Translate

Thursday, April 23, 2015

सेलिब्रिटी वाघ व त्यांची अभयारण्ये!


भारतीय वन्य पर्यटनाचं सर्वात प्रमुख आकर्षण कोणतं असेल, तर ते आहे टायगर सफारी, म्हणजे जंगलामध्ये जाऊन वाघांना पाहणे. आजमितीला भारत हा जगाच्या पाठीवर वाघ उरलेल्या देशांपैकी एक महत्त्वाचा देश आहे, जिथे नसर्गिक अधिवासात २२२६ अशा अल्पसंख्येत का होईना, पण वाघ नावाचा प्राणी नमुन्यादाखल टिकून आहे. त्याचमुळे आज प्रत्येक वन्यजीव सहलींचा प्रमुख उद्देश हा केवळ पर्यटकांना वाघ दाखवणे हा झालेला आहे.
भारतातल्या एका प्रसिद्ध जंगलातली टायगर सफारी. हो, व्याघ्र अभयारण्यातील अशा सफारींना टायगर सफारी म्हणूनच लोक ओळखतात. कारण या सफारीचा उद्देशच मुळी लोकांना जास्तीत जास्त जवळून वाघ दाखवणे हा असतो. अशी सफारी सुरू होण्याआधी व्यवस्थित हवा तयार केली जाते. जंगलातील अमुक एका झोनमध्ये वाघ दिसलाय किंवा त्या दुस-या झोनमधली वाघीण तिच्या पिल्लांना घेऊन आताच पाणी प्यायला बाहेर पडली आहे वगरे गोष्टी त्यांच्या कानावर फेकल्या जातात.
जंगलात गेल्यावर कुठेतरी वाघाच्या पावलांचे ठसे दाखवले जातात. पर्यटकांची आतुरता ताणली जाते. त्यांच्यापैकी अनेकांनी वाघ अद्यापही प्रत्यक्ष पाहिलेला नसतो. त्यांच्यासाठी तो महत्त्वाचा क्षण ठरणार असतो. त्याचसाठी तर ते एवढया लांब शहरातून आलेले असतात. एवढंच नाही तर केवळ वाघ पाहण्यासाठीच त्यांनी रिसॉर्ट व टूरचे २५-३० हजार रुपये भरलेले असतात. अशा पर्यटकांना नाराज करून चालत नाही. मग त्यासाठी वाघाचा माग काढला जातो.
तो जिथे असेल तिथपर्यंत त्याचा पाठलाग पुरवला जातो. तासन् तास जंगलात जिप्सी टेहळणी करत फिरतात, एकाच जागी थांबून राहतात व एकदा तो सापडला की मग जीप्स आणि हत्तींच्या गराडयात त्याला कोंडून एखाद्या सर्कशीतला दाखवावा त्याप्रमाणे पर्यटकांना वाघ दाखवला जातो. प्रथमच वाघ पाहत असाल तर निश्चितच या राजिबडया, उमद्या जनावराच्या तुम्ही प्रेमात पडता. त्याचं हे पहिलं दर्शन मनावर कायमचं कोरलं जातं. अधिकाधिक वाघांना आपण पाहिले पाहिजे, अशी इच्छा मनात उत्पन्न होते.
भारतातील सुमारे १६६ राष्ट्रीय अभयारण्यांपैकी ४७ ही व्याघ्र अभयारण्यं आहेत. त्यातील काही खास वाघांच्या सोप्या दर्शनासाठीच प्रसिद्ध झालेली आहेत. एखाद्या देवस्थानाला असावी तशी तिथे कायम गर्दी असते. यात हौशे-नवशे-गवशे सर्व असतात. मग अशा ठिकाणांहून तिथल्या वाघांच्या कथा देशभरात पसरत असतात.
पण विचार करा की आजघडीला देशात जेवढे वाघ लोकप्रिय आहेत, त्यांची संख्या फक्त २५च्या आसपास आहे. त्यातही काही पिल्ले आहेत. उदाहरणार्थ रणथंबोरमधील टी १९ व तिची पिल्ले, बांधवगढचा बामेरा मेल, कान्हाचा मुन्ना, ही सर्व यादी काही २५-३०च्या वर जायची नाही. मग प्रश्न असा पडतो की देशात २२२६ वाघ असताना केवळ निवडकच वाघ लोकांना माहीत का व्हावेत? या विषयाकडे फार कमी वन्यजीव अभ्यासकांचे लक्ष गेलेले आहे.
अभयारण्यांची भटकंती करताना दरवेळेस हा प्रश्न मला सतावतो की पर्यटक त्याच त्याच निवडक लोकप्रिय झालेल्या व्याघ्र अभयारण्यांना का भेट देत आहेत? ४७ व्याघ्र अभयारण्यं असतानाही पर्यटक काही निवडकच ८-१० व्याघ्र अभयारण्यांना भेट देतात. हा सर्व लोकांनी व प्रसारमाध्यमांनी दिलेल्या प्रसिद्धीचा परिणाम आहे. त्यामुळे देशातील बाकीची व्याघ्र अभयारण्ये ही पूर्णपणे दुर्लक्षित राहिलेली आहेत.
महसुलाअभावी त्यांचा विकास पुरेसा होत नाहीये. अर्थात यात चांगली एक गोष्ट घडते ती म्हणजे तिथल्या वाघांची पर्यटकांपासून सुटका होते. त्यांना त्यांच्या स्वत:च्या जंगलात मनमोकळं वावरायला मिळतं.
शिका-यांसारखे त्यांच्या मागावर राहणारे पर्यटक तिथे नसतात. तिथल्या पर्यावरणाची हानी कमी होते. मात्र यातली दुसरी तोटयाची गोष्ट म्हणजे अशा जंगलांमध्ये तस्करांचा वावर वाढतो. जिथे पर्यटकांची फारशी चहलपहल नसते तिथे त्यांना वावरायला, चोरटी शिकार करायला रान मोकळं मिळतं.
पर्यटकांची जिथे गर्दी असते तिथे निदान दिवसाढवळ्या तरी असे प्रकार घडत नाहीत; परंतु ही अभयारण्यं एकीकडे पर्यटकांच्या गर्दीपासून मुक्त राहतात तर दुसरीकडे देशातील काही मोजक्याच व्याघ्र अभयारण्यांमध्ये पर्यटकांची, फोटोग्राफर्सची, वन्यजीव अभ्यासकांची गर्दी उसळलेली असते. ही व्याघ्र अभयारण्यं जणू सेलिब्रिटी पार्कस् बनली आहेत. या पार्कचे सेलेब म्हणजे प्रमुख आकर्षण आहेत ते तिथले वाघ. ज्यातील काही मोजक्याच वाघांची माहिती आतापर्यंत आपल्याला आहे.
वास्तविक २ हजारांच्या आसपास वाघ देशातील जंगलात असताना केवळ मोजक्याच वाघांवर पर्यटकांचे लक्ष केंद्रित असणं ही खरं तर चुकीचीच गोष्ट. पण ती घडते आहे. यामुळे त्या वाघांच्याही जीवनाला धोका पोहोचतो आहे. सदासर्वदा हे निवडक वाघ, त्यांचे कुटुंब यांच्यावर प्रसिद्धीचा प्रकाशझोत टाकला जातो. गर्दी त्यांच्यापासून हटतच नाही. या वाघांना नावंही देण्यात आली आहेत. जणू काही हे अभयारण्य नसून एखादी सर्कसच असावी.
बांधवगढ, कान्हा, कॉर्बेट, ताडोबा, पेंच, रणथंबोर अशा काही निवडक व्याघ्र अभयारण्यांमधील वाघांचे अक्षरश: लाखो फोटो आज इंटरनेटवर पाहायला मिळतात. कारण इथल्या वाघांना पाहिलं नसेल असा माणूस मिळणं विरळच! या अभयारण्यांपर्यंत जाणं इतर व्याघ्र अभयारण्यांच्या तुलनेने सोपं असल्यामुळे पर्यटक तिथेच वारंवार जातात.
आज माझ्या माहितीत असे अनेक जण आहेत ज्यांनी ताडोबाला ५० वेळा भेट दिली असेल, मात्र त्यांनी तामिळनाडूतील सत्या मंगलम राष्ट्रीय अभयारण्याचं किंवा छत्तीसगढमधील अचानक मार व्याघ्र अभयारण्याचं नावही ऐकले नसेल. किंवा ऐकले असेल तरी तिथे भेट दिलेली नसेल.
सत्या मंगलममध्ये सुमारे २० वाघ अस्तित्वात आहेत. निश्चित आकडा माझ्याकडे नाही; पण तिथे नक्कीच वाघ सुखाने नांदतायत. सांगायचा मुद्दा हा की त्याच त्याच व्याघ्र अभयारण्यांमध्ये जाऊन त्याच त्याच वाघांचे फोटो काढण्याचा, त्यांना त्रास देण्याचा हा सोस सोडून द्या. लक्षात ठेवा, पर्यटकांच्या सततच्या येण्या-जाण्यानेही अरण्यातील पर्यावरणाची हानी होत असते. तिथली शांतता नेहमीच भंग होत असते.
आपल्याकडील ४७ व्याघ्र अभयारण्यांपैकी जी फारशी प्रसिद्ध नाहीत, अशी अभयारण्यं निवडा, तिथे जा, तिथला निसर्ग व वन्यजीवन पाहा. पाहण्यासारखं, घेण्यासारखं खूप काही आहे आणि पर्यायही आहेत. पण गरज फक्त तिथे वळण्याची आहे. गरज आहे ती समतोल वागण्याची. त्याच त्याच सेलिब्रिटी व्याघ्र अभयारण्यांमध्ये होणा-या गर्दीवर उपाय हवाय.
आपल्याला व्याघ्र पर्यटनातून भरपूर देशी व विदेशी महसूल मिळतो. या देशी-विदेशी पर्यटकांना फारशा लोकप्रिय नसणा-या व्याघ्र अभयारण्यांकडे जाण्यासाठी उद्युक्त केलं तर तो महसूलही वाढेल. हाच या समस्येवरील उपाय आहे.
आपल्या देशात लाखोंनी वन्यजीवप्रेमी आहेत. या अभयारण्यांची चांगली प्रसिद्धी केली, तिथे पुरेशा सोयी केल्या तर पर्यटक तिथे वळतील. परदेशी पर्यटकही नवी अभयारण्यं पाहण्यासाठी उत्सुक आहेत. त्यांनाही उत्तेजन मिळेल व पर्यायाने विदेशी चलन भारतात येण्यालाही.
नव्या ठिकाणी जा याचा अर्थ तुम्ही कान्हा अभयारण्य कधीच पाहिले नसेल तरीही तिथे जाऊ नका असा नाही, तर कान्हा पाहून झाल्यावर उत्तर प्रदेशातील पिलभित अभयारण्यालाही कधीतरी भेट द्या. आज जिम कॉर्बेट पार्क असणा-या रामनगरमध्ये रिसॉर्टची भरमसाट गर्दी आहे. अशीच गर्दी कान्हा, रणथंबोर इ. सेलिब्रिटी पार्कभवतीदेखील आहे.
२५ वर्षापूर्वी ही स्थिती अशी नव्हती. मात्र लोकांनी याच व्याघ्र अभयारण्यांना वारंवार लक्ष्य केल्यामुळे ही स्थिती ओढवली आहे. त्यामानाने सुंदरबनसारख्या दुर्गम भागातील वाघ सुखात आहेत. कारण ते तिवरांच्या जंगलाच्या आड लपलेले आहेत; परंतु पेंच, बंदीपूर, नागझिरा, बांधवगढ अशा अतिच लोकाश्रय लाभलेल्या अभयारण्यांना हे सुख नाही. तिथे कायम असणा-या गर्दीमुळे प्रवेश परवान्याची समस्या ओढवते.
नव्या अभयारण्यांकडे पर्यटक वळले तर तीदेखील कमी होतील. खरं तर प्रत्येकच अभयारण्यातील निसर्ग व वन्यजीवन, हे खूप सुंदर व अनुभवण्यासारखं आहे. या लेखाच्या निमित्ताने तुम्हीही एक नवी सुरुवात करा व सेलिब्रिटी सॅन्क्च्युअरी नसणा-या एखाद्या व्याघ्र अभयारण्याला भेट द्या.

