारे पर्यटक खरोखरीच मनात आणलं तर अध्र्या-एक तसात पूर्ण धरमशाला पाहून टाकू शकतात, पण खरं तर असा विचार करणं चुकीचंही ठरू शकतं. इथं तब्येतीत मस्तपैकी ट्रेक करत आणि गेस्ट हाऊसेसच्या रूमवर लोळत, इथल्या मार्केटमध्ये फिरत-फिरत पंधरा-वीस दिवस काढल्याखेरीज धरमशालाचं कल्चर आपल्याला कळत नाही. ‘किंगफिशर’चं छोटेखानी विमान अवघ्या दीड तासातच दिल्लीच्या शाहरी गजबजाटापासून आपल्याला एका वेगळ्या जगात आणून सोडतं.. समोर याला लँडस्केप म्हणावं की एअरपोर्ट, अशा कोड्यात टाकणारा अप्रतिम कांगरा एअरपोर्ट असतो. धरमशालाला विमानमार्गे जायचं असेल तर इथंच यावं लागतं. उतरल्या-उतरल्या प्रेमातच पडावा असा हा सुंदर-सुबकसा आणि छोटासाच कांगरा विमानतळ कांगरा हॅलिमधल्या गग्गल गावात आहे. धरमशाला इथून साधारण 40 ते 45 मिनिटांवर आहे. (बाय रोड) या एअरपोर्टवर दिवसातून फक्त एकदाच विमान उतरतं आणि तेच विमान परतीच्या प्रवाशांना माघारी दिल्लीला घेऊन जातं. छानपैकी विविध फुलांची बागा मेटेंन केलेला आणि सभोवताली ‘धवलधार’ पर्वत रांगानी वेढलेला हा कांगरा एअरपोर्ट पुढल्या प्रवासात दिसणा-या निसर्गसौंदर्याची चुणूक दाखवतो.
कांगरा हा हिमाचल प्रदेशातला सर्वात मोठा जिल्हा. धरमाशालामध्ये पोहोचेपर्यंत रस्त्यावरल्या गावांमध्ये ‘प्रकृती की रक्षा, जलसंपदा बचाओ’, ‘सर्वशिक्षा अभियान’ अशा टाइपच्या सरकारी योजना गावांपर्यंत पोहोचल्याच्या खुणा दिसत राहतात. वाटेतल्या गावात उतरून पहाडी कावा पिणं मस्ट असतं. नाही तर तिथल्या जोरदार थंडीमध्ये तोंडाची बडबड सुरू ठेवणं मुश्कील होतं.
उत्तरेकडची सर्व हिल स्टेशन्स पालथी घातलीयत, त्यात आता आणखी धरमशालात काय उरलंय पाहण्यासारखं, असं म्हणणारे पर्यटक खरोखरीच मनात आणलं तर अर्ध्या-एक तासात पूर्ण धरमशाला पाहून टाकू शकतात, पण खरं तर असा विचार करणं चुकीचंही ठरू शकतं. इथं तब्येतीत मस्तपैकी ट्रेक करत करत आणि गेस्ट हाऊसेसच्या रूमवर लोळत, इथल्या मार्केटमध्ये फिरत फिरत 15-20 दिवस काढल्याखेरीज धरमशालाचं कल्चर आपल्याला कळत नाही. म्हटलं तर धमशाला आणि भागसूनाग, मॅकलिऑड गंज, फोरसिथ गंज, नड्डी, तलनू, धरमकोट असा सर्व आपसपाचा एरिया अगदी टिकलीएवढा आहे; पण धरमशाला म्हणजे केवळ फॉरेनर्सची चहल-पहल नाही, तर तिबेटियन कल्चरचा झेंडा हिज होलीनेस दलाई लामांच्या या आवडत्या निसर्गधामात पक्का रोवला गेलाय. या ‘लिटिल ल्हासा’त तिबेटियन संस्कृतीचा आणि दलाई लामांचा प्रभाव पावलोपावली जाणवत राहतो.
