वाइन इंडस्ट्री आपल्या राज्यात स्थिरावली त्याला बरीच वर्ष झाली. आता वाइन पर्यटन म्हणजे वाइनरीज्मधली सहल लोकांना भुरळ घालतेय. वाइन पर्यटनाचं इथं बस्तान बसलं तर राज्यात परदेशी पर्यटकांकडून येणारा महसूलदेखील वाढेल. काळाची पावलं व लोकांचा कल पाहून वाइन इंडस्ट्री व राज्य शासनानेदेखील पर्यटन विकासात वाइन पर्यटनाला महत्त्व द्यायला सुरुवात केली आहे. अशीच एक सैर नाशिक जिल्ह्यातील ग्रोव्हर झाम्पा वायनरीची..
द्राक्षं काढणीचा हंगाम आला की नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्यातल्या काही गावातलं चित्र भराभर पालटतं. ऐन थंडीच्या दिवसातही उबेला बसायचं सोडून माणसं लगबगीनं कामाला लागतात. रस्त्यांवर द्राक्षमळ्यांची दिशा दाखवणारे बोर्ड ठोकले जातात. गावांची छान साफसफाई केली जाते. मळ्यातली कामं संपल्यावर माणसं पारावर बसून पाहुण्यांची वाट पाहायला लागतात आणि दर सीझनप्रमाणे पाहुण्यांच्या गाड्या रस्त्यावर धुळीचे फर्राटे सोडत गावात शिरतात. सहसा गावांमध्ये शहरी संस्कृतीला थारा नसतो असं म्हटलं जातं, पण द्राक्षाच्या लेकीचं माहेरघर असणा-या गावांमध्ये जेव्हा शहरी भागातले धनिक-वणिक येऊन ठेपतात, तेव्हा उत्तर-दक्षिण ध्रुव एकत्र आल्यासारखं वाटतं. त्यातूनच अशा प्रकारे दोन विभिन्न विश्वं एकत्र येतात. यातून काहींच्या गरजा पूर्ण होतात तर काहींना रोजगार मिळतो. राज्यातला वाइन उद्योग याचं एक उत्तम उदाहरण ठरला आहे. यातूनच आपल्याकडे काही वर्षापूर्वी वाइन पर्यटनाच्या एका वेगळ्या प्रवाहाची सुरुवात झाली आहे.
द्राक्षाचे मळे, त्यातच कुठेतरी सावली धरून टाकलेल्या शेड्स, भवतालचा खुला निसर्ग, हातात उंच, निमुळते, नाजूक असे काचेचे किणकिणाट करणारे वाइनचे ग्लास आणि त्यात मनमोहक रंगांनी डोळ्यांना व जिभेला सुखावणारी वाइन, असा सगळा माहोल वाइन इंडस्ट्री असणा-या गावांसाठी आता ओळखीचा झालाय. फ्रान्स, इटली, स्पेन, जर्मनी अशा काही देशांच्या पावलावर पाऊल टाकून महाराष्ट्रातील वाइन उद्योगांनीही हा प्रयोग सुरू केला आणि वेगळेपणा म्हणून सुरू केलेल्या या संकल्पनेचे आजकाल मोठे इव्हेंट होऊ लागले आहेत. यातलेच एक वाइन उत्पादक म्हणजे ग्रोव्हर झाम्पा वाइन्स. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीजवळ असणा-या सांजेगावात ग्रोव्हर झाम्पा वाइन्सचं विनयार्ड आहे. वैतरणेच्या पाण्यावर पोसलेले हे द्राक्षाचे मळे ४० एकर जागेवर पसरलेत. वॅले द विन प्रायव्हेट लिमिटेड आणि ग्रोव्हर झाम्पा विनयार्डस् याच्या संयुक्त मालकीची ही वाइन कंपनी आज देशातल्या वाइन उत्पादक कंपन्यांमध्ये दुस-या क्रमांकावर आहे.
ग्रोव्हर झाम्पा वायनरी सुमारे नऊ लाख लिटर वाइनचं उत्पादन दरवर्षी करते. त्यांच्या ब्रँडखाली झोम्पा, वन ट्री हिल रोड, ला रिझव्र्ह, शेने अशा काही व्हाइट, रेड, स्पार्कलिंग, रोझ वगैरे २६ प्रकारच्या वाइन्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत व निर्यातही होतात. देशातली दुसरी उत्तम वाइन कंपनी असणा-या ग्रोव्हर झाम्पानं २००५ मध्ये वॅले द विन कंपनीशी हातमिळवणी केली. त्यांच्या अनेक वाइन्सना देश-विदेशात पुरस्कार मिळाले आहेत. बंगळूरुमध्ये नंदी हिल्सवर त्यांचं ४१० एकरवर पसरलेलं विनयार्ड आहे. वाइन पर्यटन करण्यासाठी सांजेगावात आलेल्यांना द्राक्षांनी भरलेल्या बकेटमध्ये नाचायला मिळतं, त्याची गंमत घ्यायला शहरातून गाड्या भरून माणसं येतात. त्यांच्यासाठी सर्व उत्तम सुविधा इथं उपलब्ध आहेत. दोन दिवस मुक्काम करायचा असल्यास कॅम्पसाइटपण आहे. तसंच एक दिवसाची वीकेंड टूरदेखील आहे. ज्यात द्राक्षाच्या मळ्यातून फिरता येतं, वाइन टेस्टिंग करता येतं व असं बरंच काही करता येतं. शुल्क भरून या टूरमध्ये गेल्यावर द्राक्षाच्या बागायतीची माहिती, वाइन कल्चरची माहिती पुरवली जाते. विविध प्रकारच्या वाइन्सची चव चाखायला मिळते. वाइनचा कारखाना दाखवला जातो, ज्यात वाइन साठवली जाते, मुरवली जाते ती बॅरल रूम, टँक्स पाहायला मिळतात. विविध वाइन्स कोणत्या प्रकारच्या निरनिराळ्या द्राक्षांपासून बनतात, याची मनोरंजक माहिती मिळते. कारखान्यात फिल्टरिंग, बॉटलिंग, पॅकेजिंग इत्यादी प्रक्रिया बघायला मिळतात.
