'रुद्रप्रयागचा नरभक्षक', 'टेम्पल टायगर', 'कुमाऊंचे दिवस' अशी अनेक पुस्तकं, त्यातल्या जिम कॉर्बेट या धाडसी ब्रिटिश अधिकाऱ्यानं केलेल्या शिकारकथा आणि त्यातलं जंगलाचं वर्णन वाचून अंगावर काटा येत असे, पण या शिकारकथा नुसत्या वाचून काही समाधान होत नव्हतं. मग ठरवलं की जिम कॉर्बेटची ही कर्मभूमी म्हणजे आताच्या उत्तरांचलमधलं जिम कॉर्बेट नैशनल पार्क कसं आहे ते पाहायचेच.
जिम कॉर्बेट नैशनल पार्क रामनगर गावापासून सुरु होतं आणि याच गावात मोठ्या संख्येनं देशी-विदेशी पर्यटक उतरतात. जंगलात प्रवेश करण्याआधी वनखात्याची परवानगी आवश्यक असते. राहण्याची सोय आणि ही परवानगी अशी दोन्ही कामं मी मुंबईतूनच करून ठेवली होती. भारतीय रेल्वेच्या कृपेनं दिल्लीहून संध्याकाळी पाचला सुटलेली माझी गाडी रात्री एकच्या सुमारास म्हणजे फक्त साडेतीन तास उशिरा पोहोचली. तिथे अश्या अपरात्री माझ्यासाठी ताटकळत राहिलेल्या जिप्सी ड्रायव्हरपासून ते रिसोर्ट व्यवस्थापकापर्यंत सर्वांचेच मग मी आभार मानले.
जंगल सफारी सकाळी सहापासूनच सुरु होतात. पार्क पहाटे पाच वाजताच खुलं आणि संध्याकाळी पाच वाजता बंद होतं.ठिकठिकाणी चितळे, माकडं, काळवीट,सांबर, डुक्कर, मोर आणि अन्य विविध प्रकारचे प्राणी-पक्षी पाहायला मिळतात. नद्यांच्या काठावर मगरी आणि सुसरीही सुस्तावून पडलेल्या दिसतात.आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जागोजागी दिसणारी 'टर्माईट हिल्स' म्हणजे वारूळ.
जंगलात अजिबात प्रदूषण नसल्याची खात्रीच ही वारूळ देतात. या अभयारण्यात अजूनही काही गावं राहती आहेत ( आपल्या संजय गांधी नैशनल पार्कमध्ये काही कातकरी पाडे आहेत, तशीच ही गावं.) या गावांमध्ये वीजही नाही. पण इथल्या रहिवाशांना वर्षानुवर्षं राहिल्यामुळे जंगली श्वापदांचे फारसं भय वाटत नाही. १५ जून ते १५ नोव्हेंबर या काळात पार्क बंद असतं. गर्दीचा काळ हा साधारणतः डिसेंबर ते फेब्रुवारी आणि एप्रिल ते मे महिन्याचा. सध्या पार्कमध्ये १६४ वाघ आहेत. मात्र कॉर्बेटसारख्या सुमारे हजार चौरस मैलांच्या परिसरात विस्तारलेल्या या जंगलात जाऊन लगेच वाघ दिसेलच अशी अपेक्षा ठेऊ नका. कारण हा जंगलचा राजा अतिशय लहरी आणि चतुर आहे. वाघ पाहण्याची खरोखर इच्छा असेल तर जास्त दिवसांचा मुक्काम हवाच. पण वाघ नजरेला पडलाच नाही म्हणून काही इथं येणारे वन्यप्रेमी निराश होऊच शकत नाहीत. रात्रीचं जंगल कसं दिसतं, काय बोलतं हे अनुभवायचं असेल तर इथल्या ढिकालाच्या जुन्या फोरेस्ट रेस्ट हाउसवर अवश्य मुक्काम करा, नव्हे कराच.
या जंगलामधल्या ढिकाला, बिजरानी, झिरनासारख्या विभागात फिरताना बऱ्याच ठिकाणी 'कॉल वेटिंग' वर थांबलेले पर्यटकांचे गट भेटतात. 'कॉल वेटिंग' म्हणजे शहरी माणसांची समजूत होईल की, फोनवरचं 'कॉल वेटिंग',पण जंगलाची डिक्शनरी वेगळी आहे, वाघ ज्या एरियात प्रवेश करतो, तेव्हा माकडं, सांबर खाकरून इशारा देतात, हरणं चौखूर उधळतात आणि पक्षीदेखील ओरडून संकेत देतात. या सर्व प्रकाराला अलर्ट कॉल म्हणतात आणि अश्या वेळी त्या एरियात जाऊन वाघाची वाट पाहत थांबणं म्हणजे 'कॉल वेटिंग. फक्त वाघ आणि वाघच पाहणार असं ठरवून आलेले पर्यटक, अशा ठिकाणी दुर्बिणीला डोळे लावून बसलेले असतात. इथं जंगलात फिरण्याचे परमिट लागतं. आतमध्ये फिरण्यासाठी बाराशे ते दोन हजार रुपये दरानं जिप्सी भाड्यानं मिळतात.