शेवटी नाही म्हटलं तरी धरमशालाकडून येणारा पर्यटन महसूल हा बहुतांशी दलाई लामांमुळेच इथं भेट देणा-या विदेशी पर्यटकांच्या खिशातून येत असतो. हिज होलीनेस दलाई लामांच्या टिचिंग सेशन म्हणजे प्रवचनांसाठी धरमशालात पर्यटक आणि त्यांचे शिष्य जगभरातून येत असतात. नुसतेच येत नाहीत तर हजारो जण इथंच तीन ते सहा महिने मुक्काम ठोकून असतात. सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे दलाई लामा धरमशालेत वर्षातून दोन ते तीन वेळाच टिचिंग सेशन घेतात. अनेकदा ही टिचिंग सेशन्स त्यांच्या रशियन, अमेरिकन, जर्मन शिष्यांसाठी असतात. तरीही प्रत्येक वेळी केवळ हिज होलीनेसना पाहण्यासाठी म्हणून श्रद्धाळू तिबेटियन्स हजारोंच्या संख्येनं त्यांच्या मठात गर्दी करतात.
मार्केटमध्ये फिरतानाही अमिताभ बच्चनच्या खर्जातल्या आवाजाशी स्पर्धा करणा-या दलाई लामांच्या आवाजातल्या प्रवचनांच्या सीडीज- टेप्स जागोजागी दुकानातून ऐकू येतात. तिबेटी भाषेचा आपल्याला गंधही नसला तरी एकूणच या धीरगंभीर आवाजात प्रेमळ हुकूमत आणि आश्वासकता जाणवते. ‘सेव्ह तिबेट’च्या आंदोलनाला चीनमध्ये स्थान नसलं तरी धरमशालामध्ये मात्र या चळवळीचं अस्तित्व ठिकठिकाणी दिसतं. इथल्या तरुण पिढीचे पालक गेल्या जमान्यातल्या तिबेटमधून निर्वासित म्हणून धरमशालेत येऊन राहिलेले आहेत. तसाच तरुण मुलांच्याही मनात भारत आणि तिबेट असा भेदभाव पक्का आहे. ‘सेव्ह तिबेट’च्या या चळवळीत तरुण मुलं बहुसंख्येनं आहेत आणि विशेष म्हणजे आपण कधी ना कधी स्वतंत्र तिबेटमध्ये परत जाणार, ही भावना ही मुलं पटकन बोलूनही दाखवतात. गॉड ब्लेस देम ऑल!
बौद्धमठ किंवा मोनॅस्टरीज् हे धरमशालाचं उल्लेखनीय वैशिष्टय़. अर्थातच हिज हायनेस दलाई लामांच्या अस्तित्वामुळे धरमशाला आणि परिसरात अनेक बौद्धमठ आढतील; पण या सर्वामध्ये सर्वात देखणी मोनॅस्टरी आहे ती कर्मापा मोनॅस्टरी. सिधबारीजवळ असणा-या या भव्य बौद्धमठात तितकीच प्रसन्न शांतता आहे. या मठात दलाई लामांच्या खालोखाल आदरणीय मानले जाणारे सतरावे कर्मापा राहतात. ओग्येन ट्रिनले दार्जी कर्मापा अवघ्या 24 वर्षाचे आहेत. कर्मापा आणि दलाई लामा हे दोघंही पुनर्जन्म घेतात, असं मानलं जातं. बौद्धमठांखेरीज इथल्या ‘नॉरबुलिंका इन्स्टिटय़ूट’मध्येही फेरफटका मारायलाच हवा. या मठाची रचना एका जपानी वास्तुरचनाकारानं केली आहे. काळय़ा दगडांचा वापर करून बांधलेल्या या मठावर आणि तिथल्या बागेवर अर्थातच जपानी वास्तुकलेचा प्रभाव जाणवतो. इथं आर्टिस्ट मुलं येऊन राहतात आणि शिल्पकाम, चित्रकला, सुतारकाम, शिवणकाम, गार्डनिंग, हस्तकलेसारख्या कला शिकतात. त्यांना इथं ‘थांगका आर्ट’ ही तिबेटियन धार्मिक चित्रकला शिकवली जाते. यात चित्रं रंगवताना सोन्याचा वापर होतो आणि त्यांचे रंगही विशिष्ट प्रकारे बनवले जातात. त्यामुळं ही चित्रं शेकडो वर्ष टिकतात आणि तिबेटियन संस्कृतीत या ‘थांगका’ चित्रांना खास महत्त्व आहे.
