कारवारवरून मडगावला येत असताना आम्ही ठरवलं की वाटेत लागणा-या काबो दि रामा किल्ल्याला भेट द्यायची. हा सुमारे ३०० वर्ष जुना किल्ला आजही पर्यटकांचं आकर्षण आहे. गोव्यातला हा सर्वात जुना किल्ला असला तरी खूप दुर्लक्षित देखील आहे.
गोव्याचा काबो दी रामा किल्ला पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. मडगावला जाणारे लोक आवर्जून इथे येतात. वास्तविक किल्ल्यात आज सामान्य पर्यटकांनी मुद्दामहून जाऊन पाहावं असं काहीच उरलेलं नाही, मात्र आपल्याकडे प्रसिद्ध स्थळांना भक्तिभावाने भेट देण्याची जी पर्यटकी परंपरा आहे, तिच्यामुळेच या किल्ल्यावरही आज पर्यटकांची पावलं उमटत असतात. हे या किल्ल्याचे सुदैवच म्हणावे लागेल.
अनेक पर्यटक किल्ल्यावरून दिसणारा सागराचा अत्यंत रमणीय नजारा पाहण्यासाठी इथे येतात. हा दक्षिण गोव्यातला सर्वात मोठा व जुना किल्ला. कर्नाटकातून आलेला राजा सोंदा यांचं या किल्ल्यावर स्वामित्व होतं, परंतु १७६२-६३ च्या सुमारास पोर्तुगीजांनी हा किल्ला राजाकडून बळकावला. नंतर त्यांनी तिथे एक चॅपेल स्थापन केलं.
मिलिटरी बरॅक, कमांडंट क्वार्टर्स उभारल्या व २१ तोफाही आणून ठेवल्या. यातील काही तोफा आजही तिथे अडगळीत टाकलेल्या वस्तूसारख्या पडलेल्या आहेत. तोफा जडशीळ आहेत. अस्सल लोखंडातून त्या घडवल्यात. आता जमिनीमध्ये पुरल्यासारख्या दिसणा-या या तोफांना हलवण्यासाठी प्रचंड बळाची गरज लागत असेल हे कळून येतं.
मात्र या ऐतिहासिक ठेव्याकडे आज कोणाचंही लक्ष नाही. मध्यंतरी गोव्यातील किल्ल्यांवरच्या पुरातन तोफांची देखभाल करण्याची योजना मांडण्यात आली होती. मात्र त्या योजनेचा वारा काबो दी रामा किल्ल्यावरल्या तोफांपर्यंत पोहोचलेला दिसत नाहीये.
तसा हा जलदुर्ग प्रकारातला किल्ला. समुद्राच्या अगदी लगतच वसलेला. काबो दी रामा म्हणजे पोर्तुगीज भाषेत केप ऑफ राम. केप म्हणजे समुद्रात घुसलेलं भूशिर. म्हणजे भगवान रामाचं वास्तव्य असलेलं ठिकाण. पोर्तुगीजांनी ज्या सोंदा राजांकडून हा किल्ला घेतला, ते रामाचे भक्त होते. त्यावेळी किल्ल्यावर रामाची पूजाअर्चना चालत असावी, त्यामुळेच हे नाव त्यांनी दिलं असावं. खूप मागचा संदर्भ शोधायचा तर सीता व राम हे वनवासात गेले असताना या ठिकाणी राहायचे अशी वदंता आहे.
खरं खोटं काहीही असो, किल्ल्याचं स्थापत्य हिंदू शैलीतील आहे हे मात्र खरं. तिथे एक तळं आहे. जे अर्थातच आता खराब अवस्थेत आहे. खरं तर हे तळं छान सुशोभित केलं तर पर्यटकांचं आकर्षण ठरू शकेल. या तलावाला लागून पाय-या आहेत. एकूणच स्थापत्यशैलीवरून ही हिंदू रचना वाटते, कारण अशी वास्तुकला गोव्याच्या जुन्या मंदिरांमध्येही पाहायला मिळते. तलावापाशीच वॉच टॉवर आहे.
एका अर्थाने हा संपूर्ण किल्लाच वॉच टॉवर आहे असं म्हणता येईल. याला कारण त्याचं भौगोलिक स्थान. १८०,००० चौरस मीटरचा हा कॅनाकोना तालुक्यातला आगोंदा बीचजवळ असलेला किल्ला. अरबी समुद्राचा विस्तार व गोव्याची पूर्ण किनारपट्टी यांच्यावर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्यासारखे सर्वोत्तम स्थान दुसरं नाही.
वेळोवेळी हा किल्ला हिंदू राजे, मुस्लीम राजे, पोर्तुगीज व ब्रिटिश राजवटीत अनेकांच्या ताब्यात राहिला. त्यानुसार त्याचा वापर होत गेला. पण त्याचा सर्वात मोठा उपयोग समुद्रातून येणा-या शत्रूवर नजर ठेवणं हाच होता. याचंच उदाहरण प्रवेशद्वारातून आत येताना दिसतं.