नाशिक जिल्हा भारताची नापा व्हॅली किंवा वाइन कॅपिटल मानला जातो. इगतपुरी पट्ट्यात उत्तम वाइन बनवणा-या कंपन्यांची विनयार्डस् आहेत. या सर्वानीच विनयार्ड पर्यटनाची कल्पना उचलून धरली आहे. लोकांकडून मिळणा-या पैशांपेक्षा त्यांच्याकडून होणा-या तोंडी प्रसिद्धीची या कंपन्यांना जास्त गरज आहे. आपल्याकडची विनयार्ड सहल इतरांपेक्षा वेगळी कशी करता येईल यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असतात. त्यातूनच मग वेगवेगळे वाइन फेस्टिव्हल्स आयोजित केले जातात. ग्रोव्हर झाम्पानेही सिनेतारकांच्या सह्या असलेल्या व देशातील काही उत्कृष्ट चित्रकारांची चित्रं असलेल्या वाइन बॉटल्सचा लिलाव करून यात नावीन्य आणण्याचा प्रयत्न केला. शहरातल्या कोणत्यातरी हॉटेलमध्ये जाऊन वाइन ऑर्डर करण्यापेक्षा प्रत्यक्ष वायनरीज्मध्ये जाऊन आराम करत, आवडीचं संगीत ऐकत वाइन चाखण्याची मजा निराळीच आहे. अर्थात त्यासाठी शहरातून थोडं लांब जावं लागतं, पण वीकेंड सहलींसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
राज्यातील ७२ वायनरीज देशातल्या एकूण वाइनपैकी ८० टक्के उत्पादन करतात. तीस हजार हेक्टर शेती वाइनसाठी लागणा-या द्राक्षांसाठी केली जाते.
एमटीडीसीकडूनही वाइन पर्यटनाला प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न होत आहेत. नुकतंच गेल्या वर्षी गंगापूर धरण परिसरात पर्यटन विकास करण्यासाठी जे ४० कोटी रुपये राज्य शासनानं मंजूर केलेत त्यात वाइन पर्यटनाचाही समावेश आहे. भविष्यात वाइन पर्यटनाला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यास या पर्यटन प्रकारातून मिळणारा महसूलही वाढेल, अशी वाइन उत्पादकांना आशा आहे. एकूणच वाइन इंडस्ट्रीमधल्या स्पर्धेची पताका आता वाइन पर्यटनानं खांद्यावर घेतली आहे. नाशिकशिवाय पुणे, बारामती, सातारा, अकलूजमध्येही वायनरीज् सहली आयोजित केल्या जात आहेत. विविध स्पर्धा, ग्राहकांना वाइनच्या किमतीत सवलत, काही वाइनरीजमध्ये राहण्याची सोय अशा काही आकर्षणांनी वाइन पर्यटनाला चांगले दिवस आणण्याचे प्रयत्न होत आहेत. वाइन पर्यटनानं एकाच वेळी व्यावसायिक व स्थानिकांसाठी रोजगार निर्माण केला आहे. एकट्या नाशिक जिल्ह्यात आणि आसपास ५० वायनरीज् आहेत. अकलुजला फ्रॅटेली वायनरी, बारामतीजवळ युबी ग्रुपची फोर सीझन्स वायनरी, नाशिक जिल्ह्यात शातो देओरी, यॉर्क वायनरी अशा कितीतरी वायनरीज् राज्यात आहेत. यातील ब-याच वायनरीज् वाइन पर्यटन सुरू करण्यासाठी उत्सुक आहेत, काहींनी ते आधीच सुरू केलं आहे. वाइन पर्यटनाचा जम बसायला थोडा वेळ लागतो आहे, कारण कोणतीही कल्पना रुजायला अर्थकारणाची त्यात मोठी भूमिका असते. राज्यातील वाइन इंडस्ट्रीचा बिझनेस पुन्हा जोमाने बहरला, तर वाइन पर्यटनालाही यशाचा रंग मिळू शकतो.
This article is published in www.prahaar.in on 16th February,2014 here is the link to published article http://prahaar.in/collag/184870