Translate

Tuesday, September 27, 2016

बाव-या मनासाठी

कोणत्याही प्रवासात असताना नेहमीच एक प्रश्न पडतो किंबहुना तो पडलाच पाहिजे की, आपण इथे का आलो आहोत? हा प्रश्न किंवा इतरही काही प्रश्न तुम्हाला प्रवासात पडत असतील तर तुमचा आत्मसंवाद सुरू आहे समजा. तो सुरू असेल तर तुम्ही निव्वळ पर्यटक असण्याच्या पुढच्या पायरीवर पोहोचता.


                             

                                          

इयरफोनमधून सुरू असणा-या रेडिओची खरखर वाढत जाते, निवेदिकेचा आवाज कापरा होत होत हळूहळू बंदच होतो, कानातला विरंगुळा संपलाय म्हटल्यावर नजरेला तरी काही सापडतंय का ते पाहायला आपण बाहेर पाहू लागतो. झरझर बाहेर दिसणारं सर्वकाही आपल्याशी छत्तीसचा आकडा धरून उलटं पळत जातं, स्थिर वस्तूही हलत असल्याचा भास होऊ लागतो, नजर कुठे टिकवून राहताच येत नाही.
एखाद्या घराच्या भिंतीवर काय लिहिलंय वाचू म्हटलं तरी अक्षरं भिंतीवरून उडी मारून गायब होतात आणि गाडीला वेग आल्याचं एकदा मनाला पटल्यावर आपण आपलं हलतं डोकं आणि डोळे यांना नॉर्मल ठेवण्याचा प्रयत्न करू लागतो. सिमेंटच्या घरांचे ठोकळे मागे पडत जातात, अधूनमधून दिसणारे शेतीचे कोवळे लुसलुशीत तुकडेही विरळ होत जातात, मोकळी जमीन सुरू होते.
विस्तीर्ण जमीन, नदी, जमिनीसोबत धावणारं आकाश, झाडं, माळरानं, घाट, द-या, डोंगररांगा, कपारी, वळणांचे रस्ते, असा सारा प्रदेश सुरू होतो आणि आपली काही काळापुरती सगळ्या शहरी जगापासून सुटका होते. मोबाईलवर रेंज येतेय का याची दहावेळा चाचपणी केली जाते. अखेर त्याचा उपयोग निदान फोटोसाठी तरी करू असं म्हणून आपण बाहेरच्या दृश्यात मन रमवतो.
इतकं शांत राहायची सवय नसते ना आपल्याला, मग मन ‘चाळ’करी होऊ लागतं. कोणीतरी मुद्दामहून दूर लोटल्यागत आपण अस्वस्थ होत असतो. (इथं प्रवासात निवांत झोप येणारे सुदैवी). काय हवं असतं, काय करावं हे कळत नसतं. सहप्रवाशांशी बोलून झालेलं असतं, खाऊनपिऊनही झालेलं असतं, मोबाईलमधली नेहमीचीच गाणी ऐकण्यात आता रस उरलेला नसतो, हातातल्या पुस्तकापेक्षा बाहेरचा अनोळखी प्रदेश खुणावत असतो.
आपलं मन एक्झिट झोनमध्ये शिरलेलं असतं. प्रवासातली ही अवस्था अटळ असते, मग तुम्ही कुठेही असा, जहाजात, विमानात, रेल्वेत किंवा चारचाकी वाहनात. ही अस्वस्थता नसते, तर ती सुरुवात असते. तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून तुम्ही नवं काही शोधायला, पाहायला, स्वीकारायला, जाणून घ्यायला, अनुभवायला बाहेर पडलेले असता. पुढे काय होणार याची पुरेशी माहिती नसते. तरीही छान वाटत असतं. त्या छान वाटण्याचीच ही सुरुवात असते.
मनाला घट्ट चिकटलेले विविध प्रकारच्या संवादांचे तुकडे वा-यासोबत बाहेर पडून उडून जातात. हे संवाद कोणाकोणाशी, कोणकोणत्या भावनांनी झालेले असतात. जसे ते दूर जातात, आपल्याला हलकं वाटू लागतं. सर्व ओझी डोक्यावरून बाजूला काढून ठेवल्यासारखी वाटतात.
एव्हाना मोबाईल बंद असला तरी त्याची गरज आहे असं वाटणं एकदमच कमी झालेलं असतं. खरं तर आपल्या गरजा अशा कमीच कशा राहतील असा नवाच विचार येऊ लागतो. गरजांसोबत त्या पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारी माणसं व त्या अनुषंगाने येणारे संवाद व इतर गोष्टीही कमी करता येतील का याचा विचार सुरू होतो. वाहनातून एकीकडे प्रवास सुरू असतो आणि मनातल्या विचारांनीही वेग घेतलेला असतो.