Wednesday, April 22, 2015

अरण्यभाषा


वारंवार जंगलांमध्ये भटकंती करायला जाणा-यांना तिथल्या वाटा, तिथला गंध, तिथला परिसर, तिथले आवाज हे एवढया ओळखीचे झालेले असतात की रात्रंदिवस कधीही, कुठेही ते अरण्य त्यांच्या मनात जिवंत असतं. अनेकदा शहरात राहूनही त्यांना त्या जगाकडून साद येत असते, तिथले आवाज ऐकू येत असतात. त्यांना खुळावून टाकणारी असते ही अरण्यभाषा.
आयुष्यात प्रथमच अरण्यात जाणारा शहरी मनुष्य, जंगलांमध्ये जगता जगताच प्राचीन झालेला तिथला स्थानिक आणि शहरातून एका प्रचंड ओढीने तिथे जाणारी व्यक्ती या तिघांमध्ये खूप फरक असतो. मात्र या तिघांनाही भारावून टाकते ती अरण्यभाषा. जंगलाच्या अंगाखांद्यावर खेळत मोठं झालेल्या आदिवासी किंवा इतर स्थानिकाला जंगलाची ही भाषा आपसूकच येऊ लागते.
शहरातून जाणा-या माझ्यासारख्या वन्यजीव व निसर्गप्रेमींना मात्र आजूबाजूचं हे अरण्य काय सांगतंय ते सरावानेच कळू लागतं. त्यासाठी अर्थातच तन-मन-धन ओतून जंगलांवर, तिथल्या वृक्षांवर, प्राणी-पक्ष्यांवर प्रेम करावं लागतं. ही प्रक्रिया खूप निरंतर आहे, पण एकदा का याचं वेड लागलं की ती थांबत नाही.
कधीकाळी पहिल्यांदा घाबरत, कोणाच्या तरी सोबतीने जंगलात पहिलं पाऊल टाकलेलं असतं तेव्हा सभोवतालच्या गर्द सावल्यांनी व अगदी गारव्यानेही अस्वस्थ केलेलं असतं, पण काही काळाने अशी वेळ येते की शहरात परतल्यावर अस्वस्थ वाटू लागतं. जीवाच्या आतमध्ये सारखं काहीतरी खोलवर जाऊन उसळून यावं असं होत राहतं; तो गारवा, त्या सावल्या, ते तळ्याकाठचे क्षण, ती सळसळ, ती शांतता पुन्हा पुन्हा अनुभवावी, ते सर्व काही आत्ता या क्षणाला आपल्या जवळच उभं राहावं असं वाटू लागतं आणि जंगलात पाऊल पडत नाही तोपर्यंत चित्ताला काही थारा लागत नाही.
तसं म्हटलं तर काय असतं तिथे, एखाद्या नवख्याने पाहिलं तर त्याला इथे झाडेच दिसतील; पण त्यावरचा नीळकंठ नाही दिसणार. दाट गच्च माजलेलं गवत-झाडोरा दिसेल; पण त्याआडचं भेकर नाही दिसणार. वेडंवाकडं पसरलेलं तळं दिसेल; पण त्या तळ्याच्या काठच्या चिखलात उमटलेल्या प्राण्यांच्या पावलांच्या खुणा नाही दिसणार. तिथल्या पाऊलवाटांना तो रस्ते म्हणेल, त्या खडकाळ रस्त्यांनी त्याचं अंग चांगलंच तिंबून निघेल आणि स्वत:कडे लक्ष देता देता त्याचं त्याच पाऊलवाटांवर पडलेल्या रानमेव्याकडे लक्षच जाणार नाही.
तिथली रात्र त्याला भीतीदायक वाटेल, तर एखाद्या अस्सल जाणकाराला त्या रात्रीच्या पडद्याआडून येणारे विविध हाकारे झोपू देणार नाहीत. कधी एकदा पहाट होतेय आणि बाहेर रानात जातोय असं त्याला होऊन जाईल. हे असंच असतं. जीव अस्वस्थ होऊ लागला, कासावीस होऊ लागला की आमच्यासारख्या भटक्यांना कोणती आस लागलीये ते आपोआपच समजतं. पावलं मग तिथेच वळतात.
शहरातल्या कृत्रिम सुगंधी श्वासांच्या कुबडया भिरकावून देऊन रानातला तो अरण्यगंध पुन्हा एकदा श्वासात मनमोकळा, हवा तेवढा भरून घेण्यासाठी धडपड सुरू होते. तो प्राणवायूच जणू असतो. तिथल्या सग्यासोबत्यांना भेटल्याशिवाय मग चैन पडत नाही. कॉर्पोरेट लॉबीत मऊ कारपेटमध्ये टाचा घुसवून चालणा-या जंगल भटक्यांना मग कधी एकदा तो पालापाचोळा पायाखाली येतोय असं होऊन जातं.
एकदा का जंगलात गेलात की तुम्हाला ते प्रेमाचा विळखाच घालतं. हा बंध मग आयुष्यभर सोडवत नाही. तिथेच मन भिरभिरत राहातं. तिथले आवाज कानात मग शहरात येऊन देखील कानात उमटत राहतात. हे आवाज अनोळखी असतात परक्यांसाठी, पण कायम जंगलवाचन करणाऱ्यांसाठी ती अरण्यभाषा असते. ती तिथली बोली असते. जिच्यात अनेकांची साद दडलेली असते.
ज्यावेळी जंगलात जाणं शक्य होत नाही त्यावेळी मनाला समजवावे लागते. असंच एकदा सहज मनाला गुंतवण्यासाठी आमिष म्हणून इंटरनेटवर जरा शोध घेतला. समोर आली ती प्रत्यक्ष या अरण्यबोलींची रेकॉìडग्स. आज इंटरनेटवर अनेक संकेतस्थळांवर कितीतरी पक्षी-प्राण्यांचे आवाज उपलब्ध आहेत. अर्थात त्यांचे नमुने हे मोफत ऐकायला मिळतात व बाकी ध्वनिमुद्रण हे विकत घेऊन ऐकावे लागते.
यात जगाच्या पाठीवरील अनेक जंगलांमध्ये टिपलेले आवाज आहेत. जंगलात गेल्यावर हेच आवाज निसर्गप्रेमींना नादावून टाकतात. ते मधुर बोल ऐकण्यासाठी जीव तहानतो. मात्र जाऊ शकत नसाल तर इंटरनेटवर तीही सोय आहे. पण ही सोय अशी सहजासहजी होत नाही. त्यासाठी वर्षानुवर्षे, तासन् तास, दिवस-रात्र अरण्यात मुक्काम ठोकावा लागतो.
शहरात बसून तुम्ही जंगलात भटकता म्हणजे तुमची मजा आहे बुवा असं वाटत असेल, तर असं सांगावंसं वाटतं की जंगलात जाऊन साऊंड रेकॉडिंग(ध्वनिमुद्रण) करणं ही मजा बिलकूल नाही. तिथे अथक कष्ट आहेत म्हणूनच त्याचे पैसे द्यावे लागतात. शिवाय तुमच्या दारापर्यंत आजकाल कोणतीही गोष्ट आणून ठेवली की त्याचे पैसे हे घेतले जातातच, मग हे तर थेट अरण्यातूनच आणलेले आवाज!
देशी-विदेशी वन्यजीव प्रेमी, अभ्यासक, संशोधक हे जंगलात जाऊन आवाज ध्वनिमुद्रित करतात. जंगली पक्ष्याचं पहिलं रेकॉìडग हे लुडविग कोह याने एडिसन फोनोग्राफवर १८८९ मध्ये केलं होतं. पण हे पिंज-यातील पाळीव पक्षी होते. मग युरोपात असं ध्वनिमुद्रण करण्याची लाटच पसरली. इंग्लंड, जर्मनी, अमेरिका, रशिया इ. देशांमध्ये कॅनरी बर्डस, नाईटिंगेल, थ्रश, ब्लॅकबर्ड, गार्डन वॅबलर असे कितीतरी आवाज पिंज-यात ठेवलेल्या पाळीव पक्ष्यांचे ध्वनिमुद्रित होऊन त्याच्या रेकॉर्डसही विकल्या जाऊ लागल्या.
हा प्रकार तेव्हा अत्यंत लोकप्रिय झाला होता. परंतु प्रत्यक्ष जंगलात जाऊन अशा आवाजांचं ध्वनिमुद्रण करण्याची सुरुवात केली ती बर्नी क्रॉस या अमेरिकन ध्वनिमुद्रण तज्ज्ञ व संगीतकाराने. एका सांगितीक आल्बमसाठी त्यांनी काही आवाजांचं प्रत्यक्ष जंगलात जाऊन ध्वनिमुद्रण केलं आणि तेव्हा मुळातच निसर्गप्रेमी असणा-या बर्नी यांना आपण हे सर्व आवाज ध्वनिमुद्रित करून ठेवले पाहिजेत असं वाटलं.
आजपर्यंत गेली ४५ वर्ष त्यांनी वन्यजीवन आणि निसर्गाच्या प्रेमापोटी सुमारे १५ हजार पक्ष्यांचे आवाज रेकॉर्ड केलेले आहेत. यात त्यांची मेहनत प्रचंड व वाखाणण्याजोगी आहे. बायोफोनी म्हणजे मनुष्याव्यतिरिक्त इतर नसर्गिक अधिवासातील आवाज, हा शब्द त्यांनीच निर्मिला. हे आवाज रेकॉर्ड करणं हे खूप कठीण आणि नाजूक काम आहे. आज पशू-पक्ष्यांचे त्यांच्या नैसर्गिक अधिवासातील आवाज ध्वनिमुद्रित करण्याच्या क्षेत्रात बर्नी क्रॉस हे अखेरचा शब्द मानले जातात.
परंतु अजून एका बाबतीत देखील बर्नी यांचे शब्द अखेरचे व चिंतादायक मानले पाहिजेत. ते म्हणतात की, मी ४५ वर्षापूर्वी जाऊन जी रेकॉìडग्स केलीत, त्यांच्यात आणि आज त्याच जागी जाऊन केलेल्या, त्याच पक्ष्यांच्या आवाजांच्या रेकॉìडगमध्ये खूप फरक जाणवतोय. हा सरळसरळ लोकसंख्या वाढल्याचा व मनुष्याचा निसर्गात होणा-या हस्तक्षेपाचा प्रभाव आहे.
कितीतरी पक्ष्यांच्या-प्राण्यांच्या प्रजाती त्यांना नष्ट होताना दिसल्या आहेत. ४५ वर्षापूर्वी ध्वनिमुद्रित केलेले आवाज आज ध्वनिमुद्रित करण्यासाठी उपलब्ध नाहीत. शिवाय त्याच जातीचा पक्षी आज सापडला तरीही त्याच्या आवाजाच्या दर्जात खूप फरक पडलेला दिसेल. या दोन्हींचं कारण म्हणजे आज पूर्वीच्या प्रजाती उरलेल्या नाहीत. त्यांच्यात घट होतेय.
मनुष्याने जंगलांची अपरिमित हानी चालवली आहे. त्यामुळे पूर्वीची गर्द अरण्यं आता उरलेली नाहीत. परिणामत: पक्षी-प्राणी नामशेष होत चाललेत. हा ‘ग्रेट अ‍ॅनिमल ऑर्केस्ट्रा’ लवकरच बंद पडेल असं बर्नी म्हणतात. जंगल हळूहळू शांत होतंय असा भीतीदायक इशारा ते देतात. हा इशारा जगभरातील तज्ज्ञ, निसर्गप्रेमी व अभ्यासकांनी दिलाय. तो खरा होऊ लागला आहे. वेळ आहे ती तुमच्या-आमच्या परिसरातील अरण्यं, वृक्षवल्ली, सागरकिनारे, तिथल्या पशू-प्राण्यांना वाचवण्याची.
This article was published in Prahaar Marathi Newspaper on 19th April 2015, here is the link http://epaper.eprahaar.in/detail.php?cords=14,1508,1450,2262&id=story4&pageno=http://epaper.eprahaar.in/19042015/Mumbai/Suppl/Page4.jpg

Tuesday, February 18, 2014

वाइन गुणिले पर्यटनाचं नफ्याचं गणित

                                                  

वाइन इंडस्ट्री आपल्या राज्यात स्थिरावली त्याला बरीच वर्ष झाली. आता वाइन पर्यटन म्हणजे वाइनरीज्मधली सहल लोकांना भुरळ घालतेय. वाइन पर्यटनाचं इथं बस्तान बसलं तर राज्यात परदेशी पर्यटकांकडून येणारा महसूलदेखील वाढेल. काळाची पावलं व लोकांचा कल पाहून वाइन इंडस्ट्री व राज्य शासनानेदेखील पर्यटन विकासात वाइन पर्यटनाला महत्त्व द्यायला सुरुवात केली आहे. अशीच एक सैर नाशिक जिल्ह्यातील ग्रोव्हर झाम्पा वायनरीची..

द्राक्षं काढणीचा हंगाम आला की नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्यातल्या काही गावातलं चित्र भराभर पालटतं. ऐन थंडीच्या दिवसातही उबेला बसायचं सोडून माणसं लगबगीनं कामाला लागतात. रस्त्यांवर द्राक्षमळ्यांची दिशा दाखवणारे बोर्ड ठोकले जातात. गावांची छान साफसफाई केली जाते. मळ्यातली कामं संपल्यावर माणसं पारावर बसून पाहुण्यांची वाट पाहायला लागतात आणि दर सीझनप्रमाणे पाहुण्यांच्या गाड्या रस्त्यावर धुळीचे फर्राटे सोडत गावात शिरतात. सहसा गावांमध्ये शहरी संस्कृतीला थारा नसतो असं म्हटलं जातं, पण द्राक्षाच्या लेकीचं माहेरघर असणा-या गावांमध्ये जेव्हा शहरी भागातले धनिक-वणिक येऊन ठेपतात, तेव्हा उत्तर-दक्षिण ध्रुव एकत्र आल्यासारखं वाटतं. त्यातूनच अशा प्रकारे दोन विभिन्न विश्वं एकत्र येतात. यातून काहींच्या गरजा पूर्ण होतात तर काहींना रोजगार मिळतो. राज्यातला वाइन उद्योग याचं एक उत्तम उदाहरण ठरला आहे. यातूनच आपल्याकडे काही वर्षापूर्वी वाइन पर्यटनाच्या एका वेगळ्या प्रवाहाची सुरुवात झाली आहे.
द्राक्षाचे मळे, त्यातच कुठेतरी सावली धरून टाकलेल्या शेड्स, भवतालचा खुला निसर्ग, हातात उंच, निमुळते, नाजूक असे काचेचे किणकिणाट करणारे वाइनचे ग्लास आणि त्यात मनमोहक रंगांनी डोळ्यांना व जिभेला सुखावणारी वाइन, असा सगळा माहोल वाइन इंडस्ट्री असणा-या गावांसाठी आता ओळखीचा झालाय. फ्रान्स, इटली, स्पेन, जर्मनी अशा काही देशांच्या पावलावर पाऊल टाकून महाराष्ट्रातील वाइन उद्योगांनीही हा प्रयोग सुरू केला आणि वेगळेपणा म्हणून सुरू केलेल्या या संकल्पनेचे आजकाल मोठे इव्हेंट होऊ लागले आहेत. यातलेच एक वाइन उत्पादक म्हणजे ग्रोव्हर झाम्पा वाइन्स. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीजवळ असणा-या सांजेगावात ग्रोव्हर झाम्पा वाइन्सचं विनयार्ड आहे. वैतरणेच्या पाण्यावर पोसलेले हे द्राक्षाचे मळे ४० एकर जागेवर पसरलेत. वॅले द विन प्रायव्हेट लिमिटेड आणि ग्रोव्हर झाम्पा विनयार्डस् याच्या संयुक्त मालकीची ही वाइन कंपनी आज देशातल्या वाइन उत्पादक कंपन्यांमध्ये दुस-या क्रमांकावर आहे.
ग्रोव्हर झाम्पा वायनरी सुमारे नऊ लाख लिटर वाइनचं उत्पादन दरवर्षी करते. त्यांच्या ब्रँडखाली झोम्पा, वन ट्री हिल रोड, ला रिझव्‍‌र्ह, शेने अशा काही व्हाइट, रेड, स्पार्कलिंग, रोझ वगैरे २६ प्रकारच्या वाइन्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत व निर्यातही होतात. देशातली दुसरी उत्तम वाइन कंपनी असणा-या ग्रोव्हर झाम्पानं २००५ मध्ये वॅले द विन कंपनीशी हातमिळवणी केली. त्यांच्या अनेक वाइन्सना देश-विदेशात पुरस्कार मिळाले आहेत. बंगळूरुमध्ये नंदी हिल्सवर त्यांचं ४१० एकरवर पसरलेलं विनयार्ड आहे. वाइन पर्यटन करण्यासाठी सांजेगावात आलेल्यांना द्राक्षांनी भरलेल्या बकेटमध्ये नाचायला मिळतं, त्याची गंमत घ्यायला शहरातून गाड्या भरून माणसं येतात. त्यांच्यासाठी सर्व उत्तम सुविधा इथं उपलब्ध आहेत. दोन दिवस मुक्काम करायचा असल्यास कॅम्पसाइटपण आहे. तसंच एक दिवसाची वीकेंड टूरदेखील आहे. ज्यात द्राक्षाच्या मळ्यातून फिरता येतं, वाइन टेस्टिंग करता येतं व असं बरंच काही करता येतं. शुल्क भरून या टूरमध्ये गेल्यावर द्राक्षाच्या बागायतीची माहिती, वाइन कल्चरची माहिती पुरवली जाते. विविध प्रकारच्या वाइन्सची चव चाखायला मिळते. वाइनचा कारखाना दाखवला जातो, ज्यात वाइन साठवली जाते, मुरवली जाते ती बॅरल रूम, टँक्स पाहायला मिळतात. विविध वाइन्स कोणत्या प्रकारच्या निरनिराळ्या द्राक्षांपासून बनतात, याची मनोरंजक माहिती मिळते. कारखान्यात फिल्टरिंग, बॉटलिंग, पॅकेजिंग इत्यादी प्रक्रिया बघायला मिळतात.
नाशिक जिल्हा भारताची नापा व्हॅली किंवा वाइन कॅपिटल मानला जातो. इगतपुरी पट्ट्यात उत्तम वाइन बनवणा-या कंपन्यांची विनयार्डस् आहेत. या सर्वानीच विनयार्ड पर्यटनाची कल्पना उचलून धरली आहे. लोकांकडून मिळणा-या पैशांपेक्षा त्यांच्याकडून होणा-या तोंडी प्रसिद्धीची या कंपन्यांना जास्त गरज आहे. आपल्याकडची विनयार्ड सहल इतरांपेक्षा वेगळी कशी करता येईल यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असतात. त्यातूनच मग वेगवेगळे वाइन फेस्टिव्हल्स आयोजित केले जातात. ग्रोव्हर झाम्पानेही सिनेतारकांच्या सह्या असलेल्या व देशातील काही उत्कृष्ट चित्रकारांची चित्रं असलेल्या वाइन बॉटल्सचा लिलाव करून यात नावीन्य आणण्याचा प्रयत्न केला. शहरातल्या कोणत्यातरी हॉटेलमध्ये जाऊन वाइन ऑर्डर करण्यापेक्षा प्रत्यक्ष वायनरीज्मध्ये जाऊन आराम करत, आवडीचं संगीत ऐकत वाइन चाखण्याची मजा निराळीच आहे. अर्थात त्यासाठी शहरातून थोडं लांब जावं लागतं, पण वीकेंड सहलींसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
राज्यातील ७२ वायनरीज देशातल्या एकूण वाइनपैकी ८० टक्के उत्पादन करतात. तीस हजार हेक्टर शेती वाइनसाठी लागणा-या द्राक्षांसाठी केली जाते.
एमटीडीसीकडूनही वाइन पर्यटनाला प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न होत आहेत. नुकतंच गेल्या वर्षी गंगापूर धरण परिसरात पर्यटन विकास करण्यासाठी जे ४० कोटी रुपये राज्य शासनानं मंजूर केलेत त्यात वाइन पर्यटनाचाही समावेश आहे. भविष्यात वाइन पर्यटनाला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यास या पर्यटन प्रकारातून मिळणारा महसूलही वाढेल, अशी वाइन उत्पादकांना आशा आहे. एकूणच वाइन इंडस्ट्रीमधल्या स्पर्धेची पताका आता वाइन पर्यटनानं खांद्यावर घेतली आहे. नाशिकशिवाय पुणे, बारामती, सातारा, अकलूजमध्येही वायनरीज् सहली आयोजित केल्या जात आहेत. विविध स्पर्धा, ग्राहकांना वाइनच्या किमतीत सवलत, काही वाइनरीजमध्ये राहण्याची सोय अशा काही आकर्षणांनी वाइन पर्यटनाला चांगले दिवस आणण्याचे प्रयत्न होत आहेत. वाइन पर्यटनानं एकाच वेळी व्यावसायिक व स्थानिकांसाठी रोजगार निर्माण केला आहे. एकट्या नाशिक जिल्ह्यात आणि आसपास ५० वायनरीज् आहेत. अकलुजला फ्रॅटेली वायनरी, बारामतीजवळ युबी ग्रुपची फोर सीझन्स वायनरी, नाशिक जिल्ह्यात शातो देओरी, यॉर्क वायनरी अशा कितीतरी वायनरीज् राज्यात आहेत. यातील ब-याच वायनरीज् वाइन पर्यटन सुरू करण्यासाठी उत्सुक आहेत, काहींनी ते आधीच सुरू केलं आहे. वाइन पर्यटनाचा जम बसायला थोडा वेळ लागतो आहे, कारण कोणतीही कल्पना रुजायला अर्थकारणाची त्यात मोठी भूमिका असते. राज्यातील वाइन इंडस्ट्रीचा बिझनेस पुन्हा जोमाने बहरला, तर वाइन पर्यटनालाही यशाचा रंग मिळू शकतो.
This article is published in www.prahaar.in on 16th February,2014 here is the link to published article http://prahaar.in/collag/184870

