मुंबई ते हिमाचल प्रदेशातील धरमशाला
असा प्रवास मी फक्त दलाई लामांच्या दर्शनासाठी केला होता. धरमशालाच्या
निसर्गसौंदर्यापेक्षाही त्यांना पाहण्याचं आकर्षण मोठं होतं. त्यांचं भाषण
ऐकण्याची संधी मला अजिबात चुकवायची नव्हती. अवघ्या जगातील सर्वसामान्य लोकांसहीत
बड्या बड्या लोकांनाही ज्यांच्या विचारांनी प्रभावित केलं आहे, ते इतकं किमयागार
व्यक्तिमत्व आहे तरी कसं हे मला अनुभवायचं होतं.
तेनझिन ग्यात्सो या माणसाने जगात येऊन तब्बल ८१ वर्ष पूर्ण केलीयत आणि गेली कित्येक दशकं सा-या जगाला शांतीचा संदेश देणा-या या माणसाचं दर्शन घेण्यासाठी मी खूप लांबवर प्रवास करत चालले होते. असं का?; तर तेनझिन ग्यात्सो अशा तिबेटी नावाच्या एका माणसाबद्दल एवढं कुतूहल असण्याचं कारण म्हणजे या साध्यासुध्या राहणीमानाच्या आणि विनम्र दिसणा-या व्यक्तीला जग दलाई लामा म्हणून ओळखतं. महात्मा गांधींनंतर सर्वात अधिक अनुयायी असणारे सर्वांचे लाडके बौद्ध धर्मगुरू चौदावे दलाई लामा. दलाई लामांचं आयुष्य, त्यांची शिकवण, त्यांचा तिबेटसाठी चाललेला लढा, जगभरात त्यांना मिळणारा मानसन्मान, त्यांचे विख्यात अनुयायी, त्यांची पुस्तकं अशा कित्येक गोष्टींबद्दल कित्येक वर्ष वाचलं होतं. मात्र कधी त्यांच्या व्याख्यानाला हजर राहण्याची व त्यांना प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली नव्हती. दलाई लामा हे हिमाचल प्रदेशातील धरमशाला (किंवा धरमशाळा)मध्ये कायमचे वास्तव्याला असतात हे माहित होतं. आपल्या सुदैवाने आणि भारत सरकारच्या आतिथ्यशीलतेमुळे ते आज गेली कित्येक वर्ष धरमशाला शहरात राहत आहेत. त्यामुळे हिमाचल प्रदेशाच्या सहलीची आखणी करत होते तेव्हा दलाई लामांचं व्याख्यान चुकवायचं नाही हे ही ठरवून टाकलं. तेच तर माझ्या या धरमशाला ट्रीपचं मोठं आकर्षण होतं.
तेनझिन ग्यात्सो या माणसाने जगात येऊन तब्बल ८१ वर्ष पूर्ण केलीयत आणि गेली कित्येक दशकं सा-या जगाला शांतीचा संदेश देणा-या या माणसाचं दर्शन घेण्यासाठी मी खूप लांबवर प्रवास करत चालले होते. असं का?; तर तेनझिन ग्यात्सो अशा तिबेटी नावाच्या एका माणसाबद्दल एवढं कुतूहल असण्याचं कारण म्हणजे या साध्यासुध्या राहणीमानाच्या आणि विनम्र दिसणा-या व्यक्तीला जग दलाई लामा म्हणून ओळखतं. महात्मा गांधींनंतर सर्वात अधिक अनुयायी असणारे सर्वांचे लाडके बौद्ध धर्मगुरू चौदावे दलाई लामा. दलाई लामांचं आयुष्य, त्यांची शिकवण, त्यांचा तिबेटसाठी चाललेला लढा, जगभरात त्यांना मिळणारा मानसन्मान, त्यांचे विख्यात अनुयायी, त्यांची पुस्तकं अशा कित्येक गोष्टींबद्दल कित्येक वर्ष वाचलं होतं. मात्र कधी त्यांच्या व्याख्यानाला हजर राहण्याची व त्यांना प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली नव्हती. दलाई लामा हे हिमाचल प्रदेशातील धरमशाला (किंवा धरमशाळा)मध्ये कायमचे वास्तव्याला असतात हे माहित होतं. आपल्या सुदैवाने आणि भारत सरकारच्या आतिथ्यशीलतेमुळे ते आज गेली कित्येक वर्ष धरमशाला शहरात राहत आहेत. त्यामुळे हिमाचल प्रदेशाच्या सहलीची आखणी करत होते तेव्हा दलाई लामांचं व्याख्यान चुकवायचं नाही हे ही ठरवून टाकलं. तेच तर माझ्या या धरमशाला ट्रीपचं मोठं आकर्षण होतं.