आता हे प्रवेशद्वार सिमेंटमध्ये बांधून काढलंय. प्रवेशद्वाराच्या आधी एक चांगली लांब-रुंद चरी खोदलेली आहे. जी आता झुडुपांनी व गवताने बुजलीय. ती थेट समुद्रापर्यंत जाते. पूर्वीच्या काळी इथून पाणी वाहत असे. भरतीच्या वेळी समुद्राचंही पाणी आत येत असेल. या चरीमध्ये मगरी सोडलेल्या होत्या.
जेणेकरून हल्ला करायला येणा-या शत्रूला आधी याच चरी म्हणजे मोठय़ा ओढय़ातून यावं लागायचं व तो त्यात उतरला की मगरी त्याचा फन्ना उडवत. हा प्रकार आपल्या देशातल्या इतरही काही किल्ल्यांवर केलेला आढळतो. शिवाय तिथून आत येण्याची धडपड करणारा शत्रू सैनिक किल्ल्याच्या तटबंदी व बुरुजांवर बसलेल्या सनिकांच्या निशाण्याच्या टप्प्यात येत असे. मग त्याचं काम तमाम होत असे. त्यामुळे दिसायला छोटेखानी वाटला तरी किल्ल्याला सुरक्षा व्यवस्था चांगली लाभली आहे.
पोर्तुगीजांनी १७६३ साली याची पुनर्बाधणी केली. बहुतेक म्हणूनच किल्ला थोडाफार टिकून राहिलाय. कारण सध्या तटबंदीची फक्त एकच िभत सुस्थितीत आहे. िभतीवर ठिकठिकाणी मोठी छिद्रं आहेत. ज्यामध्ये आता पर्यटक नाना गोष्टी भरून ठेवतात. बहुतेक त्यांचा उपयोग टेहळणी व बंदुका-तोफांच्या नळ्या घुसवून ठेवण्यासाठी होत असावा.
किल्ल्यावरच्या खोल्या अजून उत्तम अवस्थेत आहेत. इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ओशनोग्राफीचे संशोधक कधी कधी इथे येऊन राहतात अशी माहिती मिळाली. १९३५ ते १९५५ या काळात किल्ल्याचा तुरुंग म्हणून वापर होत असे. किल्ल्यात प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला चालत गेलं की लगेच सेंट अँटोनिओचं छोटंसं चॅपेल दिसतं.
इथे प्रार्थनेसाठी आजही लोक येतात. तेही चांगल्या अवस्थेत आहे. जीर्णशीर्ण पडलेल्या किल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हे पांढरंशुभ्र चॅपेल खूप उठून दिसतं. या चॅपेलपर्यंत जाण्यासाठी सुंदर दगडी पायवाट बांधलेली आहे. चर्चपाशी सिमेट्री देखील आहे. परंतु एवढं एक चर्च वगळता किल्ल्याची दुरवस्थाच आहे. सर्वत्र तण व झुडुपं माजलेली आहेत. पाय-यांचे दगड किंवा इतरत्र कुठेही पाय ठेवला तरी तो सांभाळूनच ठेवावा लागतो. किल्ल्याची पश्चिम बाजू समुद्राकडे उतरते.
खाली जायला पाय-या देखील आहेत. येथून उत्तर व दक्षिणेचा अप्रतिम नजारा दिसतो. एकंदरीतच किल्ल्यावरून दिसणारा अथांग फेसाळता समुद्र हेच याचे वैशिष्टय़ आहे. दक्षिण गोव्याच्या या समुद्राचे किल्ल्यापाशी असणा-या भूशिरामुळे दोन भाग होतात. इथे तसा एकांतवास आहे. खूप सारे पर्यटक वाट वाकडी करून इथे येत नाहीत. त्यामुळे एखाद्या तटबंदीवर बसून निवांत वेळ घालवता येतो.
किल्ल्यावर एके ठिकाणी निरीक्षण करण्यासाठी दगडांची सपाटी बांधलेली आहे, तिथेही जाऊन बसता येते. किल्ल्याभोवती ट्रेकिंगसाठी ब-याच जागा आहेत. सी-ईगलसारखे पक्षी इथे वास्तव्य करून आहेत. माकडं तर भरपूर आहेत. किल्ल्यावर एक मोठा वटवृक्ष आहे. ही जागा खूप सुंदर आहे फक्त माकडांनी हा वट ताब्यात घेतलेला आहे. म्हणून सांभाळून जावं. याचा विस्तार खूप मोठा आहे त्यामुळे इथे छान घनगर्द सावली मिळते.
काबो दी रामा म्हणजे थोडक्यात रामाच्या या किल्ल्यावर येण्यासाठी मडगाववरून बसेस सुटतात. मडगाववरून ३० कि.मी. अंतर आहे. किंवा खाजगी वाहन असेल तर एनएच ६६वरून फातोर्पा रोडवरून बाली गावाजवळ उजवीकडे वळल्यावर लगेच हा किल्ला दृष्टिक्षेपात येतो. किल्ल्याच्या अगदी जवळ खाण्यापिण्याची व्यवस्था नाही; पण थोडं चालत बाहेर आलं की काही छोटी हॉटेलं दिसतात. पार्किंगसाठीही नीट जागा आहे. त्यामुळे गोव्यातल्या ५० किल्ल्यांपैकी हा एक पाहावा असा सुंदर किल्ला तुम्ही देखील कधीतरी पाहून या.
This article was published in 'Prahaar' http://prahaar.in/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE-2/