Sunday, January 19, 2014

काझीरंगाच्या रंगात..


आसामच्या छोट्या  निसर्गरम्य खेड्यांनी वेढलेलं काझीरंगा.. नजर जाईल तिथपर्यंत भातशेती व एलिफंट ग्रास (हत्तीगवत) पसरलेलं. मध्येच नजरेला विसावा देण्यासाठी चहाचे मळे व दूरवर दिसणा-या कार्बी अँगलॉँगच्या डोंगररांगा. या खेड्यांमधून जाता जाता काझीरंगाचं अरण्य नेमकं कधी सुरू होतं ते कळत नाही पण शेतांमध्ये राबणा-या माणसांमध्ये अचानक गेंडे व हत्ती दिसायला लागले की समजायचं काझीरंगात आलोयत. गेली कित्येक वर्ष  आसाम म्हटलं की इथे  मानस  अभयारण्य , पवित्रा अभयारण्य असूनही सर्वाधिक उल्लेख होतो तो फक्त काझीरंगाचाच. आसामच्या पर्यटन विकासात अत्यंत महत्त्वाचं स्थान असणारं व युनेस्कोनं एकशिंगी गेंडय़ांसाठी जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलेलं काझीरंगा नॅशनल पार्क हे वन्यजीव अभ्यासक व पर्यटक दोघांसाठीही अफाट खजिन्यासारखं आहे
कधीतरी असे क्षण येतात जेव्हा आपण खूप काळ एखाद्या गोष्टीसाठी थांबलेलो असतो, ती गोष्ट अगदी एका झटक्यात होऊन जाते. जंगलाचं पानदेखील गेल्या दोन वर्षात न पाहिलेली मी, एखाद्या नशेखोर माणसासारखी जंगलातल्या मातीमधून व पात्यांमधून येणारा तो अनोखा गंध श्वासामध्ये मुरवून घेण्यासाठी वाट पाहत होते. जंगलात मुद्दामहून वाट चुकायला जाणारा शहरी मनुष्य सहसा पश्चाताप करत नाही. माझ्यासारख्या अनेक भटक्या लोकांना हे पटत असेल. त्यामुळे संधी मिळताच या वेळी दुसरी-तिसरीकडे न जाता थेट आसाममधल्या काझीरंगाचा रस्ता पकडायचा हे मनाशी ठरवलेलं होतंच. त्यामुळे अनपेक्षित संधी मिळताच मी कोहरा या काझीरंगामधल्या गावात उतरले होते. हातात कोणतंही बुकिंग वगैरे नव्हतं. पण असं सर्व करायला लागलं की एक बरं होतं की आपली वाट आपणच आखतो व झापडबंद घोडय़ासारखे ठरवलेल्या मार्गावरूनच जात नाही. भटकंतीचा खरा आनंद घ्यायचा असेल तर तो असाच येतो. अगदी गोहाटीपासून कोहरापर्यंत येण्यासाठी बसचं तिकीटही माझ्याकडे नव्हतं. ते मी आदल्या रात्री नऊ वाजता गोहाटीतल्या लॉजच्या नोकराला मदतीला घेऊन आसाम परिवहनच्या बस स्टँडवर जाऊन बुक केलं होतं. ही सकाळी नऊ वाजता गोहाटीवरून सुटलेली बस नॉनस्टॉप (एकच स्टॉप तोही पंधरा मिनिटांचा, नागाव गावात घेऊन) पाच तासांनी कोहरामध्ये पोहोचली होती. सुदैवाने मित्राचं बीबीसीसाठी शूट सुरू होतं, त्यांची टीम माझ्यासाठी वाटच पाहत होती. त्यांच्यामुळे अर्थातच काझीरंगा अधिक वेगळ्या बाजूंनी पाहण्याची संधी मिळाली. पण एक आहे की, जंगलात तुम्ही कितीही फिरलात तरी जंगल कधीही पूर्णपणे वाचता येत नाही. असल्या चार-पाच दिवसांच्या फे-यांमध्ये तर मुळीच नाही. पण शहरात राहून उबगलेल्या मनाला थोडा तजेला मिळवून देण्यासाठी एवढा मुक्काम पुरेसा होतो. तसं अनेकदा काझीरंगाचं जंगल ब्रह्यपुत्रेच्या पुरात बुडून गेलेलं टीव्हीवरील दृश्यांमध्ये पाहिलेलं. पुराच्या पाण्यात पोहण्याचा व जीव वाचवण्याचा निकराचा प्रयत्न करणारे प्राणी पाहून जीव गलबलून यायचा. त्या दृश्यांवरूनच काझीरंगाचा विस्तार किती अफाट आहे याची कल्पना आली होती. आणि आता तर प्रत्यक्ष तिथेच उभे होते. तिथल्या आदिम रहिवाशांची नजरभेट होईल या उत्सुकतेने.
काझीरंगा ४७० चौरस किलोमीटर इतकं पसरलेलं आहे. भारतीय वन्यजीवांतील बिग फाइव्हपैकी चार म्हणजे हत्ती, वाघ, बिबटय़ा व गेंडा हे काझीरंगात आढळतात. तसं म्हटलं तर काझीरंगा ज्यांच्यासाठी ओळखलं जातं त्या गेंडय़ांचं दर्शन बागुरी रेंजमधील गावांपासूनच सुरू होतं. कोहराला पोहोचण्याआधी लागते ती बुरापहार व बागुरीची रेंज. त्याच वाटेवर बाजूला जाणारी आगरतोलाची रेंजपण आहे. बागुरी गाव काझीरंगाच्या चार रेंजेसपैकी एक. काझीरंगा चार रेंजमध्ये विभागलेलं आहे. आगरतोली, बुरापहार, कोहरा व बागुरी. यापैकी बुरापहारमध्ये होणा-या चोरटय़ा शिकांरीमुळे त्याची थोडी दुष्किर्ती झाली आहे व अजूनही इथं अशा शिकारी होतच असतात. त्यामुळे पर्यटकांना शक्यतो ही रेंज मनमोकळेपणे पाहता येत नाही. इथल्या चोरटय़ा शिकारीला आळा बसावा म्हणूनच खरं तर ही रेंज काझीरंगा अरण्यात वाढवण्यात आली. पण परिणाम उलटाच झाला. गावातल्या लोकांमध्ये फारसा उत्साह नसल्यामुळे इथं पर्यटक फारसे जात नाहीत. शिवाय सेंट्रलचा विस्तारच एवढा मोठा आहे की हौशी पर्यटकांची भूक भागवण्यासाठी सेंट्रलची रेंज पुरेशी होते.
http://prahaar.in/wp-content/uploads/2014/01/kaziranga-elephant.jpgगेल्या सप्टेंबरमध्ये आलेल्या पुरामुळे या वेळी इस्टर्न आगरतोलीची रेंज काही काळाकरता बंद होती. त्यामुळे माझ्याकडे फक्त बागुरी ही वेस्टर्न रेंज व सेंट्रल रेंज करण्याखेरीज दुसरा पर्याय नव्हता. पण कोणत्याही जंगलात पहिल्यांदाच फिरताना रेंजची आवडनिवड फारशी पाहायची नसते. तो दिमाख करायचा तो एकाच जंगलात दहाव्यांदा जाताना. तर खास गेंडा पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना सेंट्रल रेंजमध्येच फिरवलं जातं. इथं गेंडा अगदी हौस फिटेस्तोवर पाहायला मिळतो. गेंडा इथल्या लोकांसाठी अगदी दारातला प्राणी आहे. एकाच शेतात काम करणारे शेतकरी व गेंडा चरताना दिसणं इथं कॉमन दृश्य आहे. गेंडा हा मख्ख प्राणी आहे, असं प्रथमदर्शनी वाटतं पण तसं नाही. गेंडय़ाला नजर कमी असली तरी त्याचे कान व नाक अत्यंत तीक्ष्ण आहेत व तो वरकरणी शांत राहून सुखासीन चरत असला तरी वेळेला गेंडा अत्यंत धोकादायक प्राणी आहे. सेंट्रल रेंज बरीचशी फिरून झाल्यावर मी वेस्टर्न रेंजला जायचं ठरवलं व त्याच संध्याकाळी सेंट्रल रेंजमध्ये चवताळलेल्या गेंडय़ाने पर्यटकांच्या जीपवर हल्ला करून जीप उलटी केली. परंतु हत्तीवरून किंवा जीपमधून फिरताना एकटय़ा गेंडय़ाला कॉर्नर करून जवळून पाहण्यासाठी त्याला चहूबाजूने हत्तींनी किंवा जीप्सीज्नी घेरल्यावर असे प्रसंग घडणं साहजिक आहे. इथल्या तळ्याकाठी व शेतात निवांत चरणारा गेंडा अधेमधे चहाच्या मळ्यांमध्येही शिरतो व चहामळ्यातील कामगारांची धावाधाव होते. इथल्या विस्तिर्ण गवताळ प्रदेशामुळे काझीरंगा गेंडय़ांसाठी नंदनवनच आहे. इथं एलिफंट ग्रास म्हणजे ज्यात अगदी हत्तीदेखील लपून राहू शकतो इतक्या उंचीचं गवत मुबलक आहे, त्यामुळे यात लपलेला गेंडा अगदी जवळ गेल्यावर अवचित उठून उभा राहिपर्यंत त्याचा अंदाजच येत नाही. त्यातही पिल्लासोबत फिरणारी आई असेल तर शक्यतो त्यांच्यापासून दूरच राहिलेलं बरं. त्यांच्याकडून अचानक हल्ला होण्याचा संभव असतो. पण काझीरंगात सध्या तरी गेंडा पाहण्यासाठी फारसे कष्ट घ्यावे लागत नाहीत. इथं गेल्या वर्षीच्या गणनेनुसार २२९० गेंडे आहेत. अर्थात त्यांच्यापैकी किती पोचर्सच्या रेडारवर याचा पत्ता तर खुद्द इथल्या सरकारलाही नाही अशी माहिती माझ्या बसमधील सहप्रवाशाने दिली होती. काझीरंगाच्या जंगलात मिलीभगत नाही तर दहशतीने चोरटी शिकार होते. एक तर काझीरंगामध्ये दाट व उंच गवतात लपलेले प्राणी पर्यटकांना पाहण्यासाठी शोधूनच काढावे लागतात. गाइड मदतीला असतात तरीही जीपमधून फिरताना गेंडय़ाखेरीज इतर पाहिजे तो प्राणी दिसेलच याची शाश्वती नाही. इथल्या सुजाण लोकांशी बोलताना जाणवलं की त्यांनाही गेंडय़ांची अशाप्रकारे चोरटी शिकार वाढत असल्याची खंत व हळूहळू भारतातून तो नामशेष होईल याची भीती आहे. शिवाय दर पावसाळ्यात येणा-या पुरामुळे असंख्य प्राण्यांनाही प्राण गमवावे लागतात, ही नैसर्गिक आपत्ती आहेच.
http://prahaar.in/wp-content/uploads/2014/01/kazirznga.jpgकाझीरंगात १०६हून अधिक वाघदेखील आहेत पण इथला वाघ दिसणं तसं दुरापास्तच. हे देखील चोरटय़ा शिकारीला बळी पडत आहेत. काझीरंगात वाघ पाहायचा असेल तर जंगल चाळण लावून पाहावं लागतं. परंतु काझीरंगाच्या वैभवात भर घालण्यासाठी इथं पेलिकन, बेंगाल फ्लोरिकनसारखे सुंदर व दुर्मीळ पक्षीदेखील आहेत. काझीरंगाचं जंगल वॉचटॉवरवर जाऊन पाहण्यापेक्षा तळ्याकाठी बसून आरामात पाहावं. अर्थात तळ्यावर उतरताना आधी आसपास गेंडा किंवा हत्ती नाही ना याची खात्री करून घ्यावी. तळ्यावर जाण्यासाठी योग्य वेळ म्हणजे संध्याकाळ होण्याच्या जरा आधीची. दिवसभर तहानलेले पक्षी व प्राणी याचवेळी सांजसावल्या पडत असताना तळ्यावर येतात. तेव्हा त्यांना जीव भरून पाहता येतं. काझीरंगात सोहोला, हारमोटी, मिहीमुख, काढपारा व फोलियामारी असे वॉचटॉवर्स आहेत. यातले काही तळ्यांच्या काठीच आहेत. काझीरंगाच्या जंगलात हत्ती व जंगली म्हशीदेखील पाहायला मिळतात. हत्ती तर भारतातल्या कोणत्याही जंगलात दिसतातच, त्यामुळे खरं तर हत्ती पाहण्यासाठी एवढी उत्सुकता नव्हती. परंतु फिरता फिरता आमच्या पुढय़ात हत्तीचं एक नाचरं पिल्लू आलं. या पिल्लाने आमचं चांगलंच मनोरंजन केलं. ते रस्त्यात मध्येच उभं असल्याने त्यानं आधी जावं मग आपण अशी जंगलची रितच आहे. पण हे पिल्लू झाडीमध्ये जाण्याऐवजी मध्येच छानपैकी पायांचा ताल धरून नाचत होतं, त्याचं कारण तर कळलं नाही पण त्याला पाहताना मात्र मजा आली. पाळीव हत्ती नाचताना नेहमीच सर्कशीत बघितले मात्र या जंगली हत्तीच्या पिल्लाला रस्तात असं मध्येच उभं राहून नाचताना पाहण्याचा अनुभव वेगळाच होता. त्याला सोडून पुढं आल्यावर गवताळ मैदानात बारशिंगा (स्वॅम्प डिअर) हरणांची मोठी फौजच चरत उभी होती. त्यातच काही भेकरं पण होती. दोन-तीन फुटबॉल ग्राउंडएवढय़ा मोठय़ा अशा त्या हिरव्यागार गवताळ प्रदेशात एकाचवेळी गेंडा, हरणं, भेकरं, जंगली म्हशी, रानटी डुक्कर असे प्राणी एकत्र चरताना पाहायला मिळण्याचा अनुभव काही वेगळाच असतो. त्यातच जवळ तळं किंवा पाणथळ असेल तर काही पक्षीदेखील या समूहात उतरलेले दिसतात. जगभरातून पर्यटक भारतातली जंगलं पाहण्यासाठी का येत असावेत याचं कारण काझीरंगात डोळ्यांदेखतच दिसतं. गवताळ प्रदेशानं व्यापलेलं काझीरंगा विविध प्रकारच्या व सवयींच्या प्राण्यांसाठी राहण्याचं एक अत्यंत उत्तम अरण्य आहे. एका अर्थाने दक्षिण आफ्रिकेच्या मोठमोठय़ा गवताळ जंगलांना भारताकडून मात देणारं काझीरंगा.. खरोखरीच एकदा अनुभवलंच पाहिजे असं.
http://prahaar.in/wp-content/uploads/2014/01/kaziranga-deer.jpgकाझीरंगाला कसं जाल?
काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत. राष्ट्रीय महामार्ग ३७ काझीरंगातून जातो. त्यापैकी वेळ वाचवणारे मार्ग म्हणजे विमानाने थेट गोहाटी किंवा जोरहाट किंवा तेझपूपर्यंत जायचं. अन्यथा रेल्वेने तिथं पोहोचायचं. तिथून बसने कोहरापर्यंत यायचं. तेझपूर किंवा जोरहाटपासून बसने काझीरंगापर्यंत पोहोचायचं असेल तर किमान तीन ते चार तास लागतात. थेट गोहाटीवरून कोहराला जाण्यासाठी पाच ते सहा तास लागतात. किमान वेळ देण्याचं कारण म्हणजे केवळ आसामच नाही तर पूर्ण पूर्वाचलातच रस्त्यांची कामं सुरू आहेत. त्यामुळे कोणत्याही ठिकाणी पोहोचण्याची निश्चित वेळ देता येत नाही. कोहरा, बागुरी व आगरतोली रेंजमध्ये फॉरेस्टची रेंज ऑफिसेस आहेत. तिथं जीप व गाइडचं बुकिंग करता येतं. शिवाय आसाम पर्यटन खात्यातील माणसं खूप कार्यतत्पर आहेत. तिथल्या कोणत्याही फोन नंबरवर फोन केल्यास एका फोनवरच तुम्हाला सर्व माहिती मिळते व तुमची सर्व सोय होऊ शकते.
काझीरंगात राहण्याची सोय
काझीरंगाला यायचं म्हणजे कोहरा गावात उतरायचं. कोहराच्या आसपास बरीच गेस्ट हाउसेस व रिसॉर्टस आहेत. वनखात्याचीही तीन रेस्ट हाउसेस पर्यटकांसाठी उपलब्ध असतात. त्यांचं बुकिंग खूप आधी करावं लागतं. ते नाहीच मिळालं तर वाइल्ड ग्रास रिसॉर्ट, आयोरा रिसॉर्ट, इकोरा गेस्ट हाउस ,-हायनो गेस्ट हाउस व इतरही काही पर्याय आहेत. यांचे दर दिवसाला माणशी नऊशे रुपयांपासून ते तीन हजार रुपयांपर्यंत आहेत.
http://prahaar.in/wp-content/uploads/2014/01/elephant-1.jpgजंगलात हत्तीवरुन सफारी
काझीरंगा अरण्य पाहताना हत्तीवरल्या सफारीचा अनुभव जरूर घेण्यासारखा आहे. भारतातील इतर जंगलांमध्ये (उत्तरांचलचं जिम कॉर्बेट नॅशनल पार्क सोडल्यास) हत्तीवरून दाट गवताळ जंगलात फिरण्याची अशी मजा येत नाही. शिवाय हत्तीवर असल्यामुळे दाट गवतात लपलेले प्राणी हुडकून पाहता येतात. काझीरंगात पहाटे पाचपासून ते सहा वाजेपर्यंत ही सफारी मिळते. त्याचा दर माणशी ५७५ रुपये आहे. हत्तीवर तिघांना बसावं लागतं. पण एकटय़ालाच बसून फिरायचं असल्यास तसंही बुकिंग करता येतं, मात्र ते पर्यटकांच्या संख्येवर अवलंबून असतं. सेंट्रल रेंजमध्ये सध्या आठ-दहा पाळीव हत्ती आहेत.
 This article is published in Marathi news daily 'Prahaar' on 5th January, 2014. here is the link- http://prahaar.in/collag/171624


