Translate

Monday, August 22, 2011

मसरूरचं रॉक टेम्पल

                                                  
तीर्थस्थानांना किंवा देवस्थानांना भेट देताना काहीवेळा बरेचसे साम्य जाणवते. एक म्हणजे मंदिरं हा या साम्यातला अविभाज्य भाग..वेगवेगळया ठिकाणी विविध पुरातन आणि भिन्न राजवटींचा इतिहास तसेच शिल्पशैलींचा शतकांचा वारसा सांगणारी मंदिरं, देवालय पाहायला मिळतात. हिमाचल प्रदेशात गेले असताना कांगरा जिल्ह्यात धरमशालाजवळ असणाऱ्या नारगोटा सुरीयन लिंक रोडवर अश्याच एका अतिपुरातन मंदिरशिल्पाला भेट देण्याचा योग आला. धरमशाला हे खरं तर तिबेटी संस्कृतीचा प्रभाव असणारं छोटसं शहर आहे. मात्र खुद्द कांगरा जिल्ह्यातील इतर गावांमध्ये हिंदू संस्कृतीचा प्रभाव जाणवतो. धरमशालेजवळ काठघर, बैजनाथ, बज्रेश्वरी,ज्वालामुखी आणि श्री नैनादेवी मंदिर अशी काही मंदिरं पाहायला मिळाली परंतु सर्वात उल्लेखनीय आणि लक्षणीय वाटलं ते मसरूरचं रॉक टेम्पल ! माझ्या गाईडला आधीच सांगून ठेवल्यामुळे त्यानंही सर्वच प्रेक्षणीय स्थळांना भोज्जा देऊन येण्याच्या कामगिरीला काट मारण्याची खबरदारी घेतली होती आणि त्यामुळेच मला हे मसरूरचं रॉक कट टेम्पल अर्थात एका अखंड दगडातून कोरलेलं अत्यंत सुंदर मंदिर शिल्प पाहण्याची संधी मिळाली.


धरमशालामधील भागसुपासून मसरूरला पोहोचायला आम्हाला सुमारे दोन तास लागले पण मसरूरजवळच्याच लुंज गावात मस्तपैकी दही-आलू पराठे असा नाश्ता झाल्यामुळे एवढ्या प्रवासाचं काही वाटलं नाही. खरं तर हे मंदिर दुर्लक्षित आहे हे तिथं पाउल टाकल्या टाकल्याच समजते. पुराणवस्तू संशोधन खात्यानं लावलेला ‘संरक्षित स्थळ’चा एक नाममात्र फलक तिथं आहे, त्यामुळेच केवळ या मंदिर प्राचीन असल्याचं समजते. बाकी तिथं कधीकधी प्रवेश फी घेण्यासाठी देखील द्वारपाल उपस्थित नसतो. ऑफ सिझन असो किंवा पीक सिझन असो, या मंदिरापाशी फिरकण्याची तसदी फारसे पर्यटक घेत नाहीत. मात्र ऑफबीट स्थळांना भेट देण्याची आवड असणारे काही पर्यटक आणि संशोधक-अभ्यासक इथे आवर्जून येतात. आम्ही तिथं पोहोचलो तेव्हाही तिथं कोणीच पर्यटक नव्हते त्यामुळे ‘ देखो म्याडमजी, बोला था ना..यहां कोई भी नही है’ असं ऐकवण्याची संधी माझ्या गाईडला मिळाली.

जिथं प्रवेशद्वाराऐवजी मंदिराच्या मागून प्रवेश करावा लागतो असं मंदिर मी प्रथमच पाहत होते. मागल्या बाजूनं शिरतानाच या मंदिर शिल्पाची भव्यता जाणवते. आतमध्ये गेल्यावर पुढील प्रांगणात आल्यावर दोन मोठी शिखरं दिसतात. पूर्ण अवलोकन केल्यावर कळते कि हे संपूर्णपणे एकाच अखंड पाषाणातून कोरलेले भव्यतम असें १५ मंदिरांचे संकुल आहे. सुमारे १६० फूट लांब, १०५ फूट रुंद आणि ५०-६० फूट उंचीचे हे मंदिर शिल्प खरं तर भारतीय शिल्पकलेचा अप्रतिम आविष्कारच आहे. काही तज्ञांनी या मंदिराची कंबोडियातील ‘अंगोकार वट ’ या मंदिर शिल्पांशी तुलना केली आहे. मसरुरची हि सर्व मंदिरं पूर्वाभिमुख असून मुख्य मंदिरातील गर्भगृहात प्रभू रामचंद्र, सितामाई आणि लक्ष्मणाच्या मूर्ती आहेत. छोटेखानी दगडी सभामंडप देखील बांधलेला लक्षात येतो. या मंदिराच्या प्रवेशद्वारावर सुबक नक्षीकाम आढळतं आणि तसेच नक्षीकाम मंदिरात ठिकठिकाणी दिसतं. पुराणवस्तू संशोधकांच्या आणि इतिहास तज्ञांच्या अंदाजानुसार हे मंदिरशिल्प आठव्या शतकात बांधलेलं आहे. अर्थात हे मंदिर कोणी आणि का बांधलं याचे काही पुरावे उपलब्ध नसले तरी या मंदिराशी निगडीत अनेक पौराणिक आख्यायिका परिसरात ऐकायला मिळतात. पांडवांनी हे मंदिर अवघ्या एका रात्रीत कोरून काढल्याची गोष्टही इथे सांगितली जाते. या मंदिराला ठाकुरद्वार आणि शिवमंदिर म्हणूनही ओळखले जाते .