हिमाचल प्रदेशातील कांगरा
जिल्ह्यातील धरमशाला शहरात उतरल्यावर आपण दलाई लामांच्या गावात आलोय हे ताबडतोब
जाणवतं. इथल्या मॅकलिऑडगंज, नॉरबुलिंका आणि प्रामुख्याने अप्पर धरमशाला भागात
गेल्यावर एका वेगळ्याच प्रकारच्या मन:शांतीची अनुभूती येते. सभोवताल निसर्ग सौंदर्याची अपरिमित
उधळण असते. आजूबाजूला लहान-मोठ्या बौद्ध भिख्खूंचा वावर दिसतो. पर्यटकांची गर्दी
असली तरीही इथल्या वर्दळीतही एक प्रकारची शांतता जाणवते. बाजारातील दुकानांमध्ये
दलाई लामांची पुस्तके व त्यांच्या भाषणांच्या कॅसेट्स, सीडीज्, त्यांची पोस्टर्स इत्यादी
विकायला ठेवलेलं दिसतं. बाजारात फिरताना किंवा एखाद्या सुंदरशा कॅफेमध्ये बसून
निवांत वेळ घालवताना ही भाषणंही ऐकू शकतो. एकूणच दलाई लामांच्या अस्तित्वाचा आणि
बौद्ध संस्कृतीचा प्रभाव इथे जाणवत राहातो. त्यांचे अनुयायी व चाहते जगभरातून
त्यांना पाहण्यासाठी या लिटल ल्हासामध्ये येत असतात. नुकतीच ऑस्ट्रेलियन क्रिकेट
टीमही दलाई लामांची भेट घेण्यासाठी इथे आली होती. धरमशाला क्रिकेट स्टेडियम
जगप्रसिद्ध आहे. कदाचित निसर्गाच्या कुशीत लपलेलं हे जगातील एकमेव क्रिकेट
स्टेडियम असावं. मलाही धरमशालामधील इतर अनेक ठिकाणं पाहायची होती परंतु त्याआधी
दलाई लामांच्या व्याख्यानाला हजेरी लावता यावी यासाठी मी तिथे गेल्यावर प्रयत्न
सुरू केले. मॅकलिऑडगंजमध्येच चौदावे दलाई लामा यांचं निवासस्थान आहे. त्यांचा
कार्यालयीन कारभारही इथूनच चालतो. माझ्या धरमशालामधील गाईडने मला निश्चिंत राहायला
सांगितलं पण प्रत्यक्ष त्यांचे व्याख्यान ऐकेपर्यंत माझं स्वप्न पूर्ण झालंय असं
मला वाटणार नव्हतं.
मी गेले तेव्हा डिसेंबर
महिना चालू होता. थंडीचा मोसम सुरू झालाच होता. तरीही स्थानिकांच्या मते
डिसेंबरनंतर तिथे कडाक्याची थंडी पडते आणि धरमशाला नखशिखांत बर्फाची चादर ओढून
घेतं. मला बर्फ पाहण्याचा योग काही आला नाही मात्र दलाई लामांना भेटण्याचा योग
काही केल्या मी चुकवणार नव्हते. प्रवेशासाठी अर्ज सकाळी नऊ वाजता त्यांच्या
कार्यालयात स्वीकारला जाईल असं आदल्या दिवशीच्या संध्याकाळी कळवण्यात आलं. या
अर्जावर लावण्यासाठी फोटो आयडी काढावा लागणार होता. मग त्यासाठी भल्या सकाळी आठ
वाजता अस्मादिक फोटोच्या दुकानात हजर झाले. तिथे माझ्यासारख्याच पन्नासएक जणांनी
रांग लावली होती. चौकशी केली तर समजलं की हे सर्व देखील व्याख्यानासाठीच अर्ज
भरणार होते. व्याख्यानाला उपस्थितांची संख्या मर्यादीत असते त्यामुळे स्वत:ला प्रवेश मिळावा अशी
प्रत्येकाचीच इच्छा असते. मी फोटो आयडी काढून तो अर्जासहीत भरून दिला. आता आम्हाला
काही तास वाट पाहायची होती. त्यानंतर प्रवेश मिळणार की नाही हे समजणार होतं. ब्रॅन्च
सिक्योरीटी ऑफीसमध्ये आपण अर्जात जी माहिती भरून देतो त्याची छाननी करून मगच दलाई
लामा यांच्या व्याख्यानाला प्रवेश दिला जातो. पत्रकार असल्यामुळे मला प्रवेश मिळेल
की नाही याची शंका मनात होती. ती शंका तशीच मनात घेऊन मग मी मॅकलिऑडगंजचा फेरफटका
सुरू केला. थोड्या वेळाने समजलं की मला त्या दिवशी नाही पण दुस-या दिवशीच्या
व्याख्यानाला हजर राहाता येणार होतं. कारण त्या दिवशीच्या व्याख्यानासाठी माझा
अर्ज फार उशिरा गेला होता. असो, काही का असेना प्रवेश मिळणार होता हीच आनंदाची
गोष्ट होती.