Sunday, September 8, 2013

विष्णूपूरच्या बंगाली वृन्दावनात

                                                            



  उत्तराखंडमध्ये यावर्षीच्या जूनमध्ये झालेल्या ढगफुटीनंतर आलेल्या पुरामुळे प्रचंड वाताहत झाली परंतु केदारनाथाचेजारो वर्षांपूर्वीचे मंदिर निसर्गाच्या एवढ्या तडाख्यातून बचावून उभे आहे. लगेचच काही लोकांनी त्याला परमेश्वरी शक्तीचा अगाध महिमा अशी लेबले लावली तर काहींनी तेव्हाचे आणि आताचे वास्तुविशारद यांची तुलना सुरु केली. कारण काहीही असो, या मंदिराची बांधणी भक्कम आहे हे दिसून आले आणि आपल्या देशातल्या कितीतरी प्राचीन मंदिरे आणि वास्तू बांधणाऱ्या अनाम शिल्पकार आणि स्थापत्यकारांच्या कलेला तोड नाही हे सिद्ध झाले. मंदिरांवरील शिल्पकाम किंवा कोरीवकाम म्हणजे त्याकाळची माहिती देणारे एक सर्च इंजीनच. आपल्या सुदैवाने भारतात सर्वत्र पुरातन मंदिरांच्या देखण्या वास्तू अजूनही शाबूत आहेत. त्यापैकीच एक आहे मल्ल राजांचा वारसा सांगणारा सोळाव्या शतकातील विष्णुपूरचा टेराकोटा मंदिरांचा समूह. विष्णुपूर पश्चिम बंगालच्या बांकुरा जिल्ह्यात कोलकाता शहरापासून सुमारे २०० कि.मी अंतरावर आहे. इसवी सन ९९४ पासून मल्ल राजांची राजधानी असलेले विष्णुपूर. इथली तीस देवळे भाजलेल्या मातीच्या विटांपासून बांधून काढली आहेत हे त्यांचे एक वैशिष्ट्य पण १६व्या शतकातील मल्ल राजांचा इतिहास, त्यांचा कलासक्तपणा,सौंदर्यदृष्टी,भक्तीभाव आणि एकूणच त्यांच्या राज्यकाळातील अनेक बारीकसारीक गोष्टी या टेराकोटा मंदिर समूहाच्या माध्यमातून आपल्याला समजतात. टेराकोटा या मूळ इटालियन शब्दाचा अर्थ भाजलेली जमीन किंवा माती असा होतो. मल्ल राजांच्या काळात टेराकोटा स्थापत्यशैली पूर्ण बंगालमध्ये फोफावली, विषेशतः बांकुरा, वर्धमान जिल्ह्यात अशी अनेक मंदिरं पाहायला मिळतात. बंगालमधली टेराकोटा मंदिरे पाहायला जगभरातून संशोधक,अभ्यासक आणि पर्यटक इथपर्यंत येतात. इतिहासातील कित्येक राजा-महाराजांनी त्यांच्या काळात स्वतःची ओळख मागे राहावी यासाठी देऊळे बांधून ठेवली आहेत. तशीच ही विष्णूपुरची देऊळे. हि ऐतिहासिक मंदिरे, या वास्तू आपल्याला इतिहास, वैभव, संस्कृती सांगायला उत्सुक आहेत म्हणूनच शतकानुशतके वादळवाऱ्यात टिकून आहेत. देवळांचे इतके अनन्यविध प्रकार भारतात आहेत कि एखाद्याने नुसती देवळं जरी पहायची ठरवली तर त्याचा अख्खा जन्म पुरणार नाही.
अनेकदा चित्रे वगैरे पाहून मूळ वास्तूची कल्पना येत नाही आणि प्रत्यक्ष पाहताना आपण इथे आलो हे बरेच केलं असं वाटायला लागतं. विष्णुपूरच्या देवळांबाबत माझं नेमकं हेच झालं. एखाद्या ठिकाणी गेल्यावर पाहण्यासारखं बरेच आहे असा स्थानिकांकडून देखील आग्रह होतो. ‘काय पाहावे’ यादीतील सर्वच पाहता पाहता खरोखरीच जिथे गेलं पाहिजे होतं अशी ठिकाणं मग राहून जातात आणि त्याची हुरहूर मनाला लागते. त्यामुळे पश्चिमबंगात( बंगाली उच्चारानुसार पोश्चिमबोंगात) फिरताना १०-१२ दिवसांमध्ये काय आणि किती पहायचे हा प्रश्न होताच. पण विष्णुपूरची टेराकोटा देवळं पहावीच असा सल्ला अनेकदा माझ्या कानांनी ऐकून झाला होता. टेराकोटाशी माझा संबध म्हणजे फक्त काही शोभेच्या वस्तू आणि खोट्या दागिन्यांपुरता. प्रत्यक्ष विष्णुपूरला जाऊन ठेपल्यावर त्या अप्रतिम कलाकारीने थक्क झाले. ते कोरीवकाम, नक्षीकाम आणि काळाच्या झपाट्यात भक्कम अखंड राहिलेले असं बांधकाम पाहून नेहमीप्रमाणे ‘आ’ वासला गेलाच. तिथली प्रत्येक वास्तू विलोभनीय आहे आणि केवळ देवावरील प्रेमापायी आपल्या पूर्वजांनी इतकं काही सुघड निर्माण करून ठेवलं आहे हे अनाकलनीयच आहे. बंगालच्या स्थापत्यकलेच्या इतिहासात या मंदिरांना मोठं महत्व आहे. दक्षिण भारतासारखे इथे मोठे कातळ आणि दगड सापडत नाहीत त्यामुळेच दगडांना पर्याय म्हणून या भाजलेल्या मातीच्या विटांचा वापर करून इथली मंदिरे बांधली गेली आणि अश्या प्रकारे टेराकोटा शिल्पकलेचा उदय बंगालमध्ये झाला. अनेक शतके इस्लामी आधिपत्याखाली काढल्यानंतर सोळाव्या शतकाच्या आसपास बंगालमध्ये वैष्णव पंथाने पर्यायाने हिंदूधर्माच्या प्रभावाने पुन्हा अंमल दाखवायला सुरुवात केली. त्याच सुमारास विष्णुपूरमध्ये श्रीकृष्णाची देऊळे अस्तित्वात येत होती. साहजिकच टेराकोटा देवळांच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धातल्या देवळांच्या बांधणीवर इस्लामी स्थापत्यशैलीची झाक आहे. विष्णुपूरची ही देऊळे बंगालमधील १३व्या अणि १४व्या शतकातील मशिदी अणि ओरिसातील मंदिरे यांच्यापासून प्रभावित होऊन निर्माण झालेल्या शैलीत बांधली असल्याचेही काहींचे मत आहे. काही संशोधकांच्या मते कृष्णभक्त मल्ल राजांनी वृंदावन-मथुरेच्या धर्तीवर स्वतःच्या राज्यात मंदिरे असावीत म्हणून विष्णुपूर मंदिरांची निर्मिती केली. मंदिरांच्या भिंतींवर केलेल्या कोरिवकामात महाभारत, रामायण यातील गोष्टी आहेत खेरीज श्रीकृष्णाच्या जीवनातील काही कथा, भगवान बुद्ध ,चंडीदेवी अणि राक्षस वध, योद्धा, शिकारी, व्यापारी, निसर्ग, पशु-प्राणी, सामान्य जनांच्या दैनंदिन गोष्टी हे सर्वदेखील या नक्षीकामात कोरलेले दिसते. मुळात कोणत्याही प्रकारचे ज्ञान जेव्हा फक्त लिखित आणि मौखिक होते तेव्हाच्या प्राचीन आणि ऐतिहासिक काळात ज्ञानाच्या प्रसारासाठी शिल्पकारांनी आपल्या कलेचा अतिशय समर्पक वापर केलेला दिसतो. विविध देशांमधील शिल्प आणि कोरीवकामात साम्य आढळत असल्यामुळे आता संशोधकही अचंबित होत आहेत. विष्णुपूर मंदिरांच्या कोरीवकामातही अशी साम्य आढळली आहेत. येथील कोरीवकामात अनेक पौराणिक, ऐतिहासिक,धार्मिक आणि सामाजिक संदर्भ असलेल्या गोष्टींचे चित्रण आहे आणि याच वेगळेपणामुळे ही टेराकोटा मंदिरे भारतीय शिल्पकलेचा अत्यंत महत्वाचा नमुना म्हणून जगप्रसिद्ध आहेत.
विष्णुपूरची सैर एखाद्या टाईम कॅप्सूलप्रमाणेच आहे. वर्धमानवरून चार तासांचा बसचा प्रवास करून मी इथे पोहोचले. पुढे विष्णुपूरच्या गल्ल्यांमधून सायकल रिक्षा ओढत नेईल तिथे उतरून मंदिरे पाहण्याचा कार्यक्रम सुमारे ४-५ तास चालू होता. हा सायकल रिक्षा भाग सोडला तर हि मंदिरे थेट मल्ल राजांच्या काळातच नेऊन उभी करतात. कोणतीही प्राचीन देवळे किंवा शिल्प ही आरश्याप्रमाणेच असतात कारण त्यांच्यावरून त्याकाळच्या सांस्कृतिक, साहित्यिक, राजकीय, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचा अंदाज येतो. विष्णुपूरच्या देवळांची शिल्पकलाही अद्भुत आहे. या सर्व मंदिरांची स्थापत्यशैली भारतात पाहायला मिळणाऱ्या इतर मंदिरांपेक्षा अत्यंत वेगळी आहे आणि हेच त्यांचे वैशिष्ट्य आहे. देऊळ म्हटले कि त्यात देवाच्या मूर्ती असणं हे ग्राह्य धरलं जातं पण ज्यात मूर्तीच नाहीत अशी फक्त देवांच्या विश्रांतीसाठी बांधलेली देऊळे( शय्यागृह) देखील इथे आहेत. हि टेराकोटा देऊळे आणि वास्तू भक्तीप्रिय मल्ल राजांनी श्रीकृष्ण आणि श्रीविष्णूला समर्पित केलेली आहेत. देऊळे बांधताना साध्या रचनेत आणि आजूबाजूला मोकळी जागा सोडून बांधली आहेत. जास्तीत जास्त प्रजेने तिथे यावे, जमून देवांची भक्ती-आराधना करावी हा त्यामागील हेतू होता. वैष्णवपंथ देखील साध्या जीवन राहणीला महत्व देतो त्यामुळे सामान्य नागरिकांची घरं जशी, तशीच त्यांना हि मंदिरं वाटावीत म्हणून त्यांची बांधणी साधीच ठेवली गेली.
