नजर पोहोचत होती तिथपर्यंत कंच, लुसलुशीत शेती पसरलेली.. जोडीला नारळीच्या बागा.. मधूनच डोकावणारी टुमदार कौलारू घरं आणि या सर्वावर कडी करणारी टेकडय़ांच्या मागून सूर्यास्ताची अप्रतिम रंगउधळण..पण हे सर्व फक्त नजरेतच साठवण्याची बंदी आमच्यावर आली होती. कारण धड कुठलीच फ्रेम कॅमेरा तर सोडाच पण साध्या डोळ्यांतही पकडता येत नव्हती. एखाद्या स्पर्धेत भाग घेतल्यासारखा आमचा बस ड्रायव्हर तुफान वेगात बस हाणत होता. बंगळूरुपासून निघालेले आम्ही कुर्गपर्यंत वनपीस पोहोचू की नाही, या चिंतेत होतो. आमच्या सहप्रवाशांची मात्र या वेगाबाबत काहीच तक्रार नव्हती, कारण समोरच्या स्क्रीनवर कन्नड हिरो पुनीत राजकुमारचा सुपरहिट पिक्चर ‘आरासू’ सुरू होता.
वळणावळणाच्या घाटरस्त्यावरून चढून अखेर बस मडीकेरीत दाखल झाली आणि लहरी पावसानं आमचं स्वागत केलं. आधीच घाटमाथ्यावर असल्यानं थंडीचा गारवा जाणवत होताच, त्यातच पावसात भिजल्यामुळे अंगावरच्या शिरशिरीचं रूपांतर हुडहुडीत झालं होतं. पण तितक्यातच छत्री घेऊन आलेल्या आमच्या होम स्टेचे यजमान संगप्पा यांनी स्वागत केलं आणि आमची पावसापासून सुटका झाली. त्यांच्या घरी जाऊन मस्तपैकी गरमागरम घरगुती कर्नाटकी पद्धतीच्या जेवणावर ताव मारला. शांतीअम्मांच्या त्या जेवणामुळेच खरं तर इतर रिसोर्ट किंवा हॉटेल्सपेक्षा ‘होम स्टे’चं वेगळेपण जाणवलं. अतिथी म्हणून राहण्यापेक्षा घरातलेच समजून रहा, असा संगप्पांचा आग्रह होता. हे आम्हाला नवीनच होतं. कारण कुर्गमध्ये होम स्टेचा घरगुती उद्योग आता अत्यंत कमíशअलाइझ झालाय. जवळपास 80 टक्के घरांवर, बंगल्यांवर ‘होम स्टे अव्हेलेबल’च्या पाटय़ा दिसतात. अखेर पैशांचाच व्यवहार असल्याकारणानं घरगुती आदरातिथ्याची कितीही जाहिरात केलेली असली तरीही हा घरगुती ‘प्रेमळपणा’ किती मर्यादेत असेल, याची शंका राहतेच.
भरपूर वेळ असल्यानं उगाचच घाईगर्दीत रपेट आम्हाला करायची नव्हती आणि कुर्गचा एकूण परिसरदेखील तसा निवांतच दिसत होता. हिल स्टेशन असलं तरीही कर्नाटकातला हा छोटासा तालुका अद्याप पारंपरिक वळणाचा आहे. उत्तरेतल्या हिल स्टेशनांवर आढळणारा बाजारूपणा कुर्गमध्ये अद्याप बोकाळलेला नाही. कुर्ग हे नाव वास्तविक बाहेरच्या पर्यटकांसाठी, इथं मात्र कोडगु हेच नाव प्रचलित आहे.
