Translate

Sunday, May 1, 2011

जंगलच्या राजाची 'राजधानी'

                                                  
लांबलचक आणि अफाट पसरलेला अथांग इराई डोह थेट मोहर्लीपर्यंत सोबत करतो. जंगलाकडे जाणाऱ्या वाटेची दिशा दाखवली की जणू तो निश्चिंत होतो. विदर्भातल्या उन्हाळ्याला आता मनानं केव्हाच मागे टाकलेलं असतं आणि इराई डोहामुळे भुललेले मन आता पुढल्या रानभुलीसाठी तय्यार झालेले असतं. जंगलात बसलेला तारू देव आपल्यावर प्रसन्न व्हावा आणि मनासारखे प्राणी दिसावेत हि तुमची प्रार्थना एव्हाना त्याच्यापर्यंत पोचलेली असते. पहिल्याच टप्प्यात तेलिया डोहावर मगर दाखवण्यासाठी म्हणून गाडी विसाव्याला उभी राहते आणि उन्हामध्ये तेलिया डोहाच्या चमचमत्या पाण्याकडे पाहता पाहता कधीतरी तंद्री लागते आणि क्वचित मृगजळासारखे भासही होतात. डोहाच्या पलिकडल्या मातकट हिरवळीवर वाघ चालतोय असाही भास होऊ लागतो आणि बरेचदा हा भास खरादेखील ठरतो. तेलियाच्या रस्त्यावर आधी लागणाऱ्या चिचघाटातून जातानाही बाजूच्या काटेरी जाळीतून कोणीतरी आपल्याला समांतर चालत आपल्यावर नजर ठेवून असल्याचे जाणवते आणि अकस्मात त्या माणिक डोळ्यांचा मालक, बिबट्यावाघ तुमच्यासमोरच झेप घेऊन रस्ता क्रॉस करतो.
थोडी जिप्सी पुढं न्यावी तर (स्लोथ बेअर) काळीभोर केसाळ अस्वल मादी मोहाची फुले हुंगत हुंगत येताना दिसते. तुम्हाला पाहिल्यामुळे झाडावर चढण्याचा बेत तिने वरकरणी तरी रद्द केलेला असतो. पुढल्या वळणावरल्या टाक्यावर भेकराची मादी तहानेने इतकी व्याकूळ झालेली असते की जिप्सी पुढ्यात येऊन थांबली तरी ती दुर्लक्ष करते आणि चटचट पाणी पीत राहते.
इतक्या साऱ्या जंगलजादूनंतर एव्हाना ताडोबाच्या रानाची झिंग चढायला लागलेली असते आणि त्यात गाईड मोहाची फुले आणि टेंभूर्लीची फळं चाखायला देऊन अजून भर टाकतो. हे इतक्यावरच थांबत नाही कारण ताडोबाच्या जंगलानं खरे पत्ते अजून उघडलेलेच नसतात. या अरण्याचं वैशिष्ट्य म्हणजे हे अरण्य पर्यटन आणि फोटोग्राफीच्या दृष्टीने अजूनही 'रॉ' आहे. काही भागामध्ये वनखात्याच्या माणसांखेरीज दुसरं कोणी फारसं गेलेलंही नाही. त्यामुळेच इथल्या भ्रमंतीची मजा काही वेगळीच आहे. ६२५ चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर हक्क सांगण्याऱ्या या ताडोबाच्या भूलभूल्लैय्या जंगलात आम्हीदेखील तारू देवाची प्रार्थना करीत जिप्सीनं उभे-आडवे रस्ते धुंडाळत होतो.