सुदैवच म्हणायचं की आपल्या जबाबदा-या, चिंता, काळज्या, विवंचना, अडचणी यांना व्यक्तीस्वरूप नाही, नाहीतर बाहेर जाताना त्यांनाही बांधून घेऊन जाणं भाग पडलं असतं! आपला आपल्याशी संवाद सुरू झालेला असतो, खूप वेगळं वाटत असतं; पण समाधानही वाटत असतं. प्रवासाला बाहेर पडण्याचा आपला निर्णय योग्यच होता हे मनाला सांगितल्यावर तेही सुखावत असतं.
सुंदरबनमधल्या एका नीरव रात्री माझ्या मनाने मला असंच सांगितलं होतं. ब्रह्मपुत्रा आणि गंगेच्या त्या विस्तीर्ण पात्रात (समुद्रच तो, कारण इथं मच्छीमारांच्या बोटी बरेचदा भरकटतात!) अतिशय संथ पाण्यात बोटीच्या डेकवर एकटयानेच चांदण्याखाली आरामात झोपले होते, रात्रीचे दोन वाजले होते बहुदा.
किती का वाजलेले असेनात, अशा नितळ शांततेत तुम्हाला भान राहत नाही. हो, एवढी गूढरम्य शांतताही आपल्याला गुंगवून टाकू शकते. मग कधी भासही होतात. अशावेळी मनावरचा हक्क सोडून देण्यासाठी देखील खूप पराकाष्ठेचे प्रयत्न करावे लागतात. तरच त्या क्षणाशी आपण एकरूप होऊ शकतो. आम्ही गावांपासून, किनाऱ्यांपासून चांगलेच दूर आलो होतो. त्यामुळे तिथले आवाजही नव्हते.
यापेक्षा अप्रतिम जगात काही नसावं असं त्याक्षणी मला वाटलं. ही भावना तुम्हालासुद्धा अनुभवता येऊ शकते किंवा तुम्ही अनुभवली देखील असेल. असं म्हणतात की प्रवासाचं कधी ध्येय ठेवू नये, जे दिसतंय ते मनात उमटवत जावं, साठवून घ्यावं. त्यामुळे मी ब-याच ठिकाणी असे क्षण अनुभवले आहेत. त्यात कॉर्बेटमधील रामगंगेचा काठ होता, दांडेलीमधलं जंगल व प्राचीन वृक्षराजीत लपून गेलेली दरी होती, धरमशालेतलं त्रियुंडचं पठार होतं, अशा काही जागा होत्या, जिथे मी माझं मन सोडून आले.
आपण प्रवासाला बाहेर का पडतो तर आपल्याला रोजच्या रहाटगाडग्यातून विरंगुळा हवा असतो, विश्रांतीचे चार क्षण पाहिजे असतात. शरीराला आरामाची आवश्यकता असते, त्याहूनही जास्त ती मनाला असते. याच मनावर, मेंदूवर आपण कारण-अकारण अनेक ओझी रोज रोज चढवत असतो.
हीच ओझी, बंधनं उतरवून टाकण्यासाठी प्रवास हे एक अतिशय योग्य निमित्त असतं. त्यातून तुम्हाला एकटयाने असे काही क्षण काही घालवत, स्वत:शी संवाद करायची संधी मिळाली तर ती मुळीच हातची घालवू नका. तुमच्या आवडीचं शहर, गाव, ठिकाण कोणतंही असू देत, मग ते पठार असू देत, किल्ला असू देत, सागरकिनारा असू देत किंवा डोंगर असू देत, तुम्हाला निर्विकार होता येईल अशी एखादी जागा नक्कीच तिथे असेल.
त्यासाठी खूप लांबच, एकांतात गेलं पाहिजे असं नाही. एखाद्या छानशा नदीकाठी बसूनदेखील तुम्ही हा संवाद सुरू करू शकता. ज्यांना प्रवासाची आवड आहे, कंटाळा येत नाही अशांसाठी प्रवासासारखा दुसरा गुरू नाही. मग तुमच्या पायाखालची जमीनच तुमचं गुरुकुल बनतं. तुमची नेहमीचीच नजर, तीही चौकटीतून बाहेर पडते.
निर्बुद्धासारखे एका चाकोरीत धावणारे आपण, प्रवासात असताना तृषार्त होऊन फिरतो. आपल्याभवतीचं जग हे असं आहे याची नव्याने जाणीव होऊ लागते. आत्मसंवाद झाल्याने आयुष्यात काय हवं आहे, काय नको, काय चुकतंय, आपली दिशा कोणती याचं भान येऊ लागतं. खरं तर प्रवास हे केवळ निमित्त असतं, पण पायाखालची वाट सोडल्याशिवाय काही उत्तरं मिळत नसतात. तेव्हा तुम्हीही शोधा असंच एखादं निमित्त !
Previously published in 'Prahaar' newspaper- http://prahaar.in/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/