काकडनाला, चोरखमारा रस्ता, टायगर रोड, लिंक रोड,घाटमारा रस्ता, थाडेझारी, गौरगल्ली, वाकडा बेहेडा, बंदरचूआ गेट,चितळ मैदान,पिटेझरी रस्ता, अंधारबन, तळं नंबर १ ते ७, आम्बेझरी, तिरोडा रस्ता हे सर्व राहण्याचे पत्ते आहेत पण माणसांचे नाहीत तर वाघ, गवे, रानकुत्री, अस्वलं,बिबट अशा जंगली प्राण्यांचे...आणि हे सर्व पत्ते शोधण्यासाठी तुम्हांला नागझिरापर्यंत पोहोचावंच लागेल. त्यातही मारुती चितमपल्ली आणि व्यंकटेश माडगुळकर यांचे लेख आणि पुस्तके वाचण्याचा चस्का तुम्हांला लागला असेल तर तुम्ही नागझिरापर्यंत जरुर पोहोचणारच. नागपूरहून जवळच म्हणजे दीड-दोन तासात भंडारा जिल्ह्यात साकोली रोडवरून आत गेल्यावर पिटेझरी गावातून पुढे नागझिरा अभयारण्य सुरु होतं. गाईड सुभाष किचकने आमचं पिटेझरी गेटवरच स्वागत केलं. गेटपासून पुढे आत नवा रस्ता बांधण्याचे काम सुरु आहे तेव्हा जीपला थोडा त्रास होईल असा इशाराही दिला. अर्थात एकदा जंगलात शिरल्यावर आजूबाजूला काय दिसतंय हे पाहण्यात लक्ष असल्यामुळे खालचा खडबडीत रस्ता आम्हाला जाणवलाच नाही ( आणि रस्त्यांमध्ये खड्डे असतातच हा समज पुण्या-मुंबईच्या खड्डेयुक्त रस्त्यांनी पक्का केला आहे. )
नागझिरानं रानकुत्र्यांसाठी लौकिक कमावला असला तरी नागझिरा नुसतंच जंगल नाही तर व्याघ्र अभयारण्य ही आहे. त्यामुळे इथल्या जंगलात प्रवेश केल्यावर आपण वाघाच्या जंगलात आलोयत हे जाणवल्याखेरीज राहत नाही. नागझिराचा विस्तार फार मोठा नाही त्यामुळे जीपनं एका दिवसात अख्खं रान आरामात पाहून होतं, पण ते नुसतं ‘पाहणं’ झालं, पण नागझिराच्या रानाशी खास हितगुज करायचं असेल तर वेळच काढला पाहिजे. आमच्या ‘जीप्सिज आउटडोअर्स’सोबत पहिल्यांदाच जंगल पाहण्याऱ्या ९ ते १४ वयोगटातल्या माणसांच्या पिल्लांचाही चमू होता, त्यामुळे आम्ही देखील निवांत सवड काढून गेलो होतो. नागझिऱ्याच्या रानात शिरल्यानंतर काही मिनिटातच गवे दिसले होते त्यामुळे मुलांची टोळीही प्रचंड खुश झाली आणि आमचा जीव भांड्यात पडला. गाड्यांची चाहूल लागताच गव्यांचा कळप रस्त्याच्या मध्यातून चौखूर उधळला. कधीही गवे न पाहिलेल्या आमच्यासाठी हे दृश्य केवळ अविस्मरणीय होतं. फोटोग्राफीसाठी तर ही संधी उत्तमच होती. ताडोबाला गव्यांनी दाट गवताच्या आडून आडून चुटपुटते दर्शन दिलं होतं. आता मात्र मन भरून या सुंदर राजबिंड्या प्राण्याला अगदी जवळून पाहण्याची इच्छा पूर्ण झाली. गव्यांच्या कळपात छोटी पिल्लं आणि गाभण मादीही होत्या, अशा कळपाचा नायक आणि त्याच्या आधिपत्याखाली कळप रानात कसे वावरतात हे जवळून पाहता आलं. गव्यासारखा ऐटबाज आणि डौलदार शरीरयष्टी असणारा प्राणी नाही हे पटलं. ताडोबाला असताना एकांड्या गव्याला पाहण्याची संधी मिळाली होती, पण तो जास्त वेळ समोर ठाकला नव्हता. पण इथं नागझिरामध्ये रानात शिरल्यावर काही वेळातच गवे दिसले आणि पुढले काही दिवस कसे जातील याचा ट्रेलरच मिळाला.