यंदाचं वर्ष हे अंतरराष्ट्रीय वन वर्ष आहे हे माहित पडल्यापासूनच यावर्षीच्या भटकंतीचा शुभारंभ एखाद्या व्याघ्र प्रकल्पापासून करावा असा विचार डोक्यात होताच. त्यातच पुण्याच्या तरुणाईला जंगल भ्रमंतीची चटक लावण्याचा ध्यास घेतलेल्या रोहन तावरेच्या ‘ जिप्सीज आउटडोअर’ ग्रूपबरोबर सामील होण्याचे आमंत्रण मिळालंच होतं, मग म्हटलं महाराष्ट्रातलं हे वैभव पाहण्याची संधी का सोडा..आमच्यापैकी काहीजण अगदी पहिल्यांदाच जंगलात फिरण्याचा अनुभव घेत होते तर काहीजण अगणित वेळा जंगल वारी करून आलेले 'वारकरी' होते. नुकतीच व्याघ्र गणनेची आकडेवारी हातात पडली होती. वनांचं क्षेत्रफळ कमी झालेलं असलं तरी वाघांची संख्या वाढलेली असल्यामुळे राज्यातल्या या दुसऱ्या मोठ्या व्याघ्र प्रकल्पात जाताना हुरूप आला होता. सध्याच्या गणनेनुसार ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या 60 च्या वर गेल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. खातोडा गेटवरून एकावेळी २७-२८ गाड्या आत सोडल्या जातात. ताडोबा-मोहर्ली रेंजजवळच्या परिसरात अजून तरी कॉर्बेट किंवा बांधवगढप्रमाणे व्यावसायिक रिसोर्टनी आक्रमण केलेलं नाही. त्यामुळे M.T.D.C च्या विश्रामगृहावरच पर्यटक बरेचसे अवलंबून आहेत. ताडोबा- अंधारी टायगर रिझर्व देशातील एकमेव व्याघ्र प्रकल्प आहे जो पावसाळ्यातही पर्यटकांसाठी अंशतः खुला असतो मात्र पावसामुळे काही रस्ते बंद ठेवण्यात येतात . ताडोबाला जाणार असाल तर M.T.D.C चं विश्रामगृह उत्तम पर्याय आहे. मोहर्ली गेटच्या अगदी जवळ राहण्याचे हेच ठिकाण आहे जे रिझनेबलदेखील आहे. इंटरनेटवर पर्यटनविषयक माहिती देण्याऱ्या काही प्रसिद्ध संकेतस्थळांवर या अतिथीगृहाविषयी खराब रिव्ह्यूज लिहून पर्यटकांची दिशाभूल करण्यात आली आहे , पण ते खरे न मानता प्रत्यक्ष जाऊन अनुभव घ्यावा असा सल्ला आहे. पांढरपवनी, तेलिया,येनबुडी, काटेझरी, वसंतबंधारा अशा काही भागांखेरीज या अभयारण्यातले आणखी काही रस्ते पर्यटकांसाठी खुले करावेत अशी मागणी इथल्या गाईडसनी केलीयं. पण अरण्याचा खूपसा भाग अजून 'माणसाळलेला' नाही आणि हेच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचं मोठं आकर्षण आहे. पर्यटकांचा त्रास त्यामानाने कमी आणि वन्यप्राणी दिसण्याच्या मुबलक शक्यतांमुळे national geographic सारख्या वाहिन्यांच्या टिम्स इथे शूटिंगसाठी तळ टाकून बसलेल्या दिसतात.
प्राणी हमखास दिसतील अशी अपेक्षा न बाळगता गेलात तर ताडोबा अभयारण्यासारखा दुसरा खजिना राज्यात नाही. अपवाद फक्त सह्याद्रीचं जंगल आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा.
इथल्या प्रत्येक वळणावर, प्रत्येक रस्त्यावर, जिप्सीच्या आवाजानं सावध होऊन कान टवकारत, उड्या मारत चौखूर उधळणारे, इतरांना सावध करणारे, प्रवासी आल्याबद्दल नापसंती दर्शवणारे, जाळीतून दबक्या पावलांनी आतल्या जंगलात नाहीसे होणारे , गवताळ कुरणाच्या रंगात मिसळून लपणारे, डोहाच्या पाण्यातून नजर रोखणारे असे शेकडो पशु-प्राणी भेटतात . ताडोबाचं हे जंगलबुक खरेच अदभूत आहे. अर्थात या सर्वाना पाहण्यासाठी धीर आणि संयम हवाच.