या सर्व मंदिरांची रचना वेगवेगळी असली तरी स्थापत्यशैली एकच आहे. हे मल्ल राजे कृष्णभक्त आणि या भक्तीपायीच त्यांनी टेराकोटा देऊळे बांधण्याचा सपाटा लावला. या मंदिरांचे स्थापत्यविशारद म्हणजे आचार्य आणि शिल्पकार ज्यांना सूत्रधार असेही म्हटले जायचे, त्यांना श्रीमंत जमीनदार, व्यापारी यांच्याकडे आश्रय मिळायचा. ते आपली कला मंदिर बांधणीतून दाखवत बंगालच्या अनेक गावांमधून फिरायचे. तेव्हापासूनच बंगालमधली मंदिर शिल्प-वास्तूकला टेराकोटामय झाली. त्यामुळेच बंगालच्या बांकुरा, हुगळी, वर्धमान आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये टेराकोटा शिल्पकलेचा प्रभाव आणि प्रसार दिसून येतो. ‘चाल’, ‘रत्न’ आणि ‘दालान’ अश्या तीन प्रकारे ही मंदिरे बांधली गेली आहेत. ‘चाल’ म्हणजे छताचे कोपरे अणि अशी दोन,चार किंवा आठ उतरते कोपरे असणारी छोटी मोठी देवळे इथे दिसतात. विष्णुपूरची मंदिरे देखील चाल पद्धतीने बांधलेली आढळतात. सामान्यतः बंगाली घरे ज्या धाटणीची असत त्याचप्रमाणे ही मंदिरे देखील बांधली जात. चाल किंवा चाला म्हणजे छप्पराचे उतरते निमुळते कोन, अश्या दोन कोनाच्या छप्पराला दुईचाला म्हटले जाते तशीच चौचाला, अटचाला मंदिरे देखील आहेत. बंगालमधील ग्रामीण भागात आज देखील अशा छप्परांची घरे आढळतात. ‘रत्न’ म्हणजे देवळावरील शिखर आणि त्यातही एक, तीन किंवा पाच शिखरांची मंदिरे इथे आहेत. ‘दालान’ या प्रकारात देवळावर सपाट छत असते. हि टेराकोटा मंदिरे भारतीय इतिहासातील स्थापत्य आणि शिल्पकलेचा असाधारण वारसा आहेत. रसमंच ही इथली एक सभागृहासारखी प्रमुख वास्तू आहे. इ.स १६०० मध्ये मल्ल राजा वीर हंबीर याने रसमंच बांधले, जे या समूहातले सर्वात जुने मंदिर आहे. अनेक स्तंभांव उभे असलेले विटांच्या मनोहारी  बांधणीतले हे मंदिर अतिशय सुंदर आहे. वास्तविक हे भगवान श्रीकृष्णासाठी अर्पण केलेले शयनगृह आहे. त्रिकोणाकृती रचनेच्या मंदिराच्या जोत्यासाठी लेटेराईट स्टोन वापरण्यात आला आहे. दूरवरूनही डोळ्यात भरेल अश्या या मंदिराचे छप्पर उतरते आहे. फक्त बंगालच नव्हे तर पूर्ण भारतातदेखील या शैलीचे मंदिर आढळत नाही. मात्र या मंदिरावर कमळ इत्यादी फुलांखेरीज इतर कोणतीही खास शिल्पकला कोरलेली दिसत नाही. मुळात हे मंदिरच नसल्यामुळे इथे कोणतीही मूर्ती नाही पण १९३२ सालापर्यंत रास उत्सवाच्या वेळेस विष्णुपूरमधील इतर मंदिरातून दर्शनासाठी मूर्त्या इथे आणल्या जात. इथे एका छोट्याश्या टेकडीवर एका खोलीवजा बुरुजाचे भग्नावशेष आढळतात त्याला गुमगढ म्हणतात. त्याचा वापर नक्की कशासाठी पूर्वी होत असे याची माहिती त्यावर कोरलेली दिसत नाही आणि इतरत्र उपलब्ध देखील नाही. काहींच्या मते हा तुरुंग होता तर काहींच्या मते ते धान्य साठवण्याचे गोदाम होते. आता तिथे फक्त खिडक्या-दरवाजे नसलेले खिंडार बाकी आहे.
गुमगढवरून थोडेसे पुढे गेल्यावर श्यामराय मंदिर दिसते. इसवी सन १६४३ मध्ये मल्ल राजा रघुनाथ(दुसरा) याने हे मंदिर बांधले. पाच शिखरांचे हे पच्चुरा मंदिर अद्याप उत्तम स्थितीत आहे. या मंदिराच्या चोहोबाजूला त्रिकोणी कमानीचे दरवाजे आहेत. याच्या भिंतींवर महाभारत, रामायण, रास चक्र आणि राधा-श्रीकृष्ण यांच्याशी संबधित प्रसंग कोरलेले आहेत. श्यामराय मंदिराच्या पुढे दिसते ते केश्तोराय मंदिर. हे उंचच उंच मंदिर देखील आवर्जून पाहावे असे मंदिर आहे. जोरबंगला शैलीतल्या या मंदिराला दोन उतरत्या भाजणीची छत जोडून असल्यामुळे याला जोर (जोड )बंगला मंदिर असे म्हणतात. जोरबंगला म्हणजे संयुक्त छतांचे मंदिर. या जोडछतांच्या मध्ये एक छोटेसे शिखर आहे ज्याच्यामुळे छतांनादेखील आधार मिळाला आहे. टेराकोटा शैलीचा उत्तम नमुना म्हणजे हे इ.स १६५५ साली राजा रघुनाथसिंह(दुसरा) याने बांधलेले मंदिर आहे. या मंदिरात आत आणि बाहेर आढळणारे  कोरीवकाम देखील आकर्षक आहे. त्यात शरशय्येवर पडलेले भीष्माचार्य तसेच जहाजे आणि बोटी देखील दिसतात. पुढे दिसते ते एकच शिखराचे म्हणजे एक रत्न राधेश्याम मंदिर. याच्या भवताली उंच भिंतींची तटबंदी आहे आणि प्रवेशद्वारावर मुस्लीम स्थापत्यशैलीचा प्रभाव असणारी त्रिकोणी कमान आहे. इ.स. १७५८ मध्ये मल्ल राजा चैतन्यसिंह याने हे मंदिर बांधले. असे म्हटले जाते कि राज्याच्या खजिन्यात खडखडाट असतानाही केवळ मंदिर बांधण्याची परंपरा जपली जावी म्हणून राजाने हे मंदिर बांधले. एक शिखर असणारे दुसरे एक मंदिर म्हणजे राधालालजेऊ मंदिर, जे इ.स.१६५८ मध्ये मल्ल राजा बीरसिंह याने बांधले. राधेश्याम मंदिराच्या अगदी समोरच मृण्मयी मंदिर आहे. मंदिर जीर्ण झाले असल्यामुळे इथली मृण्मयीमातेची मूर्ती दुसरीकडे नव्या मंदिरात ठेवण्यात आली आहे. इथून पुढे गेल्यावर दोन मोठी प्रवेशद्वारे दिसतात. एक आहे तो बडा पत्थर दरवाजा, राजमहालाचे उत्तरेकडील प्रवेशद्वार म्हणून हा दरवाजा सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात महाराजे बीरसिंह यांनी बांधला. या दुमजली प्रवेशद्वाराच्या आत सैनिकांना बसण्याची जागा आहे. तिथेच जवळ एक छोटे प्रवेशद्वार आहे ते देखील याच काळात बांधले गेले होते. हि दोन्ही प्रवेशद्वारे राजघराण्याच्या एकेकाळच्या वैभवाची साक्ष देतात. जवळच सतराव्या शतकामध्ये बांधलेला एक दगडी रथ दिसतो.
मदन मोहन मंदिर हे इथले सर्वात प्रसिद्ध मंदिर. एक शिखराचे हे मंदिर इ.स १६९४ मध्ये मल्ल राजा दुर्जनसिंह यांनी बांधले. विष्णुपूरच्या सर्व मंदिरांमध्ये हे अतिशय सुंदर मंदिर म्हणून गणले जाते. भगवान विष्णू यांचा अवतार मदन मोहनाची मूर्ती या देवळात आहे. विष्णुपूरच्या काही मंदिरांमध्ये मूर्ती देखील आहेत आणि त्यांची पुजादेखील केली जाते त्यातले हे एक. मदन मोहन मंदिरात गेल्यानंतर मलाही पूजा करण्याची संधी मिळाली. पण इथल्या सर्वच मंदिरात अशा प्रकारे पूजा केली जात नाही. या मंदिराला दोन संयुक्त छते आहेत. सर्वात जुनी आणि प्रचंड दालमदल तोफ इथले आकर्षण आहे. इ.स १७४२ मधली हि तोफ ११२ क्विंटल वजनाची आणि ३.८ मीटर लांबी आणि ३० सेंटीमीटर व्यासाची आहे. मल्ल राजांच्या या मल्लभूमीवर अठराव्या शतकात मराठ्यांनी देखील आक्रमण केले होते. त्यावेळी हि तोफ वापरण्यात आली होती. एक शिखराचे छिन्नमस्त मंदिर लाईम आणि लेटेराईट स्टोनमधून बांधून काढले आहे. दुर्गेच्या या जीर्णशीर्ण मंदिराचे पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. पुढे जवळ जवळ असणारी एक शिखरीय सात मंदिरे पाहायला मिळाली. यामध्ये नंदलाल मंदिर आणि जोरमंदिर यांचा समावेश आहे. जोरमंदिराच्या एकाच आवारात तीन छोटी मंदिरे आहेत, ती मल्ल राजा कृष्ण सिंग याने इ.स १७२६ मध्ये बांधली. राधागोविंद मंदिर देखील पाहण्यासारखे आहे. हे देखील इ.स १७२९ मध्ये मल्ल राजा कृष्ण सिंग यानेच बांधले. इथून जवळच इ.स १७३७ मध्ये बांधले गेलेले राधामाधव मंदिर आहे. दोन छते आणि एक शिखराचे हे मंदिर आहे. मल्ल राजा कृष्णसिंह याची पत्नी चूडामणीदेवी हिने हे देऊळ बांधले. याच रस्त्यावर पुढे कलाचंद मंदिर आहे. इ.स १६५६ मध्ये मल्ल राजा रघुनाथसिंह याने हे मंदिर बांधले परंतु आता याचे काही भग्न अवशेषच उरले आहेत.
ही सर्व मंदिरे पहाताना पायी चालण्याइतके अंतर आहे. तरीही वेळ वाचवण्यासाठी गावात उतरल्यावर एक सायकल रिक्षा सर्व मंदिरांच्या फेरफटक्यासाठी ठरवून घेतली की काम सोप्पे होते. मंदिर पाहण्याची सुरुवात रसमंचपासून करावी लागते कारण तिथेच सर्व मंदिरांसाठीचे प्रवेश तिकीट फी घेऊन दिले जाते. इतर पाहण्यासारखे म्हणजे गावातल्या वेस्ट बंगाल टुरिस्ट लॉजच्या बाजूचे विष्णुपूर संग्रहालय अर्थात आचार्य योगेशचंद्र पुराकीर्ती भवन आणि बालुचारी साड्या बनवणाऱ्या विणकरांची घरे. आपल्या गन्जीफा पत्त्यांच्या खेळाप्रमाणे इथे मल्ल राजे पूर्वी दशवतार हा पत्त्यांचा खेळ खेळायचे तसे पत्ते देखील दुकानात विकत मिळतात. विष्णुपूरमध्ये खरेदी करण्यासारखे फार काही नाही. भारतीय हस्तकलेचे प्रतिक म्हणून जिथेतिथे दिसणारे इथले टेराकोटाचे बांकुरा घोडे जगविख्यात आहेत. खास शंखापासून बनवलेल्या दागिने,शोभेच्या वस्तू आणि नक्षीचे कोरीवकाम केलेले शंखही इथे मिळतात. (बंगाली संस्कृतीत शंखाला खूप महत्वाचे स्थान आहे.) टेराकोटाच्या वस्तूंची तुरळक दुकाने इथे दिसतात. टेराकोटापासून बनलेली खेळणी, भांडी,दागिने,घोडे,हत्ती,कासवे असे काही प्राणी आणि इतर काही शोभेच्या वस्तू विकण्याचा जोडधंदा इथे चालतो. जोडधंदा म्हटले अशासाठी कि विष्णुपूरजवळच असणाऱ्या पंचमुरा या गावात ‘कुंभकार’ जातीच्या टेराकोटा कारागीरांची काही कुटुंबे राहतात. बंगालच्या इतरही काही जिल्ह्यांमधील गावात टेराकोटा कारागीर राहतात. टेराकोटा कला जगवण्याचा ही कुटुंबे प्रयत्न करत आहेत पण यातील उत्पन्न फारच कमी असल्याने पुढची पिढी उदरनिर्वाहाच्या इतर मार्गांकडे वळतेय आणि पर्यायाने टेराकोटा उद्योग देखील अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे. इथल्या वस्त्रोद्योगालाही शतकांची परंपरा आहे. इथल्या बालुचारी साडीने विष्णूपुरचे नाव जगाच्या नकाशावर नेले. या साडीवर देखील टेराकोटा देवळांची नाजूक नक्षी पाहायला मिळते. अर्थातच अस्सल रेशीम असल्याने त्या खूप महागदेखील आहेत. ज्यांना संगीतकलेत रस आहे त्यांच्यासाठी विष्णुपूर अनोळखी नाही. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतात विष्णुपूर घराणे तर प्रसिद्धच आहे. डिसेंबरमध्ये इथे विष्णुपूर मेळा आणि संगीत महोत्सव साजरा होतो.