या ‘नॉरबुलिंका इन्स्टिटय़ूट’नंतर अनेक गाईड फोरसियगंजला जाऊन स्तराव्या शतकातलं एक चर्च पाहण्याचा आग्रह करतात. तिथे विशेष काही पाहण्यासारखं नाही; पण बाजूच्याच सिमेट्रीत देवआनंदची एकेकाळची हिरॉईन आणि जिची मुंबईतल्या तिच्या राहत्या घरी हत्या झाली, ती प्रिया राजवंश इथं चिरविश्रांती घेताना पाहून नवल वाटतं.
जिभेला बारा गावांच्या खाण्या-पिण्याची चटक असेल तर धमशालेत नुकतेच तिबेटी आणि भारतीय नाही तर देशादेशींच्या खाद्यपदार्थाचे ऑप्शन्स मिळतात. प्रत्यक्षात ज्या देशांचं एकमेकांशी पटतही नाही, अशा अमेरिका, जर्मनी, इस्रायल, हंगेरी, रशियन, जपान, इटलीसारख्या देशांची खाद्यसंस्कृती इथं सुखनैव एकत्र नांदताना दिसते. साठ-सत्तर रुपयांत दोन दिवस पुरेल इतकी कॉफी देणारी इथे अनेक ‘कॅफेज्’ आहेत. त्यामुळे तीन-चार तास एका ठिकाणी गप्पा मारण्यासाठी एकत्र येणा-या पर्यटकांची मोठीच सोय होते. रिझनेबल दरातलं, उत्तम आणि चविष्ट तिबेटियन फूड खायचं असेल तर ग्यामेड मोनॅस्टरी हे बेस्ट ठिकाण नाही तर मग कोणत्याही स्ट्रीट फूड जॉइंटचा रस्ता धरणं उत्तम. आपल्याकडे जेवढी वडापावाला लोकप्रियता आहे तेवढाच फेमस इथला ‘थुगपा’ आहे. थुगपा म्हणजे भाज्या घालून शिजवलेल्या रस्सेदार नूडल्स. गरीब-श्रीमंत असे सर्वजण दिवसातल्या कोणत्याही वेळी या थुगपावर ताव मारताना दिसतात.
धरमशाला मनसोक्त भटकून झाल्यावर इथं ट्रेकिंगसाठीदेखील त्रियुंड तोरल पास, ब्लेनी पाससारखे अनेक पर्याय आहेत. हे ट्रेक चार-पाच दिवसांत सहज होऊ शकतात. झालंच तर आसपास जाऊन पालमपूरचे चहाचे मळे, कांगरा फोर्ट, चामुंडा देवीचं आणि बैजनाथचं मंदिर पाहू शकता. वेगळं काही पाहायचं असेल तर धरमशालेजवळ क्रिकेटचं मोठं स्टेडियमदेखील आहे. इथून सुमारे दीड तासावर असणारं मसरूरचं रॉक टेंपल न चुकवण्यासारखं आहे. वरवर पाहताना हे साधे दगड वाटले तरी एका पूर्ण भीमकाय पाषाणातून पाच हजार वर्षांपूर्वी पांडवांनी हे मंदिर कोरून काढलंय. मंदिरालगतच सुंदरसा तलाव आहे आणि पलीकडे पुन्हा जिथून तिथून दिसत राहणा-या धवलधार पर्वतरांगा आहेत. या मसरूर रॉक टेंपलला युनेस्कोनं जागतिक ऐतिहासिक वारसा स्थळाचा दर्जा दिलाय. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या मंदिराकडे सरकारचं आणि पुरातत्त्व खात्याचं फारसं लक्ष नसल्यामुळे मंदिराची पडझड होत चाललीय. अस्सल ट्रेकर आणि शांततेच्या शोधात असणारा पर्यटक अशा दोन्ही प्रकारच्या फिरस्त्यांसाठी अशाप्रकारे धरमशाला हे एक उत्तम ठिकाण आहे.
this article previously published in:-
http://www.prahaar.in/madhyantar/madventure/22100.html
No comments:
Post a Comment