Translate

Wednesday, September 6, 2017

सह्यकड्यांवरील अजस्त्र फुले

भटकंतीची आवड असणा-या प्रत्येकालाच आपल्या आयुष्यात एकदा तरी एखादा जबरदस्त आणि अविस्मरणीय असा क्षण यावासा वाटतो, ज्याला हल्लीच्या स्लँगमध्येवॉवमुमेंट म्हणतात. तसाच क्षण इथे सापडला होता. परिभाषा वेगवेगळी असली तरीही मोक्षातही कदाचित असाच आनंद असावा. साता-याच्या वेशी पालथ्या घालायला निघालेल्या मला हा स्तिमित आणि आनंदित करणारा अनुभव आला पुसेगावच्या पवनचक्क्यांच्या परिसरात.
                          


पावलं हिरवाईत माखवून चालत राहावं की डोक्यावर पसरलेल्या निळाईत नजर गुंतवून हरवून जावं अशा संभ्रमातच त्या पठारावर मी चालत होते. निसर्गाने एवढ्या रंगांची उधळण आजूबाजूला केली होती की बोट लावून एखादा रंग आपल्या हातावरही घेता येतो का हे पाहावे असं वाटत होतं. मनाच्या या तंद्रीला ब्रेक लागला तो वा-याच्या घुमदार आवाजाने. हा आवाज आणि वेग आपण नेहमी अनुभवतो तशा वा-याचा नव्हता, सह्यकड्यांमधून वाहणा-या या झंझावाताशी स्पर्धा करू शकेल असं इथे काहीच नव्हतं. अडसर होता तो फक्त पवनचक्क्यांच्या भव्य पात्यांचा, ज्यांच्या मंद लयीत बिलकूल न अडकता वा-याचं घोंघावणं इथे या डोंगरावर कायम सुरूच असतं. पावसाळा असो वा उन्हाळा, इथल्या पवनरागाची पट्टी कायमच काळी पाच. वा-याचा हा जोरदार मारा अंगावर घेत, सांभाळत पवनचक्कीच्या स्तंभाकडे पाहावं तर त्याचा शेवटच दिसेना, इतके उंच असे हे आभाळाची माया गोळा करणारे स्तंभ. त्या अवाढव्य पंख्यांच्या पात्यांकडे पाहाता पाहाता दृष्टिभ्रम होऊ लागला. तो भव्य स्तंभच जणू वा-यावर डोलतो आहे असं वाटू लागलं. पांढ-या ढगांच्या व निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर हा भास अधिकच जाणवत होता. खूप वेळ पाहू लागल्यावर चक्कर येते की काय असंही वाटलं. मग नंतर समजलं की स्तंभ झुलतोय हा भ्रमच होता आणि वेगात चाललेल्या ढगांमुळे तो भास अधिकच दृगोच्चर होत होता. स्तंभ वा-यामुळे झुलत नसला तरी पंखा मात्र हलत होता व त्यामुळेच तर पवनऊर्जा निर्माण होत होती. जिथवर नजर पोहोचत होती त्या सर्व डोंगरांना पवनचक्क्यांनी दत्तक घेतलेलं दिसत होतं. पावसाळ्यात अळंब्या जशा जागोजागी उगवतात तशी आसपासच्या सर्वच डोंगरांवर पवनचक्क्यांची ही प्रचंड मोठाली अळंबी ठिकठिकाणी उगवलेली दिसत होती. आस्ते कदम..एक ताल अशा लयीत सर्वच पंख्याचं मंद लयीत फिरणं सुरू होतं. जी पवनचक्की लांबवरून इवलाली वाटत होती, ती नक्कीच कल्पनेपेक्षा अवाढव्य असणार हे पुढ्यातल्या नमुन्यामुळे चांगलंच लक्षात आलं होतं                                       
                     

                  