कोडगु हा पूर्वीचा जिल्हाच पण आता मडिकेरी, विराजपेट आणि सोमवारपेट यांचा मिळून झालेला तालुका. मध्यवर्ती असणारं मडिकेरी तसं लहानच आहे. त्यामुळे दोन-चार दिवसातच तिथले रस्ते, गल्ल्या, हॉटेलं, बाजारपेठ हे सारं अंगवळणी पडलं. पण आम्ही शॉिपंगचा मोह टाळून फिरस्त्याच्या भूमिकेत शिरायचं ठरवलं. त्याप्रमाणे आम्ही कुशालनगरकडे मोर्चा वळवला. गेली 45 वर्षं तिथं स्थायिक झालेल्या तिबेटी लोकांच्या वसाहतीत जाण्याचं कुतूहल मनात होतं. कुशालनगरपासून आठ किलोमीटर अंतरावर बयालाकुप्पे इथं तिबेटी लोकांची वसाहत आहे. 18 हजारांहून अधिक तिबेटियन्स इथं राहतात. एका परीनं मिनी तिबेटच आहे हे. इथल्या गोल्डन मोनॅस्ट्रीमध्ये भली मोठी बुद्धाची मूर्ती आहे. त्यांचा मोठाल्या झांजा घेऊन चालणारा एक नृत्यप्रकार पाहायला आम्ही तिबेटी विद्यार्थ्यांमध्ये जाऊन बसलो; त्यामुळे तिबेटी चहाचा प्रसादही मिळाला. पण तासभर होऊन गेला तरीही ते संथगतीनं चाललेलं नृत्य काही संपण्याची चिन्हं दिसेनात. मग आम्ही सांस्कृतिक कार्यक्रमांचं प्रेम आवरतं घेतलं आणि आम्ही दुबारे एलिफंट कॅम्पचा रस्ता धरला.
हत्तींच्या निवासाच्या या ठिकाणी कावेरी पार करून जावं लागतं. थोडासा उशीर झाल्यामुळे खुद्द गजराजांना आंघोळ घालण्याची संधी हुकली. मात्र या पाळलेल्या हत्तींना बघण्यापेक्षा कावेरी नदीच्या काठी असलेल्या मस्त हिरव्या पठारावर आराम करायला सर्वच धावले.
मडीकेरीपासून तासाभराच्या अंतरावर तळकावेरी आणि भागमंडळ आहे. भागमंडळमध्ये कावेरी, कणिके आणि सुज्योती या नद्यांचा त्रिवेणी संगम आहे. तर तिथूनच वरल्या बाजूला असणा-या तळकावेरीला एक छोटय़ाशा कुंडामध्ये झ-याच्या स्वरूपात कावेरी नदीचा उगम पहायला मिळतो. पण इथं न चुकवण्यासारखा आहे तो ब्रह्मगिरीचा छोटासा ट्रेक. तळकावेरीच्या मंदिरावरून अजून एक अर्ध्या तासाचा चढ म्हणजे काहीच नाही आणि धुक्याच्या ढगांमध्ये हरवून जायचा अनुभव घ्यायचा असेल तर ब्रह्मगिरीवर जायलाच हवं.
मडीकेरीमध्ये 1814 साली हलेरी राजांच्या काळात बांधलेल्या किल्ल्यात आणि राजवाडय़ात सरकारी ऑफिसेस आहेत. युरोपिअन वास्तुशैलीतल्या या राजवाडय़ाच्या एका भागात पुरातन वस्तूंचं संग्रहालय आहे. मडीकेरीनं अशा अनेक जुन्या खुणा अंगावर अजूनही बाळगल्या आहेत. राजाज सीट त्यापैकीच एक जागा. कधीकाळी कोडगु प्रांताचे राजे इथं दरीच्या काठावर बसून सूर्यास्ताचे क्षण पाहत. आता राजे नसले तरीही समोर हिरवाईनं गच्च दरी तशीच आहे आणि त्यापलीकडे अस्ताला जाणा-या त्या भास्करालाही आपल्या स्टेटसमुळे काहीच फरक पडत नाही, त्यामुळे हा विलोभनीय देखावा (फक्त पाच रुपयांत!) निवांतपणे अनुभवता येतो.
मडीकेरीहून साधारण दोन-अडीच तासांच्या प्रवासानंतर आम्ही अभयारण्यात पोहोचलो. इथं हत्ती मात्र मुबलक प्रमाणात आहेत. नागरहोलेचे हे घनदाट जंगल वाचत जाताना अजगर, मुंगुस, रानडुक्कर, गरुड, घुबड, सांबरांचे कळप, रानकुत्र्यांची टोळी आदींनी दर्शन देऊन आमचा हा लहानसा जंगल वाचनाचा धडा पूर्ण केला.
my article previously published in: -http://www.prahaar.in/collag/39643.html