मल्ल राजांच्या काळात हे टेराकोटा मंदिरांचे स्तोम बंगालमध्ये अधिकच वाढले पण आपल्याकडे अजूनही चांगल्या स्थितीत असलेली टेराकोटातून बांधलेली अनेक सुंदर देऊळे उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश,झारखंडमध्ये देखील आहेत. सर्वात प्राचीन असे सहाव्या शतकातील टेराकोटा मंदिर उत्तरप्रदेशातील कानपूर जवळ असलेल्या भीतरगाव येथे आहे. एकट्या बंगालमध्येच पाहायला गेले तर बांकुरा आणि आजूबाजूच्या परिसरात तसेच दिनाजपूर, मुर्शिदाबाद, मालदा, वीरभूम, वर्धमान, हुगळी,पुरुलिया जिल्ह्यांमध्ये पुष्कळ टेराकोटा देऊळे पाहायला मिळतात. ती मंदिरे तर विष्णुपूरपेक्षा अधिक जुनी आहेत. परंतु वाईट स्थिती म्हणजे एवढे महत्वाचे ऐतिहासिक वैभव बाळगणाऱ्या दक्षिण बंगालमधील बांकुरा, वर्धमान, दुर्गापूर, विष्णुपूर अशा ठिकाणांना अजूनही शहरीकरणाच्या वाऱ्यांचा कोणताही फायदा झालेला दिसत नाही. महाराष्ट्रातील तालुका आणि जिल्हा पातळीवरील शहरांच्या तुलनेत तर ही शहरे जुनाट वाटतात, अर्थात त्याची राजकीय आणि सामाजिक कारणेही आहेत. गेली अनेक वर्षे विष्णुपूर मंदिराच्या ऐतिहासिक ठेव्याला युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळावा म्हणून भारत सरकार आणि पश्चिम बंगाल राज्य सरकार प्रयत्नात आहे. अमेरिकन वकिलातीच्या सांस्कृतिक संवर्धन निधीतून देखील या मंदिरांच्या देखभालीसाठी अनुदान देण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात विष्णुपूरला आजही अगदी जिल्हास्तरीय सुंदर गाव म्हणण्याचेही धाडस होत नाही. विष्णुपूर जेव्हा सर्व सोयीसुविधांनी युक्त बनेल तेव्हा निश्चितच या टेराकोटा देवळांच्या शहराला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळेल अशी आशा आहे. एकूणच विष्णुपूर आज शतकांचा इतिहास कवेत घेऊन बसलेय. सर्वात जास्त सुरस माहिती-कथा कोणत्या काळात दडलेल्या असतात तर त्या नेहमीच भूतकाळात असतात, म्हणूनच इतिहासकालीन वास्तूसंशोधन किंवा अश्या वास्तू पर्यटक म्हणून जाऊन पाहणे हे खरे तर अत्यंत मनोरंजक आहे. खूपजणांच्या मते हा एक नीरस आणि कंटाळवाणा उद्योग आहे, पण अश्याच विचारांमुळे जेव्हा आपण एखाद्या पुरातन वास्तूसमोर उभे राहतो तेव्हा प्रत्यक्ष इतिहास आपल्यासमोर बोलका होतोय हि गोष्ट अनुभवणे आपण विसरून जातो. आपल्या देशात मंदिरे आणि किल्ले यांनी असाच लाखो पानांचा इतिहास आपल्यासाठी लिहून ठेवलाय पण आपण काय करतो, तर तिथे जाऊन त्या उत्तुंग वास्तूंच्या अंगावर काहीतरी बकाल आणि निरर्थक खरडवून ठेवतो. सगळ्याच इतिहासकालीन वस्तूंना पुरातत्व खात्याचे किंवा इतर प्रकारचे संरक्षण लाभू शकत नाही त्यामुळे होताहोईस्तो विष्णुपूरसारख्या या वास्तू इतिहास जपत आणि सांगत उभ्या राहतील. विष्णुपूरच्या मंदिरांना भविष्यात युनेस्कोकडून जागतिक दर्जाचे स्थळ असल्याचा मान कदाचित जाहीर होईल देखील पण आपापल्या गावात किंवा शहरात देखील अशा काही इतिहासकालीन वास्तू, वस्तू अथवा शिलालेख असल्यास त्यांची काळजी प्रथम तिथल्या नागरिकांनीच घेतली तर उत्तम कारण शेवटी अश्या प्रकारच्या इतिहास पर्यटनातून मिळणाऱ्या पैशांच्या उपयोगाने गावाचा देखील विकास होत असतो. त्यामुळे भारताच्या सांस्कृतिक पर्यटनात मोठा वाटा ऐतिहासिक पर्यटनाचा आहे हे विसरून चालणार नाही. 
विष्णुपूरला कसे जाल :- कोलकातापासून विष्णुपूर सुमारे २०० ते २५० कि.मी अंतरावर आहे. हावड्याहून विष्णुपूरला जाण्यासाठी आरण्यक एक्स्प्रेस,रूपाशी बांगला एक्स्प्रेस आणि पुरुलिया एक्स्प्रेस रेल्वेगाड्या आहेत. वेस्ट बंगाल टुरिस्ट लॉजखेरीज राहण्यासाठी आणि जेवण्यासाठी बरेच पर्याय विष्णुपूरमध्ये उपलब्ध आहेत. ते फारसे चांगले नसले तरी अगदीच गैरसोयीत टाकणारे देखील नाहीत. विष्णुपूरला बसने देखील जाता येते. दुर्गापूर एक्स्प्रेसवेचा शेवटचा रस्ता सोनामुखी गावातून अत्यंत सुंदर हिरव्यागार जंगलातून जातो. दुतर्फा असलेली वनश्री मन अत्यंत प्रफुल्लित करते, अर्थात बसने जाण्याचा अनुभव खराब रस्त्यांमुळे काही सुखकर होत नाही, त्यामुळे एव्हढाच काय तो काही मिनिटांचा पट्टा मन रमवून प्रवासाचा शीण दूर करतो. विष्णुपूरमध्ये WBTDC च्या लॉजमध्ये राहण्याची आणि जेवण्याची चांगली व्यवस्था आहे आणि मंदिरे पाहण्यासाठी  त्यांचा मार्गदर्शकही मिळतो. 
Note- This blog article was earlier published in Marathi news daily 'Prahaar' , please read it through this link http://prahaar.in/collag/127153 and also give your suggestions. Thanks.

Tuesday, April 16, 2013

१५० दिवसांची सागरी साहसगाथा-Sagar Parikrama-2


                                                        
३१ मार्च २०१३ रोजी भारतीय नौदलाच्या म्हणजेच पर्यायाने भारताच्या खात्यात एक अभिमानास्पद जागतिक विक्रम जमा झाला. या विश्वविक्रमासाठी कोणतीही स्पर्धा घेतली गेली नव्हती किंवा इतर खेळांप्रमाणे कोणत्याही लांच्छनास्पद प्रकारे आता भारताकडून हा विक्रम हिसकावून घेतला जाईल अशी शक्यता देखील नाही, या उलट हा विक्रम करणाऱ्या तरुणाने धाडसाचा कहर केलाय आणि अवघ्या पाच  महिन्यात विनाथांबा कोणाच्याही मदतीशिवाय तेही एकट्याने म्हादेई या छोट्या शिडाच्या नौके(यॉट)मधून २१,६०० समुद्री मैलांची म्हणजेच ४१,४०० किलोमीटरची सागर परिक्रमा पूर्ण करून जगाला त्याची दखल घेणं भाग पाडले आहे. लेफ्टनंट कमांडर अभिलाष टॉमी यांच्या विजयी सागरस्वारीने भारतीय नौदलाच्या इतिहासात नवे मापदंड रोवले गेले आहेत. विश्वविक्रमांच्या नोंदी जरी कागदावर होत असल्या तरी त्यांना जन्माला घालण्यासाठी कोणत्याही संकटाना तडीपार भिरकावण्याची जिगर लागते आणि तरच ‘सागर परिक्रमा’ सारखे विक्रम जगाच्या नकाशावर घडतात. असं म्हणतात कि मिळालेल्या संधीचं सोनं करावं, संधी दुसऱ्यांदा चालून येत नाही वगैरे पण म्हादेई आणि अभिलाष यांच्या बाबतीत गोष्ट वेगळी होती, संधी दुसऱ्यांदा त्यांच्याकडे आली होती. यापूर्वी अभिलाष यांनी केप टाऊन ते गोवा प्रवासात म्हादेईची धुरा एकट्याने सांभाळली होती. बोटीतून एकट्याने जगप्रवास करण्याच्या ‘धाडसी’ अभिलाषेला तेव्हाच खतपाणी मिळाले होते पण कोणत्याही साहसाची ठराविक अशी रेसिपी कोणत्याही पुस्तकात लिहिलेली नसते कि ती वाचल्यावर एक छानसे सुंदर साहस साकारता येतं. अशा साहसगाथा नेहमी नेहमी लिहिल्या जात नाहीत आणि त्या प्रत्यक्षात उतरवताना कुठेही एकदा झालेली चूक निस्तरण्यासाठी आपण पुन्हा जिवंत राहूच याची खात्री देता येत नाही. एका क्षणी आपल्यापेक्षा कोणीही श्रेष्ठ या पृथ्वीतलावर नाही अश्याच आत्मविश्वासाने आलेल्या आव्हानाला तोंड द्यावे लागते. याच वृत्तीने धाडस, साहस, कर्तबगारी, थरार इत्यादी पुस्तकी शब्दानाही फिकी पाडेल अशी हिंमत दाखवून भारतीय नौदलाचे लेफ्टनंट कमांडर अभिलाष टॉमी यांनी थेट समुद्रालाच आव्हान देत त्याच्यावर सत्ता काबीज करून १५० दिवसात सागर परीक्रमेचा विक्रम खिशात घातला. त्यांच्या या थरारक प्रवासाची खबर देश-विदेशात घेतली गेली कारण अश्या प्रकारे १५० दिवसात कोणत्याही बंदरावर न थांबता आणि अगदी संकटसमयी देखील कोणाचीही मदत न घेता पृथ्वीच्या परीघरेषेवरून जलप्रदक्षिणा करणारे अभिलाष जगातले ७९ वे आणि आशिया खंडातले दुसरे दर्यावर्दी ठरले आहेत. पण या सागर परीक्रमेमधला कोणताही टप्पा आता मी लिहित असलेल्या कोणत्याही शब्दाइतका सोपा निश्चितच नव्हता तर अक्षरशः सत्व पणाला लावून अभिलाष यांनी सागर परिक्रमा-२ पूर्ण केली आहे. ३३ वर्षीय अभिलाष हे देखील आजच्या युवा पिढीचेच प्रतिनिधी आहेत आणि दूरचित्र वाहिन्यांवर चालणारे थिल्लर रियालिटी शोज पाहून वायफळ रोमांच अंगावर उमटवून घेणाऱ्या आजच्या पिढीने नक्क्कीच त्यांचा हा जलप्रवास अभ्यासावा असा आहे. ‘लाईफ ऑफ पाय’ या चित्रपटाच्या कथेपेक्षाही चित्तथरारक या सागर प्रवासाची कथा आहे.  थोडक्यात ओळख करून घेऊ यात या ‘सागरी’ साहसगाथेची..
म्हादेई बोटीचे सुकाणू वैमानिकाच्या हाती
भारतीय नौदलाची एक परंपरा आहे, बोट दुसऱ्या कप्तानाच्या ताब्यात देताना ‘ऑल युअर्स’ असं म्हटलं जातं. गेल्या वर्षी अभिलाषच्या हातात बोटीचे सुकाणू सोपवताना अभिलाष यांचे गुरु कमांडर दिलीप दोंदे यांनीदेखील त्यांना हेच सांगितले होतं. पण बहुदा कमांडर दोंदे यांनी म्हादेईला देखील अभिलाषच्या बाबतीत ‘‘ऑल युअर्स’ असंच म्हटलं असावं कारण तेव्हापासून म्हादेईने आणि अभिलाषने एकमेकांची साथ संकटातही सोडलेली नाही. लेफ्टनंट कमांडर अभिलाष टॉमी हे नौदलाच्या वायुसेनेत वैमानिक आहेत मात्र त्यांचे सेलिंगचे ज्ञान आणि प्रेम पाहून एसपी-२ म्हणजे सागर परिक्रमा-२ साठी त्यांची निवड झाली. १ नोव्हेंबर २०१२ पासून सुरु झालेल्या सागर परिक्रमेच्या दुसऱ्या मोहिमेत मानसिक आणि शारीरिक बळाची कसोटी पाहणारे अनेक अवघड जीवावर बेतणारे प्रसंग आले मात्र म्हादेई आणि अभिलाष सर्व संकटांमधून तावून सुलाखून बाहेर पडले. याआधी नौदलाचे कमांडर दिलीप दोंदे यांनी केवळ चार बंदरांवर थांबे घेऊन आणि दोन मदतनिसांसह ( ज्यात अभिलाष यांनी म्हादेई नौकेची दुरुस्तीसाठी मदत केली होती ) २०१० साली जलप्रदक्षिणा पूर्ण केली होती. त्या अनुभवामुळेच सागर परिक्रमेच्या दुसऱ्या विनाथांबा मोहिमेसाठी अभिलाष यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं होतं. तब्बल पाच महिन्यांनी म्हादेई  नौकेच्या शिडाने वाऱ्याशी झुंज थांबवली आणि तिच्या कप्तानाच्या हातांनी देखील विश्रांती घेतली तेव्हा सागरानेही या दोघांच्या अथक जिद्दीला मनोमन सलाम ठोकला. भारतीय नौदलात प्रवेश केल्यापासून अभिलाष यांनी गेली १४ वर्षं जे सागर परिक्रमेचं स्वप्न पाहिलं होतं त्या स्वप्नाला अखेर सत्याची झळाळी मिळाली. विनाथांबा एकट्याने जगप्रदक्षिणा घालणारे जगातले पहिले नाविक ब्रिटनचे सर रॉबिन नॉक्स-जॉनस्टन यांनी अभिलाषचा विक्रम पूर्ण होण्याआधीच त्याचं अभिनंदन केले होते. साहसाला सीमा नसाव्यात म्हणूनच तर ते साहस ठरते असं अभिलाष यांचे मत आहे. सागर परिक्रमेच्या साहसात असणाऱ्या थरारापेक्षाही अनिश्चिततेचे आकर्षण वाटले म्हणूनच त्यांनी हे शिवधनुष्य उचलले. पाच महिने एकट्याने हा संपूर्ण जलप्रवास करण्याचेही आकर्षण देखील  आव्हान स्वीकारण्यामागे होते. झपाटलेपणाला कोणत्याही मर्यादा नसतात. एकदा का साहसाला सुरुवात केली कि हे झपाटलेपण अंगावर सतत बाळगूनच राहावं लागतं. त्यातच जर समोर खिजवणारा समुद्र प्रतिपक्षात असेल तर निश्चितच साहसाला सीमा उरत नाहीत. नेमके हेच त्यांच्या बाबतीत घडले.
यशाची सहनायिका ‘म्हादेई’
या पूर्ण सागर परिक्रमेत दोनच गोष्टीवर ओरखडे पडले नाहीत त्या म्हणजे म्हादेई बोट आणि अभिलाष यांचे मनोबल. किंबहुना समुद्रावरचे अत्यंत खराब हवामान आणि वादळ-वारे झेलूनही म्हादेई सुखरूप राहिली आणि म्हणूनच अभिलाष यांची जिद्ददेखील प्रखर राहिली. यामुळेच अभिलाष यांचे गुरु कमांडर दिलीप दोंदे या परीक्रमेचे पूर्ण श्रेय अभिलाष इतकेच म्हादेईला देखील देतात. म्हादेईची मजबूत बांधणी गोव्यातल्या दिवार आयलंडवर असलेल्या अक्वेरीस फायबरग्लास या कारखान्यात श्री. रत्नाकर दांडेकर यांच्या खास देखरेखीखाली झाली होती. वास्तविक सागर परीक्रमेसाठी खास धाटणीची बोट बांधण्यासाठी अनेक बड्या कंपन्यांना विचारण्यात आलं होते परंतु अगदी गोवा शिपयार्डसकट मोठमोठ्या कंपन्यांनी एक छोटीशी यॉट बांधण्यात आर्थिक फायदा नसल्याचं पाहिल्यावर भारतीय नौदलाची हि यॉट बांधणं नाकारलं होतं. पण रत्नाकर दांडेकर आणि त्यांच्या अक्वेरीस फायबरग्लासच्या टीमने हे आव्हान स्वीकारलं आणि चार वर्षांपूर्वी म्हादेई अस्तित्वात आली. आयएनएसव्ही म्हादेई ही एक ५६ फूटी यॉट प्रकारातली नौका आहे. बोटीचे रचनाचित्र नेदरलँड्सच्या व्हान दे स्टट डिझाईन ब्युरो या कंपनीकडून मागवण्यात आले होते. बोट बांधण्यासाठी सुमारे एक वर्ष दोन महिन्यांचा कालावधी लागला होता. दांडेकर यांचे व्यावसायिक कौशल्य आणि त्यांनी जीव लावून केलेल्या मेहनतीमुळेच म्हादेई अप्रतिमरित्या साकार झाल्याचं कमांडर दिलीप दोंदे सांगतात. म्हादेईचे इतके कौतुक होत असताना रत्नाकर दांडेकर यांनी मात्र म्हादेई बांधताना मी स्वतः बोटीच्या कप्तानाच्या जागी असल्याची कल्पना केली आणि त्यामुळेच म्हादेईची बांधणी इतकी मजबूत घडल्याचे सांगितले. कमांडर दिलीप दोंदे आणि लेफ्टनंट कमांडर अभिलाष यांची प्रत्येकी एकच वेळा जगप्रदक्षिणा झाली असली तरी म्हादेईने फक्त चार वर्षांच्या आयुष्यात दोनवेळा जगाचा फेरा केला आहे. त्यादृष्टीने म्हादेई या दोघांनाही सिनिअर ठरली आहे. म्हादेई एव्हढी कणखर नसती तर कदाचित आमच्यापैकी एकाच्या फोटोला नक्कीच हार लागला असता असं विनोदाने दोंदे सर सांगतात. म्हादेई मजबूत होती म्हणूनच आमच्या दोघांच्याही जगप्रदक्षिणा यशस्वी झाल्या असं त्यांना वाटतं. अख्ख्या सागर परिक्रमेवर आतापर्यंत सुमारे चार लाख रुपये खर्च झाले आहेत मात्र परिक्रमेची खरी नायिका म्हादेई हिच्या बांधणीवर सव्वा चार कोटी रुपये खर्च झाले आहेत. विशेष म्हणजे जगात सर्वप्रथम विनाथांबा एकट्याने शिडाच्या नौकेतून विश्वजलप्रदक्षिणा घालणारे सर रॉबिन नॉक्स यांची ‘सुहैली’ हि बोट देखील मुंबईतच बांधण्यात आली होती आणि भारतीय हातांनीच बनवलेल्या म्हादेईतुन दोन जलप्रदक्षिणा पूर्ण झाल्याचा दोंदे यांना अभिमान वाटतो. आतादेखील तब्बल पाच महिन्यांच्या खडतर जलसफरीनंतर ती  पूर्वीइतकीच नवी दिसत असल्याचं दोंदे म्हणतात. चार वर्षांनी खरं तर इतर बोटी बऱ्याच जुन्या दिसायला लागतात पण म्हादेईकडे पाहून तिने चार वर्षात दोन सागर परिक्रमा पूर्ण केल्या असतील यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. अजूनही म्हादेई सेलिंग स्पर्धेत उतरू शकते असा विश्वास त्यांना वाटतो. म्हादेई आणि अभिलाष यांच्याशी कमांडर दोंदे यांचे एक वेगळेच तरल नाते आहे. म्हादेई दांडेकरांच्या कारखान्यात बांधायला घेतली तेव्हापासून ते सागर परिक्रमेची दुसरी फेरी पूर्ण होईपर्यंत कमांडर दोंदे सर्व हालचालींवर बारीक लक्ष ठेवून होते. सागर परिक्रमेच्या मोहिमेची अथपासून इतिपर्यंत तयारी करण्याची जबाबदारीही कमांडर दोंदे यांनी निभावली होती. अर्थातच त्यांनी स्वतः १९ ऑगस्ट २००९ ते १९ मे २०१० या काळात सागर परिक्रमेची पहिली फेरी जिंकली होती त्यामुळे त्यांच्या अनुभवाची मोठीच शिदोरी अभिलाष यांच्या पाठीशी होती. याच पहिल्या मोहिमेतला म्हादेईलाच घेऊन केप टाऊन ते गोवा आणि रिओ दि जानेरो ते केप टाऊन हे अंतर कापण्याचा अनुभव अभिलाष यांच्या हाताशी होता.
 म्हादेईच्या नावामागील कथा
कर्नाटकातील म्हादेई नदी गोव्यात येताना मांडोवी नाव घेते आणि मांडोवीच्या परिसरात सत्तरी तालुक्यात सुमारे हजार वर्षांपूर्वीचे नौदेवीचे मंदिर पाहायला मिळते. जहाजांची हि संरक्षक देवता असल्याचे मानले जाते. त्यामुळे नौदेवी आणि मांडोवी नदीच्या नावावरून भक्तिभावाने बोटीचे नावदेखील म्हादेई ठेवण्यात आले.