आमच्यासोबतच्या या शहरी मुलांनी आतापर्यंत आयुष्यात कधीही जंगलातलं पानही पाहिलेलं नव्हतं आणि अश्या मुलांना घेऊन थेट नागझिरासारख्या शहरी सुख-सोयींचा लवलेश ही नसणाऱ्या अस्सल जंगलात नेऊन आठवडा काढण्याचं आव्हान पुण्याच्या रोहन तावरेनं घेतलं होतं. पहिल्या दिवसापासूनच सर्व मुलं एवढी समजूतदारपणे जंगलात राहण्याचा अनुभव एन्जॉय करत होती की आम्ही मुलांना मनोमन धन्यवादच दिले. हे इथं सांगणं यासाठी महत्वाचं आहे कारण नागझिरामध्ये निवासाची आणि खानपानाची सोय आहे पण निवास गृहांमध्ये वीज नाहीये त्यामुळे काळोख झाल्यावर कंदिलाच्या प्रकाशावरच सारा कारभार करायचा. इथे संध्याकाळी अंधार झाल्यानंतर कर्मचारी अतिथीगृहाच्या प्रत्येक खोलीबाहेर एक-एक कंदील आणून ठेवतात. अर्थात जिथे विजेचे दिवेच नाहीत तिथे विजेवर चालणारे पंखेही नाहीत. असा सर्व विजेशिवायचा कारभार पण त्यातही एक मजा आहे जी शहरात राहून मुळीच कळणार नाही. कोणत्याही पर्यटन प्रकारात सर्वात कमी तयारी न्यावी लागत असेल तर ती जंगलासारख्या ठिकाणी, काही जण याच्याशी सहमत होणार नाहीत पण खरं तर जिथं कोणतंही बंधन नाही आणि जिथे आपल्या असण्याला फारसे महत्वच नसतं तिथे शहरी जामानिमा नेण्याचं काही कारणच नसतं. नागझिराची गोष्टही काही वेगळी नाही उलट तिथे तर अशी बंधन नसण्यातही एक प्रकारच थरार वाटतो कारण नागझिरामध्ये भर जंगलाच्या मध्यात आजूबाजूला प्राण्यांची चाहूल असताना संध्याकाळ आणि रात्रीदेखील सोबत फक्त रॉकेलच्या वातीवरला लालटेनच असतो. अर्थात जंगल परिसराला डिस्टर्ब न करता खऱ्या जंगलात राहण्याचा फील घ्यायचा असेल तर याचीही तयारी हवीच आणि हेच तर खरं नागझिरा जंगलाचं आकर्षण आहे.
भरगच्च चांदण्यांच्या मऊसर् उजेडात अतिथीगृहासमोरच्या छोट्याश्या मोकळ्या मैदानात बसून जंगलातून येणारे प्राण्यांचे आवाज ऐकत गप्पांची ( अर्थात हळू आवाजातल्या ) महफिल जमवण्यातला आनंद काही वेगळाच आहे. भर जंगलात मध्यभागी (कोअर एरियात) आणि तळ्याकाठी राहण्याचा अनुभव घ्यायचा असेल तर नागझिरामध्ये जायलाच हवं. मध्यरात्रीनंतर हळूच खिडकीबाहेर समोर कंदिलाच्या प्रकाशात पाहिलं तर चरता चरता विश्रामकुंजापर्यंत आलेली हरणं,रानडुक्करं,सांबर असे काही प्राणी दिसतात. विश्रामकुंजाजवळच्या या हिरवळीच्या थोडसं उजव्या अंगालाच सुंदर तलाव आहे. अनेकदा तळ्याकाठी रात्री पाणी पिण्यासाठी येणाऱ्या प्राण्यांचीही चाहूल लागते. रात्री तळ्याच्या बाजूच्या खोलीत झोपायला आमच्यातल्या काही मुली घाबरल्या आणि आम्हाला खोली बदलायला लागली. त्यांनी खोली बदलणार का विचारल्यावर म्हटलं की हे म्हणजे नेकी और पूंछ पूंछ झालं की..मग नंतर तळ्याकडून येणारे आवाज ओळखण्याची स्पर्धा लावण्यात रात्र गेली.