हे पार्क संपूर्ण पाहायचं तर कमीत कमी आठवडा हवाच. संपूर्णपणे एकट्याने केलेली ही माझी पहिलीच जंगल सफारी होती त्यामुळे ती अधिकच रोमांचक झाली. हा सर्व वन्यप्रदेश अत्यंत सुंदर आणि विशेष म्हणजे प्रदूषणमुक्त आहे.त्यामुळे मोकळा श्वास घेणं काय असतं हे अनुभवण्यासाठी इथं एकदा आलंच पाहिजे आणि हो..सोबत चांगला कॅमेरा मात्र हवाच.
कसे जाल कुठे राहाल
रामनगरमध्ये ६० हुन अधिक असे स्वस्त आणि महागडे देखील टूरिस्ट लॉज आणि रिसोर्ट आहेत. जवळ पंतनगरला विमानतळ आहे. हल्द्वानीलाही तो लवकरच होईल. दिल्ली- पंतनगर विमानप्रवास करून मग पुढं कोणत्याही वाहनानं रामनगरला ३-४ तासात पोहोचता येतं. दुसरा पर्याय म्हणजे दिल्ली-रामनगर उत्तराखंड संपर्क क्रांती एक्स्प्रेस पकडावी आणि थेट कॉर्बेट पार्क जंगलाच्या दारात उतरावं.
भेट सीताबनीची...
सीताबनीला उशीरच म्हणजे संध्याकाळी सहाच्या सुमारास पोहचले. वाटेतच एक नरभक्षक वाघ याच भागात फिरत असल्याचं पेट्रोलिंगसाठी निघालेल्या वन अधिकाऱ्यांकडून समजलं. सीताबनी हा कॉर्बेटच्या अगदी बाजूलाच लागून असलेला घनदाट असा बफर झोन आहे. उंचच उंच देवदार वृक्षांच्या जंगलामधून जाणारा नागमोडी वळणाचा रस्ता या प्रवासातले थ्रील वाढवत होतं. या वाघानं काही दिवसांपूर्वीच गावातल्या एका बाईवर हल्ला केला होतं. हा भाग बघायची तीव्र इच्छा आणि ड्रायव्हरनं दिलेल्या पाठींब्यामुळं मी शेवटपर्यंत जाण्याचा निर्णय घेतला. थोड्याच वेळात चांगलाच अंधार झाला आणि प्रत्येक गवताच्या पात्यामागे मला वाघ असल्याचा भास होत होतं. सोबतीला ड्रायव्हर गावात येणाऱ्या वाघांचे किस्से सांगत होता. हट्टाने घेतलेला निर्णय अंगाशी येतो की काय असे वाटू लागलं होतं..अंगावर काटा येत होता..उघडी जिप्सी आणि त्यात मी आणि ड्रायव्हर असे दोघेच जण..पर्यटक म्हणून वाघ मला सूट देईल असे काहीच नव्हतं. वाटेत परतणारा एक गट भेटला, त्यानाही वाघाची चाहूल लागली होती म्हणूनच ते ही वेगानं गावाकडे परतत होते. मग शेवटच्या गेटपर्यंत जाण्याचा निर्णय रद्द करून मी देखील ड्रायव्हरला जिप्सी परत वळवायला सांगितली.
कॉर्बेटच्या प्रवासात वाघ नाहीतरी हत्तीच्या पाठलागाला पाठ( !) देताना जीव कसा गोळा होतो, हे मात्र मला कळलेच. हत्तीच्या शोधात आम्ही जिप्सी दाट गवतात घातली. काही अंतर जाताच एक तस्कर( सुळेवाला हत्ती ) त्या गवतामधून उगवला आणि जोरानं चीत्कारून त्यानं आम्ही आल्याचं अजिबात आवडलं नसल्याचं सांगून टाकलं. गाईड ऐकायला तयार नव्हता. त्याला हत्तीच्या अधिक जवळ जायचं होतं. जीप थोडी पुढं सरकताच त्या हत्तीनं दाणदाण पाय आपटून जीपच्या दिशेनं मोर्चा वळवला. मग आमच्या ड्रायव्हरनं कशीबशी जिप्सी मागं वळवली आणि आम्ही तिथून सुंबाल्या केला !
P:S २०११ च्या व्याघ्रगणनेत कॉर्बेट पार्क मध्ये २९५ वाघ असल्याचं समजतं. लेखात नमूद केलेली संख्या ही २००८ सालची आहे.
Note:- This article was earlier published in Marathi news daily 'Prahaar' on 17th January 2009.Link is not available in archives.