वनचक्क्या पाहण्याचा निर्णय घेतल्याचं कल्पनेपेक्षाही अधिक सार्थक झालं होतं. भटकंतीची आवड असणा-या प्रत्येकालाच आपल्या आयुष्यात एकदा तरी एखादा जबरदस्त आणि अविस्मरणीय असा क्षण यावासा वाटतो, ज्याला हल्लीच्या स्लँगमध्येवॉवमुमेंट म्हणतात. तसाच क्षण इथे सापडला होता. परिभाषा वेगवेगळी असली तरीही मोक्षातही कदाचित असाच आनंद असावा. साता-याच्या वेशी पालथ्या घालायला निघालेल्या मला हा स्तिमित आणि आनंदित करणारा अनुभव आला पुसेगावच्या पवनचक्क्यांच्या परिसरात. लहानपणी कितीतरी गोष्टींचं आपल्याला आकर्षण असतं. विशेषत: पुस्तकातल्या चित्रांबद्दल तर हे कुतूहल जास्तच असतं. माझ्यासाठी त्यातलं एक चित्र होतं पवनचक्कीचं. मोठं झाल्यावर पवनऊर्जेसाठी पवनचक्की उभारली जाते वगैरे सर्व शास्त्रीय माहिती मिळाली. आजपर्यंत कर्नाटक, मध्यप्रदेश, तामिळनाडू वगैरे प्रांतात पवनचक्क्या पाहिल्या होत्या पण त्या अत्यंत दूरवर असणा-या. परंतु प्रत्यक्षात अगदी जवळून पवनचक्की पाहायची संधी मात्र आता सातारा परिसरात फिरताना मिळाली. अर्थात त्यालाही निमित्त झालं ते मी जिथं उतरले होते, त्या फलटणच्या जॅकसन इन्स हॉटेलमुळे. त्यांचे काही पाहुणे पवनचक्की पाहायला जाणार होते, अनायासे गाडी निघणारच होती. मग त्यांनी आमंत्रण दिल्यामुळे त्यांच्यासोबत मी देखील निघाले. पवनचक्क्यांचा प्रदेश म्हणून सातारा जिल्हा आधीच विख्यात आहे तेव्हा ही आयती चालून आलेली संधी सोडता येणं काही शक्य नव्हतं                           

फलटणवरून श्रीक्षेत्र माहुलीला पोहोचण्याआधी पुसेगावच्या टेकड्यांवर ही वायूनगरी उभी राहिलेली दिसते. दूरवरूनच हे पांढरे वायूदूत दिसू लागतात. पावसाळा असल्याने हिरवीगार शेते पाहात, काही ठिकाणी विकायला आलेल्या भाज्या बाजूच्या शेतमळ्यांचे मालक शेतकरी पाहात जाणं सुखकर होतं. रस्ताही उत्तम आहे. पुसेगावला जाणा-या रस्त्याच्या दुतर्फा हे वायूसैन्य पसरलेलं दिसत होतं. दूरवरल्या एक पवनचक्कीकडे बोट दाखवून तिथवर पोहोचायचं आहे असं सांगण्यात आलं होतं. तिचा रस्त्यावरून दिसणारा पिटुकला आकार पाहाता अजून एक तास तरी लागणार हे निश्चित होतं; पण मन अधीर झालं होतं. पवनऊर्जा प्रकल्पाला यापूर्वी कधीही भेट दिली नव्हती. त्यामुळे उत्सुकता होती. कोणतंही प्रदूषण उत्पन्न करता निर्मित होणारी पवनऊर्जा ही आपल्यासाठी एक देणगीच आहे. आपल्यापर्यंत येणा-या वीजेपैकी काही वाटा या पवनऊर्जेतूनच येतो. बारामती, पुणे, सातारा परिसरात ही वीज पुरवली जाते. खरं तर कधी इंटरनेटवर देखील पवनचक्कीचे व्हिडिओ पाहिले नव्हते. अचानकच हे घडून येत होतं. मघापासून दूरवर मोठाल्या पंख्यांची फक्त पाती जी दिसत होती, त्यांना आता खांबही फुटले. पंख्याचा आकार अजस्त्र जाणवू लागला. जिकडे नजर जाईल तिकडे पवनचक्क्यांचे हे पंखेच दिसत होते. अखेर गाडी वळणं वळणं घेत एका डोंगराच्या सपाटीवर जाऊन थांबली आणि आम्ही टेकडी चढून वर गेलो. तिथून जे दृष्य नजरेस पडलं त्यामुळे आम्ही खरं तर काही क्षण गप्पगारच झालो. अक्षरश: गप्प आणि गार झालो याचं कारण म्हणजे सभोवतालचा अप्रतिम नजारा आणि तिथला तुफान थंडगार वारा. त्यातच मध्येमध्ये पाऊसही शिंतडत होता. डोंगरावर वारा इतका अफाट होता की तिथे आमच्या खाण्यापिण्यासाठी हॉटेलनं मांडलेलं टेबलही कलंडत होतं. वास्तविक या पवनचक्क्यांच्या अगदी जवळ जाण्याची परवानगी काढावी लागते, जी जॅक्सन इन्सच्या मंडळींनी आमच्यासाठी काढली होती. कारण थोड्याच अंतरावर खालच्या बाजूला पवनचक्कीच्या मालक संस्थेचं, कॉन्टिनम विंड एनर्जीचं ऑफिस होतं. तिथल्या सुरक्षारक्षकांची या डोंगरावर नेहमी देखरेख असते त्यामुळे पवनचक्की असणा-या परिसरात मुक्त प्रवेश करता येत नाही. अर्थात आमच्याकडे परवानगी असल्याने आम्हाला कोणीही आडकाठी केली नाही आम्ही अक्षरश: वारा पिऊन चौखूर उधळलेल्या एखाद्या वारूसारखेच त्या डोंगराच्या सपाटीवर बागडू लागलो
                          