अतिथीगृहाच्या मागे असलेला तळ्याचा काठ म्हणजे पक्षी निरीक्षणासाठी एकदम अप्रतिम निवांत जागा..इथं कोणत्याही झाडाखाली आरामात बसायचं आणि समोर तळ्यावर येणाऱ्या विविध पक्ष्यांच्या निरीक्षणात गुंतून जायचं. पक्षी अभ्यासकांसाठी तर ही खासच जागा आहे. ‘निलय’समोर असलेलं मध्यवर्ती तळं म्हणजे या जंगलातली चावडी आहे. कित्येकदा रानकुत्र्यांच्या शिकारी इथेच येऊन संपतात. रानकुत्र्यांनी केलेली अशीच एक चित्तथरारक शिकार आमच्या डोळ्यांदेखतच या तळ्यातच त्यांनी संपवली होती. ही लाईव्ह शिकार आमच्या टीमला पाहायला मिळाली. वरच्या डोंगराकडे गेलेल्या आमच्या अर्ध्या टीमने रानकुत्र्यांच्या टोळीला शिकारीच्या शोधात फिरताना पाहिलं होतं. त्याच टोळीने एक हरीण मादी आणि तिच्या पाडसाला हेरलं होतं. त्यांनाच पळवत पळवत तळ्याकाठपर्यंत आणून रानकुत्र्यांनी शिकारीचा दि एंड केला होता. नागझिराची युएसपी रानकुत्री आहेत याची डोळ्यादेखत खात्रीच पटली होती. असे शिकारीचे अनेक क्षण आम्हाला नागझिराच्या भटकंतीत अनुभवायला मिळाले.
महाराष्ट्रात ज्यांच्याविषयी अधिक लिहिलं गेलंय अशा जंगलांपैकी नागझिरा एक आहे. मराठीत मारुती चितमपल्ली, व्यंकटेश माडगुळकर, किरण पुरंदरे अशा काही लेखकांनी अभ्यास,संशोधन आणि मोठ्या मेहनतीनं नागझिरासंबधी अप्रतिम पुस्तकं लिहिली आहेत. नागझिराला जाऊ इच्छिणाऱ्यांनी ही पुस्तकं जरूर वाचावीत. ताडोबा किंवा कान्हा वगैरे सारख्या जंगलांच्या तुलनेत नागझिरा जंगलाचा विस्तार अगदीच लहानसा आहे, पण इथं वन्यजीवांचे वैविध्य एकवटलं आहे. वाघ, गवे,सांबर, हरीण, रानकुत्री , अस्वल, भेकर,बिबट्या असे अनेक प्राणी आणि शेकडो पक्ष्यांच्या जाती पाहायला मिळतात. तरीही देशातील इतर जंगलांच्या तुलनेत महाराष्ट्राच्या भंडारा जिल्ह्यातलं हे वैभव नागपूरपासून जवळ असूनही सरकार आणि पर्यटकांकडून दुर्लक्षित राहिलं आहे. मुळात महाराष्ट्रातल्या कुठल्याच जंगलाचं देशातल्या इतर अभयारण्यांप्रमाणे मार्केटिंग होताना दिसत नाही. टीव्हीवर येणाऱ्या ‘इनक्रेडीबल इंडिया’च्या जाहिरातींमध्ये गुजरात, मध्यप्रदेश, केरळ,गोवा आघाडीवर दिसतात. इतर ठिकाणीही उत्तरांचलचे जिम कॉर्बेट, मध्यप्रदेश मधलं कान्हा आणि बांधवगढ, आसामचं काझीरंगा, राजस्थानचं रणथंबोरसारख्या जंगलाचं भरपूर मार्केटिंग आणि जाहिरातबाजी होताना दिसते ( जे त्या त्या राज्यातले प्रवासी, टूर ऑपरेटर्स आणि राज्य सरकारचा पर्यटन विभाग करतात ) पण आपल्याकडे याबाबतीत सर्व आनंदच आहे.