सागर परीक्रमेसाठी सुसज्ज म्हादेई...
पूर्णतः भारतीय बनावटीच्या म्हादेईचे शीड केप टाऊन येथील नॉर्थ सेल कंपनीकडून बनवून घेण्यात आले होते. डिझेलवर चालणाऱ्या जनरेटरखेरीज पवनउर्जेवर चालणारा जनरेटरदेखील मदतीला होता. गरज लागल्यास सौरउर्जा यंत्रणाही बसवण्यात आली होती. बोटीच्या तळाशी साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी पंपाची सोय बोटीवर आहे. तसेच कडाक्याच्या उन्हापासून वाचण्यासाठी छोटी सनशेड बोटीवर एका बाजूला टाकण्यात आली होती. संपर्कासाठी एफबी-५०० हि अत्यंत महागडी यंत्रणा बसवण्यात आली होती.
म्हादेईच्या कप्तानाविषयी थोडेसे..
मूळचे केरळचे असणारे लेफ्टनंट कमांडर अभिलाष टॉमी हे भारतीय नौसेनेच्या वायुदलात २००१ साली वैमानिक म्हणून दाखल झाले. त्यांचे वडील निवृत्त लेफ्टनंट कमांडर व्हि.सी. टॉमी यांच्यामुळेच लहान वयातच अभिलाष यांची समुद्राशी ओळख झाली. अभिलाष वयाच्या सातव्या वर्षापासून पोहायला शिकले आणि कित्येकवेळा ते कुटुंबियांची नजर चुकवून समुद्रावर पोहायला जायचे. काहीसे अबोल, शांत आणि निगर्वी असले तरीही अभिलाष निडर आहेत त्यामुळेच हि परिक्रमा त्यांनी निभावून नेली. डॉर्निअर विमान चालवण्यात ते अत्यंत कुशल आहेत. मात्र नौकानयनात त्यांना फार पूर्वीपासूनच रस होता आणि त्यांनी नौदलात आल्यानंतर २००४ सालापासून यॉट सेलिंगला व्यावसायिकरित्या सुरुवात केली. खरे तर त्यांनी विमान चालवणे शिकण्याच्याही आधी यॉट सेलिंगचे धडे घेतले आणि कार ड्रायव्हिंग तर त्यांनी या दोन्हीनंतर आत्मसात केले. अभिलाष यांना वाचनाची खूप आवड आहे आणि त्याचबरोबर त्यांच्याकडे रोजच्या कंटाळवाण्या वाटणाऱ्या जगण्यातला नर्मविनोद हेरण्याचेही कसब आहे. त्यांना सेलिंगखेरीज फोटोग्राफी आणि गिटार वाजवण्याची देखील आवड आहे. आहाराने सध्या शाकाहारी असलेल्या अभिलाषची वेळप्रसंगी मांसाहाराला ना नसते.

सागर परिक्रमा-२ मधील परीक्षा घेणारे क्षण....
अभिलाष यांच्या मते वादळानंतर हेलकावणाऱ्या साउथ पैसिफिकच्या समुद्रात भर पावसात २५ मीटर उंच डोलकाठीवर चढून शीड बदलणे हा खरेतर आततायीपणाच होता. मात्र शीड अश्या प्रकारे फाटलेल्या अवस्थेत असताना बोट पुढे नेणे म्हणजे महामूर्खपणा झाला असता. परिस्थिती अशी होती कि डोलकाठीवर चढले किंवा नाही चढले तरीदेखील या ना त्या प्रकारे जीवावर बेतणारच होते. त्यामुळे वाघ म्हटले तरी खाणार आणि वाघोबा म्हटले तरी खाणार असा विचार करून अभिलाष निर्धार करून त्या उंच डोलकाठीवर चढले. हा सर्व नाट्यमय ’पराक्रम’ पार पाडण्यासाठी त्यांना सुमारे एक-दीड तास लागला होता. परंतु डोलकाठीच्या टोकावर पोहोचल्यानंतर एक प्रकारच्या अनोख्या चैतन्याचा आपल्यात वावर होतो आहे असेच क्षणभर अभिलाष यांना वाटले. तिथून समुद्रावर दूरपर्यंत नजर जात होती आणि तो नजारा त्यांच्यासाठी आजही अविस्मरणीय आहे. खाली उतरून या चढाई प्रसंगाचा व्हिडीओ पाहिल्यावर मात्र अभिलाष यांना आपण किती अशक्य कोटीतले साहस केले आहे याची जाणीव झाली आणि त्यांच्या अंगावर त्या आठवणीने आजही शहारे उमटतात. ऑस्ट्रेलियाजवळून जाताना म्हादेई मोठ्या वादळात सापडली त्यावेळी ते खरेच खूप धास्तावून गेले होते. महाभयंकर वादळात बोट चालवताना त्यांच्या जीवाचं पाणी पाणी झालं होतं परंतु त्यानंतर इतकी भयानक संकट झेलली कि त्या तुफानी वादळाचं आता त्यांना काहीच वाटत नाही. या दोन संकटांनीच त्यांची खरी सत्वपरीक्षा पाहिल्याचे अभिलाष सांगतात.
बोटीवरील अडचणींचा सामना...

तुफानी वादळे, ४०-५०-६० समुद्री मैलाच्या वेगाने वाहणारे झंजावाती वारे, समुद्रावरील अफाट काळामिच्च अंधार, समुद्री चाच्यांची भीती, दहा मजली इमारतीइतक्या उंचीच्या लाटा, भयानक उष्ण आणि थंड तापमानाचे प्रदेश अश्या बोटीच्या बाहेरील सर्व नैसर्गिक संकटांपुढे त्यांना बोटीच्या आतमध्ये उद्भवणाऱ्या अडचणी कमी त्रासदायक वाटायच्या. अर्थात याला अपवाद फक्त शीड फाटण्याचा प्रसंग होता. बोटीच्या इंजिनरूम मधली तेलगळती, जनरेटरमधील सतत बिघडणारे ऑईल प्रेशर, इंजिनाच्या कुलर यंत्रणेचा पंप आणि लीड सेन्सरमधील बिघाड, खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यात रुपांतर करणाऱ्या यंत्राने केलेली हाराकिरी, फाटलेली स्लीपिंग ब्याग अश्या कितीतरी अडचणी येत होत्या. एकदा तर बोटीवरील सर्व घड्याळ्यांनी संप पुकारला आणि विविध वेळा दाखवायला सुरुवात केली तेव्हा अभिलाष यांची तारांबळ उडाली होती. मात्र सर्वात कठीण होते ते पाण्याचे दुर्भिक्ष्य ! २० मार्चला म्हादेईने विषुववृत्त ओलांडले पण त्याआधी १७ मार्चला बोटीवरील सुमारे २०० लिटरहून अधिक पाणी दूषित झाले आणि त्यामुळे पाण्याचा शेवटचा घोट संपण्याआधी म्हादेई मुंबईच्या किनाऱ्यावर परत नेण्याचे आव्हान अभिलाष यांच्यासमोर उभे राहिले. 

सफरीतील काही आनंदाचे मैल...
या मोहिमेवर असताना पाच महिने अभिलाष यांना बाहेरच्या जगात चालणारी सर्व हौस-मौज स्वप्नवतच होती. आधार होता तो फक्त त्यांच्या आवडत्या पॉपकॉर्नचा. बोटीवरील कोणतीही अडचण निस्तरली कि अभिलाष लगेचच पॉपकॉर्नच्या पिशवीकडे धाव घ्यायचे. अशी पॉपकॉर्न खाण्याची संधी त्यांना अनेकदा मिळत होती. त्यापैकीच एक होता २६ जानेवारीचा दिवस जेव्हा अभिलाष यांनी केप हॉर्नला वळसा घालून बोटीवर भारताचा तिरंगा फडकवला. केप हॉर्नला यशस्वीरीत्या घातलेला वळसा हा या मोहिमेतील एक महत्वाचा टप्पा होता. वर्षअखेरीस आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळेनुसार २०१३ साली म्हादेईने आंतरराष्ट्रीय प्रमाणरेषा पहिल्यांदा पार केली पण सहा तासातच दुसऱ्यांदा देखील प्रमाणरेषा पार केली त्यामुळे भारतीय प्रमाणवेळेनुसार अभिलाष हे नववर्षाचे स्वागत करणारे आणि त्याचबरोबर मावळत्या वर्षाला निरोप देणारे पहिले भारतीय ठरले. काही समुद्रपक्षी आणि डॉल्फिन्स यांच्या अनोख्या सहवासात अभिलाष यांनी त्यांचा वाढदिवस देखील ५ फेब्रुवारीला बोटीवर साजरा केला. अश्या कित्येक मनोरंजक आणि अभ्यासपूर्ण अनुभवांची नोंद अभिलाष यांच्या ब्लॉगवर  http://sagarparikrama2.blogspot.in/ वाचायला मिळते. सागर परिक्रमेवर लक्ष ठेवून असणाऱ्या चाहत्यांसाठी हा ब्लॉग ते या खडतर प्रवासातही वेळ मिळेल तेव्हा अपडेट करीत होते. तसेच फेसबुक आणि ट्विटरवरून देखील ते सर्वांशी संवाद साधत होते.
अभिलाष यांचे मनोबल टिकवणारा योग...
भल्याभल्या दर्यावर्दींचाही आत्मविश्वास उलथवून टाकणाऱ्या बेभान समुद्रात अभिलाष यांनी विचलित न होता नेहमीच थंड डोक्याने तारतम्य ठेवून अचूक निर्णय घेतले. कितीही प्रतिकूल हवामानात आणि समस्यांमध्येही त्यांच्या मनशक्तीला खिंडार पडले नाही याचे सर्व श्रेय त्यांनी योगाभ्यास आणि ध्यानधारणेला दिले आहे. बोटीवर असताना कमीतकमी अर्धा तास योगाभ्यास आणि ध्यानधारणा करण्याचा रिवाज त्यांनी सुरु ठेवला होता. त्यामुळेच त्यांना या महाकठीण मोहिमेचे दडपण जाणवलं नाही उलट अडचणी आणि आव्हानांकडे नेहमीपेक्षा वेगळ्या दृष्टीकोनातून पाहता आलं. ‘प्रहार’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले कि योगाभ्यास विरक्तीची भावना जोपासायला मदत करतो त्याचाही मला पाच महिने सर्वांपासून दूर राहताना फायदाच झाला. एकटेपणाच्या भावनेचं ओझंदेखील योगाच्या मदतीनेच कमी झालं. योगाभ्यासामुळेच मी अनेकदा विविध भास होत असताना देखील सतर्क राहिलो, अचूक निर्णय घेऊ शकलो आणि माझ्यावर बाह्यपरिस्थितीचा फारसा परिणाम मी फारसा होऊ देत नव्हतो त्यातही मला योगाभ्यासच हाताशी आला. आता म्हादेईपासून विलग राहावे लागणार आहे पण माझ्या या भावनिक गुंतवणुकीतून बाहेर पडायला मला योगाभ्यासाचीच मदत होईल असा विश्वास त्यांना वाटत आहे. कोइमतूरमधील इशा फाउंडेशन योगा सेंटरमधून त्याने योग आणि ध्यानधारणेचा अभ्यास केला आहे.