तिबेटमधून आलेल्या चौदाव्या
दलाई लामांनी त्यांच्या अनुयायांसमवेत गेली कित्येक दशकं स्वायत्त स्वतंत्र
तिबेटची मागणी केली आहे. मात्र त्यांच्या अहिंसावादी, शांतीपूर्ण मार्गाने तिबेट
चीनच्या तावडीतून कधीही स्वतंत्र होणं शक्य नाही अशी धरमशालेतील तिबेटी तरूणांची
धारणा आहे. अशा प्रकारे दलाई लामा यांच्याभवती टीकेचीही बरीच वादळं घोंघावत असतात.
तरीही धरमशाला म्हणजे दलाई लामा हे समीकरण आज कायम आहे. वास्तविक चौदावे दलाई लामा
हे भारतात व जगभरात अनेक ठिकाणी धर्म-शांतीप्रसारासाठी फिरत असतात. प्रत्यक्ष
धरमशालामध्ये त्यांना पाहायला व ऐकायला मिळणं ही नशीबाचीच गोष्ट. मला राजकीय विचारधारांशी
फार काही देणं-घेणं नव्हतं परंतु दलाई लामांनी जीवनसार अनेकदा त्यांच्या
तत्वज्ञानातून मांडलेलं आहे, ते मला नेहमीच वाचायला आवडतं. त्यासाठीच मी अखेर
धरमशालापर्यंत येऊन पोहोचले होते. एकटीच असल्यामुळे भ्रमंतीवर कोणतंही बंधन
नव्हतं. दुस-या दिवशी सकाळी आठ वाजता दलाई लामा यांचं भाषण सुरू होणार होतं.
रशियातून आलेल्या बौद्ध धर्माच्या प्रचारक-अनुयायांसाठी हे विशेष व्याख्यान
ठेवण्यात आलं होतं.
मी सकाळी सातलाच हॉटेलबाहेर
पडले होते. थंडी असली तरी खूप प्रसन्न असं वातावरण होतं. कोवळं उनही पडलेलं होतं.
टेंपल ऑफ दलाई लामा म्हणजे नामग्याल बौद्ध पाठशाळेत हे व्याख्यान होतं. तिथे
लोकांची रांग लागलेलीच होती. मी जाऊन त्या रांगेत उभी राहिले. प्रत्येकाकडून
इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स काढून घेण्यात आले. मग आम्ही सर्व पहिल्या मजल्यावर लेक्चर
हॉलमध्ये जाऊन पोहोचलो. तिथे एका बाजूला चपला काढून ठेवण्याची सोय होती. चपला
देखील शिस्तशीर लावून ठेवलेल्या होत्या. शेकडो माणसं होती पण उगाचच चपलांचा ढिग तिथे
नव्हता. मग स्वयंसेवकांनी मला एक पांढरी तागाची पिशवी दिली, ज्यात एक खाता म्हणजे
पांढरा लहानसा रेशमी कपडा, जपमाळ, एक नोटपॅड व वाचण्यासाठी काही साहित्य असं सर्व
होतं. तिथे इतक्या सा-या परदेशी व स्थानिक अनुयायांची, भिख्खू व माझ्यासारख्या
काही पर्यटकांची गर्दी होती, परंतु कुठेही आवाज किंवा गोंधळ नव्हता. जो तो आपापलं
काम शांततेत पार पाडत होता. मग मी देखील एका कोप-यात जाऊन बसले. बसण्यासाठी आपापली
चटई घेऊन येण्याची इथे पद्धत आहे. वास्तविक आदल्या दिवशी व्याख्यानाला हजर
राहाताना कोणत्या गोष्टी घेऊन याव्यात याची यादी सोपवण्यात आली होती मात्र ती मी
विसरल्यामुळे मी जवळची शाल जमिनीवर अंथरली व त्यावर बसले. दलाई लामा जिथून येणार
होते त्या जिन्याजवळची जागा मी शोधून बसले होते.