गरुडाने( चेन्जेबल हॉक ईगलने ) केलेली शिकार देखील नागझिरामध्ये पहायला मिळाली. वास्तविक आम्ही भालुच्या शोधात चितळ मैदानाच्या पुढे गेलो होतो जो आम्हाला पुढे दिसलाच. इथल्या टाक्यावर भर उन्हामध्ये तुडुंब पाणी पिऊन सावलीला बसलेली ७-८ रानकुत्र्यांची एक टोळी पण आम्हाला भेटली. त्यानंतर झाडांच्या फांद्यांवर अगदी मिसळून गेलेला हा अत्यंत रुबाबदार गरुड आम्हाला दिसला. आमच्या गाडीच्या आवाजाला न घाबरता हा गरुड वेगात हवेतून काहीतरी घेऊन एका झाडाखाली उतरला. थोडं अधिक निरखून पाहिल्यावर कळलं की तो एक साप होता,इतका त्या सापाचाही रंग मातीशी मिसळलेला होता. या गरुडानं शिकारीचे तुकडे केले आणि त्यावर थोडी माती पसरली आणि तो पुन्हा झाडावर जाऊन बसला. बहुधा त्याला आमची चाहूल लागली होती. त्याला सोडून आम्ही पुढे निघालो. वाटेत एका छोट्याश्या तळ्यावर मगरीचं पिल्लू स्वतःला उन्हात शेकवत बसलेलं दिसलं.
जंगलात फिरताना अनेकदा जळालेल्या लाकडांचे काळेठिक्कर ओंडके लांबवरून पाहून अस्वल असल्याचा भास व्हायचा. अस्वलाच्या बाबतीत नागझिरा खूप लकी ठरलं. साकोली वॉच टॉवरच्या रस्त्यावर, गौरगल्ली, निलयच्या पुढील वळणावर, बंदरचूआ गेटवरून पुढे आतमध्ये अशी आमची अनेकदा भालुशी गाठभेट झाली. खरं तर निलयच्या पुढल्या रस्त्याला अनेकदा मादी अस्वल पाहिलं होतं पण ती नेहमी झाडांमध्ये पळून जायची. शेवटी तर अस्वलाच्या अश्या छुमंतर होत दिसण्याचाही कंटाळा आला होता. तरीदेखील अगदी निघायच्या दिवशी शेवटल्या सफारीपर्यंत अस्वलाचा शोध घेत आम्ही चितळ मैदानाच्याही बरेच आत पोहोचलो होतो आणि तिथल्या शेवटल्या टाक्यावर आमची आणि अस्वलाची गाठभेट झालीच. हा नर भालू आम्हाला पाहून अजिबात बुजला नाही उलट त्याने आरामात टाक्यावर पाणी प्यायले, चालता चालता जमिनीत खणून खाद्य मिळवलं आणि बरेच अंतर तो आम्हाला समांतर चालत राहिला पण तेवढ्यात समोरच्या वळणावरून एक खाजगी गाडी भरधाव येतानाचा आवाज त्यानं ऐकला आणि तो बाजूच्या रानात पळाला.
बंदरचूआ गेटवर अजून एक विलक्षण अनुभव पाहायला मिळाला. तिथं वानरांची टोळी बसलेली होती. आमच्या जीपचा घर्र आवाज आल्यावर सर्व माकडं झाडावर सुरक्षित ठिकाणी पळाली,पण या गडबडीत एक नवजात पिल्लू खालीच राहिलं. ते वर गेलेल्या आईकडे पाहून केविलवाण्या चेहऱ्याने चिं चिं चीत्कारू लागलं पण त्याची आई आमच्या जीपला पाहून खाली यायला घाबरत होती, तेवढ्यातच एका अनुभवी प्रौढ माकडिणीने एका झेपेतच त्या पिल्लाला जीप समोरून दूर केलं. वानरांच्या कुटुंबकाबिल्यात नाती कशी घट्ट असतात ते या निमित्तानं पाहायला मिळालं.