एकांतप्रिय दर्यावर्दी
अभिलाष यांच्याच शब्दात सांगायचं तर जमिनीवरल्या जगात असतो तेव्हा आपण विनाकारण बारीकसारीक गोष्टी मनाला लावून घेत असतो. आता सागर परिक्रमा पूर्ण केल्यानंतर तर मला जगातील थोडक्यात जमिनीवरील ९९ टक्के गोष्टी फिजूल वाटायला लागल्या आहेत. एकांतात राहिल्यामुळेच या गोष्टींची जाणीव झाली. त्यामुळेच कदाचित सागर परिक्रमा पूर्ण करून मी फार मोठा विक्रम केलाय असं वाटत नाही. पण निश्चितच भारतीय नौदलाच्या इतिहासासाठी हि एक अभिमानास्पद गोष्ट आहे असे सांगत अतिशय विनम्रपणे भारतीय नौसेनेचे अत्यंत कुशल वैमानिक लेफ्टनंट कमांडर अभिलाष त्यांनी केलेल्या विक्रमाची तारीफ करून घेणं टाळत होते. हा पूर्ण जलप्रवास एकट्याने तेही कोणाच्याही मदतीशिवाय करायचा असल्यामुळे प्रथम त्यांना घरातून आईचा खूप विरोध झाला. पण शेवटी लाडक्या मुलाने आईला या सफारीसाठी मनवलेच. परंतु पहिल्यापासूनच थोडं अबोल आणि मनस्वी असणाऱ्या अभिलाष यांना मुळात एकटे राहण्याचं आकर्षणच आहे. इतके दिवस एकटे राहताना तुमच्या मनात काय विचार येत होते असा प्रश्न त्यांना नेहमीच विचारला जायचा. ‘’मला पर्याय दिल्यास पुढील वेळी मी इंटरनेटशिवायच सागर परिक्रमा करेन कारण मला हा असा सर्व कोलाहलापासून दूर निवांत एकटेपणाच अधिक भावतो. खरंतर मी असंच राहणं जास्त पसंत करतो आणि मला एकटे असण्याचं नवल मुळात वाटतच नाही. अशावेळी तुम्हाला वेगळ्या ध्यानधारणेची गरज भासत नाही. त्यामुळे पाच महिने म्हादेईवर एकटे राहण्याची कल्पना उलट मला जास्तच आवडली होती.’’ भारतीय नौसेनेचे अत्यंत कुशल वैमानिक लेफ्टनंट कमांडर अभिलाष टॉमी यांनी ‘प्रहार’ला दिलेल्या मुलाखतीत एकटे राहण्यामागील त्यांचा विचार मांडला होता. म्हादेई बोटीवर संपर्कासाठी एफबी-५०० हि अत्यंत महागडी यंत्रणा बसवण्यात आली होती. काही कोटी रुपयांची ही संपर्क आणि दळणवळण व्यवस्था उपग्रहाद्वारे देण्यात आली होती. दर मिनिटाला अंदाजे २,५०० रुपये इतके तिचा वापर केल्यास खर्च होतात. या व्यवस्थेचा आवश्यक तेवढाच वापर करून अभिलाष या मोहिमेत सर्वांच्याच संपर्कात राहिले. शेवटच्या टप्प्यात असताना त्यांनी काही प्रसारमाध्यमांनाही मुलाखती दिल्या. लगेच तासनतास बकाल मुलाखतींचे अनावश्यक रतीब घालणाऱ्या टीव्हीवाहिन्या डोळ्यासमोर आणू नका जरी त्यांचं कामदेखील उपग्रहांद्वारेच चालतं कारण मोठमोठ्या उद्योगसमूहांचं आणि जाहिराती देऊन पुरस्कृत करणाऱ्या कंपन्यांचं ( आणि कोण जाणे कोणा कोणाचं !) त्यांना आर्थिक पाठबळ असतं. तेव्हा तिथे तुम्हाला दिसणाऱ्या प्रत्येक फ्रेममागे वाहिनीला लाखोवारी पैसे आधीच मिळालेले असतात. सागर परिक्रमा करताना मात्र अभिलाष आणि म्हादेई यांना अनेक बंधन पाळावी लागली त्यापैकी इंटरनेट आणि इतर संपर्क सुविधांचा कमीतकमी वापर हे बंधन अभिलाष यांनी स्वतःहूनच घालून घेतलं होतं. त्यांना एकटे राहण्याची सवय होत गेली आणि हे बंधन पाळणंदेखील सोपं होत गेलं. कित्येकवेळा बोटीवरील इतर कामांमुळे आणि बाहेरील दृश्य भान हरपवून टाकणारं असल्यावर बोटीवर संगणक आणि इंटरनेट असल्याचाही विसर पडायचा असं अभिलाष यांनी सांगितलं.
सागर परिक्रमा म्हणजे काय ?
लेफ्टनंट कमांडर अभिलाष टॉमी यांच्या आधी कमांडर दिलीप दोंदे यांनी २००९ ते २०१० या काळात १६५ दिवसात चार विश्रांतीथांबे घेत सागर परिक्रमा-१ पूर्ण केली होती. परंतु विनाथांबा आणि कोणाच्याही मदतीशिवाय सागर परिक्रमेचे साहस अंगावर घेण्यासाठी समुद्राला पुरून उरेल इतक्या धैर्याची गरज आहे. कारण या प्रकारच्या परिक्रमेत कोणत्याही परिस्थितीमध्ये बंदरावरून किंवा समुद्रावरील इतर बोटींची मदत घेता येत नाही. दुसरी अट म्हणजे केवळ शिडाच्या सहाय्याने बोट चालवत इंजिनाचा वापर न करता २१,६०० समुद्री मैलांचे अंतर कापणे अपेक्षित असते. परिक्रमेची सुरुवात जिथून होते तो किनारा सोडताना आणि परत त्या किनाऱ्याजवळ पोहोचल्यानंतरच इंजिनाची सुविधा वापरता येते. परिक्रमेच्या मार्गात तीन केप्सच्या उत्तरेने जात ( केप हॉर्न, केप ऑफ गुड होप आणि केप लिऊविन ) रेखावृत्त आणि विषुववृत्त (दोन वेळा) पार करावे लागतात. या मार्गात कोणत्याही कालव्यातून बोट काढता येत नाही.  
म्हादेईवरची मेजवानी
म्हादेईवर सुमारे ६०० लिटर गोड्या पाण्याचा आणि १५० किलो अन्नाचा साठा देण्यात आला होता. काही खाद्यपदार्थांची पाकिटे म्हैसूरच्या संरक्षण दलाच्या अन्न प्रयोगशाळेत बनवण्यात आली होती. दिवसाला अभिलाष यांनी निदान ५०० ग्राम अन्न खावे अशी त्यांना सूचना होती. अन्नामध्ये इन्स्टट खीर,भाज्या, व्हेज पुलाव, चिकन खिमा, पॉपकॉर्न, कॅडबरी चॉकलेट, ड्राय आईसक्रिम,गोड हलवा, भात, बटाटे,मक्याचे दाणे, बिस्किटं, खारवलेले पोहे, मासे आणि लिंबाच्या फोडी, लोणचे इत्यादींचा समावेश होता तर द्रवपदार्थात फळांचे रस, ताक, शीतपेये आदींचा समावेश होता. मात्र सततच्या परिश्रमाने अभिलाष यांचे पहिल्याच काही दिवसात १० किलो वजन कमी झाले होते.
परिक्रमेची सांगता..
म्हादेईने अपेक्षित वेळेतच म्हणजे १५० दिवसात ३१ मार्च २०१३ रोजीच परिक्रमा पूर्ण करून मुंबईच्या किनाऱ्याला स्पर्श केला. मात्र राष्ट्रपतींकडून कार्यक्रमासाठी पाच दिवसांनंतरची वेळ मिळाल्याने म्हादेई एक आठवडा आधीच मुंबईला पोहोचल्याची गोष्ट गुप्त ठेवण्यात आली. गेल्या सहा एप्रिल रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते लेफ्टनंट कमांडर अभिलाष टॉमी यांचा सत्कार करण्यात आला . या सागर परिक्रमेमध्ये डोलकाठी तुटण्यापासून ते अगदी पाण्याचा तुटवडा, अश्या अनेक संकटांनी अभिलाष यांचा निग्रह विचलित करण्याचा प्रयत्न केला. परंतु अभिलाष हे जीवावर बेतू शकणाऱ्या अनेक कसोटीच्या क्षणांना केवळ मनोबलाच्या जोरावरच तोंड देत होते. आपल्या परीक्रमेचं श्रेय मात्र या सुपरहिरोने म्हादेई आणि तिची देखभाल करणारे मोहम्मद इस्लाम आलम यांना दिलं आहे. म्हादेईला सागर परिक्रमेवर निघण्याआधीचे वर्षंभर मोहम्मद आलम यांनी म्हादेईला तळहाताच्या फोडासारखं जपून तिची निगराणी ठेवली. त्यामुळेच म्हादेई मजबूत राहून तिनं सागर परिक्रमा-२ निभावण्यात मोलाची साथ दिल्याचं अभिलाष सांगतात. सागर परीक्रमेचे तीन आधारस्तंभ नौदलाचे माजी ध्वजाधिकारी व्हाईस अ‍ॅडमिरल मनोहर आवटी, कमांडर दिलीप दोंदे आणि म्हादेईचे शिल्पकार रत्नाकर दांडेकर यांच्याशिवाय हि परिक्रमा तडीस गेलीच नसती असंदेखील अभिलाष यांनी सांगितलं. त्याचबरोबर अभिलाष यांनी ‘सागर परिक्रमा-२’ चे पूर्ण श्रेय नौदलातील एअरफोर्सच्या दलाला (ज्यांनी वैमानिकांची कमतरता असूनही सागर परीक्रमेसाठी अभिलाष यांना हुरूप दिला ), त्यांची आई श्रीमती वल्सा, व्हाईस अ‍ॅडमिरल मनोहर आवटी, कमांडर दिलीप दोंदे, बोटीचे कर्ताधर्ता रत्नाकर दांडेकर आणि म्हादेईच्या सागर परिक्रमेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक भारतीयाला समर्पित केले आहे.
शाळांमध्ये पोहोचली सागर परिक्रमा-२
इंटरनेटवर शोधल्यास फक्त सागर परीक्रमा-२ साठी सुमारे ७०,८०० रिझल्ट्स सापडतात. पण त्याहीपेक्षा अधिक कष्ट घेऊन मुंबईच्या स्वप्नाली धाबुगडे हिने सागर परिक्रमेला शाळाशाळांमध्ये पोहोचवण्याचे मोठे काम केले आहे. तिने आणि तिच्या सहकाऱ्यांनी मुंबई आणि जळगाव येथील हर एक शाळेत जाऊन इयत्ता ७वी ते ९वी मधील विद्यार्थ्यांना सागर परिक्रमेच्या मोहिमेची सखोल आणि सचित्र माहिती दिली. त्यांच्या या ‘सागर परिक्रमा जागरुकता अभियाना’मुळे आत्तापर्यंत सुमारे ३ हजारांहून अधिक मुलांना या धाडसी मोहिमेची ध्वनीचित्रफितीतून माहिती मिळाली आहे. या अभियानात मुलांना मोहिमेचा हेतू, म्हादेई बोटीची रचना, पृथ्वीवरील खंड, प्रवासाचे सागरी मार्ग, हवामान आणि समुद्राशी निगडीत इतर भौगोलिक माहिती देण्यात येते. सध्याच्या शाळांच्या सुट्ट्या संपल्यानंतर या अभियानाचे वर्ग पुन्हा सुरु होतील. भारतीय नौदलाच्या जनसंपर्क खात्यानेही या अभियानाचे कौतुक केले आहे. सागर परिक्रमेची शालेय विद्यार्थ्यांना माहिती द्यायची असल्यास इच्छुकांनी sailwithmhadei@gmail.com या ईमेल पत्त्यावर संपर्क साधावा.
सागर परिक्रमा-३ कधी ?
पाच महिन्यांच्या या अविश्रांत मोहिमेनंतर केवळ दोन दिवसांच्या रजेनंतर अभिलाष सेवेत पुन्हा रुजू झाले आहेत. वरिष्ठांनी परवानगी दिल्यास पुन्हा एकदा सागर परिक्रमेवर जायचीदेखील त्यांची तयारी आहे. नौसेनेला आता प्रतीक्षा आहे ती तिसऱ्या सागर परिक्रमेची आणि यावेळी नौदलातून युवकांनी विशेषतः महिला अधिकाऱ्यांनी पुढं यावं असं वरिष्ठांना वाटत आहे. त्यामुळे पुढील यशस्वी सागर परिक्रमेची माळ कोणाच्या गळ्यात पडेल याची नौदलात चर्चा सुरु झाली आहे. विनाथांबा सागर परिक्रमेची ही दुसरी मोहीम फत्ते झाल्यामुळे भारतीय नौसेनेतही उत्साहाचं वारं पसरलं आहे.
सागर परिक्रमा-२-जिद्द आणि स्फूर्तीचा धडा
सागर परिक्रमा-२ साठी चार लाखाहून कमी रुपये खर्च झाले आहेत. वास्तविक आजकाल देशात लग्नसोहळ्यांवर होणारे अनावश्यक खर्च आणि आयपीएल सारखे निरर्थक क्रिकेट सामने यांच्या खर्चाच्या तुलनेत हा खर्च अत्यंत क्षुल्लक आहे. अशा निरुपयोगी खेळांच्या सामन्यांमधून युवा पिढीला वास्तविक कोणतीही स्फूर्ती मिळत नाही मात्र सागर परिक्रमा-२ने यश मिळवल्यामुळे भारतीय नौसेनेतही नव्या चैतन्याची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे. भारतीय नौदलाच्या सागर परीक्रमा-२ या साहसी जलसफरीला लाखो भारतीयांनी पाठींबा दिला. यात सर्वधर्मीय लोक होते म्हणूनच एकत्र आल्यास भारतीयांमध्ये खूप मोठी मजल मारण्याची ताकद आहे असंही अभिलाष यांना वाटते. देशासाठी गर्व ठरलेल्या अभिलाष यांच्या विश्वविक्रमाने नव्या युगाची नांदी सुरु झाली आहे असे म्हणायला हरकत नाही. आज कुछ तुफानी करते है असे म्हणत निव्वळ चित्रपट आणि जाहिरातीतून थराराची चव घेण्यापेक्षा देशाची शान वाढवू शकणाऱ्या साहसांकडे युवा पिढीने जरूर वळावे हा अभिलाष यांचा संदेश गांभीर्याने घेण्याची गरज आहे कारण शेवटी ‘डर के आगे जीत है’ हे देखील खरेच आहे !

The edited article about Sagar Parikrama-2 by Lt.Cdr.Abhilash Tomy was published in 'Prahaar' news daily on 14th April,2013, you may like to read that so here is the link http://prahaar.in/collag/81141