बुद्धिबळाच्या हिरव्या पटावर शेकडो पांढ-या सोंगट्या मांडून ठेवल्या असाव्यात असं पठारावरून पाहताना वाटत होतं. अर्थातच या परिसराचा एरिअल व्ह्यू पाहिला तर नक्कीच असंच दिसत असणार. चहूबाजूच्या या सह्यडोंगरांवर विविध कंपन्यांच्या पवनचक्क्या उभारलेल्या दिसत होत्या. पवनचक्कीच्या  स्तंभापाशी पोहोचल्यावर त्याच्या अजस्त्रपणापुढे आपण खरंच डोंगळ्याइतके भासू लागतो. आकाशातल्या ढगांना जणू स्पर्शच करणारे ते पोलादी खांब. डोंगरावरून टेकड्यांची उतरण होती. हिरवेगार पठार होतं आणि मुक्त मेघडंबरींनी भरलेलं आकाश होतं. अशा बेफाट आणि भन्नाट वातावरणातून पाय निघता निघत नव्हता. अशा बेलगाम वा-यामुळेच तिथं पवनचक्की प्रकल्प असणं हे साहजिकच आहे. वास्तविक सातारा जिल्हाच मुळात पवनचक्क्यांचा प्रांत म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात इथेच फक्त पवनचक्क्या आढळतील, चाळकेवाडी, पुसेगाव, वणकुसवडे, चिखली, कास, पळशी, चिलारवाडी अशा ब-याच गावांनजीक हे प्रकल्प उभे आहेत. अशा मदमस्त वा-यामुळे सह्याद्रीच्या डोंगररांगांमुळे जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुबलक पाऊस पडतो मात्र त्याचवेळी साता-याच्या पूर्वेचा प्रदेश हा नद्यांकाठी असूनही दुष्काळग्रस्त, अशी विसंगती आढळते. साधारण दशकभरापूर्वी अशाच पवनचक्क्यांना राज्यातल्या काही भागांमधून विरोध झाला होता हे तिथे गेल्यावर आठवलं. खरं तर पवनचक्की आणि अवर्षणाचा शास्त्रीय दृष्ट्या संबंध नाही, मात्र जनमानसात मतप्रवाह एकदा का तयार झाले की ते बदलणं हे खूप कठीण असतं. विंडमिल टूरीझम किंवा पवनचक्की पर्यटनाविषयी अद्यापही आपल्याकडे अनुकूल वारे वाहताना दिसत नाहीत. त्या दृष्टीने फलटणच्या जॅक्सन इन्स हॉटेलतर्फे त्यांच्या पर्यटकांसाठी सुरू करण्यात आलेला प्रयत्न खूप चांगला वाटला. ठोसेघरला धबधबा आहे, तिथून जवळ असणा-या चाळकेवाडी विंडमिल फार्मलाही काही पर्यटक भेट देतात. पवनचक्क्यांमागील राजकारण आणि अर्थकारण काही काळाकरता बाजूला ठेवून निव्वळ पर्यटनाच्या दृष्टीने पवनचक्की प्रकल्पांच्या साईट्सना भेट दिली तर सर्वोत्तम नजारा पाहायला मिळतो.चाळकेवाडीला जा किंवा पुसेगावला जा, पण पवनचक्क्यांचा हा प्रदेश आवर्जून पाहण्यासारखा आहे एवढं मात्र खरं!
                           

फलटण तालुक्याच्या सीमारेषेवरून सह्याद्रीची महादेव रांग धावते. तालुक्याच्या सखल भागाच्या दक्षिण अंगाने ही रांग जाते. पूर्व-पश्चिम धावणा-या या रांगेच्या वाटेतच पुसेगाव व श्रीपालवणच्या डोंगरमाथ्यांवरले पवनचक्की प्रकल्प पाहाता येतात. त्याही पुढे गेलं की वारुगडाला जाता येतं. फलटण-पुसेगाव-कुळकजाई-श्रीपालवण-वारुगड असा हा मार्ग आहे. फलटण हे साता-यापासून सुमारे ६७ कि.मी अंतरावर तर पुण्यापासून सुमारे ११० कि.मी दूर आहे. पुण्याहून सासवड-जेजुरी-निरा-लोणंद या मार्गे तसेच साता-याहून वडुथ-वाठार ( रेल्वे स्टेशन)- आदर्की या मार्गे फलटणला बसनेही जाता येते. फलटणला जाण्यासाठी पुणे व सातारा दोन्ही शहरातून राज्य परिवहन मंडळाच्या बसेसची चांगली सोय आहे. मुख्य म्हणजे रस्तेही चांगले आहेत. मुंबईवरून फलटण सुमारे साडे पाच तास तर सातारा सहा तासावर आहे.