नागझिरा पर्यटन संकुलाजवळ फिरणारी माकडं जंगलातील इतर माकडांच्या तुलनेत कमी बुजरी आणि रानटी आहेत. पर्यटकांच्या जवळ वावरणाऱ्या या टोळ्यांमधले हुप्पे आणि तरुण नर पर्यटकांसमोर शक्तीप्रदर्शन करून दाखवतात तेव्हा पहायला मजा येते. आम्हीही असाच प्रकार पाहिला. एखाद्या डिस्कव्हरीसारख्या वाहिनीला शूट करून पाठवावा अशी अचाट कसरत एका वानराने करून दाखवली. संकुलाच्या आवारात एक पिंप पडलेले होते आणि बाजूला फलकाचे दोन खांब होते. त्यांचा वापर करून हा वानर अक्षरशः मल्लखांब खेळत होता. गम्मत म्हणजे प्रत्येक फेरी झाल्यावर तो विजयाच्या मुद्रेने पर्यटकांकडे पहायचा. त्याचा हा खेळ जवळपास १० मिनिटे चालला होता.
नागझिराचा विस्तार इतर अरण्यांच्या तुलनेत छोटेखानी असला तरी हाच त्याचा प्लस पॉईंट देखील आहे. कारण इथं राज्यातील इतर जंगलांमध्ये दिसणारे बहुतेक सर्व पशु-पक्षी आहेत आणि विस्तार कमी असल्याने ते समोर येण्याचे चान्सेसही अधिक असतात. अर्थात याला अपवाद फक्त वाघाचा आहे. वाघ हा तसा सहजासहजी म्हणजे ‘चला आलोच आहोत अभयारण्यात तर वाघ पाहूनच जाऊ’ अश्या वल्गनेत दिसणारा प्राणी बिलकुल नाही. पण नागझिरा आणि आसपासच्या चोरखमारा, उमरझरी, सोनेगाव गावांमधून असा थोडासा का होईना कॉरिडॉर इथल्या वाघांना उपलब्ध आहे आणि त्यामुळेच नागझिरा व्याघ्र अभयारण्यांच्या यादीत सामील आहे. लाईट्स नाहीत, मोबाईल रेंज नाही, टेलिफोन नाही,वर्तमानपत्रं नाहीत, शहरांचा वाण लागलेली गावं नाहीत अशा पूर्णपणे नैसर्गिक वन्य अधिवासात थोडक्यात शुद्ध अरण्यात राहण्याची संधी नागझिरा तुम्हांला देतं. शहरी सुखसुविधांना सरावलेली आमच्या सोबतची मुलं तिथं एक क्षणतरी काढतील की नाही याची शंका होती, पण नागझिराच्या जंगलानं अशी काही जादू मुलांवर केली की मुलं निघताना परत येण्याचे प्लान्स बनवू लागली होती.
कोणत्याही जंगलात जाऊन प्राणी पाहण्यासाठी शक्यतो हिवाळ्याचा उत्तरार्ध आणि उन्हाळा हे उत्तम कालावधी असतात. रानोमाळ भटकण्याची तयारी असली तरी विदर्भातल्या या नंदनवनात जाण्यासाठी तिथला कडक उन्हाळा आणि भयंकर थंडी या दोहोंना तोंड देण्याची तयारी ठेवूनच गेलेलं बरं. हळदु पॉइंटला गेल्याच महिन्यात एका वाघिणीने तीन छोट्या पिल्लांसह दर्शन दिलंय. रानातल्या झुळकेसारखी एव्हाना ही खबर नागझिराकडे कान-डोळे लावून बसलेल्या रानसरुंपर्यंत येऊन पसरलीय. चार-पाच महिने पाऊस झेलून रान पुन्हा एकदा घट्ट-मुट्ट झाले आहे. पर्यटकांचा इतके महिने वास आणि त्रास दोन्ही नसल्यामुळे रान आणि प्राणी दोन्ही बेफिकीरीत आहेत. प्राण्यांना त्यांच्या सहजवासात गुरफटून गेलेले असताना पाहण्याची हीच योग्य वेळ आहे. नंतर पुन्हा एकदा जंगल पर्यटकांनी गजबजेल आणि प्राणी अधिक सजगपणे वावरू लागतील.
Above article was published on 8th January 2012 in Marathi news daily 'Prahaar',link to published article:-http://www.prahaar.in/collag/53913.html
Way to Nagzira Wildlife Sanctuary, District-Gondiya,State-Maharashtra.
Nearest city to Nagzira is Nagpur and Bhandara in Maharashtra. Nagpur is well connected with domestic flights. Buses etc are available from Gondia,Bhandara,Sakoli,Tirora and Nagpur. Nearest railway stations are Nagpur,Gondiya,Bhandara road,Saundad and Tirora.