आम्ही असाच पेशंस ठेऊन राहिलो आणि काटेझरीत एका भल्याथोरल्या नर वाघानं आम्हांला मनसोक्त दर्शन दिलं. काटेझरीत वाघ बसल्याची बातमी सकाळीच लागली होती आणि मग वाघ पाहण्यासाठी उत्सुक अश्या साऱ्यांनीच तिकडे जिप्सी वळवल्या. समोर २०-२५ गाड्या असताना हा वाघ आरामात जाळीत लोळण घेत दुपारची वामकुक्षी घेत होता. शेवटी त्याच्या विश्रांतीत फारसा व्यत्यय न आणता त्याला रामराम करावा लागला. पण त्याचवेळी तेलिया डोहावर वेगळेच नाट्य घडले होते. डोहालगतच्या हिरवळीवर बसून वाघ-वाघिणीच्या जोडीनं मनमुराद टाईमपास केला होता आणि तिथे असणाऱ्या एका पर्यटक जोडप्यासाठी हा लग्गा ठरला होता. या जोडीचं फोटोसेशन करताना त्यांनी क्यामेराची मेमरीकार्ड्स अक्षरशः रिती केली होती..
पण जंगलात असेचं चालतं . धावत्या जिप्सीतून नजरेला अनेक आकार दिसत असतात. जाळीमागे कोणीतरी नक्कीच दडलंय असे भास होत राहतात. कधी झाडामागून कोणीतरी पळालं असं वाटून जातं. हिरव्या गर्द झाडांमधून तऱ्हेतऱ्हेचे आकार उगाचच दिसत असतात. आमच्यासमोर हिरव्या-पिवळ्या जाळीमधून बिबट्या अवतरला तो क्षणही असाच भासमयी होता. पण त्याची ऐटबाज सावध टप्प्याटप्प्याची चाल पाहून आम्ही भानावर आलो. दिवसा फारसा दृष्टीला न पडणारा बिबट्या दिसला आणि त्यावेळी वाघ दिसण्यापेक्षाही जास्त आनंद झाला. ताडोबाच्या सफरीत तीन वाघ पाहून झाले असल्यामुळे बिबट्या हा सर्वस्वी अनपेक्षित बोनस होता. मात्र बिबट्या दिसल्याचा आनंद आम्ही ताडोबाहून परतल्याच्या दुसऱ्याच दिवशी आलेल्या एका बातमीनं हिरावून घेतला. अष्टभुजा गावाजवळ बिबट्याच्या एका तहानलेल्या ६ महिन्याच्या बच्च्याला गावकऱ्यांनी अमानुष रीतीनं मारलं. पण या परिसरात अश्या घटना नव्या नाहीत असं आमच्याबरोबर असलेल्या आणि ‘वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडिया’मध्ये फील्ड ऑफिसर असणाऱ्या आदित्य जोशीनं सांगितलं. त्याच्या मते अश्या प्राण्यांना पकडून त्यांना सुखरूप त्यांच्या निवासात सोडण्यासाठी वनरक्षकासोबत प्रशिक्षित लोकांचीही गरज आहे. अश्या प्रशिक्षित लोकांची rapid response team, अत्याधुनिक उपकरणं असलेलं मोबाईल व्हेट वाहन घेऊन कोणत्याही गावात जाऊ शकेल आणि त्यामुळे अश्या दुर्दैवी घटना टळतील.