फोटोग्राफर्स व
स्वयंसेवकांची फौज तयारच होती. तितक्यात तिबेटी भाषेत घोषणा झाली. मग इंग्रजी
भाषेतही सांगण्यात आलं की दलाई लामा येत आहेत. अगदी खास कार्यकर्त्यांच्या
घोळक्यातून दलाई लामा जिन्यावरून येताच उपस्थित सर्वांनी त्यांना बसलेल्या स्थितीत
ओणावून दोन हात खाली आडवे करून नमस्कार केला. मी देखील त्यांचं अनुकरण केलं. काहीच
मिनिटांमध्ये लेक्चर हॉलमध्ये एक धीरगंभीर आवाज उमटला. हॉलमध्ये एकदम शांतता होती.
तिबेटी न समजणा-यांसाठी हेडफोनवर भाषांतराची सोय होती. मधूनच ते काही वाक्य
इंग्रजीतही बोलत होते. तिबेटी मनांवर व जगातल्या लाखो लोकांच्याही मनावर अधिराज्य
करणारे दलाई लामा प्रत्यक्ष आमच्यात बसून बोलत होते. वरच्या मजल्यावर एक
सिंहासनासारखी छानशी तक्तपोशी होती त्यावर ते विराजमान झाले होते. आम्ही थोडे
खालच्या बाजूला बसलो होतो. असं हे भाषण एक-दीड तास चाललं. त्यांच्या
वाणीप्रभुत्वाचा अनुभव येत होता. मधूनच ते काही मजेशीरही बोलत असावेत कारण लोक
तेव्हा हसत होते. त्यांचं भाषण ऐकण्यासाठी जमलेल्यांमध्ये अगदी गरीब म्हातारीपासून
ते महागड्या कारमधून आलेल्या लोकांपर्यंत सर्वच प्रकारचे लोक होते. दलाई लामांचं
व्यक्तिमत्वही खरंच तेजपुंज आहे. हसल्यावर ते लहान बालकासारखे वाटत. इथे आल्यावर
कित्येकांची बौद्धिक भूक भागते तर कित्येकांना मन:शांती लाभते.
भाषणामध्ये एक
चहासाठी विश्रांती देखील झाली. मी आल्यापासून इतरांनी आणलेल्या मगांकडे पाहत होते,
ते कोडं मला तेव्हा उमगलं. मी काही मग नेला नव्हता मग माझ्यावर दया दाखवून मला एका
कागदी कपात तिबेटी चहा देण्यात आला. थंडीच्या दिवसात सकाळच्या उन्हात बसून तो चहा
पिणं छानच वाटलं. सुमारे दोन तासांनी दलाई लामा भाषण संपवून जायला निघाले. तेव्हा
त्यांचे आशिर्वाद घेण्यासाठी इच्छुकांची एक रांग करण्यात आली. त्यावेळेस मला
पिशवीतल्या रेशमी कपड्याचा अर्थ उमगला. तो खाता मी दलाई लामा यांच्या हातात दिला व
त्यांनी तो पुन्हा माझ्या गळ्यात घातला व त्यांनी काही आशिर्वादपर शब्द पुटपुटले.
ही तिबेटी अभिवादनाची व आदरभाव व्यक्त करण्याची पारंपरिक पद्धत आहे. त्यानंतर
आम्ही एकमेकांना हात जोडून नमस्कार केला. थोड्याच वेळात मी तिथून निघाले. ही भेट
अविस्मरणीय होती. मन कसं हलकं झालं होतं. एक स्वप्न पूर्ण झाल्याचा अपार आनंद मनात
मावत नव्हता. खूपशी थोर माणसं माझ्या पिढीचं समजण्याचं वय येईपर्यंत जगातून निघून
गेली होती. त्यामुळेच पूर्ण जगावर आपल्या सत्शील विचारांचा प्रभाव टाकणा-या दलाई
लामांना भेटण्याची माझी इच्छा पूर्ण झाल्याचाही तो आनंद होता.
This article has been published in the newspaper, Maharashtra Dinman on 30/03/2017