मंदिरासमोरच्या आवारात अतिशय सुंदर असा दगडी बांध असलेला तलाव आहे. या बांधालगत काही शिल्पाकृती ठेवलेल्या दिसतात ज्यावर शिलालेखही आहेत. तलावाच्या पाण्यात मंदिराचं प्रतिबिंब फारच मोहक दिसतं विशेषतः पौर्णिमेच्या रात्री हा मंदिर परिसर अतिशय अलौकिक दिसत असल्याचं इथल्या पंडितजींनी सांगितलं. मंदिरातील राम-सीतेच्या मूर्तींची नैमित्तिक पूजा-अर्चना केली जाते. मला मात्र गाभाऱ्यात बराच अंधार असल्यामुळे मूर्तींचा फोटो काढता आला नाही. १९०५ साली झालेल्या प्रचंड भूकंपात या मंदिराची खूपच पडझड झाली. त्यावेळी तुटून पडलेले पाषाणखंड अजूनही तसेच आवारात आहेत. त्या भूकंपानंतर इथली काही शिल्प आणि मूर्ती सिमल्याच्या वस्तुसंग्रहालयात हलविण्यात आली होती. प्रमुख मंदिराच्या जिन्यातून वर गेल्यावर धौलाधार पर्वतराजीने वेढलेला अतिशय मनोहारी परिसर पाहताना तिथून पाय निघत नाहीत.

पडझड झाल्यामुळे सध्या हे मंदिर शिल्प जीर्णशीर्ण झालेय. एका अखंड प्रस्तरात खोदलेले आणि तेही एकसंध असें हे मंदिर अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. पूर्ण भारतात फक्त चारच ठिकाणी अशा प्रकारची मंदिरं पाहायला मिळतात. मसरूर सोडल्यास आपल्या महाराष्ट्रातील कैलास वेरूळ लेणी, दक्षिणेला महाबलीपुरम येथील रथ आणि राजस्थानमध्ये धर्मनाथ इथं अशी अखंड पाषाणात कोरलेली मंदिर शिल्पकला आढळते. या मंदिरातली शिल्पकलेची शैली नागर पद्धतीची असली तरी शिखरांमध्ये दाक्षिणात्य द्रविडी शैलीचा प्रभाव जाणवतो. या शिल्पांमध्ये देव, अप्सरा, गंधर्व, शिव-पार्वती, ऋषी, प्राणी इत्यादींचा समावेश आहे. भारतीय शिल्पकलेच्या आणि पौराणिक इतिहासात मंदिरांचं स्थान अतिशय मोठं आणि अढळ आहे. मात्र मसरूरच्या या मंदिर शिल्पाचा ठेवा आजही दुर्लक्षित आहे. वास्तविक या मंदिराचा युनेस्कोतर्फे जाहीर झालेल्या जागतिक ठेव्याचा दर्जा असणाऱ्या स्थळांमध्ये समावेश झाला आहे परंतु त्या दर्जाची कोणतीही देखरेख किंवा सुरक्षा इथं आढळत नाही. एवढंच काय आजूबाजूला पर्यटकांसाठी कोणत्याही सोयीसुविधा इथं आढळत नाहीत. प्रसारमाध्यमातून फारशी प्रसिद्धी मिळाली नसल्यामुळे या सुंदर मंदिराकडे जाण्याचे कष्ट पर्यटकही घेत नाहीत. पण हिमाचल प्रदेशात गेल्यावर आपल्या भारतीय संस्कृतीचा आणि पौराणिक शिल्पकलेचा हा अनमोल नमुना नक्कीच पाहावा असा आहे.

No comments:

Post a Comment