गेल्याच वर्षी ताडोबामध्ये काही सिमेंटची पाणटाकी बांधण्यात आली होती. बांधताना रस्त्याजवळ बांधल्यास त्यामध्ये tanker नं पाणी भरणं सोपं जाईल या विचारानं ही टाकी रस्त्यालगत बांधण्यात आली होती. पण एकदम रस्त्याला लागून असल्यामुळे प्राणी तिथे यायला बिचकतात आणि तहानलेलेच राहतात. त्यामुळेच कधी कधी शिकारी प्राणी त्यांच्या तहानलेल्या सावजापाठोपाठ गावात शिरतात किंवा स्वतःदेखील पाण्यासाठी गावाच्या आसपास येतात. अश्या वेळी प्राण्यांचा हकनाक बळी जाण्याचा मोठा संभव असतो. असे प्रसंग घडतात हे लक्षात आल्यामुळेच ही पाणटाकी थोडी आतल्या बाजूला बांधण्याचे काम सुरु आहे. ताडोबाच्या क्षेत्रात इराई, ताडोबा, तेलिया, खातोडा असे एकूण २४ छोटे-मोठे तलाव आणि पाणझरे आहेत. परंतु उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याचं मोठं दुर्भिक्ष्य निर्माण होते आणि प्राण्यांची अगतिकता उघडी पडते.
देशातल्या एकूण ३९ टायगर रिझर्वपैकी ताडोबा-अंधारी हा महाराष्ट्रातला एक व्याघ्र प्रकल्प. ताडोबामध्येही यंदा वाघांची संख्या वाढलीये. महाराष्ट्रानं 'टायगर कॅपिटल'चा किताब यंदा मध्यप्रदेशकडून हिरावून घेतलाय. त्यामुळे केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी नागपूरला 'टायगर कॅपिटल' म्हणून विकसित करण्याचं आश्वासन दिलंय. इथं आसपास ६० हून अधिक गावं आहेत. लोकसंख्या वाढतेय आणि जंगलाचं क्षेत्रफळ कमी होतंय. इथले टायगर कॉरीडोर अवैध कोळसा खाणींमुळे आधीच धोक्यात आलेत. पण या सर्वावर मात करून ताडोबा-अंधारी टायगर रिझर्वच्या वाट्याला अधिक सुधारणा येतील अशी आशा आहे.
ताडोबा-अंधारी टायगर रिझर्वमध्ये आज वाघांची संख्या 69 च्या आसपास आहे , ज्यात २५-२८ बछडे आहेत. पण वाघाखेरीज इथं बर्डींगही अप्रतिम होते. पक्षीप्रेमींसाठी तर ताडोबा अभयारण्य म्हणजे तीर्थस्थानच आहे. .चेन्जेबल हॉक-इगल , क्रेस्टेड सर्पंट इगल, इंडियन रोलर (नीलकंठ) , इंडियन पिटा, व्हाइट ब्रेस्टेड किंगफिशर, ग्रीन पिजन, इंडियन ग्रे होर्नबील, जंगल फाउल असे नानाविध पक्षी आढळतात. किंगफिशर, river lapwing, white heron, serpent eagle, rocket tailed drango,flame backed woodpecker, white shouldered kite, green pegion अश्या कित्येक मनमोहक रंगांच्या पक्ष्यांची इथं मांदियाळी आहे. त्याशिवाय मगर, गवे, हरणं, नीलगाय, सांबर, रानटी कुत्रे, साळींदर, चंदेरी पाठीचे अस्वल अश्या प्राण्यांचेही हे आश्रयस्थान आहे. डिकेमाली, बेहडा, हिरडा, बेलफळ, अर्जुन अश्या अनेक वनौषधी या रानात आहेत. नुसतं अरण्यात जरी भटकायचं म्हटलं तरी आठवडा पुरा होणार नाही. अश्याच मोठ्या भटकंतीनंतर आपोआपच इथल्या टेंभूर्लीच्या झाडाकडे जाणाऱ्या वाटा तुम्हाला पाठ होतील आणि डोक्यावरून उडालेला पक्षी नीलकंठ होता की सोनेरी पाठीचा सुतार हे ओळखण्यासाठी तुम्हाला गाईडची गरज भासणार नाही. ताडोबाच्या जंगलाचा तारू देव तुम्हाला प्रसन्न झालेला असेल !

Link for published article :  http://www.prahaar.in/collag/40898.html